(या कादंबरीचे प्रा. हरी नरके यांनी केलेले परिक्षण "देशोन्नती" मध्ये दिनांक २६ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाले होते! तो लेख इथे आहे तसा देत आहे. )
असूरवेद, संजय सोनवणी आणि समाजदर्शन
संजय सोनवणी हे मराठीतील ताज्या दमाचे प्रतीभवान साहित्यकार आहेत. त्यांनी विविध वाड:मय प्रकार हाताळले असून, दर्जेदार वैचारिक पाया आणि खोलवरचे सामाजिक भान यांच्यामुळे त्यांचे लेखन लक्षवेधी ठरले आहे. 'असुरवेद' ही त्यांची भारत बुक हाउसने प्रकाशित केलेली नवी कादंबरी म्हणजे आजवरच्या सर्व सांस्कृतिक श्रद्धा उध्वस्त करणारी स्फोटक थरार कथा आहे. एकूण वेद चार आहेत अशी लोकसमजूत आहे. तथापि जागतिक कीर्तीचे विद्वान प्रो. एफ. म्याक्सम्युलर यांच्या "हाइम्स ऑफ अथर्व वेद" महाग्रंथात त्यांनी आठ वेद असून; असुरवेद, सर्पवेद, गंधर्ववेद आणि पिशाच्चवेद असे आणखी चार वेद आहेत अस्तित्वात होते हे दाखवून दिलेले आहे. भारताचा सांस्कृतिक इतिहास जसा सांगितला जातो, तसा तो नाही, त्यात फार मोठी झाकपाक आहे , दडवादडवी आहे. आणि हे अनेक संशोधकांनी सप्रमाण मांडलेले आहे.
यज्ञधर्मीय (वैदिक) हे मुळचे असुर समाजातील होते. जातीयता हा संपूर्ण भारतीय समाजाला पोखरणारा रोग आहे. धार्मिक वर्चस्वासाठी धर्मात विकृती निर्माण करण्यात आल्या. 'असूरवेद' ही असुर लोकांची महान निर्मिती होती. त्याला अथर्ववेदाच्या गोपथ ब्राह्मणात अथर्ववेदाचा उपवेद असे म्हटलेले आहे. इसवी सनापूर्वी सुमारे २,८०० वर्षापूर्वी तो लिहिला गेला असावा. सुरेश जोशी या इतिहास संशोधकाला त्याच्या जुनाट हस्तलिखिताची कोणत्याही क्षणी तुकडे पडतील इतके जीर्ण झालेल्या भूर्ज पत्रावरची प्रत मिळते. जोशी हे एका विद्यापीठाचे पुरातन-इतिहास विभागाचे प्रमुख असतात. ब्राह्मी लिपीतल्या पैशाची भाषेतील या वेदाचे हस्तलिखित नष्ट केले जाइल या भीतीने ते हा ठेवा सुरक्षित ठेवण्यासाठी त्याची स्कॅन प्रत इन्टरनेटवर टाकतात. पुढे त्यांचा खून होतो. त्यांच्या मुलाची हत्या होते. त्यांची कन्या सायली हि प्रसन्नतेचा अनंत शिडकावा करणारे मेधावी व्यक्तिमत्व असते. ती "वैष्णविझम and इट्स इम्प्याक्ट ऑन सोशल कॉन्शस्नेस" या विषयावर पी. एच. डी.चे संशोधन करीत असते. त्यासाठी ती तिरुपती बालाजी, पंढरपूर अशा ठिकाणी प्रवास करीत असते. त्या प्रवासात तिची गौतम कांबळेशी ओळख होते. तोही पी. एच. डी करीत असतो. भारतीय धर्मेतिहासावर त्याचे काम चालू असते. पुंडरीकाची समाधी, द्विभुज विठ्ठल, मल्लिकार्जुन, दिंडीरव, लखुबाई उर्फ रखमाई या सार्यातून त्याच्यापुढे काही प्रश्न निर्माण झालेले असतात. विठ्ठल लोकजनांचा लोकदेव होता, कि आणखी काहि ? पौन्ड्रिक, पुंडरिक, पांडुरंग असा प्रवास असावा काय ? पुंडलिकाची समाधी म्हणजे शिवालय आहे काय ? विठ्ठलाच्या मूर्तीवर ( छातीवर ) कुटमंत्र नाही आणि मस्तकावर शिवलिंग नाही. टोपालाच शिवलिंग समजावे अशी प्रथा आहे. मूळ मूर्ती माढ्याच्या विठ्ठलासारखी होती, असे डॉ. रा.चि. ढेरे यांचे मत आहे. हरी-हर ऐक्य साधण्यासाठी हे पांडुरंग महात्म्य तयार करण्यात आले काय ? अशा विविध प्रश्नांची ते चर्चा करतात. इतक्यात सायलीला तिच्या इतिहासकार वडिलांचा खून झाल्याचे समजते. ती तत्काळ गावी पोचते. तिचा मोठा भाऊ अमेरिकेतून निघालेला असतो. त्याच्यावरही विमानतळावर प्राणघातक हल्ला होतो. तिच्या दुसर्या भावाला हार्ट अट्याक येतो. कोण असतात खुनी ? ते का हल्ला करतात ? असुरवेदाचे हस्तलिखित पळवून नष्ट करण्याच्या प्रयत्नात काही वर्चस्ववादी संघटना असतात? त्यांना यश मिळते काय, सायली ही जोशींची धीराची मुलगी. गौतमच्या सहाय्याने वडिलांच्या खुन्यांचा शोध घेत राहते. प्राचीन मूर्तीच्या तस्करीतून जोशींची हत्या झ्याल्याची अफवा पोलीसामार्फ़त पसरवली जाते. पेपरब्याक मधील २८४ पानांची हि थरारकथा वाचकांना खिळवून टाकते. एकदा हातात घेतल्यावर वाचून पूर्ण होईपर्यंत थांबता येत नाही अशी विलक्षण वेगवान कथा आहे. प्रवाही भाषा आहे. बौद्ध नायक आणि ब्राह्मण नायिका त्यांच्या शोधातून शेवटी काय बाहेर येते ? चित्र शैलीतील हि मूळ कादंबरी वाचूनच समजून घेतलेले बरे !
मराठीत दर्जेदार वैचारिक लेखन आहे, ज्येष्ठ प्रतीचे ललित लेखन आहे, या दोहोंचा मेळ घालणारेही काही प्रयत्न या कादंबरीत झालेले आहेत. संजय सोनवणी यांची हि कादंबरी म्हणजे वाचनीयता, वैचारिकता, व्यामिश्र, समाजचित्रण आणि भारतीय जातीयतेची पाळेमुळे यांना गवसणी घालण्याचा लक्षणीय प्रयत्न आहे. त्यांचा हा प्रयत्न उपेक्षित राहायचा नसेल, वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे. कारण तो असुरवेद लोकांसमोर येऊ नये अशीच प्रस्थापिकांची इच्छा होती. त्याच्या अस्तित्वाने त्यांची आसने गडगडणार होती. तो मातीत गाडला तरच ती शाबूत राहणार होती. पिढ्यानपिढ्याचा दंभ अबाधित राहणार होता; मात्र तसं घडणार नव्हत ! "सत्य काही काळ दडपता येत, सर्वकाळ नाही " या सार्वकाल्पनिक नियमान सत्याच दर्शन होताच भयाकुळ झालेल्या प्रस्थापितांच्या हडकंपाची धारधार कहाणी म्हणजे "असुरवेद" आहे ! रहस्य कथेला तत्वज्ञान आणि विचारधारेची नवी उंची देणारी मराठीतील हि महत्वाची कादंबरी आहे. -----
भारत बुक हॉउस १७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे ४११०३० (फोन ९८५०७८४२४६/०२०-३२५४९०३२) कडून मागवून अवघ्या ९५ रुपये किमतीची हि कादंबरी प्रत्येकाने वाचावी आणि संग्रही ठेवावी अशीच आहे. कल्पित आणि वास्तव यांचे भन्नाट रसायन या कादंबरीत आहे. संजय सोनवणी यांचे व्यक्तिचित्रण ठसठसित आहे. सामाजिक वास्तवाचे अनेक पदर त्यांनी चिमटीत पकडून उलगडून दाखवले आहेत.
प्रा. हरी नरके , महात्मा फुले अध्यासन, पुणे विद्यापीठ, पुणे-४११००७.