Saturday, May 11, 2019

'नमोकार' मंत्रात भेसळ कशासाठी?

Image result for namokar mantra

णमो अरिहंताणं
(अरिहतांना नमस्कार असो)
णमो सिद्धाणं
(सिद्धांना नमस्कार असो)
णमो अयरियाणं
(आचार्यांना नमस्कार असो)
णमो उवज्झायाणं
(उपाध्यायांना नमस्कार असो)
णमो लोए सव्व साहूणं 
(विश्वातील सर्व साधू-साध्वींना नमस्कार असो)
एसोपंचणमोक्कारो, सव्वपावप्पणासणो
मंगला णं च सव्वेसिं, पडमम हवई मंगलं
(हा णमोकार महामंत्र सर्व पापांचा विनाश करणारा सर्व मंगलांहून सर्वाधिक श्रेष्ठ मंगल आहे.)

हा आहे जैन धर्मातला सर्वात महत्वाचा मंत्र. या मंत्राला मूलमंत्र, महामंत्र, पंचनमस्कार मंत्र किंवा पंचपरमेष्ठी मंत्र असेही म्हटले जाते. खरे म्हणजे जैन तत्वज्ञानाचे मुलभूत सार या मंत्रात आले असल्याने अभ्यासकांच्या दृष्टीनेही हा मंत्र महत्वाचा आहे.

या मंत्राची विशेषत: ही आहे की यात कोणाही अमूर्त देवी-देवतेला वंदन केलेले नाही कारण विश्व निर्माता, मानवी जीवनाचा नियंता असलेला, पार्थना करुन संतुष्ट होणारा देव किंवा ईश्वर ही संकल्पना जैन धर्मात नाही. जैनांच्या दृष्टीने प्रत्येक जीव किंवा आत्मा हाच देव आहे पण कर्मामुळे आपल्या उच्च कोटीवरुन तो खाली घसरलेला आहे. त्यावर मात करत तो उच्च कोटी प्राप्त करु शकतो व आपल्या मुळच्या इश्वरी रुपाला पोहोचू शकतो. एकमात्र देव तर नव्हेच एकमात्र अरिहंत ही संकल्पनाही जैन धर्मात नाही. हा धर्म समष्टीमधील देवपणाला पाहतो. त्यामुळेच या मंत्रात अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधु-साध्वींना वंदन केलेले आहे. कोणत्या अमूर्त दैवत संकल्पनेला नाही. किंबहुना मानवी जगापारच्या महाशक्तीशाली अद्भूत आणि कर्ता-करविता अशा ईश्वराची संकल्पना जैनदर्शन मान्य करत नही तर उलट मनुष्यमत्रात किंवा सर्व जीवांत जैन नुसता देव पाहत नाहीत तर तेच देवकोटीला पोहोचू शकणारे देव आहेत  असे मानतात.

अरिहंत म्हणजे ज्याने आपल्या काम-क्रोध-लोभ-मत्सर आदि विकारांचा पराजय केला आहे, त्यांच्यावर विजय मिळवला आहे तो अरिहंत. सिद्ध म्हणजे मूक्त जीवात्मा. भारतात एके काळी सिद्ध संस्कृती वेगवेगळ्या धर्मांत व पंथांत पसरलेली होती आणि "सिद्ध" या शब्दाचे पारिभाषिक अर्थ प्रत्येक संप्रदायाने आपापल्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने लावले आहेत. जैन धर्मात अभूत सिद्धी मिळवतो तो सिद्ध असा अर्थ नसून निर्वाणप्रसंगी जो सर्व पाशांतून मूक्त आणि स्वतंत्र झालेला असतो तो सिद्ध असा अर्थ आहे. (आचारांग सुत्त १.१९७) मूक्त जीवात्मा म्हणजे सिद्ध असे येथे थोडक्यात म्हणता येईल. किंबहुना अरिहंतानंतरची उच्च कोटी म्हणजे सिद्ध अशी ही संकल्पना आहे.

आचार्य म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शक. ज्याची यात्रा केवलज्ञानाच्या दिशेने सुरु आहे आणि जो मनुष्यमात्राला दिशा देतो, नवे ज्ञान प्राप्त करून समाजाला देतो तो आचार्य तर उपाध्याय म्हणजे शिक्षक किंवा सामान्यातिसामान्यांनाही कोणत्या दिशेने आणि कसे जायचे हे शिकवणारी व्यक्ती. साधू म्हणजे अशी व्यक्ती की ती स्त्री असेल अथवा पुरुष, सर्वांग परित्याग केलेला आहे, तपस्या हाच ज्याचा एकमात्र उद्देश आहे आणि केवलज्ञान मिळवण्याचा अविरत प्रयत्न सुरु आहे ती.

या मंत्रातील विशेषत: अशी की ती सर्व अरिहंत, सर्व साधू, सर्व उपाध्याय, सर्व सिद्ध आणि सर्व आचार्यांना एकत्रीतपणे नमस्कार केला आहे. कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीला यात स्थान नाही. ही समष्टीची मुलभूत संकल्पना आहे. सर्व मानवजातीत या पाचही परमेष्ठींपैकी एक होण्याची योग्यता आहे आणि जे झालेत त्या सर्वांना कोणताही धार्मिक अभिनिवेष न आणता नमन करण्याची उदारता आहे. शिवाय या पाचही पदांना विशिष्ट अर्थ आहे आणि आध्यात्मिकच नव्हे तर व्यावहारिक पातळीवरही ही संकल्पना लागू पडते. या सर्वांना नुसता नमस्कार करणे हे अनुस्युत नसून प्रत्येक व्यक्तीने यातील पाय-या ओलांडत केवली बनावे असे अभिप्रेत आहे. थोडक्यात कोणत्याही कर्ता-करवित्या ईश्वरी संकल्पनेच्या आहारी न जाता मनुष्यालाच देव होण्याची संधी आहे कारण तोच देव आहे असा व्यापक मानवविचार मांडणा-या जैन धर्माचा हा मंत्र आहे आणि साररुपात ते तत्वज्ञान मांडनारा हा मंत्र आहे.

मंत्र हे गुढ वाटतात कारण मंत्र सारे काही स्पष्ट करत बसत नसतात तर सूत्र रुपाने तत्वज्ञानाचा सारगर्भ मांडत असतात. पण अनेकदा मंत्रोच्चारच महत्वाचा बनून जातो, त्यातील अर्थ मात्र समजावून घेतला जात नाही. मग केवळ शब्द उरतात आणि निष्फळ जप उरतो. नमोकार मंत्राचे असेच काही झाले असावे असे वाटावे अशी स्थिती आहे.

हा मंत्र किती जुना आहे? ह मंत्र अनादि आहे काय? हा मंत्र कोणी दिला? मला वाटते या इतिहासात जाण्यापेक्षा किती काळ खात्रीलायक रित्या हा मंत्र असाच्या असा उपलब्ध आहे हे पाहणे रोचक ठरेल.

राजा खारवेल हा एक जैन समाट होता. इसवे सन पूर्व १६२ मधील त्याच्या उदयगिरी टेकड्यांमधील हाथीगुंफा शिलालेखात हा मंत्र असाच्या असा कोरलेला सापडतो. म्हणजे हा मंत्र त्याहीआधी नुसता उपलब्ध नव्हता तर जैन समुदायाच्या आध्यात्मिक जीवनाचा महत्वाचा भाग होता. हा मंत्र असाच्या असा आजही म्हटला जातो.
पण अलीकडेच माझ्या नजरेला एक दादा भगवान आराधना ट्रस्ट्ने प्रसिद्ध केलेल्या काही पुस्तिका वाचनात आल्या. त्यात सुरुवातीलाच नमोकार मंत्र दिला असून त्यात अधिकच्या तीन ओळी जोडण्यात आलेल्या आहेत, त्या अशा-

"ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नम: शिवाय
जय सच्चिदानंद"

खरे तर हा ट्रस्ट आणि अनुयायी गुजराथमध्ये खूप चांगले कार्य करतात हे माझ्या ऐकीवात होते. किंबहुना त्यामुळेच या पुस्तकांत रस निर्माण झाला होता. पण हा नवीन घुसवलेल्या ओळी पाहून मात्र मी चकीत झालो कारण मुळ बाबींत बदल करता येत नाही ही सामान्य बाब नजरेतून कशी सुटावी हे समजले नाही.

आपण एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती अशी की कोणत्याही पुरातन लेखनात, मग ते लेखन धार्मिक असो, तत्वज्ञानात्मक असो की राजकीय इतिहास सांगणारे असो, त्यात कोणताही बदल घडवणे, अगदी कानामात्रा बदलणे किंवा त्यात अधिकचे काही जोडणे सर्वस्वी गैर मानले जाते, त्याला प्रक्षिप्तीकरण म्हणतात. त्यामुळे भावी काळात मुळचे काय होते याबाबत सावळागोंधळ निर्माण होऊ शकतो आणि जे काही मुळचे आहे ते अशा प्रक्षिप्तीकरणामुळे धुसर होऊ शकते. खरे तर मूळ तत्वज्ञानालाच बदलण्याचा अश्लाघ्य प्रकार घडू शकतो.

उदाहणार्थ या ज्या तीन ओळी जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे मुळच्या जैन तत्वज्ञानालाच कसा हरताळ फासला गेला आहे ते आपण पाहुयात. नमोकर मंत्र मुळात कोणा विशिष्ट व्यक्तीला नमन करत नाही आणि येथे तर वासुदेव कृष्णाला नमस्कार केला गेलेला आहे. शिव ही विश्वाची उत्पत्ती, स्थिती अणि लयाची कारक ईश्वर असलेली एक मंगलदायी संकल्पना आहे. ती पुजणीय असली तरी आहे संकल्पनाच. आणि जैनांना मुळात विश्वाची निर्मिती कोणी ईश्वराने केली आहे आणि त्याच्या इच्छेवर विश्वाचा गाडा सुरळीत चालला आहे, तो पूजा केली तर संतुष्ट होतो आणि मानवी जीवनात हस्तक्षेप करतो हेच मान्य नाही. मग शिव येथे कोठून आला? कृष्ण येथे कोठून आला? आणि कोणत्या सच्चिदानंदांचा जयजयकार केला आहे?

जैन तत्वज्ञानालाच विसंगत असलेल्या या तीन ओळी घुसवत आपण मूळ मंत्राचा तत्वगर्भच उध्वस्त करत आहोत हे असे करणा-यांच्या कसे लक्षात आले नाही? आणि मुळात "मूलमंत्रात" असा विक्षेप घडवण्याचे काम का केले गेले? ते करण्यासाठी कोणते "केवलज्ञान" प्राप्त झाले होते?

मी नम्रपणे आवाहन करेन की नमोकार मंत्राच्या शेवटी घुसवलेल्या या तीन ओळी काढून टाकल्या जाव्यात. शिव, कृष्ण, सच्चिदानंद यांनाच काय, अजुनही कोणी जे प्रेय वाटते त्यांनाही अवश्य वंदन करावे. किंबहुना या मंत्रात सर्वांनाच वंदन केले आहे आणि ते कोणत्या धर्माचे आहेत याची पर्वा केली गेलेली नाही. समजा अमूर्त संकल्पनांना नमस्कार करण्याचे नवे "जैनतत्व" निमाण करायचे असेल तर त्यालाही हरकत असण्याचे कारण नाही पण त्यासाठी मग स्वतंत्र नवा मंत्र व स्वतंत्र नवे तत्वज्ञान बनवावे लागेल हेही लक्षात घ्यावे लागेल. पण पुरातन आणि तत्वज्ञानाने विशुद्ध असलेल्या मंत्राला काही घुसवुन विकृत करू नये. वैदिक धर्मीयांनी जी चूक केली ती अन्य धर्मियांकडून होणे योग्य राहणार नाही.

प्रत्येक धर्माचे आपापले असे तत्वज्ञान असते. जैन तत्वज्ञान हे इतर धर्मांपासून स्वतंत्र पडते कारण ते मु्ळात अल्ला, शिव, इंद्र-वरूण, अहूर माझ्दा यासारख्या अमूर्त देवतांच्या संकल्पनांपासून दूर राहते. ते अधिक मानवकेंद्रीत आहे. प्रात्यक्षिक आहे. समष्टीचे तत्वज्ञान आहे...व्यकीकेंद्रित नाही. मग अशा धर्माचे तत्वज्ञान अल्पाक्षरी पंच नमस्कारात सांगणा-या मंत्रात विक्षेप करून ती तत्वज्ञानाचीच अवहेलना होते हे लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही अंगाने असे विक्षेप सहन केले जाता कामा नयेत असे मला वाटते. कारण कोणत्याही धर्माच्या मूळ लेखनात अशी कोणतीही भेसळ आता तरी केली जावू नये. अभ्यासक आणि भाविकांना मूळ जे आहे तेच मिळायला हवे. अन्य कोणाच्या वेगळ्या संकल्पना असतील तर त्या अवश्य मांडाव्यात पण मुळात जेही काही आहे त्यात बदल करू नये अशी एक धर्मेतिहासाचा अभ्यासक म्हणून माझी भूमिका आहे.


2 comments:

  1. वैदिक दहशतवादाचे आणखी एक उदाहरण. राम, कृष्ण, बुद्ध ऑलरेडी highjack केलेले आहेच. आता महावीर व जैन परंपरा.
    कुठे आहेत इतिहास तज्ज्ञ महावीर सांगलीकर. संजयजी EVM , हुकूमशाही, आणि प्रातिनिधिक लोकशाहीवर बोला काही तरी.
    अन्यथा सिंधू संस्कृतीचा वारसा गमावून बसलेच म्हणून समजा.

    ReplyDelete
  2. सांस्कृतिक षड्यंत्र

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...