Friday, January 10, 2014

शेतकरी फार शहाणा होता!

एके काळी भारतीय शेतकरी फार शहाणा होता. आपल्याला पुढील मोसमात लागणारे बियाने तोच आलेल्या पीकातून जतन करायचा. प्रत्येक प्रदेशाचे आपापले नैसर्गिक आणि भौगोलिक असे मृत्तिका वैविध्य असते याची जाण त्याला होती. या वैविध्यामुळे येणारे पीक हे भौगोलिक "स्वत्व" घेवून येते हेही त्याला माहित होते. मृत्तिकेचे वैविध्य हे मातीतील विशिष्ट खनिजवितरणाने येते हे भले त्याला माहित नसेल. पण बीजेही मातीची आणि उत्पादनही मातीचे यामुळे पीक हे फक्त "पीक" रहात नसून उपजत वेगळा स्वादिष्टपना हे त्या पीकांचे अंगभूत असे वैशिष्ट्य होते. कृष्णाकाठची वांगी आणि खानदेशी भरिताची वांगी हे पीकवैविध्य उगाच आले नव्हते. मेहरुनची बोरे खाणे हा दुर्मिळ असला तरी वेगळा खाद्यानंद होता. लवंगी मिरची कोल्हापुरची म्हनण्यात जसा आनंद होता तसेच खानदेशी मिरच्यांची चुरचुरी अनुभवण्यात वेगळा आनंद होता. गावरान ज्वारी/बाजरी/नाचणी ते तंभाटे यात वेगळाच स्वामित्वाचा आविर्भाव होता. तेही या शेतातील चांगली कि त्या शेतातील चांगली यावरचा "गावरान" वाद वेगळाच!

एकाच जातीची बोर असली तरी या बांधावरील बोरीची बोरे गोड आणि दुसर्या बांधावरील आंबट...हा प्रकार आधी कळायचा नाही. पण खनीज वितरणातील स्थानिक असमतोल हे त्यामागील कारण हे आता कळते. एका गांवातील माणसे अशी आणि शेजारच्या गांवातील मानसे तशी असे का? या प्रश्नाचे उत्तर आता कळतेय...

पण आता हा भेद संपलाय. कृत्रीम खनिजे पीकांच्या उरावर घालत अनैसर्गिक पीके आम्ही कोठेही घेऊ शकतो! रासायनिक खते असल्याने खनिजांबरोबरच रसायनेही आवडीने गिळतो. पण ती चव कोठे आहे? ते पीकाचे "स्वत्व" कोठे आहे?

अन्नक्रांती करु पाहना-या भारताने नेहरुंच्या काळात त्याचा आरंभ केला खरा...अन्न भरमसाठ वाढले...इतके कि ते गोदामांत सडू लागले...

पण "अन्न" गेले ते गेलेच!

आता त्याची दारु बनवा असे आमचे कृषिमंत्रीच सांगतात. ही वेगळी क्रांती आहे हे मान्य केलेच पाहिजे....

पण आम्ही ज्या अन्नाविषयी खरी क्रांति करायला हवी होती ती केली नाही व निकस खाद्याचे "आधुनिक" प्रवक्ते बनत गेलो याला नेमके कोण जबाबदार यावर आम्हाला गांभिर्याने विचार करावा लागणार आहे!

3 comments:

 1. संजय सर ,
  आपल्याला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होत नाही
  शेतकरी फार हुशार होता आणि आता नाही असे म्हणायचे आहे का ?श्रमजीवी शेत कामगार वर्ग हा फार मोठा वर्ग मानला तर आपणास नक्कीच त्याला दोष द्यायचा नसणार - कारण त्याच्या हातात काय आहे ?- फक्त खुरपं !
  मग आपण जमीनदार श्रीमंत शेतकरी वर्गाला तो पूर्वी हुशार होता असे म्हणत आहात का ?शहाणा म्हणजे काय ? ज्याला आपले हित कळते तो शहाणा ? ज्याला सामाजिक भान आहे तो शहाणा ?
  ज्याला व्यवहार आणि फायदा तोटा कळतो आणि अर्थकारण कळते तो शहाणा ?
  आजचा हा वर्ग झपाट्याने शेती सोडून इतर गोष्टीत लक्ष घालू लागला आहे - पैशाचे पाठबळ आणि सत्ता हे त्याचे कारण असेल पण त्याच गावातील पेट्रोल पंप ,बी बियाणांचे वितरण , चार चाकी गाड्यांचे वितरण ,दारूची दुकाने इत्यादी सर्व व्यवसायांवर त्यांची घट्ट पकड आहे - साखर कारखाने , सावकारी तर असतेच पतपेढ्या आहेतच !आपल्यां भागाचा विकास या गोंडस नावाने हे नवीन वतनदार आज आपापल्या विभागात राजेच झाले आहेत -हे संपले की यांचे लक्ष सरकारी योजना आणि अनुदाने यांच्याकडे वळते - ग्रामीण विकास या नावाखाली हे वतनदार अधिक पुष्ट आणि तुष्ट होत जातात - आपण सांगू तसे घडले पाहिजे हा हट्ट आणि त्यासाठी हवा तितका भ्रष्टाचार करण्याची निर्लज्ज मनोवृत्ती असे हे दुष्ट चक्र आहे नागरी विभागात आज नवीन विचार रुजू लागल्याचा भास होत आहे पण ग्रामीण भागात त्याची गंध वार्ताही नाही आणि त्याचा परिणाम होणे हे फार दूरचे आशावादी चित्र असेल !
  त्याना पिकाची प्रत आणि मिळणारा परतावा हेच महत्वाचे - शहरातून फेरफटका मारल्यावर त्यांच्या डोक्यात वारे वाहू लागतात ,परदेश वारी करून आल्यावर तर अजूनच सगळे चित्र सफेद कॉलरचे दिसू लागते खराब रस्ते , कमी दर्जाचे बांधकाम यातून अत्यंत बकाल खेडी निर्माण होत आहेत आणि हे कोणीही कधीही बदलू शकणार नाही कारण आपली अर्थव्यवस्था -शहरी लोकाना खेड्याच्शी अजिबात देणेघेणे नाही हे वास्तव नाकारता येत नाही त्यामुळे या वतनदारांचे फावते आहे संपूर्ण ग्रामीण अर्थकारण सहकाराच्या नावाखाली आपल्या हातात ठेवून ही मंडळी एक प्रकारे गुंडगीरीलाच समाज कारण समजत असतात -
  आज सुविद्य शेतकरी निर्यातीसाठी ठराविक पिके घेताना दिसतो - फळांचे आधुनिक प्रकार बाजारात येत आहेत -काही अभ्यासू शेतकरी अजून प्रयोगशील राहून अभ्यासू वृत्तीने नानावीध प्रयोग करत आहेत ठिबक सिंचन चा प्रभावी वापर हा अभ्यास करण्याचा विषय आहे - पण आपले काही सत्ताधारी नागरी पाणी उसाला वळवण्याचे राजकारण आखताना दिसतात - हे फारच धोकादायक आणि क्लेशकारक आहे - अशा लोकाना धर्मापेक्षा जातीचे राजकारण करणे सोयीचे वाटते म्हणूनच आपली पापे उघड करू इच्छिणारा अभ्यासू ब्राह्मण वर्ग त्याना शत्रू नंबर एक वाटतो - आणि म्हणूनच ते मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि ब्राह्मण द्वेष असे दुहेरी राजकारण करत असतात -
  पण आजकाल खालच्या जातीच्या वर्गाला हा डाव चांगलाच कळला आहे - विषय भरकटला आहे पण त्याला इलाज नाही , कारण आपण शेतकरी शहाणा होता त्यावेळची भोळ्या
  भाबड्या शेतकऱ्या ची ओळख सांगत विषय मांडला आहे पण आज त्याच धनाढ्य जमिनदारांनी खास त्यांच्या टाचेखाली रहातील असा कामगार वर्ग निर्माण केला आहे - उस वहातुक , गाळप आणि इतर शेतीची कामे यासाठी हा वर्ग जवळ जवळ आपल्या मुठीत असणारा असा त्याना हवा आहे - इतर देशात आधुनिक शेती पद्धती वापरली जाते तशी आपल्या महाराष्ट्रात कधीही होणार नाही - कारण शेतकामगारांचे वेतन हा कळीचा मुद्दा आहे -
  हा शेतकरी आजही हुशार आहे पण तितकाच असंवेदनशील आणि क्रूर होत चालला आहे !
  कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी चे दिवस संपले
  आता जमीन ही आई नाही तर बटिक झाली आहे असेच आपले म्हणणे आहे ना ?

  ReplyDelete
 2. सर ,
  मुख्यतः प्रत्येक व्यवसायात सुष्ट आणि दुष्ट अशा दोन प्रवृत्ती असतात ,त्यापमाणे आमच्यातही २ प्रवृत्ती आहेत -आम्हालातरी जमीन आई सारखी आहे आम्हा लेकराना सांभाळणारी - भरवणारी आहे
  काही सधन लोकाना शेतजमिनी विकून झटपट श्रीमंत होण्याची घाई झाली आहे तर काहीजण रासायनिक खतांचा अतिरेक करून जणू या धरणी मातेवर अत्याचार करत असतात - त्या विषयाला मांडून आमच्या वाड वडीलांच्या बोलण्यातील काही भाग वाचत आहोत असा भास झाला आमच्याकडे आधुनिक वारे आणि विचार गावात आले असले तरी शेतकरी वर्गात जागृती सुद्धा झाली आहे आणि खते आणि बी बियाणे याबाबत आम्ही जागृत आणि सावध आहोत आम्ही सरसकट उसाच्या फंदात न पडता अक्कल हुशारीने आलटून पालटून पिके घेत असतो
  आपले मनापासून अभिनंदन

  ReplyDelete