मानवी मनाने, त्याच्या प्रतिभेने, कल्पनाशक्तीने आणि बुद्धीने अचाट भराऱ्या घेत मानवी जीवन सुसह्य करणारे अनेक शोध लावले असले तरी “मन म्हणजे नेमके काय या प्रश्नाचा उलगडा व्हायला अक्षरश: हजारो वर्ष गेली. मानवी शरीरशास्त्राने आजच्या युगात प्रचंड प्रगती केली आहे. हृदय, मेंदूतील मज्जातंतू, रक्ताभिसरण या सर्वांची रचना विज्ञानाने सूक्ष्मपणे उलगडली आहे. पण या संपूर्ण भौतिक शरीराचे नियंत्रण करणारी, पण स्वतः भौतिक स्वरूपात कधीही न दिसणारी एक गोष्ट आजही वैज्ञानिकांना चक्रावून सोडते ती म्हणजे 'मन'! 'मन म्हणजे नेमके काय' आणि ते कुठे वसलेले असते' या एकाच प्रश्नाचा शोध मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासून ते आजच्या अत्याधुनिक न्यूरो-सायन्सपर्यंत अविरत सुरू आहे आणि तरीही मानवी मनाचा समाधानकारक उलगडा झालेला आहे असे नाही. मन म्हणजे मानवी मेंदूतील जैव-विद्युत-चुंबकीय तरंगांचा समुच्चय असून त्याच्या उत्पत्तीची केंद्रे मानवी मेंदूत असतात येथवर मानवी प्रगती झाली असली तरी भाषेची उत्पत्ती नेमकी का व कशी होते हे अद्याप उलगडलेले नाही. मानवी मनात उमटणाऱ्या असंख्य भावना, विचार, शरीराला दिले जाणारे आदेश, पाहण्याचे कार्य अशा अनेक मनाशी जोडल्या गेलेल्या घडामोडी सुप्त आणि जागृत स्तरावर कशा होतात याचे अंतिम उत्तर आजही आपल्याला मिळालेले आहे असे नाही.
मानवाच्या सुरुवातीच्या काळात मनाचा संबंध प्रामुख्याने अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि धार्मिक संकल्पनांशी जोडला गेला. प्राचीन भारतीय विद्वानांनी मनाला 'अंतःकरण' मानले आणि त्याचे स्थान हृदयात असते असा सिद्धांत मांडला. त्यांचे म्हणणे होते की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चार घटकांनी मिळून माणसाची चेतना बनते. योगाने मन नियंत्रित करता येते असेही त्यांचे म्हणणे होते. 'मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः' म्हणजे माणसाच्या सुख-दुःखाला आणि बंधनाला केवळ त्याचे मनच कारणीभूत असते, अशी धारणा होती. असे असले तरी मन कोठे असते आणि ते कशामुळे कार्य करते याबाबत मात्र शोध घेतला गेला नाही.
त्याच वेळेस अॅरिस्टॉटल आणि प्लेटो या ग्रीक विचारवंतांच्या म्हणण्याप्रमाणे मनाचे स्थान हे 'हृदयात' मानले जात असे! मानवी मन आणि मेंदू यांच्यात पुढे हिप्पोक्रेटिस य आधुनिक वैद्यकशास्त्राच्या जनकाने पहिल्यांदा असा तर्क मांडला की, माणसाच्या भावना, विचार आणि वेडेपण हे हृदयाशी नाही, तर डोक्यातील 'मेंदूशी' संबंधित आहे.
एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस ऑस्ट्रियन मज्जातज्ज्ञ सिगमंड फ्राईडने मनाच्या अभ्यासाला वैज्ञानिक व शास्त्रीय वळण दिले. त्याने मनाचे विश्लेषणात्मक मॉडेल मांडून जगभरात खळबळ उडवून दिली. फ्राईडने स्पष्ट केले की, माणसाला जाणवणारे मन हे हिमनगाच्या केवळ टोकासारखे १०% असते तर उरलेले ९०% मन हे सुप्त पातळीवर काम करत असते. या सुप्त पातळीवर माणसाच्या दडपलेल्या इच्छा, भीती, बालपणीच्या आठवणी आणि भावना साठवलेल्या असतात. माणसाची स्वप्ने ही त्याच्या अबोध मनाची खिडकी असतात, हा सिद्धांत फ्राईड यांनी मांडला. त्या अहंकार आणि सर्वोच्च अहंकार या संकल्पनांद्वारे मानवी वर्तनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मनाच्या शोधातील सर्वात मोठे आणि गुंतागुंतीचे कोडे म्हणजे 'भाषा'! माणूस मनात विचार करतो, तो एखाद्या भाषेत करतो. पण ही भाषा मनात आधी आली की आधी विचार आले? विचार आणि भाषा यांचा संबंध काय? विचार आधी येतो की भाषा? याबाबत प्रस्तुत लेखकाने ‘भाषांचा उगम’ या पुस्तकातून सखोल वेध घेतलाच आहे. त्यापूर्वी जगप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ नोम चॉम्स्कीने सिद्धांत मांडला की, मानवी मेंदूत जन्मजातच भाषा शिकण्याची क्षमता असते. न्युरो-सायन्सनेही यात भौतिक पातळीवर संशोधन केले. उदा. मानवी मेंदुतील "ब्रोका" हे केंद्र भाषेचे उत्पत्तीस्थान आहे असे आधुनिक विज्ञान मानते. या केंद्राला अपघाताने मार लागला तर माणसाच्या भाषिक क्षमतेत गडबड होते हे १८६१ साली लक्षात आल्याने या केंद्राला हा शोध लावणा-या पॉल ब्रोकाचे नांव दिले गेले. १८७६ साली कार्ल वेर्निकच्या लक्षात आले कि अजून एक मेंदुतील केंद्रक आहे तेथे आघात झाला तर भाषा समजण्याची आणि व्यक्त होण्याची क्षमता बिघडते. पुढे असे लक्षात आले कि भाषेच्या संदर्भात मेंदुतील अनेक विभाग परस्परावलंबी असुन प्रत्यक्ष बोलण्याची क्रिया व्हायला मेंदुचे अनेक भाग कार्यरत असतात. प्राण्यांच्या तुलनेत केवळ मानवाच्याच मनात भाषेची ही अमूर्त निर्मिती कशी झाली हे गूढ आजही कायम आहे.
आजच्या २१ व्या शतकात न्यूरोसायन्स, एमआरआय स्कॅन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मेंदूतील पेशींचा अभ्यास केला जात आहे. मेंदूतील डोपामाइन, सेरोटोनिन यासारखी रसायने आपल्या भावना ठरवतात, हे विज्ञानाने शोधले.
परंतु आजही मानवी मेंदू आणि मन यातील फरक अस्पष्ट आहे. मेंदू हा हार्डवेअर मानला तर मन ही त्यातील चेतना/विचारप्रणाली असलेले सॉफ्टवेअर आहे असे आपण तर्काने म्हणू शकलो तरी त्याचा पुरावा अद्याप मिळायचा आहे. आज एआय मानवी बुद्धीमत्तेवर मात करण्याची धडपड करत आहे आणि अनेक विद्वान त्याबाबत चिंतेत आहेत. पण अद्याप मन आणि विचार कसे काम करतात हेच माणसाला माहित नाही. तंत्रज्ञान इतके पुढे गेले असूनही माणसाला आनंद, दुःख, प्रेम, किंवा सहानुभूतीची प्रत्यक्ष जाणीव कशी होते, याचे उत्तर आजचा कोणताही अत्याधुनिक संगणक देऊ शकत नाही. हजारो वर्षांच्या वैचारिक, दार्शनिक आणि वैज्ञानिक प्रवासानंतरही 'मनाची कोडी' पूर्णपणे उलगडलेली नाहीत. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मानवी मनाची कल्पकता, त्याच्या संवेदना आणि त्याची अनपेक्षितता हाच मानवी अस्तित्वाचा सर्वात सुंदर आणि रहस्यमय भाग राहिल!
-संजय सोनवणी

No comments:
Post a Comment