Monday, May 31, 2021

समाजकेंद्री प्रशासिका

 समाजकेंद्री प्रशासिका

(मधुरिमा पुरवणी, दिव्य मराठी)
अहिल्यादेवींचे राष्ट्रनिर्मितीचे कार्य आजही प्रेरक आहे. काळाच्या पुढची दृष्टी असलेल्या आणि तशी ठाम पावले टाकणाऱ्या मध्ययुगातील त्या एकमेव शासिका होत्या. ज्या काळात राजे-रजवाडे आपल्या क्षेत्राच्या बाहेरील प्रजेचा साधा विचारही करत नसत, त्या काळात अहिल्यादेवींनी देशभरात हजारो लोकोपयोगी कामे केली. त्या कामांतून कारागीर व श्रमिकांना रोजगार पुरवला. देशातील लोकांना जोडत त्यांच्यात राष्ट्रीय भावना जागवली. काल (३१ मे) अहिल्यादेवींची जयंती झाली. त्या औचित्याने त्यांच्या लोककल्याणकारी, दूरदर्शी आणि आजही आदर्शवत असलेल्या कारभाराचे हे स्मरण...
अ हिल्याबाईंची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचे प्रशासन! अठराव्या शतकातील जगामधील सर्वश्रेष्ठ प्रशासिका असा त्यांचा गौरव ब्रिटिश पार्लमेंटने केला आहे. देशातील हिंदू-मुस्लिम सर्वच रजवाडेही त्यांचा गौरव करत असत. त्यांनी उभारलेली असंख्य मंदिरे तत्कालीन मुस्लिम शासकांच्या राज्यात होती यावरून त्यांचा प्रभाव व महिमा लक्षात यावा. त्यांचे अलौकिक व्यक्तित्व त्यांच्या काळातच जनमानसात ठसलेले असल्यामुळे इंदूर संस्थानाबाहेरच्या देशभरातील कोणत्याही समाजकार्याला कोणीही आडकाठी केली नाही. म्हैसूर आता सिल्क सिटी म्हणून ओळखले जाते. अहिल्यादेवींनी त्या वेळी दिलेली प्रेरणा यामागे आहे.
अहिल्यादेवींचे प्रशासन हे राजकेंद्री नव्हे तर समाजकेंद्री होते. समाजातील सर्व घटकांना समान न्याय हे त्यांचे वैशिष्ट्य होते. निपुत्रिक विधवांची संपत्ती जप्त करण्याचा परंपरागत कायदा त्यांनी रद्द तर केलाच; पण विधवांना दत्तक पुत्र घेता येईल व मनाप्रमाणे आपल्या संपत्तीची विल्हेवाट लावता येईल, असे कायदे बनवले. इतर रजवाड्यांनाही तसे कायदे बनवण्याची प्रेरणा दिली. निपुत्रिक विधवांना हा फार मोठा आधार होता. ही एक सामाजिक क्रांती होती.
पुण्यश्लोक अहिल्याबाई महिला स्वातंत्र्याच्या भारतातील आद्य उद्गात्या होत्या. ज्या काळात महिलांना गोषातच राहावे लागे, शिक्षणावर बंदी होती, त्या काळात मल्हाररावांसारख्या खऱ्या पुरोगाम्याने आपली सून अहिल्येला शिकवले. भारतीय राजनीतीमध्ये प्रवीण केले. अहिल्यादेवी भालाफेकीतही इतक्या तरबेज झाल्या की त्या देशात त्यासाठी नावाजल्या गेल्या होत्या. स्त्रिया स्वावलंबी झाल्या पाहिजेत, हे त्यांचे ध्येय होते. प्रजा आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि सक्षम असली पाहिजे म्हणून रोजगार, व्यापार आणि उद्योगावर त्यांचा विशेष भर होता. त्या काळात देशात असा विचार करणारा कोणताही शासक नव्हता.
अहिल्यादेवींनी महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांना लष्करी शिक्षण देणारे जगातील पहिले प्रशिक्षण केंद्र काढले. या संस्थेतून अक्षरश: हजारो स्त्रिया प्रशिक्षित झाल्या. खुद्द अहिल्यादेवींनी आपले स्वत:चे असे ५०० लढवय्या महिलांचे पथक स्थापन केले होते. भारताच्या इतिहासातील प्रशिक्षित महिलांचे हे पहिलेच लष्करी पथक! स्त्री सबलीकरणाचा हा उत्कृष्ट आविष्कार होय. याच सैन्याच्या बळावर त्यांनी त्यांचे राज्य घशात घालायला ससैन्य आलेल्या राघोबादादाला परत जायला भाग पाडले होते.
सामाजिक कुप्रथांबद्दलही त्या जागरूक होत्या. त्या काळात बालविवाहाचेी प्रथा होती. ती मोडून काढण्यासाठी त्यांनी स्वत:च्या मुलीचा प्रौढ विवाह करून आदर्श घालून दिला. एवढेच नव्हे, तर जो तरुण माळव्यातील दरोडेखोरांचा उपद्रव नष्ट करेल, अशा कोणाही युवकाशी तिचा विवाह लावून देईन, असे दरबारात घोषित करून जातीची अटही काढून टाकली. हे काळाच्या फार पुढचे पाऊल होते. महिलांना सक्षम करणे म्हणजे काय असते, हे त्यांनी अठराव्या शतकात फक्त कायदे करून नव्हे, तर कृतीतून दाखवले. कुणाच्या हातून काही काढून घेतले, तर त्याला पर्यायही दिला पाहिजे हे सूत्र अहिल्यादेवींनी घालून दिले. भिल्ल समाज त्या काळात यात्रेकरूंना लुटून उपजीविका चालवत. ते असे का करतात, याची माहिती घेऊन अहिल्यादेवींनी त्यांचे मन वळवून त्यांच्यावरच यात्रेकरूंच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली. यात्रेकरूंकडून भिलकवडी नावाचा कर घ्यायची परवानगी दिली. त्यांना कसायला जमिनीही दिल्या. आज भारतातील वंचितांचे असंख्य पारंपरिक रोजगार नष्ट झाले अथवा केले गेले तरी त्यांना जगायचे अन्य पर्याय दिलेले नाहीत. अहिल्यादेवी आजही प्रासंगिक आणि आदर्श ठरतात, ते त्यामुळेच. प्रजेने त्यांना उत्स्फूर्तपणे ‘पुण्यश्लोक’ पदवी दिली ती उगाच नाही.
सामाजिक अर्थविचाराच्या पुरस्कर्त्या
अहिल्याबाईंनी इंदूरमागोमाग महेश्वरला वस्त्रोद्योगात आघाडीवर आणत महिला विणकरांनाही प्रोत्साहन दिले. देशभरातील विणकरांना महेश्वरला यायचे आमंत्रण दिले. त्यांच्यासाठी वसाहती बांधल्या. त्या दूरदृष्टीमुळेच आज इंदूर मध्य प्रदेशचे मोठे औद्योगिक शहर आहे, तर महेश्वर माहेश्वरी साड्यांसाठी जगद्विख्यात आहे. रोजगाराची उपलब्धता, व्यापार आणि उद्योगाची सुलभता यातूनच प्रजेचे हित होते, हा सामाजिक अर्थविचार अमलात आणणाऱ्या त्या महान शासक होत्या.
अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात कररचना सौम्य व समानतेच्या तत्त्वावर ठेवली होती. इंग्रजांनी त्यांचे शासन देशात सुस्थापित झाल्यानंतर अहिल्यादेवींच्या कररचनेचा आधार घेत आपली कररचना केली. तत्पूर्वी कररचना ही रजवाड्यांच्या मर्जीप्रमाणे असे. रजवाडेच धनिकांना लुटत असल्याने श्रीमंत लोकही आपल्या वैभवाचे प्रदर्शन टाळत असत. अहिल्यादेवींच्या राज्यात मात्र तशी परिस्थिती नव्हती. प्रत्येकाच्या जीवित-वित्ताची हमी घेतलेले असे अहिल्यादेवींचे कल्याणकारी राज्य होते. त्या रोज दरबारात उपस्थित असत व प्रत्येकाची तक्रार ऐकून लगेच निर्णय देत. गुंतागुंतीचे विषय न्याय खात्याकडे स्वत: पाठवत. न्याय होईपर्यंत मातेच्या वात्सल्याने पाठपुरावा करत. प्रसंगी कठोरही होत. चंडीचा अवतार धारण करून भल्याभल्यांचा नक्षा उतरवत.
रामपुऱ्याच्या चंद्रावत बंधूंनी, “एका महिलेला कोण कर देणार?’ असा उद्दामपणा दाखवत कर द्यायला टाळाटाळ केली, तेव्हा त्यांच्यावर स्वारी करून सोभागसिंग राणावतची युद्धात हत्या केली.
युरोपात एकोणिसाव्या शतकापर्यंत स्त्रिया दास्यातच होत्या. काही लेखिका स्त्रीस्वातंत्र्याबद्दल दबकत बोलत असल्या, तरी त्यांचे सामाजिक स्थान दुय्यमच होते. युरोपातील महिलांना सर जॉन माल्कममुळे अहिल्यादेवी माहीत झाल्या. युरोपातील महिलांसाठी हे नुसते आश्चर्य नव्हते, तर त्यांनी अहिल्यादेवींमध्ये आपले आदर्श पाहिले. इतके की जोआना बेली या इंग्रज कवयित्रीने अहिल्यादेवींवर खंडकाव्य लिहिले. विदेशी साहित्यिकाने कोणाही भारतीयावर लिहिलेले हे पहिले खंडकाव्य. या खंडकाव्यात जोआना बेली म्हणतात, “तीस वर्षांचा तिचा शांततामय राज्यकारभार, प्रजेच्या आशीर्वचनांनी ओथंबलेली तिची भूमी. आया त्यांच्या लहानग्यांना म्हणतात… खुद्द ब्रह्मदेवाने आपल्या भूमीवर राज्य करण्यासाठी तिला पाठवले… एक राजस हृदयी, कोमल अंत:करणाची आणि बुलंद व्यक्तिमत्त्वाची ती अहिल्या!”
अहिल्यादेवींचा समकालीन इतिहासकार स्टुअर्ड गोर्डन म्हणतो, त्या काळात देशभरात अंदाधुंदी चालू असताना अहिल्यादेवींचा प्रदेश मात्र अठराव्या शतकातील सर्वात शांततेचा आणि भरभराटीचा होता. अहिल्यादेवींचे सामाजिक व आर्थिक भान कसे होते, हे पाहिले तर आजही थक्क व्हायला होते. अहिल्यादेवी केवळ शिवभक्त नव्हत्या. प्रजेतच त्यांनी शिव पाहिला. त्या कोमल मनाच्या होत्या तशाच कठोरही. त्यांनी स्वत: भाग घेत तीन युद्धे केली आणि जिंकली. पुण्यात त्यांच्या सन्मानार्थ विशेष दरबारही भरवण्यात आला. “ही तर दुर्गा आहे...”असे उद्गार नाना फडणीसांनी काढले होते.
स्त्रियांसाठी त्यांच्या स्वातंत्र्याचा पहिला उद्गार असलेल्या महान साध्वीला विनम्र अभिवादन!
{ संपर्क : ९८६०९९१२०५
{मधुरिमा स्पेशल
{संजय सोनवणी
समाजकेंद्री प्रशासिका

No comments:

Post a Comment

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...