Sunday, July 8, 2018

विश्वोत्पत्तीचा अविरत शोध : डॉ. स्टीफन हाकिंग


Image result for stephen hawking



डॉ. स्टीफन हाकिंग या महान सैद्धांतिक भौतिकविद आणि विश्वोत्पत्ती शास्त्रात अनमोल भर घालणा-या शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला आणि समस्त मानवजातीच्या हे विश्व कसे बनले, आम्ही कोठून आलो आणि या विश्वाचा अंत नेमका कसा होणार या निरंतर पछाडत आलेल्या प्रश्नावर वैज्ञानिक उत्तर शोधण्यातील प्रयत्नांचा एक महत्वाचा दुवा निसटला.  वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी मोटर न्युरॉन डिसीजसारखा विकलांग करीत झपाट्याने मृत्यूकडे नेणारा असाध्य आजार जडल्यानंतरही आपल्या थक्क करणा-या असामान्य जिद्दीने आणि प्रतिभेने त्यांनी आपला मृत्यू लांबवत आपला मेंदू हीच वैश्विक प्रयोगशाळा बनवत विश्वोत्पत्तीशास्त्रातील कोडी उलगडण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांची अनेक विधाने वादग्रस्तही ठरली. त्यांना आपलेच सिद्धांत पुरेसे बळ मिळत नसल्याने कधी मागेही घेतले. आदर्श ज्ञानवंताप्रमाणे ते पुन्हा जिद्दीने ती अतिक्लिष्ट गणिते सोडवण्याच्या मागे लागले. 

विज्ञान ही एक प्रदिर्घ शृंखला आहे. विश्वोत्पत्तीबद्दल पुराकथा नाहीत असा जगातील एकही धर्म अथवा समाज नाही. तत्वज्ञानाच्या पातळीवरही जगभर याबाबत धमासान वाद-विवाद घडले आहेत. ग्रीक आणि भारतीय तत्वज्ञ यात आघाडीवर होते. पण तत्वज्ञान म्हणजे विज्ञान नव्हे. तत्वज्ञानात कल्पनेच्या भरा-या चालतात पण विज्ञानात कल्पनेच्या भरा-यांबरोबरच तार्किक गणिती स्पष्टिकरणे द्यावी लागतात. आध्यात्मिक संकल्पनांना विश्वोत्पत्तीच्या संकल्पनांत मारुन मुटकून बसवता येत नाही. अलीकडे इंटिलिजंट डिझाईन हा एक छद्म विज्ञान प्रकार सुशिक्षितांमधेही झपाट्याने पसरत आहे. हे विश्व किंवा सजीवोत्पत्ती कोणत्यातरी अज्ञात आरेखनकर्त्याने आधीच बनवलेल्या डिझाईननुसार झाली आहे असे हा अवैज्ञानिक सिद्धांत सांगतो. हा कोणी अज्ञात आरेखनकर्ता म्हणजे ईश्वर हे वेगळे संगण्याची गरज नाही. भारतात आजकाल रा.स्व. प्रणित सरकारमधील विद्वान (?) "सब कुछ वेदों में" म्हणत डार्विन-न्युटनपासुन हाकिंगपर्यंत सर्वच विज्ञान व त्त्यांचे अथक प्रयत्न व प्रतिभा मोडीत काढायला बघतात तेंव्हा आमच्या देशात आम्ही आईन्स्टाईन, न्यूटन आणि हाकिंगसारख्या प्रतिभा निर्माण करण्याची सुतराम शक्यता नाही अशी खेदकारक भावना मनात आल्याखेरीज रहात नाही.

हाकिंग गेल्यानंतर आपल्याकडील काही पत्रकारांनी महाविस्फोट सिद्धांत (बिग बँग थियरी) हाकिंग यांनीच शोधली अशीही विधाने केली यावरून आपल्याला आपल्या ज्ञानात्मक दर्जाची कल्पना यावी. १९१० सालीच विश्व प्रसरण पावत आहे हे निरिक्षणातून लक्षात येवू लागले होते. त्याच वर्षी आईन्स्टाईन यांनीही स्थिर विश्व सिद्धांतात व्यापक सापेक्षता सिद्धांत लागू पडत नाही असे सांगितले. नंतर अंतराळात रोखलेल्या हबल दुर्बिणीमुळे विश्वाचा वेगाने होनारा विस्तार लक्षात आला. १९२७ साली बेल्जियन कॅथोलिक धर्मगुरु व शास्त्रज्ञ लामित्र यांनी महास्फोट सिद्धांताचा पाया घातला व त्यावर आजतागायत अनेकांगांनी चर्चा होत आली आहे. हाकिंग यांनी जे महत्वाचे काम केले ते कृष्णविवरांवर. विश्वाला जर महाविस्फिओटासारखा आरंभ आहे तर त्याला अंतही असला पाहिजे हे गृहित धरुन त्यांनी रॉबर्ट पेनरोज या गणिती सहका-याच्या मदतीने खूप काम केले. अवकाश आणि काळ हा विश्वोत्पत्तीच्या क्षणी जन्माला आला हे आईन्स्टाईन यांचे म्हणणे पुढे नेत त्यांनी विश्वाचा अंत एका कृष्णविवरात होईल असे भाकित केले. म्हणजेच काळ आणि अवकाश हेसुद्धा कृष्णविवरात विलीन होईल. 

आणि यातुनच भौतिकशास्ताला भेडसावणारा मुख्य प्रश्न म्हणजे सुक्ष्म पुंजयामिकीय भौतिकीशास्त्र आणि सापेक्षवादाचा सिद्धांत यांना एकत्र करीत सर्व स्तरांवरील भौतिकी घटनांचे स्पष्टीकरण देवू शकेल अशी "थियरी ऑफ एव्हरीथिंग" (अथवा ग्रँड युनिफाइड थियरी) कशी बनवायची हा होता आणि त्यावरही काम चालू होते व आजही ते पुर्ण झालेले नाही. कारण पदार्थाच्या सुक्ष्मातिसुक्ष्म स्तरावर चललेल्या अनेक घटनांचे स्पष्टीकरण सापेक्षतावाद देवू शकत नाही. त्यामुळे हे दोन सिद्धांत अद्याप तरी स्वतंत्रपणे वाटचाल करीत आहेत. याला हाकिंग यांनी पर्यायी सिद्धांत दिला. कृष्णविवरे मानली जातात तशी पुर्ण अवस्थेत नसून त्यातुनही प्रारण बाहेर पडते, म्हणजे कृष्णविवरे वाटतात तशी शांत नसून ती बोलतात...असे सांगून त्यांनी विश्वनिर्मितीपाठोपाठच सुक्ष्म कृष्णविवरेही निर्माण होतात आणि मग  पुंजयामिकीय आणि सापेक्षतावाद या दोन्ही सिद्धांताचे नियम लागू पडतात असे दाखवून दिले. अर्थात हा एक उत्तर शोधण्याचा प्रयत्न होता. २०१४ मध्ये त्यांनी "वैज्ञानिक समजतात तशी कृष्णविवरेच असू शकत नाहीत." असे विधान करून त्यांचे अजून वेगळे स्पष्ट्वीकरण शोधण्याचा प्रयत्न केला. सुपर स्ट्रिंग थियरीही सैद्धांतिक पातलीवर बराच काळ चर्चेत राहिली होती. २०१० मध्ये हाकिंग यांनी "थियरी ऑफ एव्हरीथिंग" असू शकत नाही असे धाडसी विधान केले व किमान पाच सिद्धांत विश्वाचे संपुर्ण गणित सोडवण्यासाठी आवश्यक असतील असे प्रतिपादन केले. 

हाकिंग हे अनेक वेळा त्यांच्या धाडसी विधानांसाठी चर्चेत राहिले आहेत. किंबहुना अशी काही विधाने करणे हा त्यांच्या बौद्धिक मनोरंजनाचा भाग असावा की काय अशी शक्यता वाटते. अलीकडेच त्यांने यत्या काही शतकांत मानवाला पृथ्वे सोडून अन्य ग्रहावर वस्ती करावी लागेल असे विधान केले होते व त्यामुळेही ते खूप चर्चेत आले. या विधानावर वैज्ञानिक जगतातून सडकून टीकाही झाली होती. पण त्यांचे हे विधान समस्त मानवजातीबद्दल असलेल्या कळवळ्यातून आलेले होते. ज्या वेगाने आपण पृथ्वीचा विनाश करत आहोत तो पाहून कोणालाही खेद वाटेल तसा तो हाकिंग यांनाही वाटला. विज्ञान हे त्यांच्यासाठी सर्वोच्च मूल्य होते. पण त्यांच्याच शब्दात, "विज्ञान हे फक्त तर्कनिष्ठ ज्ञानाचे साधन नाही तर उत्कट प्रेमाचे साधन आहे." यावरून त्यांची विज्ञाननिष्ठा दिसून येते. 

स्टीफन हाकिंग यांना त्यांच्या "ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम" या पुस्तकाने अचाट प्रसिद्धी मिळवून दिली असे म्हणण्यापेक्षा कोट्यावधी सर्वसामान्य लोकांपर्यंत सोप्या शब्दात एरवी किचकट असलेल्या विश्वोत्पत्ती शास्त्र पोहोचले. छद्मविज्ञानाचे झेंडे मिरवू पाहणा-या जगभरच्या दैवतवादी लोकांना ती झणझणीत झापड होती. विश्वोत्पत्तीशास्त कोठून सुरु झाले, त्याचा विलक्षण प्रवास कसा झाला ते आता आपण कोठवर पोहोचलोय हे सांगत पुढच्या दिशा स्पष्ट करण्याचे अनमोल कार्य या पुस्तकाने केले. खरे तर माझा "अवकाशताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती" हा विश्वनिर्मितीचे वेगळे प्रारुप मांडत अनुत्तरीत प्रश्न सोडवू पाहणारा सिद्धांत त्यातुनच पुढे आला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सापेक्षतावादाला निरपेक्षतावाद हे एक उत्तर असू शकते हे मी या सिद्धांतातून सुचवले. विश्वाच्या निर्मितीचे (आणि अंताचेही) नेमके काय कोडे आहे हे अद्याप स्पष्टपणे उलगडलेले नाही. अनेक सिद्धांत पुढे येतात व मागेही पडतात. स्वत: हाकिंग यांनी आपले सिद्धांत मागे तरी घेतले अथवा त्यात सुधारणा तरी केल्या. पण अद्याप आपण अजुन पुंजयामिकीय (क्वांटम) स्तरावरील अनेक घटनांची स्पष्टीकरणे देवू शकलेलो नाही आणि सापेक्षतावाद आणि पुंजयामीकीय सिद्धांतांचे एकीकरण करू शकेल असा नियम शोधत ग्रांड युनिफाइड थियरी बनवू शकलेलो नाही. ती नवीन दृष्टीने आजवरच्या भौतिकशास्त्राकडे पाहिले आणि रुढ विचार न करता नव्याच दृष्टीकोनातून पाहिले तरच ते शक्य आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही. वलयांकीत असलेले, नसलेले सर्व शास्त्रज्ञ व चिंतक त्या दिशेने काम करीत आहेत. कधीतरी आपल्याला त्यात यश येईल हे नक्कीच. हा दुर्दम्य आशावाद आपल्याला हाकिंग यांनीच शिकवला आहे.

भारतासाठी लक्षात घ्यायची बाब म्हणजे नट-नट्या, राजकीय नेते यांना जशी झटपट वलयांकीत प्रसिद्धी मिलते तशी ज्ञानवंतांना, शास्त्रज्ञांना मिळत नाही. शास्त्रज्ञ म्हनवणारे जेंव्हा गोमुत्रावर सरकारी पैशांनी संशोधन करु लागतात तेंव्हा आमची मान शरमेने झुकते. संशोधन कशावर करावे हा संशोधकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण तो सरकार धर्म हा केंद्रबिंदू बनवून असे संशोधन करायला सांगते तेंव्हा आम्ही राष्ट्र म्हणून आमचा वैज्ञानिक दृष्टीकोण गमावला आहे याची जाहीर वाच्यता आहे. पुरातत्व खातेही संघ प्रणित आर्य येथलेच हे सिद्ध करण्यासाठी जेंव्हा पुरातत्व खात्यालाही पुराव्यांत मोडतोड करायला सांगते अथवा जे अद्याप निर्विवाद सिद्धच झालेले नाही ते रेटून बोलायला लावते तेंव्हा आमचे सामाजिक संस्कृतीशास्त्रही लयाला जानार हे उघड आहे. हाकिंग यांनी समस्त जगाला वैज्ञानिज्क दृष्टीकोण दिला. दुर्घर आजारावर मात करीत दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अनावर कुतुहलाच्या बळावर विश्वाचे गणित सोडवायचा प्रयत्न केला. आम्ही मात्र आमच्या पिढ्यांची सर्जकता, कल्पकता आणि कुतुहलाचीच हत्या करत चाललो आहोत. आणि याचे प्रतिबिंब आमच्या बव्हंशी निरर्थक असलेल्या सामाजिक समस्या आणि वादांवर पडलेले आहे. 

आम्हाला हाकिंग यांच्यापासून एवढे तरी शिकता आले आणि आमच्यातच मुलगामी बदल करता आला तर ती खरी आदरांजली ठरेल. तसेही "त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली" वाहणारे काहे कमी लोक नव्हते. हा त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोणाचाच पराभव आहे हे आपण समजावून घेतले पाहिजे. विज्ञान पुढे जानारच आहे. प्रश्न आहे तो हा की त्यात आमचा हातभार काय लागणार आहे.

(Article was published in Shidori, April, 2018 issue)

2 comments:

  1. चांगला लेख आहे स्टीफन हौकिन्स वरचा !
    त्यातील काही गोष्टी मनाला अस्वस्थ करतात . आपल्याकडे गोमूत्र संशोधनासारखा आचरटपणा चालू असेल तर देशाचे काही खरे नाही .
    अमेरिकेत गेलेले भारतीय किती खरोखर पुढारलेले आहेत त्याविषयीही शंका येते . भारतीय आय टी माधीलाही किती लोक खरोखरचे पुढारलेले आहेत ?का नुसत्या पाट्या टाकणारे आहेत ?आसपासचे आमच्या येथील लोक अमेरिकेत स्थायिक झाले आहेत त्यावरून असा अंदाज करता येतो कि आयटी हे क्षेत्र काही विद्वान लोकांचे नसून हमाल लोकांचे आहे - निदान भारतातील अमेरिकेत स्थायिक झालेले १०० टक्के भारतीय धार्मिक आहेत - त्यांच्या जीवनात जे घडते आहे ते सर्व देवाच्या कृपेने घडते आहे असा त्यांचा समाज आहे - पूर्ण नव्या दृष्टिकोनातून जगाकडे बघण्याची संधी मिळायच्या आताच संघवाले कोवळी माने कुस्करून टाकतात - त्यामुळे पुढचे काही बोलायला नकोच !
    मोदी आणि परिवाराने ५ वर्षात काय केले ? हा मुद्दा आपण चर्चेत आणायला पाहिजे - हे सरकार थापाड्यांचे आहे हेच खरे !!!काश्मीर प्रश्न , राम मंदिर , असे प्रश्न घेऊन हे लोक परत परत लोकांसमोर येतील - जसे इंदिरा बाई गरीबी हटाव करत वनिवडणुका लढवत असत त्यातलाच हा प्रकार आहे -

    ReplyDelete
  2. चांगला लेख .

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...