Sunday, March 16, 2014

"आषाढातील एक दिवस"



 आताच मोहन राकेश यांचे ज्योती सुभाष यांनी अनुवादित केलेल्या आणि अतूल पेठेंनी दिग्दर्शित केलेल्या "आषाढातील एक दिवस" या अभिजात नाटकाचा प्रयोग पाहून आलो.

सारी माणसे आपापल्या परिस्थितीचे बळी असतात. भावनांच्या लाटांवर वाहवत जाणारे शहाणपण गमावत परिस्थितीचे गुलाम होतात आणि आपल्या चुकांची जाण जेंव्हा होते तेंव्हा काळ एवढा पुढे वाहत गेलेला असतो कि सारे काही दुरूस्तीच्या पार गेलेले असते. प्रतिभा असने आणि जगणे यातील सांधा कधी तुटतो हे समजतच नाही... कधीकधी व्यवहार प्रतिभेवरही मात करून प्रतिभावंताला गारद करतो...!

चिरकालिक सत्ये मांडनारी ही कलाकृती आहे. सर्वांनी एकदा तरी ती पहायला हवी. या नाटकातील महाकवी कालिदास, त्याची प्रेयसी मल्लिका, आई अंबिका, विलोम...सर्व पात्रे प्रातिनिधिक बनत जणू काही एकाच माणसाच्या व्यक्तिमत्वात खोल कुहरात दडून बसलेली व्यक्तित्वे उलगडत जातात...आत्ममग्न करतात...व्यथित करतात आणि आपण आपलेच जगणे कसे हरपत जातो ते दर्शवितात.

थोडक्यात आपल्याच जगण्यावर चिंतन करायला भाग पाडणारी ही कलाकृती आहे.

मल्लिकाची भुमिका करणारी पर्ण पेठे एक विलक्षण अभिनेत्री आहे हे "सत्यशोधक" पाहतांनाच लक्षात आले होते. या नाटकातील अत्यंत वेगळी भुमिका तिने साकार केली आहे. कालिदासाची भावविभोर ते उध्वस्त रुपे समर्थपणे पेलणारा आलोक राजवाडे, कालिदासाच्या मित्राची किंचित खलनायकी छटा असलेल्या विलोमचे पात्र साकार करणारा ओम भुतकर आणि मल्लिकेची आई अंबिकेची भुमिका करणा-या ज्योती सुभाष यांनी आपापल्या अभिनयशक्तीच्या जोरावर संपुर्ण नाटकाला एका मनस्वी लयीत गुंफले आहे. अतूल पेठेंना नेहमी नवनवी आव्हाने घ्यायला आवडतात...एक मनस्वी दिग्दर्शक...त्यांना सलाम!

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...