Sunday, March 5, 2017

... निराश लोकांचा देश





Image result for american dwindling economy and violence


मानवी भावनांचे अनेक उद्रेक आर्थिक कारणांशीच निगडित असतात. अर्थव्यवस्था सुदृढ असेपर्यंत कोणीही "आपले आणि परकीय" अशी वाटणी करण्याच्या फंदात पडत नाही. मराठी माणसाचा टक्का घसरला याला परप्रांतीयच जबाबदार अशी घोषणा करत शिवसेनेने आपला जम बसवला. त्याला कारण तत्कालिक अर्थस्थिती व बेरोजगारी होती.

किंबहुना अमिताभचा संतप्त तरुण याच वातावरणातून सुपरहिरो झाला. आपले आजची अनेक सामाजिक आंदोलनांना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची व बेरोजगारीची पार्श्वभुमी आहे. परके नकोत ही भावना आज जवळपास सर्वच प्रगत देशांत दिसून येत आहे. आपल्या बेरोजगारीला हे परकेच जबाबदार आहेत असे त्यांनाही वाटल्यास नवल नाही.

प्रश्न आहे कि अर्थव्यवस्थाच का ढासळतात? मुळात सध्याच्या सर्व अर्थव्यवस्था कृत्रीम पायावर उभ्या आहेत. शाश्वततेचे कसलेही वरदान त्यांना नाही. सामाजिक नीतिमत्तेचे संदर्भ या व्यवस्था पुर्णपणे गमावून बसलेल्या आहेत. कर्जाधारित अर्थव्यवस्था हा अमेरिकन व्यवस्थेचा पाया.

ती व्यवस्था आज जगभर पसरत आहे. "कर्ज करा पण सुखात जगा" हा चार्वाकाचा संदेश अर्धवटपणे राबवला जातो आहे. लोकांनी कर्जे घेऊन का होईना खरेदीच केली नाही तर या अतिउत्पादनक्षमता असलेल्या उद्योगांची विक्री कोठून होणार व ते कसे चालणार? ते चालायचे तर स्वकमाईची असो कि कर्जाची असो-क्रयशक्ती असनारे ग्राहक त्यांना हवेच आहेत. पण हे दु:श्चक्र फार काळ टिकत नाही. सबप्राईमपासून अमेरिकेचा डोलारा कोलमडू लागला होता. ग्रीसचे अलीकडेच काय झाले हेही आपण पाहिले आहे.

यातून मुळात आपले नेमके काय चुकते आहे याचा विचार न करता राजकारणी लोक सोयीचे व सोपे कारण शोधतात. लोकांनाही ते पटते. भावनोद्रेक होतात व त्यातून हिंसाचाराचा भडका उठतो. अमेरिकेत नेमके तेच होत आहे. उद्या कदाचित सर्वच देशांत हे लोण पसरेल...नव्हे पसरतेच आहे. भारतीयही त्याला अपवाद नाहीत. अशा कोसळत्या राष्ट्रांतच "राष्ट्रभक्ती"चा उदय एकाएकी होऊ लागतो तो केवळ परिस्थितीपासून पलायन करायला लावण्यासाठी हे आमच्या लक्षातही येत नाही.

मुळात आपल्या अर्थव्यवस्था वास्तवदर्शी पायावर उभ्या केल्या जायला हव्यात. नागरिकांनाही त्याची वास्तव जाण हवी. पोकळ स्वप्नाळुपणा कोठेही नेत नाही. तो अंतता: नैराश्यातच ढकलतो. भारत आज "खोट्या
स्वप्नांवर जगणारा निराश लोकांचा देश" बनला आहे.

नागरिक सुजाण बनणे कोणत्याही राजकारण्याला आवडत नाही. तशी अपेक्षाही करता येत नाही. वास्तव स्थित्या पाहून आपण आपले जीवनमान वास्तवदर्शी बनवण्याचे प्रयत्न होत नाहीत कारण खोटी स्वप्ने आडवी येतात. २००९ ची एक गोष्ट. अमेरिकेतील एक चित्रकर्ती मैत्रिण २७-२८ क्रेडिट कार्डच्या कंपन्यांचे पैसे थकल्याने तगाद्यांनी वैतागून आत्महत्या करायला निघाली होती. मी तिला थांबवले. आपल्याकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याच्या वास्तव कारणात जायची गरज आम्हाला वाटत नाही. आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यावरच आम्ही समाधान मानतो.

आपची सामाजिकता उथळ व प्रतिक्रियावादी बनली आहे, क्रिया नेमकी काय करायची याचा संभ्रम आहे आणि म्हणून ती होतही नाही. वरकरणी आनंदी वाटणारे लोकही अदृष्य तणावांचा सामना करत असतात. अमेरिकेने व्हिसा नाकारला तर...च्या भयाने आजच लाखो भारतीय पाण्यात देव बुडवून बसले आहेत. अमेरिकेने केलेली कृती हा त्यांचा वरकरणी नाईलाज आहे. त्याला असहिष्णुता म्हणता येईल. पण अमेरिकाही मुळकारणांचा शोध घेत प्रतिबंधात्मक कार्य करुन अर्थव्यवस्थेला वास्तव बनवण्याचा प्रयत्न करणार आहे काय? ती तशी वास्तव बनवली तरी सारे लोंढे थांबतील. वेगळे काही करायची गरज पडणार नाही. फुगे शेवटी फुटतातच. कृत्रीमपणे स्टिम्युलस देत ती फार काळ तगवता येत नाही.

सर्वच देशांनी अर्थव्यवस्थेच्या मुलतत्वांकडे गांभिर्याने पाहत शाश्वत अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करावी ही अपेक्षा असली तरी राजकारणी ते होऊ देणार नाहीत...कारण मग खोटी स्वप्ने दाखवता येणार नाहीत. 

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...