Tuesday, December 31, 2013

"आप" आणि आपण!

आम आदमी पक्ष आणि तिचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवालांनी गाजवले. भारतातील राजकीय समिकरणे बदलवायला केजरीवालांनी भाग पाडले असेच म्हणायला हवे. सर्वसामान्य माणूस प्रस्थापितांच्या सत्ता उलथवू शकतो हे मर्यादित परिप्रेक्षात का होईना भारताला दिसले. सर्वसामान्य मानूस भ्रष्टाचार, महागाई, वाढती बेरोजगारी याला वैतागला आहे व त्याचे प्रतिबिंब दिल्लीतील निवडणूकीत पडले असे विश्लेषक म्हणतात. दिल्लीत बसलेल्या हाद-यामुळे सर्वच इतर राजकीय पक्षांना वेगळा विचार करायला आपने भाग पाडले हे मान्य करून त्या खोलात न जाता या क्रांतीतून निर्माण होणारे प्रश्न मला महत्वाचे वाटतात.

पहिला प्रश्न हा आहे कि ही कथित क्रांती देशव्यापी होऊ शकेल काय? अन्य राज्यांत आपचे यश लक्षात घेऊन अनेक मान्यवर आपच्या मांडवाखाली जायला उत्सूक दिसत आहेत. महाराष्ट्रात विजय पांढरे आधीच आपमद्धे सामील झालेत तर राजु शेट्टींचा स्वाभिमानी सध्या तरी तळ्यात-मळ्यात दिसत असला तरी तो आपशी युती करणार नाही असे नाही. ते काहीही असले तरी आपची ही क्रांती देशव्यापी होण्याची शक्यता धुसर आहे याचे मह्त्वाचे कारण असे कि ज्या सामाजिक/आर्थिक/राजकीय परिस्थितीत दिल्लीतील व अन्य राज्यांतील निवडणूक झाली तशी परिस्थिती लोकसभेच्या निवडणूकीपर्यंत राहील असे नाही.

शिवाय प्रत्येक राज्यातील राष्ट्रीय समान प्रश्न सोडले तरी स्थानिक प्रश्नांचीही त्यांना जोड मिळत असते. त्यांचा एकुणातील प्रभाव मतदानावर कसा पडेल हे सांगता येणार नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर मंडल आयोगाला विरोध करणारे केजरीवाल व त्यांचे समर्थक येथे लोकांना कसे आकर्षित करतील हा प्रश्नच आहे. दिल्लीतील लोकांची मानसिकता आणि येथील जनतेची मानसिकता याची तुलना करणे अप्रस्तूत असले तरी मराठा राजकारणासमोर व त्या शक्तीसमोर आप टिकू शकेल काय हा खरा प्रश्न आहे.

दुसरा मुद्दा असा कि केजरीवालांना निवडणूकीत लोकप्रिय घोषणांचाच आधार घ्यावा लागला होता हे विसरता येत नाही. फुकट पाणी, अर्ध्या दरात वीज, बांधकामे नियमित करुन घेणे वगैरे. केजरीवालांनी दोन आश्वासनांची पुर्ती करायला सुरुवातही केली आहे.  आता प्रश्न असा पदतो कि लोकप्रिय आश्वासने देणे आणि त्यांचे पालनही करणे याला "बांधिलकी" म्हणता आले तरी शेवटी त्यासाठीचा खर्च कोणाच्या खिशातून वसूल केला जाणार? शेवटी नागरिकांच्याच हे साधे उत्तर आहे. कोंग्रेसचे अन्न सुरक्षा बिल या गदारोळात पटकण विस्मृतीत गेले असले तरी तेही लोकानुययासाठीच आहे हे उघड आहे. लोकानुययी योजना अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण करणा-या असतात व त्यातून सुदृढ अशी अर्थव्यवस्था आणि राजकीय स्थिती साधली जात नाही. समजा आपने देशभर अशा योजना राबवण्याच्या घोषना केल्या तर जी परिस्थिती निर्माण होऊ शकते ती फारशी सुखावह असनार नाही.

त्याच वेळीस अन्य पक्ष काय रणनीति आखतील याचाही विचार करायला हवा. कोंग्रेसने अण्णांना सोबत घेत लोकपाल आणून एका परीने केजरीवालांच्या हातातील महत्वाचा मुद्दा काढून घेतला आहे. आदर्श अहवालाबाबत जी भुमिका घेतली गेली त्यावरून भ्रष्टाचाराबाबत कोंग्रेसही जागृत आहे असा संदेश, जरी प्रभावीपणे नसला तरी, दिलाच आहे. खरे तर कोंग्रेसच्या कार्यकालात प्रथमच मोठमोठी धेंडे गजाआड झाली हेही विसरता येत नाही. कदाचित त्याची गती अजून वाढेल.

सध्या महामंदी, महागाई याने जनता सैरभैर झाली आहे व ती प्रस्थापित सत्तेच्या विरोधात आहे. आत्ता निवडणूका झाल्या तर कोंग्रेसचे पानिपत होणार यात शंका नाही. पण त्याचा फायदा आपला मिळेल काय? अत्यंत मर्यादित परिप्रेक्षात तो मिळू शकतो...पण केंद्रात सत्ता स्थापन करण्याएवढे बळ तिला मिळेल असे दिसत नाही. उलट सध्य:स्थितीचा फायदा भाजपला मिळेल.

मोदी काही काळ "आप" मुळे विस्मित झाले असले तरी ते व त्यांचे सहकारी रणनीति बदलण्याच्या मुडमद्धे दिसत आहेत. फक्त कोंग्रेस (विशेष्त: राहूल व सोनिया) यांच्यावर हल्ले केल्याने आता भागनार नाही तर अर्थव्यवस्थेची फेर-उभारणी करण्यासाठी नवे तत्वज्ञान त्यांना शोधावे लागेल...मांडावे लागेल. सध्या तरी त्यांच्याकडे त्यासाठी काही नवा विचार आहे असे दिसत नाही. पण नजिकच्या भविष्यकालात त्यांना त्यावर बोलावेच लागेल! आपकडेही राष्ट्रीय अर्थव्यवस्थेबाबत काही नव-विचार असल्याचे आत्ता तरी दिसत नाही. लोकप्रिय घोषणांतून अर्थव्यवस्था सावरत नसते.

दरम्यान महागाई कमी होईल असे संकेत आताच मिळत आहेत. अर्थव्यवस्थेला नवीन बुस्टर देण्यात कोंग्रेस यशस्वी झाली तर वेगळेच चित्र निवडणुकीच्या वेळीस असेल. लोकांची स्मरणशक्ती अल्प असते. जर अर्थव्यवस्था रुळावर आली तर आताचे चटके लोक विसरूनही जातील व तेही नव्या दृष्टीने समकालीन राजकारणाचा विचार करतील. तोवर "आप" दिल्लीत सुशासन ठेवू शकला तर ठीक...अन्यथा राजकीय व्यवस्थेत ते स्वत:चे आहे ते स्थान हरपून बसतील.

भावनेच्या लाटेवर निवडून येणे आणि त्यात सातत्य ठेवणे यात फरक आहे. आपने सर्व पक्षांना धोक्याचा इशारा दिला आणि नवीन दृष्टीने आपापल्या धोरणांकडे पहायला भाग पाडले हे आपचे निर्विवाद यश आहे. त्याचा फायदा भविष्यात आपला किती होईल हा प्रश्न असला तरी भारतीय राजकारनात गुणात्मक बदल त्यामुळे घडून येतोय व येईल असे मात्र नक्कीच म्हणता येते. त्यासाठी केजरीवालांचे अभिनंदन केलेच पाहिजे, त्याच वेळीस राष्ट्रीय पातळीवर आपचे धोकेही समजावून घ्यावे लागतील!

Saturday, December 28, 2013

O Lord Rama....

ही बालकविता इंग्रजी मी नर्सरी -हाइम्सला वैतागुन लिहुन संगीतबद्ध केली होती. ही कविता वाचुन आणि संगीत ऐकून हिंदुत्ववाद्यांना आनंदाच्या उकळ्या फुटु शकतील किंवा रामद्वेष्ट्यांना पोटशूळ उठू शकेल...मला मात्र सामान्य जनमानसांतला राम या कवितेत अभिप्रेत आहे...खालच्या शब्दांसोबत जोडलेले संगीत ऐका...


(Chorus "Oh Ram Oh Ram)

I pray to you
I bow before you
O Lord Rama
O lord Rama...(2)

Give me the strength
To seek the truth
The purity of mind
To change the world
Bless me O Lord
O Lord Rama....
I Pray to you...

I wish to make
The world beautiful
free of evil
And Violence
Give me courage
O Lord Rama
I Pray to you...
I bow before you
O Lord Rama...


http://yourlisten.com/sonawani/o-lord-rama

प्रकाशाची मला भिती वाटतेय....

कोठेतरी सारे व्यर्थ
नि उदास वाटतंय
तुडूंब भरलेल्या
काळोखी हृदयाला
घनकाळोखात डुबवावे वाटतंय
एकही लकेर रसरशित
शिरू न शकावी
असल्या कुहरात शिरावसं वाटतंय...

पुन्हा धरित्रीच्या मूक
गर्भाशयात जावंसं वाटतंय!

या कोणत्या वेदना आहेत?
हे कोणते आक्रोश आहेत?
ज्याला काही प्राप्तच करायचे नव्हते
त्याच्या वाट्याला आलेले
हे कोणते प्राप्तन आहे?
मृत्युच्या शवाशी
संभोग करणारे
हे कोणते प्रेत आहे?

काहीही समजत नाही...
काहीही उमगत नाही
चौबाजुंनी उसळनारे उद्रेकी
आक्रोश थांबत नाहीत
व्यर्थतेला सार्थ बनवणारे
हात नाहीत
स्वत:च स्वत:ला
गाडत न्यावे
त्याला पर्याय नाही...

प्रकाशाची मला भिती वाटतेय
त्याच्या स्पर्शातील
एकाकीपणा सोसण्याची
हिंमत हरपतेय......
काळोखही साथ नाकारतोय
अवचित पाठीत खंजिर
खुपसणा-या
विश्वासघातकी
मित्रासारखा...
मृत्युसारखा!

Friday, December 27, 2013

हीच आपल्या लेखनाची प्रेरणा आहे काय?

मित्रहो,

संस्कृतीचा आदिम वारसा मिरवणा-या गोमंतभूमीत भरणारे हे शेकोटी साहित्य संमेलन आधुनिक काळातील साहित्य-संस्कृतीच्या प्रकाशाचा, उर्जेचा आणि चेतनेचा उत्सव आहे. शेकोटी या शब्दातच मानवाच्या पुरातन गाथेचा समग्र इतिहास सामावला आहे. अग्नीचा शोध माणसाला लागला ही आदिमानवाच्या जीवनात क्रांती घडवणारी घटना होती. मानवी टोळ्यांनी अग्नी सतत प्रज्वलीत रहावा यातून पहिली शेकोटी पेटवली त्याला आता कदाचित लाखावर वर्ष झाली असतील. मानवी टोळ्यांनी स्थलांतर जरी केले तरी एखादे तरी जळते लाकूड दुस-या स्थानी नेले जायचे. तेथे पुन्हा शेकोटी पेटायची. या शेकोटीचा भवताली बसून टोळीमानव आपल्या आदिम भाषेत गूज करायचा. शेकोटीभोवतीच पुरातन काव्ये स्फुरली. भाषेचा विकास शेकोटीभोवतीच होत गेला. शेकोटीनेच अनेक धर्मांना जन्म घातला. वैदिक धर्मियांचे यज्ञ हे शेकोटीचेच उत्क्रांत रुप. अग्नीत हविद्रव्ये देत ते त्यांच्या अमूर्त देवतांना आवाहने करायचे. पारशी धर्मही पुर्णतया अग्नीभोवतीच फिरणारा. मुर्तीपूजक (पेगन) शैव, ग्रीक, इजिप्शियन धर्मांत मंदिरांत होम पेटायचे. अग्नी सर्वात पवित्र मानला गेला कारण त्याने नुसतीच माणसाची सोय केली नाही तर त्याच्या सांस्कृतीक जीवनात क्रांती घडवून आणली. 

गोमंतभुमीत मानवाच्या संस्कृतीचे किमान चाळीस हजार वर्षांपुर्वीचे पुरावे आहेत. ते पुरावे म्हणजे कुशावती नदीच्या काठी पुरामानवाने खडकांत कोरलेली चित्रे. ही चित्रे जशी त्याच्या कौशल्याची साक्ष आहेत तशीच त्याच्या गूढ धर्मकल्पना आणि जीवनसौंदर्याच्या जाणीवेचे प्रगल्भ दर्शन घडवनारी आहेत. त्यात आदिमातेचे जसे चित्रण आहे तसेच नाचणारी युवती व पशु-पक्षांचेही चित्रण आहे. हे चित्रण करणारा मानव, आपला पुर्वज कोणत्या भाषेत बोलत होता हे आपल्याला माहित नाही...त्या भाषेत त्याने कोणती कवने रचली हे आपल्याला माहित नाही...पण त्या गीत-संगीत तालावर ते नाचत होते...आणि ते नृत्य शिकार करुन आलेल्याला थकव्याला मिटवण्यासाठी, जीवन सौंदर्य खुलवण्यासाठी शेकोटीभोवतीच नाचत होते हे आपण निश्चयाने म्हणु शकतो. आज आपण येथे जी शेकोटी पेटवली आहे आणि त्याभोवती हा साहित्य-संस्कृतीचा जागर सुरू झाला आहे तो मला थेट त्या काळात नेतोय.

संस्कृतीचा प्रवाह अव्याहतपणे जीवंत ठेवण्यासाठीचा हा साहित्य संमेलनाचा उपक्रम मला अभिनंदनीय, अनुकरणीय वाटतो तो त्यासाठीच!

वर्तमानात येतांना मात्र आपल्याला अधिक गंभीर व्हायला लागते. आपण सारे साहित्यिक आणि साहित्यप्रेमी आहात. किंबहुना आपण आहात म्हणून साहित्य संस्कृती जीवंत आहे. पण जीवंत असने म्हणजे नेमके काय? आपण कसे जीवंत आहोत? रसरशितपणे जीवंत आहोत कि गलितगात्र जीवंत आहोत? आपली साहित्य संस्कृती कोणत्या प्रकारे जीवंत आहे याचे नीट अवगाहन केल्याखेरीज आपल्याला योग्य निदान करता येणार नाही. आपण त्यावर जर गंभीरपणे चर्चा केली नाही तर साहित्य संस्कृतीचे भवितव्यही आपल्याना नीट ठरवता येणार नाही. या शेकोटीच्या साक्षीने आपण त्यावर चर्चा करुयात.

मराठी साहित्याला पुरातन इतिहास आहे. हालाची गाथा सप्तशती आज उपलब्ध असलेला सर्वात जुना पण कालजेयी पुरावा आहे. गाथा सप्तशतीत इसवी सनाच्या पहिल्या शतकातील मानवी जीवनाचे जे मनमोकळे आणि मनोरम चित्रण झाले आहे तसे दुर्दैवाने नंतरच्या साहित्यातून गायब झालेले दिसते. गाथा सप्तशतीत आठव्या शतकापर्यंत भर पडत राहिली हे येथे लक्षात घेतले पाहिजे. गाथा सप्तशतीतील एक गाथा येथे सांगण्याचा मोह आवरत नाही कारण आपले संचित काय आहे हे समजायला त्यामुळे उपयोग होईल.

"तुह मुहसारिच्छं ण लहै त्ति संपुण्णमंण्डलो विहिणा
आणामां व्व घडइउं वि खण्डिज्जइ मिअंको..."

अर्थ असा आहे...पौर्णिमेचा पुर्ण चंद्रही तुझ्या रुपाशी स्पर्धा करु शकत नाही म्हणून चिडलेला विधाता नवीन चंद्र घडवावा यासाठी या चंद्राचे कलाकलांनी तुकडे करतो आहे.

गाथा सप्तशतीतील सर्वच गाथा नितांत रमणीय आहेत. आपल्या भाषेचे प्राचीन रुप त्यातून दिसते. ही माहाराष्ट्री प्राकृत चक्रधरांच्या...नंतर ज्ञानदेवांचा मराठीत कशी बदलत गेली यावरून मराठीचा प्रवाहीपणा दिसतो आणि बदलत्या काळाबरोबर बदलणारी भाषा कशी चिरकाळ टिकते हेही यातून स्पष्ट होते. मध्ययुगातील भाषा ते आजची भाषाही परिवर्तन स्वीकारत आली आहे. या भाषेने जसे इतर हजारो शब्द उधार घेतले तसेच हजारो शब्द इतर भाषांना दिलेही. आपली माय मराठी प्रगल्भ झाली ती यामुळेच.

पण भाषा वैभवशाली असली तरी आम्ही आधुनिक काळात तिच्यावर साज चढवण्यात कितपत यशस्वी ठरत आहोत हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मुद्दा आहे. मराठी साहित्यावर परपूष्ट असल्याचा आरोप वारंवार होत असतो. म्हणजे मूळ म्हणता येतील अशा कृती मराठीत अत्यल्प आहेत. र. वा. दिघेंसारखे, उद्धव शेळकेंसारखे काही ओरिजिनल साहित्यिक आपल्याकडे दुर्लक्षीत राहिले तर जे उचलेगिरी करत लिहित राहिले ते मात्र "सारस्वत" म्हणून मिरवत राहिले असे आपल्याला दिसते. आपले साहित्य आपल्या मातीचे हवे, आपल्या शैलीचे हवे, आपल्या आशा-आकांक्षा-जीवनस्वप्ने-जीवनशोध त्यातून प्रखरपणे आणि प्रगल्भपणे व्यक्त करणारे हवे ही अपेक्षा साहित्याकडून असायला हरकत नाही. पण गत शतकाने अपवाद वगळता आपली निराशाच केली आहे हे जर तटस्थपणे पाहिले तर आपल्या लक्षात येईल. 

साहित्य हे मानवी संस्कृतीचा उद्गार असते. समाजाच्या रचनेचा, एकुणातील व्यक्तिगत तसेच समष्टीच्या अंतर्गत कलह-विजय-अपुर्णता-पुर्णत्वाची ओढ इत्यादिंचा एकुणातील जो सारगर्भ याला साहित्यातून जीवंत केले जात असते. त्यासाठी साहित्यिकाला...कवीला प्रत्यक्ष जीवनाशी भिडावे लागते. अनुभवसंपृक्त व्हावे लागते. वैश्विक दृष्टीकोनातून समग्र जीवनाकडे पहावे लागते. मग एका सामान्य शेतक-याची साधी गोष्टही वैश्विक बनू शकते. उध्वस्त वृक्षावरील एखादी दहा ओळींची कविताही महाकाव्याचा अनुभव देवू शकते. मी येथे पाश्चात्य लेखक-कवींची उदाहरणे देत नाही. काही प्रयोजनही नाही. कारण आपल्याला आपल्या स्वप्रतिभेने अजून खूप मजल मारायची आहे. त्यांचे जीवन बेगळे, संस्कृती वेगळी, सामाजिक संदर्भ वेगळे आणि त्यांना उपलब्ध असलेले अवकाशही वेगळे. आपला प्रश्न हा आहे कि आम्ही आमचे अवकाश शोधण्यात कमी तर पडत नाही ना? 

आम्ही आमची संस्कृती नीट शोधण्यात, समजण्यात, सामाजिक अनुबंध जाणन्यात कमी तर पडत नाही ना?

आपण मोठे साहित्यिक असलो तरी हा प्रश्न विचारला पाहिजे, सातत्याने, व प्रश्नांची उत्तरेही शोधली पाहिजेत...सातत्याने, कारण आज आपल्या जगाला कधी नव्हे तेवढा वेग आला आहे. हा वेग भोवळ आणनारा आहे. त्यामुळे साहित्यिकांसमोरील आव्हानेही तेवढीच वाढली आहेत.

गत शतकातील आढावा घेतला तर हजारोंनी लेखक-कवी झाल्याचे आपल्या लक्षात येईल. पण ज्ञानेश्वरांची-नामदेवांची ते तुकोबांची उंची ओलांडुन जाईल...पुढेही टिकेल, कालातीत होईल अशी एकही साहित्यकृती मराठीत निर्माण झालेली आपल्याला दिसून येणार नाही. ज्ञानेश्वर-नामदेव-तुकोबा टिकले ते केवळ त्यांच्या आध्यात्मिक लेखनामुळे असे म्हणता येणार नाही कारण आध्यात्मिक लेखकांची तर फार मोठी मांदियाळी होऊन गेली आहे. जीवनाचे दर्शन हा त्यांच्या लेखनाचा मुलगाभा होता. आमचे साहित्यिक तेथेच कमी पडले हे वास्तव स्वीकारायला हवे. 

मी पारितोषिकांवरून साहित्याची उंची मोजत नाही. मी एखाद्या लेखकाच्या कृतीची समिक्षा किती झाली यावरुनही त्याची उंची मोजत नाही. मी एखादे पुस्तक किती खपले यावरुनही त्या पुस्तकाचा दर्जा ठरवत नाही. साहित्याची उंची आणि खोली मोजायचे एकच साधन असते म्हणजे त्यातील जीवनदर्शन किती प्रत्ययकारी आहे यावरून! तसे असले तर आज वाचक दहा आहेत कि दहा लाख...ते भविष्यात कोट्यावधी होतातच याबद्दल शंका बाळगायचे कारण नाही. अन्यथा पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे साहित्यिकाच्या हातात असतेच. Old Man and the Sea ही अवघ्या शंभरेक पानांची कादंबरी...तिलास नोबेल मिळाले... पण ती हेमिंग्वेने ३२ वेळा पुन्हा पुन्हा लिहून काढली होती हे आम्ही विसरतो. 

साहित्यनिष्ठा हा साहित्यिकाचा प्राण असतो. पण मी आजकालच नव्हे तर प्रकाशक झाल्यापासून बघतो...१९९२ सालापासून कि लेखकाला प्रसिद्ध होण्याची अकारण घाई झालेली असते. संपादकीय संस्कार, पुनर्लेखन हे प्रकार अपवाद वगळता लेखकांना आवडत नाहीत. काही लेखक तर मी असे पाहिलेत कि पुस्तक प्रकाशित होण्याआधीच पुरस्कारांची फिल्डिंग लावून आलेले होते. एका नव-लेखकाच्या शोधलेखनात खरेच दम होता...पण अप्रोच बदलला तर ते लेखन एक माइलस्टोन ठरु शकले असते. पण त्यांना आहे तसेच प्रकाशित करायचे होते. कोणी प्रकाशक भेटला नाही तर ते स्वत: खर्च करून प्रकाशित केले. मला आता त्या लेखकाचेही नांव आठवत नाही...आठवतो फक्त विषय. 

म्हणजे आपणच विस्मृतीत जाण्यासाठीच लेखन करतो काय? केवळ पुस्तक यावे व एखादा पुरस्कार मिळावा हीच आपल्या लेखनाची प्रेरणा आहे काय? मला वाटते आपण हा प्रश्न मनोमन विचारायला हवा. आपापली कृती अधिकाधिक निर्दोष आणि अधिक सखोल जीवनदर्शन घडवणारी होईल याबाबत सजग रहायला हवे. असे म्हणतात लेखनाची एखादी कल्पना स्फुरते तोच प्रतिभेचा क्षण असतो...पुढची कारागिरी असते. पण कारागिरीलाही वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी कल्पना स्फुरण्याचा जो प्रतिभाशाली क्षण होता तेवढीच प्रतिभा पुन्हा पुन्हा पणाला लावावी लागते. 

ज्येष्ठ समिक्षक शंकर सारडा नेहमी म्हणतात कि मराठीत नोबेल पारितोषिक मिळण्याच्या योग्यतेची कविता-कथा-कादंबरी यायला हवी. त्यांचे बरोबर आहे. नोबेल मिळणे हे काही साहित्यकृती श्रेष्ठ असण्याचे लक्षण नाही. गांधीजींना नोबेल मिळाले नाही पण त्यांच्या शिष्याला मिळाले. गांधीजींची योग्यता कधीच कमी झाली नाही. नोबेल समितीला त्याबद्दल खेद व्यक्त करावा लागला. असाच खेद प्रत्येक वाचकाच्या मनात निर्माण होईल अशा कृती निर्माण करायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?  

असो. आपण आज ज्या जगात जगत आहोत ते कसे आहे? 

आज जागतिकीकरणामुळे जीवनाचे संदर्भ झपाट्याने बदलत चालले आहेत. मानवी नातेसंबंधांची मोडतोड होत त्यांची नव्याने फेरबांधणी होत आहे. त्याचा परिणाम आपल्या संस्कृतीवरही होत आहे. किंबहुना एवढ्या वेगाने सांस्कृतिक-सामाजिक अभिसरण होऊ शकते याची कोणी कल्पनाही केली नव्हती. जागतीकीकरण गोयंकरांना तसे नवे नाही. पुरातन कालापासून विविध संस्कृत्यांचे मानवी समूह येथे आले आहेत. सर्वात आधी तीन-चार हजार वर्षांपुर्वी आले ते सुमेरियन. नंतर जसे हबशी आले तसे शिद्दीही. काही टिकले तर काही पुन्हा स्थलांतरीत झाले. पुढचा इतिहास आपल्याला माहितच आहे. किंबहुना गोवा...ही कोकणची अवघी किनारपट्टी जागतीक संस्कृत्यांसाठी एक पुल बनला. पण आताचे जागतिकीकरण वेगळे आहे. ते चांगले कि वाईट हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन असू शकतो. मतमतांतरे असायलाच हवीत. पण हे जे संक्रमण होते आहे त्याचे जीवंत चित्रण करणे हे आपणासमोरचे मोठे आव्हान आहे.  

दुसरे महत्वाचे असे की मराठी साहित्यात एक नवाच चातुर्वर्ण्य निर्माण झालेला आहे. म्हणजे शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, ओबीसी साहित्य, प्रादेशिक कादंब-या इत्यादी. समिक्षक अशा कोणत्या ना कोणत्या क्यटेगरीत साहित्य ढकलत त्याचे त्या क्यटेगरीप्रमाने समिक्षण करत असल्याने, व त्यालाही पाश्चात्य साहित्यिक मापदंड लावत असल्याने एक विचित्र स्थिती झालेली आहे. ही स्थिती साहित्यिकांसाठीही विघातक आहे. प्रदेशाचे, जातीयतेचे परिमाण लावून त्या साहित्याकडे पाहिले तर साहित्याचा जो मुलगर्भ हेतू...वैश्विकता कसा साध्य होईल? महात्मा फुले सामाजिक संदर्भात म्हनाले होते...एकमय समाज निर्माण झाल्याखेरीज नेशन...म्हणजे राष्ट्र निर्माण होत नसते. यालाच पुढे नेवून म्हणता येईल कि साहित्यातील सर्व प्रवाहांना एकमयतेच्या दृष्टीने जर आपण पाहू शकलो नाही तर ते मराठी साहित्याला विघातक ठरेल...नव्हे ठरतेच आहे. र. वा. दिघेंच्या कादंब-यांना ग्रामीण कादंबरी किंवा प्रादेशिक कादंबरीचे लेबल चिकटवल्यामुळे पानकळासारख्या अभिजात साहित्यकृतीचे नुकसान झाले आहे हे आपण विसरता कामा नये. 

साहित्यकृती एकतर उत्कृष्ठ असते किंवा चांगली किंवा वाईट...साहित्य हे साहित्यच असते याचे भान समिक्षकांनी ठेवले पाहिजे.

आपल्या साहित्य व्यवहाराच्या अन्य अंगांकडे जरा दृष्टी टाकुयात. आज आपला साहित्य संस्कृतीचा व्यवहार अत्यंत विखंडित झाला आहे असे आपल्या लक्षात येईल. तसा तो सुरुवातीपासुनच आहे. विदर्भातला लेखक पश्चिम महाराष्ट्राला माहित होता होता त्याचे उमेदीचे वय निघून जाते. परराज्यांतील लेखकांची अवस्था तर अधिकच बिकट आहे. प्रकाशक मिळणे, त्याची व्यापक समिक्षा होणे हे प्रकार कमीच आहेत. सर्वदूर मराठी भाषकांपर्यंत एखाद्या लेखकाला पोहोचता येईल असे दुर्दैवाने एकही माध्यम नाही. साहित्य विषयाला वाहिलेल्या पुरवण्या आटत चालल्या आहेत. एक-दोन पाने देणारी वृत्तपत्रे आता जाहिरातीच जास्त आणि चतकोर मजकूर अशा अवस्थेला आली आहेत. मग साहित्य प्रचार-प्रसार कसा होणार? नवीन लेखकांना व्यासपीठ कसे मिळणार?

महाराष्ट्रातील साहित्य संस्थाही कृपण बनलेल्या आहेत. परराज्यांतील लेखकांना, समिक्षकांना, विचारवंतांना आपण निमंत्रीत करायला हवे, त्यांची ओळख साहित्य रसिकांना व्हायला हवी यासाठी काही उपक्रम नाहीत. उलट परराज्यातील संस्था मात्र महाराष्ट्रातील लेखक-कवींना आवर्जून बोलवत असतात. त्यांचे मन लावून ऐकत असतात...सन्मान देत असतात. पण आपलेही काही उत्तरदायित्व आहे याचे भान महाराष्ट्रातील संस्थांनी ठेवलेले नाही याबाबत खंत व्यक्त केलीच पाहिजे. 

साहित्य संस्कृतीचे विकसन व्हायला, लेखक-कवींना मोकळे व्ह्यायला, अभिव्यक्त व्हायला साहित्य संमेलनांची, साहित्यिक कार्यक्रमांची, व्याख्यानांची आवश्यकता असते. गोवा हे त्या दृष्टीने श्रीमंत राज्य आहे असे म्हनावे लागेल. मराठी भाषेला अधिष्ठान देण्यात गोव्याने नेहमीच हातभार लावला आहे. किंबहुना गोव्याची संस्कृती घडवण्यात मराठीने मोठा हातभार लावला आहे. बा. भ. बोरकरांसारखे महान कवी याच भुमीने दिले आहेत. असे असतांनाही गोवा शासन मराठीला मात्र प्रशासकीय भाषेचा दर्जा देत नाही ही दुर्दैवी बाब आहे. खरे तर हे घटनाविरोधी आहे. घटनेचे कलम ३०, ३४५, ३४७ आणि ३५० (अ व ब) नुसार एखाद्या राज्यातील किंवा त्या राज्यातील एखाद्या जिल्ह्यात राहणा-या एखाद्या अल्पभाषक गटाने जरी मागणी केली तरी त्यांच्या भाषेला प्रशासकीय भाषेचा दर्जा दिला पाहिजे. खरे तर घटनेत "राजभाषा" हा शब्दच नाही...आहे तो प्रशासकीय भाषा आणि एखाद्या राज्यात अशा अनेक प्रशासकीय भाषा असू शकतात. हे असे असूनहे मराठी भाषेला गोवा शासन प्रशासकीय भाषेचा दर्जा इतकी वर्ष मागणी करुनही देत नसेल तर ही बाब घटनेच्या विरोधात जाते. सर्वांनी घटनेचा सन्मान ठेवायला हवा. गोवा शासनही ठेवेल अशी मला आशा आहे.  

आजवर दिग्गजांनी भुषवलेल्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यंदा आपण माझी निवड केली याबाबत मी संयोजकांचा आणि आपणा सर्वांचा कृतज्ञ आहे. ही शेकोटी अशाच धगधगत राहो...आपल्या चिरंतन प्रकाशाने साहित्य संस्कृती तेजालत राहो...सर्वांसाठी एक दीपस्तंभ बनो आणि आपल्या सर्वांचे...मग साहित्यिक असोत कि साहित्य रसिक...जीवन समृद्ध करो ही शुभकामना. 

धन्यवाद.

Monday, December 23, 2013

माझं गांव ...

माझं गांव 
हरवलंय
शोधतोय मी दशदिशांत 
आणि
प्रत्येक हृदयांत 
विचारतोय हरेक सहृदयाला
कोठाय माझे गांव...?

प्रत्येक जण 
म्हणतोय साश्रू नयनांनी
नाही माहित बा...
आम्हीही त्याच 
अनवरत शोधात
कोठे गेले ते आमचे गांव...?

गांवाचा शोध 
आत्म्याचा शोध
हरपलेल्या श्रेयांचा शोध
शोध-शोध शोधतोय
पण नाही सापडत कोठेच
माझे
तुमचे
हरवलेले गांव!

Tuesday, December 17, 2013

नर्सरी -हाईम...रेन इज पवरिंग...




२००० सालची गोष्ट असेल. माझी मुले तेंव्हा शाळेत शिकत होती. ते इंग्रजीतील नर्सरी -हाइम्स म्हणत त्या मला आजिबात आवडत नसत. रेन रेन गो टु स्पेन...हे काय आहे म्हटलं? मग मी स्वत: आठ बालगीतं लिहिली...संगीतबद्धही केली. अजय-अतुलने संगीत संयोजन केलं. पण व्हाईसओव्हर राहुनच गेला. मग बनवलं फक्त म्युझिकल...खरेच पक्क्या भारतीय नर्सरी -हाइम्सची गरज आहे.

म्युझिक खाली दिलेल्या लिंकमद्धे आहे. खाली दिलेल्या शब्दांसोबत स्वत:लाही म्हणता येतं का बघा हे गीत...

Rain is pouring from the sky
Come brother let's get wet
Dont worry for mother
She won't get angree
Let's go out and get wet....(4)

Look at the streams
So lovely streams
Don't you like the shining beams? (2)

Come brother let's play
Dont worry for father
He wont get angry...
Rain is pouring from the sky...

Look at the frogs
Happy jumping frogs
From where they come
I know not (2)

Look at that rainbow
Seven color it has
isn't it a magic of the God?
rain is ...

http://yourlisten.com/sonawani/rain-is-pouring-from-the-sky

Saturday, December 14, 2013

जादू-टोणा विरोधी कायदा....

भारतीय दंडविधानानुसार फक्त पिडितच तक्रार करू शकतो. (खून-अपहरनाचा अपवाद). त्रयस्थाला पिडितातर्फे तक्रार करता येत नाही. जादु-टोणाविरोधी कायद्यात पिडिताची नेमकी काय व्याख्या केली आहे हे जरी स्पष्ट नसले तरी फार तर पिडितांचे नातेवाईक तक्रार करु शकतील. (अप्रत्यक्ष प्रभावित असल्याने.) अंधश्रद्धा निर्मुलन समितीला वा तत्सम अन्य कोणालाही बाधित/पिडित नसल्याने कोणाच्याही वतीने तक्रार करता येणार नाही. ते Law of Equity च्या विरोधात जाईल. सध्याच्या विधेयकात ज्या बाबी दंडार्ह ठरवल्या आहेत त्या बाबींसाठी पिडिताचीच तक्रार ग्राह्य धरणे संयुक्तिकच आहे. फार तर अंधश्रद्धा निर्मुलन समित्या किंवा जागरुक नागरिक पिडिताला तक्रार दाखल करण्यासाठीचे मार्गदर्शन करु शकतील...मदतही करु शकतील.

मग आता प्रश्न असा निर्माण होईल कि या कायद्याची गरजच काय होती? शारीरीक/मानसिक इजा पोहोचवनारी अंधश्रद्धेची(ही) सारीच कृत्ये दंडार्हच होती. फार तर शिक्षा पुर्वी कमी असेल. तशीही महत्तम शिक्षा कोणत्याही आरोपात क्वचितच व अपवादात्मक दिली जाते.

त्यामुळे आताचा जादु-टोनाविरोधीचा कायदा पांगळा म्हणण्यात अर्थ नाही. मुळात त्याची गरज होती काय हा खरा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. खरे तर या कायद्याने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या चळवळीतील एक प्रकारे हवाच काढून घेतली आहे. मुळ प्रश्न याने सुटेल काय? हा गहन प्रश्न आहे. अंधश्रद्धेचे पिडित स्वत: कितपत तक्रारदार बनतील हाही एक प्रश्न आहे. माझ्या मते असे घडण्याची शक्यता कमीच आहे. कारण आपण अंधश्रद्धाळू आहोत हे जर शिक्षित मान्य करत नसतील तर अशिक्षित मान्य करतील याची संभावना अत्यल्प आहे.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची काटेकोर व्याख्या करण्यात समाजशास्त्रीय तसेच मानसशास्त्रीय अडचनी आहेत. उदा. ज्योतिष. ज्योतिष ही श्रद्धा कि अंधश्रद्धा? याबाबत गोंधळ आहेच. या कायद्याने बगाडाला बंदी आहे कि नाही हे स्पष्ट नसले तरी मोहर्रमच्या स्वत:ला शारिरीक हानी पोचवणा-या बाबींना बंदी नाही म्हणजे त्यालाही नसावी. संतांनी खरोखरच चमत्कार केले ही श्रद्धा कि अंधश्रद्धा कि वास्तव? हभपंपुढे याबाबत चर्चा करायचीही हिंमत सरकार करणार नाही मग कायद्यात त्याचे काय प्रतिबिंब उमतनार. संतांचे चमत्कार मान्य केले तर सोनवणीचे चमत्कार अमान्य करायला अडचण का असावी? हा शुद्ध दांभिकपणा आहे.

म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवले ही अंधश्रद्धा समजायची नाही...त्याबाबतची प्रवचने लोकांनी "निर्मळ" मनाने ऐकायची...आणि स्वत: मात्र जीवनात अंधश्रद्धा जपायच्या नाहीत. सर्व संतांबाबत असेच म्हणता येईल. पण ते मात्र प्रवचनकारांना सांगायची मोकळीक द्यायची आणि त्याला अंधश्रद्धेच्या परिघातून बाहेर काढायचे, हे काय आहे?

आता "भोंदूबाबा" याची तरी नेमकी काय व्याख्या आहे? वरचे उदाहरण घेतले तर हे हभपही भोंदु बाबाच ठरतात कारण ते जे विज्ञानदृष्ट्या अशक्य आहे त्याचाच प्रचार करतात. हा भोंदुपना नाही काय? आजतागायत जे भोंदू बाबा पकडले गेलेत ते गांवा-खेड्यातले. शहरांतेल किती भोंदूवर कारवाई झाली हाही संशोधनाचा विषय आहे. कार्यालये थाटून बसलेले भोंदू कायद्याच्या कचाट्यात येत नाहीत...आले तर तोडपानी करुन सुटतात हा आजवरचा इतिहास आहे. सत्य साईबाबाचे काय झाले? पंतप्रधानांपासून अगदी सचिनसारखा क्रिकेटपटू त्याच्या कच्छपी होता. ती अंधश्रद्धा नव्हती काय?

थोडक्यात मला वाटते जादू-टोना विरोधी कायदा प्रभावी ठरण्याची शक्यता नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत सातत्याने समाजाचे प्रबोधन करणे हाच यथोचित मार्ग आहे. कोणालाही (स्वत:लाही) इजा अथवा आर्थिक नुकसान पोचवनार नाही अशा श्रद्धांना विरोध न करता हानिकारक सर्वच बाबींना विरोध करत रहावे लागेल.  


Wednesday, December 11, 2013

कोठे तरी...

कोठे तरी आपल्याला थांबावेच लागते...
मागे वळून पाहण्यासाठी नव्हे किंवा
पुढच्या चढनीचा अंदाज घेण्यासाठी नव्हे 
तर
आपण मुळात चालतच का आहोत 
याचा अंतर्वेध घेण्यासाठी!

Tuesday, December 10, 2013

सर्व बेड्या तोडून!

मानवी जीवन विलक्षण आहे. खरे म्हणजे आपण जगतो खरे पण नेमके काय जगतो याचे भान येते तेंव्हा खूप उशिरही झालेला असतो. खरे तर जगत असतांनाच आपली जगण्याशीची नाळ कधी तुटून गेली हेही आपल्या लक्षात येत नाही. श्वास घेणे आणि सोदने...जीवघेणी धाव घेत राहणे आणि ही धावही का हे नुमजताच धावत राहणे...कारण सारेच धावतांना दिसतात म्हणून! आमचे जीवन कधी हरपून जाते हे लक्षातच येत नाही.

आपण थांबत का नाही? आपल्याला हे अचाट पण बेजान धावण्याचे वेड कोणी दिले? आपल्याच संस्कृतीने आणि समाजाने ना? समाजाने निर्माण केलेल्या भ्रामक-अर्धभ्रामक स्वप्नांत आपल्याला गुरफटवतच धावायला भाग पाडलेय ना?

कोठे गेले मग माणसाचे मूक्त स्वातंत्र्य. गांधीजी म्हणत मला फक्त देशाचे नव्हे तर मानवाचे स्वातंत्र्य पाहिजे आहे. होय...मानवाचे स्वातंत्र्य सर्वोपरी आहे. तेच आपण जर गमावले असेल तर आपले जगणे हे खरे जगणे आहे काय?

रुढ विचारधारांना, रुढ इतिहासांना, रुढ जगण्यांना आणि रुढ धर्मकल्पनांना आव्हान दिलेले चालत नाही म्हणून जर कोणी मूक राहत असतील तर ते स्वातंत्र्य कसले?

माणसाचे स्वातंत्र्य समाजच कुंठित करत असतो. खरे तर समाज हा नेहमीच स्वातंत्र्याचा पहिला शत्रु असतो...मग राजकीय स्वातंत्र्य भलेही असो अथवा नसो. समाजच आपल्या बोकांडी कोणाला बसवायचे हे ठरवतो. समाजातील तथाकथित आंतरप्रवाह हे शेवटी वर्चस्वतावादासाठीच वाहत असतात. सर्व प्रवाहांचे एकमेव उद्दिष्ट असते...माणसाला कसे गुलाम करता येईल.

आणि स्वत:लाही एखाद्या बेडीत कसे अडकविता येईल.

माणसांनीच माणसांना आणि स्वत:लाही गुलाम करण्याचा इतिहास हाच मानवाचा इतिहास आहे.

कोणाला दुखवायचे नाही कारण दुखावले तर तुमची सामाजिक प्रतिष्ठा...मान्यता धोक्यात येणार असते म्हणून तुम्ही ठरवून टाकता कोणाला...किमान स्व-समाजाला दुखवायचे नाही. इतर कोणा समाजाला दुखावले तर स्व-समाजाला जर समाधानच मिळणार असेल तर निर्धास्त दुखवावे कारण काही विपरित झाले तर स्व-समाज तुमच्या पाठीशी आहे. अशा सुरक्षित परिस्थितीत जर आम्ही आमचे स्वातंत्र्य वापरत असू तर ते स्वातंत्र्य कसे?

आमचे हृदयस्थ बोल...ते चुकीचे कि बरोबर...जोवर स्व-प्रामाणिक आहेत तोवर स्वतंत्र आहेत. पण आम्ही बाह्य परिप्रेक्षाशी जुळवून घेणारे आमचेच बोल बदलत असू तर आम्ही मूक्त कसे?

पण आपण पाहतो कि माणुस आजही कळपात राहतो. त्याच्या स्वातंत्र्याचे अपहरण त्याच्या कळप-भावनेने आधीच केलेले असते. "स्वयमेव मृगेंद्रता" आमच्या वाट्यास कधी येतच नाही. कारण ती हिम्मत नसते.

ती हिम्मत नसते कारण कळपभावनेने तिचे आधीच अपहरण केलेले असते. स्व-कळपाला व कळपभावनेला साजेशीच भाषा-विचार-संस्कृती मांडण्याचे बंधन आपसूक आलेले असते. तसे करण्यातच सुरक्षितता आहे असे वाटते.

पण ही सुरक्षिततता खरी असते काय? मुळात यच्चयावत विश्वातील एकही जीव केवळ कळपात आहे, सामाजिक बंधनांचे पुरेपूर पालन करतो म्हणुन सुरक्षित आहे काय?

जरा विचार केला कि लक्षात येईल कि मुळात सुरक्षित नसणे हाच जीवनाचा-जगण्याचा पहिला नियम आहे.

मग तुम्ही समाजाच्या कथित नीतिबंधनात असा अथवा नसा. कळपात असा अथवा नसा.

मग कळपभावनेतून येणारी सुरक्षितता आम्हाला का प्रेय वाटते?

आम्हाला आम्हीच ओढवून घेतलेले पारतंत्र्य का हवेसे वाटते?

आणि जर आम्हाला एवढेच पारतंत्र प्रिय आहे तर आम्ही नेमक्या कोणत्या स्वातंत्र्याबद्दल बोलत असतो?

एका पाश्चात्य नीतिविदाने (बहुदा नित्शे) म्हटले आहे कि मनुष्य जन्माला येतो तोच क्षण त्याचा स्वातंत्र्याचा असतो. पुढे तो परिस्थितीचा आपसूक गुलाम होतो.

काही गुलाम्या जगण्यासाठी आवश्यक मानल्या तर जगणे हे गुलामीच्या कुबड्यांवर चालते असे म्हणावे लागेल. नवे तत्वविद कदाचित म्हणतील कि छे...ती मुळात गुलामी नसून माणसाच्या जगण्यासाठीची अपरिहार्य परिस्थिती आहे. बरे...आपण तेही मान्य करू...पण मग आम्हीच मुलांचे...म्हणजे पुढील पिढ्यांचे मानसिक संयोजन (कंडिशनिंग) का करतो? स्वत:ची, समाजाची, राष्ट्राची आणि धर्माचीही स्वप्ने इतरांवर लादत असता त्यांच्यावर का लादत जातो?

याचे उत्तर असे आहे कि आम्ही स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी पुढची पिढीही जवळपास आमच्यासारखीच करण्याच्या नादात त्यांना मानसिक गुलाम करत जातो. आम्हाला हवे तसेच नवे शोध आम्ही स्विकारतो. आम्हाला हवेत तसेच नवे म्हणवले जानारे पण जुनेच विचार आम्ही नव्या भाषेत स्विकारत जातो.

पण आम्ही खरेच नवे स्विकारतो का?

आमची नव्याची व्याख्या तरी काय असते शेवटी?

आम्ही बव्हंशी आमची नव्याची व्याख्या जुन्या गतकाळातील लोकांशी किंवा मतांशी जुळवत असतो. आम्हाला सर्वस्वी नवे नकोच असते. आम्हाला नव्याची भिती वाटते. जगातील कोणत्याही धर्माचे लोक असोत...कोणत्याही राजकीय अथवा आर्थिक व्यवस्थेत राहनारे लोक असोत...माणसाची धाव ही भविष्याकडे कमी...गतकाळाकडे अधिक असते. समजा एखाद्या इमारतीला आग लागली तर लोक नकळत खाली पळण्याऐवजी वरच्या मजल्यांकडे धावतात. तेथे प्रात्यक्षिक सुरक्षा नसते...मानसिक सुरक्षा असते. माणुस गतकालाला नेहमीच एखाद्या गुहेसारखा लपण्याचा मार्ग समजतो.

माणुस गतकाळाचाही गुलाम होतो तो असा.

म्हणून गतकालच नासवणारे नतद्रष्ट या समाजात असतातच. किंबहुना इतिहास नासवण्याचे कार्य निष्ठेने वर्तमानात पार पाडले
जाते ते यामुळेच. लपण्याची गुहाही कुंठित केली जाते ती अशी.

मग माणुस ना वर्तमान, ना भुतकाळ आणि मग स्वभावत:च धुक्याने ग्रासले गेलेले भवितव्य अशा कोंडीत जो सापडतो तो कधी त्यातून बाहेरच येत नाही.

हे जगणे आहे कि जगण्याचे मेलेलेपण येशुप्रमाने स्वत:च्या खांद्यावर वाहून नेणे आहे?

आम्हा जगणा-यांना यावर विचार केलाच पाहिजे...

आमच्या स्वातंत्र्याचा मार्ग आम्ही शोधलाच पाहिजे...सर्व बेड्या तोडून!

पुरोगामी होणे फार सोपे आहे.....

"देवा-धर्माला, परंपरांना नाकारणे आणि ब्राह्मणांना शिव्या देणे एवढीच आपली पुरोगामीपणाची संकुचित व्याख्या करुन घेतली आहे. ती व्याख्या चुकीची आहे. ब्राह्मनांना शिव्या देणे व त्यांना समाजापेक्षा वेगळे समजणे यामुळे समतेचे तत्वकारण पुढे जात नाही....जावू शकणार नाही. देवाधर्माला नाकारणे ही व्यक्तिगत पातळीवरची बाब झाली. ती सामुदायिक बनू शकत नाही. तसा बनवायचा प्रयत्न समाजाला पुढे नेण्यात यशस्वी ठरत नाही. फार तर व्यवहारातून त्यांचे महत्व कमी करत राहता येवू शकते.

"पुरोगामीपनाची व्याख्या व्यापक आहे. आज आपण आर्थिक/वैचारिक/ज्ञानात्मक दृष्ट्या जिथे आहोत त्यापुढे उद्या असणे हे पुरोगामीपणाचे लक्षण आहे. त्यासाठी सतत चिंतन/मनन करत तसे जीवनाचरण करणेही तेवढेच महत्वाचे आहे.

"पुरोगामीपणा हा राजकारण, अर्थकारण तसेच समाजकारणाशीही निगडित आहे. महाराष्ट्राचा पुरोगामीचा इतिहास उज्वल असला तरी यशवंतराव चव्हाणांनंतरचा काळ पाहिला तर आपण या सर्वच क्षेत्रांत प्रतिगामी झालो आहोत असे दिसून येईल. आपले राजकारण जातींपार जाण्याऐवजी जातीनिष्ठ झाले आहे हे वास्तव असेल तर आपण कसे पुरोगामी? १९९२ नंतर धर्मांनी कधी नव्हे एवढी उचल खात हिंसकतेला बळ दिले हे आपल्या पुरोगामीतेचे लक्षण आहे काय? आजही कोणताही पक्ष जातीय विचार करुनच आपले उमेदवार देतो. यामुळे पुरोगाम्यांचे जातीविरहित समाजाचे स्वप्न साकार होणार नाही. खरे तर आजच्या जातीयतेला आरक्षणापेक्षा राजकारण्यांनाच जबाबदार धरायला हवे...पण पुरोगामी विचारवंतच कोणत्या ना कोणत्या राजकारण्याच्या कंपुत आपापल्या जाती घेऊन असतात...अशा अवस्थेत पुरोगामी म्हनवणे हा निव्वळ दांभिकपणा आहे.

 दुसरे, पुरोगामीता ही अर्थ क्षेत्रातही असते याचे भान आम्ही गमावले आहे. जशी सामाजिक लोकशाही असते तशी प्रादेशिक विकासातही लोकशाही हवी. म्हणजे समान विकासाच्या संध्या आणि त्यानुरुप सुविधा सर्वच प्रदेशांत हव्यात. पण आमचा विकास मुळात असंतुलित आहे. पश्चिम महाराष्ट्राचा नको तेवढा विकास आणि मराठवादा-विदर्भ भकास हे चित्र पुरोगामीतेला साजेशे नाही.  विकेंद्रीकरण करत सर्वच प्रदेशांचे संतुलित विकसन आम्हाला जमले नाही. पाण्यावर प्रत्येकाचा समान हक्क असुनही ७०% पाणी पश्चिम महाराष्ट्रच खातो. पश्चिम महाराष्ट्रात शहरे बेशिस्तीने वाढली कारण उद्योगधंदेही तिकडेच केंद्रीत. यामुळे ज्या सामाजिक/सांस्कृतिक/आर्थिक समस्या वाढल्या त्याचे निराकरण करायला आम्ही कमी पडतो. बकालपणा हीच जर आम्हाला प्रगती वाटत असेल तर आम्ही पुरोगामी कसे?

आम्ही लोक...या देशाचे लोक कोणत्या नैतिकतेला आज मानतो हेही तपासून पहायला पाहिजे. "प्रजेला आपल्या लायकीप्रमानेच शासक मिळतात" या उक्तीप्रमाने राजकीय क्षेत्रातील अध:पतनाला आम्हीच जबाबदार आहोत. पण आम्हाला आमची कोणतीही जबाबदारी नको आहे. आम्हाला आमच्या नेत्यांना शिव्या घालण्याचा काय अधिकार आहे? आम्ही भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जनलोकपाल मागतो...पण भ्रष्टाचार हा एकतर्फी नसतो, त्याला देणारे म्हणुन आमचाही हातभारच असतो हे मात्र आम्ही विसरतो.

आमच्या पिढ्या अशाच वाया गेल्या. आम्ही नुसते शिकलो...भले डाक्टर-वकील झाले असू...पण आमचे मानसिकता मात्र अशिक्षितासारखीच आहे. आम्हाला आमच्या मुलांना मोकळे आकाश देण्याची भिती वाटते. मुलगा संगीतकार-नाटककार बनावा...चित्रकार बनावा, सारे आयुष्य त्यासाठी द्यावे असे वाटत नाही. आम्ही त्यांचे पंख छाटतो. त्याला कमाईचे मशिन बनवू पहातो. जीवन न समजावुन न घेता जगायला सांगतो. असे आम्ही आई-बाप असू तर मुक्त मनाची सबळ पिढी कशी निर्माण होईल? आम्हाला आमचीही पुढची पिढी नोकरदारच व्हावी वाटत असेल तर आम्ही कधी महासत्ता होणार? मुलांना निकोप वाढीचे स्वातंत्र्य नाकारणारे आम्ही कसले पालक आहोत?

आज आपण जागतिकीकरणाच्या लाटेत आलो आहोत. घरोघर...अगदी झोपड्यांत सुद्धा आधुनिक साधने प्रवेशली आहेत. विज्ञानाची फळे आम्ही सर्वच चाखत आहोत...पण आज बुवा-बापुंचे पेव कधी नव्हे एवढे फुटले आहे. प्रत्येकजण कोणा-ना-कोणाचा भक्त आहे. भक्ती वाईट नाही...पण ती सरळ परमेश्वराची करण्याऐवजी आम्हाला दलाल लागत आहेत. ते बरबटलेले असले...लिंगपिसाट असले तरी आमची त्यांच्यावरची भक्ती कमी होत नसेल तर आम्ही पुरोगामी राज्याचे नागरिक कसे? उलट आम्ही दिवसेंदिवस प्रतिगामी बनत मध्ययुगात जात आहोत. आणि ही बलजबरी कोभ्णी केलेली नाही...ही स्वत:चा अंत घडवणारी स्वेच्छा आहे याचे भान आम्हाला जर नाही तर या आधुनिक जगाचा आम्हाला काय उपयोग आहे?

दाभोळकरांचा खून पुण्यात होतो. ते स्वत:साठी नव्हे... तुमच्या-आमच्या सर्वांसाठी लढत होते...आमच्याच भावी पिढ्या निकोप आणि स्वच्छ मनाच्या बनाव्या यासाठी झगडत होते. त्यांचा खून झाला. पण त्यांच्या खुन्यांना पकडायची मागणी करण्यासाठी फक्त त्यांचेच कार्यकर्ते जमावेत-मोर्चे काढावेत..? जर ते लढत होते ते जर आपल्यासाठी तर आम्ही कितीजण रस्त्यावर आलो? दाभोळकरांची हत्या हा सर्व विचारकांना इशारा होता. विचारकांनी गप्प बसावे नाहीतर "तुमचा दाभोळकर करु" अशा धमक्या सदानंद मोरे-हरी नरके यांना आजही जात असतील आणि आम्ही सारेच डोळ्यावर कातडे पांघरणार असू तर आम्ही पुरोगामी कसे? ते आमच्यासाठी, आमच्या भावी पिढ्यांसाठीच लढत होते आणि आहेत ना? मग आम्ही कसे वागतो यावर कधी विचार करणार?

पुरोगामी होणे फार सोपे आहे. पुढे डोळे उघडे ठेऊन चालत रहा. सर्व काही नीट समजावून घ्या. भावनांच्या लाटांवर वाहत जाऊ नका. ज्ञाननिष्ठ बना. पण आम्हाला बहुदा ज्ञानाची भिती वाटते. म्हणून आम्ही झापडबंद झालो आहोत. सर्वच अनैतिकतेला आम्ही मूक पाठिंबाच देत नाही तर स्वत:ही अनैतिक बनलो आहोत. महाराष्ट्र पुरोगामी नाही. तो पुरोगामी आहे हीच आपली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. सर्वप्रथम या अंधश्रद्धेला दूर सारुन स्वच्छपणे स्वत:कडे पहायला हवे."

-यशवंतराव चव्हाण यांच्या २९ व्या स्मृती समारोहात उद्घाटनपर भाषण देतांना मी मांडलेले काही मुद्दे. मंचावर श्री. दगडू लोमटे, श्री. बाबा बांड आणि श्री. गिरधारीलाल भराडिया.

Monday, December 9, 2013

अमानूष: एक थरार

माणुस वेडा असतो. तो कसलं तरी वेड घेतो आणि ते पुर्ण करायला धावतो. मी तर ठार वेडा. मी नुसती स्वप्न पहात नाही. स्वप्न पहातो आणि ती पुर्ण करण्याची शिकस्त करतो. "अमानुष: एक थरार" हा चित्रपट मी अशाच झपाटलेल्या वेडेपणातून पुर्ण केला. पैशांची कमतरता...नुकत्याच भयाण संकटातून बाहेर आलेलो...पुरता बदनाम झालेलो. पण खचणा-यांपैकी मी तरी नक्कीच नाही. आयुष्यच संकटांनी भरलेलं. थांबून कसं चालेल?

अमानुषची कथा मला सांगलीच्या जेलमद्धे सुचली. बाहेर आल्यावर मी पहिलं कोणतं काम केलं असेल तर ते म्हणजे पटकथा लिहिण्याचं. मूळ कथेला न्याय द्यायचा तर पैसा बराच लागणार होता आणि मी तर होतो कफल्लक. दुस-याकडे हात पसरण्याची स्थितीही नव्हती. मी शेवटी माझा फ्ल्यट गहान ठेवला...७ लाख रुपये उभे केले. या बजेतमद्धे चित्रपट करायचा तर मलाच ब-याच भुमिका निभवाव्या लागणार होत्या...आणि त्या मी निभावल्या. म्हणजे दिग्दर्शन, अभिनय, संगीतकार ते गायक...तरीही ७ लाखात मी फक्त शुटिंग पुर्ण करु शकत होतो...पोस्ट प्रोडक्शनला जवळपास तेवढेच पैसे लागणार होते. पण म्हटलो...नंतरचं नंतर बघु...पण शुटिंगच्या दरम्यानच माझे निर्मिती व्यवस्थापक राज उमरकर यांना काय रस वाटला कोणास ठाउक...ते भागीदार बनायला स्वत:हून पुढे आले...काम झाले. हा चित्रपट मी जेथे पावनेदोन महिने जेलमद्धे राहिलो तेथे...सांगलीत प्रथम रिलीज केला. हा चित्रपट तसा वेगळा...जेमतेम दोन आठवडे त्याने तेथे दम धरला...पण म्हटले ना...मी ठार वेडा माणूस आहे...

पण या चित्रपटाने मला दोन पैसे मिळवून दिले हेही खरे. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार!

असो.

हा चित्रपट फिरतो तो डा. विक्रम चौधरी या मृत्युवर संशोधन करणा-या शास्त्रज्ञाभोवती. तो अलीकडेच एका भिषण प्रसंगातून गेलेला. एका रिसोर्टमद्धे परिषदेसाठी जमलेल्या सर्वच शास्त्रज्ञांची निघृण हत्या होते. फिरायला गेला होता म्हणून हा एकमेव वाचलेला. त्याचे सावट (कि गतायुष्यातील काही घटनांचेही?) बाळगत हा राहतोय निर्जन भागातील एकाकी बंगल्यात...एकटाच...संशोधनात गढलेला. चिडचिडा बनलेला.

त्याच्या बंगल्याजवळ का न कळे कधी काळीच जाणारी वाहने बंद पडतात. लोक मदत मागायला शेवटी त्याच्याकडेच जातात. ते आत जसे जातात तसे बाहेरही पडतात. पण का नकळे ते गायब होतात.

पोलिस अजुनही रिसोर्टवरील घटनेचा तपास करताहेत. त्यात या अदृष्य होणा-या माणसांच्या घटना. दुवा एकच...डा. चौधरींचा बंगला...आणि त्या भिषण हत्याकांडातून वाचलेला एकमेव माणूस...डा. चौधरी. पण तो मोठा माणूस आणि त्याच्याविरुद्ध तर एकही पुरावा नाही....

त्यात डा. चौधरीला भेटायला येते त्याची जुनी प्रेयसी. माया. ती त्याला तेथे यायला नकोशी वाटतेय. तो तिला टाळायचा...लवकरात लवकर घालवायचा आटोकाट प्रयत्न करतोय. तिच्यावरील प्रेमही लपवता येत नाहीय आणि गतकाळाची भुतेही पाठ सोडत नाहीत...असह्य कोंडमा-यात सापडलेला माणूस...आणि बंगल्यावर झाकोळलेली गुढाची छाया...

मायाला हे काय माहित? ती स्वप्न पहात आलेली साधी तरुणी. तिचे अबोध प्रेम उचंबळतेय...ते विक्रमलाही समजतेय...पण साराच नाईलाज...

तिला अचानक आलेल्या पावसामुळे त्याच्या बंगल्यात थांबावेच लागते...आणि तिला भयानक अनुभवांतून जावेच लागते. अटळ नियतीच जशी.

खाली चित्रपटाची लिंक दिली आहे. यात अभिनय करणे हे आव्हान होते. सतत तणावाखाली असलेला, गतकालाची अनाम ओझी वागवनारा आणि तरीही ते दाखवायचा प्रयत्न न करनारा माणुस मला उभा करायचा होता. मला ते जमले कि नाही माहित नाही. प्रज्ञा जाधव ही नवखी नायिका...तिने मात्र समजून उत्तम अभिनय केला. या चित्रपटाचे शुटिंग अवघ्या सात दिवसात संपवले. रात्रंदिवस मला सर्वांनी अनमोल सहकार्य केले. छायाचित्रण करणारे गोपाळ तर भारीच! मी चित्रपटाची लय संथ ठेवली. मानवी संबंधातील गुढे, मृत्युचे तत्वज्ञान आणि त्याचे वास्तव संदर्भ यात टिपले...मराठीत असे चित्रपट दुर्मिळच! मी अशा एका वेगळ्या पण सर्वांशी सम्बंधित विषयावर चित्रपट काढु शकलो याचे मला अप्रूप आहेच.

बघा...आणि ठरवा...

http://www.youtube.com/watch?v=C5S9TkGhQ78


Thursday, November 28, 2013

प्रकाशासाठी....!

माझ्यासमोर खडा 
भरभक्कम
अंधाराचा सरळसोट
पहाड
चारी बाजुंनी होणारे त्याचे
ओंगळ स्पर्श
बेभान विचकट 
हसणारी
उपेक्षांची वादळे
कधीही रसातळाला 
पाठवू शकतील मला
अशी
पण मी प्रयत्न करतोय
चढायचा
तो अंधाराचा
भिषण कडा
हात चेमटत असले तरी
पाय सोलवटत असले तरी
ठेवून जातो शरीरातील
वाहता
रक्तमय प्रकाश
माझ्यासारख्या वेड्यांना
मी पोहोचलो तरी होतो
कुठवर हे समजण्यासाठी...!

कोसळलो जरी मी मधेच
खाईत अंधाराच्या
माझे प्रकाशमय रक्त
खुणावत राहील
अंधारकड्यापारच्या
प्रकाशाला
स्वच्छ आणि तेजोमय
पण
जोवर थकून कोसळत नाही मी
चढत राहिलेच पाहिजे...
कासाविस वेदनांना
अंधारात लपवलेच पाहिजे...

प्रकाशासाठी....!

वडार समाजाचा इतिहास



वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भाषाभेदामुळे या समाजाला वेगवेगळी नांवे मिळालेली दिसतात. उदा. महाराश्ट्रात वडार म्हणत असले तर कर्नाटकात त्यांनाच वड्डर म्हणून ओळखले जाते. आंध्रात याच समाजाला वड्डोल्लु वा ओड्डर असे म्हटले जाते तर तमिळनाडूत ओट्टन नायकन वा ओड्डर म्हणुन ओळखले जाते. गुजरात व उत्तरेतील इतर राज्यात त्यांना ओड अथवा ओडिया म्हणून ओळखले जाते.

मूळ व मूळस्थान:

आजवर जे लिखित संदर्भ सापडलेले आहेत त्यावरून ओडिसा हे वडारी समाजाचे मुलस्थान आहे असे विविध संशोधकांनी सिद्ध केले आहे.  १८७१ सालच्या जनगणणेच्या अहवालात "देशाच्या विविध भागात सापडणारे वड्डा(र) हे मुळचे ओडिसा व आंध्र प्रांतातील आहेत." असे नमूद करुन व्यवसायानिमित्त ते इतरत्र पांगले असे नोंदले आहे. "वड्डा" या शब्दाचा शब्दश: अर्थ होतो "ओड्र देशाचा. म्हणजे ओडिसाचा" असे १९०९ मद्धे थर्स्टनने नोंदवले आहे. ओड शब्दातुनच ओडिया, ओड्ड, वोडे, वडार, वड्डर, ओटन, वोड्डे ई. हे शब्द प्रांतनिहाय प्रचलित झाले.  ओडिया लोक राजपुतानामार्गे पंजाबमद्धे विस्थापित झाले असे हयवदन राव यांनी पुराव्यांनी दाखवून दिले आहे. (१९२७) हे झाले इंग्रजकाळातील वडार समाजाबाबतचे संशोधन.

आपण अजून मागे गेल्यास "ओड" "आंध्र" ही नांवे औंड्र या पुरातन मानववंशापासुन आली आहेत असे दिसून येते. औंड्र हा भारतातील एक पुरातन मानवगण आहे. या गणाचे वास्तव्य प्राचीन काळापासुन ओडिसा, आंध्र व काही प्रमाणात महाराष्ट्र हे राहिले आहे. ऐतरेय ब्राह्मणानुसार हे विश्वामित्राचे पुत्र होते व त्याने "शूद्र व्हाल व दक्षीणेत राज्ये वसवाल" असा शाप दिला होता. महाभारतानुसार औंड्र, पुंड्र हे बळीराजाचे पूत्र होते. त्यांनी स्थापन केलेली राज्ये त्यांच्या नांवावरुन ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रातील साडेचारशे वर्ष सत्ता गाजवणारे सातवाहन घराणेही औंड्र उर्फ आंध्र जातीचे होते.

थोडक्यात ओड उर्फ वड्डर, ओडर, वडार यांचे मुळ औंड्र या अतिप्राचीन मानवगणात जाते. ती ओळख व नांवाची खुण वडार समाजाने जतन करुन ठेवली आहे.

महाभारत व ऐतरेय ब्राह्मणातील अतिशयोक्तीचा भाग सोडून दिला तरी हा एक पुरातन मानवगण होता याबाबत शंका राहत नाही. आजचे वडार हे याच मानवगणाचे अंश होत असे म्हनणे वावगे होत नाही. औंड्र/पुंड्र हे मानवगण शिवभक्त होते त्यामुळेच कि काय आंढ्र-ओडिसामद्धे आजही विपूल प्रमाणात पुरातन शिवमंदिरे आढळतात.

मुळ व्यवसाय:

वडारांच्या व्यवसायाचे मूळ शोधायला गेलो तर आपल्याला लाखो वर्ष मागे जावे लागते. मानवी संस्कृतीच्या प्रवासात अनेक युगे अवतरली, त्यातील एक म्हणजे पाषाणयुग अथवा अश्मयुग होय. आदीमानवाने पाषाणांपासुन विविध हत्यारे तयार करायला सुरुवात केली तेथेच या युगाचा उदय झाला. दगडांपासून हातकु-हाड, तासण्या, पाटे-वरवंटे ई. बनु लागले तर गारगोट्यांपासुन बाणांची टोके, टोचे ते अगदी सुयासुद्धा बनू लागल्या. हे काम कष्टाचे असणार यात शंका नाही. जेथे उत्तम प्रतीचा दगड मिळत असे तेथे अशी हत्यारे व अन्य मानवोपयोगी वस्तु बनवण्याचे लघुत्तम कारखानेच सापडले आहेत. महाराष्ट्रात धुळे, नेवासे, बोरी, चिरकी येथे अशी हत्यारनिर्मिती केंद्रे उत्खननांत सापडली आहेत. याचा अर्थ असा होतो कि पुरातन काळीच दगडापासून उपयुक्त वस्तु बनवू शकणारा वर्ग उदयाला आला होता. किंबहुना याला आद्य व्यवसाय म्हणता येईल.

पुढे शेतीचा शोध लागला. माणुस स्थिर झाला. घरे बांधु लागला. उत्तरेत गाळाच्या मातीचे प्रमाण जास्त असल्याने घरबांधणीसाठी दगडाऐवजी कच्च्या व नंतर पक्क्या वीटांचा तर काही ठिकाणी लाकडाचा उपयोग होऊ लागला. सिंधू संस्कृतीतील सर्व घरे आपल्याला वीटांत बांधलेली दिसतात तर दगडाचा उपयोग फारच कमी व मर्यादित दिसतो. मात्र दक्षीणेत वेगळी स्थिती होती. दक्खनचे पठार व सह्याद्री बेसाल्ट जातीच्या पाषाणाच्या विपूलतेसाठी प्रसिद्ध आहे. पाषाणकार्यात तरबेज लोक दक्षीणेतच अधिक प्रमाणात विकसीत होणे स्वाभाविक होते. वडार समाजाच्या अधिकाधिक वसत्या दक्खनेत त्यामुळेच बनल्या असाव्यात.

जाते हे साध्या प्रकारचे दळण्याचे यंत्र. याचा शोध इसपू १००० च्या आसपास लागला. नेवासे येथे असे पुरातन जाते मिळुन आले आहे. पाटा-वरवंट्यावर धान्य बारीक करण्याऐवजी लोक जात्यांचा वापर करु लागले. वडार समाजातील एक शाखा त्यात प्राविण्य मिळवून एक पोटजात बनली.

वडार समाज हा मुळचा पाथरवट समाज. पत्थरांशी नाळ जोडलेला. घरे-नगर-किल्ले यांची बांधकामे ते लेण्यांची रचना-खोदकाम यात निष्णात. महाराष्ट्रात आजवर हजारापेक्षा अधिक लेणी सापडलेली आहेत. सातवाहन काळात लेणी खोदण्याची परंपरा महाराष्ट्रात सुरु झाली. बौद्ध-शैव-जैन लेण्यांची समृद्धता पाहून आजही चकित व्हायला होते. खडकाच्या अखंडतेचे अंदाज बांधणे, संकल्पचित्र ठरवणे व त्यांना प्रत्यक्ष खोदून आकाराला आणणे हे आजही सोपे काम नाही. त्यावेळीस मर्यादित साधनांच्या मदतीने असे शिक्ल्पवैभव निर्माण केले गेले ते या वडार समाजाच्या पाषाणकौशल्याने.

सातवाहन काळात वडारांना सेल वढकी अथवा वढकी असे म्हटले जात असे.अनेक शिलालेखांत ही नांवे पाथरवटाचा पर्यायवाची म्हणून हा शब्द आला आहे. किल्ल्यांची रचनाही याच काळात सुरु झाली. त्यासाठी लागणारे पत्थर घडवणे, गवंड्यांच्या मदतीने त्यांची रचना करत अभेद्य असे बुरुज व तटबंद्या निर्माण करणे या कामात मध्ययुगापर्यंत हा समाज अग्रेसर होता.

कामाचे स्वरूप असे असल्याने हा समाज साहजिकच एक काम संपले कि दुस-या कामासाठी दुसरीकडे विस्थापित होत होता. भटकेपण या समाजाला चिकटले ते या समाजाची अपरिहार्यता म्हणुन. पाषाणकार्यात अनेक प्रकार आल्याने त्या त्या कामात प्राविण्य मिळवणा-यांच्या पोटजाती बनु लागल्या. मण्ण अथवा माती वडार हे मृत्तिकाकार्यात कुशल. गाडीवडार हे दगडाची खाण करुन दगड वाहण्यात तसेच विहिरी-तळी खोदणारे, पाथरवट हे लेणी-मंदिरे ई. कामांत कुशल. कल्ल वडार हे जाती, पाटे, वरवंटे यात कुशल.

मुळात या व्यवसायात जितके कौशल्य हवे असते तितकेच ते काम कष्टाचेही. मोठमोठे पाषाणखंड तोडुन चिरे घडवणे ते दगडी वस्तु बनवण्यासाठी शारीरिक शक्तीचीही तेवढीच आवश्यकता. त्यामुळेच कि काय महाबली बजरंग या समाजाचे आराध्य न बनता तरच नवल. या समाजात स्त्रीयांनाही बरोबरीचे स्थान. स्त्रीया पुरुषांइतकीच कष्टाची कामे करत असत.

या समाजाने आजवर निर्माण झालेल्या महाकाय वास्तू, लेणी, किल्ले, वाडे, सामान्य घरे ते रस्ते, तळी, विहीरींच्या निर्मितीचे काम केले आहे. त्या दृष्टीने पाहिल्यास वडार समाजाचा इतिहास गौरवशाली आहे, अत्यंत मोलाचा आहे...किंबहुना आपल्याला इतिहासातील वेगवेगळ्या काळांचा इतिहास समजतो तो याच समाजाने बांधकाम केलेल्या वास्तुंच्या अवशेषांतुन. त्यांचे कौशल्य किती उच्च दर्जाचे होते याचे पुरावे तर ठायी ठायी मिळतात. दुर्दैवाने ज्या राजांनी अथवा धनिकांनी बांधकामे करवून घेतली त्यांच्या नोंदी मिळत असल्या तरी वडा-यांबाबतच्या नोंदी मिळत नाहीत. याचे कारण म्हणजे आपल्याकडे तशी प्रथा नाही. निर्माणकर्त्यांची नांवे सहसा कोठेही मिळत नाहीत. पण काहीही असले तरी समाजसंस्कृती घडवण्यात या समाजाचा मोठा वाटा होता हे नाकारता येत नाही.

पुराकथा:

भारतातील प्रत्येक समाजाचा स्वत:चा असा पुरा-इतिहास आहे व तो त्यांनी पुराकथांतून जपला आहे. आपापल्या व्यवसायाचा-सामाजिक स्थितीचा, सामाजिक अवस्थेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत कधीतरी या पुराकथा निर्माण झाल्या. वडार समाजही त्याला अपवाद नाही.
वडार समाजातही अनेक पुराकथा आहेत.येथे आपण काही मोजक्या पुराकथांचा मागोवा घेऊ.

१. शिव-पार्वती एकदा भूलोकी संचार करायला आले. नेमका तेंव्हा कडक उन्हाळा होता. प्रचंड उष्म्यामुळे दोघांना तहान लागली. शिवाने आपल्या घर्मबिंदूंतून कुदळ-फावड्यासहित एक माणुस निर्माण केला. पार्वतीच्या घर्मबिंदूंतून एक स्त्री घमेल्यासह निर्माण झाली. या जोडप्याला शिव-पार्वतीने विहिर खोदायला सांगितली. जोडप्याने काही वेळात विहिर खोदली. विहिरीतील पाणी पिउन शिव-पार्वती तृप्त झाले. त्यानंतर शिव-पार्वतीने जोडप्याला अमूल्य उपहार दिले. पण जोडपे खूष झाले नाही. यावर शिव संतप्त झाला व त्याने शाप दिला कि "तुम्हाला पोट भरण्यासाठी घामच गाळावा लागेल..."

आपले काम कष्टाचे आहे या जाणीवेतून ही शापकथा कधीतरी निर्माण केली गेली हे उघड आहे. पण त्याच वेळीस आपली निर्मिती शिव-पार्वतीपासून झाली आहे हा शैव असण्याचा अभिमानही त्यातून जपला गेला आहे.

२. प्रचंड दुष्काळ पडल्याने भगिरथाचे भाऊ पाण्याच्या शोधात पृथ्वी खोदू लागले. खोदत खोदत ते पार पाताळापर्यंत जाउन पोचले. तेथे एक मुनी ध्यानस्थ बसलेले होते...पण या खोदाईने त्यांची समाधी भंग पावली त्यामुळे ते संतप्त झाले. मुनीने त्यांना केवल कृद्ध नजरेने जाळुन टाकले. व "तुमचे वंशज खोदकामच करत राहतील..." असा शाप दिला. इकडे आपले भाऊ दिसत नाहीत म्हटल्यावर भगिरथ त्यांना शोधत पाताळात येऊन पोहोचला. आपले भाऊ जळून खाक झालेले आहेत हे पाहून तो दुक्खी झाला व मुनीची करुणा भाकली. मुनी म्हनाला, "जर तू गंगा पाताळात आणली तर गंगेच्या स्पर्शाने तुझे भाऊ जीवंत होतील." भगिरथाने पुढे गंगा पृथ्वीवर आणली व त्याचे भाऊ जीवंत झाले. हेच आपले पुर्वज होत असे ही पुराकथा सूचित करते.

३. रासमाल या ग्रंथात वडारांसंबंधी एक कथा येते. गुजरात नरेश सिद्धपाल जयसिंहाने पाटण येथे सहस्त्रलिंग तलावाच्या निर्मितीचे काम वडारांना दिले. वडार स्त्रीयांपैकी जस्मा या सुंदर स्त्रीवर सिद्धराजाचे मन गेले. पण ती त्याला वश होईना. एकदा कामातूर सिद्धराज तिला महालात नेण्याचा हट्ट करू लागल्यावर जस्मा पळत सुटली. राजाने तिचा पाठलाग केला व आदवे यणा-या वडारांनअ ठार मारले. मग जस्माने आत्महत्या केली. मरतांना तिने सिद्धराजाला शाप दिला कि, "तुझ्या तलावात कधीही पाणी साठनार नाही." आणि वडारांना ती म्हणाली कि, "यापुढे वडारांत सुंदर स्त्रीया निपजनार नाहीत."

वडार स्त्रीया मुळातच पुरुषांइतकीच कष्टाची कामे  उन्हातान्हात करत आल्या असल्याने तसेही सुखवस्तू नागरस्त्रीयांत असणारा नाजूकपणा त्यांच्यात असणे अशक्यच होते. मानवी मन हे अत्यंत गहन आहे आणि ते आपल्या वास्तवाचे कारण शापकथांत-पुराकथांत शोधत असते आणि मनाची समजूत काढून घेत असते. सर्वच मानवी समुदायांनी अशाच पद्धतीने पुराकथांची निर्मिती केली आहे हे आपल्या लक्षात येईल.

अवनतीचा कालखंड

मध्ययुगात, विशेषत: बाराव्या शतकानंतर, वेठबिगारीची प्रथा सुरु झाली. वेठ म्हणजे राजसत्तांनी फुकटपणे निर्मानकर्त्यांना आपली कामे करण्यासाठी जवळपास फुकटात राबवून घेणे होय. एक शिवराय आणि संभाजीराजांचा काळ सोडला तर ही प्रथा इंग्रजांचे राज्य येईपर्यंत सुरु होती. यामुळे वडा-यांपासून ते चांभार, लोहार, मातंग ई. निर्माणकर्ते समाजघटक पुरते नागवले जायला सुरुवात झाली. म्हणजे कौशल्यांत कमी पडायचे तर नाही पण मोबदला काहीच नाही. यामुळे इतर समाजांप्रमाणेच वडार समाजावर औदासिन्य न येते तरच नवल. त्यात आधी व्हायची तशी भव्य कामे होईना झाली कारण राजकीय अस्थिरता. इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकत आणि दुस-या सहस्त्रकात हा खूप मोठा फरक दिसून येतो. शिवाय मुस्लिम राजवटीत तर आपण बांधून घेतलेल्या वास्तूसारख्या दुस-या वास्तू पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणून निर्माणकर्त्यांचे हात तोडने ते ठार मारणे असे उद्योग करत. हे आपण ताजमहालाच्या बाबतीतील दंतकथांत पाहु शकतो. याची परिणती कौशल्ये विकसीत करणे सोडा, आहे ती कौशल्येही मागे सारली जाऊ लागली. वडार समाजही त्यात मागे राहिला नाही.

पुढे आले इंग्रजांचे राज्य. ही एक वेगळीच आफत ठरली. त्यांनी अनेक क्षेत्रंत आधुनिक तंत्रज्ञान आणायला सुरुवात केली. परंपरागत कौशल्ये मागे पडू लागली. त्यांचे वास्तुरचना शास्त्र आल्याने वडा-यांचा रोल फक्त ताशीव दगड घडवणे व माती आणने एवढ्यापुरताच मर्यादित झाला. उखळ, जाती, पाटे-वरवंटे यांचे मार्केट तसे मर्यादित कारण दगडाचे असल्याने त्यांचे आयुष्य मोठे...फारतर टाके घालण्याचे काम दरवर्षी एकदाच. त्यासाठी भटकंती. रेल्वे-रस्ते-घरे यासाठी दगडफोडी, तळी-विहीरी खोदने एवढेच सामान्य दर्जाचे काम वडा-यांना उरले. पिढ्या-दर-पिढ्या कौशल्ये विस्मरणात गेली. एके काळी भव्य आणि कलात्मक लेणी-किल्ले-वास्तू-मंदिरे निर्माण करणारे वडार सामान्य मजूर बनले. दगडांच्या खाणी त्यांच्या हातून जात ठेकेदारांच्या उदरात जायला लागल्या.

याची अपरिहार्य परिणती म्हणजे ढासळलेली आर्थिक स्थिती. बकालपणा. यातुनच येणारे वैफल्य. त्यातून या समाजाला उदरभरणासाठी व्यवस्थेचे कायदेही मोडावे लागले. इंग्रज सरकारने सारी जमात गुन्हेगारांच्या यादीत घालून टाकली. दमन करना-या इंग्रजी राजवटीत ते अपरिहार्यच होते. आपण स्थानिक लोकांच्या कला-कौशल्यांचा आणि पारंपारिक व्यवसायांचा अंत घदवत आहोत याची जाण परकी सत्तांना येणे शक्यच नव्हते.

आज तरी परिस्थिती काय आहे? स्वातंत्र्य आले आहे पण भटक्या समाजांना स्थिर करण्यासाठी आपले सरकारही कृतीहीन आहे. वडार समाजाचे नैसर्गिक हक्क डावलले गेले आहेत. प्रचंड इतिहास असलेला हा समाज आज आधुनिक तंत्रज्ञाने आल्याने कोणाच्या खिजगणतीतही नाही. आपल्या आस्तित्वाच्या शोधात असलेला हा समाज आपले पर्यायी अस्तित्व उभारण्याचा अयशस्वी का होईना प्रयत्न करत आहे.  त्याला सुयश लाभो या शुभेच्छा!



Wednesday, November 20, 2013

अंतरीच्या कविता




"अंतरीच्या कविता" हा संजय ऐलवाड यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला पहिला-वहिला कवितासंग्रह. चपराक प्रकाशनाने शानदार समारंभात प्रसिद्ध केलेला. हा संग्रह उल्लेखनीय अशासाठी आहे कि कवीने आपल्या जगण्याचा भवताल अत्यंत उत्कटतेने आपल्या कवितांतून व्यक्त केला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून धडपड करत मराठवाड्यातील उदगीर तालुक्यातील एकुर्का या छोट्या खेड्यातुन पुणे गाठणारा हा तरुण. व्यसनी वडिलांमुळे घरातील पडझड, आईला होणारी मारहाण, तरीही नेटाने ती ओढत असलेला संसाराचा गाडा इत्यादि दु:खद परिस्थितीने संजयला साहित्याकडे वळवले. आपल्या वेदना कवितेत अभिव्यक्त करत राहिला. कविता ही तशीही मानवाच्या वेदनांचा हुंकार असते. ती वेदनांना मायेची पाखर देते. संजय कवितेत रमत गेला. त्याचे पुस्तक झाले.

संजयच्या भाषेत अर्थातच मराठवाडी गोडवा आहे. "बाप" या कवितेत संजय म्हणतो:

"मह्या मायेच्या डोळ्यात
काहुरांनी काला केला
ओसाडल्या दाही दिशा
बाप बांधावरी मेला"

वेदनांचा पसारा हा असा छळत असतांना माणुसकीचे, भवतालाच्या वेदनांचे भानही संजयला सुटत नाही. "कायदा" या कवितेत संजय म्हणतो:

"घुमटावरच्या पारव्याने
गाभारातल्या देवाला प्रश्न केला
का नाही कायदा आम्हासाठी?
नाही तर आम्हीही केली असती फिर्याद
काळजात बाण मारुन जीव घेणा-या पारध्यावर..."

तर "अस्तित्व" या कवितेत संजय म्हणतो:

"...आणि याच समाजात
कोलमडुन पडणारे वृक्ष
दिसतात पावलोपावली
सुकलेल्या झाडाचं जीवन असं
कधी दारिद्र्य तर कधी गरीबी..."

आज शिक्षणामुळे आजवर मूक राहिलेल्या समाजांतील तरुणांना अभिव्यक्त व्हावेसे वाटत आहे. कविता, नाटक, कथा, कादंब-या यातुन ते आपले हृद्गत आपल्या स्वतंत्र प्रतिभेने, कोणत्याही प्रस्थापित कवीच्या प्रभावाखाली न येता, स्वत:ची शैली बनवत व्यक्त करु लागले आहेत. आपल्या व्यवस्थेत सर्वांना व्यासपीठ मात्र मिळत नाही हे दुर्दैव. अनेकजण लेखन मधेच सोडुन देतात ते प्रकाशकांच्या अभावामुळे. शहरी प्रकाशक शक्यतो प्रसिद्ध लेखकांनाच प्राधान्य देतात...आणि प्रसिद्ध व्हायला आधी प्रकाशक नको का? एकंदरीत आपला साहित्यव्यवहार संकुचित आहे. सामाजिक जाणीवांचे भान असणारे प्रकाशक फारच म्हणजे फारच कमी आहेत. चपराक प्रकाशनाचे घनश्याम पाटील अशाच दुर्मीळ प्रकाशकांपैकी एक. त्यांनी हा संग्रह प्रकाशित करून उद्या भवतालातून बाहेर पडुन वैश्विकतेचा प्रवास करु शकेल अशा कवीला प्रकाशात आणले आहे.

रसिकांनी संजयचा हा कवितासंग्रह अवश्य वाचावा...व एका संवेदनशील कवीच्या भवतालाच्या वेदना व आशांचा पट अनुभवावा!

अंतरीच्या कविता
संजय ऐलवाड
चपराक प्रकाशन, पुणे
मूल्य: रु. ५०/-

Saturday, November 16, 2013

मी नवा धर्म स्थापन केला होता त्याची गोष्ट!



धर्म स्थापन करायला एक ठार वेडेपणा लागतो. तो बहुदा माझ्यात असावा!

(अगणित धर्म कालौघात अशाच ठार वेड्यांनी स्थापन केले. काही टिकले...अगणित अदृष्य झाले तर काही स्मृतीशेष आहेत. पण धर्म जर चिरंतन असेल तर अनेक धर्म मुळात नष्टच का होतात? नवीन धर्म स्थापनच का होतात? धर्माचे नष्ट होणे नियत असेल तर शाश्वत धर्म असुच कसा शकतो? कि शाश्वत नसणे हेच धर्माचे मुलतत्व आहे? प्रश्न अगणित आहे कारण मीही तो येडचापपणा तथाकथित नकळत्या वयात केला होता. मी त्यालाच चिकटून नंतर जरा "हुशारीने" चमत्कारांचे वलय दिले असते तर काय सांगावे, आज तो कदाचित दखलपात्र धर्म झाला असता. पण ही हुशारी मानवविध्वंसक असते. धर्म बदनाम व त्याज्ज्य बनतात ते त्यामुळेच. मी तसा हुशार नव्हतो हे किती बरे झाले!

मी स्थापन केलेल्या धर्माची कथा अशीच बोधक आहे. अवश्य वाचा.)


मी नवा धर्म स्थापन केला तेंव्हा मी नववीत होतो. माझ्या धर्माचे नांव होते "जीवन धर्म". येथे जीवन हा शब्द "पाणी" या अर्थाने आहे. या धर्माला एकूण नऊ अनुयायी मिळाले. त्यात माझ्या वयाचे (१४-१५) पाच तर बाकी बाप्प्ये होते.

त्याचं असं झालं. मी तेंव्हा वरुडे (ता. शिरुर) या गांवात राहत होतो. माझे वडील प्राथमिक शिक्षक असल्याने तशी आम्हाला बरीच गांवे बदलावी लागली पण या गांवात मात्र आमचा मुक्काम प्रदिर्घ काळ (५-६) वर्ष होता. वरुड्यात चवथीपर्यंतच शाळा असल्याने पाचवीसाठी मी चिंचोलीच्या शाळेत जात होतो. तेथे सातवीपर्यंतची शाळा होती. रोज पायी जाणे-येणे व्हायचे. तसा पावसाळा मला पहिल्यापासुनच प्रिय. पावसाळ्यात माझा चालीव प्रवास फार मजेशीर असायचा...आनंदवणारा...सुखावणारा...सर आली कि चिंब भिजायची मजा मी कधी सोडली नाही.

पण त्याच वेळीस पिवळे ठक्क पडलेले गवताळ रानोमाळ हळुहळु ज्या नजाकतीने सरारुन हिरवाई धारण करे ते सावकाश होणारे परिवर्तन मला थक्क करे. पण त्याहून मोठी मौज वेगळीच होती. ती म्हणजे रस्याच्या कडेला खड्डे-चरांत पाण्याची जी डबकी बनायची त्यात हळुहळु चिकट-बुळबुळीत इवल्या करड्या-काळसर रंगाच्या अंड्यांच्या माळा दिसू लागत. मी रोज पाहत असे. ती अंडीही मोठी होतांना. एखाद चुकार दिवशी बेडुक-माशांची इवली पिल्ले आणि शेवाळ त्यांची जागा घेतांना दिसत. साताठ महिने कोरड्या ठक्क पडलेल्या त्या भेगा पडलेल्या भुतळावर हे जीवन कसे फुलते? मला प्रश्न पडायचा. अत्र्थात उत्तर नव्हते आणि मास्तरला विचारले तर तेही सांगत नसत.

सहावीला शाळेसाठी मी गणेगांवचा रस्ता धरला. गांवातील बरीचशी मुले गणेगांवलाच जात असत म्हणून! या मार्गावरही माझा पावसाळ्यातला एकमेव छंद म्हणजे पावसाळ्यात माळांचे होणारे विस्मित करणारे परिवर्तन आणि काहीच नसलेल्या डबक्यांत उलणारे जीवन. कोठुन येते हे जीवन? कोणी आणली ती अंडी? कोठुन आले ते शेवाळ?

प्रश्न आणि प्रश्नच.

मी वाचायचो खूप. कथा-किर्तनालाही हजेरी लावायचोच. एका बुवाला भीत भीत विचारलं तर तो सांगे "ही सगळी पांडुरंगाची कृपा...तो आहे म्हणून आपण आणि सारी प्राणिजात..." सहावीलाच असतांना मी पहिल्यांदा आणि शेवटचा पंढरपूरला आई-वडिलांसोबत गेलो. चंद्रभागेत लोक एस्टीच्या खिडक्यांतून नाणी फेकत होते. पांडुरंग पाहिला. ही दगडाची मुर्ती काही केल्या जीवनाचा निर्माता असू शकत नाही एवढेच काय ते माझ्या मनाने घेतले.

अशीच सातवीही गेली. आठवीला एक वर्ष पुण्यात पुणे विद्यार्थी गृहात होतो. तेथेही शिक्षकाने पहिल्याच दिवशी :"आज शिकवणार नाही. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा..." असे सांगितले. मी धीर धरुन (खेड्यातून आलो असल्याने माझ्यात प्रचंड न्युनगंड  होता.) "जर पृथ्वी जन्माला आली तेंव्हा उकळत्या रसाचा गोळा होती तर या पृथ्वीवर जीवसृष्टी कशी आली?" सरांनी उत्तर दिले नाही. म्हणाले, हे वर्ष संपल्यावर या प्रश्नाचे उत्तर देईल...! झालं. माझ्या शंकेचं काही कोणी हरण करेना आणि कितीही पुस्तकं वाचनालयातली वाचली तरी उत्तर मिळेना.

पुणे विद्यार्थी गृहाचं एकंदरीत धार्मिक. भारतीय संस्क्रुती आणि हिंदू धर्म किती महान असून तो जगभर कसा पसरला होता या आख्याईका आम्हाला देसाई नांवाचे एक निवृत्त शिक्षक मोकळ्या तासाला येऊन सांगायचे. तात्पुरता प्रभावितही व्हायचो...पण माझा मूळ प्रश्न काही केल्या सुटत नव्हता. गणपती अथर्वशिर्ष व गीतेचा सोळावा अध्याय त्यांनीच आमच्या कडुन तोंडपाठ करुन घेतलेला. गणपती अथर्वशिर्षाचा मज गरीबाला झालेला फायदा म्हणजे गणेशोत्सवात अगदी ब्राह्मण घरांतही आम्हा काही मुलांना घेऊन जात. ११ किंवा एकविस वेळा गणपतीसमोर ते म्हटले कि आम्हाला प्रत्येकी एक-दोन रुपयांची दक्षीणा मिळे व केळे किंवा अन्य एखादे फळही मिळे. थोडक्यात चंगळ व्हायची.

धर्माशी माझा दुसरा परिचय येथे झाला. म्हणजे खेड्यात किर्तनकार सांगत तो धर्म आणि येथे कळे तो धर्म वेगळे होते. दोन्हीही हिंदुच हा त्यातला एक भाग. पण विरोधाभासी. (हिंदुत्ववादी हा शब्द मी प्रथम येथे ऐकला.) येथे विनोबांची "गीताई" तोंडपाठ केलेली. "कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये" पासून ते "स्थिरावला समाधीत..." वगैरेंवर प्रवचनेही होत आणि मग माझे चिंतनही. (आठवीतल्या पोराच्या चिंतनाची योग्यता ती काय असनार...पण करत असे हेही खरे.)

परिस्थीतीमुळे माझे पुणे विद्यार्थीगृह सुटले. परत गांवी आलो. नववीला मी कान्हुर (मेसाई) येथे प्रवेश घेतला. वरुड्यावरुन रोज चालत जाऊन-येऊन असे. हे अंतर बरेच....साताठ किलोमिटरचे. माझे जुने निरिक्षण पुन्हा सुरु झाले. आणि एके दिवशी मला वाटले मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. मी त्या दिवशी दांडी मारली आणि एका डबक्याकाठीच त्यात विहरणा-या इवल्या मासोळ्या पाहत बसुन राहिलो.

पाणी...यालाच जीवनही म्हणतात. कशातच कोठे नसलेले जीवन पाण्यातच अवतरते. माणसाचे शरीरही बव्हंशी पाणीच आहे. इतर प्राण्यांचेही तसेच. म्हणजे पाणी हेच जीवनाचे निर्माते. बाकी सारे देव-बिव झुठ. सारे धर्म झुठ! आकाश आणि पाणी हेच आपले निर्माते. पाणी हाच सर्वांचा धर्म. बस्स ठरले...!

प्रशांत पोखरकर हा माझा पाचवीपासून बनलेला पहिला मित्र व सहाध्यायी. तो चिंचोलीत रहायचा. मी त्याला सायंकाळी घरी गाठले आणि त्याच्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता ओढतच पठारावर घेऊन गेलो. त्याच्याच शेताच्या बांधावर बसून मी मला लागलेला "अलौकिक शोध" आणि नव्या धर्माची आवश्यकता यावर त्याला भरभरुन सांगत राहिलो. तो माझा नेहमीचाच नि:सीम श्रोता त्यामुळे त्याने शांतपणे सारे ऐकून घेतले. मग विचारले "आपल्या नव्या धर्माचे नांव काय?"

त्याने "आपल्या" म्हटल्याने मला अपार हुरुप चढला. "जीवन धर्म" मी म्हणालो आणो हेच नांव का हेही त्याला सांगितले. झाले. एका नव्या धर्माची उद्घोषणा झाली आणि पहिला अनुयायाही मिळाला.

आता धर्म म्हटले कि तत्वज्ञान आणि कर्मकांडही आले.

ते आम्ही हायस्कुलला दांड्या मारुन प्राथमिक का होईना तयारही केले, पुढे ते तीन-चार वर्ष विकसीतही होत राहिले.

येथे हे सांगायला हवे कि मला इतर धर्मांची काय माहिती होती? माझे वाचन प्रचंड होते. पंचक्रोशीतील एकही ग्रंथालय मी सोडलेले नव्हते. स्वत:ला "अतिशहाणा" "किंवा "वासरात लंगडी गाय शहाणी" म्हणता येईल एवढे इतरांच्या तुलनेत माझी माहिती बरीच होती. इतर धर्मांची फार माहिती नसली तरी तोंडओळख नक्कीच होती. मला त्यातला एकही धर्म पटलेला नव्हता. असो.

तर झाले. धर्माचे कर्मकांड म्हणजे...

१. पहिला पाऊस, मग तो कधीही येवो, धर्माच्या अनुयायांनी त्या पावसात साग्रसंगीत नृत्य करायचे आणि पावसाचे थेंब तोंडात घ्यायचे.
२. नदी-ओढ्यातील वाहत्या पाण्याची फुले वाहून पूजा करायची.
३. वाहत्या पाण्याकडे पाहतच पाण्याच्या वाहतेपणाशी तद्रूप व्हायचे...हे ध्यान.
४. वाहत्या अथवा जलाशयातील पाण्याला ओंगळ-अस्वच्छ होऊ द्यायचे नाही.  असे आणि अनेक काही सोपी पण पाण्याशी निगडित कर्मकांडे तयार झाली.

यात मुर्तीपूजा नाही. व्रत-वैकल्ये नाही. सण नाही. आत्मा-मोक्ष काही नाही.

राहिली तत्वज्ञानाची गोष्ट. ते मी नववीतच लिहायला सुरुवात केले. अकरावीपर्यंत ६०-७० परिच्छेदही तयार झाले. प्रत्येक परिच्छेद "लोकहो..." या संबोधनाने सुरु व्हायचा. आठवतात त्यातील एक-दोन देतो...

"लोकहो,
मनावर ताबा मिळवायचा प्रयत्न करु नका
कारण मनाला गुलाम करणे
हे मनुष्यत्वाच्या विरुद्ध आहे."

किंवा;

"लोकहो,
शहाणे लोक पाण्याला भजतात
पाण्यापासुनच सर्व प्राण होतात
आणि त्यातच विसर्जित होतात
पाण्याचे पूजन आणि त्याचेच ध्यान
जो करतो
तोच खरा सुखी होतो..."

वगैरे.

दर्म्यान आमचा धर्मप्रसार सुरुच होता. जी कुचेष्टा व्हायची ती आठवता आज हसायला येते. पण तरीही आम्ही नेटाने आमचे धर्मपालन करत होतो. दहावीत आमचे कान्हुरचे तीन अधिक अनुयायी मिळवणुयात आम्ही यशस्वी झालो. दहावी सुटली. पुढचे शिकायला पाबळला. तेथेही हा प्रचार चालुच राहिला. काही विद्यार्थी अनुयायी बनले. गांवात मोठ्या माणसांशीही माझ्या धर्माबद्दल बोलायला मी बिचकत नसे. अनेकांनी माझी अर्थातच कुचेष्टा केली, हाकललेही. पण गांवातअला एक मारवाडीआणि एक पोस्टमास्तर (हा रजनिशांचा कट्टर अनुयायी होता. मी रजनिशांची अनेक पुस्तके यांच्यामुळेच वाचली.) हे बाप्पे माझे पहिले अनुयायी झाले. पोस्टमास्तर झाला याचे कारण म्हणजे माझा युक्तिवाद हा कि रजनिश दुसरे धर्म आणि महात्मे काय सांगतात त्याचेच निरुपन करतो...घडीत बुद्ध तर घडीत कृष्णावर येतो...काय हे? त्यापेक्षा बघा...मी काय सांगतो ते माझे आहे...आणि ही मात्रा लागु पडली. मग तो जीवनधर्माच्याच असलेल्या आणि संभाव्य तत्वज्ञानाबद्दल बोलत असे. असे थोडे वाढत एकुणात आमचे ९ अनुयायी झाले.

बारावीत असतांना मी मराठीत "भारतात नवीन धर्माची आवश्यकता का?" यावर लेख लिहिले पण ते कोणी छापले नाही. शेवटी मी "भारत में अब नये धर्म की जरुरत" आसा हिंदीत लेख लिहिला. अर्थात हा नवा धर्म म्हणजे जीवनधर्मच कि! हा लेख चक्क आज का आनंद या हिंदी पेपरने माझी दिव्य हिंदी दुरुस्त करुन प्रसिद्ध केला. त्याचा विशेष फायदा झाला नाही. पण पुढे उच्च शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर मला तेथे बातमीदाराची नोकरी मिळाली.

धर्म तोवर संपला होता. धर्मग्रंथही, जो अपूर्ण होता, मागे पडता पडता जीवनातील पडझडींत नाहीसा झाला. आता आठवले कि हसू येते. पण इतरही धर्म कसे निर्माण झाले असतील यामागची प्रक्रियाही समजते. माझा नि:ष्कर्श एकच:

धर्म स्थापन करायला एक ठार वेडेपणा लागतो. तो बहुदा माझ्यात असावा!

(वरील माहिती मी संक्षिप्तरित्या माझ्या अजून अपूर्ण असलेल्या "दिवस असेही...दिवस तसेही" या आत्मचरित्रात दिलेली आहे. तो लेखमालिका स्वरुपात किर्लोस्करमद्धे २०१० मद्धे प्रसिद्ध झाला होता.)

(मी जपलेले माझ्या धर्माचे अवशेष मात्र माझ्यात पुरते रुजलेले आहेत. उदा. मी मुर्तीपुजा करत नाही...व्रतवैकल्य कधीच केले नाही. पाऊस आणि पाणी हे माझे पुजेचे नसले तरी अनावर प्रेमाचे विषय आहेत. मृत्युनंतर एका स्टीलच्या सिलेंडरमद्ध्ये माझे  प्रेत घालु, सीलबंद करून ते समुद्रात दूरवर फेकुन द्यावे असे मी मृत्युपत्रात नमूद करून ठेवलेले आहे.) 


Friday, November 15, 2013

मृत्यू ....

मृत्यू हुंदडत असतो
चोही बाजुनं...
जाणवत असतात त्याला आपले
श्वास-नि:श्वास
भ्रमांमधले भ्रम...विभ्रम...
येथून तेथली निरंतर
व्यर्थ जीवघेणी धाव...
धपापत्या उरांचा घेत असतो तो
मोहस्पर्श
अजाणांना
अधिकच अजाणतेत
असतो कसा
रमवत तो!

...खेळच त्याचा असला
हसत असतो...
दशदिशांतून वाकुल्या दाखवुन...
माहित असते त्याला ठाम
कितीही धावले तरी
जाणार कोठे हे
जावून जावून?

Friday, November 8, 2013

जीवन फार सुंदर आहे...!

जीवन फार सुंदर आहे
ते मी करीत असलेल्या
जीवनावरील अथांग प्रेमामुळे
आणि माझ्या भावनांमुळे
माहित आहे मला
मृत्युच्या महाकाशाच्या पार्श्वभुमीवर
हेलकावे घेत असलेला
हा जीवन-बुडबुडा
फुटेल कोणत्याही 
फसव्या क्षणी
अनंतात विसावण्यासाठी
पण तरीही
मी जीवनावर अपार प्रेम करतो...
सर्वांच्याच! 

मी जगत गेलो
त्याचेच गाणे बनत गेले
मी चालत गेलो
महारस्ते बनत गेले
मी वाईटाला वाईट म्हणत गेलो
निर्भयपणे
चांगले ऋतू फुलू लागले...
मी माणुस बनायचा अविरत 
प्रयत्न करत राहिलो
माणुसकीचे मळे सर्वत्र 
डोलतांना दिसू लागले...
...
सर्वांनी 
बनावे असेच
एक दिवस
प्रार्थनेला
उगवत्या सुर्याचे दिवस 
दिसू लागले!

(आणि खात्री आहे मला...
येईल असा एक दिवस
कारण आशा अजरामर आहेत
आणि माणुसकीचे हुंकार 
अजून विझलेले नाहीत!)

Wednesday, November 6, 2013

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : कुणाचा वैरी कुणाचा कैवारी?"

Photo: राष्ट्रीय स्वयंसेवक  संघ  :  कुणाचा  वैरी  कुणाचा  कैवारी   ह्या  रोखठोक  दिवाळी   अंक   आयोजित  परिसंवादात   रवींद्र  नाट्य  मंदिर ,  मुंबई   येथे  बोलताना  श्री.  संजय  सोनवणी .


वृत्तांत: 

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : कुणाचा वैरी कुणाचा कैवारी?" हा परिसंवाद ३१ आक्टोबरला मुंबई येथे "रोखठोक" दिवाळी अंकाच्या प्रकाशनानिमित्त झाला. यात माझ्यासमवेतच माधव भंडारी, प्रमोद बापट, ज्ञानेश महाराव, प्रा, नम्रता गणेरी यांचा सहभाग होता तर चंद्रकांत वानखेडे अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात गणेरी यांनी रा. स्व. वरील महिला सहभागाबद्दलच्या प्रकल्पाच्या निमित्ताने आलेले अनुभव विषद केले व रा. स्व. संघ स्त्रीयांच्या दुय्यमत्वाला प्राधान्य देतो असे नमूद केले. बापट व भंडारी यांनी रा. स्व. संघ वाढत आहे, संघाला समजावुन घ्यायचे तर संघात काही काळ तरी प्रवेश करायला हवा, संघ आदिवासी-वंचित यासाठी अविरत कार्य करतो पण प्रसिद्धीच्या मागे पडत नाही वगैरे विवेचन केले. माझ्या भाषणातील ठळक मुद्दे:

१. रा. स्व. संघ हिंदुत्ववादी नसून "वैदिकवादी" आहे. वैदिकांचा धर्म नेहमीच वेगळा होता व आहे...त्याला अवैदिक हिंदुंचा पाठिंबा मिळु शकत नाही.
२. संघ वाढला याचे कारण मुस्लिम/ख्रिस्त्यांबद्दल निर्माण केलेली काल्पनिक भिती आहे. काल्पनिक शत्रु असल्याखेरीज संघटन होत नाही हे मानसशास्त्र संघाला चांगले माहित आहे.
३. हिटलर हे संघाचे आदर्श राहिले आहे. गोळवलकर गुरुजींचे "विचारधन" संघाचे बायबल आहे. ते हिटलरला आदर्श मानतात. (We, or our Nation defined)
४. पण त्याच वेळीस गंमत म्हणजे संघाला ज्यु सुद्धा प्रिय आहेत कारण त्यांचा मुस्लिमांशी सातत्यपुर्वक चालत असलेला संघर्ष. एकीकडे हिटलरही प्रिय व दुसरीकडे ज्युही प्रिय यात संघाचा वैचारिक व्यभिचार दिसून येतो.
५. आर्य सिद्धांत संघाने सोडला नाही. आता फरक एवढाच केलाय कि आर्य भारतातुन जगभर गेले. आर्य वंशवादातुन हे बाहेर मात्र पडत नाहीत. वैदिक हेच आर्य अशी त्यांची मान्यता असल्याने वेद व संस्कृत हे त्यांचे पंचप्राण आहेत व त्यांच्या दृष्टीने तीच भारतीय संस्कृतीचा मुलाधार आहे. सरस्वती पुजनाबद्दल ते आग्रही असतात कारण वेद हे सरस्वतीकाठी लिहिले गेले अशी त्यांची मान्यता आहे.
६. सरस्वती नदी नेमकी कुठली याचा अजून तपास लागायचा आहे. वेद हे सनपूर्व आठव्या शतकापार झालेले नाहीत कारण वेदांत झरथुष्ट्रच किमान तीनदा डोकावतो. ॠग्वेदाची मुळ भाषा संस्कृत (वैदिक संस्कृत) असुच शकत नाही कारण प्राकृतातुन संस्कृत कशी क्रमशा: विकसीत झाली याचे भाषिक पुरावे सनपुर्व तिसरे शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळातील उपलब्ध आहेत. ही भाषाही विकसीत केली ती बौद्धांनी...वैदिकांनी नव्हे. तेंव्हा वेदांची मुळ भाषा ही व्रचदा सिंधी अथवा गांधारी होती एवढेच म्हणता येईल. परंतु भाषिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या खुळातुन या कल्पना गुप्त काळात विकसीत केल्या गेल्या.
७. वैदिकजनांना पुष्यमित्र शृंगाबाबत भलतेच प्रेम असते पण प्रत्यक्ष पुरावे सांगतात कि तो आणि त्याचे वंशज प्राकृताचाच वापर करत होते.... कारण संस्कृत अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे भ्रमित लोकांनी चालवलेले भ्रमसत्र एवढेच संघाचे वर्णण करता येईल.
८. कोणतीही विचारधारा असो...खरी कि खोटी...पण तत्वज्ञान लागतेच. संघाकडे एके काळी गोळवलकर, एकात्म मानवतावाद मांडणारे दिनदयाळ उपाध्याय वगैरे लोक होते. मुखवटा केले गेलेले वाजपेयींनी समाजवादी गांधीवाद मांडला होता. दत्तोपंत ठेंगडी, बिंदुमाधव जोशी वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रांत संघ विचारांना नवे बळ देत होते. परंतु अलीकडे संघाची वैचारिक पातळी खालावली असून "आपण कोठे आहोत?" हे त्यांनाच समजत नाही हे सरसंघचालकांच्याच वक्तव्यांवरुन दिसते.
९. आम्ही संघाचे वैरी नाहीत. किंबहुना म. फुलेंची "एकमय समाज" व बाबासाहेबांची "सामाजिक लोकशाही" संकल्पना आम्हाला कोणाचेही वैरी होऊ देत नाही वा आम्ही कोणालाही वैरी मानत नाही. मनमुक्त विचारस्वातंत्र्याचे आम्ही पुजारी आहोत. शाखा आणि बौद्धिकांमुळे मुक्त विचारक समाज घडू शकत नाही....तर बौद्धिक क्लोन निर्माण होतात. आम्हाला सहप्रवासी हवेत...अनुयायी नकोत.
१०. जे संघ करतो त्याचीच फलस्रुती म्हणजे ब्राह्मणद्वेष्ट्या बामसेफ वा मराठा सेवा संघ यासारख्या संघटना उदयाला येतात. तुमची "समरसता" एक ढोंग आहे. लोकांची अस्मिता जेथे जागी नाही तेथेच घुसणे हे संघाचे सध्याचे कार्य आहे. मंडलोत्तर काळात ओबीसींना आत्मभान यायला सुरुवात झाली. तरी ओबीसी हा संघाचा मुलाधार बनवण्याचा प्रयत्न होतो. ओबीसी कधीच वौइदिक नव्हते त्यामुळे त्यांचे वैदिकीकरण करता येणे या देशात असंभाव्य आहे कारण वास्तव काय...आमचा धर्म काय याचे भान आम्हाला आले आहे.
११. संघाने आपली वैदिकवादी भुमिका बदलावी...नवेच वैश्विक तत्वज्ञान घेऊन पुढे चालावे. पण सध्या तरी संघाचा वैचारिक मृत्यू झाला आहे असेच चित्र आहे.

यानंतर ज्ञानेश महारावांचे भाषण झाले. चंद्रकांत वानखेडे यांने अत्यंत समर्पक शेवट केला. ते म्हणाले, भारतात मुस्लिमांनी सातशे वर्ष राज्य केले...त्यांना हा देश इस्लाममय करता आला नाही...इंग्रजांनी दिड-दोनशे वर्ष राज्य केले...त्यांना हा देश ख्रिस्तमय करता आला नाही...तेंव्हा इस्लामची भिती दाखवुन संघाने आम्हाला घाबरवायचे कारण नाही.







Saturday, November 2, 2013

सावरकरांचा अखंड हिंदू राष्ट्रवाद...?


अखंड "हिंदू" राष्ट्र संकल्पनेचे जनक म्हणून वीर सावरकरांकडे पाहिले जाते. सावरकरवाद्यांना याबाबत साहजिकच सावरकरांबद्दल पराकोटीचा आदर असतो. रा. स्व. संघ आजही अखंड हिंदुस्तानचा राग गात असतो. युवा पिढ्यांना हिंदुत्वाचे वेड लावायला ही संकल्पना चांगलीच कामी येत असते. हिंदुत्वाचे वेड म्हणजे मुस्लिम द्वेष हे ओघाने आलेच. आज विशिष्ट समाजघटकांत जी कट्टरता ओसंडून वाहतांना दिसते तिच्या मागे "अखंड हिंदू राष्ट्र" ही संकल्पना प्रबळ असते. तसे नकाशेही हिरिरीने मिरवले जात असतात. असो. येथे आपल्याला सावरकरांचे अखंड हिंदू राष्ट्राचे नेमके काय स्वप्न होते व ते साकार करण्याची त्यांची नेमकी काय योजना होती हे तपासून पहायचे आहे. 

सर्वप्रथम नमूद केले पाहिजे ते म्हणजे सावरकर आणि रा. स्व. संघाचा तिरंग्याबद्दलचा अनादर. प्रसिद्ध समाजवादी नेते ना. ग. गोरे १ मे १९३८ रोजीच्या एका प्रसंगाचे साक्षीदार होते. त्यात हिंदू महासभा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी कामगार दिनाच्या संचलनावर हल्ला करून तिरंगा फाडुन टाकत सेनापती बापट आणि गजानन कानिटकरांना मारहाण केली. ना. ग. गोरे लिहितात, "हेडगेवार आणि सावरकर यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिमद्वेष, कोंग्रेस द्वेष आणि तिरंग्याचा द्वेष शिकवला आहे. त्यांचा स्वत:चा भगवा ध्वज असून अन्य ध्वजाला ते मानीत नाहीत." म्हैसूर हे हिंदू संस्थान होते. या संस्थानात कोंग्रेसी सत्याग्रहींनी तिरंग्याला अभिवादन केले म्हणुन २६ सत्याग्रहींना संस्थाने पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. यावर १७ एप्रिल १९४१ रोजी सावरकरांनी शिमोगा येथील हिंदू महासभेच्या कार्यकारिणीला पत्र लिहिले, त्यात स्पष्टपणे म्हटले कि, "म्हैसूर राज्य हिंदू सभेने हिंदू संस्थानिकांचे बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करत अहिंदू अथवा वाट चुकलेल्या राष्ट्रवादाचे सोंग आणना-या हिंदुंना विरोध केला पाहिजे." याच वर्षी, म्हणजे २२ सप्टेंबर १९४१ रोजी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांसाठी जारी केलेल्या निवेदनात सावरकर म्हणाले, "हिंदूडम (हिंदू जगत) उद्घोषित करणारा कुंडलिनी-कृपाणांकित ओम आणि स्वस्तिकासहितच्या भगव्या ध्वजाखेरीज अन्य कोणता राष्ट्रध्वज असू शकतो? हिंदू महासभेच्या सर्व शाखांवर हाच ध्वज फडकला पाहिजे...तिरंगी झेंडा खादी भांडारांवरच काय तो शोभेल!"

खरे तर इंग्रजांचे बगलबच्चे असलेले हिंदू (आणि मुस्लिमही) संस्थानिक काही अपवाद वगळता स्वातंत्र्य चळवळीच्या सातत्याने विरोधात होते. आपल्या सर्वाधिकारांना आव्हान देवू शकेल अशी कसलीही चळवळ त्यांना आपल्या संस्थानांत नको होती. परंतू जे संस्थानिक हिंदू होते त्यांच्याबाबत सावरकरांना विशेष ममत्व होते. त्याहीपेक्षा त्यांचा नसर्गिक ओढा हा राजेशाहीकडे झुकणारा होता व किंबहुना त्याच पद्धतीवर त्यांचा विश्वास होता. नेपाळची हिंदू राजेशाही त्यांना नेहमीच भुरळ घालणारी व आदर्शवत वाटत असे. हिंदू महासभा आणि रा. स्व. संघ हिंदू संस्थानिकांना हिंदुंचे "शक्तिस्थान" मानीत असत. १९ जुलै १९३८ रोजी सावरकरांनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले होते कि "हिंदू संस्थानिकांच्या राज्यातील अंतर्गत कारभारात इंग्रजांनी कसलाही हस्तक्षेप करू नये.संस्थानिकांचे बळ घटेल वा त्यांच्या अधिकारांवर गदा येईल असे कृत्य करू नये." 

संस्थानांतर्गत कारभार हा संस्थानिकांच्या मर्जीवर चालत असे. त्यामुळे सामान्य नागरिकांना ब्रिटिश सत्तेखाली असणा-या नागरिकांना जे अधिकार उपलब्ध असत त्यापासून वंचित रहावे लागे. कोंग्रेसने संस्थानांतील नागरिकांना मानवाधिकार व लोकशाही हक्क बहाल केले जावेत यासाठी विविध प्रजा मंडळांमार्फत मोठी चळवळ उभी केली होती. पण २७ एप्रिल १९३९ रोजी सावरकरांनी निवेदन जारी केले कि, "त्रावणकोर, जयपूर, राजकोट आणि अन्य हिंदू संस्थानांच्या कारभारात हस्तक्षेप करुन त्यांना दुर्बल केले जाण्याला हिंदू महासभेचा विरोध आहे. हिंदू संस्थानांना दुर्बल करू शकणा-या कसल्याही चळवळींना हिंदू महासभेचा विरोध राहील." थोडक्यात सावरकर हे सर्वसामान्य जनतेच्या हितांपेक्षा हिंदू रजवाड्यांच्या हितांना प्राधान्य देत होते.  

यानंतर १९४० साली भरलेल्या हिंदू महासभेच्या बाविसाव्या सत्रात सावरकर म्हणाले, "हिंदू रजवाड्यांनी हिंदू महासभेच्या कार्यात दाखवलेली रुची उत्साहवर्धक आहे. यातून Pan-Hindu (हिंदू जगत) विचारसरणीला प्रोत्साहन मिळत आहे. हिंदू रजवाड्यांच्या अंगातून आमच्या महान पुर्वजांचे रक्त खेळत आहे. आता त्यांनी आम्हाला फक्त सहानुभुती दाखवू नये तर हिंदू चळवळीचे नेतृत्व करावे." १९४५ साली बडोदा येथे भरलेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनातही सावरकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना "हिंदू संस्थानांना दुर्बल करू शकतील असल्या कोणत्याही आंदोलनात सहभाग घेवू नये" असे जाहीर आवाहन केले. 

संस्थानांतील अंतर्गत कारभार हा सर्वसामान्य हिंदूनाच मारक असुनही सावरकर हिंदू संस्थानिकांच्या मागे सातत्याने ठामपणे उभे राहिले. संस्थाने जरी ब्रिटिश इंडियाच्या अंकित असली तरी अंतर्गत कारभारात ब्रिटिशांचा विशेष रोल नव्हता. त्यामुळे इंग्रजी प्रदेशांत (जेथे जनतेवर ब्रिटिशांचे राज्य होते) लोकांना अनेक नागरिकाधिकार मिळाले होते त्यापासून संस्थानी प्रजा वंचीत होती. या काळात संस्थानांत आणि संस्थानिकांत राष्ट्रीय प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य कोंग्रेस करत होती. प्रजा समित्यांच्या मार्फत नागरिकाधारासाठीची आंदोलने जोर पकडीत होती. कोल्हापुर, औंध, बडोद्यासारखी अनेक संस्थाने कायदेमंडळांत नागरिकांना प्रतिनिधित्वही देवू लागली होती. अनेक संस्थाने स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन व्हायलाही तयार होती. तर काही संस्थाने (मग ती हिंदू असोत कि मुस्लिम) मात्र पारंपारिक बुरसटलेल्या विचारांना चिकटून बसलेली होती अणि स्वातंत्र्याची आंदोलने दडपून टाकण्यात अग्रेसर होती. या परिस्थितीत सावरकर मात्र हिंदू संस्थानिकांना स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा उपदेश करत देशभर फिरत होते. 

याची प्रतिक्रिया म्हणुन जे हिंदू संस्थानिक करण्यास आतूर होते (म्हणजे स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र अस्तित्व जपणे) ते मुस्लिम संस्थानिकही करणार हे उघड होते. सावरकरांच्या हिंदू संस्थानिकांना असलेला पाठिंबा व त्यांना काही हिंदू संस्थानिकांकडून मिळत असलेले अर्थसहाय्य यामुळे प्रतिक्रियास्वरुप मुस्लिम संस्थानिक मुस्लिम लीगला अर्थबळ पुरवू लागले. एका परीने इंग्रजांचे छुपे हेतू साध्य करण्याचेच हे कार्य होते. या कार्यपद्धतीने अखंड हिंदुस्तान कसा बनणार होता? सुदैवाने तोवर (१९२० नंतर ते सावरकर कार्यरत होईपर्यंत)  सर्वच संस्थानांतील नागरिकांत राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्याची ज्योत पेटली असल्याने भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवता येईल काय याबाबत संस्थानिक साशंक होऊ लागले होते. नवानगरच्या महाराजांनी तर पार मुस्लिम लीगशी संधान सांधून आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी मदत मागीतली होती.

काश्मिर जरी मुस्लिम बहूल राज्य असले तरी तेथील महाराजा हिंदू असल्याने सावरकरांना त्यांच्याबद्दलही ममत्व होतेच. काश्मिरने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे हे समजताच सावरकरांना अत्यंत आनंद झाला. १० जुलै १९४७ रोजी सावरकरांनी हरीसिंगांना लिहिले कि "नेपाळप्रमाणेच काश्मीरचे महत्व आहे म्हणुंन काश्मीरमद्धे केवळ हिंदुंचे सैन्य उभारून त्यांनी नेपाळची मदत घेत आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करावे. त्याने आपले स्वातंत्र नामधारी हिंदी संघराज्याच्या अंकित ठेवणे धोक्याचे ठरेल." हे वाचून बडोद्याचे महाराज व अन्य संस्थानांचे प्रतिनिधीही त्यांना भेटले. सर्वांना सावरकर आपले सैन्यबळ वाढवायला सुचवित होते...स्वतंत्र अस्तित्व टिकवायला सांगत होते...पण ते तसे काही करत नसल्याने सावरकर निराशही होत होते. 

यानंतर स्वत: महात्मा गांधी १ आगष्ट १९४७ रोजी श्रीनगरला गेले व हरीसिंगांना भेटले. तेथे ते चार आगष्टपर्यंत होते. शेख अब्दुल्लांना मुक्त करा, राजा म्हणुन पायउतार व्हा आणि भारतात विलीन व्हा असे सांगितले ही बाबही येथे लक्षात घेतली पाहिजे. 

त्रावणकोर संस्थानाबाबतही सावरकरांची भुमिका काश्मीरप्रमाणेच होती. त्रावनकोरचे दिवान सी. पी. रामस्वामी अय्यर यांनीही त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात सामील करण्यास विरोध केला होता. ११ जुन १९४७ रोजी त्यांनी त्रावणकोरचे स्वातंत्र्यही घोषित केले. हे वृत्त समजताच सावरकरांनी त्यांना लिहिले, "अखंड हिंदुस्तानच्याच हिताच्या दृष्टीने त्रावणकोर हे स्वतंत्र हिंदू संस्थान ठेवण्याच्या तुमच्या नि महाराजांच्या दूरदृष्टीच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. निज़ामाने त्याच्या स्वातंत्र्याची घोषणा पुर्वीच केली असून इतर मुसलमान संस्थानिकही तसेच करण्याची शक्यता आहे. हिंदू संस्थानिकांनी तात्काळ एकत्र येवून आपले सैनिकी सामर्थ्य बळकट करून बाहेरुन येणा-या हिंदूविरोधी आक्रमकांचा प्रतिकार करण्यास आणि आतून होणारा विश्वासघात नष्ट करण्यास सिद्ध व्हावे. हिंदुविरोधी नेत्यांच्या हाताखाली काम करनारी सध्याची घटना समिती हिंदू जगताचा विश्वासघात करून मुस्लिमांचा आणखी मागण्या मान्य करण्याची शक्यता आहे." (जुलै ४७) येथे एक बाब नमूद करणे आवश्यक आहे ती म्हणजे त्रावणकोर संस्थानाने स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत २० जून ४७ ला जिनांनी त्रावनकोरच्या या कृतीचे स्वागत केले. त्रावनकोरनेही पाकिस्तानसाठी आपला स्वतंत्र राजकीय प्रतिनिधी (राजदूत) नेमला. 

या वरील माहितीवरून काय नि:ष्कर्ष निघतो? कसले अखंड हिंदुस्थान सावरकरांना हवे होते? उलट ते तर हिंदु संस्थानिकांना स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा, संस्थानांतील लोकशाहीवादी स्वातंत्र्य चळवळी दडपण्याच्या पक्षात १९३८ पासुनच दिसतात. हिंदू संस्थानिकांना देशभर स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची आवाहने करतांना त्याची प्रतिक्रिया मुस्लिम संस्थानिकांत काय उमटेल याची त्यांना जाणीव नसावी असे म्हणता येत नाही. संस्थानी ऐशोरामात आयुष्य घालवलेल्या संस्थानिकांना आपले अधिकार विसर्जित करण्याची इच्छा असने शक्य नव्हते. पण त्याला अपवाद होतेच. भोर, कोल्हापूर, बडोदा ही संस्थाने त्या दृष्टीने आघाडीवर होती. अन्य संस्थानांत नागरिकांवर अनन्वित अन्याय व अत्याचार होत असतांना, नागरिकांना साधे मानवाधिकारही बहाल होत नसतांना "राजेशाही प्रवृत्तीचे" आकर्षण असनारे सावरकरांनी हिंदू संस्थानांनी स्वतंत्र रहावे असे वाटने स्वाभाविक वाटले तरी ते त्यांच्याच "अखंड हिंदुस्थानाच्या" भुमिकेच्या विरोधात जात नव्हते काय? हिंदू संस्थानिकांच्या पावलावर पाउल ठेवत मुस्लिम संस्थानिकांनीही स्वतंत्र रहायचा निर्णय घेतला असता तर भारतात ५६५ राष्ट्रे निर्माण झाली नसती काय? 

सर्वात महत्वाची बाब म्हणजे ते सावरकर काश्मीर ते त्रावणकोरच्या राजांना सैनिकी शक्ती वाढवा असे का सांगत होते याचे उत्तर रामस्वामींना लिहिलेल्या पत्रातच आहे. ते भारतीय संघराज्यालाच हिंदूविरोधी मानत होते. म्हणजे हा लढा ते म्हणतात त्याप्रमाने राष्ट्रीय सीमांपारचा नसून स्वतंत्र हिंदू संस्थानांच्या सीमांपारचा होता. घटना समितीलाही ते हिंदूविरोधीच मानत होते. म्हणजे स्वातंत्र्यानंतर हिंदू संस्थानांनी भारतीय संघराज्यावर व मुस्लिम संस्थानांवर हल्ला करत ती जिंकावीत आणि मग त्यांच्या स्वप्नातील अखंड हिंदू राष्ट्र निर्माण करावे असे त्यांचे विचार होते असे स्पष्ट दिसते. यामुळे भारतात यादवी पेटेल (कारण संस्थाने, हिंदू असोत कि मुस्लिम, ही देशभर विखुरलेली होती) याचे त्यांना भान मात्र नव्हते हेही दिसून येते. काश्मीरबाबतची त्यांची भुमिका तर अत्यंत गोंधळाची दिसते. मुस्लिमबहूल राज्यात केवळ हिंदूची सेना उभारण्याचा व स्वातंत्र्य टिकवण्याचा त्यांचा सल्ला कोणते अखंड राष्ट्राचे स्वप्न दर्शवतो?  उलट विखंडित, पण केवळ हिंदुंच्या, विखुरलेल्या अनेक राष्ट्रांचे संकुचित हिंदुत्ववादी स्वप्न त्यांच्यासमोर होते हे १९३८ पासुनच्या (म्हणजे १९३७ साली इंग्रजांनी त्यांना बिनशर्त मुक्त केल्याच्या काळापासून) त्यांच्या विचारांवरून दिसून येते. खरे तर गांधीहत्येची बीजे याच विचारांत दिसून येतात, कारण गांधीजी संस्थानांच्या विलीनीकरणाबद्दल व लोकशाहीबद्दल सुरुवातीपासूनच आग्रही होते व त्यांना त्यात यशही मिळत होते. पटेलांनी पुढे सर्वच संस्थाने विलीनही करून दाखवली. जुनागढच्या नबाबाला खरे तर पाकिस्तानात सामील व्हायचे होते. पण तेथील ९८% प्रजा हिंदू असल्याने भारताने जुनागढची नाकेबंदी करून नबाबाला भारतात सामील व्हायला भाग पाडले. ही घटना ९ नोव्हेंबर ४७ ची आहे...गांधीजी तेंव्हा हयात होते. स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली १९३८ पासुनच कोंग्रेस निजामाविरुद्ध संघर्ष करत होती. भारताने स्वातंत्र्यानंतर सैन्यदले विसर्जित करावीत असे कधीही म्हटले नसले तरी सावरकर भक्त मात्र सातत्याने तसा प्रचार करत असतात हे त्याहुनही विशेष. खरे तर काश्मिरवर टोळीवाल्यांनी हल्ला केला त्यावेळीस सैनिकी कारवाईला गांधीजींनी संमती दिली होती व याबद्दल प्यारेलाल यांनाही आश्चर्य वाटले होते व ते त्यांनी नोंदवुनही ठेवले आहे.. 

सावरकरांचे अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न कसे विरोधाभासी आहे हे डा. बाबासाहेब आंबेडकरांनाही माहित होते. त्यांनी आपल्या "Pakistan or Partition of India" या ग्रंथात नमूद केले आहे कि "आधी हिंदू-मुस्लिमांत द्वेष निर्माण करुन सावरकरांना मोठे हिंदू राष्ट्र आणि छोटे मुस्लिम राष्ट्र एकाच घटनेच्या छायेखाली नांदेल असे का वाटते हे समजत नाही."

थोडक्यात सावरकरवादी आणि रा.स्व.वादी सावरकरांच्या कोणत्या आणि कशा अखंड हिंदुस्तानाबद्दल बोलत असतात यावर त्यांनी चिंतन करणे आवश्यक आहे.  सावरकरांचे विचार आणि कृती यातील विभेद समजावून घ्यायला हवा. स्वातंत्र्यानंतर सावरकरांनी १५ आगष्टला तिरंगा फडकावला म्हणजे ते भारतीय स्वातंत्र्याविरोधात नव्हते असे सांगत असतांना सावरकरवादी हे सोयिस्करपणे विसरतात कि आधी क्रुपाण-कमंडलुअंकित भगवा फडकावुनच मग तिरंगा फडकावला. तिरंगा सावरकरवाद्यांनी कधीच मनापासून स्वीकारला नाही. हिंदूजगतच्या धर्मांध जाणीवा कोणत्या दिशेने जावू शकत होत्या याचा बोध सावरकरांच्या वरील कृतींवरुन व वक्तव्यांवरून लक्षात यावे. 

-संजय सोनवणी

संदर्भ: 1. Veer savarkar: Thought and Action of Vinayak Damodar Savarkar by Jyoti Trehan
2. Making India Hindu by David Ludden
3. Hindu nationalists and Governance by John McGuire
4. Savarkar Myths and facts by Shamsul Islam
5. Divine Enterprise: Gurus & Hindu nationalist Movement by Lise McKean
6. pakistan or Partition of India by Dr. B. R. Ambedkar
7. अखंड हिंदुस्तान लढा पर्व- बाबाराव सावरकर 
८. Mahatma Gandhi , the Last Phase, Pyarelal

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...