Monday, October 26, 2020

संघाचे वैदिकत्व की शिवसेनेचे हिंदुपण?

 

रा.स्व. संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत आणि एकेकाळी त्यांची मित्र असेलेल्या शिवसेनेचे प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या दोघांची दस-यानिमित्त होणारी भाषणे ऐकली. आता हे दोन घटक मित्र राहिलेले नाहीत म्हणून त्यांच्या विचारांत बदल झालाय की संघाचे हिंदुत्व हे हिंदूंशी निगडीत नसून वैदिकवादाशी निगडीत आहे या प्रखर सत्याकडे सेनेचीही वाटचाल सुरु झालेली आहे याची निदर्शक आहे याचा या निमित्ताने विचार केला जायला हवा. त्यासाठी त्यांच्या भाषणांतले काही मुद्दे आपण विचारात घेऊ शकतो.
श्री. भागवत म्हणाले, आम्ही देशाला “हिंदू” मानतो. हिंदुत्व ही या देशाच्या व्यक्तीमत्वाची खरी ओळख आहे. स्वदेशीमधील “स्व” हाही हिंदुत्वाशी निगडीत आहे त्यामुळे आम्ही स्वदेशीचा अंगीकार हिंदुत्वाचे मुख्य तत्व म्हणून करतो. हिंदुत्व या शब्दाने आम्ही आमच्या आध्यात्मिक परंपरा आणि त्यावर आधारित नितीमुल्य हीच आमची ओळख आहे असे सांगत असतो. रा.स्व. संघाची हिंदू राष्ट्र ही संकल्पना सत्ताकेंद्रित अथवा राजकीय नाही. आमच्या मूल्यरचनेला न मानणारे आणि लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचे संरक्षक आहोत असे मानणारे लोकांना मूर्ख बनवत आहेत. ”
श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, “माय मरो आणि गाय जगो, हे आमचं हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा केलात मग तो गोव्यात का नाही? शिवसेनाप्रमुखांचं आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे आम्हाला देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व नको. हे हिंदुत्व आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. तुम्हीच बडवा ती घंटा. तुम्हाला दुसरं येतंय काय? नाहीतर करोना आला थाळ्या बडवा, घंटा बडवा हेच तुमचं हिंदुत्व. बेडूक उड्या, कोलांटी उड्या, दोरीच्या उड्या मारणारं हे कसलं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असं नाही. बाबरी पाडली गेली तेंव्हा बिळात लपून बसलेले आता आम्हाला आमचे हिंदुत्व विचारत आहेत आणि कदाचित त्या वेळेला ज्यांचं नाव त्यांच्या कुटुंबाशिवाय कुणालाही माहिती नव्हतं ते आम्हाला विचारताहेत तुमचं हिंदुत्व कुठं गेलं? तुम्ही अचानक सेक्युलर झालात?"
श्री. भागवत असे काहीही नवीन सांगत नाहीत जे त्यांच्या पूर्वसुरी आणि संघाचे तत्वद्न्य दीनदयाळ उपाध्याय सांगत आलेले नाहीत. पण यातील मेख अशी की हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र ही संकल्पना मांडत असतांना प्रत्यक्षात लोकांवर वैदिक धर्ममाहात्म्य लादण्याचे कार्य संघ का करत असतो? फार मागे जायला नको. सिंधू-घग्गर संस्कृतीला “सरस्वती” संस्कृती का म्हणत असतो?
आताच केंद्र सरकारने जो गेल्या बारा हजार वर्षांचा इतिहास लिहायला घेतलाय त्या समितीची प्रमुख उद्दिष्टे काय आहेत? वेद आणि संस्कृतची प्राचीनता शोधत (?) सिंधू संस्कृतीचे निर्माते “एतद्देशीय” वैदिक आर्य होते हे त्यांना अस्तित्वात नसलेली गोष्ट शोधायची आहे. हे कार्य भाजप सरकारने केले आणि आमचा राजकारण-सत्तेशी संबंध नाही म्हणून त्याला आम्ही जबाबदार नाही असे भागवतांचे सत्य नसलेले अप्रत्यक्ष दावे जरी मान्य केले तरी मग त्यांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला काय? या समितीत एकजात सारे उत्तरभारतीय आणि वैदिक ब्राह्मणच का असावेत? म्हणजे त्यांना नेमका कोणाचा इतिहास शोधायचा आहे? जैन, बौद्ध, हिंदू हे धर्म आणि प्राकृत आणि द्रविड भाषांना यात प्रतिनिधित्व का नाही? याचाच अर्थ “हिंदुत्व या शब्दाने आम्ही आमच्या आध्यात्मिक परंपरांचे आणि त्यावर आधारित नितीमुल्य हीच आमची ओळख आहे असे सांगत असतो.” हे श्री. भागवतांचे विधान कोणाच्या परंपरांबद्दल जास्त सजगता दाखवते आहे हे लक्षात यावे. या वैदिकत्वात (हिंदुत्व म्हणणे हा हिंदुचा अपमान आहे.) सर्वसमावेशकता नाही हे उघड आहे. हिंदू शब्दाचा वापर केवळ जनसामान्य हिंदूंना दिग्भ्रमित करत वापरून घेणे हा नाही तर अन्य काय आहे? लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता याबद्दल तुच्छता कोठून येते?
गोहत्याबंदी आणि तीही राजकीय सोयीनुसार काही राज्यात आहे तर काही नाही अशी ठेवत राजकारण तर करायचे पण आपले “गोप्रेमी” वैदिकत्व मात्र सोडायचे नाही असे भाजपा किंवा संघाचे धोरण असेल तर श्री. उद्धव ठाकरे काय चुकीचे बोलले? आता हेच वैदिक गोमेध ते गवालंभ यज्ञ करत गोमांस भक्षण करत होते हे कोणी सांगितले तर का राग येतो? बरे कालौघात त्यांनी खाणे सोडून दिले असेल, अनेक लोकांनी तसे केले म्हणून सरसकट सर्वांनीच तसेच करावे हा हट्ट कोणत्या लोकशाहीत बसतो? म्हणजेच मुळात लोकशाहीची मुल्ये अमान्य असल्याचे हे लक्षण आहे असे नव्हे काय?
श्री. ठाकरे यांनी सरळपणे “वैदिक” हा शब्द वापरला नसला तरी भाजप/संघाचे हिंदुत्व वेगळे आहे हे स्पष्ट केले आहे. प्रबोधनकारांचे आणि बाळासाहेबांचे “हिंदुपण” हे शिवसेनेचे नवे तत्व आहे, गोळवलकरांचे हिंदुत्वाच्या नावाखालील “वैदिकत्व” नव्हे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. आणि दोन समान वाटणा-या “हिंदुत्व” या संकल्पनेत फरक आता हिंदुपणाचा वेध घेणा-यांना प्रकर्षाने जाणवू लागला आहे आणि त्याचे राजकीय अभिव्यक्तीही होते आहे ही एक महत्वाची समाज-सांस्कृतिक घटना आहे जिचे दूरगामी पडसाद उमटणार आहेत. हिंदुपणात मुळात सेक्युलरीझम आहे. त्यात कडवेपणाला स्थान नाही. मंदिरांबद्दल जे ओरडा करताहेत ते वैदिकवादीच का आहेत? हिंदूंना त्याने फरक पडत नाही कारण प्रत्येकाच्या घरात देव्हारा आहे. तेच त्याचे मंदीर आहे. हिंदूंची पूजा वैदिकांच्या यद्न्यांप्रमाने कधीही सामुहिक नव्हती. आजही नाही.
राजसत्तेपेक्षा आध्यात्मिक मुल्यांवर उभी असलेली धर्मसत्ता मोठी असते आणि असावी असे म्हणणारे उपाध्याय. भागवत काही वेगळे सांगत नाहीत. कारण आध्यात्मिक नितीमुल्ये कोणती आणि कोणाची याबाबत ते स्पष्ट आहेत. त्यात अवैदिकांना स्थान असण्याचे काहीएक कारण नाही. आणि अशाच आशयाचे विधान महाराष्ट्रात भाजपची सत्ता असतांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केले होतेच.
म्हणजे भाजप आणि संघाचे “हिंदू राष्ट्र” आणि “हिंदुत्व” या संकल्पनाच मुळात फसव्या आणि दिशाभूल करणा-या आहेत अन्यथा पार्श्वभूमीला त्यांनी “वैदिक” राग आळवणे कधीच बंद केले असते.

श्री. ठाकरे धार्मिक भूमिकेबद्दल स्पष्ट होत आहेत ही चांगली बाब आहे. याची या देशात गरज आहे. सेनेने “हिंदुत्व” या शब्दाला सोडचिठ्ठी देत “हिंदुपण” खुलेपणाने स्वीकारावे.
हिंदुंचा ठेका घेतल्याचा आव आणणा-यांना त्यामुळेच रोखता येईल, वैदिक वर्चस्वतावादातून हिंदूंची सुटका होण्याची गती वाढेल आणि ते खरे राष्ट्रहितासाठी आणि सर्वांच्याच शांततामय सहजीवनासाठी उपकारक ठरेल.
-संजय सोनवणी

1 comment:

  1. That is actually new concept of percentage Hindutwa. Percentage in each contract.

    ReplyDelete

अमेरिकन शेतीचे भविष्य आणि आपण!

  २०५० पर्यंत ,  वाढत्या जागतिक लोकसंख्येला पोसण्यासाठी शेतीत व शेतीउत्पादनपद्धतीत काय बदल करावे लागतील यावर जगभरच्या प्रगत राष्ट्रांत नुसते...