तरुणाई अभिव्यक्त होतांना तिच्या भाषेत व्यक्त होते. तिची भाषा व त्याआडचा विद्रोह व खरी तगमग समजायची अनेकांची योग्यता असतेच असे नाही. युद्ध नको ही भावना व्यक्त करणारी गुरमेहर काही पहिली व्यक्ती नाही. तिने एका ओळीच्या प्ल्यकार्डमधून सांगण्याऐवजी एक लेक्चर झाडायला हवे होते असे वाटणा-या मुर्खांना ते समजणार नाही. राष्ट्रांचे शत्रुत्व व मित्रत्वही कायम नसते. युद्ध मात्र कायम असते. युद्धात कोणती बाजू चांगली हे ठरवायचे कोणतेही निरपेक्ष मानदंड अस्तित्वात नाहीत. हरले ते सर्वच वाईट असतात आणि जिंकले ते साव असे मानायची रीत असली तरी तेही खरे नाही. माणसं मेलेली असतात हेच काय ते सत्य असते. सैनिकांच्या प्राणांच्या जीवावर राष्ट्रभक्तीच्या साठमा-या खेळल्या जातात. त्यांची नेमकी बाजू काय हे यांना माहितच नसते. आपल्याच भावना सैनिकांवरही थोपल्या जात असतात.
युद्ध ही सत्तातूर राजकारण्यांची एक सोय असते. निकड असते. कारगिल नेमके का झाले हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे. पण दोन्ही बाजुंचे शेकडो ठार झाले हे सत्य आहे. आजची तरुणाई जर युद्धालाच आव्हान देत असेल तर उलट त्याचे स्वागतच करायला हवे. जगभरची युद्धे व युद्धभावना संपवण्याकडॆ मानवतेची वाटचाल हेच तरुण करणार आहेत कारण ती आमची भावी पिढी आहे. आमच्या पिढीचे विखार त्यांच्या माथ्यावर लादून त्यांना विचार-विकलांग करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला?
अभाविपतही तरुणच आहेत. त्यांच्या मस्तकावर गतपिढीच्या विखारांचे ओझे बालपणापासून जाणीवपुर्वक लादले गेले आहे. ती या विचारधारेची हत्यारे बनून गेली आहेत. त्यांना ती ओझी फेकावी लागतील व जागतिक वास्तवांकडॆ व मानवतेकडे नव्या दृष्टीने पहावे लागेल. हत्यार बनायचे नाकारल्याखेरीज तेही ख-या अर्थाने विचारशील-सृजनशील बनू शकनार नाहीत. साम्यवाद-संघवाद हे सारेच आपापल्या स्थितीचे अपत्य होते. आज त्यांचे अगत्य उरलेले नाही. हे सारे पुरातनपंथी पोथीनिष्ठ वाद त्यागत नवविचारवादाची कास धरल्याखेरीज तरुणाईची वैचारिक कुंठितता संपणार नाही.
आणि दुसरे, तरुण चुकू शकतात. त्यांना आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे हे कधीकधी न उमगल्याने त्यात संदिग्धता येत गैरार्थही निघू शकतात. पण गैरार्थच खरा मानून हिंसकतेने प्रतिक्रिया देण्यापेक्षा आधी मुळात त्या तरुणाशी संवाद साधता येत नाही कि काय? सुसंवादाची आम्ही सोयच बंद करत नाही आहोत काय? कि आम्हाला त्यातुनही राजकारण साधत समाजयुद्ध सुरू करायचे असते? आम्हीही युद्धखोर झालो आहोत काय? असे असेल तर आम्ही आपापली मने नीट तपासली पाहिजेत!
No comments:
Post a Comment