Thursday, February 14, 2013

"...न होत्याचें उजेडास येतें. दिवसच असें आहेत.’


"सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचें चरित्र" या १८९३ साली प्रकाशित झालेल्या मुरलीधर मल्हार अत्रे लिखित ग्रंथाची नवी आवृत्ती १७ मार्च रोजी प्रकाशित होत आहे. सदर ग्रंथाला माझी प्रस्तावना असून त्यातील हा काही अंश
---------------..


 चैत्र व|| १४ स ( ३-५-१७८० ) इंग्रजांची गांठ होळकराचे फौजेशीं पडली. स्वतः तुकोजी हजर होते. लढाई चांगली झाली. कांहीं लोक पडले. सहा घटकांनीं पाटीलबावांकडील तोफा व सरंजाम आला. एक लढाई उत्तम प्रकारें इंग्रजांशीं करावी, मग छावणीस फिरावें असें सरदारांचें मानस आहे.’ वरील लढाईसंबंधी अहल्याबाई म्हणाली, ‘ आम्हांकडील लोकांचीं कामें चांगली होतात, परंतु उजेडांत आणणार कोणी नाहीं. न होत्याचें उजेडास येतें. दिवसच असें आहेत.’
( संदर्भ :- मराठी रियासत खंड ६, पान नंबर १९४ )

अहिल्यादेवींचे उपरोक्त उद्गार होळकर घराण्याबाबत सर्वांनाच लागु पडतात. इतिहासाने मल्हारराव, खंडॆराव, तुकोजीराजे, यशवंतराव, विठोजीराव, तुळसाबाइ, भिमाबाई ते अगदी तिसरे तुकोजीराव यांच्याबाबत वारंवार असत्य इतिहास प्रचलित करत अन्याय करत आपली कृपणताच दर्शवली आहे असे आपल्याला दिसून येईल. एवढेच नव्हे तर प्रस्तुत चरित्र मुरलीधर अत्रे यांनी परिश्रमपुर्वक लिहुन १८९३ मद्धेच मल्हाररावांवरील सर्व आक्षेप पुराव्यांनिशी खोडुन टाकले असले तरी ते चरित्र व चरित्रलेखककासही काळाच्या उदरात गडप करुन टाकले असल्याचे आपल्या लक्षात येईल. असे असले तरी सत्य  हे कधी ना कधी प्रकाशात येतच असते. मात्र सत्य स्विकारण्याची उदारता समाजाने दाखवायला हवी.

मराठीत ऐतिहासिक चरित्रे लिहिण्याची पद्धत इंग्रजांच्या अनुकरणाने आली. बखर आणि इतिहास यातील फरक एतद्देशीय विद्वानांच्या लक्षात येवू लागला. बखरी म्हणजे इतिहास व कल्पित याची भेसळ. त्यामुळे त्यातुन अन्य अस्सल पुरावे मिळाल्याखेरीज खरा इतिहास हाती लागण्याची शक्यता कमीच. विविध संदर्भसाधने धुंडाळत एकंदरीत घटनाक्रम कालानुक्रमनाने मांडत तटस्थ निरिक्षणे नोंदवत पुढे जाणे म्हनजे ऐतिहासिक चरित्र लेखन. चरित्र लेखन करत असतांना लेखकाला सर्वच संदर्भ साधने उपलब्ध होतातच असे नाही. अनेकदा संदर्भसाधनांतील माहितीचा अन्वयार्थ लेखक आपापल्या मगदुराप्रमाणे लावत असतो. अनेक चरित्रे ही अभिनेवेशापोटी लिहिली जात असतात. त्यामुळे परिपुर्ण चरित्र असे कितीही प्रयत्न केला तरी लिहिले जाईलच असे नाही. स्वजातीयांनी वा वंशजांनी लिहिलेली चरित्रे ही शक्यतो अविश्वसनीय बनतात हा अनुभव वाचकांना असतोच. या चरित्राचे विशेष म्हणजे हे चरित्र लिहिणारा लेखक दुरान्वयानेही होळकर घराण्याशी संबंधीत नाही वा धनगर समाजाशीही संबंधीत नाही. त्यामुळे या चरित्र ग्रंथात चरित्रनायकाचे अकारण उदातीकरण करण्याचा प्रकार आढळास येत नाही. मल्हाररावांचे गुण-दोष त्यांनी मोकळेपणाने चर्चीले आहेत ते त्यामुळेच.

हे चरित्र पुणे (बुधवार पेठ) येथील नवा किताबखाना या प्रकाशनसंस्थेने सन १८९३ साली प्रसिद्ध केले. म्हणजेच हा ग्रंथ लिहिण्याचे काम तत्पुर्वीच काही वर्ष आधीच सुरु झाले असले पाहिजे. येथे आपल्याला या काळात (पुर्वी व नंतर) कोणती चरित्रे प्रकाशित झाली होती याचा धावता आढावा घ्यायचा आहे. या शतकात अनेक चरित्रे ही काव्यमय असून गद्य चरित्रांची संख्या मात्र अत्यल्प अशी दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय महात्मा फुले यांच्याकडे जाते. त्यांनी लिहिलेला "शिवाजी महाराजांचा पवाडा" १८६८ मद्धेच प्रकाशित झाला असला तरी शिवाजी महाराजांचे केळुस्कर गुरुजी लिखित अभ्यासपुर्ण गद्य चरित्र प्रसिद्ध व्हायला १९०६ साल उजाडावे लागले. म. फुले यांच्यानंतर "शिवाजी चरित्र" हे शिवाजी महाराजांचे काव्यमय चरित्र लिहिले ते गणेशशास्त्री लेले यांनी. दक्षीणा प्राइझ कमिटीने शिवचरित्र काव्य स्पर्धेत या काव्याला पारितोषिक मिळाले व ते कमिटीनेच १८७३ साली प्रसिद्ध केले. दरम्यानच्या काळात बापु गोखले, भास्करराव दामोदर पलांडे यांची चरित्रे अनुक्रमे १८७७ व १८७८ साली प्रकाशित झाल्याच्या नोंदी मिळतात. त्याच्या प्रती मला उपलब्ध होवू शकल्या नाहीत परंतु ही गद्य चरित्रे होती एवढे मात्र निश्चयाने म्हणता येते. अजुनही काही गद्य चरित्रे प्रकाशित झाली पण त्यांची संख्या अत्यल्प होती. संशोधकीय शिस्त पाळत लिहिले गेलेले पहिले चरित्र म्हणुन प्रस्तुत "सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचे चरित्र" याचा निर्देश करता येईल. या दृष्टीनेही या चरित्राचे मराठी सारस्वतात ऐतिहासिक महत्व आहे.

१८९३ नंतर प्रसिद्ध झालेले चरित्र म्हणजे गजानन देव लिखित "श्रीमंत अहिल्याबाई यांचे चरित्र". हे चरित्र १८९५ साली प्रकाशीत झाल्याची नोंद मिळते. अर्थात मुळ ग्रंथ आज उपलब्ध नाही. तो कोणत्या संस्थेने प्रकाशित केला होता याची माहितीही प्रयत्न करुनही मला उपलब्ध झालेली नाही.

बखरी या इतिहासाची अस्सल साधने होत कि नव्हेत याबाबत अनेक इतिहासकारांनी चर्चा केली आहे. वि. का. राजवाडे हे बखरींना कमास्सल साधन मानत असत व पत्रांना अस्सल साधने मानत असत. परंतु इतिहासातील अनेक पत्रे हीसुद्धा खोटी, दिशाभुल करणारी आहेत हे सिद्ध झाले असल्याने इतिहास हा शेवटी तारतम्यानेच शोधावा लागतो. असे असले तरी बखरींचे मोल कमी होत नाही. पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे मराठी बखर लेखनाच्या ऐन भरात दोन अडिचशे बखरी लिहिल्या गेल्या असाव्यात असा अंदाज राजवाडे देतात. १९५७ साली कै. र. वि. हेरवाडकर यांच्या "मराठी बखर" या व्हीनस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथात सुमारे १४० बखरीच काय त्या उपलब्ध आहेत व त्यातील ऐतिहासिक म्हणता येतील अशा केवळ ७८ बखरीच काय त्या उपलब्ध आहेत असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यातही अनेक बखरी त्रुटीत स्वरुपात उपलब्ध आहेत. त्यातीलही प्रक्षिप्त किती हे सांगणे दुरापास्त आहे एवढा विरोधाभास त्या-त्या बखरींत दिसुन येतो.

"काव्येतिहास संग्रह" हा मराठी इतिहासातील काशिनाथ नारायण साने यांनी पोटाला चिमटा काढुन केलेला उद्योग म्हनजे त्यांनी उपलब्ध होतील ती ऐतिहासिक पत्रे व बखरी प्रकाशित करण्याचा चंग बांधला. पुढे १८९७ मद्धे भारतवर्ष आणि ऐतिहासिक लेख संग्रहाच्या माध्यमातुन दत्तात्रेय पारसनिस आणि वासुदेवशास्त्री खरे यांनीही ऐतिहासिक साधने प्रसिद्ध करुन इतिहासाच्या लुप्त होवू पाहणा-या ठेव्यात मोलाची भर घातली.  त्यामुळे आज अनेक साधने आपल्याला उपलब्ध झाली असली तरी विपन्नावस्थेमुळे व मराठी माणसाच्या इतिहासाबाबतच्या अनास्थेमुळे काव्येतिहास संग्रहाच्या अनेक प्रती भेळी बांधण्याच्या कामी आल्या तर काही कसरीचे पोट भरत्या झाल्या. कै. र. वि. हेरवाडकरांनी आपल्या "मराठी बखर" या १९५७ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात ७८ बखरी ऐतिहासिक असल्याचे नोंदवले होते. परंतु पुढे शोध घेता त्यातील सुमारे २०% बखरीही आज दुष्प्राप्य झालेल्या आहेत.

तरीही आजही उपलब्ध असलेल्या शकावल्या, बखरी, पत्रे, पोवाडे इ. काही लाखांत भरणा-या कागदपत्रांपैकी फक्त १५ ते २० हजार कागदपत्रेच काय ती प्रकाशित झालेली आहेत. खरेच ही इतिहासाबद्दलची मराठी माणसाला शरम वाटावी अशी अनास्था आहे. त्यामुळेच  ज्या इतिहासकार/संकलकांनी पदरमोड करत आयुष्ये मराठ्यांचा इतिहास जतन करण्यासाठी, छापुन प्रसिद्ध करण्यासाठी घालवली त्यामुळे त्यांच्यातील काही स्वभावधर्म-दोषांकडे दुर्लक्ष करुनही आपणास त्यांचे ऋणी रहावे लागते.

मुरलीधर मल्हार अत्रे

दुर्दैवाने मला खूप प्रयत्न करुनही अत्रेंची कसलीही माहिती उपलब्ध होवू शकली नाही. इतिहासाने त्यांना जणु काही काळाच्या उदरात गडप करुन टाकले आहे. प्रस्तुत चरित्र ग्रंथाची मुद्रित प्रतही उपलब्ध नाही. या चरित्राची पुन्हा कोणीही आवृत्तीही काढलेली नाही. टोरोंटो विद्यापीठाने डिजिटल स्वरुपात हे चरित्र माहितीजालावर उपलब्ध करुन दिले आहे. याबद्दल या विद्यापीठाचे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत. मराठी चरित्र एका अमेरिकन विद्यापीठाने उपलब्ध करुन द्यावे, मात्र मराठी वाचकांना व कथित इतिहासप्रेमींना असे चरित्र मराठीत होते हेही माहित नसावे यातच आपण आपल्या उदासीन मनोवृत्तीची कल्पना करु शकतो.

प्रस्तुत चरित्र ग्रंथाचा उल्लेख विश्वास पाटील यांच्या "पानिपत" या कादंबरीच्या संदर्भ सुचीत येतो परंतु त्यांनी लेखकाचे नांव फक्त "अत्रे" एवढेच छापले आहे. याचा अर्थ त्यांनी हे चरित्र वाचले नसुन ऐकीव माहितीच्या आधाराने असेच ठोकुन दिले आहे असे दिसते. जर त्यांनी हे चरित्र खरेच वाचले असते तर त्यांनीही मल्हाररावांवरील पानिपतसंदर्भातील आरोपांचे खंडन केले असते. असो. बनचुकव्या इतिहासकारांची व ऐतिहासिक कादंबरी लेखकांची आपल्याकडे कमतरता नाही.

चरित्रग्रंथातील एकूनातील भाषाशैली पाहता अत्रे हे अत्यंत व्यासंगी पण नम्र व्यक्तिमत्वाचे गृहस्थ होते असे म्हणता येते. त्यांना त्याकाळी मल्हाररावांबद्दल जेवढी माहिती उपलब्ध झाली तिचा त्यांनी आधार तर घेतलाच आहे परंतु अनेक जुन्या-जाणत्या व्यक्तींना भेटुन काही माहिती मिळवली आहे. अत्रेंचा ग्रंथलेखनाचा हा पहिलाच आणि बहुदा शेवटचा प्रयत्न. या ग्रंथानंतर त्यांनी अन्य ग्रंथ लिहिल्याची माहिती नाही. आपल्या लेखनात न्यून राहु नये म्हणुन अत्रेंनी रावबहादुर नीळकंठ जनार्दन कीर्तने,, गोपाळ गणेश आगरकर व काव्येतिहास संग्रहाचे काशिनाथ साने अशा तत्कालीन दिग्गजांना हस्तलिखित दाखवून त्यांनी केलेल्या सुचनांचा विनम्रतापुर्वक स्वीकार केलेला दिसतो. अत्रे हे पुणेकरच असावेत असा अंदाज बांधता येतो तो त्यांना लाभलेल्या या दिग्गजांच्या सहवासावरुन. तरीही अत्रेंबाबत अन्य कसलीही माहिती मिळु नये ही दुर्दैवी बाब आहे. अर्थात भविष्यात कोणीतरी...किमान अत्रेंचा वंशज पुढे येवून अत्रेंच्या जीवनाबाबत सांगु शकेल अशी आशा आहे.

अत्रेंनी संशोधकीय शिस्त पाळत ज्या पद्धतीने या ग्रंथाची रचना केली आहे त्याला तोड नाही. आपल्या मताविरुद्ध जात असलेली मतेही त्यांनी तळटीपांत दिलेली आहेत. काव्येतिहास संग्रहात प्रसिद्ध झालेल्या बखरी, दस्तावेज आणि पत्रांचा तर त्यांनी या चरित्र लेखनासाठी संदर्भसाधने म्हणुन उपयोग केलाच आहे परंतु अन्य इंग्रजी व मराठी अशा १५ ग्रंथांचाही संदर्भासाठी उपयोग केला आहे.

* * *


शाहु महाराजांची कैदेतुन सुटका हा तत्कालीन परिस्थितीत परिस्थितीत मोगलांनी टाकलेला अत्यंत मुत्सद्दी आणि यशस्वी झालेला डावपेच होता. औरंगजेबाचा मृत्य़ु (फ़ेब्रुवारी १७०७) झाल्यानंतर उत्तरेतही पातशाहीसाठी गृहयुद्ध होणार हे जवळपास नक्कीच झाले होते कारण मुअज्जम हा लाहोरला असलेला राजपुत्रही तख्तावर हक्क सांगण्यासाठी आग्र्याकडे निघाला होताच. तख्तावर कोण बसणार हे युद्धच ठरवणार होते. अशा स्थितीत रणरागिणी ताराबाई परिस्थितीच फायदा घेवून आपल्या सीमा वाढवेल यात शंकाच नव्हती. त्यामुळे सेनापती झुल्फिकार खान व राजपुत सरदारांनी शाहजादा आझमला शाहुची सुटका करण्यास सुचवले. आझमला तो सल्ला मानण्यावाचून गत्यंतर नव्हते. शाहुच्या सुटकेमुळे मराठ्यांत सत्तास्पर्धा निर्माण होवून दोन तट पडतील व ते आपापसात लढत बसतील हा मोगली होरा मराठ्यांनी खरा ठरवला.

मोगल सत्तेशी आणि तख्ताशी इमानदार राहणे या अटींवर शाहु महाराजांना १८ मे १७०७ रोजी दोराहा (भोपाळ पासून ३२ किमी) येथे मुक्त करण्यात आले. मोगली सत्तेने शाहुंनाच स्वराज्याचा वारस म्हणुन अधिकृत मान्यता दिली. दक्षीणेतील सहा सुभ्यांची सरदेशमुखी आणि चौथाईचे अधिकारही शाहुंना बहाल केले. यामुळे शाहु महाराजांचे मनोबल वाढले, तशीच महत्वाकांक्षाही. शाहुंना मुक्त करुन आझम उत्तरेकेडे तातडीने आपल्या भावाचा सामना करायला निघुन गेला. अर्थात आझमने शाहूंना मुक्त केले असले तरी त्यांच्या दोन्ही पत्नी (सावित्रीबाई आणि अंबिकाबाई), येसूबाई आणि शाहुंचा सावत्रभावाला मात्र ओलीस म्हणुन आपल्याजवळच कैदेतच ठेवून घेतले.
अंबिकाबाई पुढे मोगली कैदेतच वारली. पुढे बाळाजी विश्वनाथाने सावित्रीबाई, येसुबाई व इतरांची सुटका मार्च १७१९ मद्धे करुन घेतली. असो.

शाहुंची सुटका झाल्याची खबर वणव्यासारखी महाराष्ट्रभर पसरली. मराठा सरदार अर्थातच द्विधेत पडले. जे गुजराथ व माळव्याच्या सीमावर्ती प्रदेशांत स्वतंत्र सैन्य उभारुन माळवा व गुजराथवर हल्ले चढवत लुट करणारे सरदार होते त्यांना ही मोठी संधी वाटली. सर्वात प्रथम सामील झाला तो बिजागढचा मोहन सिंग रावळ. तापीच्या तीरावर आला असता शाहुंना अमृतराव कदम बाडेही सामील झाला. परसोजी भोसलेनीही तीच वाट पकडली. अशा रितीने एकामागुन एक सरदार शाहुंभोवती जमायला लागले. थोडक्यात गृहयुद्धाची नांदी झाली. ताराराणीच्या सा-या राजकीय योजना आता शाहुंचे काय करायचे या प्रश्नाशी येवून थांबल्या. युद्धाखेरीज पर्याय नव्हता. ताराराणी या रणमर्दानी व मुत्सद्दी ख-या, पण बाळाजी विश्वनाथाच्या चाली जास्त धूर्त ठरल्या. धनाजी जाधवातर्फे हा शाहु खरा कि तोतया हे तपासायला बाळाजी विश्वनाथ गेला व शाहुंशी स्नेह जुळवून बसला. धनाजीला त्याने खात्री दिली कि हा शाहु खराच आहे, तोतया नाही. खेड (आता राजगुरुनगर) येथे शाहु व ताराराणीत युद्ध झाले. हे युद्ध लुटुपुटुचेच झाले. युद्ध ऐन भरात असतांना धनाजीने युद्ध थांबवले व शाहुच्या गोटात अधिकृतपणे प्रवेश केला. ताराराणीचा पराभव झाला. तरीही ग्रुहयुद्ध पुढे बराच काळ चालले. कोल्हापुर गादीसाठीही ताराराणी आणि राजसबाईत वाद पेटला. हा वाद निर्माण करण्याचे काम बाळाजी विश्वनाथानेच करुन शाहुंना जरा उसंत दिली असे जसवंतलाल मेहता आपल्या Advanced Study in the History of Modern India 1707-1813 या ग्रंथात म्हनतात.


इकडे उत्तरेतही भाऊबंदकी माजलेली होतीच. शाहजादा आजम व मुअज्जम याच्यात युद्ध झाले. त्यात आझम ठार झाला. मुअज्जम बहादुरशहा नांव धारण करत तख्तावर बसला. तरी त्याला अजुन कामबक्ष या आपल्या धाकट्या भावाचा काटा काढायचा होता. कामबक्ष तेंव्हा हैदराबाद येथे होता. शाहुंना आझमने दिलेली चौथाई आणि सरदेशमुखीची सनद त्याच्या मृत्युबरोबरच बाद झाली होती. त्यामुळे शाहुंनी बालाजीच्या सल्ल्याने प्राप्त स्थितीचा फायदा घ्यायचे ठरवले. नेमाजी शिंदेच्या नेतृत्वाखाली शाहुंनी नव्या बादशहाच्या मदतीसाठी कुमक पाठवली. मोगल व कामबक्षात झालेल्या युद्धात कामबक्षचा अपेक्षेप्रमाणे पराभव झाला. कामबक्ष जखमी अवस्थेत पकडला गेला व नंतर त्याचाही मृत्यु झाला. बहादुरशहा शाहुंना चौथाई आणि सरदेशमुखी द्यायला जवळपास तयार झाला होता, पण ताराराणीचा वकीलही तेथे येवुन ठेपल्याने सारा मामला बिघडला. बहादुरशहाने झुल्फिकार खान व मुनिमखान या आपल्या मंत्र्यांचेच ऐकले व उभयपक्षांना सांगितले कि आधी तुमच्यातले वाद मिटवून कोण अधिकृत वारस आहे हे ठरवा...त्यानंतरच सनदा दिल्या जातील. मोगलांनी येथेही आपल्या राजकीय मुत्सद्दीपनाची चुणुक दाखवली. ही घटना १७०९ मद्धे घडली.

अर्थात या धामधुमीमुळे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नव्हता. मयत धनाजी जाधवचा मुलगा सेनापती चंद्रसेन जाधव हा अकार्यक्षम असल्याचे दिसल्याने शाहुंनी बाळाजी विश्वनाथाची "सेनाकर्ते" पदीही नेमणुक केली. (ही पदवी म्हणजे आताच्या क्वर्टर मास्टर जनरल या पदासारखी होती.) याची परिणती अशी झाली कि चंद्रसेन सरळ ताराराणीला जावून मिळाला. (१७११). शाहुंनी मग त्याचा धाकटा भाऊ संताजी जाधवला सेनापती बनवले. तोही असाच चंचल असल्याने सरदार नाराज होवू लागले आणि अनेक पुन्हा ताराराणीच्या गोटात जावू लागले. बाळाजीने मग स्वत:च्या जबाबदारीवर महादजी कृष्ण नाईकांसारख्या सावकारांकडुन कर्ज उचलले, स्वतंत्र सैन्य उभारले आणि शाहूंच्या शत्रुंवर तुटुन पडला व त्यांची गादी शाबुत ठेवली..

शाहु महाराजांना बाळाजीची अनमोल मदत झाली नसती तर शाहु सत्ता प्राप्त करु शकले नसते असेच एकंदरीत घटनाक्रम पाहता म्हणता येते. बाळाजीने शाहुंसाठी रस्त्यातील अनेक काटे साफ केले. अनेक शत्रुंना शाहुंच्या बाजुने वळवले. स्वत:ही जीवावरची संकटे झेलली. राजसबाईला हाताशी धरुन ताराराणीला शेवटी पन्हाळ्यावर नजर कैदेत ठेवण्यात आले.आंग्रेंनाही त्याने ताराराणींकडुन खेचुन शाहुंच्या गोटात आणले होतेच. अशा रितीने शाहुंना शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अधिकृत वारस म्हणुन जनमान्यता व बव्हंशी सरदार मान्यताही लाभली. बाळाजी विश्वनाथ हा शाहुंचा अत्यंत मुत्सद्दी आणि विश्वासु सहकारी बनला तो त्याने शाहुंना केलेल्या अनमोल मदतीने. याचीच परिणती बाळाजील पेशवेपद मिळण्यात झाली.( १७ मे १७१३)  बहुतेक सर्व प्रशासकीय स्वातंत्र्य बाळाजीच्या हवाली करुन सातारा येथे शाहु महाराज निश्चिंतीने राहू शकले.

थोडक्यात हा सर्वच काळ अत्यंत अंदाधुंदीचा व अविश्वासाचा होता. सरदार कोणतीही बाजु घेवोत, त्यांचा भर हा स्वत:ची संपत्ती वाढवणे यावरच होता. अशा वेळीस माळवा व गुजरातेच्या सीमेवरील सरदारांची नेमकी काय भुमिका होती हे पाहिले पाहिजे तरच आपल्याला मल्हारराव होळकरांच्या उदयाची कारणमिमांसा करता येईल.

मल्हारराव पेशव्यांना सामील होईपर्यंत नेमके काय करत होते हेही येथे आपल्याला तपासुन पहायला पाहिजे.

मामांकडे असतांना मल्हारराव मेंढपाळी करत करत होते याबाबत सर्वच इतिहासकारांचे एकमत आहे. भोजराज बारगळ हे कदमबांड्यांच्या फौजेत एका पथकानिशी मोहिमांवर जात. १७०७ पर्यंत त्रिंबकराव कदमबांडे हयात होते हे त्यांनी घेतलेल्या शाहु भेटीवरुन सिद्ध होते. या भेटीनंतर कदम बांड्यांनी कितपत शाहुंचे प्रत्यक्ष सेवा केली याची माहिती उपलब्ध नाही. माल्कम सांगतो कि कदम बांडे मोगलाई सेवेत होता. त्यात अशक्य काही नाही कारण जेथे फायदा होईल तिकडे जाणे ही त्या काळची पद्धतच होती. कधी दाभाडेंबरोबर गुजराथ स्वा-या तर कधी संताजी जाधवाबरोबर माळवा स्वा-या कदमबांडे करत होते एवढे नक्की. एकार्थाने ते स्वतंत्र सरदार होते. कोणाला बांधील नव्हते. महाराष्ट्रातील यादवीमुळे तसाही कोणाचा कोणावर अंकुश नव्हता हे आपण वर पाहिले आहेच.

माळव्यावरील हल्ले अशा स्वतंत्र सरदारांनी सुरु केले तेच १६९० सालापासुन हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे. औरंगजेब दक्खनेत उतरल्यानंतर तसेही उत्तरेत अनागोंदीच माजलेली होती. त्यात गुजराथ व माळवा तसे संपन्न मुलुख. त्यामुळे या स्वतंत्र सरदारांची दृष्टी या प्रांतांकडे वळाली नसती तरच नवल. दाभाडे, कदमबांडे हे कधी एकत्र तर कधी स्वतंत्रपणे या प्रांतांवर हल्ले करत असत. त्रिंबकराव कदमबांडॆंचा मृत्यु नेमका कधीचा याचा तपशील उपलब्ध नाही, पण १७०९ च्या आसपास कंठाजे कदम बांडे सरदार बनला असावा असा तर्क करण्यास वाव आहे. या समयी मल्हाररावांचे वय १५ वर्षांचे होते. अत्रे देतात त्या माहितीनुसार बारगीर म्हणुन मल्हारराव बांड्यांच्या चाकरीस लागले. खरे तर त्यांचे मामाही बांड्यांचे पथके असतांना मल्हाररावांनी बारगळांच्या सैन्यात असनेच संयुक्तिक होते. आणि तेच उपलब्ध पुराव्यांवरुन स्पष्ट होते, कारण बाजीरावाने मल्हाररावांस आपल्या सेवेत मागून घेतले ते बारगळांकडे, बांड्यांकडे नव्हे हा या चरित्रात आलेला इतिहासही येथे लक्षात घ्यायला हवा.

थोडक्यात मल्हाररावांचे सैनिकी जीवन बारगळांच्या हाताखालीच सुरु झाले व बारगळ बांड्यांचे सरदार असल्याने अप्रत्यक्षपणे  मल्हारराव बारगळांचे अनुयायी ठरतात. पण येथे हे लक्षात घ्यायला हवे कि फारसे पगारी सैनिक कोणी सरदार पदरी ठेवत नसे तर स्वारीच्या वेळीस सोबत घेत जी काही लुट मिळेल ती घ्यायची मुभा देत असत. मल्हाररावांनीही आपले शे-दिडशे स्वारांचे स्वतंत्र पथक बनवले होते. मल्हाररावांच्या माळव्यावर १७१८ पुर्वीपासुनच स्वतंत्र स्वा-या होत असत. मल्हाररावांचा इंदोरच्या नंदलाल मंडलोई या जमीनदाराशी झालेला पत्रव्यवहार उपलब्श आहे. बाजीराव पेशव्याने पुढे मल्हाररावांस आपल्याकडे वळवले ते केवळ माळव्यात मल्हाररावांनी आधीच बसवलेल्या बस्तानामुळे असे स्पष्ट दिसते. उत्तरेत स्वराज्याचा विस्तार करायचा असेल तर मल्हाररावासारख्या दूरदृष्टीच्या मुत्सद्दी-सेनानीचा मोठ उपयोग होइल अन्यथा स्वत: मल्हाररावच उत्तरेत स्वतंत्र बस्तान बसवेल असे बाजीरावाला वाटणे स्वाभाविक होते.

अत्रेंनी बाळाजी विश्वनाथाच्या उत्तर स्वारीत मल्हारराव स्वतंत्र पथके म्हणुन सामील झाले होते हा जो इतिहास दिला आहे तो बरोबर दिसतो. मल्हाररावाचे आधी बाजीरावाशी झालेले भांडण व नंतरचे मैत्रही ऐतिहासिक दृष्ट्या बरोबर आहे.

* * *


१. नजीबखानास जीवंत सोडले म्हणुन पानिपत झाले हा महत्वाचा आरोप मल्हाररावांवर केला जातो. खरे तर असा आरोप केला जावा हे राजकरण आणि इतिहास न समजल्याची लक्षणे आहेत. मल्हाररावांनी जनकोजी व दत्ताजीला दिलेला "धोतरबडवी" सल्ल्याबाबतही असेच म्हणता येते. आपला समाज हा मुळ इतिहास न वाचता इतिहासाविषयीची आपली मते कादंब-या वाचुन बनवत असल्याने असे घडत असावे. आणि खोटे सातत्याने रेटत राहिल्याने तेच सर्वसामान्य लोकांन खरे वाटू लागते हेही खरे आहे. असो.
  १७५४ मद्ध्ये इंतिजामौद्दौल्ला हा बादशहाचा वजीर होता तर गाजीउद्दीन मीरबक्षी होता. गाजीउदीन हा मराठ्यांच्या पक्षाचा व अत्यंत महत्वाकांक्षी होता. गाजीउद्दीन आणि बादशहात विकोपाचा संघर्ष होता. इतका कि गाजेउद्दीनने बादशहाच्याच राहत्या वाड्याभोवती चौक्या उभारुन आतील लोकांची उपासमार चालवली होती. दोआबातील सिकंदराबादसह अनेक शहरे लुटली. इंतिजामौद्दौल्लाने बादशहाला मे महिन्यात जनान्यासह बाहेर काढुन सिकंदराबादला छावणीत नेले. मे महिन्यातच होळकरांकडुन बादशाही छावणी लुटण्याची घटना घडली. राजपुतांना, जे कुंभेरी प्रकरणामुळेव मराठ्यांचे शत्रु बनले होते त्यांनाच बादशहा मदत करत असल्याने हा प्रकार घडला. प्रस्तूत पुस्तकात या प्रकरणाची सविस्तर माहिती आहेच.

 होळकरांनी बादशहाकडॆ पत्राद्वारे काही मागण्या मान्य केल्या, त्या इंतिजामौद्दौल्यास पसंत नव्हत्या. त्यांनी लढण्याची तयारी केली, पण तोवर होळकरांनी दिल्लीच्या बाहेरचा बराचसा भाग लुटुन फस्त केला होता. तेंव्हा बादशहाने मराठ्यांचा मागण्या मान्य केल्या. १ जुनला गाजीउद्दीनला अहमदशहाने वजीर बनवले. गाजीउद्दीनने या उपकाराची परतफेड अशी केली कि दुस-याच दिवशी, म्हणजे २ जून १७५४  रोजी गाजीउद्दिनने बहादुरशहाचा नातू अजीजुउद्दौला आलमगीर (दुसरा) असे नामकरण करुन बादशाही तख्तावर बसवले व अहमदशहास तख्तावरून काढून त्याची ऊधमाबाईसह तुरुंगात टाकले. ता. २४ जून रोजी अहमदशहा व त्याची आई ऊधमाबाई यांचे डोळे फोडून नंतर त्यांची हत्या केली.  या विश्वासघातकी आणि कृतघ्न कृत्यामुळे गाजीउद्दीन व त्याला पाठिंबा देणारे मराठे आपसुक बदनाम झाले.

 यानंतर अब्दालीची चवथी हिंदुस्तान स्वारी होऊन गेली. दिल्ली व अंतर्वेदीवर नजीबखानाचा अंमल बसला. गाजीउद्दीनला नजीबखान दिल्लीच्या राजकारणात असणे पसंत नव्हते. १७५७ मद्ध्ये दादासाहेब पेशवे यांच्याकडे नजीबखानाहातून दिल्ली काढुन आपल्याकडे सोपवावी यासाठी गाजीउद्दीनने मदत मागितली व मराठ्यांच्या आश्रयास गेला. इकडे पातशहाने नजीबाहाती सर्वाधिकार सोपवले. गाजीउद्दीनपेक्षा नजीब बरा अशी बादशहाची समजूत असल्यास ते चुकीचे नव्हते. नजीबाने गाजीउद्दीनचे हवेली लुटुन त्याचा बायका-पोरांना हाकलून दिले. वजीराच्या जनान्याची एवढी अप्रतिष्ठा पुर्वी कधीही झाली नसली तरीही कोणालाही वाईट वाटले नाही. कारण गाजीउद्दीन आधीच आपल्या दुष्कृत्यांमुळे पुरेपुर बदनाम झाला होता.

 या पार्श्वभुमीवर नजीब व गाजीउद्दीन यांचे वैर लक्षात घेता, नजीबाला ठार मारले असते तर गाजीउद्दीनला आवरणारा अथवा अंकुश ठेवू शकनारा एकही दिल्लीत उरला नसता. नजीबाला ठार मारुन मराठ्यांचा काहीएक वरकड फायदा नव्हता. जो मिळणार होता, तो नजीबाला जीवंत ठेवुनही मिळालाच. नजीबाला मारुन गाजीउद्दीनला मोकळे रान मिळाले असते व मराठ्यांनाच डोकेदुखी होणार होती. अशा स्थितीत नजीबाला जीवंत ठेवणे हेच मुत्सद्दीपनाचे लक्षण होते. ते मल्हाररावांनी दाखवले.

 नजीबाला जीवंत ठेवल्याने त्याने अब्दालीला निमंत्रण धाडले व म्हणुणच पानिपत घडले असा सूर आमचे इतिहासकार व "पानिपतकार" ही लावतात. याचाही निरास करायला हवा.

 पहिली बाब म्हणजे दिल्ली येथून नजीब आणि त्याच्या सेनेला जायला मराठयांनी वाट दिली ती ६ सप्टेंबर १७५७ रोजी. नजीबाला मुळात पकडले गेलेले नव्हतेच. बरे, पानिपत त्यानंतर घडले १७६१ साली. त्यावेळी पानिपत घडणार हे स्वप्न कोणाला पडले होते कि काय? राजकारणात परिस्थित्या बदलत असतात आणि तदनुरुप निर्णय घ्यावे लागतात. नजीब पुढे मराठ्यांच्या कामी एकदा तरी आला...पण त्याचा फायदा पेशव्यांना घेता आला नाही तो दोष मल्हाररावांचा कि काय? असो. त्याबद्दल पुढे.

 अब्दालीला नजीबाने बोलावले म्हणुन अब्दाली आला असे जे मत मांडले जाते ते धादांत खोटे आहे. अब्दालीला निमंत्रण धाडण्यात पहिला असामी होता तो म्हणजे खुद्द पातशहा आलमगीर, मल्लिका जमानी व दरबारातील मुत्सद्दी. याहुन महत्वाचे म्हणजे जयपुरच्या रजपुत राजा माधोसिंगही अब्दालीला निमंत्रण देना-यांत होता याकडे का दुर्लक्ष केले जाते? पातशहाची अब्दालीला दिल्लीला येण्यासाठी विनवणारी पत्रे गाजीउद्दीनच्या हाती पडल्यावर त्याने संतापून पातशहा व अन्य तीन मुत्सद्द्यांचा शिरच्छेद करुन हत्या केली. (२९ नोव्हेंबर १७५९) मलिका जमानी तर अब्दालीला भेटायला पंजाबला जावून धडकली होती.

 हे वरील वास्तव पाहता केवळ नजीबाच्या निमंत्रणामुळे अब्दाली भारतात आला या मताला काहीएक अर्थ नाही असे स्पष्ट दिसते. अब्दालीचे भारतात येणे हे तत्कालीन राजकारण व परस्पर अविश्वासाची एकुणातील परिणती होती, एवढेच म्हणता येते. तरीही होळकरांचे नजीबाला जीवदान आणि म्हणुन पानिपत हा हेका लावणा-यांची कीव केली पाहिजे. अब्दाली तत्पुर्वीही चार वेळा येवून लुटालूट करुन गेला होता...तेंव्हा त्यात नजीबाचा काय संबंध होता? तेंव्हा आरोपकर्त्यांनी तारतम्य बाळगायला हवे.

4 comments:

  1. मल्हाररावानी शिंद्याना लिहिलेले ते प्रख्यात पत्र (धोतरे बडवण्याबाबत, तुमच्या मते खरे कीं खोटे? मराठ्यांवर उत्तरेतील कोणीहि राजकारणी पूर्ण विश्वास टाकत नसत (हल्लीहि नाही!), आणि त्याना परस्पर अबदालीचा शह बसत असेल तर तो सर्वाना हवा होता हे मात्र खरे. एकट्या नजीबमुळे अबदाली स्वार्‍या करत नव्हता पण नजीबाचा दाब पेशव्यांवर ठेवण्याचे राजकारण मल्हारराव खेळत होते हे नाकारता येत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. पेशव्यांच्या दृष्टीने नजीब एवढ्या महत्वाचा कधीच नव्हता. तसे असते तर नजीबाचा पुरता बिमोड करण्याचे कार्य पेशव्याने मल्हाररावांच्या हाती सोपवले नसते तर अन्य कोणा सरदाराला हुकुम करुन सांगितले असते.

      Delete
  2. (१) मल्हारराव नजीबखानाला आपला मानसपुत्र मानत असत अशी समजूत आहे त्यात कितपत तथ्य आहे?
    (२)थोडेसे अवांतर:मल्हाररावांचे वंशज श्री यशवंतराव होळकर यांनी स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला होता. छ्त्रपती शिवाजी महाराजांनंतर रीतसर राजा होणारे ते एकमेव हिंदू राजे झाले. त्यांचे दुसरे वैशिष्टय म्हणजे ब्रिटीशांचा भारतभर अंमल सुरु होण्याची लक्षणे दिसू लागल्यावर त्यांनी इतर सत्ताधिकाऱ्याना बरोबर घेऊन ब्रिटिशाविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याचा प्रयत्न केला. यासाठी ते पंजाबात रणजीत सिंगालाहि जाऊन भेटले होते. पण त्याने साफ नकार दिला. या बाबत आपण अधिक लिहावे हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. मल्हारराव नजीबाला मानसपुत्र समजत नसत तर नजीबानेच होळकरांना राघोबादादाशी तह करुन देण्याची गळ घालतांनाच्या पत्रात "आपल्याला धर्मपुत्र मानुन तह करुन द्यावा" असे म्हटले आहे.

      यशवंतरावांना सामील व्हायला रणजित्सिंग तयार झाला होता पण इंग्रजांचे वकील आणि खुद्द अन्य काही रजपुत संस्थानिकांनी त्यात मोडता घातला. याबद्दल मी यशवंतरावांच्या चरित्रात सविस्तर लिहिले आहे.

      Delete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...