(महाराष्ट्र टाईम्स, संवाद पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख.)
सिंधू लिपी आजही कोडे बनून बसलेली आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने नुकतीच हरप्पा लिपीला उलगडण्याच्या प्रयत्नांना दिशा देण्यासाठी जागतिक विद्वानांची परिषद भरवली. या परिषदेचे फलित अद्याप समोर आले नसले तरी आजवर ही लिपी वाचण्यात व त्यावरील नेमकी भाषा कोणती हे शोधण्यात यश आलेले नाही. अनेक विद्वानांनी ही लिपी वाचल्याचा आणि त्यावरील भाषा अमुकच असल्याचा दावा केला असला तरी त्यांचेही मत निर्विवादपणे मान्य झालेले नाही. असे का झाले आणि हे प्रयत्न का फसले याचा आढावा या लेखात घेतलेला आहे.
१९२० पासून सिंधु-घग्गर
खोऱ्यात झालेल्या उत्खननांत असंख्य लिप्यांकित व चिन्हांकित मुद्रा सापडलेल्या
आहेत. ढोलावीरा येथे तर गांवाचा नामफलकही सापडलेला आहे. सिंधू लिपी वाचण्याचे आजवर
अनेक प्रयत्न झाले आहेत. ती लिपी वाचल्याचे दावेही अनेकांनी केले आहेत. आर्य
आक्रमण सिद्धांत मान्य असणा-यांनी या लिपीत द्रविड भाषा असल्याचा अंदाज बांधून ही
लिपी उलगडायचा प्रयत्न केला. आक्रमक आर्यांनी सिंधू संस्कृतीच्या द्रविड लोकांना
दक्षीणेत हुसकावले असे हा आर्य आक्रमण सिद्धांत मानतो. या सिद्धांताचा मोठा प्रभाव
अजुनही खूप विद्वानांवर आहे. शिवाय ऋग्वेदात काही द्रविडियन शब्द उधारीत आले
असल्याचाही एक दावा असल्याने हे खरे वाटणे स्वाभाविक होते. अस्को पारपोला व इरावथम
महादेवन यांनी सिंधू मुद्रांवरील लिपी-चिन्हांत द्रवीड भाषा व पुराकथा शोधण्याचा
अनेक काळ प्रयत्न केला. त्यांची यावर काही पुस्तकेही आहेत. अर्थात त्यांचेही मत
सर्वमान्य झालेले नाही.
वैदिकवादी विद्वानही
या कार्यात मागे राहिले नाही. सिंधु-घग्गर संस्कृती ही वैदिक आर्यांचीच निर्मिती
अशी त्यांची एकुणात मांडणी असल्याने त्यांनी त्यात नुसती वैदिक संस्कृत शोधली नाही
तर ती लिपी वाचल्याचे दावेही केले. एन. एस. राजाराम व एन. झा यांनी असा दावा करत
एक ग्रंथही लिहिला. त्यात त्यांनी २००० मुद्रांचे वाचन केल्याचे दाखवत काही
मुद्रांवर वैदिक राजा सुदास, यदु, पुरु, कुत्स, राम आदींचा तसेच षडागमांचाही उल्लेख आहे तर
बहुसंख्य मुद्रांवर नद्यांचे तर काही ऐहिक सामान्य उल्लेख आहेत असा दावा केला. याच
ग्रंथात लेखकद्वयाने सिंधू संस्कृतीला घोडा माहित होता हे दाखवण्यासाठी एकशिंगी
(Unicorn) प्राण्यांचे चिन्ह असलेल्या मुद्रेच्या छायाचित्रावर संगणकीय छेडछाड (forgery) केली. ही बनावटगिरी
करण्याचे कारण म्हणजे सिंधू संस्कृतीत घोडा असल्याचा एकही पुरावा आजतागायत
सापडलेला नाही आणि वैदिक आर्यांचे संपुर्ण जीवन तर घोड्यांभोवती फिरते!
त्यामुळे सिंधू संस्कृतीत घोड्याचे अस्तित्व होते हे दाखवण्याची त्यांना
निकड होती. अलीकडे घग्गर नदी हीच ऋग्वेदातील सरस्वती आहे असे ठसवण्याचे अनेक
प्रयत्न होत आहेत याचेही कारण वैदिक आर्य एतद्देशीयच होते हे दाखवण्याची निकड.
सिनौली येथे सापडलेल्या गाड्याच्या अवशेषांना रथ म्हणून घोषित करण्यात आले होते
हाही अलीकडचाच इतिहास.
एन. एस. राजाराम व
एन. झा यांचे दावे वृत्तपत्रांत व पुस्तक 1999 मध्ये प्रसिद्ध झाल्यावर जगभर खळबळ उडाली. कारण
या शोधाने सिंधू संस्कृतीचा इतिहास नव्याने लिहिणे भाग होते, पण राजाराम आणि झा
यांचे दुर्दैव. हार्वर्डचे इंडोलोजिस्ट मायकेल विट्झेल आणि त्यांचे सहयोगी स्टीव्ह
फार्मर यांनी झा व राजाराम यांची फोर्जरी फ्रंटलाईनमद्ध्ये (ऑक्टोबर २०००) लेख
लिहून उजेडात आणली. राजाराम व झा यांनी मुळच्या तुटलेल्या अर्धवट एकशिंगी प्राण्याच्या
मुद्रेला संगनकीय आधार घेत पुर्ण केले व तो प्राणी घोडा असल्याचे कसे दाखवले आहे
हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. यामुळे भारतीय विद्वत्तेची जगभर लाज निघाली.
हे येथेच थांबले नाही.
एक निवृत्त पुरातत्ववेत्ते एम. व्ही. कृष्णराव यांनीही ही लिपी वाचल्याचा दावा
केला. हा दावा विलक्षण होता. ते म्हणतात कि राम हा अयोद्ध्येत जन्मला नसून
हरियाणात जन्मला, त्याने ब्यबीलोनवर
स्वारी केली आणि हम्मुराबीला युद्धात हरवत त्याला ठार मारले. हम्मुराबी म्हणजेच
रावण असा त्यांचा सिंधू मुद्रा वाचून (?) केलेला दावा. या दाव्यांनी वैदिकवाद्यांना क्षणीक
आनंद होत असला तरी यामुळे विद्वत्तेची लाज निघते, भारतीयांबाबत अविश्वसनीयता वाढीला लागते याचे भान
नाही हे दुर्दैव होय.
अलीकडेच यात भर पडली
आहे ती यज्ञदेवम तथा भारत राव यांची. त्यांनी ही लिपी म्हणजे कुटलिपी असून ती
गणिती पद्धती वापरत वाचल्याचा दावा करणारा एक प्रबंध लिहिला. त्यांनी सिंधू
मुद्रांवरील भाषा वैदिक संस्कृत असून त्यात काही वैदिक ऋचाही लिहिलेल्या आहेत असे
प्रतीपादन केले. अर्थात हा दावा जागतिक स्तरावर हास्यस्पद ठरवण्यात आलेला आहे.
समकालीन संस्कृतींच्या इतर विद्यमान उलगडलेल्या
लिपींशी या लिपीचे मूळ किंवा साम्य शोधण्याचे प्रयत्न झाले आहेत, तथापि, ते
प्रयत्न देखील अयशस्वी झाले आहेत कारण अशी कोणतीही लिपी कधीही सापडलेली नाही.
संगणक प्रोग्रामद्वारेही ही लिपी उलगडणे अद्याप यशस्वी झालेले नाही, TIFR चे
विद्यार्थी प्रत्येक मुद्रेवर दिसणाऱ्या चिन्हांच्या संयोजनांवरून एवढाच निष्कर्ष
काढू शकले आहेत की ती अर्थपूर्ण असू शकतात आणि लेखन अत्यंत सुव्यवस्थित आहे
डॉ. मालती शेंडगे
यांनी मात्र सर्वस्वी वेगळा सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या मते सिंधू संस्कृती ही
असूर संस्कृती होती. असिरियन ही पुरातन असूर संस्कृती असल्याने या संस्कृतीचे लोकच
येथे येवून सिंधु संस्कृतीची निर्मिती केली असावी. त्यामुळे सिंधू मुद्रांवरील
लिपीतुन व्यक्त होणारी भाषा ही अक्काडियन असली पाहिजे असा दावा केला.
स्टीव्ह फार्मर
यांनी लिपी वाचल्याचा दावा केला नसला तरे त्यांच्या मते सिंधू मुद्रांवर कोनतीही
भाषानिदर्शक लिपी नसून ती धार्मिक, राजकीय कार्यासाठीची स्मृतीचिन्हे आहेत. थोडक्यात
सिंधू लिपी वाचल्याचे दावे अनेकांनी केले असले तरी ते दावे राजकीय/सांस्कृतिक
वर्चस्ववादाच्या भूमीकेतून झालेले असल्याने आणि त्यामागे प्रामाणिक शास्त्रीय
प्रयत्नांची जोड नसल्याने सारेच दावे फोल ठरले असल्याचे आपल्या लक्षात येईल.
ही लिपी वाचता न
येण्याचे मुख्य कारण म्हणजे अद्याप कोणताही द्वैभाषिक लेख अथवा रोझेटा स्टोन अद्याप
मिळालेला नाही. शिवाय सिंधू मुद्रांवरील अक्षरेही कमी आहेत. आजवर स्वतंत्र असतील
अशी सुमारे ४१७ चिन्हे नोंदली गेलेली आहेत. ही चिन्हे नेमकी किती यावरही विवाद
आहेत. पण एका मुद्रेवर किमान एक तर अधिकाधिक १० चिन्हे आहेत. सरासरीने एका
मुद्रेवर पाच चिन्हे भरतात. चिन्हांची संख्या अल्प असल्याने कोणते चिन्ह कोणता
ध्वनी निर्देशित करते हे अद्याप समजलेले नाही त्यामुळे स्वभाविकपणे भाषाही समजलेली
नाही.
ही चिन्हलिपी आहे की
चित्रलिपी हाही वाद अद्याप शमलेला नाही. ही लिपी भारतियांचा स्वतंत्र शोध होता कि
ती कोठून तरी आयात झाली व सुधारित स्वरुपात वापरली गेली यावरही खूप खल झालेला आहे.
परंतू इजिप्शियन अथवा चीनी चित्रलिपी किंवा सुमेरियन चिन्हलिपीशीचे साधर्म्य
अत्यंत वरवरचे असून सिंधू लिपी ही या मातीतुनच निर्माण झाली असे राज पृथीसारखे
विद्वान म्हणतात.
या लिपीत संस्कृत अथवा द्रविड भाषा शोधणेही अशास्त्रीय असेच आहे. आर्य आक्रमण अथवा आर्यांचे भारतात स्थलांतर हा सिद्धांत
खरा जरी मानला तरी सिंधू संस्कृतीशी त्यांचा संबंध निर्माता म्हणून नाही हे अगणित
पुराव्यांच्या आधारे सिद्ध होते. किंबहुना वैदिक आर्य हे सिंधू संस्कृतीतील जवळपास
सर्वच बाबींशी अपरिचित होते असेच म्हणावे लागते. ऋग्वेदामध्ये सिंधू
संस्कृतीचे एकही वैशिष्ट्य आढळून आलेले नाही. त्यामुळे वैदिक आर्य हे स्थलांतरीत
असोत की शरणार्थी, सिंधू संस्कृतीचे निर्माते असू शकत नाही यावर जगातील
विद्वानांचे एकमत आहे. द्रविड संस्कृतीच्या लोकांनाही सिंधू संस्कृतीचे निर्माते
मानणे हेही अशास्त्रीय आहे याचे कारण म्हणजे आर्यांच्या आक्रमणामुळे द्रविडांना
दक्षिणेत विस्थापित व्हावे लागले या दक्षिणेत लोकप्रिय असलेल्या मताला पुष्टी
देणारा भाषाशास्त्रीय अथवा सिंधू संस्कृतीतील रचनापद्धतीशी साम्य दर्शवणारा एकही
पुरातत्वीय पुरावा अद्याप सामोरा आलेला नाही.
ही लिपी वाचण्याच्या प्रयत्नांचीच दिशा आजवर
चुकलेली आहे म्हणून ही लिपी निर्विवादपणे वाचण्याचा दिशेने एक पाउलही पुढे जाता
आलेले नाही. केवळ सांस्कृतिक/राजकीय कारणांसाठी ही संशोधने होत आल्याने असे होणे
स्वाभाविक आहे.
मुळात सिंधू मुद्रांचा उद्देश होता तयार
माल/वस्तू देशांतर्गत अथवा विदेशात निर्यात करतांना मालावर मालाचे नांव, किंमत,
संख्या नोंदवण्याचा. पॅक केलेल्या वस्तूंवर माती किंवा रेझिनसारख्या मऊ पदार्थांवर
छाप पाडण्यासाठी बहुतेक चौकोनी मुद्रा आणि त्याही वारंवार वापरण्यासाठी बनवल्या
होत्या हे आता स्पष्ट आहे. त्यावर कोणी वैदिक ऋचा लिहील अशी कल्पना करणेही
हास्यास्पद आहे. कारण बव्हंशी मुद्रा सापडल्यात त्या निर्मिती केंद्रामध्ये.
त्यामुळे त्यावर उत्पदित वस्तूंचे नाव असणार हे उघड आहे. मुद्रांवर लिपीव्यतिरिक्त, एकशृंगी, बैल, हत्ती, वाघ आणि कधीकधी
अमूर्त लोगो मिळालेले आहेत. आपण असे गृहीत धरू शकतो की हे प्राणी आधुनिक कॉर्पोरेट
लोगोप्रमाणेच गट/शहर/प्रांत किंवा व्यापारी संघाची ओळख दर्शवत असावेत. व्यापारी
कारणांसाठी वापरण्यात येणार्या मुद्रांवर लिपीचिन्हेही मर्यादित असणार हे उघड आहे.
याव्यतिरिक्त चौकोनी ते बटणासारख्या विविध प्रकारच्या
लिपीचिन्हे असणाऱ्या र्त्या वस्तू मिळालेल्या आहेत. यांचा उद्देश व्यापारी नव्हता कारण
याची रचना आरशाच्या प्रतिमेत नाही.. ते वैयक्तिक ओळख आणि दर्जा दर्शक असावेत असे काही
विद्वानांना वाटते. त्यामुळे ही लिपी
वाचण्यासाठी मुद्रांचा मुख्य हेतू समजावून घेणे अधिक महत्वाचे आहे.
भाषांचा
प्रवाह हा प्रगतीशील असतो. अकस्मातपणे कोणतीही सर्वस्वी नवी भाषा कोणत्याही समाजात
अवतरत नाही. सिंधू संस्कृतीची भाषा आजच्या त्या भागात बोलल्या जाणाऱ्या भाशांचीच
प्राचीन अवस्था असणार हे उघड आहे. सिंधू संस्कृती अनेक सामाजिक व रचनात्मक बाबीत
आजही प्रवाही राहिली असल्याचे दिसून येते. त्यामुळे भाषाही द्रविड अथवा संस्कृत
नसून तत्कालीन स्थानिक प्राकृत असणार हे गृहीतक घेत पुढे जावे लागेल. केवळ
सांस्कृतिक वर्चस्ववादासाठी आपापल्या अस्मितांच्या प्रभावात सिंधू लिपी उलगडण्याचा
कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाही हे उघड आहे.
-संजय
सोनवणी
No comments:
Post a Comment