Monday, April 6, 2020

वैश्विक संकटाला तोंड देण्यासाठी भगवान महावीर


 www.orissapost.com/wp-content/uploads/2019/04/M...

आज श्रेष्ठ मानवी मुल्यांची उद्घोषणा करणा-या भगवान महावीरांची जयंती आहे. अखिल विश्वाला शांतता अहिंसेसह उदात्त जीवनमुल्यांची शिकवण देणा-या भगवान महावीरांनी जगाला अभिनव तत्वज्ञानही दिले जे सार्वकालिक आहे. सारे जग याक्षणी करोना विषाणूच्या महामारीच्या संकटात सापडलेले असतांना, माणसा-माणसांत राष्ट्रा-राष्ट्रांत एकीकडे संशयाचे वातावरण वाढत असतांना दुसरीकडे प्राणभयाने जागतीक समाज-मानसिकता विस्कळीत होऊ लागली आहे. भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा थांग कोणाला लागेनासा झालेला आहे. काही राष्ट्रीय नेतृत्वेही संभ्रमित झालेली आहेत, परिस्थितीसमोर हार मानु लागली आहेत. सा-या जगाचे चक्र ठप्प झाल्यासारखे झले आहे. जवळपास सारे जग आपापल्या घरात बंदिस्त झाले आहे. मानसिक कुंठांची शिकार होऊ लागले आहे. अशा स्थितीत भगवान महावीर आपल्यासमोर आजही पथदर्शक होऊन दिलासा देत आहेत. या जयंतीच्या निमित्ताने भगवान महावीरांपासून आपण काय घेऊ शकतो याचा विचार करणे आवश्यक आहे.

सनपुर्व ५९९ मध्ये भगवान महावीरांचा जन्म झाला. त्यांचे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे धर्म-सिद्धांत सर्वपरिचित आहेतच. पण संयम हा त्यांनी सांगितलेला सर्वात महत्वाचा सद्गुण होय. कोणत्याही बिकट स्थितीवर मात करायची असेल तर संयम गुण हा अंगी बाणवावा लागतो असे महावीर सांगत असत. संयम प्रत्येक व्यक्तीला आहे त्या स्थितीकडे पहायची व्यापक दृष्टी देतो. सहनशक्ती हे संयमाचेच उपफल आहे. संयमामुळे मनोवत्ती छोट्या-मोठ्या कारणाने उत्तेजित होत नाहीत उलट आहे त्या स्थितीतून मार्ग काढायची शक्ती प्राप्त होते. संयमी माणसांच्या मनोवृत्तीही सुदृढ असतात. आणि अशा संयमी लोकांचा समुच्चय कोणत्याही संकटावर भारी पडतो. आज आपण पाहिले तर भारतीय समाज एका वेगळ्या मानसिक संक्रमणातुन चालला आहे. भय, अनिश्चितता, अस्थिरता आणि परस्परांबाबतच्या संशयाने विघातक प्रवृत्ती जोपासत सामाजिक दुही निर्माण करण्याच्या कार्यात नकळत सहभागी झाला आहे आणि आपण काही चुकीचे करत आहोत याचे भान नाही. स्वत:ला घरात काही दिवस बंदिस्त राहण्याची आवश्यकता निर्मण झाली आहे तर त्य बंदिस्ततेतही आपल्याला करण्यासारखे सकारात्मक असे पुष्कळ काही आहे याचे भान गमावून तो संयम सोडून रस्त्यांवर धाव घेण्याचा प्रयत्न करत आहे. सामाजिक जीवन त्यामुळे धोक्यात येईल याचे भानही त्यामुळे गमावले जात आहे. मानसोपचार तज्ञांकडे आता या एकांतवासाच्या समस्येने अस्वस्थ झालेल्या मनोरुग्णांच्या रांगा लागत आहेत. पण त्यांनी संयम ठेवला, आत्मचिंतन केले, स्वत:च्या आत उतरुन स्वत:चा शोध घेतला तर स्वत:बाबतचीच अनेक रहस्ये त्यांना उलगडू शकतात. मग मानसिक विकारांचा स्पर्शही होणार नाही. उलट स्वत:ला जिंकणारा, म्हणजेच जिन, होण्याकडे, आदर्श मानव होण्याकडे त्याची वाटचाल सुरु होईल हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.

आज शहरी भागांतील लाखो मजुर हाल-अपेष्टा सहन करत शेकडो मैल चालत आपल्या गांवी परतत आहेत. गरीब-बेघरांना दोन काय, एक वेळही खायला मिळत नाहीय. डाक्टर्स, पारिचारिकांना सुरक्षेसाठी लागणा-या साधनांची कमतरता आहे. सरकार काय करायचे ते प्रयत्न करेनच पण प्रत्येक व्यक्तीचीही यात सहायता करण्याची जबाबदारी आहे. भगवान महावीरांनी अपरिग्रहाचे महान तत्व मानवजातीला दिले. अपरिग्रह म्हणजे संग्रह करणे. संग्रह मानवी दु:खाचे कारण बनतो. आपल्याकडील जे अतिरिक्त आहे त्याचे समाजाला वाटप करणे म्हणजे अपरिग्रह. आज प्रत्येकाला हे तत्व आचरणात आणण्याची संधी आहे. आपल्या भवतालात मनुष्यच नव्हे तर इतर प्राणीसृष्टीचीही उपासमार होणार नाही याची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. भगवान महावीरांचे तत्वज्ञान एखाद्या सागरासारखे आहे. पण आजच्या या आपत्तीत भगवान महावीरांना जयंतीनिमित्त अभिवादन करत असतांना महावीरांची ही दोन तत्वे जरी अंमलात आणली तर आपण करोनाच्या संकटावर मात करु शकू याचा विश्वास वाटतो.

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...