दत्ताजी शिंदेचा बुराडी घाटावर मृत्यू झाला याच्या
पेशवे दरबारीही तीव्र प्रतिक्रिया उमटली. तरीही
१४ मार्चपर्यंत अब्दालीला रोखण्यासाठी पुण्यातून कोणाला पाठवावे याचा निर्णय झाला
नाही. अनेक
मुत्साद्द्यांचे १९ फेब्रुवारी १७६० पर्यंत मत होते की राघोबाददास उत्तरेत पाठवावे
पण राघोबादादा अटक प्रकरणी एक कोटीचे कर्ज करून आल्याने नानासाहेब पेशवा त्याला
उत्तरेत पाठवायला तयार नव्हता असे अनेक बखरकार म्हणतात. त्यात तथ्य नसावे असे संजय क्षीरसागरांसारखे इतिहासकर
लिहितात कारण त्यांच्या मते भाऊसाहेबाची नेमणूक झाली ती पातशहाकडून मुख्य
कारभाऱ्याचे पद मिळवणे, राघोबादादाने
बिघडवलेले राजकारण सांभाळणे आणि शक्य झाल्यास बिहार ताब्यात घेणे यासाठी. यात अब्दाली हा घटक पेशव्याच्या दृष्टीने दुय्यम होता, मुख्य नव्हे. एकंदरीत
भाऊसाहेबाच्या उत्तरेकडील वाटचालीची संथ गती पाहता त्यात तथ्य असणे शक्य आहे. शेवटी उदगीर येथे निजामाशी झालेल्या लढाईत निजामाशी
वाटाघाटी करण्यात यश मिळालेल्या बिनलढाऊ भाऊसाहेब पेशव्याला ससैन्य उत्तरेत
पाठवण्यात आले. पण
याचे परिणाम उत्तरेत विपरीत होतील याचा अंदाज पुणे दरबाराला आला नाही.
दत्ताजीच्या हत्य्येनंतर जनकोजी, साबाजी, महादजी, तुकोजी शिंदे आणि त्यांचे मुत्सद्दी तसेच मल्हारराव व
तुकोजी होळकर यांनी अब्दालीला हरवण्यासाठी नेमके काय केले याबाबत मात्र इतिहास मौन
असतो.
भाऊची नेमणूक होऊन त्याने १४ मार्च १७६० रोजी परतूडवरून दिल्लीकडे वाटचाल सुरु
करण्याआधी अनेक नाट्यपूर्ण घटना घडल्या होत्या.
दत्ताजीचे अंतिम
संस्कार होण्याच्या वेळेपर्यंत मल्हारराव आपल्या सैन्यासह जयपूरहून तेथे पोचला
होता. अंतिम संस्कार झाल्यानंतर अब्दालीवर खवळलेल्या शिंदे-होळकरांनी या
हत्येचा सूड घ्यायचा निश्चय केला. दोन्ही सेना एकत्र
आल्याने त्यांची शक्तीही वाढली होती. जनकोजी तसा अगदीच
तरूण व त्यात जखमी असला तरी तोही अब्दाली व नजीबाचा सूड घेण्यासाठी हिम्मतीने उभा
राहिला होता.
शिंदे व होळकरांनी उत्तरेत आजवर जे यश मिळवले होते ते
गनिमी काव्यामुळे. नेमका
हाच मंत्र विसरल्याने जयाप्पा व दत्ताजीचा मृत्यू झाल्याचा इतिहास डोळ्यांसमोर
होता. आता
पुन्हा गनिमी कावाच वापरायचा असे ठरवत शिंदे व मल्हारराव होळकराने, प्रसंगी आपला कट्टर शत्रू सुरजमल जाटाचीही मदत घेत
शिंद्यांसह १४ जानेवारी १७६० ते २८ फ़ेब्रुवारी १७६० या काळात अब्दाली व नजीबच्या छावण्यांवर
हल्ले चढवायला व करता येईल तेवढी हानी करून माघार घेण्याचा क्रम सुरु केला.
अब्दालीने द्त्ताजीची हत्या केली ती गनिमी काव्यानेच
यमुना ओलांडून शेरणीच्या उंच दाटीतून हल्ला करून. तोही या तंत्रात कुशल होता. पण आता शिंदे-होळकर
अनेक बाजूंनी अचानक हल्ले करू लागल्याने तो त्रस्त झाला. त्यात मराठ्यांनी गनीमी काव्याने वेगवेगळ्या पद्धतीने
चढाया करत पार सिकंदराबाद ताब्यात घेत अब्दालीच्या नाकावर टिच्चुन चौथाई वसुल केली.
आग्र्याजवळील सिकंदराबाद हे महत्वाचे ठाणे असल्याने
आणि त्याचाही पाडाव झाल्याने अब्दाली निराश होणे असंभाव्य झाले होते. मराठ्यांचा पाठलाग करावा तरी कोठे आणि कसे हेही
त्याला कळेना झाले. जनकोजी
आणि मल्हारराव कधी भरतपूरकडे निघून जात तर कधी दोआबात घुसत. अब्दाली आपल्या पाठीशी यावा म्हणजे त्याला दोन्ही
बाजूंनी कोंडीत पकडून हरवता येईल असा शिंदे-होळकरांचा
डाव होता. पण
अब्दालीही तेवढाच चाणाक्ष असल्याने तो
मराठ्यांच्या कात्रीत सापडला नाही.
मुळात अब्दाली दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्यात उत्सुक
नव्हता हे सर्वच इतिहासकारांनी नोंदवले आहेच. उन्हाळा तोंडावर येऊ लागल्याने त्याला आता परत जायची
घाई होती. येथील
उन्हाळ्यात वास्तव्य करण्याचे त्याने नेहमीच टाळलेले होते. आता येथे थांबून त्याच्या पदरात काही विशेष पडण्याची
शक्यता नव्हती, दिल्ली
त्यानेच पुरेपूर लुटली असल्याने तेथूनही काही मिळण्याची शक्यता नव्हती. त्याचे सैन्यही परतत जायची घाई करू लागले होते. शिंदे-होळकर
या जोडीशी लढण्यात प्राणहानी आणि वित्तहानी तेवढी वाढत जाणार होती. हे टाळण्यासाठी त्याने शेवटी मल्हाररावाकडे तहाचा
प्रस्ताव पाठवला.
त्यानंतर तहावर अनेक चर्चा होत तहही झाला. नजीबाचे काय करायचे, पातशहा कोण असावा व भारताची सीमा नेमकी काय ठरवायची या
मुद्द्यांवर चर्चा होत शेवटी नजीबाचा प्रदेश त्याच्याकडेच ठेवत सुरजमलच्या
मर्जीतील पातशाही उमेदवार शाहजहान सानी
ऐवजी शाह आलम (अली
गौहर) यास पातशहा म्हणून मान्यता देणे व सरहिंद ही
भारत व अफगाणिस्तानातील सीमा ठरवणे यावर समेट झाला. यावेळेस शिंदे व होळकर भरतपूर येथे होते आणि ही सारी
चर्चा नजीबखानातर्फे हाफिज रहमत खान (रोहिल्ला सरदार), मराठ्यांतर्फे गंगोबातात्या (गंगाधर यशवंत चंद्रचूड- हा होळकरांचा
कारभारी होता) व पेशव्यांतर्फे हिंगणे सामील होते तर सूरजमल जाट यांनी मध्यस्थी केली. हाफिज रहमत खान हा अब्दाली आणि मराठ्यांमधील दुवा होता, तर सूरजमल जाटाने आपल्या प्रभावाचा उपयोग मराठ्यांना पाठिंबा देण्यासाठी केला.
या तहाच्या घटनेची आणि त्यानंतर जून महिन्यापर्यंत
घडलेल्या घटनांची नोंद मराठी रियासतीत मिळते ती अशी-
“अब्दालीचा
नजीबला असलेला पाठिंबा लक्षात घेऊन शिंदे - होळकरांनी
हाफिज रहमतखानाच्या मार्फत तोड ठरवली कि, नजीबचा प्रदेश त्याच्याकडे कायम ठेऊन अब्दालीस
मार्गस्थ करावे. या
बोलण्यात गंगोबातात्या ( होळकरांचा
कारभारी ) व
हिंगणे ( पेशव्यांचा
दिल्लीतील वकील) यांचा
सहभाग होता. तहाच्या
वाटाघाटी चालू होत्या तेव्हा शिंदे - होळकर
भरतपूर येथे होते. सुरजमल्ल
जाट देखील मध्यस्थी करू लागला होता. नजीबकडे
असलेला प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवायच्या अटीवर १३ मार्चच्या सुमारास अब्दाली - मराठे यांच्यात तह घडून आला. पण पाठोपाठ उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर भाऊची
नेमणूक झाल्याची बातमी येतांच मात्र नजीब घाबरला. अब्दाली छावणी उठवून निघालेला असताना, नजीबने
त्यास येथेच रहाण्याची गळ घातली. परिणामी
वरील करार फिसकटला. असे
असले तरी मराठी सरदारांनी तहाची बोलणी पुढेही सुरुचं ठेवली होती. १२ जून रोजी होळकर लिहितो, " गिलच्यांच्या
फौजेतून हाफिज रहमतखान भरतपुरास आला. गंगाधरपंतांशी
( बहुतेक
गंगोबा तात्या )
बोलत आहे. नजीबखानाने
सलुखाचा संदर्भ चालविला आहे, पण आमचे विचारानुरूप बनत नाही. श्रीमंतही संनिध आले."
( मराठी रियासत - खंड
४ )"
म्हणजे १३ मार्चच्या सुमारास हा तह झाला असता आणि
अब्दाली परत जायला तयार झाला असता भाऊसाहेब पेशवा मोठे सैन्य घेऊन येतो आहे (भाऊचा मुख्य उद्देश्य माहित नसतानाही) ही वार्ता मिळाल्याने नजीबखानाची भंबेरी उडणे
स्वाभाविक होते.
अब्दाली निघून गेला तर मराठ्यांचे एवढे मोठे सैन्य आपल्यावर तुटून पडेन व आपला
विनाश करेल अशी भीती त्याला वाटणे स्वाभाविकही होते.
तरीही शिंदे व होळकरांनी आपले प्रयत्न सोडले नाही. होळकर ज्येष्ठ व सर्वात जास्त अनुभवी असल्याने त्याने
भाऊसाहेबास तातडीने पत्र पाठवले की चंबळ नदीच्या पलीकडेच थांबावे, उत्तरेत येऊ नये आणि दरम्यान अब्दालीशी व नजीबाशी जून
महिन्यापर्यंत सलोख्याची बोलणी सुरु ठेवली. भाऊसाहेबाने
होळकरांचे काही एक न ऐकता आपली वाटचाल संथ गतीने चालूच ठेवली.
खरे तर आता १३ मार्च रोजी
अब्दालीशी तह झाला होता आणि या तहानुसार
नजीबाला त्याचा प्रदेश तसाच मिळणार असून मराठ्यांच्या इच्छेनुसार शाह आलम पातशहा
बनणार असून सरहिंद ही भारत-अफगाणीस्तानची सीमा ठरणार हे पक्के झाल्यानंतर अब्दालीला भारतात राहण्याचे आता काही कारण उरले नव्हते तसेच भाउलाही उत्तरेत एवढ्या तातडीने यायचे कारण उरले नव्हते.
शेवटी पानिपत युद्धानंतर जो तह झाला तोही याच स्वरूपाचा
होता.
.आणि अब्दाली परत जायला निघालाही होता, पण भाऊ चंबळ येथेच न थांबता पुढे येऊ लागल्याने आता मात्र
तहाची शक्यता मावळतेय असे दिसू लागले, तरीही जनकोजी व मल्हारराव भाऊ चंबळ व गंभीर नदीच्या आसपास
असता प्रत्यक्ष भाउस भेटले. यावेळी (१९ जून) भाऊ त्यांना बेफिकीरपणे म्हणाला की “पटले तर अब्दाली परत जाईल. कदाचित राहिलाच तरी एका-दो दिवशी आगऱ्याजवळ यमुना उतरून पारिपत्य करू.”
जाटांचा भाऊवर विश्वास नव्हता त्यामुळे त्याने आपल्या
मुलुखातून जातांना कसलाही उपद्रव देऊ नये व खंडणी मागणार नाही असे आश्वासन मागितले. पण यमुनेला तेव्हा पूर आला होता व शुक्रतालजवळील आपला
मुक्काम हलवून अब्दाली जवळ येऊन कोळजलेश्वर येथे मुक्काम टाकला होता. अशा स्थितीत नदीवर नावांचा पूल बांधून सैन्य यमुनापार करणे
अशक्य होते. सबब मराठे सर्वात आधी
तेथे अडकून पडले. आता तह होणे अशक्य
होते व त्याची जाणीव जनकोजीला झालेली होती.
भाऊने आधी ओस पडलेली दिल्ली ताब्यात घ्यायचे ठरवले, पण येथेही त्यांची वाटचाल तीर्थक्षेत्रांना भेट देत
झाल्यामुळे दहा जुलै पर्यंत वेळ दवडला. त्यात श्रावणमास सुरु झाल्याने धर्मकृत्ये सुरु झाली. त्यातही भाऊने वेळ वाया घालवला. तोवर भाऊचा एकंदरीत रांगरंग पाहून मराठ्यांचा मित्र सुजा
अब्दालीच्या गोटात सामील झाला, सुरजमल जाटानेही नंतर भाऊला साथ देण्यास नकार दिला. उयेथे परिस्थिती एवढी बिकट असताना आपण वेळ दवडत आहोत आणि
उत्तरेतील मित्रही गमावत आहोत याची भाऊला जशी जाणीवच नव्हती,
अब्दाली खरे तर शिंदे आणि होळकरांच्या गनिमी काव्याने तो
त्रस्त झालेला होता. त्याच्या फौजेची दमछाक झालेली होती. अशात भाऊने पोहोचायला उशीर केल्याने व आता पावसाला सुरुवात झालेली असल्याने अब्दाली व त्याच्या
सैन्याला विश्रांती घेण्यास पुरेसा अवसर मिळाला होता. त्यामुळे तो आता निश्चिंत बनला होता. संजय क्षीरसागरांच्या शब्दात भाऊची कूर्मगती अब्दालीच्या
पथ्यावर पडली होती.
अखेर भाऊ मथुरेहून दिल्लीपर्यंत आला. दिल्ली तशी तेव्हा ओस पडलेली होती. हजारभर सैन्य तेथे
ठेवण्यात आले होते. अब्दाली यमुनेच्या
पल्याडच्या तीरावर होता. त्याचा फायदा घेत, आपले बरेच लोक गमावत अखेर भाऊने दिल्लीच्या किल्लेदाराकडून दिल्ली आपल्या
ताब्यात घेतली. आता भाऊ
विश्वासरावासोबत तेथे आलेला होता. विश्वासराव सरसेनापती असला तरी तो वयाने लहान असल्याने
नामधारी का होईना मुख्य सेनापती भाऊ होता. तो ठरवेल तीच रणनीती असल्याने शिंदे-होळकरांना त्याच्या आज्ञेत राहणे भाग होते. ओस पडलेल्या दिल्लीला जिंकणे यात काही पराक्रम होता
अशातलाही भाग नाही. १ ऑगष्ट रोजी
मराठ्यांची हानी होऊन दिल्लीचा किल्ला ताब्यात आला. पातशहा तर आधीच इंग्रजांच्या आश्रयाला निघून गेला होता.
त्यात मराठ्यांच्या गोटात असलेले जाट व गाजीउद्दीनच्या
महत्वाकांक्षा वाढू लागल्या. तशात दिल्लीत मराठी सैन्याचे कुचंबणा सुरु झाली. दिल्लीत त्यांना उपासमारीने मरण्याची वेळ आली. मग भाऊने अब्दालीच्या ताब्यात असलेले कुंजपुरा ताब्यात
घ्यायचे ठरवले. तरीही १६ सप्टेंबर
१७६० पर्यंत त्याने प्रत्यक्ष हालचाल काहीही केली नाही. तो आता अब्दालीशीच्या तहाच्या वाटाघाटीसाठी प्रयत्न करू
लागला. शिंदे-होळकर यांनी केलेला तह फिस्कटायला लावला तो भाऊनेच, आणि तोच आता तशाच स्वरूपाच्या तहासाठी प्रयत्न करू लागला हे
एक विशेषच.
त्यात नजीबखानाने मराठ्यांनी विश्वासरावास दिल्लीची पातशाही
दिली आणि त्यांनी दिवाणखान्याचे छत फोडून
पातशहाची अप्रतिष्ठा केली अशा कंड्या पसरवण्यास सुरुवात केली. दिल्लीजवळील प्रदेश मुस्लीमबहुल असल्याने या कंड्यानी काय
उत्पात माजला असेल याची आपण कल्पना करू शकतो. यातील चांदीचे छत फोडले ही गोष्ट खरी असली तरी ती सैन्याचा
पगार भागवण्यासाठी नाणी पाडण्यासाठी, पातशहाची अप्रतिष्ठा करण्यासाठी नव्हे हे कोणी लक्षात घेतले
नाही.
काहीच मनासारखे होईना म्हणून भाऊ अखेर जनकोजी शिंदेच्या
मसलतीमुळे अखेर कुंजपुऱ्याकडे जायला निघाला. आघाडीवर शिंदे-होळकर होते. ही फौज अखेर १६ ऑक्टोबर १७६० रोजी कुंजपुऱ्यास पोचली.
हा किल्ला धमासान युद्धानंतर पडला. जनकोजी या युद्धात मोठ्या शौर्याने आणि चेवीला येऊन लढला
कारण दत्ताजीचा खुनी कुत्बशाह त्याच किल्ल्यात होता. त्याला पकडून त्याचा शिरच्छेद करण्यात आला व दत्ताजीचे शिर
जसे भाल्यावर टोचून मिरवले गेले होते तसेच त्याच्याही शिराशी करण्यात आले. आपल्या चुलत्याच्या क्रूर हत्येचा असा बदला जनकोजीने घेतला. आता मात्र मराठ्यांनी कुंजपुऱ्याचा किल्ला नष्ट केला.
पण यावेळेस एक चुक घडलीच. किल्ल्यातील फौजेपैकी अफगाण-रोहील्यांनी मराठ्यांच्या चाकरीत रहायची इच्छा दाखवली. सरदार विंचूरकरांनी दोन-तीन हजार रोहिले-पठाणांना आपल्या सेवेत घेतले. याच लोकांनी पानिपतवर ऐन वेळेस घात करून मराठा लष्करात पळ
माजवला. पानिपतविषयक चर्चा
करताना बहुतेकांनी या चुकीचे विश्लेषण करणे टाळलेले आहे.
कुंजपुरा काय ताब्यात आला, दिल्लीकडे माघारी येण्याऐवजी भाऊ कुरुक्षेत्राची तीर्थयात्रा
करायला निघाला. कुंजपुरा पडल्याचे
समजताच अब्दाली तातडीने काही ना काही हालचाल करेल तेव्हा आपण वेळ न घालवता दिल्लीकडे जावे
हा शिंदे-होळकरांचा अनुभवी
सल्ला त्याने ऐकून घेतलाच नाही. यमुनेला पूर असल्याने अब्दाली कसल्याही स्थितीत ऐलतीरी येऊ
शकत नाही यावर त्याचा विश्वास होता.
पण कुंजपुरा पडल्याने अब्दाली धास्तावला असला तरी तो अनुभवी
सेनानी होता. त्याने
कुरुक्षेत्राच्या वाटेवर भाऊ असतानाच उतार शोधुन बागपतजवळ धाडसाने यमुना ओलांडली. ही बातमी मिळताच भाऊ हादरला. पण भाऊ उत्तरेत आल्यापासून तो शिंदे व होळकर या उत्तरेतील
अनुभवी सरदारांचे न ऐकता पुण्याहून त्याच्या सोबत आलेल्या पुरंदरे, मेहंदळे यासारख्या सरदारांचे व इब्राहीमखान गार्द्यासारख्या
निजामाच्या सेवेतून अलीकडेच आपल्याकडे
आलेल्या तोपचीचे ऐकण्यात तो स्वारस्य दाखवत होता.
भाऊने आता हतबल होऊन आता काय करायचे हा प्रश्न विचारला
तेव्हा जनकोजी व अन्य शिंदे सरदार काही बोलले नाही, पण ज्येष्ठ व सर्वात अधिक अनुभवी असलेल्या मल्हाररावाने
भाउच्या चुकांचा पाढा वाचला व “आता काय करावे याबाबत मेहेंदळे यांनाच सल्ला विचारावा” असे सांगून त्या बैठकीतून आपले अंग काढून घेतले.
शेवटी इब्राहीमखान गार्द्याच्या सल्ल्यानुसार मराठे सुरक्षित
निसटण्यासाठी विलायती पद्धतीचा गोल बांधून दिल्लीच्या दिशेने निघाले कारण भाउला
लगेच अब्दालीशी भिडायची इच्छा नव्हती. गोल म्हणजे बुणगे मध्ये ठेवत सैन्याने त्यांच्या भोवती घेरा
घालत करायची वाटचाल. सुरक्षित पलायनासाठी अशी योजना करण्यात येते. पण यामुळेच वाटचाल धीमी होते. वेगवान हालचाली करायची सवय असलेल्या होळकर व शिंदेंना हे
पसंत नसले तरी त्यांनी सेनापतीचे ऐकले.
२५ ऑक्टोबरला निघालेले मराठा सैन्य २८ ऑक्टोबर तारखेस पानिपत
येथे येउन पोहोचले. तीन दिवसात केवळ ३०-३५ मैलांचे अंतर कापले एवढा येथेही वेग संथ होता. पानिपत एक-दोन दिवस आधीच ओलांडले असते तर कदाचित अब्दालीला त्यांची
वाट अडवायची संधी मिळाली नसती. पण तसे व्हायचे नव्हते.
दोन्ही बाजूंची टेहळणी पथके पानिपत आणि सोनपतच्या दरम्यान
एकमेकांना भिडली. त्यात मराठ्यांचे २५
लोक पकडून नेण्यात आले. त्यातील चार लोकांचा शिरच्छेद करण्यात आला तर इतरांना लुटून सोडून दिले. हा एक प्रकारचा अपशकुनच होत्या आणि तसेच व्हायचे होते. अब्दालीने मराठे येत आहेत हे लक्षात येताच अब्दालीने आपले
सैन्य होता होईल त्या वेगाने पानिपतच्या दिशेने आणले. तेथूनच त्याला मायदेशी परतता येणार होते.
१ नोव्हेंबर १७६० रोजी अब्दालीच्यांही फौजा पानिपतजवळ येऊन
पोचल्या. त्याचा हेतू
अफगाणिस्तानला निघून जायचा होता. त्यामुळे तो सावधगिरीने वाटचाल करत होता. पण मराठ्यांची फौज आपल्याच दिशेने येत आहे हे कळताच त्याला पानिपतजवळच
मुक्काम ठोकणे भाग पडले व मराठ्यांची दिल्लीकडे जाणारी वाट अडली. दोघांनी अशा रीतीने एकमेकांच्या वाटा अडवल्या जो कोणाचाही हेतू
नव्हता, नियतीने जणू पानिपतचे
विनाशक युद्ध घडवण्याचा जसा चंग बांधला होता.
दोन्ही सेना
समोरासमोर उभ्या ठाकल्या असल्या तरी लगेच युद्ध झाले नाही. मुळात युद्धाचा हेतू दोन्ही पक्षांचा नव्हता. त्यामुळे तहाच्या बोलाचाली दोन्ही पक्षात सुरु झाल्या व
त्यात कालापव्यय होऊ लागला.
पण पानिपत युद्धाचे बीज रोवले गेले होते ज्यात विश्वासराव पेशवा व भाऊसाहेब
पेशव्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुण जनकोजी आणि त्याचे चुलते तुकोजी शिंदेला आणि
मल्हाररावाचा सरदार संताजी वाघला प्राण गमवावे लागले तर पानिपत युद्धातील
पराभवामुळे मल्हाररावावरच आरोपांशी राळ उडाली. खरे दोषी बाजूलाच राहिले त्यामुळे त्याचीही चिकित्सा करणे
आवश्यक आहे.
आता
आपण पानिपत युद्ध प्रकरणाकडे सरळ वळू. मल्हाररावांविषयी
भाऊच्या मनात प्रथमपासून आकस होता व जनकोजी अद्याप तरुण असल्याने त्याला काय कळते
असे वाटून भाऊ आपल्या मेहंदळेंसरख्या सरदारावर व इब्राहिमखान गारद्याच्या कवायती
सैन्यावर अधिक विश्वास ठेउन होता हे इतिहासकारांना मान्य आहे, त्यामुळे
त्याबाबतच्या तपशीलात येथे जात नाही.
पानिपत येथील मुक्कामाच्या काळात अब्दालीशी ज्या दोन
मोठ्या चकमकी झाल्या त्या केवळ शिंदे आणि होळकरांमुळे जिंकल्या गेल्या याबाबतही कोणाचे
दुमत नाही. दोघांना
तात्काळ राखीव कुमकेची मदत मिळाली असती तर मराठे तेंव्हाच जिंकले असते याबद्दलही
इतिहासकारांना संशय नाही.
२२ नोव्हेंबर १७६० रोजी वजीर शहावलीखानाशी झालेले
युद्ध निर्णायक ठरले असते. शिंदे-होळकरांनी अफगाणी फौज अक्षरश: कापुन काढली. सुजा
व नजीबाने अधिकची कुमक पाठवुनही वजीराला व त्याच्या सैन्याला पळावे लागले. शिंदे-होळकरांच्या
फौजांनी त्यांचा पार अब्दालीच्या छावणीपर्यंत पाठलाग केला. लष्कराची हे अवस्था पाहुन आणि शिंदे होळकर जोडीने
त्यांचा पाठलाग लावला आहे हे लक्षात येताच मुख्य छावणीतील अफगान-रोहिल्यांनीही पळ काढायला सुरुवात केली. खरे तर या वेळीस लगोलग बळवंतराव मेहंदळे (जे काही अंतरावर ससैन्य उभे राहुन हा प्रकार पाहत
होते) अथवा
अन्य कोणी सरदाराची कुमक मिळाली असती तर...?
पण
आता थकलेल्या शिंदे-होळकर
सेनेला मदत करण्यासाठी ताज्या दमाची राखीव कुमक मिळायला हवी असे मेहंदळेला वाटले
नाही कारण त्याचा शिंदे-होळकराबाबत
असलेला आकस. आणि
भाऊसाहेबालाही त्यासे करण्याचे सुचले नाही कारण रणांगण काय असते आणि कश्या
युद्धनीती आखायच्या असतात याचा त्याला मुळात अनुभवच नव्हता.
त्यामुळे १४ जानेवारी १७६१ रोजी मराठे जिंकु किंवा मरु या भावनेने
अब्दालीच्या सेनेवर तुटुन पडले हे खरे नाही. सत्य सांगते ती आदल्या रात्रीची सर्वांची मसलत:
"गिलच्यांचे बळ वाढत चालले. आपले लष्कर पडत चालले......तेंव्हा हा मुक्काम सोडुन बाहेर मोकळे रानी जावे...दिल्लीचा राबता सोडुन दुसरीकडे जाउ...पण झाडी मोठी मातब्बर....गिलचा जावू देणार नाही...यास्तव बंदोबस्ताने निघावे."
ही नोंद एवढेच सुचवते की निकराच्या युद्धाचा भाऊचा
बेत नव्हता. असता
तर त्याने सुरक्षीत पलायनासाठी इब्राहिमखान गारद्याने विलायती पद्धतीच्या गोलाची
कल्पना राबवलीच नसती.
मल्हारराव होळकर आणि जनकोजी या योजनेशी सहमत असण्याची
शक्यता नव्हती.
ज्या गनीमी काव्याने आजवर शेकडो लढाया ते लढले होते तोच याही वेळी कामास येईल असा
त्यांचा विश्वास होता. पण
युद्ध करून दिल्लीकडे जाण्यात भाऊलाही रस नव्हता. त्यामुळे त्याने ना होळकरांचे ऐकले ना जनकोजीचे.
शेवटी गोल करुन सुरक्षितपणे यमुनेच्या दिशेने जायचे
ठरले. प्रत्येक
सरदाराला आपली जागा नेमून दिली. गोलाच्या
लढाईचे खालील नियम असतील व ते पाळले जातील अशी हमी भाऊने सर्वांच्या वतीने
इब्राहिमखान गारद्याला दिली होती. ते
नियम असे:
१. कोणत्याही सरदाराने कसल्याही स्थितीत गोल तोडायचा
नाही, आपली
नेमून दिलेली जागा सोडायची नाही.
२. शत्रु जर गोलातील एखाद्या सरदाराच्या गोटावर चालुन
आलाच तर फक्त त्यानेच बाहेर पडायचे, हल्ला परतवायचा आणि पुन्हा मागे येऊन आपली जागा
घ्यायची. दुस-या कोणत्याही सरदाराने त्याच्या मदतीला जायचे नाही...सबब कोणत्याही स्थितीत गोल मोडायचा नाही.
आता गोलाची भाऊने (इब्राहीम गारद्याने) निघण्याआधी केलेली गोलाची रचना पहा व अब्दालीची छावणी
त्यावेळेस कोठे होती हेही पहा.
अब्दालीच्या गोटाच्या ईशान्य बाजुला, म्हणजे
गोलाच्या मधोमध, हुजुरात
(भाऊचे
सैन्य) आहे. भाऊच्या डाव्या बाजुला गारदी आहे तर उजवीकडे, म्हणजे
बरोब्बर अब्दालीच्या सरळ दिशेत उत्तरेला होळकर आहेत. शिंदेंची योजना होळकरांच्याच बाजूला केलेली आहे. गोलाची मागची बाजु (मधे बुणगे) दुय्यम
प्रतीच्या सरदारांनी व्यापलेली आहे. कारण
हल्ला नैऋत्येकडील अब्दालीच्या छावणीच्याच बाजुने होणार हे उघड होते. त्यामुळे त्या बाजुला सामोरे असणारे सेनानीही तेवढेच
प्रबळ असनार हे ओघानेच आले.
गोलाची
अब्दालीच्या दिशेची बाजु हीच भाऊच्या सैन्याची आघाडी होती. होळकर, शिंदे, स्वत: भाऊ, पवार, गायकवाड, विंचुरकर, माणकेश्वर
व गारदी हे सर्वच सरदार त्या अर्थाने आघाडीच सांभाळत होते हे येथे लक्षात घ्यायला
हवे.
पण मुळात लढाईचा बेत नसल्याने गोलाची रचना करण्यात आली होती आणि यदाकदाचित अब्दालीचा
हल्ला झालाच तर याच बाजुवर, डावीकडे, उजवीकडे
अथवा मधोमध कोसळणार हे नक्कीच होते...नेमक्या
कोणत्या बाजुने, कधी
आणि कोणत्या सरदाराने हे अब्दाली ठरवणार होता...आमचे इतिहासकार नव्हेत.
असो.
१४
जानेवारीला सकाळीच गोल पुर्व दिशेने यमुनेकडे निघाला. येथेही संथ वाटचाल नडली. मराठे आपल्यावरच चालून येत आहेत असा समज होउन सकाळी
साडे अकराच्या सुमारास रोहिल्यांनी आधी धाव घेतल्यामुळे गारद्याच्या बाजुने
युद्धाला तोंड लागले. तोवर
अब्दालीलाही मराठे पळ काढत आहेत कि आपल्यावरच चालून येत आहेत याची कल्पना नव्हती. त्यामुळे त्याने सर्व शक्यता लक्षात घेउन लगेच आपले
सैन्य रवाना केले.
त्यावेळी मराठे व अब्दालीच्या सैन्याची रचना
खालीलप्रमाणे झाली.
अब्दालीच्या सैन्याला मराठी सैन्य पुर्वेकडे निघालेय कि
आपल्या दिशेने चाल करुन येत आहे याची कल्पना असणे शक्य नसल्याने त्याने आपल्या
दिशेला दिसनारी गोलाची सर्व बाजु हीच मराठ्यांची आघाडी समजून सुरुवातीला तशीच आपली
सैन्यरचना केली. त्यामुळे
शिंदे-होळकरांसमोर
सुजा, जहानखान, नजीब
व शहापसंदखान हे सरदार उभे ठाकले. हुजरातीसमोर
शहावलीखान तर पवार-गायकवाडांसमोर
हाफिज रहमत फैजुल्ला खान उभे ठाकले. गारद्याची
बाजु अडवायला अमिरबेग व बर्खुरदार खान आले.
स्वत: अब्दाली
मात्र कुशल सेनापती प[रामाने
राखीव सैन्यासह मागे थांबला. उलट
गोलाच्या रचनेमुळे भाऊ स्वत: आघाडीवर
अडकला.
युद्धाची
सुरुवात गारद्याच्या अथवा विंचुरकर, पवार व गायकवाडांच्या बाजुने सुरु झाली. गोलाच्या नियमानुसार या तिघांनी रोहिल्यांना
गोलाबाहेर पडुन पिटाळले व मागे येवून आपली जागा घेतली. अशाच रितीने मराठे युद्ध करत राहिले. निर्णायक युद्ध करण्याचा भाऊचा बेतच नसल्याने व
युद्धाचे पारडे तरीही आपल्या बाजुने फिरत असल्याचे दिसत असुनही भाऊने गोलाचे नियम
मोडण्याच्या आज्ञा देत सर्वच सरदारांना युद्धात उतरण्याचे आदेश न दिल्याने
प्रत्येक सरदार, अगदी
भाऊही,
आपापले युद्ध, समोरुन
कोणी चालून आलाच तर, करत
राहिले. म्हणजे
या युद्धाला सर्वकश युद्धाचे रुप भाऊने देण्याचा एकही प्रयत्न केला नाही. सर्व सरदारांनी सेनापती या नात्याने भाऊने दिलेल्या
आज्ञा पुरत्या पाळल्या. .
अशा रितीने हुजरात ते गारद्याची बाजू यांत चकमकी होत
राहिल्या. इकडॆ
शिंदे-होळकरांच्या
बाजुने तोफा-जंबुरके, बंदुकांचे
युद्ध सुरु होते. त्यांच्यात
हातघाईचे युद्ध पेटले ते अब्दालीच्या आज्ञेने तीन-साडेतीनच्या दरम्यान. साडेचार वाजता विश्वासराव पेशव्याचा गोळी (अथवा तीर) लागून
मृत्यू झाला. तोवर
तरी मराठ्यांची एकंदरीत युद्धावर पकड असल्याचे दिसते. विश्वासरावाचा मृत्यू झाला त्याच दरम्यान गारद्यांचा
निकाल अफगाण-रोहिल्यांनी
लावला होता. इब्राहिमखान
गारदी कैद करुन नेला गेला. या दोन्ही घटना थोडक्या कालावधीने मागे-पुढे झाल्याने एकीकडे विश्वासरावाच्य मृत्युमुळे
हुजुरातीत पसरलेली अस्वस्थता, भाऊवर स्वाभाविकपणे आलेली शोकमग्नता यामुळे हुजरात
संकटात सापडणे स्वाभाविक होते.
याक्षणी (साडेचार
ते पाच) असलेली
परिस्थिती नीट समजावून घेणे गरजेचे आहे. विश्वासरावाचा
मृत्यू झाल्याची खबर मल्हाररावांपर्यंत पावने-पाच ते पाचच्या दरम्यान पोहोचली. तोवर विंचुरकर-पवार-गायकवाडांवर व हुजुरातीवर रोहिले, गिलचे
व अफगाण तुटुन पडलेले होते. शिंदे
व मल्हाररावाचे नजीब, शहापसंदखान
व सुजाशी युद्ध सुरु होते. तरीही
विश्वासरताव ठार झाल्याने हुजुरातीची बिकट अवस्था झाल्याचे समजल्याने मल्हाररावाने खुद्द जनकोजी शिंदें, त्याचे चुलते तुकोजी शिंदे व आपला सरदार संताजी वाघ यांसोबत
काही सैन्य देवून भाऊच्या मदतीला पाठवले.
भाऊची हुजुरात व शिंदे-होळकरांची गोलातील जागा यात किमान तीन किलोमीटरचे
अंतर होते. त्या
धमासान युद्धातही हे तिघे भाऊच्या हुजुरातीपर्यंत साडॆपाच-सहा पर्यंत पोचले. पण तत्पुर्वीच विंचुरकरांनी कुंजपुरा युद्धात पदरी घेतलेल्या
दोन-तीन
हजार रोहिले-अफगाणांनी
गारद्यांच्या बाजुचा पराभव होताच मागे धाव घेत बुणग्यांत घुसून मराठे हरल्याच्या
घोषणा देत बुणग्यांना मारायला सुरुवात केली. त्यामुळे
पराभव झाला असे वाटून आघाडीच्या मागील बाजुचा घाबरुन पळ सुटला होता. बहुदा याच वेळीस यशवंतराव पवार मारला जावून त्याचीही
फौज उधळली. एकंदरीत
वेगाने सर्वच स्थिती हाताबाहेर गेली.
साहजिकच भाऊ अधिकच अडचणीत सापडला. तोवर संताजी वाघ आणि जनकोजीची कुमक त्याला मिळाली खरी
पण पराजय अटळ बनला होता. संताजी
शौर्याने लढता-लढता
ठार झाला. जनकोजीने
तलवार चालवत भाउला वाचवण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याला बर्खुरदार खानाने दगा
करून जखमी अवस्थेत पकडले तर तुकोजी शिंदे लढता लढता ठार झाला. संताजी वाघच्या अंगावर चाळीसपेक्षा अधिक जखमा होत्या, ज्या
पाहून अब्दालीही गहिवरला होता असे म्हणतात. नंतर
भाऊचे खरे काय झाले हे रहस्य अद्याप उलगडायचे आहे.
ही
स्थिती पाहता किमान साडेपाच वाजेपर्यंत तरी मल्हाररावांनी आपल्या आघाडीवर आलेल्या
शत्रुला रोखुन धरले होते. जनकोजी
भाऊच्या मदतीला गेला असला तरी महादजी व साबाजी शिंदे जनकोजीच्या जागी सैन्याचे
नेतृत्व करायला थांबलेले होतेच. त्यांचे
युद्ध सुजा, जहानखान, नजीबाच्या
सैन्याशी सुरुच होते.
याच वेळीस हुजुरात हरल्याची खबर मल्हाररावांना मिळाली
असावी. तोवर
सुर्यास्तही (५.२० वाजता) होवुन
गेला होता. आता
अंधार पडू लागल्याने युद्ध पुढे रेटण्यात अर्थ नव्हता. त्यात सगळीकडे पळ सुटला होता. गिलचे-रोहिले
हुजुरातीला हरवून लुटीच्या मागे लागले होते. अशात
महादजी शौर्याने युद्ध करत असतांना त्याच्या मांडीवर तलवारीचा घाव पडल्याने तो
जखमी झाला. महाद्जीला
राणेखान नावाच्या पाणक्याने आपल्या हेल्यावर बसवून त्या प्रेतांच्या दाटीतून
त्याला बाहेर काढले. मल्हारराव
व शिंदेंची बरीचशी फौज युद्धातच कामी आलेली होती. विंचुरकरादि सरदारांनी पूर्वीच माघार घेतलेली होती.
होळकरांसमोरही मागे फिरन्याशिवाय कोणते गत्यंतर
राहिले नाही. मल्हारराव व भाऊची
पत्नी पार्वतीबाईची गाठ वाटेत पडली. त्यांची दुरवस्था पाहून
मल्हाररावाने तिला सुखरुपपणे पुढे
नेले हेही येथे लक्षात घ्यायला हवे. (सटवोजी जाधवचे १९ जानेवारी १७६१ चे पत्र). मल्हारराव आधीच निघाला असता तर मागून आलेल्या मल्हाररावची
भेट पार्वतीबाईशी कशी झाली असती? पार्वतीबाई पराजय दिसताच आधीच निघाली एवढाच याचा अर्थ होतो
पण याबाबत इतिहासकारांनी मौन बाळगले आहे.
बर्खुर्दार खानाने जायबंदी झालेल्या जनकोजीला पकडले खरे पण त्याने
त्याला अब्दालीसमोर न नेता किंवा अब्दालीला ती वार्ता मिळू न देता गुप्तपणे आपल्याच
गोटात ठेवले. जनकोजीला
सोडवण्यासाठी कोणी खंडणी देईल किंवा जनकोजीच खंडणी कबूल करेल असा त्याचा होरा होता. त्यातून आपला आर्थिक फायदा
होईल असे स्वार्थी गणित त्याने मांडले होते.
जनकोजीकडे त्यावेळेस खजिना असणे शक्य नसल्याने
तो खंडणी देण्याच्या शितीत नव्हता. तोवर जगले-वाचलेले सारेच मराठे निघून गेले असल्याने आता जनकोजीला कोणतीही आशा
उरलेली नव्हती. आशा असेल तर ती एकच म्हणजे ज्याप्रमाणे सुजा इतर मराठ्यांना कैदेतून सोडवायला
मदत करतो आहे तशीच मदत आपल्याला करेल ही,
पण बर्खुरदार खानाने जनकोजीच्या अटकेला गुप्त
ठेवले असल्याने तसेही तत्काळ होऊ शकले नाही.
पण अशा गोष्टी तेही सैन्यतळावर पूर्ण गुप्त राहणे अशक्य असल्याने
जनकोजीच्या विनंतीवरून बर्खुरदार खानाने आपल्या दिवाण मोतीलालला सुजाचा दिवाण
काशीराजाला बोलावणे धाडण्यास सांगितले.
काशीराज व जनकोजीची भेटही घालून देण्यात आली. बर्खुरदार खानाने सात लाख
रुपयांची खंडणी मागितली. सुजाशी चर्चा करायला काशीराज निघून गेला पण जनकोजी बहुदा बर्खूरदार
खानाच्या गोटात आहे ही कुणकुण नजीबाला लागली. त्याने ही बातमी
अब्दालीपर्यंत पोचवली. अब्दालीने बर्खुरदार खानाच्या गोटाची झडती घेण्याचा आदेश दिला. अब्दालीच्या हालचालीची खबर
बर्खुरदार खानाला लागताच त्याने जनकोजीची हाल हाल करून हत्या केली आणि त्याच्या
प्रेताची गुप्तपणे विल्हेवाट लावली.
जनकोजीचा तोतया
पण त्यामुळे मराठे मात्र जनकोजीचे प्रेत कोणीच पाहिले नसल्यामुळे तो
जिवंतच आहे या समजाखाली राहिले. त्यात जनकोजीचा रघुजी थोरात नामक एक तोतया उगवला व आपणच जनकोजी असा
दावा करू लागला. शिंद्यांच्या लष्करातील अनेकांनीही हाच जनकोजी असे ठामपणे सांगून, त्याच्यासोबत एका ताटात
भोजन करून निर्वाळा दिला. सखारामबापूचा चुलतभाऊ गिरमाजीपंत याला जनकोजीचा कारभारी बनवण्यात आले. यामागे काहीतरी पेशवे
दरबाराचे कारस्थान होते हे नक्की.
पण पुढे माधवराव पेशव्याने चौकशी करून हा जनकोजी नसून रघुजी थोरात नावाचा
बनावट इसम आहे हे सिद्ध केले. तोवर, म्हणजे १७६३ च्या नोव्हेंबरपर्यंत जनकोजी म्हणून रघुजी सत्ता भोगात्व
वावरत राहीला होता. त्याची लबाडी उघड झाल्यावर त्याचे नाक-कान कापून सोडून देण्यात
आले. पण
दुसऱ्याच दिवशी त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. (मराठी रियासत- खंड ५)
म्हणजे मृत्युनंतरही जनकोजीचे दुर्दैव संपले नव्हते. जनकोजीचा मृत्यू झाला
तेंव्हा तो फार तर १६-१७ वर्षाचा पोरगेलासा तरुण होता. पण अंगात धैर्य आणि शौर्य
असल्याने त्याने या वयातही दत्ताजीचा मृत्यू झाल्यानंतर शिंदे सेनेचे नेतृत्व केले. त्याला साबाजी, तुकोजी, महादजी यांचीही मोलाची साथ
लाभली. होळकर-शिंदे यांच्यात वैमनस्य
होते या मतालाही छेद दिला गेला. बर्खुरदार खानाने मनी स्वार्थ ठेवत जनकोजीचा खून केला नसता तर
भविष्यात त्याने शिंदेशाहीला खूप पुढे नेले असते. शिंदे वारसाबाबत प्रश्न
निर्माण करून मराठा सत्तेचेही स्वार्थ जागले नसते.
पण हे व्हायचे नव्हते.
नियतीच्या मनात अजून काही वेगळे होते. महादजी शिंदेचा राजकीय
क्षितीजावर उदय होणार होता आणि शिंदेशाहीच्या वैभवाला कळसावर नेणार होता.
·
No comments:
Post a Comment