Wednesday, November 20, 2013

अंतरीच्या कविता




"अंतरीच्या कविता" हा संजय ऐलवाड यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला पहिला-वहिला कवितासंग्रह. चपराक प्रकाशनाने शानदार समारंभात प्रसिद्ध केलेला. हा संग्रह उल्लेखनीय अशासाठी आहे कि कवीने आपल्या जगण्याचा भवताल अत्यंत उत्कटतेने आपल्या कवितांतून व्यक्त केला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून धडपड करत मराठवाड्यातील उदगीर तालुक्यातील एकुर्का या छोट्या खेड्यातुन पुणे गाठणारा हा तरुण. व्यसनी वडिलांमुळे घरातील पडझड, आईला होणारी मारहाण, तरीही नेटाने ती ओढत असलेला संसाराचा गाडा इत्यादि दु:खद परिस्थितीने संजयला साहित्याकडे वळवले. आपल्या वेदना कवितेत अभिव्यक्त करत राहिला. कविता ही तशीही मानवाच्या वेदनांचा हुंकार असते. ती वेदनांना मायेची पाखर देते. संजय कवितेत रमत गेला. त्याचे पुस्तक झाले.

संजयच्या भाषेत अर्थातच मराठवाडी गोडवा आहे. "बाप" या कवितेत संजय म्हणतो:

"मह्या मायेच्या डोळ्यात
काहुरांनी काला केला
ओसाडल्या दाही दिशा
बाप बांधावरी मेला"

वेदनांचा पसारा हा असा छळत असतांना माणुसकीचे, भवतालाच्या वेदनांचे भानही संजयला सुटत नाही. "कायदा" या कवितेत संजय म्हणतो:

"घुमटावरच्या पारव्याने
गाभारातल्या देवाला प्रश्न केला
का नाही कायदा आम्हासाठी?
नाही तर आम्हीही केली असती फिर्याद
काळजात बाण मारुन जीव घेणा-या पारध्यावर..."

तर "अस्तित्व" या कवितेत संजय म्हणतो:

"...आणि याच समाजात
कोलमडुन पडणारे वृक्ष
दिसतात पावलोपावली
सुकलेल्या झाडाचं जीवन असं
कधी दारिद्र्य तर कधी गरीबी..."

आज शिक्षणामुळे आजवर मूक राहिलेल्या समाजांतील तरुणांना अभिव्यक्त व्हावेसे वाटत आहे. कविता, नाटक, कथा, कादंब-या यातुन ते आपले हृद्गत आपल्या स्वतंत्र प्रतिभेने, कोणत्याही प्रस्थापित कवीच्या प्रभावाखाली न येता, स्वत:ची शैली बनवत व्यक्त करु लागले आहेत. आपल्या व्यवस्थेत सर्वांना व्यासपीठ मात्र मिळत नाही हे दुर्दैव. अनेकजण लेखन मधेच सोडुन देतात ते प्रकाशकांच्या अभावामुळे. शहरी प्रकाशक शक्यतो प्रसिद्ध लेखकांनाच प्राधान्य देतात...आणि प्रसिद्ध व्हायला आधी प्रकाशक नको का? एकंदरीत आपला साहित्यव्यवहार संकुचित आहे. सामाजिक जाणीवांचे भान असणारे प्रकाशक फारच म्हणजे फारच कमी आहेत. चपराक प्रकाशनाचे घनश्याम पाटील अशाच दुर्मीळ प्रकाशकांपैकी एक. त्यांनी हा संग्रह प्रकाशित करून उद्या भवतालातून बाहेर पडुन वैश्विकतेचा प्रवास करु शकेल अशा कवीला प्रकाशात आणले आहे.

रसिकांनी संजयचा हा कवितासंग्रह अवश्य वाचावा...व एका संवेदनशील कवीच्या भवतालाच्या वेदना व आशांचा पट अनुभवावा!

अंतरीच्या कविता
संजय ऐलवाड
चपराक प्रकाशन, पुणे
मूल्य: रु. ५०/-

15 comments:

  1. Hello Sir,

    Is there an E-book version available. I did my search but couldn't find. I live in California.

    ReplyDelete
    Replies
    1. Dear Abhay ji, I checked up with publisher, yes, e-book will be soon published by bookganga.com. I will let you know as soon it is published. Thanks.

      Delete
  2. आप्पा - अतिशय अंतर्मुख करणारा असा कविता संग्रह बरेच दिवसांनी पहायला मिळाला

    बाप्पा - त्याचे मुखपृष्ठ अतिशय बोलके आहे

    आप्पा - पहिली कविता अतिशय अर्थगर्भ आहे

    बाप्पा -आणि दुसरी कविता आशयासाठी कितीतरी वर्ष लक्षात राहील

    आप्पा - तिसरी कविता त्यातील चपखल शब्द् रचनेमुळे क्रांतिकारक ठरली आहे

    बाप्पा - चौथी कविता आशय उलगडून दाखवण्याच्या लकबीमुळे दीर्घकाळ लक्षात राहील

    आप्पा - पाचवी कविता जो एक हलकासा सामाजिक अन्यायाचा चिमटा काद्गते त्यामुळे मराठी काव्य चर्चेला एक नवी दिशा देईल

    बाप्पा - सहावी कविता दुसरी आणि तिसरी कविता एकत्र परिणाम साधेल तसा परिणाम साधते आणि मन अस्वस्थ होते

    आप्पा - सातवी कविता थोडीशी आशेची किनार असलेली असली तरी तिचा शेवट परत सामाजिक अन्यायाची एक नवी जान मराठी महात निर्माण करेल

    बाप्पा - आठवी कविता सीमाभागात खळबळ माजवेल अशा विचारांनी सुरवात करते आणि समस्त मराठी वाचकाना एक वेगळाच संदेश देते

    आप्पा -नववी रचना चौथ्या आणि सहाव्या रचनेपेक्षा आईच्या हृदयाला हाक घालण्यात फारच यशस्वी झाली आहे आणि त्यामुळे मराठी भगिनी वर्गात एक अस्वस्थ करणारी वेदना पसरली आहे तरीही शेवटचे कडवे एक आश्वासक वातावरण निर्माण करतात

    बाप्पा - एका नव्या अर्थाने आज महाराष्ट्राला नवा महाकवी मिळाला अशी चर्चा करायला लावणारी दहावी कविता सर्व पुस्तकाचा अर्क आहे असेच म्हणावेसे वाटते

    आप्पा - गीत रामायणा नंतर इतकी माणसाच्या सर्व भावनाना स्पर्श करणारी कविता आज पर्यंत झाली नाही असेच जाता जाता सांगावेसे वाटते

    बाप्पा -आधुनिक वाल्मिकी म्हणून एकविसाव्या शतकात आता या कवीचे नाव अजरामर होईल असे म्हणणे प्रत्यक्ष वस्तुस्थितीला धरूनच होईल

    आप्पा आणि बाप्पा - सर्वार्थाने आज मराठी मनाला आपल्या भावना व्यक्त करणारा कवी लाभला असेच म्हणावेसे वाटते

    ReplyDelete
  3. संजय ऐल्वाड ,

    महाराष्टाचा आधुनिक वाल्मिकी कोण हा प्रश्न या पुस्तकाच्या निमित्ताने कायमचा संपला आहे

    आधीचे आधुनिक वाल्मिकी हे ब्राह्मणी थाटाचे आणि शहरी मध्यम वर्गाचे प्रतिनिधी वाटत असत हे सत्य नाकारता येणार नाही ख़रेतर आज समस्त सर्व जाइत्नचि दुःखे कोणतीही स्वप्ने न दाखवता मांडणारा कवी आज महाराष्ट्राला लाभला आहे

    गजानन वाळिंबे

    ReplyDelete
  4. संजय ऐलवाड ,

    आपले नम्रता पूर्वक अभिनंदन ,

    आपल्याला कविता काय देते किंवा देत असते ?

    प्रत्येक कला आपल्या मनावर एक भावनेचा आघात करत असते , मग ती झेंडूची फुले असोत किंवा सतारीचे बोल असोत किंवा कवींनी पाहिलेला पावसाळा असो -

    चित्रकला असो किंवा नाट्यलेखन किंवा कविता - लेखन हा मामला तर फारच प्रभावी आहे आणि त्यात आज

    घुमटा वरच्या पारव्याने गाभाऱ्यातल्या देवाला आज जो प्रश्न केला आहे तो फारच मन हलवून टाकणारा असाच आहे

    फार कमी वेळा अशा ओळी जन्माला येत असतात मराठी कविता काही प्रतिकात आणि शब्दांच्या जोक्गादात अडकली होती तिला आज एक नवी दिशा मिळाली आहे

    कविता प्रभुणे

    ReplyDelete
  5. संजय ऐलवाड ,

    आपले अभिनंदन ,तसेच,

    चपराक प्रकाशनाचे प्रथम आभार मानायला पाहिजेत कारण आजच्या ५० रुपये मालिकांच्या तीव्र स्पर्धेत आपण हा कविता संग्रह वाचकांच्या समोर आणत आहात

    दुसरी गोष्ट - त्याचे मुखपृष्ठ -

    ते अतिशय नितांतसुंदर झाले आहे हे अवश्य नमूद केले पाहिजे ,नाहीतर तो त्या चित्रकारावर अन्याय होईल असे वाटते ,धबधबा आणि एक डोह आणि उठणारे तरंग हे आत काय आहे याची नांदीच ठरतात आणि संजय ऐलवाड यांचे अत्यंत मनाला भिडणारे ओघवते काव्य आपली कधी पकड घेते ते समजत नाही - सध्या पुण्यात अनेक पुस्तक प्रदर्शने भारत असतात , तेथे आपण त्वरीत हा कविता संग्रह उपलब्ध करून द्यावा हि नम्र विनंती

    सोबत आपण आपल्या स्वाक्षरीही सोय केली तर अजूनच आकर्षक ठरेल


    प्रतिमा केळकर

    प्रकाश केळकर

    ReplyDelete
  6. अंतरीच्या वेदना हा अभय तरंगे यांचा काविता संग्रह अत्यंत सुंदर झाला आहे

    आज मराठी काव्याला आलेली मार्गाल त्यामुळे दूर होईल

    संग्रहाचे आपण संजय सोनावणी किंवा हरी नरके यांच्या कडून भव्य प्रकाशन करत ते लोकांसमोर आणावे असे सांगावेसे वाटते , तसेच साहित्य संमेलनात या संग्रहावर चर्चा घडवत त्याचे वाचन होईल अशी आशा करते

    हा कविता संग्रह बी ए च्या अभ्यासाला लावला तर ते योग्य ठरेल त्यासाठी संजय सोनवणी यांनी प्रयत्न केले पाहिजेत

    पुन्हा एकदा अभय ऐलवाड आणि प्रकाशक संजय तरंगे यांचे अभिनंदन आणि संजय सोनवणी आणि हरी नरके यांचे अभिनंदन

    पौर्णिमा

    ReplyDelete
  7. संजय सर ,

    अनेक प्रतिक्रिया येत आहेत

    परंतु आप्पा आणि बाप्पा यांची प्रतिक्रिया अभ्यासपूर्ण आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल कारण त्यांनी दिलेल्या विवेचनाचा आणि कवितांचा मेळ बसत नाही असे सकृत दर्शनी वाटते आहे

    त्यांनी अगदी अनुक्रमणिके प्रमाणे विवेचन केले आहे परंतु त्या प्रमाणे कवितेतील आशयाचा आणि विवेचनाचा मेळ बसत नाही -

    त्यामुळे कुठेतरी गोंधळ झाला आहे असे आप्पा बाप्पा या जोडीला सांगावेसे वाटते

    हेरंभ पर्वतीकर

    ReplyDelete
  8. लेखक आणि त्याचा वाचकवर्ग

    किंवा लेखकाचे यश याचे नाते कसे असते -

    विळ्या भोपळ्याचे सख्य आणि आधी कोंबडी का आधी अंडे हा चिरंतन प्रश्न

    लेखकाला आणि प्रकाशकाला सतावत असतो

    सर्व प्रदर्शनीय कलाप्रकारात हाच मुद्दा वादाचा असतो - चित्रपट नाटक कादंबरी किंवा कविता

    यश मिळाले तर माझ्यामुळे आणि अपयश पदरी पडले तर तो तुमचा दोष !

    पण कधीकधी कोसला सारखी कादंबरी सर्व समीकरणे चुकवते - मुंगीच्या पावलाने लोकांच्या मनाचा कब्जा घेते ,शोले सारखा एखादा चित्रपट सुरवातीला अपयशी म्हणून धरला जातो आणि पुढे एक इतिहास घडवतो-एक चमत्कार ठरवणारा हा अदृष्य हात कोणाचा असतो ?

    माझ्यामते वाचक किंवा प्रेक्षक आणि श्रोते या नावाने कलेचा आनंद लुटणारा हा वर्गच असे इतिहास घडवत असतो आणि त्यांची अभिरुची कधीही कोणीही दुर्लक्ष करता कामा नये -


    भारतीय कानाना कोळीगीते , तमाशा- लावणी , जागर आणि आरती ,नाट्यगीते आणि भावगीते पावसाची गाणी ,भूपाळी अशा अनंत प्रकारांनी तृप्त करून सोडणारे निखळ भारतीय गीत संगीत हे जसे सच्चे इथल्या मातीतलेच आहे तसेच घराघरासमोर घातल्या जाणाऱ्या रांगोळ्या , चैत्रांगण ,आदिवासी चित्रकला,पोथ्यातिल रेखाटने ,राजे हवेलीतील कोरीवकाम आणि नक्षीकाम ,आणि अगदी शेले कशिदे पासून गोधड्या पर्यंत दिसणारे शिवाण काम आणि विणकाम


    तसेच मेघदूता पासून नट सम्राटा तील गद्य उताऱ्या पर्यंत रसग्रहण करण्याची ताकद देणाऱ्या रसिक मनावर संस्कार करणाऱ्या अदृश्य शिक्षकांना घडवणाऱ्या या भारतीय मातीचे कोडेही उलगडत नाही

    घेतला वसा टाकणार नाही या विनम्र बुद्धीने इथे हजारो माता भगिनी आणि शिक्षकांनी मागील काळात आपली मने घडवली आहेत

    म्हणूनच आपण कोणतीही राजकीय सत्ता असली तरी या मातीतून उमलणाऱ्या कोणत्याही कल्पनेचे - कलाकृतीचे नेहमीच स्वागत केले आहे आणि म्हणूनच कोणतेही परचक्र - मग ते यावनी १००० वर्षांचे दास्य असो किंवा ब्रिटीशांचे १५० वर्षांचे शासन असो - आपले भारतीयत्व संपवू शकले नाही

    आपला आनंद आपले दुःख आपल्या वेदना आणि अन्याय हे इथल्या मातीतले आहेत ,

    म्हणूनच ते आजही आपल्याला अशा कविता सनग्रहाञ्च्या रूपाने समोर आल्यावर जागीच खिळवून टाकतात ,

    अगदी हातातला घास हातातच राहील इतक्या तीव्रतेने या वेदना आत मनाच्या गाभाऱ्यात जाउन भिडतात

    संजय ऐलवाड यांचे अभिनंदन !

    ReplyDelete
  9. संजय सोनवणी यांचे अभिनंदन केले पाहिजे कारण त्यांनी अशा कविता संग्रहाचे महत्व ओळखून त्यांना एक व्यासपीठ मिळवून देत एक आश्वासक वातावरण निर्माण केले आहे

    संजय ऐलवाड यांचे मनापासून कौतुक करावे असेच त्यांच्रे लिखाण आहे

    अभिनंदन

    यापुढेही आपल्या कवितेतील ताजेपणा आणि सच्चाई प्रसिद्धीच्या झोतात दिपून - गोंधळून जाणार नाही असे वाटते

    ReplyDelete
  10. रवीन्द्रनाथ टागोर किंवा केशवसुत किंवा अमृता प्रीतम असे वळून पाहिले तर स्वातंत्र्याच्या आधी लोकाना स्वातंत्र्य हेच सर्व दुःखांवर एकमेव सोल्युशन वाटत असे परंतु नंतर जस जसा भ्रमनिरास होत गेला आणि समाज जीवनावर राजकारणाचा पगडा बसत गेला , आणि कोणतेही सामाजिक कार्य बदल किंवा नवी सुरवात हि राजकीय आशीर्वादाशिवाय घडूच शकत नाही हि खात्री होत गेली ,

    तसतशी आपल्या इथे एक विचित्र पोकळी निर्माण झाली ,सर्वाना निराशेने ग्रासले

    असमता आणि त्याला उत्तर म्हणून दलित चळवळ किंवा समाजवाद हि लेखकाना सापडलेली वाट किती सच्ची ते काळच ठरवेल पण त्याची धारही आजच्या राजकारणामुळे बोथट होत आहे

    जुने जाऊ द्या मरणालागुन जाळून किंवा पुरुनी टाका ,

    किंवा

    गर्जा जयजयकार क्रांतीचा हे युग संपून ते दुःख आज वैयक्तिक खाजगी पातळीवर मांडले जात आहे याचा अर्थ काय धरायचा ?

    त्यातील सामाजिक आशय हरवतो आहे का ?

    हा कविता संग्रह हा त्यातलाच प्रकार आहे का ?

    निवेदिता परांजपे

    ReplyDelete
  11. श्री ऐलवाड यांनी आता अल्पबचत ,कुटुंब नियोजन राष्ट्रीय एकात्मता आणि सगळ्यात हुकमी एक्का म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज यांचा पोवाडा अशी ४ कविता संग्रहाची पुस्तके अग्रक्रमाने काढावीत २०१४ च्या वातावरणात त्याला प्रचंड खप राहील आणि कदाचित आपण पुढच्या कवी संमेलनाचे अध्यक्षही होऊ शकता

    अल्पबचत हा आपल्या नवकवींचा लाडका विषय असतो त्यासाठी अल्पबचत खात्याकडे पाठपुरावा करावा आणि संजय सोनावणी यांची प्रस्तावना घ्यावी

    म फुल्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला होता त्या नंतर शिवाजी वर पोवाडा झाला नाही

    एकदा होऊन जाऊ दे जोरदार - त्यामुळे संभाजी ब्रिगेड छावा गटात आपल्याला जोरदार मागणी राहील आणि तुम्ही मालामाल पण व्हाल

    कुटुंब नियोजन हा विषय पण असाच अमर आहे

    रामायणातील कुटुंब नियोजन असा विषय घ्या आणि नंतर महाभारतात त्याची कशी वात लागली ते लिहा पांडव आणि कौरव यात पान्दवाञ्चा विजय कुटुंब नियोजनामुळे झाला असा लेख संजय सोनावणीना लिहायला सांगा - नाहीतरी त्याना हल्ली सासवड प्रकरणा नंतर विषयच सापडत नाहीत -बिचारे हरले आणि गप्प झाले - एकदम कविताच करू लागले - त्याना म्हणावं शिव पार्वती हेच कसे कुटुंब नियोजनाचे संस्थापक आहेत ते सिद्ध करा - त्यांचा हातखंडा आहे काहीही सिद्ध करण्यात -असो - ते आता हे सर्व छापणारच नाहीत रागाने !

    चला तर- सुरु s s - हे जीजी रे जी रे जीजी हा जीजी -

    सोळाशे तीसावर सालाला

    माता जिजाबाई ला

    माता भवानीने कौल हा दिधला s s !

    ReplyDelete
  12. समजा ,

    आज संजय ऐलवाड यांना सरकारी नेमणुकीने पाठ्य पुस्तकाची रचना करायला बसवले तर ?

    आणि संजय सोनावणी याना मार्गदर्शक नेमले तर ?

    कशी आयडिया आहे ?

    मलातर वाटते , महाराष्ट्राचे विभाजन होणे हे फार आवश्यक आहे असा मुद्दा हे दोघे का मांडत नाहीत ?कारण या लोकाना कधीच वरच्या वर्तुळात प्रवेश मिळणार नाही हे आत्ताच्या साहित्य अध्यक्ष निवडणुकीतून सिद्ध झाले आहे ३० - ४० मते घेऊन काय होणार आहे ?त्यापेक्षा आपली समता चळवळ हे लोक नवीन महाराष्ट्रात का चालवत नाहीत ?एखादे विद्यापीठ उभारा -

    पतंगरावाना विचारा -त्यानापण कुणी हल्ली मोट्ठेपणा देत नाही- डी वाय आणि कराड आणि पतंगराव एकत्र आले तर आठवड्यात नवा महाराष्ट्र नवीन विद्यापीठासकट निर्माण होईल

    त्याचे नाव काय असेल ?शिव राष्ट्र ? ग्रेट - शिवरात्रीला रात्री बारा वाजता -

    संजय सोनावणी भाषण करतील - नियती बरोबर - इत्यादी इत्यादी -

    आपण एक लिस्ट करुया सर्व कॉलेज शाळा आणि विद्यापिठाना सावित्रीबाई ,शाहू आणि आंबेडकर अशीच नावे असतील आणि नद्या आणि धरणे याना पण अशीच नावे असतील

    त्या बाबतीत या कोकणस्थानी बाजी मारली ! सावित्री नदी ही कोकणातून आधीच वाहात आहे !

    महाराष्ट्रा जागा हो ! आता सगळे नवीन - अन्याय नवीन - न्यायालये नवीन - न्याय नवीन !

    घुमट फक्त मशिदीचा नसेल ही काळजी घ्यावी

    ReplyDelete
  13. हे सर्व निरुद्योगी लिखाण लिहिण्याची काय आवश्यकता ?

    इतकी छान कविता आहे

    श्री ऐलवाड यांचे कौतुक करण्याचे भान नाहीच आणि इतर फालतू गोष्टी कशासाठी

    आपण एकतर गप्प् तरी बसावे किंवा काहीच लिहू नये हे योग्य नाही का ?

    अशी मनोवृत्ती सार्वजनिक कामात अडथळा आणणारी असते असे मला वाटते

    बहुतेक ही प्रवृत्ती विनाशकारी असते कुणीतरी बोलावेच लागते म्हणून हा प्रपंच

    माझे आणि या माणसाचे काहीही वैर नाही पण हे लोक असे उगीचच विषयांतर करून चांगल्या चर्चेचा हिरमोड करतात तेंव्हा कुणीतरी वरिष्ठ लोकांनी खडसावलेच पाहिजे

    संजय सोनावणी यांनी तरी

    हे केले पाहिजे

    कारण

    हे त्यांनी बांधलेले घर आहे असे मानले तर त्याची निगराणी करणे हे त्यांचेच काम नाही का ?

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...