Wednesday, March 5, 2014

ज्ञान म्हणजे काय? (१)


ज्ञान म्हणजे माहिती, माहितीचे संहितीकरण, आत्मसातीकरण, स्वानुभुती आणि तिचे एकुणातील प्रकटन अशी सर्वसाधारण व्याख्या करता येईल. असे असले तरी नेमके ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञानाची पुर्णावस्था मानसाला गाठता येवू शकते काय हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. ज्ञानाची केवळ संकल्पनात्मक व्याख्या करता येणार नाही. यासाठी आपण वरील व्याखेत नमूद केलेले घटक विचारांत घेऊ.

जन्मता:च कोणी ज्ञानी नसतो. संस्कारात्मक माहिती, शिक्षनातून व अन्य अनुभवादि स्त्रोतांतून येणारी माहिती ही कोणाचीही पहिली पायरी असते. असे असले तरी "जन्मजात ज्ञानी" या संकल्पनेचा प्रभाव अध्यात्मवाद्यांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमानावर दिसतो. अवतार ही कल्पना याच संकल्पनेची उपज आहे. अमूक कोणी खुद्द परमेश्वराचाच अवतार असल्याने त्याला सर्वच माहित असतेच कारण तोच निर्माता आहे त्यामुळे त्याचे जन्मत:च ज्ञानी असणे स्वाभाविक आहे असा समज धार्मिक बाळगत असतात, श्रद्धाही ठेवत असतात. कारण हीसुद्धा त्यांच्या दृष्टीने "माहिती" असते. आणि या माहितीवर त्यांची श्रद्धा असते. ज्ञानामद्धे श्रद्धेचे तत्व नसावे असे नितीविद जरी म्हनत असले तरी अंतत: जेही काही "ज्ञान" म्हणून पदरात पडते ते "ज्ञान" आहे यावर श्रद्धा/विश्वास असल्याखेरीज ते ज्ञान कसे हाही प्रश्न उपस्थित होतो. जर अमुक माहित होणे म्हनजे ज्ञान आहे कि नाही याबाबत साशंकता असेल तर ज्ञानाच्याच अस्तित्वावर गदा येणार नाही काय? म्हनजेच ज्ञानाच्या अस्तित्वावर किंवा जे ज्ञात झालेले आहे त्यावर विश्वास श्रद्धा एकार्थाने अपरिहार्य होत जातात. पण ते तसे खरेच असते काय?

आपल्यावर विविध प्रकारची माहिती आदळत असते. किंबहुना वर्तमान काळात आपण माहितीच्या गोंगाटात जगत आहोत असा आपला अनुभव आहे. माहितीची संसाधने प्रचंड प्रमानात वाढली आहेत. पण या माहित्यांची सत्यासत्यता थोडावेळ दूर ठेवून असा विचार करुयात कि आपण व्यक्तीपरत्वे कोणत्या माहितीत रस घेतो? कोणती माहिती घेतो? अर्थात हे व्यक्तीगत कुतुहल, आवड आणि गरज यावर अवलंबून असेल हे उघड आहे. हे कसे ठरते? म्हणजे आपल्याला अमुकचीच आवड का आणि तमुकचीच का नाही हे आपण कसे ठरवतो?

नैसर्गिक निवड हे तत्व येथे कामाला येते काय? म्हणजे आवडी-निवडी या नैसर्गिक असून त्याच माणसाचा माहिती घेण्यातील एकुणातील कल ठरवतात असे वरकरणी जरी म्हनता आले तरी सामाजिक-सांस्कृतिक संस्कारही यात मोठा हातभार लावतात हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे मनुष्य निसर्गत: जसा जन्माला आला तो समाजात वाढतांना तसाच रहात नाही. कारण त्याच्यासमोर त्याच्या वर्तमानात अस्तित्वात असलेले विषय, तत्संबंधीची माहिती आणि तत्सबंधी समाजातच एकुनात असलेले कुतुहल अथवा अनास्था याचा त्यावर परिणाम होतो कि नाही? अनेकांच्या बाबतीत तो सर्वस्वी तर काहींच्या बाबतीत तो काही प्रमानात होतो असे म्हनावे लागेल. कारण समाजाच्या धारणांच्या सहास्तित्वात आणि त्या-त्या समाजाला त्या-त्या काळाच्या चौकटीच्या व माहितीच्याही मर्यादा त्याचे कुतुहलाचे विषय बदलू शकतात असे म्हनावे लागेल. म्हनजेच नैसर्गिक निवडीचे तत्वही सापेक्ष आहे.

आता मनुष्य माहितींच्या रेट्यात माहितीचे (आवडीच्या क्षेत्रातीलही) आकलन कसे करतो हा एक प्रश्न आहे. माहिती ही निरपेक्ष आणि निखळ कोरडी बाब नसते तर ती ज्या स्त्रोतांतुन येते त्या-त्या स्त्रोतांच्या आकलनाचे रंग त्या माहितीला लागलेले असतात हेही लक्षात घ्यायला हवे. कोणतीही माहिती सर्वस्वी निरपेक्ष स्त्रोतातून मिळत नाही हे आपण विश्वकोशांतील कोरड्या वाटना-या माहितीबद्दलही म्हणू शकतो. म्हणजे येणारी माहिती ही सर्वस्वी निर्लिप्त असत नाही.

मग मनुष्य येणा-या माहितीचे काय करतो? ज्ञानाची पुढील पायरी म्हणजे माहितीचे संहितीकरण. हे संहितीकरण मानसिक असते. म्हणजे मिळणा-या माहितीचे तो आपापल्या वकुबानुसार पृथक्करन करीत त्याची क्रमवारी ठरवत असतो. त्यातील कच्चे दुवे, ते दुवे जुळवण्यासाठी अधिकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे अथवा चिंतनातून त्याची जुळवणी करणे ही पुढची पायरी आहे असे आपल्याला वरील व्याख्या सुचवते. किंबहुना माहितीचे ज्ञानात रुपांतर करण्यातील ही महत्वाची पायरी आहे. एकाच प्रकारची माहिती वेगवेगळे लोक घेत असले तरी ही पुढील पायरीच प्रत्येकाचे व्यक्तीसापेक्ष संहितीकरण करनार असल्याने दोन व्यक्तींचे समान विषयातील, समान माहितीवरचे आकलन (पाठांतराधारित शालेय नव्हे) वेगळे होत जाते. उदा. एकाच गीतेचे आदी शंकराचार्य, ज्ञानेश्वर, महात्मा गांधी आणि टिळकांचे आकलन भिन्न आहे हे आपल्याला माहितच आहे. हे मानसिक संहितीकरण/आकलन भिन्न असेल तर मग ज्ञानाचे स्थान काय राहते आणि ज्ञानाचे व्यक्तीपरत्वे भिन्न असणे हाच ज्ञानाचा पाया आहे काय हाही ज्ञानाच्या क्षेत्रातील सैद्धांतिक प्रश्न आहे असे आपल्याला म्हनावे लागेल.

माहितीची ज्ञानात्मक अनुभुती ही जशी मानसिक बाब आहे तशीच ती भौतिकही आहे. सुर्याभोवती पृथ्वी फिरते या तत्कालीन ज्ञानाला आव्हान देत ते तसे नसून त्याच्या अगदी उलट, म्हनजे पृथ्वीच सुर्याभोवती फिरते, असे आहे. ही सर्वस्वी नवी माहिती आहे जी जुन्या माहितीला आव्हान देते, त्याज्ज्य ठरवते. ही माहिती गतकालातील काही विद्वानांना कशी झाली? या माहितीचा प्रत्यक्षानुभव घेण्याची कसलीही सोय नसतांना? तर्क, गणित आणि कुतुहल या तीन बाबींच्या एकत्रीकरनातून ही नवीन माहिती समोर आली असे म्हणता येईल. प्रश्न पडणे, कुतुहल निर्माण होणे आणि त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी उपलब्ध माहिती आणि साधने वापरणे यातून ज्ञान पुढे जाते असे म्हनता येईल...पण तरीही त्याला सर्वस्वी "ज्ञान" हा शब्द सर्वकशपणे वापरता येईल का?

जे पुर्ण नाही ते ज्ञान कसे असू शकेल हा प्रश्न येथे उपस्थित होऊ शकतो. येथे आपल्याला सोक्रेटिसच्या "मला काहीच ज्ञान नाही याचे ज्ञान होणे म्हणजे ज्ञान..." या जगविख्यात उक्तीची आठवण होणे स्वाभाविक आहे. भारतात एके काळी अज्ञानवादी पंथ होता. भगवान महावीरांनी या पंथाचे वर्नण करुन ठेवल्याने या पुरातन पंथाची आपल्याला माहिती होते. या पंथाची विचारसरणी अशी होती कि दोन व्यक्तींचे ज्ञान भिन्न असू शकते, दोन व्यक्तींनी ज्ञानविषयक चर्चा/वाद केले कि मने कलुषित होतात, ज्ञानामुळे इच्छा उत्पन्न होतात आणि त्यातून जी कर्मे घडतात त्यातुन दु:खच वाढते आणि त्याचे निराकरण ज्ञान करू शकत नाही, पुन्हा खरे ज्ञान कोनते हा प्रश्न शिल्लक राहतोच, म्हणून मुमुक्षूने ज्ञान मिळवायच्या फंदात पडू नये...! (या अज्ञानवादाचे भारतात ६७ उपपंथ होते ही बाबही लक्षणीय आहे. त्यावर वेगळा विचार करावा लागेल)

म्हणजेच ज्ञान आणि ज्ञानाची उपलब्धी व त्याची व्याप्ती याबाबत पुर्वीही खूप चिंतन झाले आहे हे उघड आहे. पण आपल्या चर्चेचा तो विषय नसून ज्ञानाचा नेमका अर्थ समजावून घेणे हा आहे.

तर आपण ज्ञान हे सर्वकश/सर्वव्यापी असे असते काय यावर चर्चा करत होतो. माहितीची जमावट, आकलन, पृथ:क्करन, संहितीकरन आणि प्रकटीकरण या बाबी ज्ञानाकडे जाणाच्या पाय-या आहेत, ज्ञान नव्हे असे म्हनावे लागते. कारण संपुर्ण मानवी समाजाच्या उपलब्ध माहितीचे कितीही अंगाने पृथक्करन केले तरी हरेक क्षणी माहितीत होत जानारी वाढ पाहता ज्ञानाकडे जाणा-या पाय-या वाढत आहेत आणि ज्ञान हुलकावनी देत आहे असे आपल्याला दिसून येईल. कोणतीही ज्ञानशाखा सर्वस्वी परिपुर्ण आहे असे विधान आपल्याला करता येत नाही. शिवाय निखळ ज्ञान आणि उपयुक्ततावीदी ज्ञानांचीही सीमारेखा समजावून घ्यावी लागेल. विगतातील सर्वज्ञ, अंतिम ज्ञान, ज्ञाता, अवतार वगैरे बाबी या निव्वळ समजुती असून माणसाने प्रश्नांना न भिडण्यासाठी, कुतुहल शमवण्याचे प्रयत्न न करण्यासाठी निवडलेली एक अंधश्रद्ध पळवाट आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.

पुढील भागात ज्ञानाचे अन्य पैलूही आपण तपासून पाहुयात.

(Pls click here to read next part: http://sanjaysonawani.blogspot.in/2014/03/blog-post_6.html

8 comments:

  1. भगवद्गीता या महाग्रंथाबद्दल मला समजलेले काही वास्तव
    येथे… http://goo.gl/6LLgQP

    ReplyDelete
  2. आणि आपला लेख खरच खूप प्रशंसनीय आहे…

    ReplyDelete
  3. आप्पा - संजय सोनवणी, मार दिया !
    बाप्पा - अरे फोनवर बोलतो आहेस तर नीट बोल नां रे
    आप्पा - अरे फोन वर " नीट " म्हणजे काय ?संजय सराना लावत होतो फोन !
    बाप्पा - शेरोशायरी+ " मार डाला " वगैरे काय ? इतका का बर कौतुक करून राहिला आहे बे?
    संजय ला सवय नाही कौतुक करून घेण्याची ! तो आपला मुरारबाजी सारखा दोन्ही हातात शाब्दिक तलवारी घेऊन स्वतःशी शैव,वैदिक ,मोहन्जोदारो,असे पुटपुटत स्वतः भोवती गरागरा भिरभिरत असतो
    बाप्पा - पण आज बघ ना !किती म्हणजे किती सुंदर विषय आणि किती छान मांडणी झाली आहे
    आणि रिएक्शन देताना किती विचार करावा लागणार आहे सर्वाना बघशीलच आता !
    आप्पा - काही काही लोकाना सवयच झाली आहे ना , त्यांची चांगलीच कुचंबणा होणार आहे !
    बाप्पा -सवय म्हणजे ब्राह्मणाना बदमान करायची असेच ना ?
    आप्पा - हो ना , हुश्श्श ,निदान या विषयात तरी तास काही होणार नाही ,
    बाप्पा - आजकालच्या जाहिरातीच्या युगात इतके प्रकार इतक्या प्रकारे कानावर आदळत असतात की यातली जाहिरात कोणती आणि माहिती कोणती तेच समजत नाही !
    आप्पा - ज्ञानाच्या नावाखाली वाट्टेल ते चालू असते य़ोगाची जर दुकाने उघडतात,तर असे होणारच
    बाप्पा - भगवे कपडे आणि कमंडलू सुद्धा हल्ली जोरात आहेत !
    आप्पा - जमा झालेल्या माहितीचे आपण आपल्या विवेकाच्या आधारे विश्लेषण करत असतो आणि माझे ज्ञान हे तुला मान्य होईलच असे सांगता येत नाही
    बाप्पा - मला संगीतातली ओढच नसेल किंवा त्या बद्दलचे ज्ञान हि मला अडगळच वाटणार !
    आप्पा - मलातर भीती वाटते की ज्या वेगाने आपले सुगम संगीत सिनेमा संगीत बदलत आहे त्यामुळे अजून २०-३० वर्षांनी लता मंगेशकर ही हास्यास्पद गायिका ठरू शकते अशी भीती वाटू लागते
    बाप्पा - पुढच्या पिढीचा ज्ञानाचा रेफ़रन्स पॉइन्ट काय असेल आणि आदर्श काय असतील, आस्वाद घेण्याची भूमिका आणि बैठक काय असेल काहीच समजत नाही
    आप्पा - हि समस्या फारच जातील आहे हा जनरेशन ग्याप चा नुसता प्रश्न नाही !इथे जीवन मूल्यांचा पण प्रश्न येतो,आदर्शांचा पण प्रश्न येतो !
    बाप्पा - अलोपाथिचे डॉक्टर होमिओपाथि मानतच नाहीत म्हणजेच ते ज्ञान ते मानतच नाहीत नाही का ?त्याला बौद्धिक मान्यता म्हणता येईल !
    आप्पा - म्हणजेच अशा बऱ्याच मान्यता + भावनिक , बौद्धिक ,मानसिक आपण घेत जात जात आपली ज्ञानाची कक्षा रुंदावत असतो !
    त्यात भौगोलिक आणि धार्मिक , सांस्कृतिक छटाही महत्वाचा तोल सांभाळत आपले ज्ञान परिपूर्ण करत जातात ,पण संजय सर म्हणतात ते खरच किती सत्य आहे नाही का ?
    बाप्पा - हेच ना की , ज्ञान कधी परिपूर्ण होते का ? असेच ना ?ते अपडेट होत असते - निरंतर !
    आप्पा - ज्ञान आणि माहिती ही गमतीदार गुंफण आहे किंवा गुंता आहे म्हण ना !
    बाप्पा - संजय सरांचे या विषयावर अजून भरपूर ऐकायला आवडेल
    आप्पा - मग लाव ना तसा फोन संजय सोनवणी ना आणि सांग !
    बाप्पा - त्याना म्हणाव जरा इ स १००० च्या पुढून घ्या गाडी ,अगदी मोहोन्जो दारो नको , खूप दमछाक होते म्हणाव
    आप्पा - रागावतील बर का आपले संजय सर !मला पुढे करून त्यांची फिरकी घेऊ नकोस ! ते पण चांगले तयार आहेत ! कशी तुझी फिरकी घेतील कळणारही नाही !

    ReplyDelete
  4. संजय सर ,
    नमस्कार ,
    हा विषय निवडून आपण एक शिवधनुष्यच उचलण्याचा पण केलेला आहे !
    अतिशय सुंदर मांडणी झाली आहे निरुपण अगदी टप्प्या टप्प्याने आणि अंतर्मुख करणारे झाले आहे
    पूर्वी कीर्तन उभे राहिले आणि पूर्वरंग सुरु झाला की उत्तररंगापुर्वी कीर्तनकाराच्या पाया पडत असत तसे आपल्या पाया पडावेसे वाटते आहे !
    आपण वचन दिल्या प्रमाणे हा विषय पुढच्या काही लेखांनी खुलून येउ दे आणि आम्हा सर्वाना त्यात मनसोक्त भाग घेता येउदे ! ज्ञानाचा एक पूरच येऊ दे आणि आमची सर्वाची मने त्यात ओथंबून न्हाऊ देत अशी इच्छा आहे !
    आपण खांबाला टेकून सांगत रहा आणि आम्ही सच्चिदानंद बाबाचे काम आवडीने करू !
    आपल्याकडे अंतिम सत्य आणि अंतिम ज्ञान याला सर्वश्रेष्ठ ज्ञान मानले जाते पण तरीही सर्वसामान्य भौतिक जीवन जगत असताना अनेक शाखातून अनेक प्रकारचे ज्ञान गोळा होत असते

    मी आर्कीटेक्ट असल्यामुळे ऐतिहासिक अभ्यासात आम्हास पिरामिड आणि झीगुरट , तसेच ग्रीक आणि रोमन असे बरेच अभ्यासता आले , पण अशी माहिती म्हणजे ज्ञान म्हणता येईल का ?भौतिक शास्त्रे आणि त्याचा अभ्यास , कला आणि त्यांचा अभ्यास , यात माहितीचा भाग किती आणि ज्ञान किती यामुळे गोंधळ होत होता पण आपण समर्थपणे अति सुलभतेने हा गुंता सोडवला आहे त्यामुळे अजून आपले हे निवेदन चांगले अखंडपणे आम्हास वाचायचा योग यावा हि नम्र विनंती

    आम्हास मान्य आहे की आपल्या प्राधान्याच्या यादीत या विषयाला ठराविकच महत्व असेल ,पण आपली इतिहासाची आवड लक्षात घेता आपण असेच सलग या विषयावर लिहित जावे असे नम्रपणे सुचवतो आणि थांबतो !
    या लेखांच्या प्रतिक्रियेत आपण कठोरपणे एडिटिंग करत अवाजवी प्रतिक्रिया कठोरपणे कात्री लावून दूर ठेवल्यात तर या लेखांचा गंभीरपणा अबाधित राहील असे वाटते .

    ReplyDelete
  5. आप्पा-बाप्पा, आगाशे सर, खूप खूप आभार. असेच प्रोत्साहन देत रहा.

    ReplyDelete
  6. ज्ञान, कर्म, भक्ती

    - कमलाकर देसले

    श्रीमद्भगवतगीतेने ज्ञान , कर्म , भक्ती असे मुक्तीचे मुख्य तीन मार्ग सांगितले आहेत. प्रत्येक व्यक्ती सर्वार्थाने एक दुसऱ्यापेक्षा भिन्न व स्वतंत्र आहे. प्रत्येकाचे आवडीचे , आकर्षणाचे , अभ्यासाचे व कर्माचे क्षेत्र भिन्न आहे ; पण प्रत्येकाची सुखाची किंवा आनंदाची भूक मात्र एक आहे. सर्वांची वर्गवारी करायची , तर ती ज्ञानसाधक , कर्मसाधक व भक्त अशी करता येईल.

    आपले आस्तित्व पाण्याच्या थेंबासारखेच असते. प्रत्येक थेंब स्वतंत्र असतो हे खरे ; पण मिटून जाण्याचा एक गुण प्रत्येक थेंबात समान असतो. प्रत्येक थेंबाची जागा वेगळी असते. म्हणजे असे की , पावसाचे काही थेंब झाडांच्या पाना-फुलांवर चमकतात. काही टपोरे थेंब आभाळातून काळ्याभोर शिवारात पडतात. काही खडकावर कोसळतात. तर काही थेट सागरातच. अजूनही अनेक ठिकाणी पाण्याच्या थेंबांचा संचार आणि संसार चालू असतो. प्रत्येक साधक पाण्याच्या थेंबासारखा आहे. प्रत्येक साधकाची दु:खमुक्तीची आणि परमसुखाच्या प्राप्तीची भूक सारखी आहे. मात्र प्रत्येकाचा स्वभाव आणि साधनाभूमी वेगवेगळी आहे.

    काही साधक हे शेतात पडणाऱ्या पावसाच्या थेंबासारखे असतात. शेतात , मातीत पडणाऱ्या थेंबाची गती काय ? मातीत मिळून-मिसळून जाणे. मातीतील बीजाला ओलावा , गारवा देणे. त्याला अंकुरायला मदत करणे. जीवनाच्या प्रवाहाला गतीशील ठेवणे आणि सृष्टीच्या या विशाल निरपेक्ष कर्माचा एक भाग होणे. हाच या थेंबाचा स्वभाव आणि पूर्णता. कर्मयोगी साधकांचाही कर्मशीलता हाच श्वास , स्वभाव आणि आनंद असतो. कर्म हाच त्याचा श्रीराम आणि विश्राम असतो.

    काही साधक हे खडकावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबासारखे असतात. अशा थेंबांची गती काय ? खडकाची , वाळूची एक अंगभूत उष्णता असते. त्यावर पडणाऱ्या थेंबात ही उष्णता जिरवण्याची , पिण्याची आणि पचविण्याची स्वाभाविक क्षमता असते. ती उष्णता पिताना स्वत:ला वाफाळून घेणे आणि महाकाय आकाशात आपले चिमुकले अस्तित्व हरवून आकाशच होऊन जाणे. ज्ञानयोग्याची साधना अशीच असते. ज्ञान म्हणजे प्रकाश. ज्ञान तप्त असते. ज्ञानसाधक हा ज्ञानसाधनेच्या तपाने तप्त होऊन व्यापक परमात्म सत्तेशी एकरूप होतो. हाच ज्ञानयोग.

    कधी कधी पाऊस थेट समुद्रात पडतो. पडताना थेंबांचे अस्तित्व स्वतंत्र आणि क्षुद्र असते ; पण सागरावर पडताना पावसाच्या थेंबांना विराट सागरात पडण्याशिवाय दुसरी कुठली गती असणार ? सागरात पडताच थेंबच सागर होतो. भक्ताच्या अंत:करणात अनासक्ती , अकर्तेपणा , समर्पण आणि नम्रतेचा वेग-आवेग असाधारण असतो. भगवंताच्या चरणाशी लीन होण्यात आणि सदा लीन राहण्यात भक्ताची पूर्णता असते. स्वतंत्रपणे न उरणे हा भक्ताचा स्वभाव असतो. मिटण्यातच मुक्ती असते. एवढेच त्याला कळते. हाच भक्तियोग.

    थोडक्यात , विरतो तो ज्ञानयोगी , जिरतो तो कर्मयोगी , सरतो तो भक्त. आपण यापैकी कुणीतरी एक नक्की असतो. ज्यांना हे कळते त्यांची साधना श्रीगुरुकृपेने सिद्ध झाल्याशिवाय राहात नाही.
    .......................................................................................................

    ReplyDelete
  7. शंकराचार्य ज्ञानेश्वर व टिळक यांचे गीतेचे आकलन भिन्न आहे असे आपण म्हटले आहे. टिळकांनी तर आपल्याला शंकराचार्यांचे गीतातात्पर्य मान्य नसल्यानेच आपण गीतारहस्य लिहीत आहो असे म्हटले आहे. ज्ञानदेवांनी काही म्हटले नसले तरी श्लोकांचे अर्थ वेगळे दिले आहेत. असे असले तरी, त्यांचे गीतेचे आकलन वेगळे आहे असे माझ्याच्याने म्हणवत नाही. गीतेचे वेगळे आकलन म्हणजे प्रत्येकाला वेगळे 'ज्ञान' झाले असे होते. ज्ञानाला अनेकवचन नाही कारण ज्ञान एकच आहे. हे बरोबर मानले तर अनेक प्रश्न निर्माण होतील व त्यांची उत्तरे शेवटी 'एका' ज्ञानापाशी पोहोचतील!

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...