पार्श्वनाथ पर्वतरांगेतील सम्मेद शिखरजी हे सर्वात उंच ठिकाण आहे. छोटा नागपूर पठाराच्या पूर्वेला असलेले हे शिखर सध्या झारखंड राज्यात मोडते. सम्मेद शिखरजी हे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असून याच पर्वतावर जैनांच्या चोवीस तीर्थंकरांपैकी २० तीर्थंकरांना निर्वाण प्राप्त झाले अशी मान्यता आहे. यातील तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ फार महत्वाचे आहेत कारण ते एक ऐतिहासिक व्यक्ती होते हे इतिहासकारांनीही सिद्ध केलेले आहे. या शिखरावर भगवान पार्श्वनाथांसहित सर्व तीर्थकर व अनेक महान मुनींची प्राचीन मंदिरे आहेत. या “शाश्वत तीर्थ”स्थानाला भेट देण्यासाठी जगभरातून जैन धर्मीय आणि जैन तत्वद्न्यानाबाबत आस्था असलेले असंख्य भाविक येत असतात.
अलीकडेच सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थल घोषित करणारी अधिसूचना जारी झाली आणि त्यामुळे जैन धर्मियांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ठिकठीकाणी आंदोलने होत असून नउ दिवसांच्या उपोषणानंतर मुनी सुज्ञयसागर यांचे निधन झाले आहे. सम्मेद शिखर तीर्थक्षेत्र असताना त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यामुळे येथे पर्यटकांची संख्या वाढून या स्थळाचे पुरातन पावित्र्य धोक्यात येईल अशी भीती जैन बांधवांना वाटते. सर्वच पर्यटन स्थळांची सध्याची अनवस्था पाहता ही भीती गैरलागू आहे अशातील भाग नाही.
या तीर्थस्थळाला अगदी राजपूत व मुघल सत्तांनीही सहकार्यच केले असल्याचे इतिहासात डोकावता दिसते. पृथ्वीराज चौहानाच्या काळात या तीर्थस्थळाचा सर्व कर माफ केला गेला होता. नंतर सन १५९२ मध्ये एका फर्मानाने बादशहा अकबराने शत्रुंजय (पालीताना), अबू, राजगिर आणि सम्मेद शिखरजी या पवित्र ठिकाणी कोणत्याही प्राण्याच्या हत्येस प्रतिबंध करण्यात आला होता. शिवाय करमाफीची जुनी योजना तशीच कायम करण्यात आली होती. त्यावेळचे प्रसिद्ध जैन जगद्गुरू आचार्य हिरविजय सुरीश्वरजी महाराज यांच्या विनंतीवरून अकबराने हे फर्मान जारी केले होते. १६९८ मध्ये जहांगीराचा द्वितीय पुत्र आलमगीरने शिखरजी हे स्थान जैन तीर्थयात्रीसाठी करमुक्त केले होते. परधर्मियांबाबत अनास्था न ठेवता मोगल सत्तेने या तीर्थस्थळाचे जनमाणसातील स्थान मान्य करून हे निर्णय घेतले होते.
१७६० मध्ये ब्रिटीश काळात मात्र बंगाल सुभ्याचा सुभेदार नबाब अहमदशहा बहादूरने सम्मेद शिखरजी पर्वतावरील जैनांच्या ताब्यात असलेली जमीन मुर्शिदाबादच्या जगत शेठ या धनाढ्यास विकली. जगत शेठने पालगंजच्या राजाला एका पत्रान्वये सम्मेद शिखरजी पर्वताचा केअरटेकर म्हणून नेमले. ब्रिटीश सरकारने याच पत्राचा आधार घेत पालगंजच्या राजाला या जमीनीचे सर्वाधिकार दिले. राजाने तीर्थस्थानाचा खर्च करावा पण त्या बदल्यात तीर्थक्षेत्राला मिळणा-या उत्पन्नात त्याला भागीदारीही दिली. राजाने याच अधिकाराचा वापर करत या पर्वतावरच्या जमीनीपैकी दोन हजार एकर जमीन चहाच्या मळ्यासाठी एका इंग्रजाला भाडेपट्ट्याने दिली आणि नव्या मालकाने १८८८ साली तेथे डुक्करांचा कत्तलखानाही काढला.
थोडक्यात पूर्वीच्या सत्तांनी दिलेले परंपरागत मालकी व वहिवाट हक्क तर डावलण्यात आलेच पण सम्मेद शिखरजीचे पावित्र्यही डागाळले गेले. त्यामुळे जैन धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली. त्या वेळेस हा कत्तलखाना बंद करून मुळ पावित्र्याची आणि अहिंसेच्या मुलतत्वाची उद्घोषणा करण्यासाठी उभे ठाकले प्रसिद्ध प्रज्ञावंत व जैन तत्वद्न्य बॅरिस्टर वीरचंद गांधी. त्यांनी खुद्द पालगंजचा राजा आणि त्या इंग्रजाविरुद्ध कलकत्ता उच्च न्यायालयात केस गुदरली. प्राचीन आज्ञापत्रे व फर्माने पुराव्यादाखल पुढे ठेवली. इंग्रज न्यायालयाने ते पुरावे ग्राह्य धरून सम्मेद शिखरवरील कत्तलखाना बंद करण्याचा आदेश तर दिलाच पण तो बेकायदा भाडेपट्टाही रद्द केला. तेंव्हापासून आता सम्मेद शिखरला पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करेपर्यंत येथील शांतता व पावित्र्य अढळ राहिले.
जे पूर्वीच्या हिंदू, मुघल आणि ब्रिटीश सत्तांनी तत्व पाळले त्याला आता मात्र छेद मिळाला आहे. या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा या मागणीकडे कानाडोळा करून या स्थळाला पर्यटन स्थल म्हणून घोषित करणे हा प्रकार या स्थळाचे पुरातन पावित्र्य धोक्यात आणण्याचा प्रकार आहे अशी भावना समस्त जैनांची झाली असल्यास नवल नाही. हे स्थळ त्या भागात राहणा-या बहुसंख्य आदिवासी जनतेलाही सरकारचे हे कृत्य आवडलेले नाही कारण असे म्हणतात कि पार्श्वनाथ यांचे असंख्य अनुयायी गोंड, संथाल या आदिवासी समाजांपैकी होते. येथे केवळ पर्यटनाच्या हेतूने गर्दी वाढली व पर्यटकांच्या सोयीसाठी सरकारने या पर्वताचे मुळचे सौंदर्य डागाळणारी बांधकामे केली तर येथे शांतीच्या शोधात येणा-या भाविकांचे येथे वावरणे कठीण होऊन जाईल. सरकारने झारखंडमध्ये पर्यटनस्थळे म्हणून विकास करावीत अशी इतर असंख्य स्थळे असताना सम्मेद शिखरकडे आपले नजर वळवावी हे अनाकलनीय आहे असेच एकंदरीत स्थिती पाहून म्हणता येते. जैन समाजाला पुन्हा एकदा बॅरिस्टर वीरचंद गांधीसारख्या झुंझार प्रज्ञावंताची गरज आहे हे यातून अधोरेखित होते.
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment