Thursday, September 13, 2018

किती "फिरंगी" आहेत रे?- बाळासाहेबांनी विचारला प्रश्न

Image may contain: 6 people, including Vijay Dattatraya Mandake and Pradip Chaudhari, people smiling, people standing and indoor

सन दोन हजारची गोष्ट आहे. माझी पहिली-वहिली इंग्रजी कादंबरी "ऑन द ब्रिंक ऑफ डेथ" लिहून झाली होती. राजीव गांधींच्या हत्येच्या पार्श्वभुमीवरील ही कादंबरी आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा थरारक आढावा घेत एक विदारक कथा सांगणारी. या कादंबरीचे प्रकाशन धडाक्यात व्हावे असे माझ्या मित्रांचे मत पडले. ज्ञानेश महारावांनी बाळासाहेब ठाकरे हेच त्यासाठी योग्य व्यक्ती आहेत असे सांगितले. ते म्हणाले, बाळासाहेबांचे इंग्रजीही सुंदर असल्याने ते या कादंबरीवर इंग्रजीतच बोलतील. त्यांना पत्र आणि पुस्तकाची प्रत पाठवून द्या. मी तसे केले आणि काही दिवसात चक्क बाळासाहेबांनी होकारही भरला.
मुंबईला कोहिनूर होटेलच्या सभागृहात कार्यक्रम करायचे ठरले. दरम्यान मी कसून माझे भाषण इंग्रजीत तयार करुन ठेवले. मुंबईला गेलो. कार्यक्रमाआधीच बाळासाहेब तेथे आले. मागोमाग महापौर आणि सुभाष भेंडे, नारायण आठवले वगैरे प्रभुतीही आल्या. सभागृहाच्याच बाजुच्या खोलीत बैठक भरली. खाजगीतले बाळासाहेब अत्यंत वेगळे. त्या बैठकीत त्यांनी हेमिंग्वेच्या आत्महत्येचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, "हेमिंग्वे वेडपट माणूस...तो लेकाचा एका विमान अपघातातून बचावला...आणि नंतर काही दिवसंत गोळी झाडून आत्महत्या केली! नशिबाचा संकेत त्या प्राण्याला का समजला नसेल बरे?" त्यांची सांगायची शैलीही लाजबाब. कोठली तरी उद्यानातील झाडे तोडण्याचा महानगरपालिकेने आदेश जारी केला होता. बाळासाहेब महापौरांना म्हणाले, "झाडे तू लावली होतीस का रे? झाडे न तोडता तुला दुसर मार्ग शोधता येत नाही का? झाडे तोडायची नाही..." महापौरांसमोर काय पर्याय होता? त्यांनी लगोलग तसा आदेश काढतो म्हणून सांगून टाकले. मला म्हणाले, "मी राजीवला सांगत होतो, त्या श्रीलंकेच्या प्रश्नात पडू नको. बिचारे हिंदू तमिळ शस्त्र उचलत असतील तर त्यंचा काय दोष? पण नाही ऐकले त्याने. गेला हकनाक बिचारा..." तर अशा अनेक विषयांवरील गप्पा आणि बाळासाहेबांची तुफान शेरेबाजी.
थोडक्यात साहित्य मैफिलच भरली. तोवर सभागृह भरले होते. आम्ही आता कार्यक्रमाची सुरुवात करुयात म्हणून सभागृहात जायला निघालो. वाटेत चालतांना अचानक बाळासाहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले,
"बाहेर फिरंगी किती आहेत?"
मी या प्रश्नावर चमकलो. "कोणीही नाही..." मी उत्तरलो.
"मग आपण इंग्रजीत कशाला भाषण करायचं? मराठीतच बोलुयात." ते म्हनाले.
मी निमुट मान डोलावली खरी पण माझ्या पोटात गोळा उठला होता.
एक तर मला त्या काळात भाषणच करता यायचे नाही. मी चक्क वाचून दाखवायचो. मीे भाषण तयार करुन आणले होते ते इंग्रजीत. आता काय करायचं हा यक्षप्रश्न पडला.
आणि काय वाट लागायची ती लागलीच!
लेखक म्हणून आधी माझे भाषण. त्यात बाळासाहेबांसमोर. मी कागद काढले आणि कसा बसा लाईव्ह अनुवाद करत वाचून दाखवू लागलो. शेवट्वी मीच कंटाळलो (लोक किती कंटाळले असतील?) आणि बसायला मागे वळालो.
बाळासाहेब माझ्याकडे पहात मिश्कील हसत होते. कशी फजिती केली हाच भाव त्यांच्या हसण्यात असावा. हा त्यांच्यातला निरागसपणा. माझ्या मागे सुभाष भेंडे बसलेले होते. त्यांने हळूच कानाशी विचारले, "काय झालं संजय? पार बिघडलं भाषण..."
मी हातातील भाषणाचे कागद त्यांच्याकडे दिले. त्यांनी ते पाहिले आणि कपालाला हात मारुन घेतला.
नंतर बाळासाहेबांचं अप्रतिम भाषण झालं.
मी मात्र, या कार्यक्रमात फिरंग्यांनाच बोलावण्यासाठी काय करायला हवं होतं याचा विचार करत बसलो.

1 comment:

  1. छान ..बाळासाहेब म्हणजे बाळासाहेबच

    ReplyDelete

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...