Monday, February 6, 2017

खैरलांजी ते कोपर्डी... एका वेदनेचा प्रवास

खैरलांजी ते व्हाया कोल्हापूर-कोपर्डी असा प्रवास आम्ही केला आहे गेल्या अवघ्या एका दशकात. एकीकडे जगात व देशातही अनेक भल्या-बुऱ्या बदलांच्या लाटा आहेत. त्यातून कसे तगायचे हा एक यक्षप्रश्न सर्वांसमोर असताना आम्ही मात्र 2006मधील मानसिकतेतच साकळलो आहोत, याची आम्हाला लाज वाटली पाहिजे. जातीय आधारावरच आमच्या सामाजिक संघर्षाच्या व्यूहरचना ठरणार असतील, तर आम्ही आमची शिक्षितता व बुध्दिमत्ता तपासून पाहिली पाहिजे. बदलाची गरज सर्वांनाच आहे. खैरलांजी ते कोपर्डी हा संपूर्ण समाजमनावरील आघात आहे.
खै
रलांजी ते कोपर्डी या दोन घटनांत एका दशकाचे अंतर. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या भय्यालाल भोतमांगेंचे नुकतेच निधन झाले व एका वेदनामय जीवन प्रवासाचा अंत झाला. खैरलांजी घटनेने जो वर्ग बचावात्मक भूमिकेच्या पातळीवर गेला होता, तो वर्ग कोपर्डी घटनेने आक्रमक होत गेला. हे एक चक्र झाले. दरम्यानच्या काळात अशा अनेक घटना झाल्या, पण त्या चर्चेचा विषय बनल्या नाहीत. उदाहरणार्थ, कोल्हापुरात झालेली इंद्रजित कुलकर्णी व मेघा पाटील या दांपत्याचे गळे चिरून झालेली निर्घृण हत्या. हत्या करणारे मेघाचे सख्खे भाऊ होते. खैरलांजी व कोपर्डीसमवेत या घटनेचा उल्लेख करणे काहींना कदाचित खटकेल. पण आपला समाज कोणत्या वेदनादायक परिस्थितीतून प्रवास करत खरे तर होता तेथेच थांबला आहे, मानसिक दृष्टीने किंचितमात्रही कसा पुढे गेलेला नाही हे आपल्याला पाहायचे असल्याने आणि या तिन्ही घटनांना जातीयच संदर्भ असल्याने येथे या सर्वच घटनांबाबत विचार करणे आवश्यक बनले आहे.
खैरलांजी घटनेत पीडित हे दलित कुटुंबातील होते, तर अत्याचार करणारे तथाकथित उच्चवर्णीय होते. कोल्हापूर घटनेत बळी पडलेले दोघेही तसे उच्चवर्णीय असले, तरी स्त्रियांबाबतची सरंजामदारी मानसिकता हत्याकांड घडवण्यामागे होती. कोपर्डी प्रकरणात बळी पडलेली शाळकरी पोर ही तथाकथित उच्च वर्णाची होती, तर अत्याचारकर्ते दलित वर्गाचे होते. या तीन घटनांची तुलनात्मक तटस्थ चिकित्सा केली, तर हे लक्षात येते की अत्याचार करणारे कोणत्याही वर्गातील लोक असू शकतात. प्रश्न असतो तो मानवी विकृती जपणाऱ्या मानसिकतेच्या माणसांना संधी मिळण्याचा. असे लोक संधी कशातही शोधू शकतात. त्याला जातीय संदर्भ असतीलच असे नाही, पण प्रत्येक पीडिताची व अत्याचारकर्त्यांची सर्वप्रथम जात शोधणे ज्या समाजात महत्त्वाचे बनून जाते व त्यानुसार प्रतिक्रिया ठरवल्या जातात, त्या समाजातील विकृतींचा प्रश्न कसा सुटेल?
29 सप्टेंबर 2006 रोजी भंडारा जिल्ह्यातील खैरलांजीत भोतमांगे परिवारातील चार सदस्यांची निर्घृण हत्या केली गेली. हत्येपूर्वी महिलांची अब्रू लुटली गेली. प्रेतांना कालव्यात फेकून देण्यात आले. सुरेखा व प्रियांका यांच्यावर ज्या वेळी अत्याचार होत होते, तेव्हा गावातील महिलाही मोठया संख्येने उपस्थित होत्या, पण त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. दगडांनी चेचून मग चौघांनाही ठार मारले गेले. या प्रकरणात वाचला तो एकमेव भय्यालाल भोतमांगे. एवढी भीषण घटना घडून गेल्यानंतरही 1 ऑक्टोबरपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाच नाही. माध्यमांनाही, जेव्हा जनआक्रोश सुरू झाला तेव्हाच जाग आली. तपास पुढे सीबीआयकडे देण्यात आला. अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल यायचा आहे. असे असले, तरी नागपूर खंडपीठाने या प्रकरणाला 'दुर्मीळातील दुर्मीळ अपराध' न मानता हे सूडापोटी झालेले हत्याकांड आहे असा निष्कर्ष नोंदवला. त्याला या दुर्दैवी घटनेच्या काही दिवस आधी झालेल्या गावातील भांडणाचा व त्यातून उद्भवलेल्या पोलीस केस व साक्षीचा संदर्भ होता. एवढेच नव्हे, तर या प्रकरणाला जातीय कोन नसल्याने आरोपींना दलित व आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलमे लावता येणार नाहीत असेही खंडपीठाने स्पष्ट केले. असे असले, तरी एकंदरीत त्या जिल्ह्यातच दलित व आदिवासींबाबत असलेल्या घृणास्पद भावनेचाच हे प्रकरण घडण्यात वाटा होता, असे माध्यमांनी नोंदवले आहे.
येथे लक्षात येणारी बाब अशी की या प्रकरणी जोही निषेधाचा उग्र सूर उमटला तो दलित संघटनांकडून. बाकी समाज अपवाद वगळता चिडीचुप होता हेही येथे नोंदवले पाहिजे. न्यायालयांनीही जशी जशी केस वरच्या कोर्टात जात गेली, तसतशी फाशीची शिक्षा मिळालेल्यांची संख्या कमी कमी होत गेली. आता आठही आरोपींना 25 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झालेली आहे. यावरही अपील करण्यात आले आहे.
यानंतरची 2015मधील ठळक घटना म्हणजे कोल्हापुरात अत्यंत निर्दयपणे मारले गेलेले प्रेमविवाहित दांपत्य. हे घृणास्पद कृत्य केले ते मुलीच्याच भावंडांनी. सख्ख्या बहिणीचा आणि मेव्हण्याचा गळा चिरून त्यांना ठार मारण्यात आले. सख्ख्या भावांत एवढा निर्दयी पाशवीपणा कोठून आला असेल? पण या भयानक हत्याकांडाची विशेष चर्चा महाराष्ट्रात झाली नाही. माझे मित्र प्रकाश पोळ यांनी एका वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहिल्याने एका वाहिनीवर चर्चा तेवढी झाली. त्या चर्चेत माझे स्नेही प्रा. हरी नरके यांनीही महाराष्ट्रीय जातीयवादाचे मर्म उलगडून दाखवले. फेसबुकवर बोटचेप्या खंती आल्या, पण त्यात यातील दाहकता समजण्याएवढा पाचपोच नव्हता. हे का झाले? दोन्हीही मयत व खुनीही कथित उच्चवर्णीय असल्याने या प्रकरणाची दाहकता कमी होते की काय? पण या प्रकरणाची चर्चा झाली नाही, कोणी न्यायासाठी मोर्चे काढले नाहीत एवढे मात्र खरे.
13 जुलै 2016 रोजी या साखळीतील तिसरी घृणास्पद घटना घडली ती कोपर्डी येथे. नववीत शिकणारी, अवघ्या पंधरा वर्षांची एक पोर आपल्या आज्याला भेटून घरी परतत असताना तिघा जणांनी तिच्यावर अमानुष बलात्कार केला व तिची निर्दय हत्या केली. या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटकही झाली. आता द्रुतगती न्यायालयात सुनावणीही सुरू आहे.
या प्रकरणात खैरलांजीच्या नेमके उलटे घडले. येथे अत्याचारित मुलगी उच्चवर्णीय होती, तर आरोपी दलित. या प्रकरणी अटक होण्याआधी आरोपींनी अत्याचारितेच्या कुटुबीयांना ऍट्रॉसिटीच्या धमक्या दिल्या, असेही बोलले जाऊ लागले. हे प्रकरण म्हणजे मराठा समाजाला एक मोठा मानसिक धक्का होता. त्यातूनच पुढे अकोला, औरंगाबाद इत्यादी शहरांतून अवाढव्य मूक मोर्चे निघाले. यात कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या अशी जशी एक मागणी होती, तशीच ऍट्रॉसिटी कायदा रद्द करा अशीही सुरुवातीची एक मागणी होती. नंतर मूक मोर्चांचे पेवच फुटले. मागण्याही बदलत गेल्या. ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर नको असे म्हणत स्वामिनाथन आयोग ते आरक्षण असे अनेक मुद्दे थोडयाफार बदलाने पण विस्कळीतपणे मोर्चेकरी मांडत गेले. हे मोर्चे अत्यंत शिस्तबध्द व पूर्णतया अहिंसक असल्याने त्यांचे कौतुकही झाले.
पण यात कोपर्डी घटनेचा आक्रोश विझत जात तो राजकीय वळणावर कधी वळला, हे बहुधा मोर्चांच्या आयोजकांच्या लक्षात आले नसावे. दलित व ओबीसी मराठा मोर्चांतील अवाढव्य सहभागाने आधी हबकून गेले. दलितांनी नेतृत्व करत बहुजन मोर्चांची हाक दिली. विखुरलेला ओबीसीही जागा झाला तो आरक्षणावर येऊ पाहत असलेल्या गदेच्या कारणाने. ऍट्रॉसिटी कायद्याला हातही लावायचा प्रत्यत्न झाला तर दलित कडवा विरोध करणार हे तर निश्चितच होते. ऍट्रॉसिटी कायदा कठोरपणे राबवा एवढीच मागणी उरली नाही, तर काहीही ओबीसी विचारवंतांनी ओबीसींनाही ऍट्रॉसिटी कायद्याचे सुरक्षा कवच द्या अशा मागण्या सुरू केल्या. अर्थात त्यांना विशेष पाठिंबा मिळाला नाही. पण एकंदरीत समाजाचे त्रिभाजन झाल्याचे ठळक चित्र मराठा मोर्चांमुळे व प्रतिमोर्चांमुळे उघड झाले. 'प्रतिमोर्चांची आवश्यकता नाही...' असे वाहिन्यांवरून जाहीरपणे सांगणाऱ्यांचा आवाज या सर्व गदारोळात दबला गेला, हे मात्र नक्की.
यात कोपर्डी कोठे राहिले? खैरलांजी प्रकरणात वाचलेल्या एकमेव भय्यालाल भोतमांगेचा मृत्यू झाला, पण खैरलांजीचे अखेर काय झाले? इंद्रजित व मेघा यांचे काय झाले? किंबहुना ज्यांसाठी आक्रोश केला गेला किंवा ज्यांच्यासाठी आक्रोश करण्याची आवश्यकताही भासली नाही, अशा या व इतर अनेक प्रकरणांचे काय झाले? आक्रोश तरी खरा होता की जातीय अस्मिता पेटवत राजकीय व सामाजिक फायदे पटकावण्याची ती एक चढाओढ होती? बलात्कार, हत्या, अन्याय, अत्याचार याला जातीयच संदर्भ असतात काय? जातीय संदर्भ असले, तर त्याबाबत आमची सामाजिक व्यूहनीती काय आहे? अत्याचारकर्त्याला जात असते काय? हे आणि असेच अनेक प्रश्न या निमित्ताने मराठी विचारवंतांनी चर्चिले आहेत. अजूनही चर्चा होईल. कदाचित तोवर आणखी एखादी दुर्दैवी घटना घडेल व संबंधित समाज रस्त्यावर आल्यावर चर्चा पुन्हा नव्याने पण त्याच वळणावर सुरू होइल आणि आधीच्या विस्मरणाच्या कालकुपीत बंद केल्या जातील. पण या चिरंतन भळाळत्या वेदनांचे काय करायचे?
हा प्रवास कोठे संपणार आहे?
वरील तिन्ही घटना पाहिल्या, तर एक बाब स्पष्ट होते व ती म्हणजे अत्याचार...खून कोणीही व कोणावरही करू शकते. पीडित हा दुर्बल जातीचा आहे म्हणून नव्हे, तर शरीरदुर्बल स्त्रिया/मुली व अत्यंत गरीब या अत्याचारांना बळी पडलेले आहेत. पण तरीही जातीय संदर्भ अपरिहार्यपणे का येतात? समाजात विखार आहे ही बाब सत्य आहे. ती नाकारण्याचे कारणच नाही. पण हा विखार उच्चजातीयांचा दलितविरोधातच आहे असे नसून उच्चजातीय आपल्या कर्माने अथवा श्रेष्ठत्व गंडाने दलितांकडूनही निमंत्रित करून घेत आहेत. एवढेच नव्हे, तर सारा विद्रोह, संताप जहरी शब्दांत विशेषत: ब्राह्मणांविरुध्द गेला अनेक काळ व्यक्त केला जात आहे व आता सत्तेच्या उबेत सतत राहण्याची सवय लागलेल्या मराठयांच्याही विरुध्द व्यक्त होतो आहे. काल-परवापर्यंत विखुरलेला व ओबीसी म्हणून कोणतीही एकत्र अस्मिता न जपणारा समाजही आज एकत्र येऊ लागला असेल, तर भविष्यात महाराष्ट्राचे सामाजिक चित्र काय असेल याची आपण कल्पना करू शकतो. कोल्हापूर प्रकरणात अन्य समाज चिडीचुप बसले, कारण मरणारे ब्राह्मण व मराठा होते यामुळे तर नाही? केवळ द्वेषाचे केंद्रबिंदू असलेल्या जातीतील कोणी कितीही निर्घृणपणे त्याच जातीच्या व्यक्तींना ठार मारत असेल, तर अवाक्षरही का काढायचे? असा प्रश्न पडून हे एकदम मुके तर होऊन जात नाहीत? सत्तेच्या परीघाबाहेरही जगाकडे पाहावे लागते, जातीय वर्चस्वतावादी अहंगंड सोडत समाजकारणाकडे पाहावे लागते ही कल्पनाही या मूक क्रांती मोर्चावाल्यांना शिवू नये? की कशातही शेवटी राजकारणच आणायची सवय जडली आहे?
आपण आज एका विखाराच्या विळख्यात जखडत चाललो आहोत. खैरलांजीने माणसाचा एक विकृत चेहरा दाखवला. कोणाचेही काळीज पिळवटावे अशी ती घटना. तिला जातीय संदर्भ असतील किंवा नसतील, पण त्या घटनेकडे पाहणारे त्या घटनेकडे जातीयच दृष्टीकोनातून पाहत होते, त्याचे काय करायचे? कोपर्डीत बळी पडलेली एक गरीब पोर. कोणाच्याही पोरीसारखी. पण त्याचा आक्रोश मराठयांनाच रस्त्यावर येऊन व्यक्त करावा लागावा? दलित संघटनांनी सुरुवातीला यात बोटचेपी भूमिका घेतली होती, हे येथे विसरता येत नाही. खैरलांजी घडले तेव्हाही कथित उच्च जातीयांनी अशीच भूमिका घेतली होती. कोल्हापूर प्रकरणात तर भूमिका घेण्याची मुळात कोणाला गरजच वाटली नाही. याचा अर्थ एकच होतो व तो म्हणजे जातीय जाणिवांनी आपला समाज सडलेला आहे. मानवी वेदनांना किंमत नसून जातीलाच महत्त्व आहे. जातीच्या आधारावरच आमच्या भूमिका ठरणार. मग शाहू-फुले-आंबेडकरांचेच नाव घेत विद्रोही ते पुरोगामी कोणत्या समाजोध्दाराच्या बाता करत असतात? हा गंभीर प्रश्न आपण आपल्यालाच विचारायला हवा.
खैरलांजी ते व्हाया कोल्हापूर-कोपर्डी असा प्रवास आम्ही केला आहे गेल्या अवघ्या एका दशकात. एकीकडे जगात व देशातही अनेक भल्या-बुऱ्या बदलांच्या लाटा आहेत. त्यातून कसे तगायचे हा एक यक्षप्रश्न सर्वांसमोर असताना आम्ही मात्र 2006मधील मानसिकतेतच साकळलो आहोत, याची आम्हाला लाज वाटली पाहिजे.
दुर्बल... मग तो जातीने असो की शरीराने - जेव्हा पीडित होतो, अत्याचारित होतो, तेव्हा सर्वांचेच हृदय कळवळत नाही, तोवर आमच्या समाजाला कसलेही भविष्य नाही हे पक्के समजून चालावे लागेल. जातीय आधारावरच आमच्या सामाजिक संघर्षाच्या व्यूहरचना ठरणार असतील, तर आम्ही आमची शिक्षितता व बुध्दिमत्ता तपासून पाहिली पाहिजे. बदलाची गरज सर्वांनाच आहे. खैरलांजी ते कोपर्डी हा संपूर्ण समाजमनावरील आघात आहे. त्या वेदनेचा प्रवास संपायला तयार नाही. भय्यालाल भोतमंगे न्यायाच्या प्रतीक्षेत संपला. त्याच्याबरोबरच आमच्या हृदयातील न्यायभावनाही मेली असे अन्यथा समजून चालायला हवे. आणि ती मरू द्यायची नसेल, वेदनांचाच अंत करायचा असेल तर आम्हालाच आतातरी बदलावे लागेल, हे लक्षात घ्यावे लागेल!

3 comments:

  1. I fully agree with the article. Maharashtra is really in bad shape today if we see social situation. But it sounds bit contradictory when you write about this. One side, you say that we face so many challenges in the country and we are still stuck up with caste. On other side, you also write completely irrelevant Vaidik and Shaiv related articles. No one is really bothered where he is shaiv or Vaidik in today's world and still you write about that almost every month. Then on what basis you complain about others if they are stuck with caste mentality? You are also looking backwards when you write about that Vaidik topic. You must focus on forward looking articles. Especially related to Economy. You definitely have good understanding of that topic. Please grow up.

    ReplyDelete
  2. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकात नाना पाटेकर याने रंगवलेले पात्र म्हणते की हे सगळे अत्याचार बंद होणार आहेत - नक्की बंद होणार आहेत - तेंव्हा असे वाटते की तो असे का म्हणतो ? तर तो पुढे सांगतो - स्त्रिया "विरोध करणेच सोडून देणार आहेत "असे माजोरडे विधान ऐकल्यावर प्रेक्षकांच्या अंगावर काटा येत असे !!!
    असे विखारी तत्वज्ञान आता यापुढे लोकप्रिय होईल की काय अशी भीती वाटते !
    धर्मसंस्कार आणि शिक्षणातून येणारे सामाजिक बंधन यापासून आजचा तरुण वर्ग कितीतरी दूर आहे सर्व देशात गवगवा होतो आहे तो विजय मल्ल्या कसा (यशस्वीपणे ? ) पळून गेला आणि दुसरे म्हणजे निवडणुकीचे राजकारण !!! आपला समाज दररोज नव्यानव्या बातम्या आणि सनसनाटी गोष्टींना छाटलेला आहे हेच सिद्ध होते .
    भारतात लोकशाही रुजवताना पुरोगामी धर्म निरपेक्ष गोष्टींचे अवडंबर माजवले गेले आणि त्यामुळे घरोघरी जुन्या पिढीतून घडणारे सांस्कृतिक संस्कार " घेतला वसा टाकणार नाही " या न्यायाने जे स्वयंपाकघरातून सांभाळले जात होते त्याला पूर्णविराम मिळाला .ब्रिटीशानी नुसतेच इंग्रजी जाणणारे नोकरदार निर्माण केले , पण जणूकाही मुद्दाम लोकशाही इथे रुजवली नाही त्याचीच फळे आपण भोगत आहोत .इंग्रजानी इथे नवविचारांचे आणि आधुनिकतेचे वारे वाहूच दिले नाहीत ? का आपणच करंटे ? आजही आपला एकही दिवस जय भवानी जय शिवाजी असे ओरडल्या शिवाय जात नाही . आपण कुठल्या कोशात अजूनही जगात आहोत ?

    ReplyDelete
  3. अमितचे अभिनंदन ! नेमकेपणाने सरांच्या लिखाणातील दोष सांगितला त्याबद्दल !
    सरांनी खरेतर जर का जाहीर सभा घेतल्या तर त्यांचे त्यांनाच कळेल की आपण किती तेच तेच बोलत असतो ,खरेतर वय वाढते तसे माणूस परिपकव होतो असे म्हणतात पण इथेतर उलटेच दिसते .सर , सदा सर्वदा वैदिक आणि शैव यावरच बोलत असतात आणि जनमानसात त्यामुळे किती परिणाम साधला जातो ? शून्य !आणि काय सिद्ध करायचे आहे ? ब्राह्मणांनी इतरांना दावणीला बांधले आणि हिंदू धर्मात वैदिकांनी घुसखोरी केली ?
    आजच्या घडीला धार्मिक वास्तवात जे मंत्र वापरले जातात त्यातून काही खरोखरचे मंगल साध्य होते का ?दिवाळीतले फटाके हे आपल्या संस्कृतीतले नाहीत , ते चिनी आहेत , पण आज आपल्या संस्कृतीत सामावले गेले आहेत , तसाच हा वैदिक हिंदू प्रकार आहे !
    एकीकडे सर अतिशय प्रमाणबद्ध मुद्देसूद लिहीत असतात, सामान्य लोकांना न जाणवणाऱ्या गोष्टी उलगडून दाखवतात , पण हे वैदिक आणि शैव प्रकरण म्हणजे एक विनोद होतो आहे !
    संजय सर , प्लिज , जाऊ दे आता !!
    आय टी मध्ये किती शैव आहेत आणि किती वैदिक आणि याच शिस्तीत - - किती वकील डॉक्टर , आर्किटेकट,इंजिनियर,दूधवाले ,डॉक्टर्स --- भेळवाले हॉटेलवाले ,असंख्य ट्रेडर्स,मंडई ,एसटी रेल्वे,एअरपोर्ट - - हमाल चोर-शिपाई,फेरीवाले, बॅँक विमा,टीव्ही सिरीयल चे सेट्स,मंत्रालयआणि सरतेशेवटी आपले सैन्य - - -अशा अनेक ठिकाणी असा भेद करता येईल का ? तशी चर्चा करता येईल का ? आणि त्यातून तात्पर्य काय निघते ?
    पानिपत झालेच नसते तर ? अशा आशयाचा सुंदर अप्रतिम लेख आपणच लिहिला होता , तेच संजय सर आपली एनर्जी अशी का वाया घालवतात ? बोला ना सर ?

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...