Friday, January 10, 2014

"माझं आभाळ": सर्वांनी वाचावे असे पुस्तक!


सचीन परब या मनमोकळ्या शोधक तरुणाशी माझी प्रत्यक्ष ओळख नंतर झाली....पहिली ओळख त्यांच्या ब्लोगशी. "माझं आभाळ" हा ब्लोग खरंच एका संवेदनशील माणसाच्या अविरत शोधाशी, चिंतनशीलतेशी ओळख करुन देणारा व चिंतन करायला भाग पाडणारा. दोनेक वर्षांपुर्वीची ही गोष्ट असेल तेंव्हा माझा त्यांच्या ब्लोगशी परिचय झाला. काही लेख वाचले आणि त्यांच्या ब्लोगच्या प्रेमातच पदलो. सारे लेख आठवडाभरात वाचुन काढले. वाचकांच्या उत्स्फुर्त वाहवाहीच्या पण चिकित्सक प्रतिक्रियाही वाचल्या. मी त्यांच्या नवीन लेखनासाठी त्यांच्या ब्लोगचा पाठपुरावा करत असे. हा माणूस तसा आळशी असावा हा मी तर्क बांधला कारण बरेच दिवस काहीच नवे येत नसे. पण लिहिण्यासाठी उचंबळून येत नाही तोवर हा माणुस काही लिहित नाही हे लक्षात आले आणि मग मी गुमान नव्या लेखाच्या नोटिफिकेशनची मेलवर वाट पाहू लागलो.

छापील लेखन आणि ब्लोग ही दोन विभिन्न तंत्रे. ब्लोग लिहिणारे असंख्य झालेत ते त्यातील तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे. प्रसारही पटकन होतो असे वाटते यामुळे. पण ते वास्तव नाही. नियमित वाचले जाणारे ब्लोग मराठीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच. कारण साधं आहे. फुकट वाचायला मिळतं म्हणून कोणताही ब्लोग वाचावा असे वाचक करत नाही. तो लेखकाची योग्यता एखाद-दुसरा ब्लोग वाचुन ठरवून लेखकाची पत ठरवून टाकतो. सचिन परबांचा ब्लोग मोजक्या नियमीत वाचल्या जाणा-या ब्लोगपैकी एक. त्यातही वैशिष्ट्यपूर्ण.

त्यांच्या सर्व लेखांत विषय वेगळे असले, प्रथमदर्शनी प्रासंगिक वाटले तरी एक आंतरिक सूत्र आहे. ते सूत्र म्हणजे निखळ मनाने केलेली समाज-समिक्षा. ती अवघड आहे. पुर्वग्रहविरहित लिहिणे आणि प्रश्नाच्या मुळाशी नेणे सहजी होणारे काम नाही. सचिन परबांना हे जमते कारण त्यांचा स्वभावच मुळी नितळ स्वच्छ पाण्याप्रमाणे खरे खरे प्रतिबिंब दाखवणारा आहे. या माणसाला साधे चेह-यावरचे भाव लपवता येत नाही तो लेखनात काय लपवालपवी करू शकणार? हे माझे त्यांच्याबद्दल मत बनले ते पहिल्या भेटीतच! नंतर आम्ही अपरिहार्यपणे मित्र झालो ते झालोच!

ब्लोगचे पुस्तकात रुपांतर होणे हा दुर्मीळ योग. मराठीत कदाचित पहिलाच! मला हे पुस्तक प्रकाशित करावे वाटले ते सचीन परब माझे निकटतम मित्र आहेत म्हणून नव्हे. त्यांच्या लेखनात एक चिरंतनता आहे. माणसाला स्वत:कडे डोळसपणे पहायला लावायची एक विलक्षण शक्ती आहे. नेटवर त्यांचे लाखो वाचक आहेतच पण जो अवाढव्य वाचकवर्ग अजून नेटसाक्षर नाही. अथवा असला तरी छापील वाचल्याखेरीज जीवाचे समाधान होत नाही अशा वाचकांपर्यंत ही विचारसाधना पोहोचावी म्हणून मी हे पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले.

स्वतंत्र विचारांचे एक मूल्य असते आणि कोणताही समाज नवनव्या विचार-संकल्पनांशी परिचित होत नाही, मोकळ्या आभाळासारखं स्वच्छ व निरामय बनत चिंतन-प्रगल्भ होत नाही तोवर आपल्या समाज बौद्धिक उंचीचा आलेखही गाठू शकत नाही. वाचकांपर्यंत हे मनमोकळं पण चिंतन-प्रगल्भ लेखन पोहोचले पाहिजे या जाणीवेने मी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. एका आधुनिक माध्यमातून झालेले लेखन दुस-या पारंपारिक माध्यमात प्रकाशित करणे यात एक मौजही आहे. भविष्यात सर्वच माध्यमांची एक मजेशीर पण उपयुक्त अशी सरमिसळ होत जाईल याचीही एक नांदी आहे.

वाचक या पुस्तकाला पुष्पच्या अन्य मौलिक प्रकाशनांप्रमाणे उत्तम प्रतिसाद देतील याचा विश्वास आहे. सचीन परबांनी आळस झटकुन जरा लेखनाचा वेगही वाढवावा असा त्यांना माझा "प्रकाशक" आणि एक वाचक म्हणून सल्लाही आहे!

अमर हबीब सरांनी या पुस्तकाला अल्पावधीत अभ्यासपुर्ण प्रस्तावना लिहून देवून या पुस्तकाच्या महत्तेला उलगडून दाखवले याबद्दल मी त्यांचा नितांत आभारी आहे.

-संजय सोनवणी
पुष्प प्रकाशन

पुस्तकाचे वितरकः भारत बुक हाऊस, पुणे फोन 020 32548032/3 मोबाईल 9850784246 

2 comments:

  1. संजयजी, पुस्तक काढलं त्यासाठी आधी थँक्स आणि आता या पोस्टसाठीही.

    ReplyDelete

अमेरिकन शेतीचे भविष्य आणि आपण!

  २०५० पर्यंत ,  वाढत्या जागतिक लोकसंख्येला पोसण्यासाठी शेतीत व शेतीउत्पादनपद्धतीत काय बदल करावे लागतील यावर जगभरच्या प्रगत राष्ट्रांत नुसते...