Sunday, April 16, 2023

महाराष्ट्र आणि जैन धर्म

 


(२६.०३.२०२३. प्रसिद्ध इतिहास संशोधक, विविध धर्मांचे अभ्यासक आणि लेखक श्री संजय सोनवणी यांनी सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेत दिलेले व्याख्यान. )

जय जिनेंद्र

जैन धर्माचा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की, जगभरातील जे धर्म आहेत ते बहुतांशी कर्मकांडात्मक आणि सृष्टीनिर्माती कोणी ईश्‍वर अथवा अचिंत्य शक्ती आहे असा विश्वास बाळगणारे आहेत. पण जैन धर्म हा त्यात विशेष वेगळा आहे कारण तो मानतो की विश्‍व आदिम कालापासून आहे असेच आहे. त्याची निर्मिती झाली नाही कि कोणी देव अथवा ईश्वराने त्याची निर्मिती केलेली नाही. ते आहे असेच स्थिर आहेआणि त्यात कर्मामुळे बदल होत असतात. कर्मसिद्धांत असेल, स्याद्वाद असेल, अनेकांतवाद असेल, तत्वद्न्यानाचे अभिनव व अलौकिक असे सिद्धांत जैनांनी मांडले. कर्म या सिध्दांतावर तर प्रचंड अशी चर्चा जैन धर्मामध्ये दिसते की इतकी सखोल चर्चा कोणीही केलेली नाही. कर्म सिद्धांत आज लोकांना भगवद्गीतेतील “कर्मण्येवाधिकारस्ते...” सारख्या वचनातून माहित असते पण तो सिद्धांत अर्धवट आहे. जैन तत्वज्ञानातून केलेली उसणवारी आहे.  हे विधान पॉप्युलर आहे खरे, पण  काही घेतलं जैनांपासून. परंतु ते तेवढं समाजमनावर ठसवण्यामध्ये मधल्या काळामध्ये, म्हणजे दहाव्या शतकानंतर विशेषत:,  ते विशेष काही शक्य झालेलं नाही. जैन तत्वज्ञानाचा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की, वैश्‍विक धर्म जर कोणता असेलजो विश्‍वाला एक शांति देवू शकेल, एक बंधुभाव वाढवू शकेल आणि प्रत्येकाला, प्रत्येक जीव हा परमेश्‍वर आहे, प्रत्येक जीव हा स्वत:च्या विकारावर विजय मिळवू शकतो, जिन होऊ शकतो असे मानणारा हा जगातला एकमेव धर्म आहे. त्या अर्थाने जीव कोणीही असू शकतो. मनुष्याचे घ्याल तर तो  पृथ्वीतलावरचा कोणत्याही वंशाचा, कोणत्याही राष्ट्रातला, कोणत्याही प्रांतातला व्यक्ती असू शकतो.  त्यामुळे जो आपला णमोकार महामंत्र आहे, त्याच्याकडे मी विशेष आकर्षलो गेलो कारण, बहुतेक प्रार्थना कशा असतात...‘देवा मला हे दे... देवा मला ते दे...देवा माझी ही इच्छा पूर्ण कर ...ती इच्छा पूर्ण कर’ पण णमोकार मंत्रात उपाध्याय आहेत, ‘सिध्द आहेत, अरिहंत आहेत, आचार्य आहेत... त्या सर्वांना नमस्कार आहे पण कोणाचही नाव घेतलेलं नाही.  तीर्थंकरांचंसुद्धा नाव घेतलेलं नाही. हा धर्म व्यक्तीपुजकही नाही. सर्वशक्तीमान ईश्वराला तर स्थानच नाही. प्रत्येक माणसांमध्ये तीर्थंकर होण्याची क्षमता आहे असं माणनारा हा जगातला एकमेव धर्म आहे. अलिकडच्या काळात  जैन धर्माच्या तत्त्वांची मांडणी कोणी कोणी केलेली आहे याचा अभ्यास केला तेंव्हा मी बॅरिस्टर वीरचंद गांधीकडे वळालो.

बॅरिस्टर वीरचंद गांधी कोण ? हे जैनांनासुद्धा दुर्दैवाने फार माहित नाहीत. 1893 साली शिकागो येथे जी पहिली धर्मसंसद झाली, ज्या स्वामी विवेकानंदांना बोलवलं नव्हतं, ज्यांच्यामुळे स्वामी विवेकानंदाना पाच मिनिटे का हाईना बोलायची संधी मिळाली, ते विवेकानंद आज जगभर पॉप्युलर आहेत. परंतु ती संधी मिळवून देणारे बॅरिस्टर वीरचंद गांधी हे जैन धर्मातर्फे तेथे आपली मते मांडायला तेथे गेले होते आणि त्यांचा जैन तत्त्वज्ञानाबरोबर जगातल्या सर्व धर्मांचा अभ्यास होता. बौध्द असेल, हिंदू असेल, वैदिक असेल किंवा इस्लाम असेल, ख्रिश्‍चन असेल, चायनीज असेल या सर्व धर्मांचा प्रगाढ अभ्यास असणारे 19 व्या शतकातले सर्वात महान व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला बॅरिस्टर वीरचंद गांधी यांच नाव घ्यायला लागेल. सम्मेद शिखरजीचा आता वाद चालू झाला आहे, आपल्याला माहित आहे. या वादामध्ये बॅरिस्टर म्हणून 1890 साली बॅरिस्टर वीरचंद गांधी यांनी पहिली केस लढली होती. याच कारण असं आहे की सम्मेद शिखरजीच्या परिसराची मालकी तिथल्या राजाकडं होती आणि तेथे ब्रिटीशाना काही त्यांनी चार-पाचशे एकर जमिन विकली होती आणि त्या जमिनीत त्यांनी डुकराचा कत्तलखाना काढला होता. तो कत्तलखाना काढण्यासाठी बॅरिस्टर वीरचंद गांधी कलकत्त्याला गेले, कारण कलकत्ता येथे त्यावेळी ब्रिटीशांचा सर्व कारभार चालत होता. वीरचंद गांधी तेथे जाऊन बंगाली भाषा शिकले. त्यांनी अकबर- शहाजहानच्या काळापासून सर्व कागदपत्रे गोळा केली आणि सिद्ध केले की या सम्मेद शिखरजीला टॅक्स माफ आहे, येथे कोणत्याही प्राण्यांची हत्या करू नये असे बादशहाचे आदेश आहेत, आणि असे सारे हुकुमनामे असताना ब्रिटीशांनी हा घोळ का करावा आणि ही जागा कत्तलखाण्यासाठी विकावी का ? आणि विकली तर विकली ठिक आहे, त्यांची ती मालकी आहे, परंतु ती डुकुरांचा कत्तलखाना काढून मूळ शिखरजीचे पावित्र्य का घालवावं ? ती केस बॅरिस्टर वीरचंद गांधी जिंकले. सम्मेद शिखरजीचं पावित्र्य त्यावेळी कायम झालं. आता दुर्दैवाने पुन्हा त्यावर आघात करण्याचा प्रयत्न झालेला आहे. याबद्दल मी दैनिक लोकमतमध्ये लेखही लिहिला होता की, हे जे काही घडतेय ते योग्य नाही. जे मुगल-सल्तनत चालविणारे  अधिकारी त्यांनीसुध्दा तेथे अहिंसेचं तत्त्व मान्य केलेलं आहे, तेथे कोणत्याही प्रकारची हिंसा घडू नये यासाठी आदेश काढले-हुकुमनामे काढले त्याची पायमल्ली त्यांनी कधी केली नाही ती तुम्ही कशी काय करता ? त्याच्या पावित्र्याचा भंग का करताय ?

तर, 1893 च्या धर्मसंसदेमध्ये बॅरिस्टर वीरचंद गांधींना तीन भाषणे द्यावी लागली. विवेकानंद फक्त पाच मिनिटे बोलले. संपूर्ण पंधरा दिवसाच्या परिषदेमध्ये बॅरिस्टर वीरचंद गांधींचा पहिलं भाषण इतकं गाजलं की त्यांना तीन वेळा त्यांना बोलावं लागलं. ते इथेच थांबले नाही तर  अमेरिकेनं त्यांना ठेवून घेतलं आणि 550 हून अधिक व्याख्यानं बॅरिस्टर वीरचंद गांधीनी अमेरिकाभर दिली. त्यानंतर ते इंग्लडला आले. तेथेही त्यांनी व्याख्याने दिली आणि त्यांनी समाजसुधारण्यासाठी, म्हणजे स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली. अनेक संस्था उभ्या केल्या. भारतात त्यावेळी दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांनी अमेरिकेतून देणग्या गोळा करून करून एक जहाज भरून धान्यसुध्दा भारतात पाठवलं होत. इतका मोठा महान कार्य करणारा आणि तत्त्वज्ञ ज्याचा तत्त्वज्ञानावर इतका गाढा अभ्यास आणि जैन तत्त्वज्ञान हे सर्व तत्त्वज्ञानावर मात करून कसं उरतं हे सिध्द करणारा एक महापुरुष. त्यांचे आपण प्रत्येक जैनानीच नव्हे तर प्रत्येक भारतीयांनी स्मरण ठेवलं पाहिजे. कारण त्यानी नुसतं जैन धर्माची नव्हे तर संपूर्ण भारताची पताका खर्‍या अर्थाने खांद्यावर फडकावून भारतीय तत्त्वज्ञान हे जगाला एक धाग्यामध्ये कसं बांधू शकतं हे विषद केले. आताचा जो राष्ट्रवाद आहे किंवा जो संघर्ष चालू आहे त्याला मात देण्याचे सामर्थ्य जैन तत्वज्ञानात आहे. अलिकडे आपण पहातो रशिया आणि युक्रेनचा वाद पहातोच आहोत, मागे इराण-इराक आणि अमेरिकेचे चालू होतंच. चीन - अमेरिका हे व्यापारयुद्धाच्या रुपाने एक युध्द चालू होतं असे हे संघर्ष खूप आहेत. करोनाच्या काळामध्ये असं वाटत होतं  की मानव जात आता सुधारेल ...एव्हढे मोठे संकट आल्यानंतर त्यातून काहीतरी माणूस धडा घेईल ...आणि एकमेकाविषयीच्या वागण्यामध्ये स्वत:मध्ये बदल घडवून आणेल आणि जगाची नव्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर रचना होईल. हे नविन तत्त्वज्ञान कोणतं? तर ते काही नविन तत्वज्ञान नाही हे पाच हजार वर्षापूर्वीचं तत्त्वज्ञान म्हणजेच समन संस्कृतीचे जैन तत्त्वज्ञान आहे... हे जैन तत्त्वज्ञान जागतिक पातळीवर जायला हवं. आणि आता सुदैवाने अमेरिका म्हणा, फ्रान्स म्हणा, ब्रिटीश म्हणा हे आता जैन तत्वज्ञानाकडे फार मोठ्या प्रमाणात वळाले आहेत.

मग पुढे हा जो जैन धर्माच्या स्वतंत्र धर्म असल्याचा आणि अल्पसंख्याक असण्याचा संघर्ष सुरू झाला होता, मग त्यात मीही पडलो. अनेक ठिकाणी याविषयी व्याख्याने दिली. पत्रकार परिषदा घेतल्या आणि हे सांगितलं की 19 व्या शतकातच हे सिध्द झालयं की जैन धर्म हा स्वतंत्र धर्म आहे. जैन धर्म हा हिंदू धर्माचा भाग नाही तो हिंदू धर्माचा पंथ नाही कारण त्याचं तत्त्वज्ञान हे स्वतंत्र आहे, त्याचं कर्मकांड स्वतंत्र आहे, त्याची विश्‍वउत्पत्तीची संकल्पना आहे तीही स्वतंत्र आहे. अशा स्थितीमध्ये जैन धर्माला हिंदू धर्माचा किंवा कोणत्याही धर्माचा किंवा बुध्द धर्माचासुद्धा भाग मानता येत नाही. बौध्द धर्म आणि जैन धर्म जरी एकाच काळात होवून गेले असे मानले जात असले तरी... जैन धर्म हा फार पुरातन धर्म आहे. परंतु भगवान महावीर आणि बौध्द समकालीन असल्यामुळे बौध्द धर्माचा जैन तत्त्वावर फार प्रभाव आहे अशी जी काही मान्यता होती, मग हर्मन याकोबी वगैरे अनेक पाश्चात्य विद्वानानी हे दावे खोडून काढलेत. असं असताना जैनांना मात्र स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळत नाही, अल्पसंख्याक धर्म म्हणूनसुद्धा मान्यता मिळत नाही ही गोष्ट अन्यायी आहे. हा संघर्ष सारे जैन बांधव जिंकले हेही एक सत्य आहे.

मित्रहो, झालंय असं की, जैन धर्माकडं स्वत:कडं देण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत. खुद्द महाराष्ट्र आणि ही आपली मराठी भाषा याच्यावर जैनांचे प्रचंड ऋण आहे. एव्हढं मोठं ऋण आहे की ते मराठी भाषिकही फेडू शकत नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ते ऋण आहे. याच्याबद्दल मी बोलेणच.  आचार्य भद्रबाहु... जैन धर्म महाराष्ट्रात आला कधी ? इसवीसनपूर्व तिसर्‍या शतकामध्ये ज्यावेळेस चंद्रगुप्ताच्या काळामध्ये एक मोठा 21 वर्षाचा दुष्काळ पडला. त्यावेळेस आचार्य भद्रबाहू आपल्या साधुना घेवून दक्षिणेकडे निघाले, तेव्हा त्यांचा मार्ग कोणता ? याच्यामध्येसुद्धा खूप वाद निर्माण झालेला होता. काहींना वाटायचं की महाराष्ट्रात ते आलेच नसतील, ते आंध्र मार्गाने केरळ-तमीळनाडू वगैरे भागात गेले असतील. महाराष्ट्रात त्यांचा हा थांबा असू शकत नाही कारण त्यांच्यासमोर त्यावेळेस पुरावेच नव्हते. कारण पुरावे उजेडात आले तर त्याकडे लक्ष जातचं असं नाही. तर आता जो आचार्य भद्रबाहुंच्या प्रवासाचा जो क्रम आहे, दक्षिणेकडे तमिळनाडूपर्यंत पाहोचण्याचा, तो सिद्ध झाला आहे. तमिळनाडूमध्ये तर जैन धर्म फार मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्हाला अजुन एक दुर्दैवी गोष्ट सांगतो, की साडेपाचशेच्यावर जैन शिलालेख आहेत, गुंफा आहेत ते एकट्या तमिळनाडूमध्ये. महाराष्ट्रातही खूप प्रमाणात आहेत. परंतु त्याचं डाक्युमेंटेशन भारत सरकारने केलं नाही, पुरातत्त्व खात्याने केलं नाही. त्यासाठी फ्रेंच सोसायटी ऑफ आर्किओलोजी आहे त्यांनी त्या साडेपाचशे शिलालेखांचं डाक्युमेंटेशन केलं, त्याची क्रमवारी लावली आणि ते आता प्रसिद्ध केलं. बाहेरच्या लोकांना हे इतकं आकर्षण आणि इथल्या सरकारला म्हणा किंवा सामान्य लोक,  तुम्हा-आम्हाला त्याबद्दल मात्र कसलीही आस्था नसते. महाराष्ट्रातील तर अवस्था त्याहूनही दयनीय आहे. म्हणजे आचार्य भद्रबाहू आले, पहिल्यांदा त्यांचा मुक्काम महाराष्ट्रात तापी नदीच्या खोर्‍यात झाला. आपण गेल्याच ‘प्रगति’ च्या अंकामध्ये जो लेख छापलाय ‘शाहदा येथील प्राचीन जैन गुंफांबाबत माहिती देणारा. 2200/2300 वर्षापूर्वीच्या इतक्या जुन्या त्या गुंफा आहेत. त्याची निर्मिती भद्राबाहुंच्या प्रभावात झाली. मग ते तेथून सरकत सरकत तुमच्या या भागात सांगली-कोल्हापूर या भागातून  श्रवणबेळगोळला जावून थांबले आणि काही लोक अजुन दक्षिणेकडे गेले. म्हणजे दक्षिणेकडे जैन धर्म पहिल्यांदा आला तो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये सातवाहन काळातील राजांनी जैनांना इतका राजाश्रय दिला की नाशिक, नाणेघाट, नाणेघाटाच्या अलिकडे पाले नावाचं गाव आहे येथील जैन गुंफा घ्या, तेथे शिलालेखही सापडले आहेत. हे शिलालेख सापडले म्हणून त्या जैन गुंफा आहेत हे सिध्द झालं, नाहीतर तेही झालं नसतं. तर असे शिलालेख   नसलेल्या जैन गुंफा किती असतील याचा आपण अंदाजही बांधू शकत नाही. लोहगडलासुद्धा इ.स.पूर्व दुसर्‍या शतकातला शिलालेख आहे, तो शिलालेख अरिहंतांना नमस्कार करून, म्हणजे “‘णमो अरिहंताणं’” अशी सुरूवात त्या शिलालेखाची होते त्यामुळे या शिलालेखाविषयी कोणाच्या मनात शंका येण्याच कारणच नाही. कराड, सांगली आणि कोल्हापूर या भागात अजूनही उत्खणन होत असताना काहीं ना काहीतरी सापडतं आणि  अलिकडेच एक शिलालेख सापडला होता.

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर... ते जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की, ‘यक्षिणी’ जी लक्ष्मी मानली गेलेली आहे, जैन धर्मामध्ये जी तीर्थंकरांचे संरक्षण करते त्या अंबा यक्षिणीचं ते मंदिर होतं आणि अशी यक्ष आणि यक्षिणी जी जैन यक्ष-यक्षिणींची अनेक उध्वस्त झालेली मंदिरे खूप आहेत. हिंदू मात्र त्यांना आपल्याच देवता समजून यात्रा करतात अक्षरश:, मूळ स्वरूप विसरून गेलेत. पण अजूनही यात्रा करतात. यवतमाळ येथे वाई नावाच गाव आहे. सातारा जिल्ह्यातला वाई नव्हे, वाई नावाची महाराष्ट्रात अनेक गावे आहेत. या वाईला शेतात अक्षरश: विखुरलेली, भग्न झालेली उध्वस्थ जैन मंदिरं सापडलेली आहेत, तिथेही एक शिलालेख सापडला. तो शिलालेख राष्ट्रकूटांच्या काळातला आहे. राष्ट्रकूटांचा जो महामात्य होता भरत. त्याच नावही भरत आणि त्या लेखात ‘भारताच नाव भारत का पडलं’ याचा शिलालेखामध्ये उल्लेख मिळतो. तसाच उल्लेख हाथीगुंफा येथील इ.स.पूर्व दुसर्‍या शतकातल्या जैन सम्राट खारवेलचा एक शिलालेख आहे  त्यातही ‘भारताच नाव चक्रवर्ती भरत वरून पडलेले आहे’ अशी नोंद आहे. याच्यावरती “मी ‘शोध भारत नावाचा”’ म्हणून पुस्तकही लिहिलं आहे. कारण सर्वसाधारणपणे समज काय असतो की, दुष्यंत शंकुतलेचा मुलगा, म्हणजे महाभारतातला ‘भरत’ त्याच्या नावावरून देशाला नाव पडलंय हे खरं नाही कारण, पुराणांनीसुद्धा, म्हणजे ‘विष्णुपुराण’ असेल, ‘विष्णुधर्मोत्तर पुराण’ असे, ‘वायु पुराण’ असेल, ‘मार्केंडेय पुराण’ असेल, या पुराणामध्ये ‘ऋषभदेवांचे पुत्र भरत हे चक्रवर्ती होते आणि त्यांच्यावरून या देशाला ‘भारत’ हे नाव पडलेलं आहे’  असा अगदी स्पष्ट उल्लेख हिंदू पुराणामध्येसुध्दा करून ठेवलेलं आहे हे लक्षात घ्या. त्यांनी ते मोकळेपणाने मान्य केलेलं आहे कारण चक्रवर्ती भरत यांचा महिमाच इतका होता. त्यामुळे आपल्या देशाला ‘भारत’ हे नाव या चक्रवर्ती भरत यांच्यामुळेच, त्यांच्या दिग्विजयामुळे मिळालं आहे.

मराठवाड्यामध्ये ‘जिंतूर’ नावाच गाव आहे. त्याच मूळ नाव ‘जिनपूर’. त्याच्याजवळच पर्वतामध्ये जैन गुंफा आहेत आणि त्या गुंफामध्ये जैन तीर्थंकरांच्या अत्यंत सुंदर अशा मूर्त्या आहेत. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे बर्‍याच गुंफा आहेत त्या अक्षरश: अज्ञाताच्या खाईत आहेत.

आता सगळ्यात धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगतो की कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे दोन वर्षापूर्वी (औरंगाबादजवळ असलेल्या) देवगिरी किल्ल्यावर साफसफाई करताना झाडा-झुडुपांखाली अदृष्य झालेल्या सोळा गुंफा सापडल्या. त्यातील एक गुंफा पावसाने किंवा नैसर्गिक-प्राकृतिक कारणाने कोसळलेली आहे. परंतु त्या गुंफा या जैन गुंफा आहेत हे सिध्द झालं त्याबाबतची बातमी फक्त एका ‘दिव्य मराठी’ नावाच्या एका पेपरमध्ये चार ओळीची बातमी होती. ते एखादं वैदिक ठिकाण असतं किंवा एखादं हिंदू ठिकाण असत तर मला वाटत टिव्ही,चॅनलवाल्यांनी गदारोळ केला असता, उलथापालथ केली असतंमासिकांनी केला असता, वक्त्यांनी केला असता, धर्मांध लोकांनी केला असता. परंतु या जैन गुंफाकडे एक पुरातन ठेवा सापडला याकडे खुद्द जैनांचही लक्ष गेलेलं नाही हे खरं दुर्दैव आहे.

म्हणजे महाराष्ट्रामध्ये जैन धर्म यवतमाळपासून कोकणापर्यंत आणि खानदेशापासून ते कोल्हापूरपर्यंत किती मोठ्या प्रमाणात पसरला होता याचे पुरावे आजही मिळतात. उध्वस्थ झालेली ठिकाणं खूप आहेत...उदा.नाशिकपासून आपण त्र्यंबकेश्‍वरला जातो तेव्हा मार्गात सात ते आठ पुरातन मंदिरांचा समूह आहे तो ही उध्वस्त झालेला आहे, तिथेही कोणी जात नाही. परंतु ती जैन मंदिरे आहेत.  फेसबुकवर लोकांनी काही फोटो वगैरे टाकलेले होते, परंतु त्याचेही पुढे काही झालेलं नाही.  म्हणजे महाराष्ट्र आणि जैन धर्म यांच नाते कमितकमी 2200 वर्ष जुनं आहे आणि तेही लेखी पुराव्यानुसार म्हणतोय, त्याच्या आधी किती काळ असेल ते आपल्याला माहित नाही. परंतु जे लिखित स्वरूपात जे पुरावे उपलब्ध आहेत त्यानुसार 2200 वर्षे हे तर पक्के आहे.

आता...मराठी भाषा. आज आपण जे मराठी बोलतो ती ‘महाराष्ट्री प्राकृता’चं आजच रूप आहे. कारण भाषा बदलत जात असतात. शंभर वर्षापूर्वी आपले लोक जे बोलत होते, ते आज आपण तशा भाषेत बोलत नाही. आगरकर किंवा टिळक ज्या भाषेत लिहायचे किंवा सावरकार ज्या भाषेत लिहायचे ती मराठी आणि आपली आताची मराठी यामध्ये भरपूर फरक पडलेला आहे. कादंबरीकारांची भाषा, म्हणजे  ह.ना. आपटे यांची भाषा आणि आज जे मराठी लेखक लिहितात किंवा भालचंद्र नेमाडे लिहितात त्यांची भाषा यात जमिन-आसमानचा फरक पडलेला आहे. कारण जीवंत भाषा असते, ती नेहमी बदलत असते पुढे जात असते.

गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ आहे, जो सातवाहन सम्राट हाल सातवाहन याने तो संपादित केला, स्वत:ही तो कवी होता त्याच्याही त्यात कविता आहेत, आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जैन कवी पालित्य किंवा पादलिप्त यांच्या अनेक गाथा (कविता) आहेत. म्हणजे हे धार्मिक स्वरूपाच लेखन नाहीए, ते अत्यंत जीवनाचे वर्णन करणारे, जीवनातलं सौंदर्य शोधणारे, असे ते कवी आहेत. इसवीसनाच्या पहिल्या शतकातला हा ग्रंथ. त्याच काळातला अजुन एक ग्रंथ आहे- ‘अंगविज्जा’. ‘अंगविज्जा’ हा एका जैन लेखकाने लिहिलेला ग्रंथ आहे. पण त्याकाळातील, इसवीसनाच्या पहिल्या शतकातल्या सामाजिक स्थिती काय होती? लोक वाहने कोणती वापरत होती ? कपडे कोणते वापरायचे ? अलंकार कोणते वापरायचे ? नौका कोणत्या प्रकारच्या होत्या ? समुद्रातला प्रवास कशाप्रकारे व्हायचा ? नगर व कररचना कशी होती ? गृहरचना कशी होती ? मंदिरे कशाप्रकारची होती ? सण व उत्सव कोणते साजरे करण्यात येत होते ? अशाप्रकारची अत्यंत सखोल सामाजिक जीवनाची माहिती त्या ‘अंगविज्जा’मध्ये मिळते आणि तो आहे महाराष्ट्री प्राकृतात. तोही गद्यात आहे. गाता सप्तशती तर काव्य आहे आणि हा ग्रंथ गद्यात आहे.  आता बघा लबाडी कशी केली जाते. आता आपल्या सर्वांना माहित आहे, ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’ हा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी पुरावे कोणते दिले गेले ? गाथा सप्तशतीचा पुरावा दिला गेला. परंतु ‘अंगविज्जाचे नावसुद्धा काढलं नाही...घेतलं नाही.  शिलालेखातली जी भाषा आहे, आद्यमराठीत शिलालेख तर श्रवणबेळगोळला मिळतो असं आपण म्हणतो. परंतु त्याच्याही पूर्वीचा महाराष्ट्री प्राकृतातला इ.स.पूर्व दुसर्‍या शतकातला तोही जैनच शिलालेख आहे. म्हणजे मराठीचं आज आपण अस्तित्व-प्राचिनत्व सिध्द कोणाच्या जीवावर करू शकतो तर, आज जैनांनी लेखन करून ठेवलं, शिलालेख कोरले त्याच्यामुळेच आपण आज पुरावे सादर करू शकलो. त्यानंतर अनेक ग्रंथ आहेत- पैठणचं ‘विविधतीर्थकल्प’ नावाचा एक ग्रंथ जैन साधूंनी लिहिलेला आहे, त्यात महाराष्ट्रात इसवीसनाच्या सहाव्या शतकात अडुसष्ठ तीर्थस्थळ आहेत. अडुसष्ठ तीर्थस्थळं आणि बावन्न पूज्य प्रतिमा एव्हढं स्वरूप अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होते आणि त्याचं त्यांनी त्यामध्ये वर्णन केलं.

महालक्ष्मी मंदिरातला दीपोत्सव. इसवीसनाच्या 18 व्या शतकापर्यंत ते जैनच मंदिर होतं. ते अंबा या यक्षिणीचंच मंदिर होतं. अंबा (लक्ष्मी) ही यक्षणिच मानली जाते. त्या विष्णूपत्नी लक्ष्मीचं आपण नाव उगीचच गुंतवून नामसाधर्म्याचा फायदा कसा घेतला जातो त्याच हे उदाहरण आहे. परंतु त्या महालक्ष्मी मंदिर आजही पाहिलं तर वरच्या भागात सगळ्या तीर्थंकरांच्या बैठ्या प्रतिमा आहेत. हिंदू मंदिर असतं तर तीर्थंकरांच्या प्रतिमा तिथे येण्याचं काही कारणच नव्हतं आणि तेथे खास दिपोत्सव व्हायचा. दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर जैन समाज दीपात्सव साजरा करायचा. आता महाराष्ट्रात धाराशीव, वेरूळ असेल, अंकाई-टंकाई असेल, मांगी-तुंगी असेल, देवगीरी असेल, लोहगड आहे, पाले म्हणून गाव आहे, चाळीसगाव, पाटण, शाहदा, चांभारटेकडी येथे एवढ्या किमान जैन गुंफा आहेत हे आज सिध्द झालेले आहे. परंतु सिध्द न झालेल्या अजून किती गोष्टी असतील याचं आपल्याला आजही कल्पना नाही.

सातवाहन हा महाराष्ट्राचा आद्य राज्यवंश. इसवीपूर्व 220 ते इसवीसन 2३०, एवढा काळ. म्हणजे त्यांनी साडेचारशे वर्षे राज्य केले. याकाळात त्यांनी जैनांना राजाश्रय दिला. त्यांच्या काळामध्ये अनेक गुंफा निर्माण झाल्या, शिलालेख निर्माण झाले. नाहीतर नाणेघाटच्या रस्त्यावर जैनांचा शिलालेख राजाश्रय असल्याखेरीज येणं शक्यच नव्हतं.

त्यानंतर अहिर राजवंश आला, वाकाटक आले, शिलाहार आले. याही राजांनी जैन धर्माशी फार सलोख्याचे संबंध ठेवले आणि महत्त्वाचा काळ म्हणजे राष्ट्रकूट काळ होय, विशेषत: त्यांचं साम्राज्य आंध्र व कर्नाटकचा काही भाग आणि महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत एव्हढं त्यांच विशाल साम्राज्य होतं आणि ते स्वत: जैन सम्राट होते. त्यामुळे त्यांच्या राजवटीच्या काळामध्ये जैन धर्म हा पूर्ण महाराष्ट्र व्यापला होता असा विद्वानांकडून अंदाज व्यक्त केला जातो. हा जोहान्स ब्रोंकहोर्स्ट यांचा हा अंदाज आहे. हा माझा अंदाज नाही.  महाराष्ट्रातील कमीत कमी चाळीस टक्के जनता तरी जैन होती. नंतर काय झालं मग? समस्या अशी आली की दक्षिणेमध्ये वैदिकधर्मीय  आणि जैन धर्मीय यांच्यामध्ये संघर्ष चालू झाला. याविषयी प्रतिमा शिल्प आहेत. जैन साधूंना सुळावर कसं चढवलं याच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. शेकडो जैन साधूंना अक्षरश: त्यांनी ठार मारलं किंवा जिवंत जाळलं आणि त्यांचे साहित्य बर्‍याच प्रमाणात नष्ट केलं. त्याच्यामुळे जैनांनी त्यावेळी काही तडजोडी स्वीकारल्या. काही आम्ही तुमच्या गोष्टी मान्य करतो, पण आमच्या पद्धतीने हे धोरण ठेवले. जैनांना जाती- वर्णव्यवस्था आधी मान्य नव्हती परंतु आचार्य जिनसेनांनी ती मान्य केली. पण त्यांच्याच गुणभद्र नावाच्या शिष्यांनी ते अमान्य करून टाकली. जाती-वर्ण  हे काही खरं नाहीए... उच्च निच्च वर्णभाव योग्य नाही, जैनांनी तो पाळू नये अशा स्वरूपाची त्यांनी घोषणा करून आपल्या गुरुच्या मताचे त्यांनी खंडन केले. पुष्पदंतांनी महापुराण लिहिलं ते महाराष्ट्री प्राकृतामध्येच आहे. आणि असं म्हणतात की पुष्पदंताइतका श्रेष्ठ कवी कालिदाससुद्धा झाला नाही.  कालिदासापेक्षाही उत्कृष्ट प्राकृताचं सौंदर्य, म्हणजे आज जी आपण भाषा बोलतो त्या प्राचीन भाषेचे खरे सौंदर्य पुष्पदंतांनी आपल्या महापुराणामध्ये दाखवून दिले. त्यांची ख्याती तर प्रचंड होती. म्हणजे पुष्पदंतांचे तर कोणी प्रतिस्पर्धीच नव्हते. असा तो एक काळ होता की त्या काळात असा महाकवी कोणी झाला नाही. त्यापूर्वीही नाही कि नंतरही नाही. पुष्पदंतांनी तो ग्रंथ महाराष्ट्री प्राकृतामध्ये महाराष्ट्रामध्ये तो ग्रंथ लिहिला आहे हे आपल्याला विसरता येत नाही.

आज प्रगति आणि जिनविजयचा जो वर्धापन दिन आहे आणि दक्षिण भारत जैन सभेने हे जे महत्त्वाचे कार्य हातात घेतलंय ते अनेक अंगांनी पुढे जावू शकतं.  सरहद संस्था आहे माझे मित्र संजय नहार यांची. त्यांचा एक असा प्रयत्न चालू आहे की, महाराष्ट्रातले हे जे उध्वस्त जैन मंदिरे अथवा गुंफांचे अवशेष आहेत त्याच किमान डाक्युमेंटेशन व्हावं आणि किमान पुढच्या पिढीसाठी त्या वास्तु जरी पुनुरूध्दारण जरी करू शकत नसलो तरी किमान डाक्युमेंटरीच्या स्वरूपात, पुस्तकाच्या स्वरूपात, फोटोग्राफच्या स्वरूपामध्ये, व्हीडीओच्या स्वरूपात त्याच एक डाक्युमेंटेशन केलं जावं. म्हणजेच महाराष्ट्रातील जैन धर्म किती प्रबळ होता हे सिध्द होईल. म्हणजे राष्ट्रकुटाच्या शेवटच्या काळामध्ये वैदिक आणि जैनांमध्ये झालेलं जे संघर्ष आहे, त्या संघर्षामुळे महाराष्ट्रात लोकसंखेने 40% असणारा जैन समाज किती टक्क्यावर आला आणि भारतभर म्हणाल तर अर्धाटक्का. कारण झालं असं की, टिकावंच करता येणार नाही अशी स्थिती निर्माण केली. त्यानी वैदिक धर्माच प्राबल्य म्हणा किंवा स्तोम म्हणा, एव्हढ वाढवलं की, त्यांच्यापुढे तगून राहाणं अवघड झालं. राजाश्रय मिळेना. राष्ट्रकूटानंतर जैनांना राजाश्रय मिळणं बंद झाल. त्यामुळे जैनांची अधोगती होत गेली. परंतु महाराष्ट्री प्राकृतातलं लेखण 80% प्राकृत ग्रंथ आज ही उपलब्ध आहे आणि हे सर्व 80% प्राकृत ग्रंथ केवळ जैनांनी लिहिलेली आहेत. म्हणजे त्याची संख्या दोन ते अडीच लाख इतकी भरते. हे दोन ते अडीच लाख ग्रंथ दोन हजार वर्षाच्या काळामध्ये लिहिले गेले. त्याच्यामध्ये धार्मिक ग्रंथ आहेत, ‘पउमचरिय’ सारखं प्राकृत महाकाव्य आहे. वासुदेवहिंडीसारखं अत्यंत उच्च कलाकृती मानता येईल आणि ज्यामध्ये प्राचीन व्यापारी मार्गसुद्धा उल्लेखले आहेत आहेत जे भारताचे मध्य आशिया म्हणा, चीनला म्हणा, पश्‍चिम आशियाला जोडणार्‍या, किंवा समुद्रमागे श्रीलंका असेल, जावा, सुमात्रा या जोडणार्‍या समुद्रमार्गाबद्दल सखोल विवेचन त्यात मिळतं. त्यात भूगोलाचं ज्ञान मिळतं, त्यात त्याकाळातील समाजस्थितीचं ज्ञान मिळतं आणि त्याकाळात जैन धर्मियांच धार्मिक तत्त्वचिंतन काय होतं आणि त्यात कसकसे भर पडत गेली याच ज्ञान मिळतं.

एक गोष्ट तुम्हाला सांगतो ‘शून्याचा शोध’. आपण मानतो की आर्यभट्ट यांनी शुन्याचा शोध लावला. इतकं धांदांत खोटं दुसरं कोणतंही नसेल. बक्षाली  हस्तलिखित सापडले ते इसवीसनातल्या पहिल्या शतकातलं आहे. ते गांधारमध्ये सापडले. म्हणजे आताच्या भारतातलं नाही. कारण आता विभाजन झालेलं आहे. ते जैन हस्तलिखित आहे आणि त्याच्यामध्ये ‘शून्य’ चा उल्लेख तर आहेच आहे. हा शुन्य आज आपण जसा वापरतो त्याप्रमाणेच त्याच चिन्ह त्यांच्यामध्ये दिलेल आहे.

त्यानंतर इसवीसनपूर्व तिसर्‍या शतकातला ‘जंबुद्विवपन्नति’ नावाचा एक ग्रंथ आहे. तो संस्कृतमध्ये त्याच रूपांतर ‘जंबुद्विपप्रज्ञप्ती केलेलं आहे. कारण प्राकृत आधीची तर  संस्कृत नंतरची भाषा आहे. संस्कृत म्हणजे काय तर प्राकृत शब्दांच थोडसं सुलभ उच्चार देऊन आहे त्याच शब्दांची नवी रूपे बनवून तयार केलेली भाषा. प्राकृतावर संस्कार करायचे म्हणजे संस्कृत होते. जंबुद्दीवपन्नती हा ग्रंथ इसवीसनपूर्व चौथ्या ते सनपूर्व तिसर्‍या शतकाच्या दरम्यान लिहिला गेलेला ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये तर ‘शुन्या’चा उल्लेख आहेच आहे परंतु पृथ्वीचं सूर्यापासूनच अंतर, पृथ्वीचं चंद्रापासूनच अंतर, पृथ्वीचं नक्षत्रांपासूनच अंतर, ग्रहांचं अंतर याची अगदी गणिती पद्धतीने त्याची सूत्रं दिलेली आहेत. आताच्या आधुनिक विज्ञानाच्या कसोटीत ती तंतोतंत उतरत नाहीत, परंतु त्याकाळात नुसत्या नजरेने निरीक्षण करून जैन साधूंनी नुसता पृथ्वीचाच नाही तर, संपूर्ण विश्‍वाचा विचार केला आहे.

तिसरी गोष्ट ‘जंबूद्वीप’ हा शब्द आपण सतत वापरतो. ही ‘जंबुद्विप’ संकल्पना आली कोठून? वेदांमध्ये ‘जंबुद्विप’ नावाची कसलीही कल्पना नाही. वेदामध्ये भूगोल येतो तो फक्त दक्षिण अफगाणिस्तानातला, जिथे हे आर्य लोक किंवा वैदिक लोक होते. तिथलाच भूगोल तेव्हढा येतो. पृथ्वी सपाट आहे का गोल आहे याची त्यांना काही माहितीच नव्हती. परंतु पृथ्वीतलावर सातद्विप आहेत त्यातलं एक ‘जंबुद्वीप’ नावाचं एक द्विप आहे, मग त्याचे भाग कोणते तर - हिमवत असेल म्हणजे आताच हिमालय, काश्मिर वगैरे पासून ते पार दक्षिणेला ऐरावत वर्षपर्यंत असं करून हिमालयाच्या पलिकडचे जे प्रदेश आहेत उत्तरकुरु वगैरे ही सगळी वर्णनं  आपल्याला ‘जंबुद्वि’ संकल्पनेत पहायला मिळतात. म्हणजे भूगोलाचं ज्ञानसुद्धा विस्तारण्याच काम जैनांनी केले. आजच्या भूगोलसारखं ते अ‍ॅक्युरेट असणं शक्य नाही. कारण ती आधुनिक साधणं नव्हती. अर्थातच त्या महितीला मायथॉलॉजिकल रूप दिलं गेलेलं आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये मायथालॉजिकल रूप दिली जातात त्यात आश्‍चर्य नाही, परंतु आज विचार करण्याची त्यांची प्रज्ञा, त्यांची प्रतिभा जागृत होती याच हे फार मोठं उदाहरण आहे.

जगाच्या पाठीवर आज जर खर्‍या अर्थाने शांतता नांदायची असेल, जगात जर खर्‍या अर्थाने एक जग-एक राष्ट्र व्हावं असं वाटत असेल तर जैन तत्त्वज्ञानाला पर्याय नाही’ असं वीरचंद गांधीनी 1893 साली शिकागो येथे जगाला ठासून सांगितलं. ते म्हणाले कि जैन धर्म तर स्वतंत्र आहेच, परंतु हे जे ख्रिश्‍चन धर्माचा माणूस सांगतो ना माझा धर्म श्रेष्ठ, इस्लामवाला सांगतो माझा धर्म श्रेष्ठ आणि मी तर श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवायला आलेलोच नाही. मी फिलॉसॉफिकल बेसवर बोलतोय, माझ्या फिलॉसॉफीला प्रतिवाद करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे ? अगदी सूक्ष्म जीवापासून, त्यांच्या जिवीताच्या हितापासून ते मनुष्यापर्यंत या सगळ्या जीवांचं जो धर्म विचार करतो अगदी पाण्याचाही विचार करतो की, प्रवाही पाण्यातील जे जिवाणू आहेत जे डोळ्याना दिसत नाहीत, त्यांचीही नकळत हत्या होवू नये, असा धर्म जो सूक्ष्म ज्ञानाची कामना करतो.

आज जर जगातील संघर्ष सोडवायचे असतील तर पुतीनला आणि झेलेन्सकीला खरं म्हणजे ‘अनेकांतवाद’ वाचायला द्यायला पाहिजे. ‘अनेकांतवाद’ जर लक्षात घेतला तर सत्याकडे जायचे अनेक मार्ग असतात ना, माझाच मार्ग बरोबर असतो असं थोडीच आहे. दुसरेही मार्ग असू शकतात, कोणाचा लवकर जाईल, कोणाचा उशीरा जाईल, ते काही सांगता येत नाही. एकदा का हे तत्त्वज्ञान समाजमनावर ठसलं तर वादाचा मुद्दाच राहात नाही. संघर्षाचा तर मुद्दाच राहात नाही आणि कोणी कोणावर कुरघोडी करणार नाही. कोणी कोणावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणार नाही. तो स्वत:वर विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल आणि जो स्वत:वर विजय मिळवितो त्यालाच आपण ‘जिन’ म्हणतो. स्वत:वर विजय मिळविण्यासाठी ‘अरिहंत’ होण्यासाठी मानवी मनातील जे जे काही वाईट आहे त्याचा नाश करण्यासाठी आपण आहोत, आपण दुसर्‍याचा नाश करण्यासाठी नाही. आपल्यातील वाईटाचा नाश करण्यासाठी आहोत ही भावना ज्यावेळी पृथ्वीतलावरील माणसांमध्ये जेव्हा जागे होईल आणि त्यासाठी हे तत्त्वज्ञान जेव्हा त्यांच्यासमोर ठेवलं जाईल त्यावेळेस मला असं वाटतं खर्‍या अर्थाने जगामध्ये तात्त्विक, अध्यात्मिक उन्नती होईल. समाजामधील जे वातावरण आहे ते बदलेल, राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्ष थांबतील.  आज जाती-जातीमध्ये आपण संघर्ष करतोय. मला फार वाईट वाटतं की, खानदेशामध्ये ज्या मारामार्‍या झाल्या गुजरातमधील आणि महाराष्ट्रातील जैन बांधवांमध्ये, वाईट वाटलं की जो धर्म सांगतो की ‘मी जगातला आदर्श आहे’, धर्म हा जगण्यावर असतो, वागण्यावर असतो. ‘मी दीक्षा घेतली, मी जैन झालो’? नाही, मी जैन होत नाही. तो मी ‘नावाचा’ जैन झालो, माझ्या वर्तनातून मी जैन सिध्द व्हायला पाहिजे आणि तो ‘जिन’ होणं हे पृथ्वीतलावरच्या प्रत्येक माणसासाठी अत्यंत आवश्यक आहे.

महाराष्ट्राला जैन विद्वानांच जे योगदान मिळालेलं आहे ते प्रचंड मोठं आहे. मग ते भाषेला योगदान आहे, तत्त्वज्ञानाला योगदान आहे. ते सामाजिक विचारांना योगदान आहे, ते कोणी कसं वागावं ? साधूंनीसुध्दा विपत्तीत आल्यानंतर कसं वागावं यासंदर्भातलं योगदान आहे. मध्यंतरी भारतातले एक महाविद्वान असे म्हटले की, ‘जैनांमुळे आणि बौध्दामुळे भारतावर आक्रमणं आली, भारताची प्रतिकार क्षमता ‘अहिंसा’ तत्वाचे प्राबल्य असल्यामुळे नष्ट झाली.’ हे इतकं विनोदी वाक्य आहे कि त्यांच्या अज्ञानाची कीव येते. ‘राष्ट्रकूट’ जैन होते. मग त्यांनी आपलं साम्राज्य गुजरातमध्ये कसं नेलं. खारवेल राजाही जैन होता- त्याचा शिलालेख आहे. त्यांनी तर कोणत्या कोणत्या प्रांतावर विजय मिळविले, याचे सखोल वर्णन त्या शिलालेखात आहे. किंबहुना खारवेल नावाचा सम्राट होता हे आपल्याला माहिती झालं ते त्या शिलालेखामुळं. त्यानंतर कुमारपाल  सोळंकी नावाचा गुजरातमध्ये सम्राट झाला, तो तर फारसा आपल्याला माहितही नाही. पण गजनीने तेथील सोमनाथ मंदिर उध्वस्थ केलं त्यावेळी त्याचा पहिला जिर्णोध्दार कोणी केला असेल तर या कुमारपालांनी आणि कुमारपाल जैन होता. हेमचंद्र मुनि त्याकाळातले गुजराजमधले मध्ययुगातले ते सर्वश्रेष्ठ विद्वान होते. त्यांचे कुमारपाल हे शिष्य होते. कुमारपालने मुलतानपासून ते कोकणापर्यंत आपलं साम्राज्य पसरवलं. हे युध्द करूनच पसरवलं असणार ना! हिंसा कोठे हवी... जर माझ्यावर कोणी आक्रमण केलं, जर माझ्यावर कोणी हल्ला केला, कोणी दरोडेखोर माझ्यावर चालून आला, जर माझ्या स्त्रीला अत्याचाराचा धोका आहे अशावेळी जैन तत्त्वज्ञानाने प्रतिकारार्थ हिंसा मान्य केलेली आहे. जैनांची अहिंसा ही शत्रूंसाठी लागू नाही. त्यामुळे जैनांमुळे किंवा बौध्दामुळे भारत दास्यात गेला असं सावरकरांपासून लोकं म्हणत आली आहेत. यांचा जैन किंवा बौध्द धर्माबद्दल किंवा त्याच्या इतिहासाबद्दल आकलन नव्हतं, कसलाही अभ्यास नव्हता हे लक्षात येतं. खुद्द चक्रवर्ती भरत ज्याच्यामुळे आपल्या देशाला ‘भारत’ हे नाव पडलं. चक्रवर्ती भरत का म्हणतात ? त्याने अख्खा देश  पादाक्रांत केला, जिंकला म्हणून ते ‘चक्रवर्ती’ झाले. त्यामुळेच त्यांना ‘चक्रवर्ती’ पद मिळालं. म्हणून या देशाला त्यांच नाव मिळालं. पूर्वी छोटी-छोटी असंख्य राज्य असायची, ती सगळी राज्ये युध्दाशिवाय कोणी शरण येत नसतं, युध्द ही करावीच लागतात. अत्याचार-अन्याय याविरुद्ध लढा द्यावाच लागतो. समाज जीवन मात्र सर्व प्रकारच्या हिंसेपासून मुक्त असले पाहिजे.

सम्राट अशोकाच नातू संप्रत्ती हा जैन होता. सम्राट चंद्रगुप्त ही उत्तरकाळात जैन झाला परंतु संप्रतीने विशेषत: महाराष्ट्रामध्ये जैन धर्मिय जे साधू होते त्यांच्यासाठी मठ बांधून  दिले आणि त्याने पैठणला 12/13 व्या शतकात ‘पैठण प्रशस्ती’ नावाचं एका जैनांनीच लिहिलेला ग्रंथ आहे, त्यात सातवाहनांनी पैठण आणि आसपासच्या परिसरात जैनांसाठी मठ कसे निर्माण केले आहे याचे वर्णन करून ठेवले आहे.

आपण मराठी प्राकृत भाषे बद्दल बोलत होतो, जैनांचीच 80% ग्रंथ आहेत, बाकींचे 20% आहेत, ती 20% अशासाठी राहिले आहेत की, टिकविले गेले नाहीत. परंतु जैनांनी आपल्या मठामध्ये, जैन साधूंनी सगळ्या पुरातन पोथ्या ज्या आहेत, भुजपत्रावर कोरून ठेवल्या. मुखोद्गत केल्या. वारसा टिकवला. आता पुण्यामध्ये आचार्य वैराग्यरति विजयजी महाराज आज शेकडो ग्रंथांचं पुन्हा एकदा त्याचं डिजीटल व्हर्जन तयार करतायत. मराठीत दुर्लक्षित भाग कोणता राहिला मराठीत तर जे आजच्या जैन समुदायाने मनावर घ्यायला पाहिजेत. असंख्य ग्रंथ अनुवाद आजच्या मराठीत किंवा इंग्रजीतही उपलब्ध नाहीत. आता उदाहरणात ‘जंबुद्वीपपण्णती’ मराठीत अनुवाद नाही,‘वासुदेवहिंडी’ मराठी अनुवाद नाही, ‘पउमचरियचा मराठी अनुवाद नाही. ‘पुष्पदंत कवीच्या रचनांचा  मराठी अनुवाद नाही. त्याच्यामुळे झालंय काय की, आपण आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाच्या अनमोल ठेवाला कोठेतरी मुकतो आणि अभ्यासकांचीही पंचायत होते, कारण सगळ्यांना ही प्राकृत भाषा येत नाही ना. जगात कोणी एखादीच विलुप्त असलेली भाषा शिकू शकेल. प्राकृत-संस्कृत मला येते परंतु काहीना संस्कृत-प्राकृत येत नाही, आजकाल धार्मिक आवश्यकतेपोटी फक्त जैन लोक प्राकृत शिकतात. परंतु साहित्यिक आवश्यकतेपोटी किंवा जिज्ञासेपोटी किंवा अभ्यासासाठी जी प्राकृत शिकली जात नाही.  फार कमी ठिकाणी त्याच शिक्षण उपलब्ध आहे आणि ते ही सुदैवाने म्हणा फक्त जैन समाजानेच उपलब्ध करून दिलेलं आहे बाकी कोणी केलेलं नाही. खुद्द पुणे युनिव्हर्सिटीत प्राकृत विभाग आहे, पाली विभाग एकत्र आहे. ते पाली भाषेचा संशोधन प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात, पण प्राकृत भाषेकडे पहातच नाहीत. भांडारकर ओरिएंटल इन्स्टीट्युटमध्ये 30 ते 40 हजार प्राकृतमधील हस्तलिखितं उपलब्ध आहेत. त्याचं अनुवाद करणे-प्रकाशित करणे वगैरे तर भाग सोडून द्या, त्याच सुचिकरण करणंसुद्धा अजून शक्य झालेले दिसत नाही.  तेही फक्त संस्कृतचंच संशोधन करतात. त्यावर भर देतात आणि ते स्वाभाविक आहे कारण ती एक वैदिक संस्था आहे त्यामुळे ते वैदिक साहित्याचेच संशोधन करणार. प्राकृत साहित्य म्हणजे केवळ जैन धार्मिकता आहे असं नाही. अजितसागर सुरीन्च्या तरंगवतीसारख्या कथा आहेत. अंगविज्जा’सुद्धा धार्मिक ग्रंथ नाही पण तो समाजजीवनाचे फार मोठं विवरण रूप दाखवणारा ग्रंथ आहे.

जैन धर्माचा इतिहास वृषभनाथांपर्यंत जातो आणि त्यांचा काळ,  मी “‘वृषभनाथ आणि शिव’ एकच आहेत काय?”  नावाचं पुस्तक लिहिलंय जे आता चिनार पब्लिशर्सतर्फे प्रकाशनाच्या मार्गावर आहे, मी अयोध्या येथे झालेल्या उत्खननानुसार इ.स.पूर्व 2700 म्हणजे आजपासून 4700 वर्षे इतका तो जुना आहे हे दाखवून दिलेले आहे. त्यापासूनचा जो जैन तत्त्वज्ञान आणि जैनांचा इतिहास जो आहे तो मी आता लिहायला घेतला असून सध्या वाचन आणि नोटस् काढण्याच काम चालू आहे. हा एव्हढा इतिहास प्रदीर्घ इतिहास आहे. त्यात पार्श्‍वनाथ, वृषभनाथ, अजितनाथ, नेमिनाथ हे सर्व 24 तीर्थंकर ऐतिहासिक व्यक्तिमत्वे होती हेही दाखवून देणार आहे.

देशाचे माजी राष्ट्रपती विद्वान श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जैन धर्म हा या देशातील सर्वात पुरातन धर्म असल्याच सिध्द केलेलं आहे. पण मुख्य धारेतल्या विद्वानांनी जैन धर्माकडे पाहिजे तितके लक्ष दिलेले नाही. ते बहुतेक वेळेस जैन धर्म म्हणजे आजचा जैन धर्म बघतात आणि प्राचीनकालीन जैनधर्माकडे ते दुर्लक्ष करतात. ते जैन कर्मकांडाकडे लक्ष देतात परंतु जैन तत्त्वज्ञानांकडे लक्ष देत नाहीत. ‘हत्ती आणि सात आंधळे’ ही कथा प्रत्येकाला माहिती आहे परंतु ते ‘अनेकांतवादा’तून निर्माण झालेली जैन कथा आहे हे कितीजनांना माहिती आहे ? बरोबर ना ? ज्या मुलभूत जैन गोष्टी आहेत त्या जैनांनी सोडून दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर मालकी आता वैदिकांनी केलेली आहे. मालकी घेऊदेत. चांगलं वाटलं म्हणून घेतलं. चांगल्या गोष्टी कोणी स्वीकारल्या तर आपला त्याला विरोध नाही, परंतु श्रेय किंवा क्रेडिट हे जैन तत्त्वज्ञानाला, जैन सिध्दांतालाच द्यायला हवं. भगवतगीतेमधला कर्मसिध्दांत हा जैन कर्मसिध्दांतामधून आलेला आणि त्यातला एकच भाग त्यांनी घेतलेला आहे. जैन कर्मसिध्दांत हा सजिव पातळीवर, निर्जीव पातळीवर, वैश्‍विक पातळीवर तो कर्म या संकल्पनेचा विचार करतो. कर्म म्हणजे मी हात हलवतो किंवा मी चालतो हे एव्हढच कर्मामध्ये येत नाही तर मानसिक कर्मसुध्दा असतं, आत्मिक कर्मसुध्दा असतं- या सर्व कर्मांचा एव्हढा सखोल चिंतन जैन कर्मसिध्दांतामध्ये केलेलं आहे ते तुम्हाला वैदिक साहित्यात सापडणार नाही. त्यासाठी आपल्याला जैन साहित्य जे प्राकृतमधील आहे त्याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल.

आपण म्हणतो की ‘अयोध्येचा राम बाई... योध्येचा राम. ’ ही गोष्ट खरी आहे. पण या अयोध्देची नावे तीनवेळा बदललेली आहेत. भगवान वृषभनाथ यांनी ही नगरी स्थापन केली, तेंव्हा तिच नाव होतं ‘विनया’. नंतर ते कालोघात साकेत झालं आणि आता ते चौथ्या शतकामध्ये अयोध्या झालं. म्हणजे काळाच्या पटामध्ये नाव कशी बदलली जातात आणि मूळ इतिहास कसा पुसट होतो याच हे उत्तम उदाहरण आहे. वृषभनाथांनी या नगरीचं नाव ‘विनया’ असं ठेवलं त्याच्यामागेसुद्धा मोठं तत्त्वज्ञान आहे. कारण यात ‘विनय’ आहे, नम्रता आहे, यामध्ये गर्व नाही. त्यांनी स्वत:च नाव ठेवलं नाही, ‘ते आपण स्थापन केलेल्या नगराचे वृषभनगर’ नाव ठेवू शकत होते किंवा मुलाच्या नावाने ‘भरतनगर’ म्हणून ठेवू शकत होते परंतु तसं त्यांनी केलं नाही. हा त्यांचा विनयच होता असे आपण म्हणू शकतो.

जैन तत्त्वज्ञान किंवा समण तत्त्वज्ञान जे आपण म्हणतो, त्यातील मूळ शब्द ‘समण.’ सर्वामध्ये समानदृष्टीने, समभावाने जो वागतो त्याला ‘समण’ म्हणतात. हा खरा ‘समण’ शब्दाचा अर्थ आहे. त्याचं संस्कृतीकरण शब्द म्हणजे ‘श्रमण’, जो श्रम करतो तो श्रमण असा याचा अर्थ होतो. आता अर्थाची उलथापालख कशी होते पहा, की श्रम गाढवही करते, श्रम मजुरही करतो, श्रम शेतकरीही करतो, प्रत्येकजण श्रम करतो. त्या अर्थाने मग प्रत्येकाला ‘श्रमण’ म्हणायला पाहिजे. तर ‘श्रमण’ शब्द चुकीचा आहे आपण चुकीचा वापरतो... खरा मूळ प्राकृत शब्द ‘समण’ असा आहे आणि त्याची व्याख्यापण दिलेली आहे - समभावाने समानवृत्तीने सर्व जीवमात्रांशी जो वागतो तो ‘समण’. तर मूळ शब्द ‘समण’. ‘समण’ संस्कृतीचा इतिहास सिंधूकाळापर्यंत मागे जातो आणि  या संस्कृतीने भारताला खरे तर तीन धर्म दिले- जैन, बौध्द आणि आजीवक. आजीवक धर्म नंतर जैनधर्मामध्ये विलीन झाला. कारण मंखली गोशाल हा आजीवकांचा मुख्य तत्त्वज्ञ होता तो प्रथम भगवान महावीरांचा शिष्य होता. गौतम बुद्ध हे आठ वर्षे भगवान महावीराबरोबर राहिले. काही तात्त्विक गोष्टीबद्दल त्यांचे मतभेद झाले. त्यांना टोकाची अहिंसा अमान्य होती. म्हणजे गौतम बुध्दानी आपल्या शिष्यांना सांगितलेलंच आहे की ‘दुसरे कोणी मांसाची भिक्षा म्हणून तुम्हाला वाढली तर तुम्ही ते खाऊ शकता’. बौध्द धर्माचं हे तत्त्व आहे. परंतु भगवान महावीरांना ते पटलं नाही, त्यांचे अहिंसा तत्त्वज्ञान वेगळे होते. त्यामुळे गौतम बुध्द बाजूला झाले. आजीवक तत्वाद्न्य मंखली गोशाल ही बाजूला झाले कारण त्यांचा नियतीवाद महावीराना मान्य नव्हता. परंतु त्यांचे अनुयायी पुढे जावून चौथ्या शतकापर्यंत भगवान महावीरांच्या जैन धर्मामध्ये समाविष्ट झाले, विलीन झाले.

मथुरा कुशाण काळापासून जैनांच एक सर्वात मोठं केंद्र होतं. तेथे जैनांचे एव्हढे स्तूप आणि तीर्थंकरांच्या मूर्ती आणि शिलालेखही सापडलेले आहेत. घंटाशाळा म्हणून आंध्रप्रदेशातलं एक बंदर आहे. म्हणजे आता ते वापरात नाही, तेथेसुद्धा जैन तीर्थंकर, यक्ष-यक्षिणी यांच्या प्रतिमा मिळालेल्या आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो नुसता महाराष्ट्रच नव्हे तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जैन धर्माची पताका काश्मिरपर्यंत फडकत होता हे सिध्द झालेलं आहे.

काश्मिरचा इतिहासावर ‘काश्मिरफाईल्स’ म्हणून एक वेबसीरीज निघते आहे, त्यामध्ये माझं नुकतच शुटींग झालं. काश्मिरमध्ये जैनांची 15 ते 16 स्थानं होती. खुद्द चीनप्रवाशी युआंग श्वांग यांनी प्रवासवर्णनामध्ये लिहून ठेवलेलं आहे की, ‘शारदापीठ’ आपण जे  म्हणतो तेथे अनेक जैन मुनी त्या विद्यापीठामध्ये शिकायचे आणि शिकवायचे असं ते कार्य करीत होते. ते विद्यापीठच होते. तक्षशीलेचं जसं महत्व होतं तसं ‘शारदापीठा’च महत्त्व होतं. शारदापीठ हे त्याच मूळ नाव नाही. ते ‘ज्ञानाचं केंद्र होतं. ते जैन, बौध्द लोकांनी स्थापन केलेलं नंतर हळूहळू शंकराचार्यापासून वैदिकांनी ते आपल्या ताब्यात घातले. जैन परंपरा काश्मिरमधून थोडीथोडी हटवली गेली. म्हणजे जैनांचा प्रभाव किंवा जैनांचं कर्तृत्व उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत एव्हढ्या मोठ्या प्रमाणात प्रभाव असताना आजचा जो जैन समाज आहे, तो आपल्या परंपरेला कोठेतरी नीट लक्षात घेत नाही. ठिक आहे. दैनंदिन जीवनात संघर्ष असतात, समस्या असतात, महत्त्वाकांक्षा असतात, स्वप्न असतात, श्रेष्ठ व्हावं असं प्रत्येकाला वाटतं परंतु प्राचीन काळापासून जैनांनी जी साधूपरंपरा निर्माण केली. या साधुंमुळे फक्त या ज्ञानाचं संरक्षणच झालं नाही तर ज्ञानामध्ये वर्धन होत गेलं. कारण साधूंची समाजानेच जबाबदारी घेतली... कारण त्यांना स्वत:च्या चरितार्थासाठी काही करण्याची आवश्यकताच नव्हती म्हणजे त्यांनी ‘सर्वसंगपरित्याग’च केलेला आहे. जैन धर्माचे ते मुलतत्वच आहे. ती परंपरा हजारो वर्ष जीवित आहे.

आपण आज वर्धापनदिन साजरा करतो आहोत ही चांगली गोष्ट आहे. शंभरवर्षाहूनही अधिक काळ हे मासिक निघतं हे विशेष आहे. आधुनिक काळातील एक आदर्श उदाहरण आहे. अशी काही मासिक महाराष्ट्रात निघतात. ‘जैन जागृती, तीर्थंकर’ सारखी मासिकेही नियमित निघतात. पण ती जैनांपुरतीच मर्यादित राहतात हे आपण लक्षात घेवूया. आता आपल्याला ‘जैन धर्म हा सर्वांचा आह’ या भावनेतून कर्मकांड वजा करून ‘जैन तत्त्वज्ञान’ काय आहे याचा प्रचार करायला हवा. जैनांचा एव्हढा प्रभाव कशामुळे निर्माण झाला होता?... तो बळजबरीने निर्माण झालेला नव्हता. तो फक्त प्रेमाने, भाईचा-याने आणि शांती, अहिंसेच्या तत्त्वज्ञानामुळेच तो निर्माण झाला होता. अहिंसेचा फटका जैन साधूंना बसला, दक्षिणेत जैन साधूंना जिवंत जाळलं, मारलं, सुळावर लटकवलं पण या सर्व यातना सहन करूनही त्यांनी जैन धर्म सोडला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.  असे एक दोन नव्हे तर हजारो साधूंनी आमच्या धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे, त्याग केलेला आहे आणि यासाठी आपण त्यांच्याशी सदैव कृतज्ञ राहिलं पाहिजे. एका येशू ख्रिस्ताला सुळावर चढवलं तर अख्खा ख्रिस्ती धर्म उभा राहिला आणि आमचे हजारो साधू जिवंत जाळले जातात, सुळावर चढवले जातात आणि आम्ही यातून शिकलो काय ? आपण सूड घ्यायला हवा होता असं मी अजिबात म्हणणार नाही कारण कारण जैन धर्माची ती शिकवणचं नाही, पण यातून काहीतरी प्रेरणा घेवून शिकायला तर पाहिजेच ना ? हे जर आपण शिकलो नाही याचा प्रसार नाही केला तर आपला काही उपयोग नाही असं मला वाटतं.

मित्रहो, जैन तत्त्वज्ञान... ‘कर्मकांड’ काय, तर ते बदलत असतं.  जैन हा मुळचा एकच धर्म होता. त्यामध्ये दिगंबर-श्‍वेतांबर झाले, नंतर तेरापंथी, बारापंथी, मंदिरमार्गी वगैरे उपपंथ निर्माण झाले... ते ठिक आहे प्रादेशिक कारणामुळे तिथले जे स्थानिक लोक जैन धर्मामध्ये येतात ते मूळ श्रध्दाही सोबत घेवून येतात. त्यामुळे पंथ पडत जाणे स्वाभाविक म्हणावे लागेल. पण धर्माचे मुलभूत तत्वज्ञान एकाच आहे. अखिल भारतीय जैन आणि अखिल विश्‍व जैन हे लक्षात घेवून जैन तत्त्वज्ञान आम्हाला पुन्हा पुन्हा सार्‍या जगाला आपल्याला पुन्हा पुन्हा सांगावे लागेल. ते विद्यापीठ पातळीवर, पॉलिटीकल सायन्समध्येसुद्धा जैनांच खूप मोठं योगदान आहे, ज्यावेळी पॉलिटिक्समधील विद्यार्थ्यांसमोर जेव्हा हे जाईल तेव्हा त्यांच्या असं लक्षात येईल की आजच्या सारखं सूड किंवा क्रूर भावनेने, कोणाचा तरी नाश करायचा आहे...कोणाला तरी संपवूनच टाकायचे आहे...ही भावनाच त्याज्ज्य आहे. मग याला संपवून टाकू... त्याला संपवून टाकू  अशाप्रकारचे वर्तन  राजकारणांकडून होणार नाही आणि खर्‍या अर्थाने जागतिक एक आदर्श राज्यसंस्था त्यामुळे निर्माण होईल आणि आनंदाची बाब आपण सर्वांनी ही मानली पाहिजे की हा सांगली, कोल्हापूर, कराड हा जो भाग आहे या राष्ट्रकूटांच्या काळामध्ये हा जैनांसाठी अत्यंत वैभवशाली काळ होता. आजही याच भागात जैनांची लोकसंख्या सर्वाधिक आहे याला ऐतिहासिक कारण आहे. तो इतिहास म्हणून हा आपल्याला पुन्हा मुळ पदावर कसा नेता येईल हे पहायला हवे. सर्व लोक जैन धर्माचे व्हावेत असं नाही, खरे तर ते जैन विचारांचे व्हावेत असे प्रयत्न हवेत. आणि आज सारं जग जैन विचारांच करण्याची जास्त मोठी आवश्यकता आहे, त्यामध्ये जैन तत्त्वज्ञान ही आपली फार मोठी शक्ती आहे, या तत्त्वज्ञानावर आपण भर दिला पाहिजे, प्रचार केला पाहिजे आणि जागतिक पातळीवर कसं जाईल हे आपण पाहिलं पाहिजे. एव्हढे बोलून मी थांबतो.

सर्वांनी ऐकून घेतलेत, धन्यवाद ! जय जिनेंद्र !

संजय सोनवणी 

1 comment:

  1. जैन लोकानीच पहिल्यांदा तुमच्या या लेखावर गांभीर्याने चिंतन करायला हवंय,कारण ते स्वतःच आपल्या तत्वज्ञान आणि परंपरांना समजुन न घेता दिशाहीन होऊन भरकटत आहेत.
    प्रस्तुत काळी आपल्यासारख्या अभ्यासकांच्या मार्गदर्शक नेतृत्वाची जैनांनच नव्हे तर सर्व भरतखंडाला जरुरी आहे
    खुप खुप धन्यवाद सर !
    जय जिनेंद्र!

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...