Saturday, April 4, 2020

व्यामोहात सापडलेली प्रजा

बिनडोक उन्मादी समुहभावना जागुत करणे ही हुकुमशहांची नितांत आवश्यकता असते. मग आंधळे लोकही मुर्खपणातही तर्क शोधण्यात आपली सुमार बुद्धी पणाला लावतात. देशाचे मार्गक्रमण सामुहिक विनाशाकडे होऊ लागते पण व्यामोहात सापडलेली प्रजा सावध होत नाही.
करोनानंतरचा भारत कसा असेल याचे चित्र आताच ठळक होऊ लागले आहे. राष्ट्र संकटात सापडते तेंव्हा सर्व नागरी शक्ती सकारात्मक कार्याकडे आणि भविष्यवेधी स्वप्नांकडे नेण्याची जबाबदारी नेत्यांची असते. लाखो मजूर आजही रस्त्यांवर वाट तुडवत आपल्या घराकडे चालतच आहेत. शेतक-यांचे प्रश्न गहन होत चालले आहेत. उद्योगधंद्याचे चक्र ठप्प झाले आहे. हीच स्थिती बळावत गेली तर आरोग्यसेवाही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्थितीतून कसे बाहेर पडणार, काय करावे लागेल याची योजना हताश झालेल्या जनतेसमोर मांडायची आवश्यकता होती पण आता ती आशा व्यर्थच आहे हे उघड झाले आहे.
दुसरीकडे बेजबाबदार नागरिक ज्यात शतमुर्ख तबलिगी आणि संघीही आले, या संकटाला हातभारच लावत आहेत. हे सारे रोखण्यासाठी जनमत तयार करणे आणि प्रशासनानेही भेदभाव न करता कठोर पावले उचलण्याची गरज असता अप्रत्यक्ष रितीने सामाजिक दुही कशी वाढेल याचेच प्रयत्न होत आहेत. किंबहुना नोटबंदीपासून विकलांग केलेली अर्थव्यवस्था आता आचके देत आहे. धर्मांधतेचा उद्रेक व्हायला अशी स्थिती नेहमी सहाय्यभूत होते. आपण करोनात्तर समाजजीवन विखाराच्या दिशेने नेत आहोत याचे भान दाखवले जात नाही हे दुर्दैव आहे.
वैदिकवाद्यांना हीच स्थिती हवी होती असे त्यांच्या प्रतिक्रियांवरुनच दिसून येते. किंबहुना यात आपलाही अंतत: विनाशच आहे हेही त्यांना समजत नाही. उन्मादाच्या नशेत पहिला बळी जातो तो विवेकाचा. तो तर गेलाच आहे. भारतातील उरल्या सुरल्या वैज्ञानिक दृष्टीकोनाने आत्महत्या करावी अशी वेळ येऊन ठेपली आहे. मग कोणाचे फावणार हे उघड आहे. निरंकुश सत्ता हवी असणा-यांना नेहमीच विचारशुन्य प्रजा हवी असते आणि ते कार्य मात्र जोमात आहे. सृजनाची परंपरा पद्धतशीर संपवली जात आहे.
जागतीक गुरु व्हायचे स्वप्न वाईट नाही पण ते साध्य होण्यासाठी तेवढी प्रगल्भता आणि मानवकल्याणाची खरी आस लागते. नवसर्जनाचे अविरत प्रयत्न लागतात. बिनडोकांना थोडा वेळ रिझवणारे इव्हेंट करुन विश्वगुरु होता येत नाही याचे भान असले पाहिजे.
करोनोत्तर भारत जास्त मानवतावादी, सहृदयी आणि अधिक सर्जक होईल ही आशा अजुनही आहेच. जेही थोडके भानावर असलेले या देशात उरलेले आहेत त्यांची जबाबदारी फार वाढलेली आहे.
अविवेकाची काजळी दूर होऊन सर्वांची अंत:करणे शुद्ध प्रकाशाने भरुन जावोत यासाठी प्रार्थना.

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...