Thursday, March 6, 2014

ज्ञान म्हणजे काय? (२)


 ज्ञान हे सर्वच ज्ञानशाखांचा गाभा असल्याने ज्ञानाचे तत्वज्ञान हे स्वतंत्रपणे मांडले जायला हवे. ज्ञानाचे शाखाकरण होऊ शकते काय कि ज्ञान हे फक्त शुद्ध ज्ञान असून कथित ज्ञानशाखांतून मिळणारे ज्ञान हे छद्मज्ञान (आभासी ज्ञान) असते यावरही आपल्याला विचार करायला हवा. ज्ञानाची व्याख्या करण्याचे प्रयत्न प्लेटोपासून सुरु आहेत. वेद ह शब्द ज्ञानाच्या समानार्थी आहे असे मानण्याची आपल्याकडे परंपरा आहे, पण वेद हा शब्द "विद्या" या शब्दार्थाशी अधिक जवळीक साधतो. त्यामुळे वेद हा शब्द ज्ञानात्मक नसून विद्यात्मक आहे असे आपल्या लक्षात येईल. भारतीय दर्शनांतही ज्ञानाबाबत विविध समजुती आढळतात. बौद्ध व मीमांसकांच्या मते ज्ञान ही एक क्रिया असून वस्तुवर (जडावर) मनाची क्रिया होऊन वस्तुचे स्वरुप समजणे म्हणजे ज्ञान. पण ज्ञान हे कर्म होऊ शकते काय हाच एक मुलभूत प्रश्न आहे. उपनिषदे व अन्य नंतरचे तत्वज्ञ मात्र ज्ञान हे जाणीवरूप, अनुभवरूप असते व जे अज्ञान आहे ते जाणल्याने ज्ञान होते असे म्हणतात. अधिककरून भारतीय ज्ञानाचा विचार आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानाच्याच क्षेत्रात अधिक झाला असून "आध्यात्मिक ज्ञान" याबाबत चर्चा करतांना आपण या विचारांचा परामर्श घेऊच! पण लोकायतीक लोकांनी मात्र प्रत्यक्षप्रमाणाला महत्व दिल्याचे आढळते.

ज्ञान अथवा Knowledge हे शब्द "माहित असणे/अनुभवातून अथवा शिक्षणातून माहिती करून घेणे, जाणने, व्यक्तिगत अनुभूतीतून एखाद्या तत्वाची प्राप्ती होणे" वगैरे वापरले जातात. असे असले तरे ज्ञानाची विज्ञानात्मक परिपूर्ण (अविवादास्पद) व्याख्या अजून झालेली नाही.

ज्ञान किंवा Knowledge हे शब्द आपण वापरतो तेंव्हा त्याला संदर्भाप्रमाने विविध छटा प्राप्त झालेल्या असतात. जाणने म्हणजे ज्ञान असे आपण म्हणलो तर प्रश्न उपस्थित होतात ते हे कि "जाणले" या शब्दाला प्रत्यक्ष प्रमाण काय? कि जाणीव ही केवळ मानसिक/भावनिक आहे? ती सिद्ध करता येईल काय? सिद्ध करता येऊ शकते ती जाणीव म्हनजे ज्ञान काय? आणि जे जाणले ते मूर्त आहे कि अमूर्त? म्हणजे ते वस्तुचे व तिच्या क्रियांचे जाणने आहे कि तिच्या अस्तित्वाचे व्यक्तिविशेष जाणने आहे? कि ज्ञान म्हणजे अन्य काहीएक नसून व्यक्तिगत व सामाजिक जाणीवांचा विस्तार आहे?

म्हणजे येथे आपण अगदी प्राथमिक विचार करत आहोत. तरीही आपल्याला पुढे जाण्यासाठी या प्रश्नांचा विचार करावा लागणार आहे. अधिकाधिक माहितीचा संग्रह ज्याच्याकडे आहे, त्या माहितीचे पृथक्करन करून..तिचे संहितीकरन करून स्वस्त:च्या आकलनाने व तर्कबुद्धीने सिद्धांतन करून एखादी गोष्ट जी व्यक्ती सिद्ध करून दाखवू शकते तिला त्या विशिष्ट बाबीचे ज्ञान आहे असे आपण सर्वसाधारणपने समजत असतो. थोडक्यात ती व्यक्ती आपल्या जाणीवांच्या महत्तम कक्षेपर्यंत जाऊन उपलब्ध आकलनात भर घालत असते. त्या मर्यादेपर्यंतच ज्ञानाचीही मर्यादा असते काय?

येथे एक उदाहरण घेऊ. आईन्स्टाईन यांचा साधारण सापेक्षतावाद हा आधी गणिती तर्कबुद्धीच्या जोरावर सिद्ध केला गेला होता. प्रकाश हा प्रबळ गुरुत्वीय क्षेत्रात वाकतो हा त्यांचा एक सिद्धांत नंतर अनेक वर्षांनी पडलेल्या सुर्यग्रहणाच्या वेळी प्रत्यक्षानुमानाने सिद्धही झाला. परंतु वेगवेगळ्या संदर्भ व्युहांतील प्रयोगांत हे सिद्धांतन सिद्ध होत नाही असेही नंतर लक्षात आले व मुळात प्रकाशाचेच खरे रूप काय याकडे पुढील विद्वान वळाले.
आता येथे आपल्याला एक विधान करता येईल ते म्हनजे आईन्स्टाईन यांनी उपलब्ध माहिती अथवा ज्ञानाच्या कक्षा अजून पुढे नेल्या, वेगवेगळ्या संभावनांना जन्म दिला. पण आईन्स्टाईन यांना "ज्ञान झाले" असे विधान करता येईल काय? कि ते भविष्यातील ज्ञानाचे "पथदर्शक" झाले असे म्हनता येईल?

याचा अर्थ समजावून घ्या. इतरांनी जे जाणले नव्हते ते जाणले अथवा त्यांना विशिष्ट माहितीचा अभाव होता त्या माहितीत भर घातली म्हनजे ज्ञान ही ज्ञानाची परिपूर्ण व्याख्या होऊ शकत नाही अथवा ती ज्ञानदर्शक स्थितीही नाही. प्रत्यक्ष प्रमाणांनी सिद्ध होते ते ज्ञान हेसुद्धा येथे म्हनता येत नाही कारण एका संदर्भ चौकटीत जे सिद्ध होते ते दुस-या संदर्भ चौकटीत सिद्ध होईल असे नाही. जी बाब आपल्या चुमितीय जगात सिद्ध होऊ शकते ती मितीहीन विश्वात सिद्ध होऊ शकत नाही. कृष्णविवराच्या (आत्यंतिक गुरुत्वाकर्षनाच्या) परिस्थितीत गणिताचे व भुमितीचे सारेच नियम कोसळून पडतात असे भौतिकशास्त्र सांगत होते. मग प्रत्यक्षप्रमाण हा ज्ञानाचा विषय होऊ शकतो काय हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. हे आत्यंतिक उदाहरण वाटले तरी ते अनेक संदर्भ चौकटींत तपासून पाहता येईल व प्रत्यक्षप्रमाण हे सर्वच संदर्भचौकटींत सिद्ध होईलच असे नसल्याने त्याला फारतर मर्यादित ज्ञान म्हणता येईल. ज्ञान नव्हे.

उपलब्ध माहितीचे सिद्धांतनात रुपांतर होणे व ते अभिव्यक्त होणे ही ज्ञानाची एक पायरी मानली जाते. मग हे सिद्धांतन कोणत्याही क्षेत्रातील असो. इतिहास असो कि अवकाशभौतिकी, कायदेशास्त्र असो कि नीतिशास्त्र अथवा धर्मशास्त्र. आपण सिद्धांतनाचा अगदी पुरातन कालापासून आजतागायतचा जरी आढावा घेतला तरी निर्विवाद सिद्धांतन कोणत्याही शाखेत झालेले नाही असे आपल्या लक्षात येईल. किंबहुना निर्विवाद सिद्धांतनाच्या अभावामुळे सातत्याने नवनवी सिद्धांतने पुढे आल्याचे व आजही येत असल्याचे आपल्या लक्षात येईल. अध्यात्मवाद्यांच्या दृष्टीने अनुभुती हेच ज्ञानाचे गमक असले तरी ती प्राप्त करण्याचे मार्ग कोणते याबाबतही वेगवेगळे सिद्धांतन झाले आहे. धर्मांची तर गोष्टच वेगळी.

यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो कि माहिती पुढे जात आहे कि ज्ञान? आपण माहितीलाच ज्ञान समजण्याची चूक तर करत नाही आहोत ना? माझ्या मते ज्ञानाकडे व्यक्तीसापेक्ष अथवा समाजसापेक्ष दृष्टीकोनातून पाहून चालणार नाही. आज आपल्याकडे अगणित संवादी आणि विसंवादी माहितीत हरेक क्षणी भर पडत आहे. या माहितीचे कितीही पृथक्करण केले, संहितीकरण केले व सिद्धांतन केले तरी सिद्धांतनही माहितीच्याच पातळीवर वावरत असल्याने सिद्धांतनांना ज्ञान म्हणता येणार नाही. त्यांना माहितीचे-जाणीवांचे प्रागतिक/संस्कारित प्रकटीकरण असे फार तर म्हणता येईल. मानव जातीला मानसिक, बौद्धिक आणि भौतिक सुख-अथवा दु:ख अथवा बौद्धिक मनोरंजन त्यातून होत असले तरी ज्ञान त्यापासून दुरच राहते असे म्हनावे लागेल.

मग नेमके ज्ञान तरी काय आहे?

(क्रमश:)

To read previous article pls click here...http://sanjaysonawani.blogspot.in/2014/03/blog-post_2824.html

5 comments:

  1. अतिशय सुरेख मांडणी, अतिशय उत्तम लेख!

    प्रशांत चोपडे

    ReplyDelete
  2. The Enlightened Man :

    I. At one time, the Gautam Buddha had reached the high road between (the two towns of) Ukkattha and Setabbya. Then the Brahmin named Dona had also reached the high road between Ukkattha and Setabbya.
    2. Just then the Exalted One left the road and sat down at the foot of a tree cross-legged. Then Dona the Brahman, following the footsteps of the Exalted One, saw Him seated at the foot of that tree resplendent and of a comely appearance, with sense, controlled, with mind appeased, supremely tamed, restrained and powerful. So seeing he approached where the Exalted One was.
    3. Having come he said thus to Him : " Is not the Venerable One a Deva ? " " Brahman, I am indeed not a Deva." " Is not the Venerable One then a Gandhabba?" " Brahman, I am indeed not a Gandhabba." " Is not the Venerable One then a Yakkha ? " " Brahman, I am indeed not a Yakkha." " Is not the Venerable One then a man ? " " Brahman, I am indeed not a man."
    4. Having heard the Blessed One reply thus, the Brahman Dona said: "When Thou art asked: Are ye a Deva ? Thou sayest: No. When Thou art questioned : Are ye a Gandhabba ? Thou sayest : No. When Thou art asked: Are ye a Yakkha ?
    Thou sayest: No. When Thou art questioned : Are ye then a man ? Thou sayest : No. Who then can the Venerable One be ? "
    5. " Brahman, verily I was a Deva, a Gandhabba, Yakkha, a man, so long as I had not purged myself of the intoxicants. These very intoxicants have I now given up with roots cut out like unto a palm-tree, with its base destroyed and rendered unable to sprout again, so that in future they do not come into existence.
    6. " Just as a lotus or a water-lily born of the water, grown in the water, risen out of the water, stands unstained by the water even so, Brahman, being born of the world, grown in the world, having overcome the world I abide unstained by the world.
    7. " Therefore, 0 Brahman, consider me as the Enlightened One."
    -------------------------------------------------------------------------------------------------------------

    ReplyDelete
  3. आप्पा - ज्ञानप्राप्ती हे कर्म आहे का ? हा प्रश्न किती विचार करायला लावतो नाही का ?
    बाप्पा - पण आपण ज्ञान प्राप्ती म्हणजेच अज्ञानाचे निराकरण असे समजून घेताना + स्पर्श गंध चव आणि दृक श्राव्यादि आपल्या पंचेंद्रियांच्या ज्या शक्ती आहेत त्यांचापण आदर करतो
    आणि सर्वश्रेष्ठ अंतिम सत्याचा शोध घेताना या पंचेंद्रियांचा उपयोग हाच सत्याकडे जाण्याचा मार्ग आहे का ,ते पण तपासावे लागते !
    आप्पा - गुलाबराव महाराज याना दृष्टी नसतानादेखील त्याना अंतिम सत्याची ओळख झाली होती असे सांगितले जाते !
    बाप्पा - म्हणजेच स्पर्शादि जाणिवांच्या पलीकडे इंद्रियांची मदत नसताना केवळ चिंतन आणि तपाने अंतिम सत्याची भेट होऊ शकते असेच ना ?आणि तसे असेल तर सत्य शोधनात मन आणि बुद्धी यांचा वाटा किती प्रमाणात मानता येईल ?
    आप्पा - एक गमतीची शंका म्हणजे हा दिव्यत्वाचा , अंतिम सत्याची ओळख झाल्या नंतरचा क्षण निरंतर आपली सोबत करतो का ?
    बाप्पा - टीव्ही वर संतांचे रेखाटन तसे असते आणि ते कायम तंद्रीत असल्याचे दाखवले जाते , पण ते पटत नाही ,संशोधनाचा काळ हा समाधीसुखाचा असू शकतो पण आईनस्टाईन किंवा न्यूटन वा ,आर्किमिडीज हे कायमच चिंतनाच्या तंद्रीत नक्कीच नसणार,तेपण सामान्यां सारखे वागतच असणार
    आप्पा -म्हणजेच दिव्यत्त्वाचा साक्षात्कार किंवा एन्लाईटनमेंट चा परिणाम हा उर्वरित जीवनास सदाकाळ व्यापूनच राहतो असे नव्हे !फारतर अभ्यासाने हा काळ वाढवत नेता येत असावा असे आध्यात्मिक लिखाणावरून जाणवते ,
    बाप्पा - प्रभातच्या संत तुकाराम सिनेमात जसे तुकोबा सदासर्वदा एकाच साक्षात्कारी नादात बोलताना आणि वावरताना दाखवतात तसे खरेतर अवघडच वाटते !
    आप्पा - भौतीक सत्ये ही बदलू शकतात खरेतर हा सत्य उलगडण्याच्या अंतिम यात्रेचा एक टप्पा असतो आणि दरवेळेस आपण एकेक पायरी गाठत जात असतो ! हा शून्यापासून अनंतापर्यंतचा प्रवास अनेक योगायोगानी गुंफलेल्या क्षणांचा परिपाक असतो !
    बाप्पा - अनेकाना त्यांची प्रतिभा अर्ध्यावरून सोडून जाते आणि त्यांच्या हातून पुढे काहीच संशोधन होत नाही ,लेखन होत नाही यामागचेही रहस्य कसे उलगडायचे ?आपल्या हातून एखादे अशक्य शोधाचे किंवा , लिखाणाचे , काम झाल्यावर ते लोक रडलेले आढळतात , ते काम त्यांच्या आयुष्याचा हिस्सा बनलेले असते , देहभान हरपुन ते असे क्षण जगत असतात ,आणि एकदम सर्व थांबते - संपते , सर्व रिते होऊन जाते
    आप्पा - असे संशोधक लेखक कावरे बावरे होतात , एखाद्या स्वप्नवत जगलेला तो काळ एकदम संपतो !हे असेच असते का ? हा अनुभूतीचाच भाग आहे - प्रत्यक्ष प्रमाण !
    संजय सर हे दुसरे ओवलेले पुष्पही अप्रतिम आणि फार अपार आनंद देणारे ठरले !
    आप्पा बाप्पा - आम्ही आपले ऋणी आहोत !!

    ReplyDelete
  4. खुपच छान लेख आहे सर ♡★☆☆☆

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...