Monday, May 17, 2021

“सकारात्मक”

 केंद्र सरकार क्रूर, अमानुष, हिंस्त्र आहे

असे म्हणून कशाला शिव्याशाप देत
आपली जुबान खराब करता आहात?
आपल्या असकारात्मक अक्कलेचे
दिवाळे कशाला काढत आहात?
बेड नाही, ऑक्सिजन नाही, औषधे नाहीत
किंवा लस नाही म्हणून कशाला
स्वत:ला व्यर्थ त्रास करून घेता आहात?
रोजगार रोज जाताहेत
जमा पुंजी व्यवस्थेच्या जबड्यात
जगण्यासाठी घालवली जाते आहे
अर्थव्यवस्था अखेरचे आचके देते आहे
स्वप्नांचे महाल डोळ्यादेखत उध्वस्त होताहेत
म्हणून कशाला चिंतीत होता?
हा कसला मनोरोग झालाय तुम्हाला?
अरे, हे बघा,
किती भाग्यवान आहात तुम्ही माहिताय?
अजून तुमचे नाव मेलेल्यांच्या यादीत गेलेले नाही
तुमचे प्रेत नदीत, खड्ड्यात किंवा खाईत भिरकावले गेलेले नाही
किंवा अंत्य संस्काराच्या लायनीत स्मशानाबाहेर
पडलेले नाही
बघा कि जरा डोळे उघडून
पाउस अजून तरी नियमाने पडतोय
म्हणजे पीक येणारच आहे
जनावरासाठी चाराछावण्या काढाव्या लागणार नाहीत
कि सध्या किमान पाण्याचे टेंकर बोलवावे लागणार नाहीत
दयाळू लोकांनी तुमच्यासाठी अन्नछत्रांची व्यवस्थाही केलेली आहेच
म्हणजेच तुम्ही श्वास कोंडून तडफडून जर मेले नाहीत
तर तुम्ही किमान तहान-भुकेने तरी मरणार नाही आहात...
खात्रीने सांगतो!
आणि किती मरतात अखेर?
६ कि ७ टक्के फक्त
आणि तेही कोरोना झालेल्यांपैकी
...हो कि नाही?
अरे, म्हंजे तुम्ही अजून तरी चक्क नशीबवान
९४% मध्ये आहात !
कोणी सुरक्षित बाहेर तर
कोणी काठावर, किंवा कोणी मध्यात किंवा कोणी मरणाच्या सीमेवर...
पण आहात तर जिवंतच ना?
आणि तरी तुम्हाला
“सकारात्मक”
कसे राहता येत नाही म्हणतो मी?
महान नेत्याचे साधे एवढेही ऐकता येत नाही?
देशद्रोही कोठले!
-संजय सोनवणी

1 comment:

Classical Language Status: Marathi

  Why the Marathi language should get Classical Language Status?   The Marathi language has been spoken in Maharashtra and adjoining reg...