Saturday, December 31, 2016

आपल्याला नेमके कोठे जायचे आहे?


Image result for futuristic


भविष्याचे कुतुहल नाही असा माणुस क्वचित असेल. भविष्यासाठी तरतूदीही माणुस करतो ते संभाव्य व अनपेक्षीत अनिष्टांचा सामना करण्यासाठी. सरकारची अथवा व्यक्तीची अंदाजपत्रकेही एक प्रकारे भविष्याचीच आर्थिक वाटचाल ठरवत असतात. अंदाजपत्रके अथवा बजेट अनेकदा कोलमडतातही. कधी कधी ती अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वीही होतात. अंदाजपत्रक म्हणजे भविष्यातील एका कालखंडात नेमके काय व कसे साध्य करायचे याचा आराखडा व त्यासाठी केल्या गेलेल्या तरतुदी. बजेटचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर आढावा घेण्याचीही पद्धत असतेच. आपल्याला काय साध्य करायचे होते आणि त्यातील किती खरोखर साध्य झाले, जे झाले नाही ते का झाले नाही याचे विश्लेषन यात अपेक्षित असते व त्यानुसार पुढचा मार्ग शोधला जातो. मानवी समाजानेही अशे उद्दिष्टे समोर ठेवत ती कशी सध्य करायची यावर उहापोह केला पाहिजे.

हा मार्ग ब-यापैकी वास्तव असतो. म्हणजे त्याला आजच्या स्थितीचा एक बेस असतो.  हा बेस ठरवण्यासाठी वापरले जाणारे मानदंड नेहमी बरोबरच असतात असे नाही. आजची स्थिती ठरवण्याचे नेमके मानदंड काय असावेत यावर विद्वान नेहमीच चर्चा करत असतात, प्रसंगी वादही घालत असतात. सुधारणांना नेहमीच वाव असतो हेही खरे. अनेकदा अनपेक्षित आरिष्टे अशा पद्धतीने अवतरतात कि अंदाजपत्रकांना काही अर्थ राहत नाही. ही आरिष्टे निसर्गनिमित्त असतील, मानवनिर्मित असतील किंवा अंमलबजावणीतील भोंगळपणामुळेही असतील. अचानक होणारी युद्धे, दंगली, कोणा एका दुस-याच राष्ट्राची अर्थव्यवस्था एकाएकी कोसळणे यामुळेही व्यक्ती व सरकारांची अंदाजपत्रके कोसळू शकतात. मानवी समाजाचीही उद्दिष्टे साध्य होतीलच असे नाही.

पण याचा अर्थ असा नसतो कि अंदाज बांधू नयेत. भविष्याचा वेध घेऊ नये. समग्र मानव जातीला अधिकाधिक स्वतंत्र, अर्थपुर्ण, निर्वैर आणि समाधानी जगण्याकडे जायचे असते. पण अधांतरी व ध्येय नसलेली स्वप्ने पाहून माणुस कोठेही कसा पोहोचेल? त्यासाठी वास्तवाचा पुरेसा आधार लागतोच. मानवजात आज कोठे आहे हे नेमके समजल्याखेरीज पुढची दिशा ठरवता येणे अशक्यच आहे हेही आपल्याला समजावून घ्यावे लागेल.

येथे भविष्य म्हणजे एखाद्या ज्योतिषाने कुंडली मांडुन ग्रह-तारे एखाद्याच्या वा राष्ट्राच्या जीवनावर परिणाम करतील असले पोकळ भविष्य आपल्याला निश्चितच अभिप्रेत नाही. आपल्याला येथे येणा-या पुढच्या पंचविसेक वर्षात मनुष्य प्रत्येक क्षेत्रात नेमका कोठे असेल याची संभाव्य दिशा तपासणे हा आपला हेतू तर आहेच पण ध्येयांमद्ध्ये आणखी काही भर घालता येऊ शकते काय हे पाहणेही आपला हेतू असणार आहे. मनुष्य समाजाने भुतकाळात अनेक ध्येये समोर ठेवली होतीच. मग ते तत्वज्ञ असतील, राजकीय धुरीण असतील अथवा शास्त्रज्ञ असतील. ती सर्व ध्येये अजुनही पुर्ण झाली असे म्हणता येणार नाही. अनेक तर आज विस्मरणात गेलेली आहेत. काही ध्येये अशीही होती कि अशी ध्येये कधीकाळी माणसाने ठरवली असतील हे आज खरे सुद्धा वाटणार नाही.

आज आपण एकविसाव्या शतकात आलो आहोत. अनेक क्षेत्रांत माणसाने अद्भुत अशी प्रगती केलेली आहे. असे असले तरी माणसासमोर हजारो वर्षांपुर्वी जे प्रश्न होते ते आजही नीटसे सुटले आहेत असे नाही. चुका सुधारत नव्या दुरुस्त्या तो अवश्य करत आला आहे, पण त्यांनी प्रश्न सोडवले आहेत कि जटील केले आहेत यावर ठामपणे काही सांगता येणे अशक्य आहे. सामाजिक व म्हणुनच राजकीय प्रश्न तर अधिकच जटिल बनलेले आपल्याला दिसतात. उदा. राज्यव्यवस्था नेमकी कशी असावी, अर्थव्यवस्थेचे नेमके प्रारूप कसे असावे, धर्माचे जीवनातील नेमके स्थान व आवश्यकता काय, राष्ट्रवादाची आवश्यकता आहे कि नाही, दहशतवादी प्रेरणा कोठून येतात, युद्धविहिन जागतिक व्यवस्था येऊ शकते काय, जातीसंस्थेचे अखेर काय होणार, गरीबीचे निर्मुलन शक्य आहे कि अशक्य, मानवी आरोग्याचे नेमके पुढे काय होणार, भविष्यात विविध क्षेत्रात कोणते नवे शोध लागून मानवी जीवन आमुलाग्र बदलू शकतील, कला माध्यमांत अजुन कोणती नवी प्रारुपे येतील वगैरे असंख्य प्रश्न आज आपल्यासमोर आहेतच. आपण त्यावर तात्पुरती उत्तरेही शोधतो. ही उत्तरे कधी कधी अंगलट कशी येऊ शकतात हे आपण काळा पैसा नष्ट करण्यासाठी योजलेल्या नोटबंदीमुळे कसा हाहा:कार उडाला यातून पाहू शकतो. जगभर असे घडत असते. अर्थव्यवस्था कधी वर तर कधी खाली असे हेलकावे घेत असते. असेच समग्र जीवनाला व्यापणा-या अनेकविध बाबींत असे होत असते.

 पण माणसाचा जीवनप्रवाह थांबत मात्र नाही. भविष्याचा वेध घेतलेला असो वा नसो, तो बदलत्या स्थितीशी जुळवून घेण्यात वाकबगार आहे हे समग्र इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल. त्यातल्या त्यात कोणत्याही स्थितीत आनंद उपभोगण्यासाठी सवड काढण्याची त्याची प्रवृत्ती चिरंतन आहे. पण दु:खांची स्थिती किमान करत न्यायचा प्रयत्न करणे हेही माणसाचे उत्तरदायित्व असते. त्यासाठीही तो झटतच असतो. वाद घालत असतो. हिरीरीने आपली मते मांडत असतो. आपलेच मत अंतिम कसे आहे हे सांगण्याचा प्रयत्न जसा धर्ममार्तंड करत आले आहेत तसाच प्रयत्न विद्वान, तत्वज्ञान्यांनीही केला आहेच. या मतामतांच्या गलबल्यात अखेर कोणते विचार तगतील हे आपण मानवी जीवनप्रवाहाच्या आलेखावरून तपासू शकतो व भविष्याचा वेध घेऊ शकतो.

आजचा मानवी समाज वाईट स्थितीत आहे असे निराशावादी मत मी व्यक्त करणार नाही. पण तो ध्येये ठरवत स्वप्रामाणिक रहात त्यासाठी प्रयत्न करत आला असता तर आजचे स्थिती अधिक चांगली व वेगळी असती हेही नमूद केले पाहिजे. आजच्या आहे त्या स्थितीतून आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा आहे व आपल्या मनोवृत्तींमध्ये बदल घडवत त्यातल्या त्यात चांगले ध्येय जे असेल त्या दिशेने कसे प्रामाणिक प्रयत्न आपण करू शकू हेही पहायचे आहे.

वर्तमान युगात भारतीयांचा ज्ञान-विज्ञान-तत्वज्ञानातील एकुणातील वाटा नगण्य आहे. तो का आणि तो वाढवण्यासाठी आपण काय करू शकू हेही आपल्याला पहावे लागणार आहे. एकार्थाने पुढील पंचवीस वर्षात जीही काही प्रगती शक्य आहे त्यात आमचा वाटा कसा वाढेल यासाठी प्रयत्न करण्याची आकांक्षा निर्माण व्हावी हाही या लेखमालिकेचा हेतू आहे. वाचकांनी अवश्य प्रतिक्रिया द्याव्यात, चर्चा करावी, विचारांत भर घालावी ही अपेक्षा आहे.

-संजय सोनवणी

(प्रसिद्धी दै. संचार, १.१.२०१७)

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...