Wednesday, February 20, 2013

अगा जे घडलेची नाही....




पानिपत युद्धातून मल्हारराव होळकर दुपारीच निघून गेले असा एक अज्ञाधारित आरोप गेली अनेक वर्ष होतोय. "सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचें चरित्र" या १८९३ साली प्रकाशित झालेल्या मुरलीधर मल्हार अत्रे लिखित ग्रंथाची नवी आवृत्ती १७ मार्च रोजी प्रकाशित होत आहे. सदर ग्रंथाला माझी प्रस्तावना असून त्यातील पानिपतसंबंधातील माहिती देणारा हा काही अंश... 



"आता आपण पानिपत युद्ध प्रकरणाकडे सरळ वळू. मल्हाररावांविषयी भाऊच्या मनात प्रथमपासून आकस होता व आपल्या मेहंदळेंसरख्या सरदारावर व इब्राहिमखान गारद्याच्या कवायती सैन्यावर अधिक विश्वास होता हे इतिहासकारांना मान्य आहे, त्यामुळे त्याबाबतच्या तपशीलात येथे जात नाही. पानिपत येथील मुक्कामाच्या काळात अब्दालीशी ज्या दोन मोठ्या चकमकी झाल्या त्या केवळ शिंदे आणि होळकरांमुळे जिंकल्या गेल्या याबाबतही कोनाचे दुमत नाही. दोघांना तात्काळ राखीव कुमकेचे मदत मिळाली असती तर मराठे तेंव्हाच जिंकले असते याबद्दलही इतिहासकारांना संशय नाही. २२ नोव्हेंबर १७६० रोजी वजीर शहावलीखानाशी झालेले युद्ध निर्णायक ठरले असते. शिंदे-होळकरांनी अफगानी फौज अक्षरश: कापुन काढली. सुजा व नजीबाने अधिकची कुमक पाठवुनही वजीराला व त्याच्या सैन्याला पळावे लागले. शिंदे-होळकरांच्या फौजांनी त्यांचा पार अब्दालीच्या छावणीपर्यंत पाठलाग केला. लष्कराची हे अवस्था पाहुन छावणीतील अफगान-रोहिल्यांनीही पळ काढायला सुरुवात केली. खरे तर या वेळीस लगोलग बळवंतराव मेहंदळे (जे काही अंतरावर ससैन्य उभे राहुन हा प्रकार पाहत होते) अथवा अन्य कोणी सरदाराची कुमक मिळाली असती तर...? असो.
१४ जानेवारी १७६१ रोजी मराठे जिंकु किंवा मरु या भावनेने अब्दालीच्या सेनेवर तुटुन पडले हे खरे नाही. सत्य सांगते ती आदल्या रात्रीची सर्वांची मसलत: "गिलच्यांचे बळ वाढत चालले. आपले लष्कर पडत चालले......तेंव्हा हा मुक्काम सोडुन बाहेर मोकळे रानी जावे...दिल्लीचा राबता सोडुन दुसरीकडे जाउ...पण झाडी मोठी मातब्बर....गिलचा जावू देणार नाही...यास्तव बंदोबस्ताने निघावे." म्हणजे निकराच्या युद्धाचा बेतच नव्हता. करायचे होते ते सुरक्षीत पलायन. आणि अशा सुरक्षीत पलायनासाठी इब्राहिमखान गारद्याने विलायती पद्धतीच्या गोलाची कल्पना सर्वांना समजावुन सांगीतली.
मल्हारराव होळकर त्याशी सहमत नव्हते. ज्या गनीमी काव्याने आजवर शेकडो लढाया ते लढले होते तोच याही वेळी कामास येईल असा त्यांचा विश्वास होता. पण भाउंचा गारद्यावरच सर्वाधिक विश्वास होता. उलट मल्हाररावांना "धनगरांना काय युद्ध कळते?" असा अवमानकारक सवाल केला गेला. हा संदर्भ जाटांच्या इतिहासातही मिळतो. त्यामुळे भाऊसाहेबाच्या मनात मल्हाररावांबद्दल केवढे किल्मिष होते हेही स्पष्ट दिसते.
शेवटी गोल करुन सुरक्षितपणे यमुनेच्या दिशेने जायचे ठरले. प्रत्येक सरदाराला आपली जागा नेमून दिली. गोलाच्या लढाईचे खालील नियम असतात व ते पाळले जातील अशी हमी भाऊने सर्वांच्या वतीने इब्राहिमखान गारद्याला दिली होती. ते नियम असे:
१. कोणत्याही सरदाराने कसल्याही स्थितीत गोल तोडायचा नाही, आपली नेमून दिलेली जागा सोडायची नाही.
२. शत्रु जर गोलातील सरदाराच्या गोटावर चालुन आलाच तर त्यानेच बाहेर पडायचे, हल्ला परतवायचा आणि पुन्हा आपली जागा घ्यायची. दुस-या सरदाराने त्याच्या मदतीला जायचे नाही...सबब कोनत्याही स्थितीत गोल मोडायचा नाही.
आता गोलाची भाऊने (गारद्याने) केलेली रचना पहा.



अब्दालीच्या गोटाच्या ईशाण्य बाजुला, म्हणजे गोलाच्या मधोमध, हुजुरात (भाऊचे सैन्य) आहे. भाऊच्या डाव्या बाजुला गारदी आहे तर उजवीकडे, म्हनजे बरोब्बर अब्दालीच्या सरळ दिशेत उत्तरेला होळकर आहेत. गोलाची मागची बाजु (मधे बुणगे) दुय्यम प्रतीच्या सरदारांनी व्यापलेली आहे. कारण हल्ला नैऋत्येकडील अब्दालीच्या छावणीच्याच बाजुने होणार हे उघड होते. त्यामुळे त्या बाजुला सामोरे असणारे सेनानीही तेवढेच प्रबळ असनार हे ओघानेच आले. तरीही काही लोक अपप्रचार करतात को होलकरांना मुद्दाम मागच्या बाजुला उभे करण्यात आले (अथवा होळकरांनी मुद्दाम ती जागा घेतली.) असा आरोप केला जातो तो किती खुळचट आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गोलाची अब्दालीच्या दिशेची बाजु हीच भाऊच्या सैन्याची आघाडी होती. होळकर, शिंदे, स्वत: भाऊ, पवार, गायकवाड, विंचुरकर, मानकेश्वर व गारदी हे सर्वच सरदार त्या अर्थाने आघाडीच सांभालत होते हे येथे लक्षात घ्यायला हवे.
अब्दालीचा हल्ला झालाच तर याच बाजुवर, डावीकडे, उजवीकडे अथवा मधोमध कोसळणार हे नक्कीच होते...नेमक्या कोणत्या बाजुने, कधी आणि कोणत्या सरदाराने हे अब्दाली ठरवणार होता...आमचे इतिहासकार नव्हेत.
असो.
१४ जानेवारीला गोल पुर्व दिशेने यमुनेकडे निघाला. सकाळी साडे अकराच्या सुमारास रोहिल्यांनी आधी धाव घेतल्यामुळे गारद्याच्या बाजुने युद्धाला तोंड लागले. तोवर अब्दालीलाही मराठे पळ काढत आहेत कि आपल्यावरच चालून येत आहेत याची कल्पना नव्हती. त्यामुळे त्याने सर्व शक्यता लक्षात घेउन आपले सैन्य रवाना केले. त्यावेळी मराठे व अब्दालीच्या सैन्याची रचना खालीलप्रमाणे झाली.




.
अब्दालीच्या सैन्याला गोल पुर्वेकडे निघालाय कि आपल्या दिशेने चाल करुन येत आहे याची कल्पना असणे शक्य नसल्याने त्याने आपल्या दिशेला दिसनारी गोलाची सर्व बाजु हीच मराठ्यांची आघाडी समजून सुरुवातीला तशीच आपली सैन्यरचना केली. त्यामुळे शिंदे होळकरांसमोर सुजा, जहानखान, नजीब व शहापसंदखान हे सरदार उभे ठाकले. हुजरातीसमोर शहावलीखान तर पवार-गायकवाडांसमोर हाफिज रहमत फैजुल्ला खान उभे ठाकले. गारद्याची बाजु अडवायला अमिरबेग व बर्कुर्दार खान आले. स्वत: अब्दाली मात्र राखीव सैन्यासह मागे थांबला. उलट गोलाच्या रचनेमुळे भाऊ स्वत: आघाडीवर अडकला.
युद्धाची सुरुवात गारद्याच्या अथवा विंचुरकर, पवार व गायकवाडांच्या बाजुने सुरु झाली. गोलाच्या नियमानुसार या तिघांनी रोहिल्यांना गोलाबाहेर पडुन पिटाळले व मागे येवून आपली जागा घेतली. अशाच रितीने मराठे युद्ध करत राहिले. निर्णायक युद्ध करण्याचा भाऊचा बेतच नसल्याने व युद्धाचे पारडे तरीही आपल्या बाजुने फिरत असल्याचे दिसत असुनही भाऊने गोलाचे नियम मोडण्याच्या आज्ञा देत सर्वच सरदारांना युद्धात उतरण्याचे आदेश न दिल्याने प्रत्येक सरदार, अगदी भाऊही आपापले युद्ध, समोरुन कोणी चालून आलाच तर, करत राहिले. म्हणजे या युद्धाला सर्वकश युद्धाचे रुप भाऊने देण्याचा एकही प्रयत्न केला नाही. सर्व सरदारांनी सेनापती या नात्याने भाऊने दिलेल्या आज्ञा पुरत्या पाळल्या. असो.
अशा रितीने हुजरात ते गारद्याची बाजू यांत चकमकी होत राहिल्या. इकडॆ शिंदे-होळकरांच्या बाजुने तोफा-जंबुरके, बंदुकांचे युद्ध सुरु होते. त्यांच्यात हातघाईचे युद्ध पेटले ते अब्दालीच्या आज्ञेने तीन-साडेतीनच्या दरम्यान. साडेचार वाजता विश्वासरावांच्या गोळी (अथवा तीर) लागून मृत्यू झाला. तोवर तरी मराठ्यांची एकंदरीत युद्धावर पकड असल्याचे दिसते. विश्वासरावाचा मृत्यू झाला त्याच दरम्यान गारद्यांचा निकाल अफगान-रोहिल्यांनी लावला होता. इब्राहिमखान गारदी कैद करुन नेला गेला. या दोन्ही घटना थोडक्या कालावधीने मागे-पुढे झाल्याने एकीकडे विश्वासरावाच्य मृत्युमुळे हुजुरातीत पसरलेली अस्वस्थता, भाऊवर स्वाभाविकपणे आलेली शोकमग्नता यामुळे हुजरात संकटात सापडणे स्वाभाविक होते.
याक्षणी (साडेचार ते पाच) असलेली परिस्थिती नीट समजावून घेणे गरजेचे आहे. विश्वासरावाचा मृत्यू झाल्याची खबर मल्हाररावांपर्यंत पाउने-पाच ते पाचच्या दरम्यान पोहोचली. तोवर विंचुरकर-पवार-गायकवाडांवर व हुजुरातीवर रोहिले, गिलचे व अफगान तुटुन पडलेले होते. शिंदे व मल्हाररावांचे नजीब, शहापसंदखान व सुजाशी युद्ध सुरु होते. तरीही हुजुरातीची अवस्था समजून मल्हाररावांनी खुद्द जनकोजी शिंदेंना व आपला सरदार संताजी वाघ यांसोबत काही सैन्य देवून भाऊच्या मदतीला पाठवले.
भाऊची हुजुरात व शिंदे-होळकरांची गोलातील जागा यात किमान तीन किलोमीटरचे अंतर होते. त्या धमासान युद्धातही हे दोघे भाऊच्या हुजुरातीपर्यंत साडॆपाच-सहा पर्यंत पोचले. तत्पुर्वीच विंचुरकरांनी कुंजपुरा युद्धात पदरी बाळगलेल्या दोन-तीन हजार रोहिले-अफगानांनी गारद्यांच्या बाजुचा पराभव होताच बुणग्यांत घुसून मराठे हरल्याच्या घोषणा देत बुणग्यांना मारत सुटले. त्यामुळे आघाडीच्या मागील बाजुचा घाबरुन पळ सुटला होता. बहुदा याच वेळीस यशवंतराव पवार मारला जावून त्याचीही फौज उधळली. एकंदरीत सर्वच स्थिती हाताबाहेर गेली.
साहजिकच भाऊ अधिकच अडचणीत सापडला. तोवर संताजी वाघ आणि जनकोजीची कुमक त्याला मिळाली खरी पण पराजय अटळ बनला होता. संताजी शौर्याने लढता-लढता ठार झाला. त्याच्या अंगावर चालीसपेक्षा अधिक जखमा होत्या, ज्या पाहून अब्दालीही गहिवरला. जनकोजी मात्र जीवंत पकडला गेला. भाऊचे खरे काय झाले हे रहस्य अद्याप उलगडायचे आहे.
ही स्थिती पाहता किमान साडेपाच वाजेपर्यंत तरी मल्हाररावांनी आपल्या आघाडीवर आलेल्या शत्रुला रोखुन धरले होते हे सिद्ध होते. त्यानंतर सर्वत्र जो पळ सुटला त्याची लागण त्यांच्या व शिंदेंच्याही सैन्याला होणे स्वाभाविक होते. जनकोजी भाऊच्या मदतीला गेला असला तरी महादजी शिंदे जनकोजीच्या जागी सैन्याचे नेतृत्व करायला थांबलेला होताच. सुजा, जहानखान, नजीबाच्या सैन्याशी युद्ध सुरुच होते. याच वेळीस हुजुरात हरल्याची खबर मल्हाररावांना मिळाली असावी. तोवर सुर्यास्तही (५.२० वाजता) होवुन गेला होता. त्यानंतर युद्ध पुढे रेटण्यात अर्थ नव्हता. गिलचे-रोहिले हुजुरातीला हरवून लुटीच्या मागे लागले होते. अशा स्थितीत ही सर्व कोंडी फोडुन निघून जाणे हिताचे होते. मल्हाररावांची बरीचशी फौज युद्धातच कामे आलेली होती.  ते मल्हारराव, महादजे शिंदे व तत्पुर्वीच विंचुरकरादि सरदारांनी केले.
दुसरे असे कि भाऊचा बालमित्र व हुजरातीच्याच जवळ तैनात केलेला सरदार नाना पुरंदरे होळकरांसोबतच निघाला असे त्याच्याच एका पत्रात लिहितो.(पुरंदरे दफ़्तर ३. ले. २०९) याचाच अर्थ असा कि होळकर युद्धात अखेरपर्यंत होते. जेंव्हा सर्व फौजा पराजित झाल्या व पळुन गेल्या तेंव्हाच दोघांनी रणांगण सोडले हेही सिद्ध होते.
तिसरे असे कि मल्हारराव या युद्धात आपल्या पंधरा हजार सैन्यानिशी उतरलेले होते. सटवोजी जाधवच्या १९ जानेवारीच्या पत्रानुसार पानिपत युद्धातुन बाहेर पडलेल्या मल्हाररावांसोबत फक्त हजार-दोन हजार फौज होती. म्हणजे बाकी सैन्य युद्धात कामी आले होते. एवढी मोठी हानी होवूनही "मल्हाररावांनी युद्ध केलेच नाही...ते दुपारीच पळुन गेले म्हणुन पानिपत युद्धात पराजय झाला." असे जे चित्र उभे केले गेले आहे ते किती धादांत खोटे आहे हे वरील विवेचनावरून लक्षात येईल. सर्व लोक ही बाब विसरतात कि जर खरेच मल्हारराव दुपारीच निघून गेले असते तर ती बाजू मोकळी पडुन भाऊचा पराभव सायंकाळी साडेपाचच्या आसपास झाला तो खूप आधीच झाला असता. आणि एकट्या मल्हाररावांना असे शत्रु कसा जावू देईल?
पण इतिहासकारांनी वास्तवाचा कसलाही विचार न करता, जे घडणे मुळात असंभाव्य होते, ते घडले असे दाखवायचा प्रयत्न का केला?
त्याचे उत्तर खरे तर प्रास्तविकाच्या सुरुवातीलाच दिलेल्या अहिल्यादेवींच्या पत्रात आहे, त्यामुळे त्यावर मी अधिक येथे विवेचन करत नाही.
मल्हाररावांवर पेशवे व सरदारांच्या कुटुंब-कबिल्याला युद्धात पराजय झाला तर सुखरुप परत नेण्याची एक जबाबदारी मल्हाररावांवर सोपवली होती असाही एक प्रवाद आहे आणि तो अनेकांना खराही वाटतो. असे प्रवाद निर्माण करणारे अक्कलशुण्य असले पाहिजेत यात शंका नाही. मल्हारराव दौलतीचे एकमेव सुभेदार आणि ज्येष्ठ सेनानी होते. पेशवे-सरदारांच्या बायका-पोरांच्या रक्षनाची दुययम जबाबदारी त्यांच्यावर टाकली जाइल आणि ते ती घेतील असे मुळात वाटतेच कसे? दुसरे म्हणजे त्या दिवशी सरवकश युद्ध करण्याची मुळात भाऊची जर योजनाच नव्हती तर पराजयाची गोष्टच कोठे येते? तिसरे असे कि प्रत्येक सरदाराचे स्वत:च्या कुटुंबियांचे रक्षण करण्यासाठे स्वतंत्र अंगरक्षकांचे पथक असे. अगदी नाना फदणीसाचेही होते. त्यामुळे अशी काहीएक जबाबदारी मल्हाररावांवर नव्हती हे येथे लक्षात घ्यायला हवे.
मल्हारराव व भाऊची पत्नी पार्वतीबाईची गाठ वाटेत पडली. त्यांची दुरवस्था पाहून मल्हाररावांनी तिला सुखरुपपणे पुढे नेले हेही येथे लक्षात घ्यायला हवे. (सटवोजी जाधवचे १९ जानेवारी ६१ चे पत्र.) मल्हारराव आधीच निघाले असते तर ही गाठभेट कशी झाली असती याबाबतही इतिहासकारांनी मौन पाळले आहे. आणी पार्वतीबाईने पानिपत अखेरचा घाला पडल्यानंतरच सोडले असल्याने ती निघाली व मागाहून आलेल्या मल्हाररावांशी त्यांची भेट झाली हेच यातून सिद्ध होते.
थोडक्यात मल्हाररावांवरचे सर्व आरोप बिनबुडाचे आणि केवळ बळीचा बकरा बनवण्यासाठी केले गेले आहेत एवढेच यावरुन सिद्ध होते. खरे तर १९९३ सालीच अत्रेंनी प्रस्तूत ग्रंथात तत्कालीन उपलब्ध असलेल्या पुराव्यांनीशी हे आरोप खोडले असले तरी त्यांच्या ग्रंथाचा पुढे कोणीही आधार घेतलेला दिसत नाही. अन्यथा आजवर हे सारे प्रवाद कधीच नष्ट झाले असते. पानिपतच्या पराभवाचे खापर कोणावर तरी फोडणे आवश्यक होते म्हणुन भाऊ व मल्हारराव हे त्यांना सोयिस्कर बकरे सापडले. भाऊ काही उत्तर द्यायला परत येणार नव्हता आणि किमान हयातीत तरी मल्हाररावांवर कोणी आरोप केला नसल्याने म,अल्हाररावांनाही उत्तर देण्याची गरज नव्हती.
मल्हाररावांनी काही दिवसांतच पुन्हा सैन्य उभारले, बंडाळ्या मोडुन काढत अल्पावधीत मराठ्यांची जरब पुन्हा उत्तरेत बसवली. नानासाहेब पेशव्याने अब्दालीबरोबरच्या तहाची जबाबदारी मल्हाररावांवरच टाकली. यावेळी मल्हाररावांचे वय ६६ वर्ष होते हेही येथे लक्षात घ्यावे लागते."

Read this also: http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_14.html

6 comments:

  1. इतिहासाची सदृढ मांडणी केल्याबद्दल तुमचे आभार. पानिपत युद्ध्याबाबत अनेक गैरसमज आपण आजवर दूर केलेत. आपली हि इतिहासाची सेवा कौतुकास्पद आहे. आपल्या या लेखनासाठी अनेक शुभेश्च्च्या

    ReplyDelete
  2. संजय सर ,
    आपले विवेचन अतिशय संग्राह्य आणि माहितीपूर्ण तसेच अंतर्मुख करणारे झाले आहे .
    सोयीस्कर गैरसमज पसरवणारे कोण आहेत ?
    तेपण सर्वाना समाजाने फारच महत्वाचे आहे. मग ते कोणत्याही जातीचे असो .
    आपण यावर अवश्य लिहिले पाहिजे.
    आपल्या अभ्यासुपानाबद्दल आपले मनापासून अभिनंदन !

    ReplyDelete
  3. आपले विवेचन अभ्यासपूर्ण आहे. इभ्राहिमखानापाशी अवजड तोफखाना होता. त्याचेपाशी पुरेसे सैन्यबळ बहुधा नसावे. त्यामुळे त्याची बाजू लंगडी पडली असे वाटते. गोलाची रचना करून मराठे पूर्वेकडे सरकू लागले पण तिकडे यमुना नदी वाट अडवून होती त्यामुळे अबदालीच्या सैन्याशी मुकाबला केल्याखेरीज दक्षिणेकडे जाण्यासाठी वाट मिळणे मुष्किलच होते. मग याबद्दल मराठ्यांचा काय प्लॅन होता याबद्दल काही माहिती आहे काय? मल्हाररावांवर जर भाऊचा विष्वास नव्हता तर होळकरांना पानपतावर ठेवून घेऊन वितुष्टे वाढवण्या ऐवजी मल्हाररावांना त्यांच्या पद्धतीने लढाया करण्यासाठी मोकळे सोडणे व अबदालीची रसद मारणे, त्याच्या सैन्यावर गनिमि हल्ले करून सतावणे योग्य झाले असते. रसद मारण्याचे काम गोविंदपंतावर सोपवले होते पण त्याचे बळ तोकडे होते त्यामुळे त्याचा बळी जाण्याशिवाय दुसरे काही हाती लागले नाही. उपासमार होईपर्यंत उत्तरायणाची वाट पहात बसून राहाण्याचा प्रकार अगम्य आहे. एकूण पराभवाचा कोणी एक धनी नसतो हेच नेहेमी दिसून येते.

    ReplyDelete
  4. Very important information
    Thanks
    Sanjiv ji

    ReplyDelete
  5. sonwni sir ghya ekda sagle panipatkar ringnat ya mhanav open charchela..........ugi swatahachi pustke khapvaysathi dusryana ka badnam kart amhanav..........

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...