Tuesday, December 31, 2013

"आप" आणि आपण!

आम आदमी पक्ष आणि तिचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवालांनी गाजवले. भारतातील राजकीय समिकरणे बदलवायला केजरीवालांनी भाग पाडले असेच म्हणायला हवे. सर्वसामान्य माणूस प्रस्थापितांच्या सत्ता उलथवू शकतो हे मर्यादित परिप्रेक्षात का होईना भारताला दिसले. सर्वसामान्य मानूस भ्रष्टाचार, महागाई, वाढती बेरोजगारी याला वैतागला आहे व त्याचे प्रतिबिंब दिल्लीतील निवडणूकीत पडले असे विश्लेषक म्हणतात. दिल्लीत बसलेल्या हाद-यामुळे सर्वच इतर राजकीय पक्षांना वेगळा विचार करायला आपने भाग पाडले हे मान्य करून त्या खोलात न जाता या क्रांतीतून निर्माण होणारे प्रश्न मला महत्वाचे वाटतात.

पहिला प्रश्न हा आहे कि ही कथित क्रांती देशव्यापी होऊ शकेल काय? अन्य राज्यांत आपचे यश लक्षात घेऊन अनेक मान्यवर आपच्या मांडवाखाली जायला उत्सूक दिसत आहेत. महाराष्ट्रात विजय पांढरे आधीच आपमद्धे सामील झालेत तर राजु शेट्टींचा स्वाभिमानी सध्या तरी तळ्यात-मळ्यात दिसत असला तरी तो आपशी युती करणार नाही असे नाही. ते काहीही असले तरी आपची ही क्रांती देशव्यापी होण्याची शक्यता धुसर आहे याचे मह्त्वाचे कारण असे कि ज्या सामाजिक/आर्थिक/राजकीय परिस्थितीत दिल्लीतील व अन्य राज्यांतील निवडणूक झाली तशी परिस्थिती लोकसभेच्या निवडणूकीपर्यंत राहील असे नाही.

शिवाय प्रत्येक राज्यातील राष्ट्रीय समान प्रश्न सोडले तरी स्थानिक प्रश्नांचीही त्यांना जोड मिळत असते. त्यांचा एकुणातील प्रभाव मतदानावर कसा पडेल हे सांगता येणार नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर मंडल आयोगाला विरोध करणारे केजरीवाल व त्यांचे समर्थक येथे लोकांना कसे आकर्षित करतील हा प्रश्नच आहे. दिल्लीतील लोकांची मानसिकता आणि येथील जनतेची मानसिकता याची तुलना करणे अप्रस्तूत असले तरी मराठा राजकारणासमोर व त्या शक्तीसमोर आप टिकू शकेल काय हा खरा प्रश्न आहे.

दुसरा मुद्दा असा कि केजरीवालांना निवडणूकीत लोकप्रिय घोषणांचाच आधार घ्यावा लागला होता हे विसरता येत नाही. फुकट पाणी, अर्ध्या दरात वीज, बांधकामे नियमित करुन घेणे वगैरे. केजरीवालांनी दोन आश्वासनांची पुर्ती करायला सुरुवातही केली आहे.  आता प्रश्न असा पदतो कि लोकप्रिय आश्वासने देणे आणि त्यांचे पालनही करणे याला "बांधिलकी" म्हणता आले तरी शेवटी त्यासाठीचा खर्च कोणाच्या खिशातून वसूल केला जाणार? शेवटी नागरिकांच्याच हे साधे उत्तर आहे. कोंग्रेसचे अन्न सुरक्षा बिल या गदारोळात पटकण विस्मृतीत गेले असले तरी तेही लोकानुययासाठीच आहे हे उघड आहे. लोकानुययी योजना अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण करणा-या असतात व त्यातून सुदृढ अशी अर्थव्यवस्था आणि राजकीय स्थिती साधली जात नाही. समजा आपने देशभर अशा योजना राबवण्याच्या घोषना केल्या तर जी परिस्थिती निर्माण होऊ शकते ती फारशी सुखावह असनार नाही.

त्याच वेळीस अन्य पक्ष काय रणनीति आखतील याचाही विचार करायला हवा. कोंग्रेसने अण्णांना सोबत घेत लोकपाल आणून एका परीने केजरीवालांच्या हातातील महत्वाचा मुद्दा काढून घेतला आहे. आदर्श अहवालाबाबत जी भुमिका घेतली गेली त्यावरून भ्रष्टाचाराबाबत कोंग्रेसही जागृत आहे असा संदेश, जरी प्रभावीपणे नसला तरी, दिलाच आहे. खरे तर कोंग्रेसच्या कार्यकालात प्रथमच मोठमोठी धेंडे गजाआड झाली हेही विसरता येत नाही. कदाचित त्याची गती अजून वाढेल.

सध्या महामंदी, महागाई याने जनता सैरभैर झाली आहे व ती प्रस्थापित सत्तेच्या विरोधात आहे. आत्ता निवडणूका झाल्या तर कोंग्रेसचे पानिपत होणार यात शंका नाही. पण त्याचा फायदा आपला मिळेल काय? अत्यंत मर्यादित परिप्रेक्षात तो मिळू शकतो...पण केंद्रात सत्ता स्थापन करण्याएवढे बळ तिला मिळेल असे दिसत नाही. उलट सध्य:स्थितीचा फायदा भाजपला मिळेल.

मोदी काही काळ "आप" मुळे विस्मित झाले असले तरी ते व त्यांचे सहकारी रणनीति बदलण्याच्या मुडमद्धे दिसत आहेत. फक्त कोंग्रेस (विशेष्त: राहूल व सोनिया) यांच्यावर हल्ले केल्याने आता भागनार नाही तर अर्थव्यवस्थेची फेर-उभारणी करण्यासाठी नवे तत्वज्ञान त्यांना शोधावे लागेल...मांडावे लागेल. सध्या तरी त्यांच्याकडे त्यासाठी काही नवा विचार आहे असे दिसत नाही. पण नजिकच्या भविष्यकालात त्यांना त्यावर बोलावेच लागेल! आपकडेही राष्ट्रीय अर्थव्यवस्थेबाबत काही नव-विचार असल्याचे आत्ता तरी दिसत नाही. लोकप्रिय घोषणांतून अर्थव्यवस्था सावरत नसते.

दरम्यान महागाई कमी होईल असे संकेत आताच मिळत आहेत. अर्थव्यवस्थेला नवीन बुस्टर देण्यात कोंग्रेस यशस्वी झाली तर वेगळेच चित्र निवडणुकीच्या वेळीस असेल. लोकांची स्मरणशक्ती अल्प असते. जर अर्थव्यवस्था रुळावर आली तर आताचे चटके लोक विसरूनही जातील व तेही नव्या दृष्टीने समकालीन राजकारणाचा विचार करतील. तोवर "आप" दिल्लीत सुशासन ठेवू शकला तर ठीक...अन्यथा राजकीय व्यवस्थेत ते स्वत:चे आहे ते स्थान हरपून बसतील.

भावनेच्या लाटेवर निवडून येणे आणि त्यात सातत्य ठेवणे यात फरक आहे. आपने सर्व पक्षांना धोक्याचा इशारा दिला आणि नवीन दृष्टीने आपापल्या धोरणांकडे पहायला भाग पाडले हे आपचे निर्विवाद यश आहे. त्याचा फायदा भविष्यात आपला किती होईल हा प्रश्न असला तरी भारतीय राजकारनात गुणात्मक बदल त्यामुळे घडून येतोय व येईल असे मात्र नक्कीच म्हणता येते. त्यासाठी केजरीवालांचे अभिनंदन केलेच पाहिजे, त्याच वेळीस राष्ट्रीय पातळीवर आपचे धोकेही समजावून घ्यावे लागतील!

19 comments:

  1. संजय सराना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

    सर

    आपला ब्लोग आम्ही अतिशय उत्सुकतेने पहात असतो तसेच फेसबुक वर पण आम्हाला आपले विचार माहिती होतात फेसबुक च्या अक्षरांचा वाचताना त्रास होतो आणि फोटो आणि जाहिराती यांचा फाफट पसारा भरपूर त्रास देणारा ठरतो

    सध्या आपल्या ब्लोग वर सुद्धा बघताना अनेक जाहीत्राती येत्व असतात त्यामुळे रसभंग होत असतो त्याची आपण काळजी घ्याल हि आशा आहे

    सर आपणास एक सुचवावेसे वाटते -आपण एक विचार आणि भूमिका घेत जर एका विषयावर सतत आठवड्यातून एकदा लिहित गेलात द होईल सोप्या भाषेत म्हणजे पूर्वी मंदिरातून पुराणिक बुवा सांगत किंवा नंतरच्या काळात साप्ताहिक सोबत किंवा साप्ताहिक स्वराज्य असे पुण्यातून अंक निघत त्या प्रमाणे आपण एकाच विषय खुलवत गेलात तर वाचकाना

    त्यात सहभागी होता येईल

    सर आमच्या मते सध्या आपले काय चुकते ते असे -

    आज एक विषय असतो , तर उद्या एकदम दुसर्या टोकाचा विषय असतो

    समजा आज एक सुंदर लेख आहे जादू टोना विरोधी कायदा तर त्यात व्यत्यय आणणारा असा पुढचा विषय असतो -त्यामुळे विचाराना ओघवतेपणा रहात नाही म्हणून ,

    आपण एक महिन्याचा आराखडा जर बनवलात तर किती छान होईल बरे ?आपण लिहिलेल्या चांगल्या प्रतिक्रियाना आपण सविस्तर प्रतिसाद देत नाही अशी आमची प्रेमाची तक्रार आहे !

    त्यामुळे मध्येच फालतू आणि विषय बाह्य प्रतिसाद देत त्रास देणाऱ्या समाज कान्ताकांचे फावते आणि कुणावरही काहीही राळ उडवणे चालू होते आणि चार्चेही पातळी अत्यंत पोरकट पातळीला जाते

    मग असे वाटू लागते कि हा ब्लोग वाचणेच नको

    आज अनेक समाज प्रबोधन करत वैचारिक लिहिणाऱ्या अनेक विचारवंतांचे नेमके हेच दुखणे आहे आपण आम्ही लहान तोंडी मोठा घास आम्हास क्षमा कराल अशी आशा आहे

    नवीन वर्षात आम्ही या ब्लोग कडून बरेच काही शिकू शकतो म्हणून हि हात्ताची मागणी असे समजा सर !आपणास सर्व पुणेकर वैचारिक चळवळीकडून हार्दिक शुभेच्छा !

    २०१४ हे वर्ष फार फार महत्वाचे ठरणार आहे असे दिसते !

    आपल्या ब्लोग वरून डॉ अभिराम दीक्षित प्रो मोहरीर सारखे लोक उगीचच सनातनी सनातनी असे करत ठराविक वर्गाला टार्गेट करत असतात तसेच अनामिक लिहिणारे सुद्धा अत्यंत खालच्या पातळीवर जाउन लिहित असतात आपली ब्लोग च्या चर्चेची पातळी उंचावण्यासाठी आपण त्यावर एक आवाहन करून कान उघडणी करणारे स्वतंत्र स्फुट लिहावे ज्यामुळे अशा लोकाना जरब बसेल

    लोकाना जरब बसेल अशी विनंती करून थांबणे योग्य ठरेल



    पद्मजा कुंभारे

    ReplyDelete
  2. पद्मजाताई, आपणासही नववर्षाच्या शुभेच्छा! मोझिलच ब्राउझर वापरला तर मलाही जाहिराती दिसतात...गुगल क्रोम वापरला तर जाहिराती दिसणार नाहीत. मी ब्लोगवर कोनतीही जाहिरात घेत नाही. मी मोझिलाकडे तक्रार केली पण काही उपयोग होत नाही.
    विषय अनेकदा टोकाचे वेगळे असतात हे खरे आहे...पण जसे सुचतात तसे लिहिले जाते...शक्यतो मी अनेक विषय वेळोवेळी पुढे नेत असतो...(मी प्रतिक्रियांची दखल जमेल तेवढी घेत जाईल)

    ReplyDelete
  3. सर. केजरीवाल हा अपघात आहे

    त्याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे आणि अंतस्थ परीक्षणही !

    त्यात मिडीयाचाही हात भरपूर हात आहे ह्याचापण अभ्यास केला पाहिजे कारण

    पहिल्या अण्णांच्या आंदोलनानंतर मुंबईतल्या त्यांच्या आंदोलनाला शून्य प्रतिसाद मिळाला तसेच परवाच्या इलेक्शन मध्ये दिल्लीतील सभेला राजीव गांधींची सभेच्या गर्दीबाबत अगदीच फजिती झाली

    केजरीवाल यानापण आता पळवाट शोधावीच लागणार आहे- कारण भरमसाठ सबसिडी हे काही केजरीवाल याना - ज्याचे शिक्षण हे भारतातील सर्वोच्च शिक्षण समजले जाते - अशा माणसाला अशी सोल्युशन्स काढणे शोभत नाही

    महाराष्ट्रात जो ग्यास बाबत उपाय काढला आहे तो जास्त व्यावहारिक आहे

    दिल्ली आणि इतर राज्ये यात जमीन अस्मानाचा फरक आहे दिल्ली हे बाबू लोकांचे राज्य मानले जाते आणि महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य मानले जाते महाराष्ट्राचा दबाव टाकण्याच्या राजकारणाचा स्वभाव आहे त्यात मराठी मातीचा अभिमान पण आहे संयुक्त महाराष्ट्राची लढ्याची परंपरा आहे त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाला येथेपण स्थान नाही कारण गुजराथ महाराष्ट्र हे समीकरण जुळत नाही तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक हे पण जुळत नाही -

    आपण थोडेसे स्वयंभू अशी भारत भर मान्यता आहे म्हणून तर आपल्याला - म्हणजेच स्व. यशवंत राव चव्हाण याना दिल्लीवाले दूर ठेवत असत आजही तेच चालू आहे - शरद रावांचा सवता सुभा हि त्या स्वयंभू राजकारणाची चुणूक आहे ऽअपल्या कुंपणावरच्या राजकारणाची केजरीवाल यांनाही कल्पना असणार, तसेच अण्णा हजारे यांची कुप्रसिद्ध छुपी हुकुमशाही वृत्ती आणि केजरीवाल याना लागलेले सत्तेचे वेध आणि त्यांची राजकारणात उतरायची इच्छा यामुळे सत्ता आणि ओ चळवळी असा काहीसा मामला होता आणि आहे

    शिवाजी महाराजांच्या नंतर पेशव्यांनी जी चूक केली तीच चौथाई सर देशमुखीची चूक हे नवे विस्ताराचे राजकारण करणारे पक्ष जर करू पाहतील तर ती घोडचूक ठरेल आणि पहिला विजय न पचवता केलेली विस्ताराची घाई केजरीवाल यांच्या अंगाशी येऊ शकते

    महाराष्ट्रात पांढरे , दमानिया आणि इतर असे एकत्र येउन जर अट्टल राजकारण्याना खिंडीत गाठायची स्वप्ने बघत असतील तर ते तोंडघाशी पडतील - कारण मराठी माणूस सभाना गर्दी करतो पण मत मात्र उलटेच देत असतो हा इतिहास आहे !

    ReplyDelete
  4. आप्पा - काय हो बाप्पा ? काय म्हणत्ये तुमची पुण्याची गुलाबी थंडी ?

    अगदी गुरगुटून घेतलय की तुम्ही स्वतःला - कुठल्याही गल्लीत शिरलात तरी ओळखू येणार नाही !त्यापेक्षा शेकोटीच्या अध्यक्षांबरोबर का बसला नाहीत शेकत आणि गप्पा ऐकत आणि त्यांच्या कापूस गोंड्याच्या गोष्टी ऐकत ?

    बाप्पा - अरे बाबारे - गल्लीचे सोड - ते किरकोळ - शेकोटी भोवती आमच्या दिल्लीत जायच्या गप्पा चालल्या होत्या - पण ! अरे इथे घाम आलाय हे केजरीवाल प्रकरण ऐकून ! झोप उडाली आहे !घशाला कोरड पडली आहे आणि काय काय सांगू ?आत्ता कुठे रिटायर झालो होतो चांगला त्या पांढरे साहेबा सारखा - म्हटलं राजकारणात जाव आणि मजा करावी -नशीब काढाव - पण हा केजरीवाल आडवा आला मांजरी सारखा !मी स्वतंत्र दुधाचे राजकारण करणार होतो - पवार साहेब जसे कांद्याचे करतात तस्से ! !



    आप्पा - बापरे - ओ ब्रुटस यु टू ? असे विचारावेसे वाटतय बाप्पा - अहो तुम्हीच म्हणत होतात ना राजकारण हा सैतानाचा शेवटचा आसरा असतो - आणि तुम्हीच ?

    बाप्पा - सांगाना काय करू मी ते - पेन्शन आणि ग्रचुइटी आहे पाठीशी - मुलांची लग्न झाली आहेत - आता म्हटलं शेवटच्या महिन्यात ऑफिसातून सगळी गुप्त माहिती झेरोक्स करून आणली आहे त्याच्या जोरावर राजकारण करावं तर त्या मंत्रालयालाच आग लागली - काय राहील - मोठ्ठा भोपळा -काय कराव ते समजत नाही काहीतरी गेम केलीच पाहिजे

    बाप्पा - हुकमी एक्का सांगू का ? संजय सोनावणी ना भेट -

    आप्पा - कोण हे सोनावणी ?

    बाप्पा - कमाल आहे रे बाबा ! कोण हे संजय सोनावणी ?उद्या सुमो किंवा न्यानो मध्ये बसून हे कोण टाटा असे विचारशील - जरा बारीक विचार कर - आज हे शेकोटी संमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत उद्या नक्कीच मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष असणार-

    आप्पा - असे म्हणतोस ? चल मग त्यांची सही तरी घेऊन ठेऊ - पुढे उपयोगी ठरेल

    बाप्पा - पण काय रे हा केजरीवाल करतो तरी काय नेमकी जादू ?

    आप्पा - तेच कळत नाही रे - सगळी दिल्ली यडी झाली बघा या केजरीवाल पाई !

    बाप्पा - आपले बिचारे अण्णा - अगदीच वाळीत टाकल रे त्याना !

    आप्पा - हीच तर गम्मत आहे या दिल्लीची - कधी रावाचा रंक आणि कधी रंकाचा राव होईल सांगता येत नाही राणे काय भुजबळ काय - हि चिल्लीपिल्ली आहेत - एकच बंदा रुपय्या - शरदराव - कसा बिनधास्त आहे बघा !इथे केजरीवाल आलाच तरी आपले साहेब चटणी करतील त्याची किंवा इतका घोळात घेतील गोड गोड - बोलून - त्याला कळणारच नाही आपला गळा कसा आणि कुणी आणि कधी कापला ते

    बाप्पा - एक मात्र भारी बरका - कोन्ग्रेस आता दिल्लीत इंनोव्हात मावेल या आकाराची करून दाखवली या पठ्ठ्याने - एकदम फिल्मी झाली बघ लढाई - एकदम अमिताभ झालाय तो आता बघ कसा पाणीच वाटत सुटलाय - पोट फुटे पर्यंत पाणीच पाणी नंतर सगळ्याना दिवेच दिवे - मग सर्वाना घरेच घरे !

    आप्पा - अटल बिहारीना हे जमल असत - पण ते जुन्या सम्राट अशोकाच्या राज्याप्रमाणे नवे रस्ते आणि रस्त्याच्या कडेने सावलीसाठी झाडे लावत बसले आणि हरले -त्यांनी जर या बाजाराला फुकट पाणी आणि वीज दिली असती तर ? आज

    जहां डाल डाल पर सोनेकी चिडिया करती है बसेरा

    वो भारत देश है मेरा

    असे गाणे म्हणत सगळे अर्धी चड्डी वाले दिल्लीभर हिंडत बसले असते

    आज तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय

    बाप्पा - पण तुला एक सांगतो बाप्पा , ही कोन्ग्रेस काहीही म्हण , सोलिड भारी !

    केजारीवालला कसा खिशात टाकलाय बघ !नकोसा झाला कि बरोब्बर चाट घालून तोंडघाशी पाडतील - राज्य कराव तर त्यांनीच !पडद्या आडून असेल किंवा कसेही !

    आप्पा - चला त्या केजारीवालला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊ या - न जाणो - पुढे कसा उपयोग होईल ?

    बाप्पा -पुण्यात फुकट घर देतो म्हणाला तर ?असुदे आपल्या शुभेच्छा !त्याला काही पैसे लागत नाहीत - नाही का - दे टाळी !

    आप्पा - हि घे - टाळी द्यायलापण पैसे पडत नाहीत - काय ? हा हा !

    ReplyDelete
  5. संजय सर ,

    हैप्पी न्यू ईयर २०१४ बर का

    आणि सगळ्याना बर का

    ते एक राहून गेल होत

    आलो होतो हासत मी काही श्वासासाठी फक्त

    पण केजरीवाल चा विषय रंगला आणि आम्हाला कळलच नाही !

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा-बापा...तुम्हालाही नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! यंदाही अशी हास्यस्फोटक महफिल रंगेल अशा अपेक्षेत!

      Delete
  6. "आप" म्हणजे इतर राजकीय पक्षांच्या डोक्याला "ताप"

    ReplyDelete
  7. होय,

    "आप" म्हणजे इतर राजकीय पक्षांच्या डोक्याला "ताप"

    कदाचित इतर पक्षांचा होईल पत्ता साफ.

    ReplyDelete
  8. "आप" का आना दिल धडकाना,
    कॉंग्रस-भाजपची निंद चुराना,
    प्यार आ गया हैं ssssss,
    प्यार आ गया हैं,
    प्यार आ गया हैं ssssss,
    प्यार आ गया हैं,

    ReplyDelete
    Replies
    1. "आप" का आना दिल धडकाना,
      कॉंग्रस-भजपकि निंद चुराना,
      प्यार आ गया हैं ssssss,
      प्यार आ गया हैं,
      प्यार आ गया हैं ssssss,
      प्यार आ गया हैं,

      Delete
  9. राजू शेट्टी : एका शेतक-याची राजकीय आत्महत्या!
    रामदास आठवलेनी जातीयवादी पक्षाच्या गोटात शिरून राजकीय आत्महत्या केली. समस्त आंबेडकरी समाजाशी गद्दारी करत भगव्यांच्या दारात भिक्षा पात्र घेऊन उभा असलेला रामदास रामाचे दास्य करण्या वाचून अजुन काही करु शकणार नाही हेच खरे. पण त्याच्य जोडीला शेतक-याचा नेता म्हणविनारा राजू शेट्टी यानी आज वाज्या गाज्यात संघाची चड्डी घातली अन समस्त शेतक-यानी तोंडात बोटं घातली. जातीयवाद्याच्या गोटात शिरुन पुरोगाम्यांशी लढण्याचा विचार करणारे हे राजकीय रातकिडे शेवटी संघाचा सूर लावणारे जातकिडे निघाले. भारतीय राजकारणाला भ्रष्टाचाराची कीड लागली म्हणून दिवस रात्र तार स्वरात हिंडणारे संघाचे नि सेनेचे जातकिडे हे विसरतात की स्टींग ऑपरेशनद्वारे भ्रष्टाचाराचे बुरखे फाडण्याची सुरुवात तुमच्याच एका नेत्यापासून झाली होती. स्वच्छ प्रतिमेचा आव आणणारे व प्रगतीचे गाण गाणारे भगवे हे विसरतात की नितीन गडकरीच्या पुर्ती समूहातील प्रचंड घोटाळे व गोपिनाथ मुंडेच्या जिभेतून निसटलेले निवडणूकीचे कोटीचे आकडॆ म्हणजे समस्त भगव्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. तरीही मेरी ही लाल म्हणत माकड उड्या मारणारे चड्डीवाले व त्यांचे लाल टिळ्याचे सोंगाळे बाता काय मारतात तर म्हणे यांचा लढा स्वच्छ प्रतिमेच्या आग्रहासाठी व देशाच्या विकासासाठी आहे.
    चला एकदा माणून चालू की ही लोकं आर्थिक विकास साधून दाखवतीलही... पण आर्थीक प्रगती म्हणजे समाजाचा विकास होय का? अजिबात नाही. सामाजीक वातावरण दहशतीचं असल्यावर पैसा कोण्या कामाचा? आर्थिक विकास ही माणसाची जणू एकमेव गरज असून तो प्रश्न सुटला की सगळे प्रश्न सुटतात असा आवा आणणारे हे भगवे सामाजीक सुरक्षितते बद्दल ब्र शब्द बोलत नाही. माणसाकडे पैसा नसतानाही वा अत्यल्प पैशातही तो सुखानी जगू शकतो. कारण पैसा हा गरजांशी निगडीत असून गरजांशी तोडजोड करत जगणे माणसाला चांगलेच ठाऊक आहे. पण मानवी हक्क नाकारात जातीयवाद बोकाळला गेला व उरात धडकी भरणारी दहशत घेऊन एखादा माणूस चैनीने झोपू शकेल का? अशक्य आहे. मग आजचे हे भगवे जे विकासाच्या बाता मारत आहेत यांच्या एकुण मनोवृत्तीचा ज्याना अंदाज आहे त्याना हे चांगलेच माहीत आहे की भगवा राज्य म्हणजे दहशतीचे राज्य. आज उभा गुजरात दहशतीत जगतो आहे. तिथला दलीत व मुस्लीम संवर्णांच्यापुढे गुलामा सारखा वागतो आहे. आर्थिक विकास साधलेल्या(?) गुजरातेतील दहशतीत जगणा-या माणसांच्या आयुष्यातील ही पोकळी कुठल्याही पैशानी भरुन निघणार नाही. पण अगदी याच्या उलट महाराष्ट्रातील तळागळातला माणूस पैशानी थोडं मागे असला तरी भगव्या दहशती पासून तो मुक्त आहे ही जमेची बाजू नाही का? की आर्थीक विकासाच्या नावाखाली भगवी दहशत विकत घ्यायची?

    ReplyDelete
  10. Contd......
    यावेळी नरेंद्र मोदीनी मुंबईत सभा घेतली तेंव्हा एका शब्दानी हिंदूत्वाचा मुद्दा काढला नाही. पण अगदी याच्या उलट तिकडे उत्तर प्रदेशात मात्र प्रत्येक सभेतून हिंद्त्वाच्या गर्जना होताना दिसतात. याचा अर्थ काय? याचाच अर्थ असा की ईथल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेतून माणसाचा वैचारीक विकास झाला हे त्याना कळले. म्हणजेच इथल्या शासनानी निव्वड आर्थीक विकासच नाही तर माणसाचा वैचारीक विकास घडवला असून तो कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पुरोगामी धोरणाचा परिणाम आहे हे मोदी व समस्त भगवे जाणून होते. देशातील इतर भागातील मतदार अशा पुरोगामी शासनाच्या अभावामुळे आजही मुर्ख असून तिकडे हिंदूत्वाचा मुद्दा रेटता येतो व तो खपतो सुद्धा. पण महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने राजकारणाच्या पलिकडे जाऊन फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा फुलविला व त्यातून पुरोगामी माणूस निर्माण केला नि जपला आहे. त्या पुरोगामी माणसापुढे आंधळे व भगवे मुद्दे उभे करायला मुंबईच्या सभेत मोदीची छाती झाली नाही ही आहे ख-या अर्थाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीची कमाई....

    आता थोडसं राजु शेट्टी बद्दल:
    राजु शेट्टीला आपण सगळे शेतक-यांचा नेता म्हणून ओळखतो. एवढेच नव्हे तर शेतक-यांसाठी लाठ्या काठ्या खात राजू शेट्टीने जी चळवळ उभी केली त्यातून शिवार ते संसद असा दैदिप्यमान प्रवास करुन आज राजू शेट्टी खासदार बनले... किंबहुना लोकानी त्याना बनविले. असे हे राजू शेट्टी नेमके आले कुठून तर... शरद जोशींच्या शेतकरी चळवळीतून आले. शरद जोशी स्वत:ला पुरोगामी मानत असत व सेना-भाजपाला ते नेहमी "जातीयवादी गिधाडं" असं संबोधत असत. त्यामुळे सामान्य माणूस त्यांच्या पाठीशी उभा राहीला. पण एक दिवस जोशींचा बुरखा टरकन फाटला व ते सेना-भाजपाला पाठिंबा दयायला निघाले. यावरुन राजून शेट्टीनी विरोध दर्शविला. फुले-शाहू-आंबेडकराचा पुरोगामी विचार जपणारा राजू शेट्टी आपल्या गुरुवरच उलटला व जातीयवादी गिधाडाशी मैत्री नको म्हणत वेगळी चूल मांडली. राजू शेट्टीच्या या स्वाभिमानी व बाणेदार कृतीला मुजरा करत पश्चिम महाराष्ट्रातील सामान्य माणूस आता राजू शेट्टीच्या पाठीशी उभा झाला. त्यातून उदय झाला राजू शेट्टी नावाच्या नवा झंझावाताचा... पण आज जरासं पक्ष स्थिरावल्यावर हाच राजू शेट्टी त्याच जुन्या गिधाडांशी मैत्री करायला निघाला ज्यांच्या विरोधात दंड थोपटून स्वत:चं राजकीय अस्तित्व उभारलं होतं. म्हणजे पुरोगामीत्वाचा आव निव्वड पक्ष बळकटीसाठी आणला होता एवढेच... व कालची जातीयवादी गिधाडं आज राजू शेट्टी याना अचानक मित्र वाटू लागली आहेत... हा झाला राजू शेट्टी यांचा संक्षिप्त इतिहास.

    ReplyDelete
  11. Contd.........

    आता परत सेना भाजपचं काय ते बघू. मुंबईच्या सभेत महार्जना करताना मोदीच्या घषात अडकलेला हिंदूत्व म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पुरुगामीत्वाची पावती होती. कारण मोदी व सेना-भाजप हे चांगल्या प्रकारे जाणतात की इथला माणूस कसा आहे. अन राजू शेट्टी अशा पुरोगामी महाराष्ट्राला भगव्यांच्या दावणीला बांधायला निघाले या सारखी लज्जस्पद गोष्ट नाही. अत्यंत भ्रष्ट अशा भाजप-सेनेचे पाय चाटत हेच ते अमृत व तिर्थ आहे म्हणून गुणगाण गाणारे दास व शेतक-यांचे बाप्पे ख-या अर्थाने स्वताचाच घात करत आहेत. या पुरोगामी महाराष्ट्राला खोट्या व बनावट विकासाची भुरळ पडेल असे दिसत नाही. पण दुर्दैवाने पडलीच तर भगव्या दहशतीचे व जातीयवादाचे चटके बसल्या शिवाय राहणार नाही. किंवा एकेकाळच्राया राजू शेट्टीच्या भाषेत सांगायचे तर ही जातीयवादी गिधाडं आमचे लचके तोडणार. शेट्टी हे शेतक-यांचे नेते आहेत. इथला शेतकरी आत्महत्या करतोय हे आपण नेहमी वाचत आलोय. आज राजू शेट्टीने महायुतीत प्रवेश केल्यावर मी एवढेच म्हणेण... एका शेतक-यानी केली राजकीय आत्महत्या...!!!
    End.

    ReplyDelete
  12. "आप" आए, बहार आए!!!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  13. आप रे आप.. राजलाही ताप


    'आप'चा फटका सगळ्याच पक्षांना बसण्याची शक्यता आहे; पण सर्व पक्षांहून आपण वेगळे असल्याची केलेली वल्गना टिकवण्यासाठी राज यांनाही बराच खटाटोप करावा लागणार आहे. नाराज, भ्रमनिरास झालेल्या, दुखावलेल्या मतदारांची मोट बांधताना त्यांनाही 'आप'चा अडसर होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कदाचित, त्यामुळेच मोदी आणि 'आप'च्या माध्यमातून त्यांनी हे एकाच धनुष्यातून दोन तीर मारले आहेत. ते कोणाच्या वर्मी लागतात की नुसतेच हवेत जातात, हे आगामी काळच ठरवेल.


    महाराष्ट्रात आपणच बाप असल्याचे सांगत 'आप'ची खिल्ली उडवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्ष आपणही 'आप'ची मनसे धास्ती घेतल्याचेच जणू दाखवून दिले आहे. त्याचबरोबर महायुतीत जाण्याची इच्छा आतापर्यंत तरी प्रकट न केलेल्या राज यांना चौथी सीट मिळणार नाही, असे म्हणत खिजवण्यात भाजपाचेही हसू झाले आहे. सर्वच पक्षांनी अगदी मनसेनेही 'आप'ची धास्ती घेतली आहे, असेच वाटावे अशा घटना गेल्या आठवडाभरात राज्यात घडल्या. दिल्लीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर 'आप'ने देशभरात सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. त्याला महाराष्ट्रातही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. बहुधा त्यामुळेच सर्व पक्षांनी काही ना काही मते व्यक्त करून 'आप'ची दखल घेतली आहे. राज्याच्या व देशाच्या राजकारणार 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'आप' हा देशाच्या राजकारणातील अपघात आहे, या शब्दांत हेटाळणी केली. राज्यात गेल्या खेपेस 'आप' सारख्याच नव्याने उदयाला आलेल्या मनसेने राष्ट्रवादीसह बहुतेक सर्वच पक्षांची झोप उडवली होती, याची धास्ती त्यातून दिसून आली. 'आप' सारखेच अनपेक्षित व घवघवीत यश मनसेला पदार्पणातच मिळाले, हे विसरून चालणार नाही.
    CONTD...

    ReplyDelete
  14. राज यांनी नाशिकमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे एकच राजकीय धुरळा उडाला आहे. नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदी नाव घोषित होण्यापूर्वीच राज त्यांच्या सद्भावना यात्रेमध्ये सहभागी झाले होते. मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या विकासकामांची त्यांनी तोंड फाटेस्तोवर स्तुती केली. त्यामुळे शिवसेना व भाजपाचे स्थानिक नेते अस्वस्थ झाले होते. पुढे महायुतीची मोट बांधताना मनसेला सहभागी करून घेण्याबाबत युतीचे कार्यकर्ते आग्रही होते; पण 'टाळी' देण्या-घेण्यावरून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी रंगलेल्या जुगलबंदीमुळे राज महायुतीत सहभागी होण्याची शक्यता धूंसर झाली. त्याच वेळी मोदी यांच्याशी राज यांच्या निर्माण झालेल्या उत्तम संबंधांमुळे ते महायुतीत सहभागी होतील, असा तर्क बांधला जात होता. प्रत्यक्षात राज यांनी थेट मोदी यांच्यावरच निशाणा साधल्यामुळे सगळेच मुसळ केरात गेले. लोकसभा व विधानसभेसाठीची महायुती तर दूरच, पण आता नाशिकच्या महापालिकेतील तरी युती राहते किंवा कसे हा पेच निर्माण झाला आहे. राज यांनी मोदींवर टीकास्त्र सोडल्याने अस्वस्थ झालेल्या भाजपाच्या नेत्यांनी नाशिक महापालिकेत मनसेला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा इशारावजा धमकी दिली. त्यावर मला सत्ताच नको, अशी वरकडी करत राज तातडीने मुंबईला निघून गेले. पूर्वी सेना-भाजपामध्ये असे अनेकदा वाद-विवाद झाले; पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे प्रमोद महाजन यांच्या शब्दांवर कार्यकर्ते नमते घेत असत. आता या पक्षांमध्ये असे कोणी 'श्रेष्ठी' उरले नसल्याचे कार्यकर्त्यांना प्रकर्षाने जाणवत आहे.

    गुजरातचा विकास आणि नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळणार्या् राज यांनी आकस्मिकपणे असा पवित्रा का घेतला असावा? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. दिल्लीतील 'आप'ची जागा महाराष्ट्रात 'मनसे'च भरून काढून शकतो हे अधोरेखित करण्यासाठी म्हणजेच वेळप्रसंगी भाजपाच्याही नेतृत्वाला आपण आव्हान देऊ शकतो हे दाखवण्यासाठी, तर राज यांनी हे वक्तव्य केले नसेल ना? की गेले काही दिवस राज्यात एवढय़ा घडामोडी घडूनही मूग गिळून गप्प बसलेल्या राज यांनी माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठीच हा स्टंट केला असावा, अशीही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. सत्ताधारी काँग्रेसला तसेच एकंदरच प्रस्थापित असलेल्या भारतीय जनता पक्षासह सर्वच पक्षांच्या आश्वाकसनांना कंटाळलेल्या मतदारांनी 'आप'च्या जाहीरनाम्यावर विश्वा्स ठेवला. शुद्ध चारित्र्याच्या उमेदवारांवर भरवसा ठेवला व त्यांना निवडून दिले; पण राजकारणात नुसते यश मिळवणे सोपे नसते. ते टिकवणे आणि वृद्धिंगत करणे महत्त्वाचे ठरते. देशाच्या सर्व थरांतील आणि सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये त्यामुळे कमालीचे कुतुहूल आहे. दिल्लीत सुरू असलेल्या 'आप'च्या वार्याशचा देशभर झंझावात तर होणार नाही ना? अशी चिंता कित्येक नेते खाजगीत व्यक्त करत आहेत. त्यामुळेच बहुदा राज यांनीही महाराष्ट्रात 'आप' नव्हे आम्हीच बाप, असे वक्तव्य करत त्यांना भेडसावणारी चिंताच अप्रत्यक्षरीत्या व्यक्त केली. दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्राच्या जनतेने आपल्यालाही भरभरून मते दिली, हे राज यांनी विसरता कामा नये.
    CONTD...

    ReplyDelete
  15. लोकसभेच्या, विधानसभेच्या आणि महापालिकेच्या गेल्या निवडणुका मनसेसाठी नवीन होत्या. या पक्षाला कितपत यश मिळेल? राज यांच्या सभांना होणार्याा गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होईल का? अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या; पण मतदारांनी मनसेला भरघोस मते देत सर्वच पक्षांना चांगलाच झटका दिला. लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचा एकही खासदार निवडून आला नसला, तरी पुण्यासारख्या शहरात रणजीत शिरोळे या तरुण उमेदवाराला तब्बल ७५ हजार मते मिळाली होती, हे विसरून चालणार नाही. राज्याच्या सर्वच भागातून त्यांना अशी घवघवीत मते मिळाली. विधानसभेच्या निवडणुकीत, तर पहिल्याच खेपेस तेरा आमदार निवडून आणून त्यांनी चमत्कार घडवला. त्या निवडणुकीत बारा ठिकाणी मनसेचे उमेदवार द्वितीय क्रमांकावर होते. एवढेच नव्हे, प्रस्थापित व प्रबळ उमेदवारांच्या विरोधात तर पंधरा ठिकाणी जेमतेम पाच हजारांपर्यंतच्या फरकाने पराभव झाला होता. मनसेच्या या यशाने प्रस्थापित पक्ष हादरले. राजकीय विश्लेषक बुचकळ्यात पडले. सर्व धर्मांतून, सर्व समाजातून, सर्व वयोगटातून आणि विशेषत: तरुणाईकडून मनसेला मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले. पुढे पालिका-महापालिकांच्या निवडणुकीतही हेच प्रत्यंतर आले. पुण्यात २८ नगरसेवक निवडून आले. पुण्याची सत्ता थोडक्यात हुकली, तरी नाशिकला सत्ता मिळाली. मुंबई, कल्याण-डोंबवली अशा महापालिकांमध्ये तब्बल १३३ नगरसेवक निवडून आले. हा राज यांचा करिष्मा तर होताच; त्यापेक्षाही प्रस्थापित पक्षांपेक्षा आपण निराळे आहोत हे ठसवण्याचा त्यांचा प्रय▪यशस्वी झाला. मनसेच्या जाहीरनाम्यावर आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्ल्यू प्रिंटवर विश्वाणस ठेवून मतदारांनी मनसेच्या पारड्यात भरभरून मते टाकली. दिल्लीतील 'आप'पुढे जे आव्हान आहे, तेच आव्हान असलेली 'मनसे' मात्र या कसोटीत उतरू शकली नाही, असेच म्हणावे लागले. गेली पाच वर्षे नुसती चर्चा असलेली महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट काही अद्यापि कोणाला दिसली नाही आणि राज यांनीही पुन्हा कधी त्याबाबत चर्चा केल्याचे स्मरत नाही.
    CONTD...

    ReplyDelete
  16. नाशिकमध्ये सत्ता मिळूनही ठोस विकासकामे मनसेला मार्गी लावता आली नाही. त्याबाबत जनतेमध्ये असंतोष वाढत असल्याचे लक्षात येताच 'गोदापार्क'चा प्रकल्प अंबानींच्या सहकार्याने सुरू करण्यात आला. मध्यंतरी टोलसारख्या मुद्दय़ांवर राज्यभर आंदोलने छेडली गेली; पण टोलसारखी अनेक आंदोलने टीपेला पोहोचल्यावर आकस्मिकपणे का थंडावली? त्याचे 'राज' कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही ठाऊक झाले आहे. ज्या अपेक्षा मतदारांना मनसेकडून होत्या, त्या पूर्ण करण्यात मनसे तितकीशी यशस्वी ठरली नाही. प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत राज सभा कशा घेतात? ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कशी हुबेहुब नक्कल करतात? त्यांचे नियोजन किती चोख असते? गर्दी किती अफाट असते? स्थानिक प्रश्न मांडून लोकांची नेमकी नस कसे ते पकडतात? वगैरे गोष्टी 'लाईव्ह' दाखवून त्यांचा झेंडा उचलून धरला आहे; पण मनसेने मतदारांना दिलेल्या आश्वाशसनांची पूर्तता कितपत झाली? नगरसेवकांची कार्यपद्धती कशी आहे? याचे विश्लेषण कोणत्याही माध्यमांनी केले नाही. जनतेला दिलेली आश्वाेसने अंगलट येण्याच्या शक्यतेने तर मनसे नाशिकमधील सत्तेतून बाहेर पडायची तयारी दाखवत नाही ना? तशी जबाबदारी झटकणे म्हणजे मतदारांनी ठेवलेल्या विश्वाखसाला तडा देणे होय, कारण महाराष्ट्राच्या विकासाबद्दल राज ठाकरे यांची नेमकी कल्पना काय आहे? हे नाशिकवरूनच दिसणार आहे आणि राज आताच तेथील सत्ता सोडून बाहेर पडण्याची भाषा करीत आहेत. ही रणछोडगिरी महाराष्ट्रातील जनतेला पसंत पडणारी नाही. बहुधा राज यांनाही हे ठाऊक असावे. त्यामुळेच काहीही कारण नसताना केजरीवाल, 'आप' आणि मोदींबाबत वादग्रस्त विधाने करून राष्ट्रीय स्तरावर आपली चर्चा होईल याची व्यवस्था त्यांनी केली असावी, अशी चर्चा आहे. मुंबईतील लोकलमध्ये तीनजणांच्या आसनावर थोडी सरकासरकवी केली, तर चौथाही बसू शकतो.
    महायुतीच्या लोकलमधील ही चौथी जागा स्वाभिमानी पक्षाने पटकावली आहे. त्यामुळे राज यांना 'मनसे'चा खुंटा हलवून अधिक बळकट करावा लागणार आहे. दिल्लीतील 'आप'चा झंझावात महाराष्ट्रात येऊन थडकण्यापूर्वीच आपणच सर्वांचे 'बाप'आहोत, अशी प्रतिमा तयार करावी लागणार आहे. 'आप'चा फटका सगळ्याच पक्षांना बसण्याची शक्यता आहे; पण सर्व पक्षांहून आपण वेगळे असल्याची केलेली वल्गना टिकवण्यासाठी राज यांनाही बराच खटाटोप करावा लागणार आहे. नाराज, भ्रमनिरास झालेल्या, दुखावलेल्या मतदारांची मोट बांधताना त्यांनाही 'आप'चा अडसर होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कदाचित, त्यामुळेच मोदी आणि 'आप'च्या माध्यमातून त्यांनी हे एकाच धनुष्यातून दोन तीर मारले आहेत. ते कोणाच्या वर्मी लागतात की नुसतेच हवेत जातात, हे आगामी काळच ठरवेल.

    -राही भिडे

    END.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...