Tuesday, September 25, 2012

ऐरणीच्या देवा तुला...


Image result for iron pillar mehrauli history


आपल्या पुरातन पुर्वजांनी इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर जीवनोपयोगी जे शोध लावले ते पाहून आपण अचंबित होतो. लोहाचा शोध हा एक असाच अत्यंत महत्वाचा टप्पा. लोहयुगाचे सुरुवात ही मानवी विकासाच्या टप्प्यातील एक क्रांतीकारी घटना मानली जाते. सनपूर्व तीन हजार वर्षांपुर्वी मानवाला लोहाचा शोध लागला असे पुरातत्वविद मानतात. लोहयुग सुरु होण्याच्याही खूप आधी मध्यपुर्वेत अशनींत मिळणारे शुद्ध लोह-निकेलचे गोळे वापरात आनले जात असत. भूपृष्ठावर मिळणा-या लोह खनिजात अशुद्ध धातू व अधातु जवळपास ३० ते ३५% असतात. शिवाय धातुकाचे ओक्सीडीकरण झालेले असते. लोह वितळवण्यासाठी आवश्यक असलेले उच्च तापमान निर्माण कृत्रीमरित्या निर्माण करणे व शुद्ध लोह वेगळे करणे ही क्रिया सुरुवातीला अशक्य अशीच होती. त्यामुळे लोह वितळवून धातूरस साच्यात घालुन वेगवेगळ्य वस्तु निर्माण करत येत नसत. त्यामुळे सुरुवातीला लोखंडाचे गोळे तापवून, नरम करुन त्याला ठोकून निरनिराळ्या वस्तू बनवल्या जावू लागल्या. कालांतराने मानवाने भट्ट्यांत तांत्रिक सुधारणा केली व लोहाचा रस निर्माण करण्यासाठी आवश्यक तापमान निर्माण व्हायला सुरुवात झाली.


भारतात लोहयुग कधी अवतरले याबाबत विद्वानांत अनेक मतभेद आहेत. ऋग्वेदात लोहाचा उल्लेख येत नाही. वैदिक मंडळीनी लोहशास्त्र आदिवासी मुंड लोकांकडुन घेतले असे मत अ.ज. करंदीकर यांनी व्यक्त केले आहे. संस्कृतात मुंड शब्दाचा अर्थ "लोह" असाच आहे. मुंडायसम, मुंडलोहम अशी नांवे वेदांत वारंवार येतात. त्यामुळे भारतातील लोहाच्या शोधाचे श्रेय मुंड या आदिवासी जमातीला दिले जाते व ते संयुक्तिकही आहे. मुंड आदिवासींच्या वसाहती आजही ज्या भागांत आहेत तेथे लोहखनिजाच्या विपूल खानी आहेत. त्यामुळे लोहाशी त्यांचा प्रथम परिचय झाला असणे स्वाभाविक आहे. सनपूर्व अठराव्या शतकापर्यंत लोह उद्योग भारतभर पसरला होता असे विविध ठिकाणी झालेल्या उत्खननांतुन सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात तीन हजार वर्षांपुर्वीच्या  महापाषाणयुगातील लोखंडाचे घोड्याचे नाल व खिळे तसेच घोड्याच्या मुखावर बसवण्यासाठी बनवलेला तांब्याच्या पत्र्यापासून बनवलेल्या व लोखंडी खिळ्यांनी ठोकलेला अलंकार मिळाला आहे.

पुढे मात्र लोहक्षेत्रात भारतियांनी खुपच मोठी क्रांती घडवली. शुद्ध लोह मऊ असल्याने हत्यारांसाठी त्याचा उपयोग होत नसे. पण धातुरसात कर्ब मिसळला तर कठीण असे पोलाद तयार होते असे लक्षात आले. बैलगाडीच्या चाकांना लोखंडी धाव बनवणे ही फारच मोठी तंत्रकौशल्याची बाब होती. त्यामुळे बैलगाड्यांचे आयुष्य तर वाढलेच मालवाहतुकही सुलभ होत गेली. सिंधु संस्कृतीत लोहाच्या धावा बैलगाड्यांना असत. अशा धावांच्या चाको-याही सापडलेल्या आहेत. पाण्याच्या मोटी, नांदरांचे फाळ, कुदळी, टिकाव, पहारी, खुरपी, घमेली, विळ्या, खिडक्यांचे गज, बांगड्या, प्याले ते थाळ्याही लोहापासून बनू लागल्या.  मानवी जीवनात ही एक मोठी क्रांती होती. मानवी जीवन सुलभ, सुसह्य करण्यात या असंख्य लोहवस्तुंनी हातभार लावला.

युद्धतंत्रातही या शोधाने मोठी क्रांती झाली. सनपुर्व १००० पासून पोलादी तलवारी, बाणांची टोके, चिलखते पोलादापासून बनू लागली. सैन्याची संहार व बचाव क्षमता वाढली. दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते सैन्यासाठी शस्त्रास्त्रे बनवणे हा एक देशव्यापी अवाढव्य उद्योग बनला. लोह वितळवणे ते त्यापासून विविध वस्तु बनवणे हे एक तंत्र कौशल्याचे तसेच कष्टाचे काम. शिवाय धातुज्ञानाची आवश्यकता. सातयाने उष्नतेच्या धगीत रहावे लागण्याची आवश्यकता. यामुळे इसपू १००० पासुनच हा उद्योग परंपरागत बनत गेला. भारतात निर्माण झालेल्या प्राचीन जातींपैकी ही एक जात. अर्थात या जातीत विविध वंशगटांतील लोक आले. व्यवसाय वैविध्यही त्यामुळेच आले.

भारतातील लोहारांनी धातुशास्त्रात जी प्रगती केली तिला तोड नाही. भारताच्त बनणा-या पोलादी तलवारी जगात उच्च दर्जाच्या मानल्या जात. निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत असे. भारतीय तलवारींत न्यनो तंत्रज्ञान वापरले गेले असल्याचे दावे आता होत आहेत. टिपू सुलतानाची तलवार न्यनो तंत्रज्ञानानेच बनवली गेली होती. या सर्व प्रक्रिया लिखित स्वरुपात लिहिल्या न गेल्याने आधुनिक लोहविज्ञानाची मोठीच हानी झाली आहे असे आपल्याला म्हनता येते. परंतु आपापले शोध, तंत्रे पिढ्यानुपिढ्या आपल्याच वंशात जपण्याची आपली पद्धत. त्यामुळे असे होणेही स्वाभाविक होते.

भारतीयांनी अझुन एक क्रांती केली ती म्हनजे लोहभुकटी विज्ञानात घेतलेली झेप. अठराव्या शतकापर्यंत जे तंत्रज्ञान युरोपातही शोधले गेले नव्हते ते तंत्रज्ञान भारतीय लोहारांना चांगलेच माहित होते. याचा आजेही जिताजागता असलेला पुरावा म्हणजे महरौली येथील २३ फुट उंचीचा व सुमारे सहा टन वजनाचा कधीही न गंजनारा लोहस्तंभ. हा स्तंभ सन चवथ्या शतकात निर्माण केला गेला. हा स्तंभ उघड्यावर असूनही का गंजत नाही ही बाब नेहमीच आश्चर्याची मानली गेली आहे. परंतु आधुनिक पावडर मेटालर्जी तज्ञांनी हा स्तंभ लोहभुकटी विज्ञानाने बनला आहे असे सिद्ध केले आहे.

लोखंडाची अत्यंत बारीक भुकटी करुन, त्यात निकेल, तांबे अशा धातुंची पुड काही प्रमाणात मिसळुन मिश्रधातु बनवणे ही पहिली पायरी. पुढची पायरी म्हनजे हे भुकटी मिश्रण साच्यात दाबुन सरासरी वितळबिंदुच्या खालचे म्हणजे ९०० डिग्री तापमान बाहेरुन देणे. या तापमानाला धातुभुकटीचे कण परस्परसंबब्ध होवून अखंड वस्तू मिळते. या तंत्रज्ञानाला आज सिंटरिंग तंत्रज्ञान म्हनतात. याच पद्धतीने क्रमाक्रमाने हा लोहस्तंभ बनवला गेला आहे. यात असलेल्या अगंज धातुकांच्या भुकटीच्या मिश्रनानेच या स्तंभावर आजतागायत गंज चढलेला नाही. पण हे तंत्रज्ञान पुढे फारसे वापरात आलेले दिसत नाही. अपवाद असतीलही, पण त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे मात्र उपलब्ध नाहीत. परंतु आजही पाश्चात्य जग धातुभुकटी विज्ञानाच्या शोधाचे श्रेय भारताला देते हा आपल्या लोहविद्येचा मोठा सन्मानच होय.

पुर्वीचे लोहार किती मोठे साचे बनवू शकत असतील? याचे एक उदाहरण आजही जीवित आहे.

रांचीच्या पश्चिमेला दोनेकशे किलोमीटर अंतरावर टांगीनाथ नांवाचे एक प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे. येथे एक प्रचंड त्रिशुळ असून त्याचे मधले टोक तुटुन पदलेले आहे. या तुकड्याचेच वजन तीन टन आहे. संपुर्ण त्रिशुळाचे वजन वीस टन असावे असा तज्ञांचा कयास आहे. हा त्रिशूल अखंड साच्यातुन बनवला गेला आहे. अवघ्या जगात असे लोहकामाचे उदाहरण नाही. हा त्रिशुळ किमान दीड हजार वर्ष एवढा जुना आहे. वीस टनी त्रिशूळ बनवायला केवढा मोठा साचा तयार करावा लागला असेल व त्यासाठी नेमके कसे तंत्रज्ञान विकसीत केले गेले असेल याची आज आपण फक्त कल्पनाच करु शकतो.

थोडक्यात भारतातील लोहारांनी धातु विज्ञानात अद्भुत प्रगती साधली होती. बिल ड्युरांटने "द स्टोरी ओफ सिविलायजेशन" या ग्रंथात भारतीयांनी कास्ट आयर्न बाबत भारतीयांनी केलेल्या प्रगतीचे कौतुक केले असून पाश्चात्य जग भारतीयांपेक्षा किती मागासलेले होते याचे विस्तृत वर्णन करून ठेवले आहे.

 भारतात एखादा व्यवसाय वंशपरंपरागत बनला कि त्याची जात बनते हे एक ऐतिहासिक वास्तव आहे. लोहार हीही एक जात बनणे स्वाभाविकच होते. भारतात सुरुवातीला ज्या अल्पशा जाती बनल्या त्या आद्य जातींपैकी लोहार ही जात होय. प्रदेशनिहाय भाषाभेदांमुळे व व्यवसाय वैशिष्ट्यांमुळे लोहार समाजात विविध पोटभेद पडत गेले. रिश्ले हा मानववंशशास्त्रज्ञ म्हणतो कि भारतातील लोहार हे वेगवेगळ्या वंशगटांतुन आलेले आहेत. त्यामुळेच कि काय देवदेवता, विवाह चालीरिती, धर्मश्रद्धा यांत फरक आढळतो. प्रदेशनिहाय नांवेही वेगळी आहेत. उदा. कन्नड लोहारांना कम्मार म्हणतात, कोकणी लोहारांना धावड तर बिहारमद्धे बढई म्हणतात.

राजस्थानातुन महाराष्ट्रात आलेल्या गाडी लोहारांची कथाही अद्भुत आहे. गाडीलोहार म्हनजे फिरस्ते लोहार. हत्यारे बनवून बैलगाडीतुन हिंडुन ती विकणारे वा स्थानिक गरजांप्रमाने ती बनवून देणारी ही एक पोटजात. हे मुळचे राजस्थानी. सन १५६८ मद्ध्ये अकबराने चितोड काबीज केले. गाडी लोहारांना या घटनेचे प्रचंड दु:ख झाले व त्यांनी राजस्थान सोडुन जायचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी पाच प्रतिज्ञा केल्या त्या अशा...१. कुठेही स्थाईक वस्ती करायची नाही, २) छपराखाली रहायचे नाही, ३) विहिरीतुन दोराने पाणी काढायचे नाही, 4) दिवा लावायचा नाही आणि ५) खाटेवर झोपायचे नाही. नंतर चारशे वर्षांनी स्वातंत्र्यानंतरच या स्वाभिमानी गाडी लोहारांचा राजस्थान प्रवेश समारंभपुर्वक झाला...पंतप्रधान पं नेहरु या समारंभाला आवर्जुन उपस्थित होते.

महाराष्ट्रात आजमितीला जवळपास २० लाख लोहार समाजाचे लोक राहतात. हा समाज खेडोपाडी विखुरलेला असून जवळपास पाच पोटजातींत हा समाज विखुरलेला आहे. या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व शुण्य असून औद्योगिकरणानंतर तर हा व्यवसायही जवळपास संपला आहे. मोठमोठे उद्योग अगदी टिकाव-घमेलीही बनवू लागल्याने यांची गरजच संपवली गेली. खरे तर शासनाने या परंपरागत उद्योगाला संजीवनी देत औद्योगिकिकरणात सामाविष्ट करून घेत त्यांच्या पारंपारिक कौशल्यांचा उपयोग करुन घ्यायला हवा होता. अजुनही वेळ गेलेली नाही असे लोहार समाजाचे नेते श्री दिलीप थोरात मानतात. पोटजातींतील विभेद संपवण्याचे प्रयत्नही मोठ्या प्रमानावर होत आहेत. हे खरे असले तरी शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण व आर्थिक दारिद्र्य हा या समाजासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. पदवीधरांची अजुनही या समाजात मोठ्या प्रमाणावर वानवा आहे. भारतात लोहयुग अवतरवत जनजीवन सक्षम आणि समृद्ध करनारा हा समाज आज अस्तित्वहीण झालेला आहे. या समाजाचे आर्थिक उत्थान करता येणे सरकारला अशक्य नाही. त्यासाठी लोहार समाजाच्या पारंपारिक व्यवसायाला आधुनिक बनवण्यासाठी तांत्रिक व अर्थसहाय्य उपलब्ध करून देत विक्री यंत्रणा निर्माण करुन दिली तर आजही हा उद्योग काही प्रमानात का होईना उभारी धरु शकतो व आजही खेडोपाडी जे लोहारकामावरच कसाबसा तग धरुन आहेत त्यांना उत्पन्नाचे साधन मिळु शकते. अनेक लोहवस्तु आजही कारखान्यांत बनत नाहीत पण त्यांची गरज असते. अशा वस्तु-उत्पादनापुरता तरी या समाजाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होवू शकतो. एके काळी मुंबईतील लोहार चाळ ही दैनंदिन उपयोगाच्या कलात्मक लोहवस्तुंसाठी प्रसिद्ध होती. आता तिचे नांव तेच राहिले पण उत्पादने भलतीच विकली जातात. पण यातुन घेता येईल तो धडा हा कि लोहवस्तुंची अनेक विक्रीकेंद्रे काढता येणे सहज शक्य आहे. हस्तोद्योग, खादी-ग्रामोद्योग केंद्रांप्रमानेच लोहवस्तु केंद्रेही बनवता येणे अशक्य नाही. पण त्यासाठी हवी शासनाची संवेदनशीलता. सर्व समाजघटकांचे खरे कल्याण घडवण्याची तळमळ!

एखादा समाज अत्यल्पसंख्य आहे, राजकीय प्रतिनिधित्व नाही म्हणुन त्या समाजाला पुर्ण दुर्लक्षीत ठेवायचे असले निंद्य कृत्य शासनाकडुन व सर्वच समाजांकडुन होवू नये हीच अपेक्षा.

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

5 comments:

  1. दै. लोकसत्तामध्ये महात्मा फुले यांच्या विषयी अवमानकारक छापून आले आहे. अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर याविषयी एक लेखही दिसत आहे. लोकसत्तेतील लेखाची लिन्क अशी : http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=251553:-lokrangexpressindiacom-&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117

    ReplyDelete
    Replies
    1. निषेध...निषेध...महात्मा फुलेंची नालस्ती करना-या लोकसत्ता आणि असलेकरांनी तात्काळ माफी मागावी!

      Delete
    2. महात्मा फुले यांची बदनामी करणारे प्रशांत असलेकर यांचे जाहीर व तीव्र निषेध...

      प्रशांत असलेकर व दैनिक लोकसत्ता'ने माफी मागावी.

      Delete
  2. ह्या भटूकल्यांच्या हातात जोपर्यंत मिडीयाच्या नाड्या आहेत तोपर्यंत असेच होत राहणार.

    ReplyDelete
  3. Kasar samaja cha itihas mahit asel tr nakki post kara
    v mala email kara pritamsalvis@gmail.com

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...