डॉ.. आनंद यादव कालवश झालेत. त्यांच्या साहित्य कारकीर्दीबाबत भरपूर लिहिले गेले आहे. आनंद यादवांनी आपल्या साहित्यातून व स्वत:च्या जगण्यातून, विशेषत: अखेरच्या "आनंदपर्वात" अनेक प्रश्न उभे करून ठेवले व ते नेहमीच तमाम साहित्यिक व साहित्यसंस्कृतीच्या धुरीणांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असतील. डा. यादव हे गेल्या पिढीच्या साहित्यसंस्कृतीचे एक खंदे अध्वर्यू होते. त्यांची विचारधारा कोणती अथवा ते नेमक्या कोणाच्या गोटातले यावर मराठीत अनेकदा उघड तर कधी खाजगी चर्चा झाली आहे. विचारधाराच नाही असा माणूस तर असुच शकत नाही, त्यामुळे त्यांची अमुकच विचारधारा का हा प्रश्नही अप्रस्तूत ठरेल. त्यामुळे या लेखात ती चिकित्सा अभिप्रेत नाही. थोर थोर समीक्षकांनी विविधांगांनी त्यांच्या साहित्याची चिकीत्सा केली असल्याने त्यात नव्याने मी काही भर घालू शकेल असेही नाही. डॉ.. यादवांनी उपस्थित करून ठेवलेले प्रश्न मात्र आमचे साहित्यविश्व कसे सोडवणार हा खरा प्रश्न आहे व त्यावरच मी येथे भर देणार आहे.
माझा आणि डॉ. यादवांचा प्रत्यक्ष परिचय़ कधीही नव्हता. जी काही भेट झाली ती त्यांच्या साहित्यातून. अर्थात तेही मी फारसे वाचलेले नाही. माझा त्यांच्याशी अप्रत्यक्ष संबंध समर्थक व विरोधक अशा दोन्ही नात्यांनी येवू लागला तो "संतसूर्य तुकाराम" च्या निमित्ताने २००८ साली. मी यावरील काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेली परिक्षणेही वाचली होती. समीक्षण करणा-यांना या कादंबरीत काहीही अश्लाघ्य आहे असे वाटले नव्हते. पण साहित्यसंमेलनाचे पडघम वाजू लागले आणि आनंद यादव निवडूनही आले तसे एकाएकी देहुकरांना व काही फदकरी महंतांना जाग आली. त्यांनी अक्षरश: सांस्कृतिक दहशतवाद माजवला. एवढे वादळ महाराष्ट्रातील साहित्यविश्वात घडत असुनही एकही साहित्यिक या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या का होईना, पण आनंद यादवांच्या मागे उभे राहिला नाही. अपवाद फक्त माझा होता. मी माझ्या शैलीत यावर वारकरी तालिबानी झाले आहेत अशी जाहीर प्रतिक्रिया दिली होती. एक महंत तर माझ्या घरावर दगड फेकायला तयारही झाले होते. पण त्यांना त्यासाठी आर्थिक प्रायोजक न भेटल्याने तो बेत बारगळला ही बाब वेगळी. पण ह.भ.प. देगलुरकर महाराजांनी एक ‘फतवा’ जारी केला आणि त्यात म्हटलं, ‘संतांबद्दल श्रद्धायुक्त अंतःकरणानेच लिहिलं पाहिजे. अन्यथा लिहू नये.’ यावरही मी लेखकांच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला.
पण साहित्यविश्व मात्र कानठळ्या बसतील एवढे शांत राहिले. डॉ. यादवांनी कादंबरी मागे घेतली. एवढंच नव्हे तर संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला. अध्यक्षाशिवाय साहित्यसंमेलन भरवायची नामुष्की महाराष्ट्रावर ओढवली.
यानंतर खाजगी खटलाही झाला. यादव व त्यांचे प्रकाशक "पुराव्यांसह" लिहिलेल्या तुकाराम व ज्ञानेश्वर महाराजांवरील कादंब-यांबाबत एकही पुरावा देऊ शकले नाहीत. २०१४ साली निकाल लागला. दंडावर भागले. तेंव्हाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यावेळीसही मी आनंद यादवांची पाठराखन करत अभिव्यक्तीला घटनाबाह्य बंधने नकोत असे सांगितले. कवी श्रीधर तिळवे यावेळीस माझ्यासोबत होते. त्यांचा अपवाद वगळला तर सारी सुमसाम होती. आनंद यादवांनी तेंव्हाही व आता गेल्यावर मराठी साहित्यिकांच्या मुखंडपणावर जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर विचार करायला हवा. यादव स्वत: कमजोर निघाले हा भाग वेगळा. त्यांच्या या दोन्ही कादंब-यांच्या दर्जाबाबत मी शेलक्या शब्दात टीका केली हाही भाग आता वेगळा.
पण साहित्यिकाला मन:पूत लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे कि नाही? लेखकांनी आपल्या स्वातंत्र्याची जपणूक करण्यासाठी ठामपणे उभे रहावे कि नाही? पुरस्कारवापसी करत प्रसिद्धीसाठी हपापलेल्यांना तेंव्हाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच हा संकोच आहे असे वाटून पुरस्कारवापसी सोडा...साधा निषेधही करावा असे का वाटले नाही? ते कोनाला घाबरले? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा हा सिलेक्टिव्ह असतो काय? कोण कोणत्या विचारांशी बांधीलकी ठेवतो यावरून त्याच्या पाठीशी उभे रहावे की नाही असा विचार वैचारिक व्यभिचार होत नाही काय? की यामागे त्यांची स्वत:ची काही स्वार्थी गणिते आहेत? हे व असे अनेक प्रश्न डॉ. यादवांनी उभे करून ठेवले आहेत व त्याची सोडवणूक करावीच लागणार आहे. अन्यथा मराठी साहित्य हे दिशाहीण व कणाहीण कंपुबाजांच्या दावणीला बांधले गेले आहे व त्यामुळेच मराठीत साहित्याचा मूक्त उद्गार उठण्याची व वैश्विक होण्याची क्षमता गारद झाली आहे असे म्हणावे लागेल.
यादवांची अथवा कोणाचीही कृती चांगली कि वाईट यावर स्तुती-निंदा करण्याचाही अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यात अंतर्भूत आहे. अभिव्यक्ती बाबत उठसुठ बोलणा-या साहित्यिकांना हे पाठ आहे. पण स्वत:चीही अभिव्यक्ती अभिप्राय, कोणाला दुखवले तर जात नाहीहे ना वगैरे विचार करून जे लिहित आले आहेत, लिखित भाषण काय होते आणि बोलतांना आपण काय बोललो याशीही इमान न राखणारे, जे बोललो त्यावर ठाम न राहता लिखित भाषणाकडे बोट दाखवत सुटका करून घेऊ पाहणारे हे जे मराठी साहित्यिक आहेत (अनेक विचारवंतही यात आले) त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलण्याचा कितपत अधिकार आहे हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात जातीय द्वेषाचे जहर मनात घेऊन साहित्यिकांची गळचेपी करण्याचे प्रकार काही जातीय संघटनांनीही केले आहेत. त्याही विरुद्ध साधे बोलायचीही हिंमत कोणी दाखवली नव्हती. मला अभिमान आहे कि तसा काही संबंध नसतांना मी एकहाती पुरंदरेंचाही लढा लढलो. धमक्या-शिव्या सहन केल्या. झुंडीला सामोरा जायला निघालो. तेंव्हा माझे, तसे साहित्यिक नसलेले, प्रा. हरी नरके, घनशाम पाटील, सचीन परब वगैरे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच मित्र माझ्या बाजूने ठाम राहिले. पण एकही लेखकराव काही बाहेर आला नाही. ब्रही काढला नाही.
हे अशासाठी सांगावे लागतेय कि आनंद यादवांचीही, किमान अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी, कड घ्यायला मराठी साहित्यिक आले नाहीत कारण ते मुलत: भेकड व स्वार्थी होते. यादवांना आपली कादंबरी मागे घ्यावी लागली, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला तो या मुखंडांमुळे याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी. अध्यक्ष नसतील तर संमेलनावर सर्व साहित्यिकांनी बहिष्कार घालावा असे आवाहन मी पत्रकार परिषद घेऊन केले होते. माझ्या आवाहनाचा परिणाम व्हावा असा मी कोणी मोठा नाही, त्यांनी संमेलनाला हजेरी लावलीच, पण त्यांची मुळात नैतिकता काय आहे आहे हे यामुळे लक्षात आले.
मग प्रश्न उरतो तो हा कि यांची साहित्याशी बांधीलकी काय? नसेल तर कशाला कागद वाया घालवतात?
डॉ. आनंद यादव आज आपल्यात नाहीत. पण ते असे प्रश्न सोडून गेलेत की त्याची उत्तरे शोधावीच लागतील साहित्यिकांना आत्मचिंतन करावेच लागेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या महत्तेला नव्याने समजावून घ्यावे लागेल व मुख्य म्हणजे तसे वागावे लागेल. भुमिका नसणारे साहित्यिक हे साहित्यिक असुच शकत नाहीत हेही लक्षात घ्यावे लागेल. भित्रे पण स्वार्थी लेखक हे साहित्याचे मारक असतात. त्यांच्याकडून वैश्विक जीवनदर्शनाची सुतराम शक्यता नाही हे समजावून घ्यावे लागेल. अशा लेच्यापेच्या साहित्यिकांच्या जीवावर माय मराठीचे कसलेही भले होऊ शकत नाही. आनंद यादवांसारख्या लेखकाला अखेरच्या काळात लेखन संन्यास घ्यावा लागावा एवढे औदासिन्य/नैराश्य यावे याबद्दल खेद वाटतो.
त्यांच्यामुळे उपस्थित झालेल्या प्रश्नांवर उत्तरे शोधली जावीत ही अपेक्षा मी त्यांना आदरांजली वाहतांना करतो.
-संजय सोनवणी
(लोकशाही वार्ता (संवाद) मधे प्रकाशित झालेला लेख.)
http://epaper.lokshahivarta.in/epapermain.aspx?queryed=23#
No comments:
Post a Comment