Saturday, December 17, 2022

उंबरठ्यावर आलेली जगबुडी!


 

 


“कसं होईल या जगाचं?” या चिंतेने व्यापलेले लोक जगात कमी नाहीत. काहींच्या चिंता या व्यक्तीसापेक्ष असतात तर काही मोजक्या लोकांच्या चिंता या विश्वसापेक्ष व अभ्यासावर आधारित असतात. स्टिफन हॉकिंग्ज या विश्वविख्यात शास्त्रज्ञाने मागे येत्या शंभर वर्षात एकतर मानवजातीला परग्रहावर रहायला जावे लागेल किंवा मानवजातच नष्ट होईल असे भाकीत वर्तवले होते. त्यांच्या भाकितामुळे जगभर खळबळ उडणे स्वाभाविक होते. ज्या वेगाने मनुष्य पृथ्वीतलाचे वाटोळे करत निघाला आहे तो वेग पाहता मानवजात नष्ट होईल किंवा त्याला अन्यत्र कोठे परग्रहावर आश्रय शोधावा लागेल हे भय संवेदनशील विचारवंतांना व वैज्ञानिकांना वाटत असल्यास नवल नाही. पण या भयाकडे आपण गांभिर्याने पाहिले पाहिजे. पण त्यापेखा मानवाचे या धरातलावर राहणारे सह-निवासी आहेत त्यांचा ज्या वेगाने –हास होतो आहे अथवा केला जातो आहे तो पाहता एक दिवस माणसालाही आपला गाशा येथून गुंडाळावा लागेल ही केवळ काल्पनिक भीती नव्हे तर वास्तव आहे हे आपल्या लक्षात येईल.

 

पृथ्वीवर आजमितीस ८० लक्ष जीव प्रजाती आहेत आणि त्यातील पंधरा हजार प्रजाती या आता नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत. पृथ्वीच्या इतिहासात नैसर्गिक कारणांनी नष्ट झालेल्या जैव प्रजातींची संख्या मोठी असली तरी त्यांचा नष्ट होण्याचा वेग कमी होता. पण आता मानवनिर्मित कारणांमुळे हा वेग भयावह गतीने वाढला आहे असे जैव-शास्त्रद्न्य सांगत असतात पण ते हव्यासात दंग झालेल्या आम्हा बधीर लोकांना ऐकू येत नाही.

 

पृथ्वीवर एकूण पाच वेळा झालेल्या नैसर्गिक उत्पातांमध्ये व्यापक प्रमाणात जलचर-भूचरांचा संहार होऊन तत्कालीन अस्तित्वात असलेल्या प्रजाती समूळ नष्ट झाल्याची नोंद मिळते. शेवटचा असा महा-विनाश साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाला होता. हा विनाश मोठ्या अशनीपातामुळे झालेल्या वातावरण बदलामुळे झाला याबाबत शास्त्रद्न्यांचे एकमत आहे. पण आता जो सहावा महा-विनाश सुरु आहे याचे कारण मानवनिर्मित असून त्यात खुद्द मानवाचे अस्तित्वही धोक्यात येत आहे याची जाणीव अद्याप मानवाला पुरेशी झालेली आहे असे दिसत नाही.

 

पृथ्वीवरील जलवायूमान हे नेहमीच बदलते राहिलेले आहे. त्यामुळे इतिहासात अनेक संस्कृती नामशेष झाल्या आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर चीन ते मेसोपोटेमिया अशा विस्तृत क्षेत्रात सनपूर्व १७५०च्या आसपास अशाच पर्यावरण बदलामुळे पावसाचं प्रमाण कमी होत गेलं. बारमाही वाहणा-या नद्या फक्त मौसमी नद्या बनल्या. त्यामुळे शेती उत्पादन आणि निर्यातही घटल्याने लोक नागरी संस्कृतीकडून ग्रामीण संस्कृतीकडे वळाले. शहरं ओस पडली. एकार्थाने सिंधू संस्कृतीसह तत्कालीन प्रगत असलेल्या संस्कृतीचा -हास सुरू झाला. श्रीमंतीची जागा दारिद्र्याने घेतली हे उत्तर-हरप्पन संस्कृतीच्या अवशेषांवरून लक्षात येतं. याच भागात दर हजार-बाराशे वर्षांनी ओलं आणि सुकं चक्र आल्याचा इतिहास नोंदवला गेला आहे.

आज कोणाचा विश्वास बसणार नाही पण महाराष्ट्राचं पुरा-पर्यावरण हे चांगलंच पावसाळी होतं. इतकं की महाराष्ट्रातील बहुतेक जमिनी पानथळ होत्या. पानघोड्यांसारखे प्राणी त्यात सुखनैव विहार करत असत. नंतर मात्र कोरडं आणि निमपावसाळी चक्र सुरू झालं. त्यातही ओली आणि सुखी आवर्तनं येतच राहिली. सन १०२२पासून महाराष्ट्रात मोठे दुष्काळ पडू लागले. ११९६चा दुर्गाडीचा दुष्काळ तर तब्बल १२ वर्षं टिकला. मानवी वसाहतींची वाताहत याच काळात झाली. महाराष्ट्रीय संस्कृतीतही आमूलाग्र बदल होऊ लागले. यानंतर १६३०पर्यंत असे छोटे-मोठे २५० दुष्काळ महाराष्ट्रात पडल्याची नोंद व्ह्यन ट्विस्ट नामक एक डच व्यापारी करतो. १६३० सालच्या दुष्काळाचं हृदयद्रावक वर्णन तुकोबारायांनी करून ठेवलंच आहे. तेव्हाही पुण्यासकट गावंच्या गावं ओस पडली होती. पोट भरायला लोक जिकडे तिकडे भटकत होते. मोरलँड नावाचा इतिहासकार सांगतो की १६३०च्या दुष्काळात एक शेर रत्नं दिली तर मोठ्या मुश्किलीने एक शेर कुळीथ मिळत असे.

 

आताही मोठमोठ्या धरणांमुळे पाण्याचा प्रश्न सुटला आहे असे शहरी लोकांना वाटत असले तरी भविष्यात तिसरे महायुद्ध झाले तर ते केवळ पाण्यामुळेच होईल असे अनेक विद्वान म्हणत असतात. अन्नसुरक्षेचा प्रश्न आजच भयावह बनलेला आहे. शेतीची उत्पादन क्षमता आता कमाल पातळीवर गेली असून आता अन्न-धान्य उत्पादनात दरवर्षी १% पेक्षा अधिक वाढ होणे शक्य नाही असे जागतिक कृषीतद्न्य म्हणत असतात. त्याच वेळेस नादिया ड्रेकसारख्या पर्यावरणतज्ञही म्हणतात की आज बारा जैव प्रजाती रोज नष्ट होत आहेत. याच नष्ट होणा-या प्रजातींच्या रांगेत आज मनुष्यही उभा आहे हे मात्र कोणी लक्षात घेत नाही हे दुर्दैव आहे. कोरोनाच्या आपत्तीमुळे तरी जग शहाणे होईल अशी एक आशा होती पण ती फोल ठरल्याचे आपल्याच लक्षात येईल.

 

मनुष्याने औद्योगिक क्रांतीनंतर नैसर्गिक साधनस्त्रोतांचा बेसुमार उपसा करत निसर्गाचे संतुलन पुरते घालवलेले आहे. पुढे हा वेग वाढताच राहील. दुसरी बाब अशी की माणसाने कृत्रीम साधनांच्या बळावर आपले आयुष्यमान वाढवले असले तरी लोकसंख्येचे प्रमाण हे नैसर्गिक समतोलाशी विसंगत बनलेले आहे. पर्यावरणाबाबत सारेच जरी बोलत असले तरी प्रत्यक्षात प्रामाणिक प्रयत्नांची वानवा आहे हे आपण नुकत्याच झालेल्या पॅरिस कराराची कशी लगोलग वासलात लावायचे प्रयत्न सुरु झाले त्यावरून लक्षात येईल. एकंदरीत जीवसृष्टीला लायक असलेला हा एकमात्र पृथ्वी नामक ग्रह, पण त्यावरील अत्याचार "अमानवी" म्हणता येतील असेच निघृण आहेत. यामुळे सर्वच प्रजातींच्या एकंदरीतच जगण्याच्या पद्धती, जैविक संरचनेतील बदल आणि त्यातून उद्भवणारी संकटे यातून आपण स्वत:च स्वत:साठी विस्फोटक "जैविक बॉम्ब" तयार करत नेत असून त्यात आपलाच नव्हे तर अन्य जीवसृष्टीचाही विनाश आहे हे आपल्या लक्षात येईल.

 

नैसर्गिक कारणाने, उत्क्रांतीच्या टप्प्यांवर आपल्या पुर्वज मानव प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. निएंडरथल मानव नष्ट होऊन फार फार तर ४० हजार वर्ष झालीत. आजचा माणुस अवतरून फारतर दीड लाख वर्ष झालीत. सहा अब्ज वर्षांच्या पृथ्वीचा इतिहासात ही दीड लाख वर्ष म्हणजे अत्यंत किरकोळ आहेत. पण आजच्या आहे त्या होमो-सेपियन प्रजातीच्या माणसातून किंवा आहे हा मानव नष्ट होत नव्याच जैविक-संरचनेतुन पुढचा नवा मानव उत्क्रांत होईल अशी नैसर्गिक स्थितीच जर आम्ही ठेवली नाही तर मानव-प्रजातीचा प्रवाह कोठेतरी थांबणार अथवा हे नक्कीच आहे. आणि या प्रदुषित पर्यावरनातून समजा नवा मानव उत्क्रांत झाला तरी तो बौद्धिक व शारिरीक दोषांनी पुरता ग्रासलेला नसेल असे कशावरून? आणि समजा तो त्या प्रदुषित स्थितीला तोंड देण्यास समर्थ जरी बनला तरी त्याचे जैव विश्व मात्र अत्यंत आकुंचित झालेले असेल.

 

आपल्याला शाश्वत जीवनशैलीचाच अंगीकार करत आज बिघडत गेलेले पर्यावरण किमान आहे असेच राहील हे पाहिले पाहिजे. उंटावरची शेवटची काडी कधी पडेल हे सांगता येणे अशक्य आहे करण अखिल जीवसृष्टीच परस्परांशी अशा साखळीत गुंतलेली आहे की नेमकी कोणती कडी तुटली तर सर्वविनाशक चेन रिऍक्शन सुरू होत संपुर्णच कडेलोट होईल हे सांगता येणार नाही. विज्ञानाचा आधार हा विशिष्ट मर्यादेपर्यंतच असू शकतो कारण विज्ञानालाही आजच्या मानवी प्रजातीच्या बौद्धिक सर्वाधिक झेपेच्या मर्यादा आहेत हे विसरून चालणार नाही. हव्यासखोरीत अडकून आपल्या मर्यादा न ओळखण्याची गंभीर चूक आपण करीत आहोत. आपल्याला या उंबरठ्यावर आलेल्या जगबुडीपासून सावध व्हायला हवे!

 

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...