धर्म स्थापन करायला एक ठार वेडेपणा लागतो. तो बहुदा माझ्यात असावा!
(अगणित धर्म कालौघात अशाच ठार वेड्यांनी स्थापन केले. काही टिकले...अगणित
अदृष्य झाले तर काही स्मृतीशेष आहेत. पण धर्म जर चिरंतन असेल तर अनेक धर्म
मुळात नष्टच का होतात? नवीन धर्म स्थापनच का होतात? धर्माचे नष्ट होणे नियत
असेल तर शाश्वत धर्म असुच कसा शकतो? कि शाश्वत नसणे हेच धर्माचे मुलतत्व
आहे? प्रश्न अगणित आहे कारण मीही तो येडचापपणा तथाकथित नकळत्या वयात केला
होता. मी त्यालाच चिकटून नंतर जरा "हुशारीने" चमत्कारांचे वलय
दिले असते तर काय सांगावे, आज तो कदाचित दखलपात्र धर्म झाला असता. पण ही
हुशारी मानवविध्वंसक असते. धर्म बदनाम व त्याज्ज्य बनतात ते त्यामुळेच. मी
तसा हुशार नव्हतो हे किती बरे झाले!
मी स्थापन केलेल्या धर्माची कथा अशीच बोधक आहे. अवश्य वाचा.)
मी नवा धर्म स्थापन केला तेंव्हा मी नववीत होतो. माझ्या धर्माचे नांव होते "जीवन धर्म". येथे जीवन हा शब्द "पाणी" या अर्थाने आहे. या धर्माला एकूण नऊ अनुयायी मिळाले. त्यात माझ्या वयाचे (१४-१५) पाच तर बाकी बाप्प्ये होते.
त्याचं असं झालं. मी तेंव्हा वरुडे (ता. शिरुर) या गांवात राहत होतो. माझे वडील प्राथमिक शिक्षक असल्याने तशी आम्हाला बरीच गांवे बदलावी लागली पण या गांवात मात्र आमचा मुक्काम प्रदिर्घ काळ (५-६) वर्ष होता. वरुड्यात चवथीपर्यंतच शाळा असल्याने पाचवीसाठी मी चिंचोलीच्या शाळेत जात होतो. तेथे सातवीपर्यंतची शाळा होती. रोज पायी जाणे-येणे व्हायचे. तसा पावसाळा मला पहिल्यापासुनच प्रिय. पावसाळ्यात माझा चालीव प्रवास फार मजेशीर असायचा...आनंदवणारा...सुखावणारा...सर आली कि चिंब भिजायची मजा मी कधी सोडली नाही.
पण त्याच वेळीस पिवळे ठक्क पडलेले गवताळ रानोमाळ हळुहळु ज्या नजाकतीने सरारुन हिरवाई धारण करे ते सावकाश होणारे परिवर्तन मला थक्क करे. पण त्याहून मोठी मौज वेगळीच होती. ती म्हणजे रस्याच्या कडेला खड्डे-चरांत पाण्याची जी डबकी बनायची त्यात हळुहळु चिकट-बुळबुळीत इवल्या करड्या-काळसर रंगाच्या अंड्यांच्या माळा दिसू लागत. मी रोज पाहत असे. ती अंडीही मोठी होतांना. एखाद चुकार दिवशी बेडुक-माशांची इवली पिल्ले आणि शेवाळ त्यांची जागा घेतांना दिसत. साताठ महिने कोरड्या ठक्क पडलेल्या त्या भेगा पडलेल्या भुतळावर हे जीवन कसे फुलते? मला प्रश्न पडायचा. अत्र्थात उत्तर नव्हते आणि मास्तरला विचारले तर तेही सांगत नसत.
सहावीला शाळेसाठी मी गणेगांवचा रस्ता धरला. गांवातील बरीचशी मुले गणेगांवलाच जात असत म्हणून! या मार्गावरही माझा पावसाळ्यातला एकमेव छंद म्हणजे पावसाळ्यात माळांचे होणारे विस्मित करणारे परिवर्तन आणि काहीच नसलेल्या डबक्यांत उलणारे जीवन. कोठुन येते हे जीवन? कोणी आणली ती अंडी? कोठुन आले ते शेवाळ?
प्रश्न आणि प्रश्नच.
मी वाचायचो खूप. कथा-किर्तनालाही हजेरी लावायचोच. एका बुवाला भीत भीत विचारलं तर तो सांगे "ही सगळी पांडुरंगाची कृपा...तो आहे म्हणून आपण आणि सारी प्राणिजात..." सहावीलाच असतांना मी पहिल्यांदा आणि शेवटचा पंढरपूरला आई-वडिलांसोबत गेलो. चंद्रभागेत लोक एस्टीच्या खिडक्यांतून नाणी फेकत होते. पांडुरंग पाहिला. ही दगडाची मुर्ती काही केल्या जीवनाचा निर्माता असू शकत नाही एवढेच काय ते माझ्या मनाने घेतले.
अशीच सातवीही गेली. आठवीला एक वर्ष पुण्यात पुणे विद्यार्थी गृहात होतो. तेथेही शिक्षकाने पहिल्याच दिवशी :"आज शिकवणार नाही. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा..." असे सांगितले. मी धीर धरुन (खेड्यातून आलो असल्याने माझ्यात प्रचंड न्युनगंड होता.) "जर पृथ्वी जन्माला आली तेंव्हा उकळत्या रसाचा गोळा होती तर या पृथ्वीवर जीवसृष्टी कशी आली?" सरांनी उत्तर दिले नाही. म्हणाले, हे वर्ष संपल्यावर या प्रश्नाचे उत्तर देईल...! झालं. माझ्या शंकेचं काही कोणी हरण करेना आणि कितीही पुस्तकं वाचनालयातली वाचली तरी उत्तर मिळेना.
पुणे विद्यार्थी गृहाचं एकंदरीत धार्मिक. भारतीय संस्क्रुती आणि हिंदू धर्म किती महान असून तो जगभर कसा पसरला होता या आख्याईका आम्हाला देसाई नांवाचे एक निवृत्त शिक्षक मोकळ्या तासाला येऊन सांगायचे. तात्पुरता प्रभावितही व्हायचो...पण माझा मूळ प्रश्न काही केल्या सुटत नव्हता. गणपती अथर्वशिर्ष व गीतेचा सोळावा अध्याय त्यांनीच आमच्या कडुन तोंडपाठ करुन घेतलेला. गणपती अथर्वशिर्षाचा मज गरीबाला झालेला फायदा म्हणजे गणेशोत्सवात अगदी ब्राह्मण घरांतही आम्हा काही मुलांना घेऊन जात. ११ किंवा एकविस वेळा गणपतीसमोर ते म्हटले कि आम्हाला प्रत्येकी एक-दोन रुपयांची दक्षीणा मिळे व केळे किंवा अन्य एखादे फळही मिळे. थोडक्यात चंगळ व्हायची.
धर्माशी माझा दुसरा परिचय येथे झाला. म्हणजे खेड्यात किर्तनकार सांगत तो धर्म आणि येथे कळे तो धर्म वेगळे होते. दोन्हीही हिंदुच हा त्यातला एक भाग. पण विरोधाभासी. (हिंदुत्ववादी हा शब्द मी प्रथम येथे ऐकला.) येथे विनोबांची "गीताई" तोंडपाठ केलेली. "कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये" पासून ते "स्थिरावला समाधीत..." वगैरेंवर प्रवचनेही होत आणि मग माझे चिंतनही. (आठवीतल्या पोराच्या चिंतनाची योग्यता ती काय असनार...पण करत असे हेही खरे.)
परिस्थीतीमुळे माझे पुणे विद्यार्थीगृह सुटले. परत गांवी आलो. नववीला मी कान्हुर (मेसाई) येथे प्रवेश घेतला. वरुड्यावरुन रोज चालत जाऊन-येऊन असे. हे अंतर बरेच....साताठ किलोमिटरचे. माझे जुने निरिक्षण पुन्हा सुरु झाले. आणि एके दिवशी मला वाटले मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. मी त्या दिवशी दांडी मारली आणि एका डबक्याकाठीच त्यात विहरणा-या इवल्या मासोळ्या पाहत बसुन राहिलो.
पाणी...यालाच जीवनही म्हणतात. कशातच कोठे नसलेले जीवन पाण्यातच अवतरते. माणसाचे शरीरही बव्हंशी पाणीच आहे. इतर प्राण्यांचेही तसेच. म्हणजे पाणी हेच जीवनाचे निर्माते. बाकी सारे देव-बिव झुठ. सारे धर्म झुठ! आकाश आणि पाणी हेच आपले निर्माते. पाणी हाच सर्वांचा धर्म. बस्स ठरले...!
प्रशांत पोखरकर हा माझा पाचवीपासून बनलेला पहिला मित्र व सहाध्यायी. तो चिंचोलीत रहायचा. मी त्याला सायंकाळी घरी गाठले आणि त्याच्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता ओढतच पठारावर घेऊन गेलो. त्याच्याच शेताच्या बांधावर बसून मी मला लागलेला "अलौकिक शोध" आणि नव्या धर्माची आवश्यकता यावर त्याला भरभरुन सांगत राहिलो. तो माझा नेहमीचाच नि:सीम श्रोता त्यामुळे त्याने शांतपणे सारे ऐकून घेतले. मग विचारले "आपल्या नव्या धर्माचे नांव काय?"
त्याने "आपल्या" म्हटल्याने मला अपार हुरुप चढला. "जीवन धर्म" मी म्हणालो आणो हेच नांव का हेही त्याला सांगितले. झाले. एका नव्या धर्माची उद्घोषणा झाली आणि पहिला अनुयायाही मिळाला.
आता धर्म म्हटले कि तत्वज्ञान आणि कर्मकांडही आले.
ते आम्ही हायस्कुलला दांड्या मारुन प्राथमिक का होईना तयारही केले, पुढे ते तीन-चार वर्ष विकसीतही होत राहिले.
येथे हे सांगायला हवे कि मला इतर धर्मांची काय माहिती होती? माझे वाचन प्रचंड होते. पंचक्रोशीतील एकही ग्रंथालय मी सोडलेले नव्हते. स्वत:ला "अतिशहाणा" "किंवा "वासरात लंगडी गाय शहाणी" म्हणता येईल एवढे इतरांच्या तुलनेत माझी माहिती बरीच होती. इतर धर्मांची फार माहिती नसली तरी तोंडओळख नक्कीच होती. मला त्यातला एकही धर्म पटलेला नव्हता. असो.
तर झाले. धर्माचे कर्मकांड म्हणजे...
१. पहिला पाऊस, मग तो कधीही येवो, धर्माच्या अनुयायांनी त्या पावसात साग्रसंगीत नृत्य करायचे आणि पावसाचे थेंब तोंडात घ्यायचे.
२. नदी-ओढ्यातील वाहत्या पाण्याची फुले वाहून पूजा करायची.
३. वाहत्या पाण्याकडे पाहतच पाण्याच्या वाहतेपणाशी तद्रूप व्हायचे...हे ध्यान.
४. वाहत्या अथवा जलाशयातील पाण्याला ओंगळ-अस्वच्छ होऊ द्यायचे नाही. असे आणि अनेक काही सोपी पण पाण्याशी निगडित कर्मकांडे तयार झाली.
यात मुर्तीपूजा नाही. व्रत-वैकल्ये नाही. सण नाही. आत्मा-मोक्ष काही नाही.
राहिली तत्वज्ञानाची गोष्ट. ते मी नववीतच लिहायला सुरुवात केले. अकरावीपर्यंत ६०-७० परिच्छेदही तयार झाले. प्रत्येक परिच्छेद "लोकहो..." या संबोधनाने सुरु व्हायचा. आठवतात त्यातील एक-दोन देतो...
"लोकहो,
मनावर ताबा मिळवायचा प्रयत्न करु नका
कारण मनाला गुलाम करणे
हे मनुष्यत्वाच्या विरुद्ध आहे."
किंवा;
"लोकहो,
शहाणे लोक पाण्याला भजतात
पाण्यापासुनच सर्व प्राण होतात
आणि त्यातच विसर्जित होतात
पाण्याचे पूजन आणि त्याचेच ध्यान
जो करतो
तोच खरा सुखी होतो..."
वगैरे.
दर्म्यान आमचा धर्मप्रसार सुरुच होता. जी कुचेष्टा व्हायची ती आठवता आज हसायला येते. पण तरीही आम्ही नेटाने आमचे धर्मपालन करत होतो. दहावीत आमचे कान्हुरचे तीन अधिक अनुयायी मिळवणुयात आम्ही यशस्वी झालो. दहावी सुटली. पुढचे शिकायला पाबळला. तेथेही हा प्रचार चालुच राहिला. काही विद्यार्थी अनुयायी बनले. गांवात मोठ्या माणसांशीही माझ्या धर्माबद्दल बोलायला मी बिचकत नसे. अनेकांनी माझी अर्थातच कुचेष्टा केली, हाकललेही. पण गांवातअला एक मारवाडीआणि एक पोस्टमास्तर (हा रजनिशांचा कट्टर अनुयायी होता. मी रजनिशांची अनेक पुस्तके यांच्यामुळेच वाचली.) हे बाप्पे माझे पहिले अनुयायी झाले. पोस्टमास्तर झाला याचे कारण म्हणजे माझा युक्तिवाद हा कि रजनिश दुसरे धर्म आणि महात्मे काय सांगतात त्याचेच निरुपन करतो...घडीत बुद्ध तर घडीत कृष्णावर येतो...काय हे? त्यापेक्षा बघा...मी काय सांगतो ते माझे आहे...आणि ही मात्रा लागु पडली. मग तो जीवनधर्माच्याच असलेल्या आणि संभाव्य तत्वज्ञानाबद्दल बोलत असे. असे थोडे वाढत एकुणात आमचे ९ अनुयायी झाले.
बारावीत असतांना मी मराठीत "भारतात नवीन धर्माची आवश्यकता का?" यावर लेख लिहिले पण ते कोणी छापले नाही. शेवटी मी "भारत में अब नये धर्म की जरुरत" आसा हिंदीत लेख लिहिला. अर्थात हा नवा धर्म म्हणजे जीवनधर्मच कि! हा लेख चक्क आज का आनंद या हिंदी पेपरने माझी दिव्य हिंदी दुरुस्त करुन प्रसिद्ध केला. त्याचा विशेष फायदा झाला नाही. पण पुढे उच्च शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर मला तेथे बातमीदाराची नोकरी मिळाली.
धर्म तोवर संपला होता. धर्मग्रंथही, जो अपूर्ण होता, मागे पडता पडता जीवनातील पडझडींत नाहीसा झाला. आता आठवले कि हसू येते. पण इतरही धर्म कसे निर्माण झाले असतील यामागची प्रक्रियाही समजते. माझा नि:ष्कर्श एकच:
धर्म स्थापन करायला एक ठार वेडेपणा लागतो. तो बहुदा माझ्यात असावा!
(वरील माहिती मी संक्षिप्तरित्या माझ्या अजून अपूर्ण असलेल्या "दिवस असेही...दिवस तसेही" या आत्मचरित्रात दिलेली आहे. तो लेखमालिका स्वरुपात किर्लोस्करमद्धे २०१० मद्धे प्रसिद्ध झाला होता.)
(मी जपलेले माझ्या धर्माचे अवशेष मात्र माझ्यात पुरते रुजलेले आहेत. उदा. मी मुर्तीपुजा करत नाही...व्रतवैकल्य कधीच केले नाही. पाऊस आणि पाणी हे माझे पुजेचे नसले तरी अनावर प्रेमाचे विषय आहेत. मृत्युनंतर एका स्टीलच्या सिलेंडरमद्ध्ये माझे प्रेत घालुन, सीलबंद करून ते समुद्रात दूरवर फेकुन द्यावे असे मी मृत्युपत्रात नमूद करून ठेवलेले आहे.)