Saturday, September 13, 2025

शिंदेशाहीचे संस्थापक राणोजी शिंदे

 



    

     राणोजी शिंदे यांचे घराणे महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्वाचे स्थान पावलेले असून बहामनी कारकिर्दीत या घराण्याने पुन्हा प्रतिष्ठा मिळवायला सुरुवात केली. 'रविराव', 'रुस्तुमराव’ ‘झुंझारराव' ह्यांसारखे बहुमानदर्शक पद शिंद्यांच्या एका घराण्याकडे होते, असा उल्लेख ग्रांट डफने लिहिलेल्या इतिहासांत दृष्टीस पडतो.

     मध्य युगात अनेक हिंदू व मुसलमानी राज्यामध्ये शिंदे नांवाचे पुरुष मोठमोठे लष्करी अधिकार उपभोगीत होते, अशीही माहिती मिळते.  स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या कारकीर्दीपासून शिंदे घराण्यांतील पुरुषांचा नामनिर्देश जुन्या बखरी व जुन्या कागदपत्रांत  आढळतो व त्यावरून हें घराणे मराठेशाहीच्या अगदी प्रारंभापासून अस्तित्वात आहे, असे निःसंशय म्हणता येते. शिवाजी  महाराजांच्या पदरी नेमाजी शिंदे नामक एक प्रबळ व पराक्रमी सरदार होता. त्याने स्वराज्य स्थापनेचे कामीं चांगली मदत केली होती.

     . थोरले शाहू महाराजांचे कारकीर्दींतील अव्वल राजकारण प्रसंगांत वेळोवेळी शिंदे लोकांनी बजावलेली अलौकिक कामगिरी अनेकदा दृष्टीस पडते. थोरले राजाराम महाराज ह्यांचे कारकीर्दींत जे लोकोत्तर स्वदेशभक्त निर्माण झाले, व ज्यांनी जिवावरची संकटे सोसत  स्वराज्य रक्षण केलें, त्या वीरमंडलामध्ये नरसोजी व जिवाजी पाटील शिंदे तोरगलकर पागनीस ह्या दोघांची नावें अंतर्भूत आहेत. म्हणजेच हे घराणे पूर्वीपासूनच विख्यात होते असे म्हणावयास हरकत नाही .असे दत्तात्रय पारसनीस आपल्या महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्रया पुस्तकात म्हणतात.

     पुढे पारसनीस जॉन माल्कमचा हवाला देवून एक अविश्वसनीय दंतकथा नोंदवतात की,  “शिंदे ह्यांचे घराणें मूळचें शूद्र जातीचें असून त्यांचा मूळ पुरुष राणोजी हा मूळचा कण्हेरखेडचा पाटील असून तो बाळाजी विश्वनाथचा हुजुऱ्या (खिदमतगार) होता. पुढे पहिला बाजीराव पेशवा बनल्यानंतर राणोजीला पागेचा शिलेदार म्हणून नियुक्त करण्यात आले.

     हे कसे झाले हे सांगतांना ते पुढे अजून एक आख्याईका ते सांगतात. ते म्हणतात की बाजीराव साहेब एके वेळीं शाहू महाराजांस भेटण्याकरितां राजवाड्यांत गेले. त्या वेळी त्यांचा हुजऱ्या राणोजी  हा, नेहमीप्रमाणे त्यांच्या चर्मपादुका हातीं घेऊन, दाराशीं बसला, तितक्यात त्यांस निद्रा आली. बाजीराव शाहू महाराजांची भेट घेऊन बाहेर आले, तो त्यांच्या दृष्टीस उराशी जोडे घेऊन झोपलेला राणोजी दिसला. त्याची स्वामीनिष्ठा पाहून त्यांस आश्चर्य वाटले. तेथून राणोजीचा भाग्योदय सुरु झाला आणि राणोजीला पागेमध्ये शिलेदारी दिली. यावरून राणोजी प्रथमत: हलक्या दर्जाच्व्हां नोकर होता असे दिसुन येते.”

     अर्थात ही आख्यायिका असली तरी अशा स्वरूपाच्या कोणाचे मूळ कसे हीणकस होते हे दाखवून त्यांची एक प्रकारे अप्रतिष्ठा करण्यासाठी अनैतिहासिक आख्यायिका निर्माण करण्यामागील तत्कालिन मराठी इतिहासकारांचा दुषित दृष्टीकोनच दिसून येतो. किंबहुना अशाच कथांमुळे राणोजी शिंदे यांच्या आधीच्या जीवनाबाबत अनेक चमत्कारिक दंतकथा निर्माण झाल्या आहेत. ते पेशव्यांचे पागनीस होते असेही काही इतिहासकारांनी नमूद केलेले आहे. पण या आख्यायिका जनमानसात प्रचलित असल्याने त्यांची नोंद घेणे आवश्यक ठरते. ती नोंद घेऊन आपण वास्तव इतिहास काय होता याल्डे आपण आता लक्ष देऊयात.

            राणोजी शिंदे हा सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेडचा पाटील होता याबाबत सर्वांचे एकमत आहे.  कन्हेरखेड हे ऐतिहासिक गाव असून येथील शिंदे घरांणे पूर्वापार मनसबदारी निभावत आलेले आहे. सातारा येथे थोरल्या शाहू महाराजांची गादी होती. ही गादी स्थापन होण्यापूर्वीच्या काही घटना तपासून पाहिल्या पाहिजेत.

     राणोजी शिंदचा आजोबा दत्ताजी हा औरंगजेबाच्या पदरचा मनसबदार होता. हा बहुदा संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या काळात झालेल्या धामधूमीमुळे औरंगजेबाच्यापक्षात मिळाला असावा. शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत असतांना औरंगजेबाने शाहू महाराजांची सोयरिक दत्ताजीच्या सावित्रीबाई नामक कन्येशी करून दिली होती. या दत्ताजीचा मुलगा जनकोजी शाहू महाराज दक्षिणेत आल्यानंतर त्यांच्याच सेवेत होता. पुढे बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचे लष्करी प्रशासन पाहू लागल्यानंतर त्याला बाळाजीच्या सोबत दिले.

     पण दुर्दैवाने या जनकोजीबाबत इतिहासात फारशी माहिती उपलब्ध नाही. पण तत्कालीन प्रथेनुसार त्याच्या पुत्राने म्हणजे राणोजीने त्याच्या हाताखाली काम सुरु केले असेल अथवा त्याच्यानंतर त्याची जागा घेतली असणे सहज संभवनीय आहे.

     जनकोजीचा पुत्र म्हणजे राणोजी होय. त्याने आपोआप आपल्या पित्याचे स्थान घेतले. पारसनीस म्हणतात त्याप्रमाणे ती कामगिरी म्हणजे हुजुरेगीरी असण्याची तीळमात्र संभावना दिसत नाही. छत्रपती शाहू महाराजांशी सोयरिक असलेल्या घराण्याचा नातू पेशव्यांचा हुजऱ्या किंवा जोडेरक्षक म्हणून काम करत होता आणि त्यालाच नंतर एक बलाढ्य सरदार बनवले ही कहाणी मनोरंजक वाटली तरी ती फार तर एखाद्या कादंबरीतच शोभेल. प्रत्यक्षात ते वास्तव आहे असे दिसत नाही, आणि बखरी बव्हंशी विश्वसनीय नसल्याने या हकीकतींवर फारसा विश्वास ठेवता येत नाही हे वाचकांना पुढील प्रकरणेही वाचताना लक्षात येईलच.

     या उलट जी अधिकची माहिती आहे ती पारसनीस यांच्या मताला पुरेपूर छेद देते.

 

 

     राणोजी शिंदे पेशव्यांच्या खाजगी सेवेत नव्हता तर पेशव्याच्या सैन्यात होता. वास्तव इतिहासातून हे समजते की प्रथम बाळाजी विश्वनाथच्या पदरी पायदळात राणोजी होता (१७१६). याच काळात रामचंद्रबाबा सुखटणकर या मुत्सद्द्याच्या लक्षात आले की राणोजी फक्त शूर नसून एक बुद्धिशाली मुत्सद्दीही आहे. त्याच्या शिफारशीवरून बाळाजी विश्वनाथाने राणोजीला पदोन्नती दिली व काही खास कामगिऱ्याही सोपवल्या.  या माहितीवरून जनकोजी शिंदेचा या घटनेआधी मृत्यू झाला असावा असा तर्क करता येतो.


     शाहू महाराजांचे आसन स्थिर करण्यात बाळाजी विश्वनाथाने जरी मुत्सद्दीपणामुळे तत्कालीन राजकारणात मोलाची भूमिका निभावली असली तरी तो लढवैय्या नव्हता. शिवाय अनेक मराठा सरदार ताराराणीच्या गोटात गेले असल्याने बाळाजीला नव्या सरदारांची गरज होतीच. तो पराक्रमी आणि प्रस्थापित सरदारांच्या जागेवर नवे सरदार नेमण्याच्या प्रयत्नात होता. बहुदा जनकोजी शिंदेची जागा रिक्त झाल्याने ती भरणे आवश्यक होते. त्यात बाळाजीला पेशवेपद मिळण्यात शाहू महाराजांशी नातेसंबंध असलेल्या जनकोजीची मदत झाली होती. त्यामुळे त्याचा पुत्र  राणोजी भविष्यातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व बनणार हे निश्चित झाले होते.

 

     शाहू महाराजांनी बाळाजीला १७१३ मध्ये पेशवेपदावर नेमले. बाळाजी विश्वनाथ पेशवा झाल्यावर त्याने दिल्ली स्वारी केली होती. त्यामागे असे कारण घडले. १७१८ मद्ध्ये बाळाजीने सय्यद हुसेनकडून चौथाईचे व सरदेशमुखीचे हक्क शाहुसाठी मिळवले. जेवढा प्रदेश शिवाजी महाराजांच्या अंकित होता जवळपास त्या सर्व प्रदेशावरील चौथाईचे हक्क मिळवणे ही बाळाजीची मोठीच कामगिरी होती.. अर्थात या मोबदल्यात पातशाहीची सार्वभौमता मान्य करावी लागली. हे जरी घडले असले तरी हुसेन बंधुंमुळेच निर्माण झालेल्या नव्या राजकीय घडामोडीमुळे पातशहाने ही योजना बाद केली आणि हुसेन बंधूशी युद्धाची तयारी सुरु केली.


     त्यामुळे सय्यद हुसेन तातडीने बाळाजी विश्वनाथासह दिल्लीकडे ससैन्य रवाना झाला व दिल्लीत पोचताच सरळ फर्रुकसियर बादशहाची उचलबांगडी करुन दुसऱ्या नामधारी पातशहाची स्थापना केली. दिल्ली  स्वारीच्या वेळीस बाजीरावही बाळाजीसोबत होता. सय्यद हुसेनने बाळाजीचे ऐकले त्यातूनच ही संयुक्त स्वारी घडली होती. नवी परिस्थिती उद्भवताच या संधीचा फायदा घेऊन बाळाजी विश्वनाथाने मोगली कैदेत असलेल्या येसुबाई व सावित्रीबाई, तसेच इतरांची सुटका मार्च १७१९ मद्धे करुन घेतली. अंबिकाबाई मात्र पुर्वीच मोगली कैदेतच वारली होती. 

 

     त्यावेळेस त्याच्या सैन्यातही राणोजी तर होताच पण मल्हारराव होळकरही स्वतंत्र पथक्या म्हणून आपल्या पाचशेच्या सामील झाला होता. या दिल्ली स्वारीच्या वेळेस (१७१९) मल्हारराव व राणोजी यांचा परीचय झाला की नाही याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही. असे असले तरी उत्तर हिंदुस्तान काय आहे आणि तेथील राजकारण नेमके काय आहे हे समजायला दोघांनाही मदत झाली असे म्हणता येते कारण दोघेही तेवढे चाणाक्ष आणि बुद्धिशाली होते.

 

     बाळाजी विश्वनाथाच्या मृत्युनंतर पहिल्या बाजीराव पेशव्याने राणोजीला पदोन्नती दिली. (१७२२). निजामाबरोबर झालेल्या १७२४ च्या सावरखेड येथील लढाईत राणोजीने भाग घेतला. तो १७२५ मध्ये सरदार झाला. कर्नाटकच्या मोहिमेतही तो होता. त्यातील यशामुळे राणोजीच्या यशाची कमान चढतीच राहिली.


     १७२८-२९ दरम्यान शिंदे, होळकर व पवार यांनी आपली शक्ती पणाला लाऊन माळवा जिंकून घेतला. त्यानंतर नोव्हेंबर १७३१ मध्ये या तीनही बलाढ्य सरदारांनी माळव्याची आपापसात वाटणी करून घेतली व बाजीराव पेशव्याकडून त्यासंबंधी सनदही मिळवली व आपापला सरंजामही निश्चित करून घेतला.


     बाजीरावालाही उत्तरकेंद्रित धोरण राबवायचे असल्याने त्याला उत्तरेत वर्चस्व गाजवू शकणाऱ्या पराक्रमी लोकांची गरज होतीच. त्यात माळवा प्रांतातील मोगलांचे सुभेदार दयाबहाद्दर व बंगश यांचा या त्रिकुटाने पराभव केल्यामुळे माळवा त्यांच्या कब्जात आलाच होता. यातही होळकर व शिंदे यांनी मोठा पराक्रम गाजवल्यामुळे त्यांच्या ताब्यात बरोबरीचा प्रदेश येणार हे निश्चित होते. या वाटपामुळे  उज्जैन (नंतर शिंदे घराण्याने आपली राजधानी ग्वाल्हेर येथे हलवली), इंदोर व धार संस्थान अस्तित्वात आले. थोडक्यात ते पेशवाईशी सैल संबंध असले तरी स्वतंत्र राजे बनले.

         

     माळव्याच्या वाटपामुळे राणोजीच्या वाट्याला माळव्याच्या दीड कोटी वसुलापैकी ६५·५ लाखांचा मुलूख वाटणीस आला. यानंतर शिंद्यांनी माळव्यात आपल्या वाट्याला आलेल्या भागात जम बसविला. संस्थानिक होताच राणोजीने रामचंद्रबाबा सुखटनकरांची नेमणूक आपला दिवाण म्हणून केली व त्याने पूर्वी केलेल्या मदतीची एक प्रकारे परतफेड केली. उज्जैनला १७३२ चा कुंभमेळा आणण्याची कल्पना सुखटणकरांची अशी नोंद ब्रिटीश इतिहासकारांनी केली आहे. राणोजी अर्थातच या संकल्पनेचा जनक होता. यशजी रंभाजी याला आपले सरसेनापती म्हणून नियुक्त केले व आपल्या संस्थानाची प्रशासकीय व सैनिकी व्यवस्था लावली.


     राणोजीने निजामाविरुद्धच्या पालखेड व भोपाळ वेढयात (१७३७) तसेच वसईच्या प्रसिद्ध लढाईत (१७३७३९) भाग घेतला होता. भोपाळ युद्धात मल्हाररावाने निजामाची रसद तोडली तर राणोजीने निजामी सैन्यविरुद्धचा वेढा फासासारखा कडेकोट आवळला. निजामी सैन्याला पळ काढता येणेही अशक्य झाले. यामुळे निजामाच्या सैन्याची भूक-तहानेने दुर्दशा उडाली व शेवटी निजाम शरण आला. ही शिंदे-होळकर या जोडगळीची सर्वात मोठी कामगिरी म्हणता येईल. यामुळे मराठीशाहीचा दबदबा संपूर्ण देशांत पसरला. मोगल व राजपुतांनीही या दोघांची धास्ती घेतली.


     वसईच्या किल्ल्याला सुरुंग लावण्याची बहादुरीही त्याने व मल्हारराव होळकराने एकत्र मिळून केली. त्यामुळे या युद्धात एक अशक्यप्राय विजय मिळाला. शिंदे-होळकरानी उत्तरेतील बहुतेक युद्धे सोबत केल्याने त्यांच्यात एक अभेद्य मैत्री निर्माण झाली होती. इतकी की शिंदे-होळकर हेच या जोडगोळीचे नाव सर्वतोमुखी झाले. “हे दोघे एकत्र आहेत तोवर मराठाशाही अजिंक्य राहील असा जो विश्वास निर्माण झाला तो यामुळेच.


     १७३७-३८ मधील बाजीरावाच्या दिल्ली स्वारीत राणोजी व मल्हारराव सामील होते. तालकटोरा येथे बाजीरावाने तळ टाकला. मल्हाररावाने एकीकडे दोआबात घुसुन तों मुलुख बेचिराख करत दिल्लीचे रसद तोडली तर राणोजीने चालून आलेल्या मोगल सैन्यावर निकराचा हल्ला चढवला व त्यांना पराभूत केले. या पराभवामुळे दिल्लीचा पातशहा भीतीने तळघरात लपून बसला होता असे म्हणतात. पण बाजीरावाने दिल्लीवर चाल न करता आपला मोर्चा इतरत्र वळवला.   

 

     नादिरशहाची दिल्ली स्वारी

 

     या काळात घडलेली राष्ट्रीय आपत्तीची घटना म्हणून नादिरशहाचे भारतावरील आक्रमण. मराठी इतिहासकारांनी नादिरशहाच्या १७३९ मधील आक्रमणाकडे जवळपास दुर्लक्षच केलेले आपल्याला दिसते. त्याला निमंत्रीत करण्यात मोठा वाटा होता तो शाह वलीउल्लाह या कट्टरपंथी जिहादी विचारांच्या हाजीचा. भारतातील मुस्लीम हे हिंदुंच्या साहचर्याने अजलाफ (हीण) बनले आहेत, त्यासाठी सच्चा मुस्लिमांचीच देशावर सत्ता असावी असा प्रचार तो करत असे. नादिरशहाचे आक्रमण न्रुशंस आणि रानटी होते. कर्नाळ येथे झालेल्या युद्धात खुद्द पातशहाला अटक होण्याची वेळ आली. मुस्लीम सरदार/वजीरांतील स्वार्थलोलुपतेमुळे नादिरशहा दिल्लीपर्यंत पोहोचला. हजारो दिल्लीवासी ठार मारले गेले. मोगलांनी ३८० वर्ष जमवलेली संपत्ती नादिरशहाने एका झटक्यात लुटली. या धक्क्यातुन मोगल कधीच सावरले नाही. दिल्लीची सत्ता नुसती कमजोर झाली नाही तर विखरू लागली.

    

     अब्दालीचा उदय

 

     यानंतर नादिरशहाचा खून झाला आणि पाठोपाठ अब्दालीचा उदय झाला. याचनंतर झालेली मराठ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी घटना म्हणजे थोरल्या बाजीरावाचा आजारपणामुळे २८ एप्रिल १७४० रोजी रावेरखेड येथे मृत्यू झाला. हा एक आघात होता. यानंतर बाळाजी बाजीराव हा पेशवा बनला. मराठेशाहीची पुन्हा नव्याने आखणी सुरु झाली.


     २ सप्टेंबर १७४१ रोजी छत्रपती शाहू महाराजांनी राणोजीला चांभारगोंदे (आजचे श्रीगोंदे) गावाची पाटीलकीही बहाल केली.


     राणोजी यांचे दोन विवाह झाले होते. त्यांची पहिली पत्नी निंबाबाई (अथवा मैनाबाई)  तर द्वितीय पत्नी चिमाबाई. राणोजीची हयात बव्हंशी रणभूमीवरच गेली. प्रचंड घोडदौड करावी लागली. बहुतेक त्या दगदगीमुळे किंवा एखाद्या लढाईत जखमा झाल्यामुळे राणोजी गंभीर आजारी पडला. हे आजारपण बहुदा बरेच लांबले असावे, पण आजारपणाचे निश्चित कारण इतिहासात कोठेच नोंदलेले सापडत नाही.


     या आजारपणातच राणोजीचा मृत्यू ३ जुलै १९४५ रोजी माळव्यातील सुजालपूरजवळ झाला. त्यांची समाधी कुंडलापूर (कुदनग्राम) येथे आहे. तेथे मोडी लिपीत "राणोजी घुमट" असे लिहिलेले आहे. शिवाय सुजालपूर येथे राणोगंज नावाची पेठही वसवण्यात आली आहे.


     राणोजीला एकूण पाच पुरुष अपत्ये झाली. जयाप्पा(याचे मूळ नाव जयाजी होते पण इतिहासात हा जयाप्पा तथा दादासाहेब म्हणून विख्यात आहे.), दत्ताजी, जोतिबा, हे पुत्र मैनाबाईपासून तर तुकोजी आणि महादजी हे पुत्र चिमाबाईपासून झाले.


     यातील त्यांपैकी तुकोजी हा पानिपत युद्धात कामी आला तर बुंदेलखंडातील ओर्छा संस्थानच्या राजाने जोतिबास बरवासागर जवळ बोंडसे येथे झालेल्या एका लढाईत दगा करून १७४३ मध्ये मारले, तथापि या घटनेचे इतिहासात अत्यंत अस्पष्ट संकेत आहेत, ठामपणे विधान करता येईल अशी सविस्तर माहिती उपलब्ध नाही. पण या ओर्छा संस्थानावर राणोजी शिंदे यांचे प्रभुत्व असून त्यांच्याशी शिंदेंचा खंडणी/चौथाईबाबत संघर्ष होत असे याचे उल्लेख मात्र मिळतात. शिवाय मध्ययुगात दगाबाजीने अनेक राजकीय हत्या झाल्या आहेत, त्यामुळे या घटनेची अधिकृत नोंद झाली नसल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. कारण खुद्द जयाप्पा शिंदे यांचीही १७५५ मध्ये नागौर येथे विश्वासघाताने हत्या करण्यात आली होती हे आपल्याला विसरून चालणार नाही.


     एकंदरीत इतिहासाकडे पाहता राणोजी शिंदे याचा कार्यकाळ तसा मर्यादित असला तरी तो मुत्सद्दी व पराक्रमी होता हे स्पष्ट होते. प्रारंभी तो पेशव्यांचा हुजऱ्या किंवा पागेवरचे हलक्या दर्जाचा सैनिक होता या निखळ हेतुपुरस्सर पसरवल्या गेलेल्या दंतकथा आहेत हे त्यांचे घराणे प्राचीन काळापासून प्रसिद्ध होते आणि ते छत्रपती शाहू महाराजांचे नातेवाईकही होते यावरून स्पष्ट होते. “आलीजाबहद्दर शिंदे घराण्याचा इतिहास या जगन्नाथ प्रभाकर सरंजामे यांनी सन १८७२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातही या दंतकथेला हास्यास्पद ठरवलेले आहे.


     अतिसामान्य माणसेही स्व-पराक्रमाने काळावर आपली गीते लिहितात हे मल्हारराव होळकरांसारख्या माणसावरून सिद्ध होत असले तरी जाणीवपूर्वक एखाद्याची पार्श्वभूमी कशी हीन होती हे काही हेतूंनी प्रेरित होऊन लिहिणे हे नैतिक कृत्य आहे असे म्हणता येणार नाही. शिवाय चिमाबाई या त्यांच्या पत्नी नसून अंगवस्त्र होत्या व त्यांच्यापासून झालेले महादजी शिंदे हे मराठेशाहीचे नायक हे अनौरस होते अशाही वावड्या त्या काळापासून आजतागायत पसरल्या आहेत याला आपण एक राजकीय हेतूंनी प्रेरित हिणकस कृत्य आहे एवढेच म्हणू शकतो.


     जयाप्पा हा राणोजीचा थोरला पुत्र असल्याने राणोजीनंतर शिंदेशाहीची धुरा त्याच्याकडेच जाणार हे निश्चित होते. तरुण जयाप्पा हा पराक्रमी होताच. पण १७४५ नंतरचा काळ हा देशातील राजकारणाला वेगळे वळण देणारा होता. या बदलत्या स्थितीत टिकणे हे आव्हान पेलणे आवश्यक होते. राघोबादादा पेशव्याचे स्वार्थही याच काळात जागे व्हायला लागले होते. दिल्लीत मोठया नाट्यमय घडामोडी घडू लागल्या होत्या. अब्दालीचे पहिले आक्रमण जवळपास नक्की होत आलेले होते. दक्षिणेतही स्थिती आलबेल नव्हती. मराठे तिकडच्या संघर्षातही अडकत जात होते.


     जयाप्पा शिंदेच्या हातात सूत्रे गेली ती या आशा उद्रेकी काळात. शिंदे घराण्यावर यशाची कमान चढती असली तरी एकामागोमाग एक दुर्दैवी आपत्ती येत राहिल्या. त्याविरुद्ध शिंदे व होळकरांनी कसा संयुक्त लढा दिला तो इतिहास हृद्य तर आहेच पण तेवढाच प्रेरकही आहे.

 


-संजय सोनवणी 

 

 

2 comments:

  1. Chukichi mahiti deu naka Malharao holkar teva swatrant navte te kantaji raje kadam bande yanchya lashkarat hote aek sanga jar maratha itihasat kantaji raje kadam bande ha pendhari samjla jato tar tuanche Bande nishan mirvnare holkar pan pendhari ch ka? Malharao chs kartha dartha kantaji raje kadam bande hoy

    ReplyDelete
    Replies
    1. कंठाजी कदमबांडे यांच्या सेवेत सर्वात आधी मल्हारराव होते ते त्यांचे मामा भोजराज बारगळ यांच्यामुळे. १७२० नंतर ते स्वतंत्र होत मालाव्याव्र छापे मारू लागले होते. प्रस्तुत लेखाचा उद्देश मल्हाररावांचा इतिहास सांगणे हा नसल्याने तो इतिहास दिलेला नही. त्यासाठी या ब्लॉगव्र्म्लहार्राव व होळकर घराण्याबाबत अनेक लेख आहेत. ते वाचावेत. धन्यवाद.

      Delete

ऐसे केले या गोपाळे....

शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र   आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...