Thursday, April 20, 2023

जैन धर्माची पुरातनता आणि आजचे वास्तव!


जैन धर्माचे संस्थापक महावीर आहेत असा सर्वसाधारण समज आहे. प्रत्यक्षात जैन धर्म अतिप्राचीन असून आद्य तीर्थंकर ऋषभनाथ हे सनपूर्व २७०० मध्ये होऊन गेल्याचे आता ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. या धर्माचा उदय सर्व जीवांना समान मानणा-या समन संस्कृतीच्या उदयकाळीच झाला.  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी याबाबत सविस्तर विवेचन आपल्या ‘इंडियन फिलोसोफी’ या ग्रंथात केले आहे व ते उद्बोधक असे आहे. ते म्हणतात कि भागवत पुराणानेही ऋषभनाथ हे जैन धर्माचे संस्थापक आहेत हे मान्य केले आहे. इसवी सनापूर्वीच ऋषभनाथांची आराधना केली जात होती असे पुरावे मिळाले आहेत. यजुर्वेदामध्ये ऋषभ, अजितनाथ आणि अरिष्टनेमी ही तीन तीर्थकरांची नावे नमूद आहेत. महावीर हे जैन धर्माचे संस्थापक नसून ते त्यांच्यापूर्वी (इसपू ७७६) झालेल्या पार्श्वनाथांच्या परंपरेतील थोर सुधारक होते. ऋषभनाथांचे ऐतिहासिकत्व बघता जैन धर्म हा पार्श्वनाथापूर्वीही अस्तित्वात होता यात संशय राहत नाही.

डॉ. हर्मन ज्याकोबी म्हणतात कि जैन धर्म अगदी प्रारंभिक काळापर्यंत मागे जातो. त्यातील आदिम धार्मिक आणि आधिभौतिक सिद्धांत हे भारतीय तत्वज्ञानात अगदी सुरुवातीचे असल्याचे दिसते. “आश्रव” आणि “संवर” हे शब्द हे जैनांनीच अत्यंत वेगळ्या परिप्रेक्षात मूळ अर्थाशी प्रामाणिक राहत वापरले होते. पण बुद्धिस्ट तत्वज्ञानात ते वेगळ्या अर्थाने वापरले गेले आहेत असे आपल्याला तुलनात्मक अध्ययन केले असता दिसते. पण या शब्दांच्या वापरावरून जैन धर्म हा वेदपूर्व आणि खूप जुना आहे असे म्हणता येते. बौद्ध साहित्यातही अनेक ठिकाणी पार्श्वनाथांचा उल्लेख केला गेलेला आहे. जैन धर्माला ते बंधनमुक्त जीवन जगत असल्याने त्या धर्माचे नाव आधी निगंथ असे होते. ते पुढे स्वत:वर विजय मिळवणारे ते जिन आणि जिनांचा समुदाय म्हणून जैन असे धर्माचे नाव स्थापित झाले.

धर्मानंद कोसंबी म्हणतात कि निगंथ म्हणजे बंधमुक्त. ही निगंथांची परंपरा निश्चितपणे बुद्धपूर्व आहे. त्रिपिटकांमध्ये अनेक ठिकाणी निगंथ परंपरा उल्लेखली असून अन्गुत्तर निकायमध्ये बाप्पा नामक शाक्य हा निगंथ श्रावक होता असे उल्लेखिले आहे. हा बाप्पा गौतम बुद्धांचा काका होता असे अठ्ठकथासूत्रात म्हटलेले आहे. हर्मन ज्याकोबी म्हणतात कि निगंथ म्हणजे सर्व प्रकारच्या विकारांपासून आणि भौतिक साधनांपासून ज्याने आपले सर्व बंध तोडले आहेत (माया-मोह पाश) त्याला निगंथ असे म्हणत व जैन धर्माचेच ते पुरातन नाव होते.

तीर्थंकर हा शब्द प्रेषित किंवा धर्मसंस्थापक या अर्थाने वापरला जात नाही. तीर्थ म्हणजे भक्तीभावाने दर्शन घ्यायला जावे असे पवित्र स्थान असाही अर्थ येथे अभिप्रेत नाही. द्रष्टे, केवलज्ञानी आणि मानवाला अधिक उन्नत दिशा दाखवणा-या व्यक्तीलाच तीर्थंकर असे संबोधले जाते. तीर्थंकरम्हणजे तीर्थ उत्पन्न करणारा. तीर्थ या शब्दाचे पुढे दिल्याप्रमाणे अनेक अर्थ जैन ग्रंथात आढळतात : (१) धर्म, (२) संसारसागराच्या पैलतीरावरील मोक्षमंदिराकडे नेणारा पाण्याचा उतार (घाट) व बंदर, (३) जैन साधू, साध्वी, श्रावक, श्राविका यांचा संघ, (४) जैनांचे १२ अंगग्रंथ इत्यादी. या अर्थांवरून तीर्थंकर म्हणजे धर्माध्यक्ष, जैन संघप्रमुख, मोक्षमार्ग दाखविणारा असे या संज्ञेचे अर्थ होतात. पण हे झाले लौकिकार्थ. यामागे दडलेले सांकेतिक अर्थ मात्र वेगळे आहेत. तीर्थंकरालाच जिनम्हणजे इंद्रिये जिंकणारा, ‘अर्हत्’, सर्वज्ञ, वीतराग, केवली म्हणजे केवलज्ञानी’ अशी नावे दिलेली आहेत. जिन शब्दावरूनच या धर्माच्या अनुयायांना जैनअसे नाव पडले. केवल ज्ञानप्राप्तीनंतर तीर्थंकर धर्मोपदेश करीत विहार करतात. तीर्थंकर हे केवली असतातच परंतु सर्व केवली तीर्थंकर होत नाहीत.

 इतिहासकाळापासून पाहिले तर आद्य तीर्थंकरांपासून झालेल्या प्रत्येक तीर्थकराने जैन तत्वज्ञानात भर घातलेली आहे. पार्श्वनाथ यांनी चातुर्याम धर्म सांगितला. महावीरांचे मातापिता याच संप्रदायाचे अनुयायी होते. महावीरांनीही याच संप्रदायाची दीक्षा घेतली. महावीरांच्या सुधारित संप्रदायाला जिनकल्पआणि पार्श्वनाथांच्या प्राचीन संप्रदायाला स्थविरकल्पम्हणतात. पार्श्वनाथांनी चातुर्यामसंवरम्हणजे अहिंसा, सत्य, अचौर्य व अपरिग्रह ही चार व्रते प्रतिपादन करणारा चातुर्याम धर्मशिकविला. महावीरांनी त्यांत ब्रह्मचर्यव्रताची भर घालून आपली पाच महाव्रते किंवा पंचयामिक धर्मसांगितला. यांशिवाय प्रतिक्रमण म्हणजे स्वपापांची कबुली व प्रायश्चित्त घेणे, नग्नव्रत, संन्यास व तप या गोष्टींवर महावीरांनी विशेष भर दिला. पार्श्वनाथांचा व महावीरांचा असे दोन्ही संप्रदाय काही काळ निराळे होते परंतु महावीरांनी त्यांना नंतर एकत्र केले. जैन धर्माला प्रभावी धर्म बनवण्यात महावीरांनी मोठा वाटा उचलला असल्याने जगातील प[रमुख धर्मसंस्थापकांत त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

 

जैन अथवा बौद्ध धर्म हे वैदिक धर्म व कर्मकांडाविरुद्ध आलेली प्रतिक्रिया स्वरूपात जन्माला आले असा सावरसाधारण समज आहे, पण त्यात वास्तव नाही. मुळात वैदिक धर्म भारतात सनपूर्व १२०० नंतर आला. भारतीय ऐहिक, वैचारिक संस्कृती त्याच्या फार पूर्वी वैभवाच्या शिखरावर पोचलेली होती. समण विचारधारांनी वेगवेगळ्या तत्वद्न्यानाच्या, संप्रदायांच्या आणि जीवनहेतूंच्या माध्यमातून लोकधर्मातूनच आलेल्या लोकांचे वैचारिक व आध्यात्मिक प्रबोधन करण्याचे कार्य विस्तृत केलेले होते. पुराणे ही वेदपूर्व वैचारिक चळवळ समजून घेण्यास मदत करतात. असे असले तरी काही वैदिक विद्वान वेद हेच समण परंपरेचे स्त्रोत होत असे आग्रहपूर्वक सांगतात. उदा. आपल्या “वैदिक संस्कृतीचा इतिहास” या ग्रंथात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पृष्ठ क्र. ३५३ वर एकीकडे म्हणतात कि, “बौद्ध व जैन धर्म म्हणजे वैदिक परंपरेच्या विरुद्ध बंड करून निघालेली हिंदुंचीच पाखंडे होत.” तर दुसरीकडे लगेच म्हणतात कि “बौद्ध व जैन धर्माचा वैदिक धर्माशी असलेला ऐतिहासिक संबंध अगदी निकटचा आहे.” (पृ. ३५८)

पण प्रसिद्ध अभ्यासक जोहान्स ब्रोंकहोर्स्ट म्हणतात कि, जैन व बौद्ध धर्म हे वैदिक धर्माच्याच शाखा आहेत अशी मान्यता असली तरी ते खरे नाही. हे दोन्ही धर्म वैदिक धर्माच्या प्रभावक्षेत्रापासून दूर असलेल्या भागात जन्माला आले. वैदिक तत्वद्न्यानाचा आधार आणि जैन-बौद्धांच्या तत्वद्न्यानाचा आधार परस्परविरोधी आहे. ( Brahmanism: Its place in ancient Indian society by Johannes Bronkhorst, p. 362,) जैन आणि बौद्ध धर्म उदयाला आले ते मगधात. मगध तर वैदिकांना दीर्घ काळ त्याज्ज्य असलेला प्रदेश होता. वैदिक धर्मियांचे वास्तव्य इसपू तिस-या शतकापर्यंत आर्यावर्त म्हणजे कुरु-पांचाल या प्रदेशातच होते. मगधात त्यांचा प्रवेशाच झाला नसल्याने त्याविरुद्ध हे नवे दोन धर्म जन्माला येण्याची आवश्यकता नव्हती. मुळात जैन आणि बौद्ध धर्माला समन संस्कृतीची अतिदीर्घ पार्श्वभूमी आहे. किंबहुना संन्यास, योग, अहिंसा, ब्रह्मचर्य इत्यादि बाबी समन संस्कृतीचा स्वतंत्र उद्गार आहे. महावीर या परंपरेतील श्रेष्ठ समाजसुधारक होते व त्यांनी आपल्या तत्वज्ञानातून आणि संघटनेतून धर्म सुधारक म्हणून स्थान मिळवले.

ईश्वराशिवाय धर्म असू शकतो, ही गोष्ट सामान्य माणसाला विचित्र वाटते. कारण धर्म म्हणजे ईश्वरप्रार्थना’, हे समीकरण त्याच्या मनात ठसलेले असते. मराठीत आपण देवधर्म हा समास करून देव व धर्म यांचा संबंध प्रगट करतो परंतु ईश्वर सृष्टिकर्ता आहे, तोच जीवांना त्यांच्या कर्मानुसार चांगलीवाईट फळे देतो, ही कल्पना जैन धर्माला मान्य नाही. सृष्टी ही कोणी केलेली नाही व कोणी तिचा नाशही करीत नाही. प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार आपोआप फळ मिळत असते, अशी विचारसरणी जैन धर्माची आहे. जैन धर्म सृष्टिकर्ता ईश्वर मानीत नसला, तरी पापपुण्य, स्वर्गनरक व बंधमोक्ष मानतो आणि मोक्षप्राप्तीसाठी इंद्रियनिग्रह व्रताचरण, ध्यानधारणा इ. गोष्टी आचरावयास आग्रहाने सांगतो.

असे जरी असले, तरी देवकिंवा ईश्वरनावाची वस्तू जैन धर्मात नाही असे नाही. कर्माचा नाश करून केवलज्ञानप्राप्ती व मोक्षप्राप्ती करून घेतलेला प्रत्येक जीव परमात्माच आहे व तो आदर्श व पूज्य असल्याने त्यालाच जैन ईश्वर म्हणतात. त्याच्या गुणांची प्राप्ती होण्यासाठी, त्याला आदर्श म्हणून पुढे ठेऊन, त्याची पूजाअर्चा आणि भक्ती करणेही जैन धर्माला मान्य आहे. भारतवर्षामध्ये सगळीकडे तीर्थंकरांची भव्य मंदिरे प्राचीन काळापासून अस्तित्वात असून मोठ्या वैभवाने त्यांच्या मूर्तींची तेथे पूजा केली जाते. परंतु प्रत्येक जीवास/मनुष्यास ईश्वर बनण्याचा अधिकार मान्य असलेला हा जगातील एकमेव धर्म अये म्हणायला प्रत्यवाय नाही.

प्रत्येक धर्मात वैचारिक मतभेदांमुळे फुट पडल्याचे आपल्याला दिसते. जैनांचेही तेच झाले. जैनांची पहिली धर्मपरिषद पाटलीपुत्र येथे भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर १६० वर्षांनी भरली होती. या परिषदेत भगवान महावीरांची वाणी एकत्रित केली गेली. त्यानंतर सम्राट चंद्रगुप्ताच्या काळात २१ वर्षीय भयानक दुष्काळ पडला. या वेळीस आचार्य भद्रबाहू हजारो जैन मुनींसह दक्षिणेत गेले. येथूनच श्वेतांबर आणि दिगंबर हे भेद निर्माण झाले असे मानले जाते. या पंथात अनेक मान्यताभेद आहेत, ते असे,

(१) नग्नत्व (अचेलकत्व) हे मुक्तीचे आवश्यक अंग आहे, वस्त्रधारी साधूला केव्हाही मुक्ती मिळणार नाही, असे दिगंबर पंथाचे मत. उलट श्वेतांबर पंथाचे मत असे, की नग्नत्व श्रेष्ठ साधूचे लक्षण असले, तरी वस्त्र धारण केल्याने मुक्तीच्या मार्गात अडथळा येत नाही.

(२) स्त्रीजन्मात मुक्ती नाही, असे दिगंबरांचे मत. स्त्रियांच्या अंतःकरणांत चिंता आणि माया (कपट) असते म्हणून त्यांना मुक्ती नाही. स्त्रियांना तप करता येईल, सद्‌गती मिळविता येईल पण मुक्ती मिळविता येणार नाही. त्यासाठी त्यांना पुरुषजन्म मिळवावा लागेल. उलट श्वेतांबरांचे मत असे, की स्त्रियांनाही तप करून कर्मनाश करता येतो आणि मुक्ती मिळविता येते. चोवीस तीर्थंकरांपैकी एकोणिसावे तीर्थंकर मल्लीही स्त्री होती, असे श्वेतांबर मानतात.

(३) केवलीला (केवलज्ञानी साधूला) आहाराची जरूरी नाही असे दिगंबर मानतात पण श्वेतांबर म्हणतात, की केवली आहार घेतात.

(४) पाणी पिताना व आहार घेताना पात्राचा उपयोग न करता हातातूनच अन्नपाणी सेवन करणे, हे दिगंबर साधूंचे वैशिष्ट्य आहे. श्वेतांबर साधू भिक्षा घेण्यासाठी व अन्न सेवन करण्यासाठी पात्राचा उपयोग करतात. दिगंबर साधू उभे राहून आहार घेतात, तर श्वेतांबर साधू भिक्षान्न आपल्या वसतिस्थानात आणून अन्न सेवन करतात.

(५) अकरा अंगग्रंथ व दसवेयालिय, उत्तरज्झयण  इ. अंगबाह्य ग्रंथांना श्वेतांबर जैनागम समजतात पण ते दिगंबरांना आगम म्हणून प्रमाण नाहीत. मूळ अंगग्रंथांचा लोप झालेला आहे, असे ते समजतात.

(६) उमास्वातीचे तत्त्वार्थधिगमसूत्र  दोन्ही संप्रदायांना मान्य आहे परंतु काही पाठभेद आहेत. तत्त्वार्थाधिगमसूत्रावर उमास्वातीचे जे भाष्य आहे, ते श्वेतांबरांना मान्य आहे परंतु दिगंबरांना ते मान्य नाही. तत्त्वार्थाधिगमसूत्रामध्ये जे अनेक सांप्रदायिक पाठभेद आहेत, त्यांपैकी काही खालील विषयांसंबंधी आहेत :

(अ) दिगंबर सोळा स्वर्ग मानतात तर श्वेतांबर बाराच स्वर्ग मानतात.

(आ) दिगंबर पृथ्वी, आप, तेज, वायू व वनस्पती या पाच जीवांना स्थावरजीव मानतात तर श्वेतांबर  पृथ्वी, आप व वनस्पती हे तीनच स्थावर मानतात.

(इ) दिगंबर कालहे स्वतंत्र द्रव्य मानतात तर श्वेतांबरांपैकी फक्त काहीच आचार्य कालाला स्वतंत्र द्रव्य मानतात.

(ई) पाच अनुव्रतांच्या नावांमध्ये व क्रमामध्ये दोन्ही संप्रदायांत मतभेद नाही परंतु तीन गुणव्रते व चार शिक्षाव्रते यांच्या नावांमध्ये व क्रमामध्ये त्यांच्यात मतभेद आहेत.

 

पण या दोन पंथाच्या अनुयायांना आपापल्या पंठाचीही मते बदलावी वाटली आणि त्यातून पुढे अजून उपपंथ पडत गेले. दिगंबर पंथात वीसपंथी, तेरापंथी असे काही तर श्वेतांबरांत मंदिरमार्गी, स्थानकवासी असे काही उपपंथ निर्माण झाले आणि जैन तत्वज्ञानही कोठे विस्तारित तर कोठे संकुचित झाले. असे असले तरी उत्तर, मध्य व दक्षिण भारतात हा धर्म फार मोठ्या प्रमाणावर विस्तारला. अनेक राजांनी त्या धर्माला तर स्वीकारलेच पण राजाश्रयही दिला. महाराष्ट्रात हा धर्म केवढा प्रबळ होता याचे पुरावे इसपूच्या तीस-या शतकातील लोहगड व पाले येथील शिलालेख, देवगिरी किल्ल्यावरील जैन गुंफा, जिंतूर (जिनपूर), कोल्हापूर-सांगली इत्यादी भागातील शिलालेख व जैन गुंफा यावरून दिसते. राष्ट्रकुट काळात तर या धर्माने मराठी जीवनही व्यापले होते.

 

आठव्या शतकापर्यंत हा धर्म आपले सर्वस्वी स्वतंत्र अस्तित्व राखण्यात यशस्वी झाला. वैदिक धर्मातील कल्पनांना जैनांनी थाराही दिला नाही. पण दक्षिणेत  आचार्य जिनसेनांच्या काळात दक्षिणेत ब्राह्मणी (वैदिक) धर्म आणि जैन धर्मात भीषण संघर्ष सुरु होता. महावीरांच्या  उदारतम संस्कृतीला  अनुसरून त्यांनी ब-याचशा ब्राह्मणी कर्मकांडांचे जैनीकरण केले. ते पुढे म्हणतात कि कोणीही साहित्यकार आपल्या काळातील सामाजिक प्रभावांपासून अलिप्त राहू शकत नाही. ही कृतीही त्याला अपवाद नाही. मनुस्मृतीत ज्याप्रमाणे गर्भादानापासून अंतिम संस्कारापर्यंत जी जी कर्मकांडे येतात त्याचेच जैन संस्करण या पुराणात आलेले आहे. पण अर्थात यात बदलही असून अहिन्सादी जैन व्रतांचा स्वीकार ज्याही व्यक्तीने केला त्यालाच ब्राह्मण मानले गेले. अशा व्रतसंस्कार झालेल्या व्यक्तीने यज्ञोपवीत धारण करणे अनिवार्य केले.....आदिनाथांनी समाज व राज्यव्यवस्था स्थापन केली व तीनच वर्ण निर्माण केले. पण भरत चक्रवर्तीने ब्राह्मण वर्णाची स्थापना केली. यात व्रतसंस्काराने कोणीही ब्राह्मण बनू शकतो असे म्हटले. जैन ब्राह्मणाने असी, मसि, कृषी, आणि वाणीज्याच्या सहाय्याने उपजीविका करावी.  (पृ. ८, पृ. १० “Mahapuran ( Adi Purana ) Bhagavat Jinasenacarya By  Pandit Panna Lal Jain) भारतीय ज्ञानपीठ, काशी, १९४४) क्षत्रीय, वैश्य आणि शुद्र वर्णाची स्थापना ऋषभदेवांनी केली तर ब्राह्मण या वर्णाची स्थापना चक्रवर्ती भरताने केली असेही या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे. अर्थात या वर्णांचा अर्थ आणि त्यांच्या नियत कर्मांना त्यांनी व्रत बंधनात बांधले हे वेगळेपण महत्वाचे आहे. (आदिपुराण पर्व ३८) असे असले तरी वैदिक व्यवस्थेचे हे बदल करून का होईना केले गेलेले अनुसरण आहे व ते प्राचीन ग्रंथांतील मतांशी मेळ खात नाही हे स्पष्ट आहे.

एकंदरीत प्राप्त स्थितीत तडजोड करण्याच्या अथवा आपला धर्म वरिष्ठ असून वैदिक धर्म दुय्यम आहे हे दर्शवण्यासाठी प्रतिक्रियास्वरूप ही वर्णने आलेली दिसतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे समग्र जैन साहित्यात वर्णांचा व स्पृश्य-अस्पृश्यतेचा स्पष्ट उल्लेख प्रथम फक्त जिनसेनकृत आदिपुराणातच मिळतो. पण या पुराणाचा आजच्या जैनांवर अद्भुत प्रभाव असून श्रेष्ठ-कनिष्ठता व ब्राह्मणी संस्कारांचे जैन धर्मात मुळात नसलेले स्थान त्यांच्यात आज रुजलेले दिसते.

 

जैन धर्मतत्वे पूर्णतया स्वतंत्र असतानाही आज जैनांचे वेगाने वैदिकीकारण होत आहे काय याची शंका यावी असे वातावरण आहे. महावीरांनी व पार्श्वनाथ यांनी अशी परिस्थिती आहे. एके काळी सहिष्णू असणारा हा धर्म संकुचित वृत्तीचा व असहिष्णू बनत चालला आहे हे अनेक घटनांवरून दिसते. जातीय जाणिवांचा त्याग केलेला हा धर्म आज कोठेतरी जातीयही झाला आहे आणि यामुळे या धर्माचा विस्तार पूर्वी जेवढ्या मोठ्या प्रमाणात होता तो आज दिसत नाही. पूर्वी जैन धर्मात ज्ञानी साधुंची एक प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरा होती. त्यांनी मराठीसह देशांतील अनेक जनभाषांना समृद्ध केले. साहित्य-व्याकरणही दिले. आज ती परंपरा क्षीण झालेली आहे. त्यामुळे खुद्द जैनांनाच आपल्या प्राचीन साहित्यात काय म्हटलेले आहे हे माहितही नाही. जैनांकडे पाहण्याची जैनेतरांची दृष्टी “एक संकुचित प्रवृत्तीचा अनुदार धर्म” अशी होत गेलेली आहे आणि हे या अतिप्राचीन धर्माला शोभणारी बाब आहे असे म्हणता येणार नाही. वैदिकीकरणाचा मोह हेच या वाढत्या अनुदार प्रवृत्तीमागे आहे हे आजच्या जैन बांधवांना लक्षात घ्यावे लागेल. सर्व जीवांना ईश्वर होता येण्याची क्षमता आहे यावर श्रद्धा असलेल्या महनीय तत्वज्ञान असलेला हा धर्म संकुचित प्रवृत्तीच्गा बनणार असेल तर तो विश्वधर्म कसा होईल यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे!

 

-संजय सोनवणी 

1 comment:

  1. फारच उदबोधक विवेचन. सामान्यत: या बाबी फार कमी लोकांना माहित आहेत. या पध्दतीचे लेखन काही सन्मान्य अपवाद वगळता सहसा आढळून येत नाही. आणि जाती धर्माच्या habitualउल्लेख/लेखाभिमानापुढे अशा प्रकारच्या लेखनाची स्वतंत्र, समत्वाने विचार करण्याची फारशी सवय भारतीय लोकात नाही. तशी रुजवली गेलीही नाही. प्रयत्न झालेच नाहीत असे नाही पण प्राचीन भारतीय अध्यात्म परंपरेचा मुळ पाया हा मग तो ईश्वर केंद्री , निसर्ग केंद्री वा अनात्मवादी असो तो अखंड जीवांचे कल्याण, स्वास्थ्य पाहतो. हेच जैन परंपरेनेही व्यक्त केले आहे. जगा आणि जगू द्या हे जीवन भाष्य आहे. स्थळ, काल व वेळ, भौगोलिक घटक यांचाही कारणपरत्वे त्या त्या संस्थांवर कडक, निर्बधयुक्त, लवचिक प्रभाव पडतच असतो. विद्या व्यासंग करुन समत्वभाव सांगणे वेगळे व प्रत्यक्षात जीवन व्यवहारात, व्यक्तीगत आयुष्यात वापर/अनुभव करणे या वेगळया बाबी ठरतात. त्यांचे निकष हितसंबध वेगळे कठोर असतात.
    जैन धर्मासारख्या अतिप्राचीन धर्म, परंपरेची मुळ शिकवण, व्यापक अनेकांतवादी दृष्टीकोन आपण वाचकांसमोर आणला त्यासाठी आपले मनापासून अभिनंदन. अभय पवार, वांद्रे,मुंबई.

    ReplyDelete

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी

    महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी -संजय सोनवणी   आम्ही मराठी माणसे इतिहासात फार रमतो. बरे, ज्याही इतिहासात आम्ही रमतो तेवढ्या ...