Sunday, July 2, 2017

तो म्हातारा...


Image result for mahatma gandhi


तू उद्या कोणाचे
कुराण होशील
कदाचित गीताही
काय सांगावे
तुलाच वेठीला धरत
गोरक्षकांना दिले जाईल उत्तेजन
सांगता येत नाही कधी
तुझे कधीकाळचे
चातुर्वर्ण्याचे समर्थन
तुझेच नांव घेत
कोणाचा बनेल मुलमंत्र
तर कोणाच्या तुला पडणा-या
शिव्या शापाचे साधन
तू टकल्या आहेस
बोळक्या तोंडाचा आहेस
कोणी तुला आज्जा म्हणतं
कोणी बापू
तर कोणी नराधम
अर्थात सोयीने!
तू बदलत राहणारा
वाईटातून चांगल्याकडे
सतत प्रवास करत राहणारा
स्वत:च्या आत्म्याला झंझोडणारे
प्रश्न विचारत राहणारा
चुका करत
सत्याकडे अविरत जात राहणारा
एक साधा माणूस होतास
हे मात्र तुला महात्मेपण देणारे
आणि महात्मेपणाला शिव्याही घालणारे
जाणत नाहीत
तुझे बोळके निरागस हास्य
असे सहजी आलेले नाही
ते माणुसकीच्या अपार वेणांतून आलेले!
तो म्हातारा मला माहित आहे
हृदयातील अनंत गोळ्या मोजत
प्रत्येकीवर मिश्किल हसणारा
करुणेने सर्वांकडे पाहणारा
आपल्या दोषांवर हळाळणारा
हास्याच्या पडद्याआड लपलेला
तो खिन्न म्हातारा
मला माहित आहे!

1 comment:

  1. सोनवणी सर, अप्रतिम!

    ReplyDelete