वादळी व्यक्तिमत्त्वाचा रोमहर्षक वेध
संगमेश्वर मुक्कामी निजामी मोगलांनी एका बेसावध क्षणी राजे संभाजी आणि कवी कलश यांना जेरबंद केले अाणि त्या क्षणापासून कादंबरीला सुरुवात होते. मुकर्रबखान हा राजांचे हाल करतो. क्रोर्याला सीमा उरत नाही. प्रचंड शारीरिक हाल करूनही राजे विचलित होत नाहीत. त्यांचे आेज, तेज, रूबाब आणि पराकोटीचा स्वाभिमान अढळ आहे. त्यांचे अवघे जीवनच संघर्षमय आहे. शिर्केंसारख्या स्वकीयांशी त्यांना लढावे लागले. सोयराबाईंच्या सावत्रपणाने प्राणघात करण्याचा प्रयत्न झाला. आबासाहेबांचे दुर्लक्ष झाले. घरभेदीपणाचा कळस झाला. राजांच्या नाशासाठी मुघल टपून बसला हाेता. लढाया, माेहिमा सतत चालू होत्या. परकीयांप्रमाणे स्वकीयांनीही विश्वासघाताचा खेळ चालू ठेवला होता. मात्र या साऱ्या डावपेचांना राजे पुरून उरले होते. मृत्यूनंतरही ते मृत्युंजय ठरले. कादंबरीची मांडणी संभाजी राजांच्या अात्मनिवेदनातून, मनोगतातून उलगडत जाते. हे निवेदन, प्रवाही अाणि प्रभावी झाले आहे. ते आपल्या प्रिय येसूशी हृदयसंवाद साधतात तेव्हा त्याच्यातला प्रियकर लक्षात येतो. औरंगजेबाविषयी व्यक्त होणारा क्षोभ, त्वेष, शत्रंूना दिलेलं खुलं आव्हान, अाबासाहेबांविषयीचा जिव्हाळा, जगदंबेची भाकलेली करूणा, पुत्रवियोगाच्या प्रसंगाने व्याकूळ होणारे त्यांचे मन आणि त्या असह्य स्थितीतही शत्रूंच्या हृदयात धडकी भरवणारी भेदक गर्जना, असे अनेक पैलू अास्वादकांना दीर्घकाळ लक्षात राहतील. "आबासाहेब आमचे फक्त पिता नव्हते तर आमच्या हृदयात स्वप्नांचे महावृक्ष पेरणारे महामानव होते." "आम्ही हा ज्वालामुखी आता आमच्या डोळ्यांनी प्राशन करणार आहोत. हा सतेज प्रकाश पिण्याचे भाग्य आमच्याच भाळी आलेले दिसते. अरे षंढांनो, मैदानात आमच्याशी जंग करण्याची हिंमत नाही, गिधाडांची मौत मिळेल तुम्हाला, तुमची औकात ती काय?" यासह अनेक तेजस्वी वाक्ये वाचकांना भावणारी आहेत. लेखकाची लेखनशैली सुबोध, शब्दशैली वेचक आणि वर्णनशैली प्रासादिक, अर्थपूर्ण आणि प्रभावी आहे. राजांच्या विरोधात आखलेल्या कटकारस्थानांचे तपशील, त्यातील स्थळकाळांच्या नोंदी, संदर्भात येणारी व्यक्तिमत्वे, त्यांचे स्वभाव या साऱ्यांची वीण लेखकाचा अभ्यास स्पष्ट करते. ही कादंबरी वाचत असताना तत्कालीन ऐतिहासिक घटनांना उजाळा मिळत असला तरी ती एक ऐतिहासिक ललित कलाकृती आहे, हे वाचकांनी लक्षात घेतले पाहिजे. इतिहास आणि कल्पना यांचे संमिश्र रसायन लेखक संजय सोनवणी यांनी या पुस्तकात मांडले आहे. अशा कलाकृतींमध्ये ऐतिहासिक घटनांना प्रतिभेची जोड देण्याचे स्वातंत्र्य लेखकांना असते. संभाजीराजांच्या अटकेपासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या घटनांवर आधारित ही कादंबरी आहे. कवी कलश, राणी येसूबाई यांच्याशी मनाेगतातून संवाद साधत माेगली सरदारांना संभाजीराजे सडेतोडपणे फटकारतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे आजवरच्या अनवरत संघर्षाच्या तांडवांना छाताडावर झेलत स्थिरचित्त राहणारा साक्षात सह्याद्रीच. पण दृष्टबुद्धीचे लोक एकत्र आले की, गलितगात्रपणाचा अनुभव भल्याभल्यांनाही घ्यावा लागतो. तरीही राजेंनी मरणाचे स्वागत ओजस्वीपणे आणि धीरोदात्तपणे केले आहे. ही कादंबरी सर्वकालीन प्रेरक आहे.
| |||||
No comments:
Post a Comment