Friday, December 23, 2022

रेशीम मार्गावरील जगप्रसिद्ध प्रवासी!


 




रेशीम मार्गावरून इस्तंबूलपासून चीनपर्यंत प्रवास करणारे असंख्य व्यापारी होऊन गेलेत. दुर्दैवाने त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल काही लिहून ठेवले असले तरी ते आज अभावानेच आपल्याला उपलब्ध आहे. भारतातून रेशीम मार्गावरूनच चीनपर्यंत बौद्ध धर्म पसरला असला तरी त्या बौद्ध भिक्षुंनी प्रवासवर्णने लिहिलेली नसल्याने या मार्गावरील त्यांच्या आठवणी व निरीक्षणे उपलब्ध नाहीत. सातव्या शतकातील प्रसिद्ध चीनी विद्वान ह्यु-एन-त्संग याचा मात्र अपवाद. बौद्ध धर्माबाबत अपार आस्था असल्याने हा रेशीम मार्गाने प्रवास करत भारतात आला होता. चीनला परत गेल्यानंतर चीनी सम्राट तायझोंगच्या  इच्छेनुसार आपले प्रवासवर्णनही लिहले. त्याचे हे लेखन आजही इतिहासकार आणि पुरातत्वविदांसाठी इतिहासातील अनेक गाळलेल्या जागा भरण्यासाठी उपयुक्त ठरते आहे.

 

त्यानंतर काही काळातच इत्सिंग हा चीनी भिक्षुही भारतात आला आला होता. त्याने प्रवासात लिहिलेल्या दैनंदिन्याही नंतर प्रसिद्ध करण्यात आल्या. रेशीममार्गावरील व भारतातील राज्ये, तेथील समाजजीवन व एकंदरीत धार्मिक स्थिती यावर त्यातून मोठा प्रकाश पडतो.

 

पण रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणा-या इटालियन मार्को पोलोची कहानी मात्र विलक्षण अशी आहे. मार्को पोलो मुळचा व्हेनिस शहरातील. त्याचे वडील निकोलो व चुलते माफ्फेओ हे दोघेही व्हेनिसमधील नामांकित व्यापारी होते. व्यापारानिमित्त ते व्होल्गा नदीखोऱ्यापासून इस्तंबूलपर्यंत प्रवास करीत असत. मार्को आपल्या आईच्या पोटातच होता तेंव्हाही निकोलो व माप्फ्फेओ बंधू व्यापारासाठी बाहेर पडलेले होते. जागतिक व्यापारी पटलावर काही बदल होण्याची चिन्हे दिसू लागल्याने आलेल्या संधीचा फायदा घ्यायचे त्यांनी ठरवले.  

 

रोमन काळापासून चीन, भारतादी अतिपूर्वेकडील आशियाई देशांशी ज्या खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे, तो मार्ग अब्बासी खिलाफतीच्या कालखंडात यूरोपियनांसाठी बंद झाला होता. पण चंगीझखानाचा नातू हूलागूखान याने बगदादची अब्बासी खिलाफत नष्ट केल्यावर, म्हणजे १२५८ नंतर, हा मार्ग पुन्हा यूरोपियन व्यापाऱ्यांसाठी खुला झाला. या संधीचा फायदा घेऊन १२६० मध्ये निकोलो व माफ्फेओ यांनी साहस करून मध्य आशियातील बूखारा गाठले. बूखारा हे त्यावेळेसही मोठे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र होते. तेथे कुब्लाईखानाच्या राजदूताशी त्यांची भेट झाली व त्याच्याबरोबरच ते चीनला गेले. मध्ययुगीन काळात चीनमध्ये जाणारे ते पहिले यूरोपीय व्यापारी होते.

 

पेकिंगमध्ये त्यांनी कूब्लाईखानाची भेट घेतली. त्याने निकोलो व माफ्फेओ यांचे स्वागत केले आणि काही काळ त्यांना ठेवूनही घेतले. जवळपास पंधरा वर्षांच्या नंतर १२६९ मध्ये पोलो बंधू इटलीला परतले. तोवर निकोलोच्या पत्नीचा मृत्यू झालेला होता तर पंधरावर्षीय मार्कोच्या दृष्टीने  पिताही हयात नव्हता. पण बापाला पाहून पोरक्या मार्कोला बरे वाटले असल्यास नवल नाही.

 

चीनमधून निघताना कुब्लाईखानाने पोपला उद्देशून चीनमध्ये १०० ख्रिस्ती मिशनरी पाठवावेत या अर्थाचे निकोलोकडे दिलेले होते. पण पोप चौथा क्लेमेंट याच्या मृत्यूमुळे आणि नवीन पोपच्या निवडणुकीच्या विलंबामुळे ते पोहोचते करू शकले नाहीत.

 

प्रवास आणि व्यापाराची वृत्ती स्वस्थ बसू देत नाही म्हणून अवघ्या दोन वर्षांत म्हणजे १२७१ साली पोलो बंधू सतरा वर्षांच्या मार्कोसह पुन्हा चीनकडे व्यापारासाठी निघाले. ते एकर येथून जेरूसलेमला आले. तेथून ते उत्तरेकडे प्रवास करीत सिरियाच्या किनारी आले. त्याच ठिकाणी त्यांना आपला मित्र दहावा ग्रेगरी हा पोप म्हणून निवडला गेल्याची बातमी समजली. त्यामुळे ते परत रोमला आले. १२७१ मध्ये पोपचा निरोप घेऊन ते निघाले. पोपने मिशन-यांची पुरेशी व्यवस्था केली नाही. त्यांच्याबरोबर अवघे दोनच मिशनरी आर्मेनियाच्या सरहद्दीपर्यंत आले. पुढे प्रवास करायची त्यांची हिम्मत झाली नाही. आयाश येथून इराणच्या आखातावरील हॉर्मझ या बंदरात आले. तेथून जलमार्गाने चीनला जाण्याचा त्यांचा विचार होता परंतु जहाज मिळू न शकल्याने त्यांनी रेशीम मार्गाने जावयाचे ठरविले.

 

इराणचे दुष्कर असे वाळवंट ओलांडून ते अफगाणिस्तानातील बाल्ख शहरी आले. येथून ते ऑक्ससमार्गे वाखान येथे आले. नंतर पामीर पठार ओलांडून ते थंड वाळवंट काश्गर, यार्कंद, खोतानमार्गे लॉप नॉर सरोवराच्या किनाऱ्याशी आले. नंतर पुढे पुन्हा गोबीचे वाळवंट  लागले. ते पार करून १२७५ मध्ये ते चीनमधील शांगडू शहरी दाखल झाले.

 

मार्कोने चीनमध्ये मंगोल भाषेचा अभ्यास केला. मार्कोची हुषारी, विशेषत: त्याचे भाषाप्रभुत्व, बहुश्रुतता आणि नम्रता या गुणांनी कूब्लाईखान खूष झाला. १२७७ मध्ये खानाने मार्कोची नागरी सेवेत नेमणूक केली. अंगच्या गुणांमुळे थोड्याच अवधीत कूब्लाईखानाच्या तो खास मर्जीतील समजला जाऊ लागला. त्याला खानाने अनेक देशांत आपला राजकीय प्रतिनिधी म्हणूनही पाठवले. त्याने तिबेट, ब्रह्मदेश, कोचीन, श्रीलंका, ईस्ट इंडीज बेटे, भारत इ. भागांना भेटी दिल्या. त्याच्या प्रवासवर्णनात उत्तर भारत वगळता कन्याकुमारी, भारताचा प. किनारा, रामेश्वर ते अंदमान-निकोबारपर्यंतच्या प्रदेशाचे सखोल विवेचन आलेले आहे. एका परकीयाच्या नजरेतून तेराव्या शतकातील भारत पाहणे एक मनोद्न्य अशी बाब आहे.

 

सतरा वर्षे चीनमध्ये काढल्यानंतर पोलोंना मायदेशाची ओढ लागली परंतु कूब्लाईखान त्यांना सोडण्यास राजी नव्हता पण त्याच सुमारास तशी एक संधी चालून आली. इराणचा प्रदेश कूब्लाईखानाच्या भावाचा नातू ऑर्गून याच्याकडे होता. त्याची मंगोल वंशातील पत्नी मरण पावली. त्याला दुसरा विवाह करायचा होता पण आपली दुसरी पत्नीही त्याच वंशातील करण्याची त्याची इच्छा होती. यासाठी त्याने आपल्या दूतास खानाकडे पाठविले. तेव्हा कूब्लाईखानाने कोकचीनया राजकन्येस इराणला पाठविण्याचे ठरविले. या कामगिरीवर जाण्यास पोलोंखेरीज इतर कोणीही माहितगार व्यक्ती नव्हती. त्यामुळे कूब्लाईखानाने पोलोंना मायदेशी जाण्याचे परवानगी दिली व आपलीही कामगिरी पार पाडायला सांगितले. पोलोंबरोबर त्याने फ्रान्स, स्पेन येथील राजांना आणि पोपला मैत्रीपूर्ण संदेशही पाठविले.

 

मग मार्को पोलो आपला पिता, चुलता, राजकन्या कोकचिन आणि प्रशियाचे दूत यांच्यासह १२९२ मध्ये चिंगज्यांग (झैतून) बंदरातून निघाला. वाईट हवामानास तोंड देत मलॅका सामुद्रधुनीतून निकोबार बेटे, श्रीलंका, भारत या मार्गाने अडीच वर्षांनी ते इराणला पोहोचले. प्रवासकाळात त्यांच्याबरोबर असलेले प्रशियाचे दोन दूत मरण पावले. त्याच काळात त्यांना कूब्लाईखानाच्या मृत्यूची वार्ता समजली. ज्याच्यासाठी भावी वधू म्हणून  कोकचिनला घेऊन चालले होते  त्या ऑर्गूनचाही त्याच सुमारास मृत्यू झाला. शेवटी तोड म्हणून कोकचीनचे लग्न ऑर्गूनच्या मुलाशी लावण्यात आले.

१२९५ मध्ये परतल्यावरही मार्को अनेक राजकीय कामगि-यांत व्यस्त होताच. १२९८ मध्येच व्हेनिस आणि जिनेव्हामध्ये युद्ध पेटले. या युद्धात मार्कोने भाग घेतला. या युद्धात मार्कोला युद्धकैदी म्हणून पकडण्यात येऊन जिनेव्हातील तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्याच्याबरोबर पीसा येथील रुस्टीचेल्लो नावाचा एक लेखकही बंदी होता. मार्कोने त्याला आपल्या प्रवासाचा वृत्तांत सांगितला. त्याने या वृत्तांतावर आधारित द बुक ऑफ मार्को पोलो हे पुस्तक तुरुंगातून सुटल्यानंतर तयार केले. थोड्याच कालावधीतच सर्व यूरोपभर या पुस्तकाची प्रसिद्धी झाली.

युरोपियन जगताला तेंव्हा सुदूर पूर्वेकडील जगाबद्दल विशेष ज्ञान नव्हते. या पुस्तकात मार्कोने पाहिलेले देश, तेथील लोक व समाजजीवन, पशुपक्षी इत्यादींची वर्णने आहेत. त्याने लिहिलेली आशियाई देशांची वर्णने यूरोपात विशेष लोकप्रिय ठरली. ख्रिस्तोफर कोलंबस याच्याकडे मार्को पोलोच्या पुस्तकाची एक लॅटिन आवृत्ती होती. नवे जग शोधण्यासाठी मार्को पोलोची मदत होईल यावर त्याचा विश्वास होता. व्हेनिस येथे मार्को पोलोचे निधन झाले. एक साहसी प्रवाशी म्हणून मार्कोची जगाच्या इतिहासात नोंद झाली.

 

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...