Thursday, January 5, 2017

सर्वैक्याच्या दिशेने...

(पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष संजय सोनवणी यांच्या अध्यक्षीय भाषणाचा सारांश.........)
मित्रहो,
सोलापुरात सुरू होणा-या पहिल्याच आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण आज एकत्र आलेलो आहोत. आदिम काळापासून मुक राहिलेल्या या समाजाचा साहित्यिक उद्गार प्रथमच नागरी संस्कृतीच्या प्रांगणात उमटत आहे. साहित्य धनगरांना नवीनं नाही. किंबहुना साहित्य-कला संस्कृतीचा पायाच धनगर-गवळी आदि पशुपालक समाजाने घातला आहे. मराठीतील, (महाराष्ट्री प्राकृतातील) पहिले काव्य संकलन केले ते हाल सातवाहनं या राजानेच. सातवाहन घराणे धनगर होते. हालाचे हे काव्य संकलन "गाथा सप्तशती" या नावाने जगविख्यात आहे. या संकलनात इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील जनजीवनाची, मानवी भावभावनांची जेवढी वेधक काव्यमय वर्णने मिळतात तेवढी नंतरच्या साहित्यातुनही मिळत नाहीत. हाल सातवाहन स्वत: कवि, त्याच्या स्वत:च्या गाथाही या संकलनात आहेत. कविकुलगुरु म्हणवल्या गेलेल्या कालिदासास कोण विसरेल ? तोही धनगर समाजातुनच आलेला कवी. भटक्या जीवनातून जे धनगर व गोपालक नागरी संस्कृतीत आले ते राजे, कवी तसेच विद्वान म्हणून आपल्याला प्रतिष्ठा मिळवतांना दिसतात. चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन, हरीहर-बुक्क हे भारताची संस्कृती प्रतिष्ठित करणारे सम्राट याच जमातीतून आलेले. रोज खुल्या आभाळाखाली, गिरी-कंदरांत मेंढरे अथवा अन्य पशुंसोबत भटकंती असल्याने जगण्याच्या अविरत झुंजीतून पराक्रमही धनगरांच्या रक्तात भिनलेला आहे. त्याचे दर्शन वेळोवेळी इतिहासात झालेले आहे. अलीकडचेच उदाहरण म्हणजे थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, तुकोजी होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्याबाई होळकर, तुळसाबाई होळकर व आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भिमाबाई होळकर. यादी खूप मोठी आहे. एवढे सम्राट, महाकवी व समाजधुरिण देणारा बहुसंख्य समाज मात्र आपल्या आदिम काळापासून चालत आलेल्या पेशातच रमल्यामुळे तो आज नागरी संस्कृतीपासून दुरच राहिल्याचे दिसत आहे. तो आपली निसर्गाची ओढच जपतच राहिला आहे. त्याचवेळी नागरी शैलीचे अंधानुकरण न करता आपल्या कला संस्कृतीचीही जपणुक करत राहिला आहे.
धनगरांची जीवनशैली जशी स्वतंत्र आहे, तशीच त्यांची साहित्यशैलेही. ग. दि. माडगुळकर म्हणाले होते, "धनगरांची कला ही अनगड हि-यासारखी आहे. त्याला पैलू नसतील पण ते खरे हिरे आहेत. ते उकिरंड्यावर पडण्यासाठी नाहीत, मयूर सिंहासनावर चमकण्यासाठी आहेत. धनगर अडाणी असेल पण त्याला अक्षरातील नादब्रह्माची ओळख आहे. म्हणून हे काव्य माळरानावर जसे आहे, तसेच ते सर्वत्र गेले पाहिजे. महाराष्ट्र शारदेच्या व्यासपीठावर याला मानाचे पान मिळायला पाहिजे." धनगरी ओव्या, लोककथा सुंबरानातून मांडल्या जाताहेत गेली हजारो वर्ष. मौखिक परंपरेन या ओव्या-कथा पुढच्या पिढीत प्रवाहित होत राहिल्या आहेत. नवीन पिढ्या त्यात आपल्या कल्पनांचे भर घालत राहिल्या आहेत. त्या लिखित स्वरुपात न आल्याने भाषेचे विविध टप्पे आपल्याला माहित होत नाहीत. पण प्रवाहीपणाच भाषेला जीवंत ठेवतो. यात त्यांच्या धर्मकल्पना, दैवतकथा विपुलतेने येतात. प्रदेशनिहाय धनगरी बोलीही वेगळ्या. अलीकडे या समृद्ध साहित्याला ग्रंथबद्ध करायचे काम होत आहे. पण ते पुरेसं नाही. गुंथर सोंथायमर, सरोजिनी बाबर ही या प्रयत्नातील खूप मोठी नांवे.
धनगरांची नृत्यशैलीही आगळी वेगळी. त्याला गजानृत्य म्हणतात. थोडक्यात डोगर-द-यांत, माळरानांवर राहुन त्यांनी स्वत:च्या वेगळ्या धर्मश्रद्धा, कर्मकांडे, गीतकाव्य व नृत्यशैल्यांना जपले आहे. आद्य कवी हाल सातवाहनही ग्रामीण जीवनातील मुक्ततेला आपल्या काव्यात वाव देतो. किंबहुना स्वातंत्र्य हा धनगरांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे जो त्यांच्या काव्यातून उमटत आला आहे. मित्रांनो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला जे मुख्य कारण होणार आहे ते म्हणजे हालाची गाथा सप्तशती आणि सातवाहनांचे प्राकृतातील शिलालेख. मराठी भाषेचा उदयकालच त्यांच्यापासून सुरु होतो हे आपण येथे लक्षात घ्यायला पाहिजे.
धनगरांचा इतिहास मानवी संस्कृती जेवढी प्राचीन आहे तेवढाच प्राचीन आहे. धनगर-गोपाळांतीलच काहींनी शेतीचा शोध लावला. अनेक धनगर-गोपाळ शेतीकडे वळाले. स्थिर झाले. त्यातुनच अनेक व्यवसाय विकसित झाले. भारतात व्यवसायांच्या पुढे जाती बनल्या. नागरी जीवन सुरु झाले ते सिंधू संस्कृतीपासूनच. पशुपती शिव हा सर्वांचाच त्यामुळेच आराध्य राहिला. धनगरांच्या विठोबा, खंडोबा, बिरोबा, म्हस्कोबा, धुळोबा, जोतिबा इत्यादि अनेक देवता शिवाशीच अभिन्न नाते सांगतात ते यामुळेच. पण मोठा समाज नागरी जीवनाकडे वळाला व पुढे वेगवेगळ्या जातीनामांनी ओळखला जाऊ लागला तरी हे लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे सर्वांचेच पुरातन पुर्वज पशुपालकच होते. ज्यांनी आपल्या आदिम व्यवसायाचा त्याग केला नाही, आजवर पशुपालकाचेच जीवन जगत आले, त्यांच्याबाबत सर्वांनी कृतज्ञ रहायला हवे.
कृतज्ञ रहा म्हणने ठीक आहे, पण तसे चित्र नाही. नागरी समाजाने धनगर समाजावर नको तेवढे अतिक्रमण केले. वैदिकीकरणाच्या प्रक्रियेत अनेक देवतांचे बाह्य स्वरुप बदलता आले नसले तरी कृत्रीम कथा निर्माण करून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मौर्य, सातवाहन हे धनगरांतून आलेले सम्राट, पण त्यांच्या जन्माबाबत एवढ्या बनावट कथा रचल्या कि सत्य हाती लागुच नये. थोडक्यात ते धनगर होते हे अमान्य करण्यासाठीच बनावट कथा बनवल्या गेल्या. अन्यथा एवढ्या परस्परविरोधी कथा बनवण्याचे कारण काय ? चंद्रगुप्ताच्याच जन्माविषयी किमान सोळा कथा आपल्याला सापडतात. पण त्याच्या गुरुबाबत तो कोण होता, कोणत्या जातीचा होता हे मात्र ठाम माहित असते. असे कसे हा प्रश्न इतिहासकारांनीही विचारला नाही, कारण त्यांना उत्तर द्यायचे नव्हते. सातवाहनांचेही असेच झाले. अलीकडच्या काळातील मल्हारराव, यशवंतराव यांचे पराक्रम व त्यांचे मुळ लपवता येणे तर शक्य नाही म्हणून कल्पोपकल्पित कथा निर्माण करून बदनाम केले गेले. भिमाबाई होळकरांनी १८१७ पासून तब्बल दीड वर्ष इंग्रजांशी स्वातंत्र्याचा अथक लढा दिला, पुढे त्या फितुरीने कैद झाल्या व मरेपर्यंत तब्बल ३६ वर्ष आयुष्य कैदेत घालवले. त्यानंतर १८५७ घडले. एवढे असुनही भारतीय इतिहासाने त्यांची आद्य महिला क्रांतीकारक म्हणून दखल घेतली नाही. दखल घेतली ती पाश्चात्य इतिहासकारांनी. यशवंतरावांच्या पत्नी महाराणी तुळसाबाईंनी यशवंतरावांच्या निधनानंतर १८११ ते १८१७ पर्यंत इंग्रजांनी घोर प्रयत्न करुनही इंदौर संस्थानात पायसुद्धा ठेवू दिला नाही. त्या तर मराठी जनतेला माहितही नाहीत, कारण त्यांच्यावर लिहिलेच गेले नाही. आणि नागरी शैलीत इतिहास मांडायची, कथा-कादंब-या लिहिण्याची रीत धनगरांना माहित नाही. त्यामुळे प्रतिवाद करायला अथवा पुराव्यानिशी सत्य मांडायला येणार कोण? यामुळे दुर्लक्षाचे वातावरण कायम राहिले.
तसाही भारतीय समाज इतिहास लेखन व जतनाबाबत उदासीन. शास्त्रशुद्ध इतिहास लिखानाची सुरुवात आपल्याकडे इंग्रजकाळानंतर लडखडत सुरु झाली. तत्कालीन वरिष्ठ नागरी समाजांनी आपापले इतिहास शोधायला सुरुवात केली. प्रसंगी त्यातही अनेकदा खोटेपणा, स्वत:ला उंचावण्यासाठी इतरांना दोष देणे अशा लबाड्या केल्या. मग जे नागरी समाजाबाहेरचे घटक होते त्यांना मुळात असले काही होतेय, याची जाणच नसल्याने लबाड्या काही काळ पचुनही गेल्या. अशा स्थितीत त्यांच्या इतिहासाकडे कोण लक्ष देणार ? कोण त्यांना त्यांचे श्रेय देण्याचा उदारपणा दाखवणार ? आपल सामाजिक वास्तव आपल्याला समजावून घ्यावे लागते. मुक, बुजरा व अशिक्षित धनगर समाज आपला इतिहास जगण्याच्या लढाईत विसरुन गेला होता. असे बव्हंशी बहुजनीय जातींबाबत झाले. एवढे कि आपल्याला इतिहासच नाही असे त्याला वाटु लागले. पण ते वास्तव नाही. एखाद्या खेड्यातील थोरल्या भावाने काबाडकष्ट करत लहान्याला शहरात शिकायला पाठवावे, लहान्याने स्वत:ला प्रगत समजत थोरल्याला मात्र नंतर टाळत रहावे...किंबहुना विसरुनच जावे असा प्रकार घडलेला आहे. या विस्मरणाच्या गर्तेतून बाहेर पडणे आवश्यक होते.
पण अलीकडे धनगर जमात आपल्या कोषातून बाहेर पडू पहात आहे. आपल्या इतिहासाबाबत तो कधी नव्हे एवढा सजग झाला आहे. या सजगतेत अभिनिवेश नाही. जातीय अहंकाराचे पुटे त्याला चढलेली नाहीत. स्वत:चा शोध घेण्याची ही प्रक्रिया आहे व ती सर्वच मानवी घटकांसाठी आवश्यक आहे. आपल्या अस्तित्वाचा अर्थ निकोप इतिहासातून समजतो. संस्कृतीला दिलेल्या योगदानातुन समजतो व भवितव्याच्या उज्ज्वल दिशा त्यातुनच उलगडत जातात. डा. गणेश मतकर, मधुकर सलगरे ते तरुण पिढीचे होमेश भुजाडे असा हा स्वशोधनाचा प्रवास धनगर समाजाने केला आहे. हा प्रयत्न पुरेसा नाही हे उघड आहे. अजुनही इतिहासाची असंख्य दालने अंधारात आहेत. विविधांगाने चिकित्सा करण्याची ऐतिहासिक दृष्टी मिळवायची आवश्यकता आहे. ते कार्य नवीनं पिढी धनगर इतिहास परिषदेच्या माध्यमातून करेल असा मला विश्वास आहे.
साहित्य हा कोणत्याही संस्कृतीचा प्राण असतो. आपण मराठी साहित्य पाहिले तर त्यात धनगरी जीवनाचे चित्रण अभावानेच आढळेल. त्यांची स्वप्ने, जीवनशैली, सुख-दु:खे व संघर्षाची परिमाने नागरी समाजापेक्षा अत्यंत वेगळी असुनही, साहित्त्यिक प्रेरणांना आव्हान देणारी असुनही अन्य साहित्यिकांनी मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. हे चित्र समाधानकारक नाही. एक मोठा आदिम संस्कृतीला येथवर घेऊन येणारा समाजघटक साहित्यात मात्र अदृष्य असावा हे अनाकलनीय आहे. किंबहुना आपल्या साहित्यिकांची दृष्टी एवढी विशाल नाही याचेच हे द्योतक आहे. अलीकडे धनगर समाजातुन नवे कवी, कथाकार व कादंबरीकार उदयाला येत आहेत हे खरे आहे. सुरेश पां. शिंदे यांची "मेंढका" व शिवाजीराव ठोंबरे यांची "डोंगरापल्याड" या कादंब-या धनगरांच्या भटक्या जीवनातील आशय समृद्धपणे मांडतात. हाल-अपेष्टा व थोडीबहुत वाट्याला येणारी सुखेही समर्थपणे मांडतात. पण मुख्य प्रवाहाने या कादंब-यांची दखल घेतली असल्याचे आपल्याला पहायला मिळत नाही. ही वृत्ती मराठी साहित्यसृष्टीने सोडली पाहिजे. अधिकाधिक साहित्य निर्माण व्हावे, वाचले जावे व धनगरी जीवनाशी सर्वांनीच साहित्यातून तरी जोडले जायला हवे. आपल्या मुळ संस्कृतीच्या प्रेरणा कोठून आल्या हे आधुनिक समाजाला त्याशिवाय समजणार नाही.
धनगर समाज आपल्या परंपरागत व्यवसायातुन फेकला जायची परंपरा ब्रिटिश काळापासून सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर तर त्याला अधिकच हवालदिल केले. चरावू कुरणे हाच ज्या संस्कृतीच्या जगण्याचे साधन तीच हिरावली गेली. भारतात ब्रिटिश काळापुर्वी २२% क्षेत्र हे चरावू कुरणांचे होते. सरकारी धोरणे, लबाड राजकारणी यामुळे महाराष्ट्रात आज अवघे १.८% क्षेत्र हे चरावु कुरणांचे उरले आहे. यामुळे अर्थव्यवस्थेत मोलाचे भर घालणारा उद्योगही संपण्याच्या बेतात आहे. जे किमान ४०% धनगर आजही मेंढपाळीवर कसेबसे अवलंबून आहेत तेही भविष्याच्या प्रश्नाने ग्रासले आहेत. एक जगण्याचे साधन हिरावून घेतांना पर्याय द्यायला हवा याचे भान कोणत्याही सरकारने ठेवले नाही. त्यामुळे मिळेल त्या अन्य क्षेत्रांत जगण्यासाठी धनगर बांधव प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना एक दिशा व मार्गदर्शन नसल्याने जी ससेहोलपट होते आहे ती पाहून कोणाचेही अंत:करण हेलावल्याखेरीज राहणार नाही. पण हा समाज आजही तेवढाच दुर्लक्षित आहे जेवढा होता. साहित्य काय व माध्यमे काय, तीही त्यांच्याबाबत उदासीनच राहिली असावीत हे दुर्दैवच आहे. बहुतेकांच्या दृष्टीने हा समाजच अस्तित्वात नाही एवढे घोर दुर्लक्ष या समाजाप्रत आहे.
पण हे साहित्य संमेलन हे विराट भविष्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. या मुक बांधवांचा साहित्यिकच नव्हे तर आत्मोद्गार आपल्याला ऐकण्याची ही संधी आहे. धनगर बांधव हा सर्वांचाच आहे, राहणार व सर्वांच्या हातात हात घालून प्रगती करणार याची ग्वाही म्हणजे हे संमेलन आहे. धनगर समाज म्हणजे आजवर नागरी समाजाने अव्हेरलेला थोरला भाऊ. धाकट्या भावाला थोरल्याच्या जवळ घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे. या संमेलनात आयोजित विविध परिसंवादांतून व्यापक विचारमंथन होईल, सकारात्मकतेच्या दिशेने सर्वच जातील ही अपेक्षाही आहे. आजच्या जातीय गढूळ वातावरणात भरणारे हे संमेलन म्हणजे सर्वैक्याची घोषणा करणारे महत्वाचे सकारात्मक पाऊल आहे. डॉ. अभिमन्यू टकले, छगनशेठ पाटील, अमोल पांढरे, जयसिंगतात्या शेंडगे व त्यांच्या सहका-यांचे मी त्यासाठी आभार मानतो.
धन्यवाद.

4 comments:

  1. संजय सर धनगरांचे वाङ्मय मौखिक परंपरेने हजारो वर्षे जिवंत राहिले असे अभिमानाने सांगतात , पण तीच गोष्ट(मौखिक परंपरा ) वैदिक वाङ्मयाच्या बाबतीत घडली असेल असे त्यांना मान्य नाही - आपल्या जातीचा अभिमान असावा पण वैदिकांचा दुःश्वास का ? वेद हे फारफार तर पारशी गाथांइतकेच काय ते जुने आहेत असे म्हणताना , सरांना मौखिक परंपरेने वेद हे हजारो वर्षे पुरातन असतील हे मान्यच होत नाही -
    इतके मोठमोठे राजे जर धनगर समाजात झाले , तर मग तो समाज मागास का बरे ?
    एखाद्या संमेलनाच्या भाषणात तरी संजय सर वैदिक लोकांबद्दलच्या अढीबद्दल संयम आणि मौन राखतील असे वाटले होते - पण नाही ! शेपूट वाकडी टी वाकडीच !

    ReplyDelete
    Replies
    1. vaidik labadya kartat, dhangar nahi. Rigved jasachya tasa japla hi bhulathap ahe.

      Delete
    2. Agashe sir tumhi sangata vaidik samaj. Nakki kon ahet. Baherun alelya Aary lokani mandlelya kalpana mhanje Ramayan v Mahabharat ahe ase baryach thikani mhatl jat. Yachi pusti milte ti tyatunach, jase ki Ramayan he vhaychya agodar lihale ahe. Mhanje ithalya lokavar akraman karnyacha plan mhanje ramayan asach mhanav lagel.

      Delete
  2. आर्थिक मागास आहेत. पण भाव,क्रतज्ञता,इमानदारी,यांनी सर्वांना मागे ठेवले आहे.मोठमोठे राजे जर धनगर समाजात झाले , तर मग तो समाज मागास का बरे ?लबाडी,फितुरी करण्यात मागे आहेत

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...