Wednesday, April 17, 2013

व्यवस्था बदलायचीच तर....


आम आदमी पक्ष भ्रष्टाचार निर्मूलन व जनलोकपाल आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर स्थापन झाला. केवळ मिडियासेंट्रिक असेच या पक्षाचे स्वरूप राहिल्याचे आपल्याला दिसते. स्थापनेपुर्वीच या आंदोलनातील नेत्यांची फाटाफूट झाल्याचे व त्यांच्यावरही भ्रष्टचार/नीतिभ्रष्टतेचेही आरोप झाल्याचे आपण पाहिले आहे. आम आदमी पक्षाची सुरुवात वरून खाली...भावनीक आंदोलन व ते मिडिया टु पब्लिक अशा स्वरुपाची दिसते. माध्यमांनी पाठ फिरवली आणि हा पक्षही विरल्याच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रातील राज ठाकरेंच्या पक्षाची सुरुवात ही परप्रांतीयांच्या द्वेषावर, ठाकरे परिवाराच्या वलयावर आणि "खळ्ळ खट्याक"च्या जोरावर तसेच मिडियाच्याच आशिर्वादाने मिळणा-या विपूल प्रसिद्धीवर आधारीत आहे व त्याची वाटचाल अशीच पुढेही चालू राहणार हे आपण पाहतोच आहे. अशी वाटचाल कोणत्याही नव्या पक्षाला किती काळ यश मिळु देईल याबाबत शंका वाटणे स्वाभाविक आहे. जनतेचे खरे प्रश्न जाणने, त्यावर उत्तरे शोधणे व त्यासाठी खालून, तळागाळातून संगठण करत प्रश्नांचे सोडवणूक करत सत्तेचा खरा सोपान चढणे हे खरे तर कोणत्याही नव्या पक्षाचे ध्येय असले पाहिजे. पण वर्तमान काळात असे कोणी करणे असंभाव्य वाटावे अशी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती असतांना महादेव जानकरांसारख्या उच्चशिक्षीत तरुणाने २००३ सालीच राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करुन या पक्षाला देशव्यापी बनवण्यासाठी पायाला भिंगरी लावून तळागाळापासुनच आपल्या पक्षाची रचना करण्याचे कार्य केले आहे व ते आता फोफावते आहे हे शहरी वर्गाला फारसे माहित नसते.

महादेव जानकर अत्यंत कृतीशील व्यक्तीमत्व आहे हे मी त्यांच्याशी असलेल्या गेल्या दीडेक वर्षाच्या परिचयातून सांगू शकतो. त्यांना प्रसिद्धेचा सोसहे नाही. मिडियापासून कशाल फटकून राहता हे विचारले तर ते म्हणतात ती प्रसिद्धी किती टिकते? त्यापेक्षा मी सामान्यांत राहून जे राष्ट्रस्तरावर करत आहे तेच खरे प्रदीर्घकाळ टिकणार आहे. ध्येय साध्य करायला वेळ लागेल हे खरे आहे पण घाई केली तर मग ज्या राजकीय तडजोडी कराव्या लागतील त्या खरा भारत उभारायला कामी येणार नाहीत. अन्य राजकारणी आणि माझ्यात फरक उरणार नाही.

शरद पवारांना पराजित करण्याचे स्वप्न असणारा हा अजून एक विलक्षण माणुस. गेल्या निवडणुकीत शरद पवारांविरुद्ध त्यांनी लाखापेक्षा अधिक मते मिळवून शरद पवारांनाही चकीत केले होते. पवार निवडुन येणारच होते परंतू त्यांच्या विरोधात नवख्या पक्षाच्या नेत्याने एवढे मते मिळवली हे राजकीय विश्लेशकांनाही धक्का देवून गेले होते. नंतर त्यांच्याशे तडजोडी करण्याचे अनेक राजकीय प्रयत्न झाले पण त्यांनी कोनाला त्यात यश मिळवू दिले नाही. "एकला चालो रे!" चा घोष त्यांनी लावला.

खळ्ळ खट्यकचा प्रयोग केला असता तर जानकर सर्वांनाच माहित झाले असते. कोणाच्या द्वेषाचा अजेंडा राबवला असता तरी ते फेमस तरी झाले असते. परंतू द्वेष हा त्यांच्या विचारचा गाभाच नाही. माझे आणि त्यांचे मैत्र झाले ते केवळ त्यामुळेच. आधुनिक भारतात द्वेषाला स्थान नाही. जातीयतेला अथवा धर्मांधतेला स्थान नाही. सर्वांचा आर्थिक विकास व्हायचा असेल तर ग्रामीण भारत आधी सुद्रूढ व्हायला हवा व त्यासाठी शाश्वत अर्थव्यवस्था आणि ग्रामीण अर्थविकासाची आवश्यकता आहे असे त्यांचे मत. त्यासाठी ते देशभर फिरत असतात. आसाम असो कि गुजरात, महाराष्ट्र असो कि तमिळनाडु...जानकरांच्या पक्षाचे अस्तित्व आज या सर्व राज्यांत आहे. हा पक्ष सत्तेपासून आज दूर असला तरी  प्रांतिक विचारांत न गुरफटता राष्ट्रीय विचार करणारा हा पक्षनेता आहे.

त्यासाठी त्यांने वयाच्या बाविसाव्या वर्षे कधीही विवाह न करण्याची शप्प्थ घेतली. स्व्त:च्या घरी, जोवर ख-या बहुजनांची सत्ता केंद्रात येत नाही तोवर स्वत:च्या घरीही न जाण्याची शप्प्थ घेतली. त्यांचे स्वत:ची कसलीही संपत्ती नाही. कसलेही बेनामी उद्योग नाहीत. मुलात घराणंच गरीबाचं. आज त्यांचा फिरण्याचा व जेवण-खाण्याचा खर्च लोकवर्गणीतून चालतो. असा एकही राजकीय पक्षनेता मला आजतागायत आधुनिक काळात दिसला नाही.

आर्थिक बळ नाही, भांडवलदारांची कास धरलेली नाही, राजकीय तडजोडी नाहीत, जातीय भावना नाहीत तरीही या पक्षाने गेल्या दहा वर्षांत ग्रामीण जनमानसात आदराचे स्थान मिळवले आहे. अनेक ग्रामपंचायती ताब्यात आहेत, जिल्हापरिषदांवर वर्चस्व आहे, एक आमदारही या पक्षाच्या तिकिटावर आलेला आहे, अन्य राज्यांतही हा पक्ष स्पर्धेत आहे. याला यश म्हणता येणार नाही हे खरे आहे. परंतू साधनस्त्रोतांचा पुर्ण दुष्काळात मिळवले ते यश अन्य कोणत्याही पक्षांच्या यशापेक्षा उजवे आहे असेच मी म्हणेल.


मला या माणसाचा मनुष्य म्हणुन भावलेला गुण म्हणजे  अत्यंत सामान्य राहणी आणि वर्तन. सभांत हे स्टेजही टाळतात...चक्क मांडी घालुन कार्यकर्त्यांत बसतात...आपली वेळ आली कि भाषण करून पुन्हा तेथेच. स्टेजवर मिरवण्याची हौस नसलेला (आणि त्याची प्रसिद्धीही करण्याची हौस नसलेला) राजकारणी मी तरी पाहिला नाही.

खरा राजकारणी तोच जो जनसहभागातून मोठा होतो व जन-आकांक्षांचे प्रतीक म्हणून पुढे येतो. असा नेता जो कोणत्याही अफुचा गुंगीखाली कार्यकर्ते अथवा समाज नेत नाही तर उलट त्यांचाच सहभाग घेत आंदोलने करतो. जानकरांची आजवरची सारीच आंदोलने ही जनप्रश्नांसाठीच झालीत...पण आपल्या व्यवस्थेतील जातीय परिमाणांमुळे व भांडवलशाहीवादी आधार नसल्याने ती माध्यमांच्या "डोळ्यांतून" सुटने स्वाभाविक आहे. हगण्या-मुतन्याची अथवा प्रांतवादी ते जातीयवाद्यांची संस्कृती जेथे माध्यमांची जागा व्यापून बसते तेथे चरावू कुरनांचे, आगरी-कोळ्यांचे, शेतक-यांचे मुलभूत प्रश्न मांडणारे जानकर कोठुन आकर्षण निर्माण करणार?

असे असतांनाही देशभरात खिशातुन खर्च करत पक्ष चालवणारे लाखो अनुयायी त्यांनी जे निर्माण केलेत आणि ज्यांची संख्या वाढतच आहे ते एक दिवस आजची प्रस्थापित राजकीय व्यवस्था आणि तत्वज्ञान बदलवण्याची खरी शक्ती बाळगतात यचे भान प्रस्थापित राजकारण्यांना आहे. म्हणुनच कि काय अन्य पक्षांत सुस्थिर असलेले नेतेसुद्धा जानकरांच्या शिवाय बहुजनीय (हा शब्द येथे मी ब्राह्मणेतर या अर्थाने वापरलेला नसून भगवान बुद्धांना ज्या अर्थाने "बहुजन" म्हणजे "अधिकांत अधिक लोक" या अर्थाने अभिप्रेत होता त्या अर्थाने वापरला आहे.) हिताचे राजकारण होणार नाही याबाबत सजग आहेत. त्याची प्रचिती गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक कार्यक्रमांतून आलेली आहे.

राजकारण हा माझा विषय नाही. कारण सध्या जे राजकारण चालू आहे ते राजकारण नसून भ्रष्टांत कोण कमी कोण जास्त या स्पर्धेचे एक विघातक (आणि तरीही लोकांना मनोरंजक वाटणारे) रूप आहे. समाज रोज त्याची प्रचिती घेतो. जनसामान्यांची कशी खिल्ली सर्व प्रकारे उडवली जाते याचे प्रतीरूप म्हणजे सध्याचे राजकारण. जानते राजे बेकायदेशीर बांधकामांबाबत समाह्नुभुतीने बोलतात...पण महाराष्ट्रात (तरी) एकही बंधकाम बेकायदेशीर नसेल याची मात्र ग्वाही देत नाहीत असे हे "जाणतेपण" काही केल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जाणतेपण नव्हे. आत्मक्लेषाची व्याख्याच पार बदलून टाकणारे "आत्मक्लेश" हे खिल्लीचेच का विषय बनतात हे त्यांना कधी समजणार नाही. जगाला एक सांगायचे आणि इकडे शेतकरी टीक ट्वेंटी पीत आत्महत्या करत असतांना ट्वेंटी-ट्वेंटीला हजे-या लावणा-यांची राजकीय संस्कृती ही उक्ति आणि कृतीपासून केवढी दूर गेली आहे हे दर्शवत असतांना असा एक आशेचा किरण दिसतो.

व्यवस्था बदलायची तर प्रामाणिक लोक हवेत असे आपण सर्वच म्हणतो. प्रामाणिक व तरुण लोकांनी राजकारणात यावे असा तर राहुल गांधीही हट्ट धरतात. पण जे खरोखर प्रामाणिक लोक राजकारणात येतात, लोकसहभागातुन राष्ट्रीय पक्ष स्थापन करतात...तळागाळात पोहोचण्याचा प्रयत्न करतात त्याबाबत मात्र आम्ही उदासीन का असतो बरे? म्हणजे आम्हाला नौटंकीच राजकारणी हवे आहेत काय? ज्यांचे कसलेही समाज-अर्थ तत्वज्ञान नाही असेच नेते हवे असतात काय? असेच असेल तर मग नवी समाज-राजकीय क्रांती कधी होणे अशक्य आहे.

भावनीक लाटांवर आरुढ होवून कधीही देशाची प्रगती होत नसते. धार्मिक, जातीय अथवा प्रांतिक अहंकारांच्या जोरावर हे राष्ट्र चालणे शक्यच नाही. माध्यमांनी कितीही कोणाबाबत स्वार्थप्रणित महत्ता वाढवल्या तरी त्याचा उपयोग नाही. कालचे नायक आज खलनायक होतात हे आपण रोजच पहात असतो. त्यातून नैराश्य येणे व हे असेच चालणार अशी उद्विग्नता येणे स्वाभाविक आहे. पण जानकरांसारखी जीही काही अल्पसंख्य पण ध्येयवेडी काही माणसे आहेत ते काहीतरी आशा देतात. त्यांनी तरी निराश करू नये असे वाटणे स्वाभाविक आहे. गेली दहा वर्ष जनसहभागातून...आर्थिक असो कि पार न्यायासाठी संघर्ष करत जेलमद्धे जायची तयारी असो...अशा मनस्वी कार्यकर्त्यांकडुन तळातून वाढत असलेला हा पक्ष आहे. येत्या निवडनुकांत मोठे यश मिळवायची आशा बाळगणारा हा पक्ष आहे.

महादेव जानकर उद्या ४५ वर्षांचे होताहेत. राजकारणात ते सर्वाधिक तरुण आहेत असे म्हटले तरी वावगे होणार नाही. या तरुणाचे सर्वैक्याचे आणि सक्षम भारताचे स्वप्न साकार होवो ही शुभेच्छा!

11 comments:

 1. आंम्ही मेंढपाळ असल्यामुळे राजकारणाशी आमचा फार कमी समंध यायचा आमचा वापर फक्त मतदानापुरता व्हायचा
  परंतु
  मा. महादेव जानकर साहेबांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केल्यापासुन सर्व ऊपेक्षीत बहुजनांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत कि आतातरी आंम्हा ऊपेक्षीत सर्वसामांन्यांच राज्य येईल आणी हळु हळु यशही येत आहे
  योगायोक असा कि जानकर साहेबही एका मेंढपाळ कुटुंबातच जन्माला आलेत आणी सम्राट चंद्रगुप्त मौर्यसुद्धा मेंढपाळच होते त्यांनी संपुर्ण जगावर राज्य केले होते आणी जानकर साहेबही पंतप्रधान बनायचे स्वप्न पाहिले ते सत्यात ऊतरने फार अवघड नाहिये
  राष्ट्रीय समाज पक्षाला मदत म्हनुन दरवर्षी मेंढपाळ बांधव एक बेनं (मेंढरु) देतात

  पुर्वी प्रस्थापीत राजकारण्यांनी दिलेल्या वडापाव भजीपावर आंम्ही त्यांच्या मागे पळायचो पण आता आंम्ही जानकर साहेबांच्या मागे कायम ऊभे राहनार आहोत याची शपथ प्रत्येक मेंढपाळाने बिरोबाचा भंडारा ऊचलुन घेतलेली आहे कारण जानकर साहेबांनी आमचा स्वाभीमान" जागा "केला
  आहे
  मेंढपाळी करताना रोज 4 गावे आंमी फिरतो तेंव्हा जनमताचा कानोसा घेतला असता राष्ट्रीय समाज पक्षाला माननारा एक खुप मोठा युवावर्ग आहे हे सहज लक्षात आले
  (मेंढपाळी करत असताना अशीच एका प्रस्थापीत राजकारण्याशी गाठ पडली त्याने विचारले आंम्ही तुंम्हाला पैसे देवु शकतो आमच्या कार्यक्रमांना तुंम्ही का येत नाही? त्याला माझ्या 82 वर्षाच्या आजोबांनी ऊत्तर दिले कि तुमच्या सभांना गर्दि आसतीया ति पैसं घिवुन वडापाव भजीपाव चारुन दारु पाजुन गांजा पाजुन आणलेली आसतीया पण जानकरांच्या" सभेला येत्यात ते ज्यांना बदल पाहीजेल आणी ते जानकरांना साथ देवुन बदल घडवी हायतच की, आतापरीन झाल्याल्या आपमानाचा बदला घ्यायचाय, ज्यांचा स्वाभिमान जागा झालाय, कारं बाबा तुझा आजा,तु, तझा ल्योक राजकारनात सुन, आणी आता नातु राजकारणा
  मग आमी किती पिढ्या तुमची गुलामगीरी करायची किती दिवस येठ बिगारागत तुमच्या दावनीला रायचं आता आमचं राच येनार हाय
  तुमचं दिवास आता संपलं बाबा)
  राष्ट्रीय समाज पक्षाच
  प्रस्थापीत राजकाण्यांनी कायम मेंढपाळांची पशुपालकांची टर उडवली आहे (अपमान) केला आहे
  फक्त राष्ट्रीय समाज पक्षाने जनावरांच्या चारा प्रश्नावर वारंवार आवाज ऊठवलाय
  तरीपण महाराष्ट्रातील दादा नावाच्या वढाळ मंत्र्याने पशुपालकांचा घोर अपमान केला आहे
  या अपमानाचा बदला 2014 ला आंम्ही पशुपालक घेनारच आहोत हि काळ्या दगडावरची रेघ आहे

  ReplyDelete
 2. असे विरळ, लोकाभिमुख आणि व्यवस्था बदलवणारे व्यक्तिमत्व आमच्या समोर आणल्याबद्दल आपले आभार.

  ReplyDelete
 3. Thank you Sanjayji.
  Wishing a happy birthday to Mahadeo Jankar Saheb.

  ReplyDelete
 4. साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा....

  ReplyDelete
 5. लेख फार छान आहे ..धन्यवाद सर..बऱ्याच वेळा माहिती अभावी विलक्षण अशी क्षमता असणारी व्यक्तिमत्वे कालाच्या पडद्या आड़ दडून रहातात ...व्यवस्ता परिवर्तानाची ताकद रखानारे असे महादेव जानकर यांचे व्यक्तिमत्व आहे .. अता गरज आहे ती जन सामान्यानी या लढ्यात सहभागी होण्याची ..

  ReplyDelete
 6. प्रथम तुमचे अभिनन्दन. श्री जानकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. श्री जानकर हे खूप मोठे व्हावेत हि सदिच्छा. animal फार्म (george orwell) होवू नये हि इच्छा. .... विचक्षण

  ReplyDelete
 7. ramayanamadhe java sumatra bete ani meru parvatacha ullekh aahe, sadhya ti indonesia mahe aahet. bhagwan sri ram ayodhyamadhun nighalyavar dakshiinet lankejade jatana jithe jithe thamble tyacha sarvatra ulekh aahe. eg. panchavati nashikmahe, seeta nhani(bathroom, at dongargaon mountain at ahmendagar, bhadrashalam at andhra pradesh and many more) u cant deny truth.

  ReplyDelete
 8. Very good article sir,Happy Birthday to Jankar sir.

  ReplyDelete
 9. Very good article sir,Happy Birthday to Jankar sir.

  ReplyDelete
 10. खळ्ळ खट्यकचा प्रयोग केला असता तर जानकर सर्वांनाच माहित झाले असते. कोणाच्या द्वेषाचा अजेंडा राबवला असता तरी ते फेमस तरी झाले असते. Agree

  ReplyDelete
 11. जानकर साहेबाना वाढदिवसाच्या शुबेच्चा. !!

  सोनवणी सर तुमची शब्दमांडणी अतिशय सुरेख असते आणि जानकर साहेबा बद्दल चे तुमचे शब्द भावून जातात. मनाला स्पर्श करून जातात.

  नारायण पाटील, पुणे मा . महादेवजी जानकरांचा एक सच्चा कार्यकर्ता.

  ReplyDelete