Thursday, March 6, 2014

ज्ञान म्हणजे काय? (३)

विश्व कोणत्यातरी एकाच द्रव्यातून बनले. म्हणजे आज जे आपल्याला जेवढी भौतिक अस्तित्वे दिसतात ती एकाच मुलद्रव्यापासून (माझ्या मते अवकाशापासून) बनली असा सध्याचा भौतिकशास्त्राचा सिद्धांत आहे. समजा हे गृहितक घेऊन पुढे गेलो तर सर्व ज्ञानशाखांचे मुलकारण/निर्मितीकारण एकमेवाद्वितिय अशा "ज्ञान" या संकल्पनेत असले पाहिजे, पण जसे विश्वनिर्मितीचे एकमेव मुलद्रव्य कोणते हे आपणास माहित नाही तसेच "ज्ञान" या संकल्पनेचे मुलवास्तव कदाचित अद्याप तरी आपणास माहित झालेले नाही असे म्हणावे लागेल.

माहिती, पृथक्करन, संहितीकरन, सिद्धांतन व प्रकटीकरन हे सध्या आपल्या हातातील ज्ञानाकडे जायचे मार्ग आहेत. सिद्धांतन व प्रकटीकरणाला "ज्ञान" म्हणता येईल का यावर आपण मागील भागात चर्चा केली आहे.

सिद्धांतन हे ज्ञान नसून त्याला आपण "विशिष्ट्ज्ञान" अशी संज्ञा देवु शकतो. म्हणजे एका ज्ञानशाखेतील विश्झिष्ट काळातील ज्ञानाचा एक टप्पा, पण संपुर्ण ज्ञान नव्हे. बरे एकाच क्षेत्रात असे एकाच वेळीस बहुमूख असे अनेक टप्पे असू शकतात. ते परस्परविरोधीही असू शकतात. त्यांतील प्रत्येकाला आव्हानही दिले जावू शकते. नव्हे दिले जातेच. ते आपण प्रत्यही पहात असतो. एका परीने मतांच्या गलबल्यातूनच आपण पुढे जात असतो. असे असते म्हणून ज्ञानाचे टप्पे गाठायचेच नाही असे होऊ शकत नाही.

धर्मवादी ज्ञान हे बंदिस्त असते. किंबहूना विश्वातील सर्वच ज्ञान पुर्वीच्या प्रेषित/धर्मग्रंथ/अवतारांनी सांगुनच ठेवले असल्याने त्याबाहेर काहीही नाही असे बजावण्याचे कार्य धर्मवादी करत असतात. किंबहूना उपलब्ध माहिती व तिच्या सिद्धांतनावर, म्हणजे विशिष्ट-ज्ञानावर जोवर बुद्धीवादी संशय घेतला जात नाही, शंका घेतली जात नाही तोवर नवीन दृष्टीकोनातून नवे आकलन/सिद्धांतन व प्रकटीकरण होऊ शकत नाही हे उघड आहे. किंबहुना संशयवादच विशिष्ट ज्ञानवादाला कारण ठरतो. पण धर्मवादी मात्र संशयवादाचे कट्टर विरोधक असल्याचे आपल्याला चित्र दिसते. विश्वास/श्रद्धा यावर त्यंचा भर असल्याने नवीन सिद्धांतनाची शक्यता मावळली जाते. त्यातुनच्ज नवे बंडखोर तयार होत्रात...नवे धर्म/पंथ स्थापन होतात व तेही पुन्हा तोच जुनाकित्ता गिरवु लागतात हे सर्व धर्म/पंथांच्या इतिहासात घडलेले आहे. कोण खरी मुक्ती आणि किती झटपट देवु शकतो याच्या प्रचारकी बळावरच यांची वाढ होत असल्याने अगदी धर्मज्ञानही अजुन मागास आदिम टप्प्यावरच थांबले आहे हेही आपल्या लक्षात येईल. मुळात मुक्ती ही संक्सल्पना आहे कि वास्तव हे कोणत्याही पातळीवर सिद्ध झालेले नाही.

तर, संशयवाद हाच ज्ञानवादाचा पाया आहे असे म्हनता येईल. संशय म्हणजे रुढार्थाने आपण वापरतो तो संशय नव्हे. आता उपलब्ध असलेले ज्ञानच अंतिम न मानता स्वयंप्रेरणेने, नव्या माहितीमुळे अथवा जाणीवेमुळे उपलब्ध विशिष्ट ज्ञानालाही आव्हान देत त्यांचेही पृथक्करन करत नवे सिद्धांतन करायचे तर आधीच्या सिद्धांतनाच्या अंतिमतेवर संशय/शंका घेणे भाग आहे. आणि संशयास्पद नाही, प्रश्नचिन्हांकित नाही असे कोणतेही सिद्धांतन असू शकत नाही हे किमान आजवरच्या ज्ञानप्रवासावरून सिद्ध झालेली बाब आहे.

वरील थोडक्यातील चर्चेवरून आपण असे म्हणू शकतो कि आज आपल्याला उपलब्ध असणारे, पुढे जात असणारे प्रत्येकाचे ज्ञान हे "काल-निबद्ध-विशिष्ट-ज्ञान" आहे, ज्ञान नाही. यातून आपण फारतर विशिष्टज्ञानवादाची संरचना करू शकतो व त्या आधारावर ज्ञानाचे अधिक पृथक्करन/विश्लेशन करू शकतो.

ज्ञान याचा शब्दार्थच पाहिला तर "ज्ञात करून घेणे म्हनजे ज्ञान आणि ज्याचे आपण ज्ञान करुन घेतो ते म्हणजे ज्ञेय," असे साधारणपणे म्हणता येईल. विश्वात ज्ञेये अगणित असल्याने (किंवा अज्ञाते असंख्य असल्याने) ज्ञानाचा परिसरही तेवढाच अवाढव्य असल्याचे आपल्या लक्षात येईल. शिवाय प्रत्येक शब्द जेंव्हा जन्माला आला आणि तेंव्हा जो अर्थ त्या शब्दासाठी अभिप्रेत होता त्याला कालौघात असंख्य अर्थछटा चिकटत गेल्याने शब्द (भाषा) हे ज्ञान (संकल्पना/सिद्धांतन) व्यक्त करण्यासाठी साधन म्हणून ब-याचदा कुचकामी ठरते. विज्ञानाच्या क्षेत्रात त्यामुळेच यदाकदाचितही अर्थबदल होऊ शकणार नाही अशा गणिती भाषेचा (समीकरणांचा) उपयोग त्यामुळेच सुरु झाला.  त्यामुळे गणीताच्याही अनेक ज्ञानशाखा वाढल्या हा इतिहास आहे.

असे असले तरी अर्थ हा मनात असतो. अभिव्यक्तीच्या व आकलनाच्या मर्यादा भाषेमुळे येतात, मग ती गणिती भाषा का असेना. कारण आकलन अथवा अभिव्यक्ती शेवटी बाह्य साधनांच्या मदतीखेरीज होऊ शकत नाही. E=MC2 या समीकरणातून जो अर्थ मला जाणवेल तसाच्या तसा अर्थ सर्वांना जाणवेलच असे नाही. या समीकरणाच्या निर्मात्याला तो जेवढा आणि जसा समजला व त्यामागे जी विचारप्रक्रिया होती ती आपल्याला कधीही माहित होऊ शकत नाही. आपण त्याच्या चिंतन/विचारांचे उत्पादस्वरूप जे समीकरण आहे ते घेऊन पुढे जात असतो.

याचे कारण माणसावर निसर्गत: असलेल्या मर्यादांत आहे कि अजून सर्वांना एकसारखी वाटेल, प्रत्येक शब्दात एकच एक अर्थछटा राहील...जी अंतिम असेल...अशी भाषाच आपल्याला अजून गवसलेली नाही. "ईश्वर अव्याख्येय आहे" हे विधान धर्मवाद्यांसाठी ठीक असेल पण "जे अव्याख्येय आहे ते विशिष्ट-ज्ञान अथवा ज्ञान असू शकत नाही." असे मला म्हणावेसे वाटते.

आपल्या काळात व तत्पुर्वीही जे ज्ञान-सिद्धांतन झाले आहे, होत आहे व होणार आहे ते "विशिष्ट-ज्ञान" असून विशिष्टज्ञानवादाकडुनच ज्ञानाकडे वाटचाल होत असते असे आपण या प्रकरणात स्पष्ट केले आहे.

अर्थात या मार्गात लबाडांची संख्या कमी नसते. आकलनातून/पृथक्करणातून नव्हे तर पुर्वग्रहदोषमंडित मिथ्या-ज्ञान मांडत सोयीचे सिद्धांतन स्वीकारणारे वा त्याला बळ देनारे नवीन सिद्धांतन करणारे यच्चयावत पृथ्वीतलावर अधिक लोक होते आणि आहेत हेही सरळ विचार केला तर आपल्या लक्षात येईल. पुर्वजपरंपरांचा अतिरेकी अभिमान, वंशाभिमान, धर्माभिमान, जातीअभिमान इत्यादितुन अशा लबाड्या घडत असतात. त्यावर विश्वास ठेवनारे बहुसंख्येने लोक असतात कारण संशय घेणे, प्रश्न विचारने, उत्तर शोधणे ही जी मुलभूत प्रक्रिया आहे तिची त्यांना गरजच भासू नये अशी व्यवस्था दुराभिमानवादी लोक करण्यात जगभर मग्न असतात. ज्ञानवादातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. असो.

आपला मुख्य उद्देश आहे तो ज्ञानाचे ज्ञान समजावून घेण्याचा. येथवर आपण "विशिष्ट-ज्ञान" या संकल्पनेपर्यंत आलो आहोत जी सध्याची वास्तव स्थिती आहे. जी स्थिती आहे ती ज्ञानात्मक नसून ज्ञानाकडे जाण्याच्या अगणित टप्प्यांतीतल काही टप्प्यांची स्थिती आहे.

पण अंतत: ज्ञेय काय आहे जे एकमेवाद्वितीय आहे? जे जाणल्याने जाणण्यासारखे काहीही उरणार नाही असे कोणते अज्ञात आहे? असे काय आहे कि जे जाणने हाच ज्ञानाचा अंतिम थांबा असून ज्ञान संकल्पनेत कसलीही अधिकची भर घालण्याची गरज उरणार नाही? ज्ञानाचा अंतिम टप्पा गाठेपर्यंत "ज्ञान" या संकल्पनेला कितपत परिपुर्ण म्हणता येईल असा प्रश्नही उद्भवेल.

याबाबतही मतांतरे असू शकतात...किंवा "मी कोण?" आहे व हे "विश्व कशासाठी बनले?" हे निर्विवादपणे समजणे म्हणजे अंतिम ज्ञान यावर एकमतही होऊ शकते...

प्रत्येक व्यक्तीची जिज्ञासा अंतिम ज्ञेयाबाबत वेगळी असते हे तर वास्तव आहे. म्हणजे अज्ञेयांबाबतही एकमत होणार नाही. समग्र मानवजातीचे एकत्रीत ज्ञानविश्व म्हणजे ज्ञान म्हणता येईल एकवेळ, पण व्यक्तीच्या ज्ञानाचे काय? त्या अर्थाने व्यक्ती ज्ञा्नी होऊ शकते काय हाही एक प्रश्न उपस्थित होईल.

पण ते खरेच तसे आहे काय?

आपली ज्ञानाकडुनची अपेक्षाच समूळ चुकीची आहे कि काय? व्यक्तीवाद कि जागतिक समुहवाद, व्यक्तीज्ञान कि जागतिक सामुहिक ज्ञान यावरही आपल्याला चिंतन करावे लागेल.

आणि महत्वाचा पुन्हा उद्भवत जाणारा प्रश्न....ज्ञान नेमके आहे तरी काय?

(क्रमश:)

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...