Saturday, November 26, 2016

भारत दुर्दैवाने आज तरी अशा स्थितीत आहे!

एक मुक्तीदाता...एक तारणहार...या संकल्पनेने मानवी मनावर पाशवी गारुड केले आहे आणि यातच त्याच्या स्वनिमंत्रित गुलामीची बीजे आहेत. दगडालाही शेंदूर फासत त्याच्यातही एकमात्र ईश्वर शोधणारे कमी नसतात. भारत तर अशांचा मुकूटमणी. अशा समाजात स्वतंत्र विचार, लोकशाहीची मुल्ये ख-या अर्थाने रुजू शकत नाहीत.

ख-या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, ते सुटुच नयेत यासाठी थिल्लर प्रश्नाभोवती राष्ट्रीय अस्मितांना चेतवले जाते तेंव्हा राष्ट्राने आपला आत्मा हरवला आहे असे समजायला हरकत नाही. मुक्तीदाता कोणीही नसतो हे भान नसणे हे स्वत:च गुलामीसाठीच जन्माला आलेल्यांना समजणे शक्यच नसल्याने त्यांचे उन्माद हेच जणुकाही राष्ट्रवादाचे उद्गार बनतात. आपल्या जहरी उद्गारांच्या समर्थनार्थ हवे ते मार्ग वापरणे ओघाने आले.

हे राष्ट्राच्या मुळांचेच वधक असतात. सर्जनाचे कृत्य यांच्याकडून होऊ शकत नाही. विध्वंस हेच त्यांना सृजन वाटावे अशा पद्धतीने यांची मानसिकता बनवण्यात आली असते. संधी मिळताच ती उफाळते. एकामागोमाग एक अशी कृत्ये घडू लागतात. अशा रितीने कि मागचे कृत्य सौम्य वाटावे. बुजगावण्यांनाही शेताचे मालक आहोत असे वाटावे अशी स्थिती यातुनच निर्माण होते. राष्ट्राचे मारकच लोकांना राष्ट्रभक्ती शिकवू लागतात.

नादानांची क्रांती आत्मघातकी असते हे आम्हाला विसरून चालणार नाही.

भारत दुर्दैवाने आज तरी अशा स्थितीत आहे.  

2 comments:

  1. मस्त अगदी योग्य. असे मुक्तीदाते प्रत्येक धर्म मार्गात आहेत. व ते सातत्याने लोकांच्या मनावर बिंबवून मेमरीत ठोकले जातात. बवाल करुन आपले महत्व वाढवणारे तुम्हाला सगळीकडे दिसतील. धर्म अर्थ काम व मोक्ष मग श्रध्दा असो वा ज्ञान प्रत्येक विभागात साचेबध्द प्रस्थापित आहेत. त्यांना बदल तर नकोच आहे. असला तर सोयीचा.धर्मग्रंथ असो वा महापुरुषांचे बाबतीत तर बाबा वाक्यंम प्रमाण असेच आहे. का शोधतात रोजच्या जीवनमरणाच्या प्रश्नांची कारणं त्या जुनाट ग्रंथात. त्याच्यात असे म्हटले आहे किंवा नाही यावर काथ्याकुट चालतोय. प्रश्न सोडविण्याचा विवेकाने स्वत:च्या अनुभवाच्या ताकदीने इतरांचया सहकार्याने चिंतनाने का नाही. संजय सरांचा लेख अत्यंत वास्तववादी असाच झाला आहे. जुने कपडे जसे झिजलेले निस्तेज असतांत. तसेच ग्रंथांतील अनेक कालबाहय गोषटी ओळखून परिवर्तन स्वत:मध्ये तसेच इतरांच्या बाबतीत समजावे. समतेचे पोकळ ढोलच फार वाजविले जातात.विषमता मात्र छुप्या पध्दतीने जात पात सांभाळूनच पाळली जाते. समत्वाची मागणी करणाऱ्यांना कळतच नाही आपणही विषमता पाळतो. ती पण संरक्षणाची स्वार्थाची भिती दाखवून. आणि हे प्रत्येक व्यक्तीपरत्वे पिढयांनपिढया संरक्षिले पाळले गेले आहे. मागे एका लेखांत संजयसरांना एक महत्वाचे सांगितले की,गुन्हेगार शेवटी देशभक्तीच्याही मागे लपतो. ते मात्र सामान्य नागरिकाला ओळखता आले पाहिजे. मग तो भारत असो वा पाक किंवा इतर राष्ट्रे.

    ReplyDelete
  2. काय हे संजय सर ?
    किती लपून छापून वार करत आहात ?
    तुम्ही नरेंद्र मोदी सरकारवर किंवा आरेसेंस वर वार करत आहात हे स्पष्ट आहे . मग घाबरायचे कशाला ? समोरासमोर स्पष्ट वाद घालावा त्यात पुरुषार्थ आहे .
    आजच्या राज्यातील नगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी एक नवा आशेचा किरण दिसत आहे ,त्याचा आनंद व्हायला पाहिजे . नरेंद्र मोदी नावाच्या वादळाने मागच्या लोकसभेत सर्वांची टोपी उडवली -आज त्यांची ( मोदी सरकारची ) मनमानी चालली आहे असे सर्वाना वाटत असेल . पण आधीचे काका पुतण्याचे भ्रष्टाचार आठवले तर अजूनही आपल्या जनतेच्या सहनशीलतेची ,लाचारीची ,आणि षंढत्वाची लाज वाटेल अशी ती कृत्ये होती हे कबूलच केले पाहिजे आपण इतिहासावर जीव तोडून लिहिता हे स्वागतार्ह आहेच , पण त्यातून पुढे जाऊन वैदिक वर्गावर घाव घालणे आतातरी सोडा !त्यातून काय साधणार आहे ?
    आजचे तंत्रशास्त्र शिकून आणि काळाची गरज ओळखून आपापल्या समाजाला आरक्षण मुक्त जीवनाचा सल्ला देणे हेच योग्य आहे . अशा कुबड्यांसाठी किती आंदोलने करायची ?अशा आरक्षणातून प्रत्येक जातीतून मलईवर्ग तयार होत जाऊन तो वर्ग आपल्याच जातीतल्या इतर वर्गापासून फटकून वागतो हे मी स्वतः सखेद अनुभवले आहे . आरक्षण हा लिमिटेड काळासाठी आवश्यक प्रकार होता , वंद्य डॉ आंबेडकर यांचेही विचार असेच होते.

    मराठा आरक्षणाचे कार्ड चालवून काहीही उपयोग झाला नाही !ओवेसींना कदाचित आशा वाटेल पण आरक्षणाची पुंगी ही गाजराचीच ठरणार हे ओवेसींनी दूरदर्शीपणे वेळीच ओळखले पाहिजे.ओवेसींची वक्तव्ये अंतर्मुख करणारी नक्कीच असतात,पण त्यांचा हैद्राबादी इतिहास स्वच्छ नाही हेच खरे !

    आज नोटाबंदीचा वणवा पेटून त्यात सरकारची आहुती पडेल , हा आडाखा साफ चुकला आणि काका पुतण्या निराश झाले , काँग्रेसची तर खिल्ली उडाली , भाजप मधील अनेक नाकर्त्या लोकांचेही धाबे दणाणले पंकजाताई सारख्या बोलबच्चन लोकांचे हसे झाले- हेही एक बरेच झाले. भाजप मधील मुंडे गट संपणे आवश्यक होते - ते झाले . - ठरवून झाले असेल !
    संजय सर आपण मूळ प्रश्नाला हात घालून रोखठोक लिहावे ही कळकळीची विनंती - त्यामुळे आपली कळकळ , जास्त प्रखरतेने लोकांसमोर येईल - आपल्या विचारात खोटेपणा नक्कीच नाही हे सत्य आहे . फक्त आपण नकळत कोणाच्या हाताचे बाहुले तर बनणार नाही ना हि भीती वाटते म्हणून हा लेखन प्रपंच ! असो -
    आरक्षण , मराठा मोर्चे यातून काय साधले ते अंतर्मुख होऊन अभ्यासले पाहिजे. भाजप हा फारच बेरकी आहार हे गाव पातळीवर सिद्ध होते आहे . त्यांची पकड सहजासहजी ढिली होणार नाही .
    आपल्या नव्या पक्षाला बरेच काही करायचे आहे . त्यासाठी शुभेच्छा !
    आपले मित्रमंडळ काहीच प्रतिसाद देत नाहीत आणि तुम्हालाही वेळ होत नाही - आमचे दुर्भाग्य !

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...