Saturday, July 25, 2026
पोरस म्हणजे पुरू?
Wednesday, July 15, 2026
कुंभमेळा : इतिहास
भारतीय परंपरेत सामुहिक स्नानांनाही धार्मिक/सांस्कृतिक महत्व आहे हे आपल्याला सिंधू संस्कृतीत सापडलेल्या सार्वजनिक अवाढव्य स्नानगृहांवरुन दिसते. तेथे खाजगी घरांतील स्नानगृहे घराघरातही सापडलेली आहेत. घरात स्नानगृहे असतांनाही सार्वजनिक स्नानगृहेही असावीत याचा अर्थ त्यांचा संबंध धार्मिक कृत्यांशी असावा असे अनुमान करता येवू शकते. सिंधुपुजनाचा उत्सवही त्या प्रदेशातील नदीबाबतच्या कृतज्ञतेशी जोडता येतो. ब्रह्मपुत्रेचीही अशीच पुजा करण्याची पद्धत आहे. नद्यांचा आणि मानवी संस्कृतीचा निकटचा संबंध असल्याने कृतज्ञतेपोटी नदीतील स्थान आणि तिची पुजा याला महत्व आले असल्यास नवल नाही.
Thursday, July 9, 2026
शोध पाणबुडीचा!
आभाळात पंख पसरून उडणाऱ्या
पक्षांना पाहून माणसाला विमानाची कल्पना सुचली, तशीच अथांग
सागराच्या पोटात लीलया विहरणार्या माशांना पाहून त्याला पाण्याच्या खाली जाण्याची
ओढ लागली. माशाप्रमाणे पाण्याच्या खाली जाऊन प्रवास करता
यावा, शत्रूच्या नकळत समुद्राच्या तळाशी दबा धरून बसता
यावे आणि हवे तेव्हा पुन्हा पाण्याच्या वर येता यावे, या मानवी कल्पकतेतूनच जन्म झाला एका अद्भुत साधनाचा —'पाणबुडी'चा!
अलेक्झांडर द ग्रेटच्या
काचेच्या पेटीपासून सुरू झालेला हा प्रवास आजच्या अत्याधुनिक, महिनोनमहिने पाण्याखाली राहणाऱ्या आण्विक पाणबुड्यांपर्यंत कसा
पोहोचला याचा इतिहास प्रचंड रंजक आणि थक्क करून सोडणारा आहे.
इसवी सन पूर्व चौथ्या शतकात
अलेक्झांडर द ग्रेटने समुद्राच्या खाली काय आहे हे पाहण्यासाठी एका काचेच्या पेटीसारखी
रचना केली होती याचे दाखले इतीहासात मिळतात. अर्थात ती आजच्या अर्थाने पाणबुडी नव्हती, तर पाण्याखाली काही काळ राहता
यावे यासाठी केलेली एक तात्पुरती सोय होती.
त्यानंतर अनेक शतके
माणसाच्या मनात या कल्पनेने घर केले होते. सुरुवातीच्या काळातील विचारवंतांनी आणि
चित्रकार-शास्त्रज्ञांनी काढलेली रेखाटने पाहिली तर त्यात विज्ञानापेक्षा निसर्गाची हुबेहूब नक्कल जास्त दिसते. माणसाने देवमासा, कासव किंवा इतर माशांच्या
शरीररचनेचा अभ्यास करून तशीच रेखाटने कागदावर उतरवली. निसर्गाने माशांना
पाण्याखाली पोहण्यासाठी जी रचना दिली आहे तीच माणसाला आदर्श वाटत
होती.
जगप्रसिद्ध चित्रकार आणि
संशोधक लिओनार्डो दा विंची याने १५ व्या शतकातच एका पाणबुडीचे रेखाटन तयार केले
होते. परंतु त्याने ते जाणीवपूर्वक जगापासून लपवून ठेवले.
"माणूस या यंत्राचा वापर समुद्राच्या तळाशी जाऊन जहाजे बुडवण्यासाठी आणि
क्रूर युद्धासाठी करेल," अशी भीती त्याला वाटत होती. भविष्यात अर्थात ही
भीती खरी झाली हे वेगळे.
खऱ्या अर्थाने पाणबुडीची
पहिली अधिकृत वैज्ञानिक संकल्पना १५७८ मध्ये विल्यम बर्न या इंग्रज गणितज्ञाने
कागदावर मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली कॉर्नेलियस व्हॅन ड्रेबेल या डच
इंजिनिअरने. १६२० मध्ये त्याने लाकूड आणि चामड्याचा वापर करून एक नाव तयार केली आणि ती थेम्स नदीत पाण्याखाली चालवून दाखवली.
सुरुवातीच्या रेखाटनांमध्ये
सर्वात मोठी समस्या होती ती नाव पाण्याखाली तर जाईल, पण तिला पुढे ढकलणार कोण? तेव्हा याचे उत्तर केवळ माणसाचे हात हेच होते. त्यामुळे
जुन्या रेखाटनांमध्ये पाणबुडीच्या दोन्ही बाजूंना मोठी वल्हे किंवा हाताने
फिरवायचे पंखे दाखवले गेले आहेत.
हाताने वल्हे मारून पाण्यात
प्रवास करणे किती जीवघेणे असू शकते, याचा प्रत्यय अठराव्या
शतकात आला. १७७५ मध्ये अमेरिकन क्रांतीच्या दरम्यान डेव्हिड बुशनेल याने 'टर्टल' नावाची
पाणबुडी बनवली. दिसायला ही पाणबुडी एखाद्या मोठ्या उभ्या पिपासारखी होती. एकाच
सैनिकाने आत बसून हाताने पॅडल मारत आणि पंखा फिरवत ती चालवायची होती. शत्रूच्या
जहाजाला पाण्याखालून सुरुंग लावणे हा याचा उद्देश होता. विचार करा, त्या अंधाऱ्या,
अरुंद पिपात बसून, एकाच वेळी ऑक्सिजनची कमतरता सोसत, हाताने ताकद लावत शत्रूवर
हल्ला करणे म्हणजे आत्मघाती मोहीमच होती! ही मोहीम यशस्वी झाली नसली तरी युद्धाच्या उद्देशाने बनवलेली ती पहिली
पाणबुडी ठरली.
त्यानंतर अमेरिकन यादवी
युद्धाच्या काळात १८६३ मध्ये ‘एच. एल. ह्न्ली’ या पूर्णपणे लोखंडाच्या पाणबुडीने शत्रूचे जहाज बुडवून इतिहास रचला.
परंतु या पाणबुडीला गती देण्यासाठी आत चक्क आठ सैनिक
हाताने एक मोठा कँक
फिरवत होते. आतील हवेची
कोंडी आणि तांत्रिक बिघाडामुळे या मोहिमेदरम्यान 'हन्ली' सर्व सैनिकांसह समुद्राच्या तळाशी बुडाली.
तोपर्यंत शास्त्रज्ञांच्या
लक्षात आले होते की, केवळ मानवी ताकदीवर प्रचालन आणि खोल पाण्यातील प्रचंड
दाब सहन करणेही अशक्य आहे. जसजशी भौतिकशास्त्राची प्रगती झाली तसतशी रेखाटनांमध्ये 'चौकोनी' ऐवजी 'दंडगोलाकार' आणि 'गोलाकार' आकारांना प्राधान्य दिले गेले. अशाच आकारामुळे पाण्याचा दाब
सर्व बाजूंनी समान विभागला जाईल अशी ही योजना होती. तसेच, माशांच्या शरीरातील हवेच्या पिशवीसारखीच यंत्रणा रेखाटनात आली, ज्याला आज आपण 'बॅलास्ट टँक्स'
म्हणतो. यात पाणी भरले की
पाणबुडी जड होऊन खाली जाते आणि कॉम्प्रेस्ड हवेने पाणी बाहेर काढले की हलकी होऊन
वर येते.
याच काळात, फ्रेंच लेखक ज्युल्स व्हर्न याने १८७० मध्ये “ट्वेंटी थाउजंड लीग्ज अंडर द सी” ही काल्पनिका लिहिली. या कादंबरीतील कॅप्टन नेमो आणि त्याची 'नाँटिलस' नावाची अत्याधुनिक पण काल्पनिक
पाणबुडीचे वर्णन वाचून जग थक्क झाले. विज्ञानाने ज्या गोष्टीचा विचारही केला
नव्हता ती एका लेखकाने आधीच कागदावर जिवंत केली होती. या
कादंबरीने तत्कालीन शास्त्रज्ञांना प्रचंड प्रेरणा दिली.
लवकरच, १९०० च्या सुमारास जॉन फिलिप हॉलंड या शास्त्रज्ञाने पेट्रोल इंजिन
आणि इलेक्ट्रिक बॅटरी यांचे मिश्रण करून पहिली यशस्वी आधुनिक पाणबुडी विकसित केली.
जेव्हा पाणबुडी पाण्याच्या वर असे, तेव्हा ते इंजिनवर चालत असे
आणि सोबत बॅटरी चार्ज करत असे. पाण्याच्या खाली गेल्यावर पेट्रोल इंजिन बंद करून
ती बॅटरीच्या ऊर्जेवर शांतपणे प्रवास करत असे. हा शोध पाणबुडीच्या इतिहासातील 'टर्निंग पॉईंट'
ठरला.
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात
जर्मनीने 'यू-बोट्स' नावाच्या
पाणबुड्यांचा ताफा निर्माण करून अटलांटिक महासागरात थैमान घातले. समुद्राच्या संथ
पाण्याखाली लपून राहून अचानक टॉरपेडो डागणारी ही पाणबुडी शत्रूसाठी अदृश्य मृत्यू
ठरली होती.
पारंपरिक पाणबुड्यांमध्ये
एक मोठी मर्यादा होती. इंजिन चालवण्यासाठी आणि आतील माणसांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची
गरज असायची. त्यामुळे या पाणबुड्यांना काही काळातच पाण्याच्या पृष्ठभागावर यावे
लागायचे. या समस्येवर कायमचा तोडगा निघाला १९५४ मध्ये, जेव्हा अमेरिकेने जगातील पहिली अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी बनवली आणि
तिला नाव दिले ज्युल्स व्हर्नच्या कादंबरीवरून—'युएसएस नाँटिलस'. अणुऊर्जेमुळे पाणबुडीला इंधनाची आणि ऑक्सिजनची
चिंता उरली नाही.
अणूभट्टीमधून मिळणाऱ्या अफाट
उष्णतेच्या जोरावर समुद्राच्या पाण्याचेच पिण्यायोग्य पाण्यात आणि श्वास
घेण्यासाठी ऑक्सिजनमध्ये रूपांतर करणे शक्य झाले. आजच्या आधुनिक आण्विक पाणबुड्या
या पाण्याच्या खाली सलग ३ ते ४ महिने सहज राहू शकतात. त्यांना वर येण्याची गरज
फक्त आतील सैनिकांचे अन्न संपते तेव्हाच असते! आण्विक पाणबुडी म्हणजे समुद्राच्या
तळाशी वसलेले एक आधुनिक
स्वयंपूर्ण शहरच असते.
कागदावर माशांची हुबेहूब
नक्कल करणाऱ्या रेखाटनांपासून सुरू झालेला हा प्रवास, आज एका महाकाय,
अदृश्य आणि विनाशकारी
महाशक्तीत रूपांतरित झाला आहे. भारताकडेही आज 'आयएनएस अरिहंत' सारख्या अत्याधुनिक आण्विक पाणबुड्या आहेत, ज्या देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करतात. केवळ युद्धासाठीच नव्हे, तर सागरी जीवसृष्टीचा आणि सागरतळाचा अभ्यास करण्यासाठी माणसाने
बनवलेली ही कृत्रिम मासोळी आजही मानवी बुद्धिमत्तेची आणि जिद्दीची साक्ष देत
समुद्राच्या गर्भात संचार करत आहे.
-संजय
सोनवणी
Monday, July 6, 2026
हे बोललेच पाहिजे!
लेखक-विचारवंत आणि इतिहासकार यांना स्वतंत्र मते असावीत की नाही हा प्रश्नच सध्याच्या काळात बाद झालेला आहे, कारण ते जी मते मांडतात किंवा मांडायचे टाळतात त्यामागे सांस्कृतिक आणि राजकीय दबाव आहेत असा प्रचार केला जातो. काही प्रमाणात ते खरेही असेल, म्हणून स्वत:ची सांस्कृतिक आणि राजकीय मते असू नयेत आणि ते मांडू नयेत असा होत नाही. येथे हिटलरच्या नाझीवादाविरुद्ध उभे राहिलेले थॉमस मान, स्टालिनच्या राजवटीचा पर्दाफाश करणारे जॉर्ज ऑरवेल किंवा अलेक्झांडर सोल्झेनित्सिनसारख्या जागतिक लेखकांचे नाव घेत असतानाच आपल्याकडील शरदचंद्र चटर्जी, बंकिमचंद्र तसेच मराठीतील अण्णाभाऊ साठे, अरुण साधू, नामदेव ढसाळ यांसारखे समाज, संस्कृती आणि राजकारण यावरच प्रश्न उभे करणारे लेखक झालेले नाहीत असे नाही. पण अलीकडे गेल्या काही दशकांत ही परंपरा आटत आटत आता एवढी क्षीण झालेली आहे की तिचे अस्तित्वही लक्षात येऊ नये. याच काळात नेमक्या संस्कृतीवर, समाजव्यवस्थेवर एवढे राजकीय आणि सांस्कृतिक आघात होऊ लागलेले आहेत आणि तरीही त्यांचा नेमका वेध घेत त्यांच्या मुळाशी जात त्याचे प्रलयंकारी चित्रण मात्र केले जाऊ नये हे आश्चर्य आहे. काही लोक सत्तानुकुल निहीतात किंवा जी विचारधारा प्रबळ आहे त्याचे समर्थन होईल अशा कृती लिहितात वा चित्रपट निर्माण करतात आणि सहसा तेच यशस्वी होत असताना दिसत असल्याने त्या विचारधारेच्या विरोधात कोणी लिहिले अथवा चित्रपट निर्माण करणे आजकाल सहसा होत नाही. त्यात कोणी विरोधी सूर लावला तरी त्यामागील सत्यासत्यता पडताळून पाहण्याऐवजी “लेखकांना राजकीय मते असू नयेत...” असे वावदूक सल्ले दिले जातात.
विचारवंत
आणि इतिहासकार आजकाल सत्तेची जी हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) विचार्धारेलाच
समर्थन मिलेल असे विचार आणि इतिहास मांडतांना दिसतात. इतिहास चुकीचा असेल तर तो
सत्यस्वरूपात मांडणे अथवा नव्याने आकलन करणे ही एक जगन्मान्य लेखन परंपरा आहे. पण
विशिष्ट विचारधारेचे प्राबल्य पाहून सरकारदरबारी स्थान मिळवण्यासाठी आपले मूळ
विचार बाजूला सारत इतिहासाचेच मुडदे पडतील असे काही लेखन प्रकाशित होत असेल आणि
नावाजले जात असेल तर मग इतिहास कोठे राहिला? भारताचा इतिहास मुळात भ्रामक झाला
आहे, मिथकात्मक झाला आहे तो याच प्रवृत्तीमुळे. आपण आपली ज्ञानपरंपरा त्यागून
अंधारयुगाचेच समर्थन करतो आहोत की काय असा आता गंभीर प्रश्न पडतो आहे.
बरे,
हा इतिहास ग्रंथांपुरताच मर्यादित राहिला असता तरी ठीक होते, पण आता चक्क तो
अभ्यासक्रमातही घुसवला जातो आहे. त्याचे ताजे उदाहरण आपण नंतर पाहूच पण मुळात
केंद्र सरकारनेच अभ्यासक्रमातील इतिहास बदलण्यासाठी अवाढव्य प्रकल्प सुरु केले
आहेत, त्याविरुद्ध मात्र कोणी आवाज उठवलेला दिसत नाही. केंद्रीय माध्यमिक
शिक्षण मंडळाने (सीबीएसइ) इयत्ता अकरावी आणि बारावीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र
या विषयांच्या अभ्यासक्रमातून शीतयुद्धाच्या काळातील अलिप्ततावादी चळवळ, आफ्रिका
आणि आशियातील काही देशांत झालेला इस्लामी साम्राज्यांचा उदय, मुघलकालीन न्यायव्यवस्था अशा इतिहासाला कात्री लावली तर दहावीच्या
अभ्यासक्रमातून अन्नसुरक्षेबाबतचा संपूर्ण धडाच काढून टाकला आहे. उर्दूतील
प्रसिद्ध कवी फैज अहंमद फैज यांच्या दोन कवितांचे अंशही काढून टाकण्यात आले आहेत.
जे वगळले आहे ते बव्हंशी नेमके नेहरू आणि इस्लामच्या संदर्भातील आहे. भाजप सरकारने गेल्या बारा हजार वर्षांचा इतिहास
लिहिण्यासाठी समिती नेमली आहे. त्या समितीत केवळ उत्तर भारतीय ब्राह्मण आहेत.
विशेष म्हणजे ते सर्व संघ विचारांचे आहेत. वेदकाळ मानला जातो त्यापेक्षा प्राचीन
ठरवणे, रामायण-महाभारत खरेच घडले होते
हे सिद्ध करणे आणि महत्वाचे म्हणजे वेद सिंधु संस्कृतीच्या पूर्वीच लिहिले गेले
आणि त्या संस्कृतीचे जनक वैदिक धर्मीयच होते हे दाखवणे आणि हेच वैदिक आर्य भारतातील
हरीयानातून पश्चिमेकडे पसरत इंडो-युरोपियन भाषा आणि संस्कृतीचे वाहक कसे झाले हे
दाखवणे हा या समितीचा इतिहासलेखनामगील हेतू होता. यात द्रविड संस्कृती, जैन-बौद्ध संस्कृती, उत्तरपूर्वेची संस्कृती, आदिवासी संस्कृती याला
स्थानच नाही कारण या समितीत यातील एकालाही प्रतिनिधित्व नाही. प्राकृत आणि पाली
भाषा त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नाहीत. आणि विशेष म्हणजे हा नवा इतिहास
अभ्यासक्रमात सामाविष्ट करण्याचे सुतोवाच तत्कालीन सांस्कृतिक
व पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केले होते.
याचं तत्काळ झालेला परिणाम असा की अभ्यासक्रमात जगात कोणीही पुरातत्वद्न्य किंवा इतिहासकाराने मान्य न केलेले दावे सांस्कृतिक अभिनिवेशाच्या भरात अभ्यासक्रमात आणले गेले. घग्गर नदीचे नामकरण सरस्वती नदी केले गेले. एवढेच नव्हे तर सिंधू संस्कृतीचे नाव “सिंधू-सरस्वती संस्कृती “ असेही सरकारी पातळीवर केले गेले. अलीकडेच याचे ताजे आणि विदारक उदाहरण म्हणजे NCERT च्या नववीच्या पुस्तकात घडलेला प्रकार. हडप्पा कालीन नर्तकीच्या जगप्रसिद्ध मूर्तीच्या चित्रातील तिचा छातीखालचा भाग धुसर केला गेला आहे. तिचे मूळचे नग्न रूप विद्यार्थ्यांना दिसू नये असला दिव्य विचार NCERT ने केलेला आहे. पण ही सांस्कृतिक इतिहासाशी सरळ-सरळ बेईमानी आहे. भारतीय सिंधुकालीन सौंदर्यशास्त्र आजच्या नजरेतून पाहणे ही संस्कृतीच्या मुळाशी बेईमानी आहे हे यांच्या लक्षात आले नाही. भारतात पुरातन काळापासून आजही लिंगपूजा आणि योनीपूजा होते आणि त्यात काही वैदिक सोडता कोणालाही अश्लील वाटलेले नाही. उलट सृजनाचे प्रतीक म्हणून त्याचा स्वीकार केला गेला आणि जनमानसात त्या प्रतीकान्व्र आढळ श्रद्धा आहे. असे असताना नर्तकीच्या प्रतिमेला धूसर करून कोणते संस्कृती रक्षण झाले? ही नर्तकीची प्रतिमा मुळात तंत्रशास्त्रातील आहे असे मत अनेक पुरातत्व विद्वान मांडत असतात. आणि अशी नग्नता भारतात असंख्य शैव आणि शाक्त मंदिरात प्रतीकात्मक रीत्या चितारली वा खोदलेली आपल्याला जिवंत रूपात दिसते. खजुराहो, अजंता आणि मार्कंडा मंदिर ही याची जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत. ही नर्तकीची मूर्ती पुरातन शिल्पशास्त्रामधील सौंदर्याचे एक मूर्तीमंत उदाहरण मानले जाते. या प्रतिमेत योनी ठळक असल्याने ती मातृदेवता असू शकेल असेही अनेक पुरातत्वविदांचे म्हणणे आहे. ते काहीही असले तरी ती मूर्ती सिंधुकालीन जीवनपद्धतीचे, प्रगत धातूशास्त्राचे आणि सौंदर्यदृष्टीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
नग्नतेची एवढी लाज
वाटत असेल तर या मूर्तीचे चित्रच का ठेवले? काढून टाकायचे ना ते पुस्तकातून! पण
त्या चित्राला धूसर करून कोणते शहाणपण विद्यार्थ्यांना दिले गेले? अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतल्यावर NCERT
ने पुस्तकाच्या डिजिटल आवृत्तीत मूळ
चित्र प्रसिद्ध केले असले, तरी
छापील आवृत्तीत ‘नंतर
करू’ असे त्यांचे उत्तर
आहे. मुळात हा शहाजोगपणा का केला गेला? हे संस्कृतीचे आणि इतिहासाचे
विकृतीकरण नाही असे कोण म्हणेल? इतिहासकार अशा निवडक बाबीबद्दल तरी बोलले हे
स्वागतार्ह असले तरी याच पुस्तकात घग्गर नदीचे नाव सरस्वती केले गेले, सिंधू
संस्कृतीला “सिंधू-सरस्वती” म्हटले त्याबाबत मात्र कोणी आवाज उठवलेला नाही.
किंबहुना या नव्या सोळा सदस्यांच्या इतिहासलेखन समितीबाबत मी सोडलो तर
महाराष्ट्रात कोनी साधा उच्चारही केलेला दिसत नाही.
मराठी लेखक आणि विचारवंत किती बोटचेपे असावेत याचे उदाहरण दिल्लीत
झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातच दिसून आले. उद्घाटन करतांना पंतप्रधान
नरेंद्र मोदी बिनदिक्कतपणे म्हणाले की मराठी भाषा संस्कृतमधून निर्माण झालेली आहे.
येथे पंतप्रधान हे विसरले की नुकताच त्यांनीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला
आहे. मराठी अभिजात आहे याचा अर्थ ती कोणत्याही भाषेपासून निर्माण झालेली नसून तिची
निर्मिती स्वतंत्र आहे. या कार्यक्रमात जवळपास हजारभर मराठी साहित्यिक, विचारवंत,
पत्रकार आणि आजी-माजी संमेलनाध्यक्ष उपस्थित होते. यातील एकालाही पंतप्रधानांच्या
विधानावर आक्षेप घ्यावा असे वाटले नाही की साधा विरोधही नोंदवता आला नाही. मीच
फक्त तेथेच झालेल्या परीसंवादात याचा सविस्तर जाहीर निषेध केला. परंतु
महाराष्ट्रातील फक्त दोन वृत्तपत्रांनी त्याची नोंद घेतली, बाकी वृत्तपत्रे गप्प
बसली. मग यांचे भाषेवरील प्रेम कोठे गेले होते की तेही मिंधे झालेले होते? की त्यांना
कसलीतरी भीती वाटत होती?
भारतातील सध्याचा संघर्ष राजकीय कमी आणि सांस्कृतिक जास्त आहे याचे
भान ना पुरोगामी लेखकांना आहे ना प्रतिगामी मानल्या गेलेल्या लेखकांना. अशा
पद्धतीने चुकीचा इतिहास प्रसृत करून आपण आपल्या भावी पिढ्यांचे कसे अतोनात नुकसान
करत आहोत याचे भान सरकार वा त्यांच्या कट्टर समर्थकांना नसले तरी त्यातून
ज्ञानवन्तांची पिढी निर्माण होणे अशक्य आहे याचे भान येणार कसे याचे सर्वांनीच गांभीर्याने आत्मपरीक्षण
करण्याची वेळ आली आहे. विद्यमान सरकार हे उजव्या विचारसरणीचे व पुनरुज्जीवनवादी असल्याने हे घडले आहे हे सहज कोणाच्याही लक्षात येईल.
काही कधी इतिहासाचे पुनर्लेखन करणे खरेच आवश्यक बनून
जाते, कारण नवीन पुरावे समोर येत असतात, जुनी मते बदलावी लागतात किंवा आकलन बदलावे
लागते. पाश्चात्य इतिहासकारांनी लिहिलेला इतिहास परिपूर्ण नाही, त्यात अनेक तृटी
आहेत हे मान्यच कारण भारतीय समाज-संस्कृतीचे त्यांचे भान बाह्यात्कारी घटक म्हणून
होते. तरीही त्यांनीच येथील लेणी शोधली, ब्राह्मी-खरोश्ती लीपे वाचली आणि जमिनीत
गाडून पडलेला इतिहास उजेडात आणला, शेकडो संस्कृत आणि प्राकृत ग्रंथांचे इंग्रजीत
आणि जर्मन भाषेत अनुवाद करून जगासमोर तो ठेवा नेला हे त्यांचे ऋण विसरता येत नाही.
आता त्यांच्याकडून राहून गेलेल्या त्रुटी दूर करायला हव्यातच पण त्या शास्त्रशुद्ध
पद्धतीने. आपल्या प्रांतीय, राष्ट्रीय आणि धार्मिक अभिनिवेशातून नाही, पण याचे भान
सध्या पूर्णपणे सुटलेले दिसते. गतकाळात आमचेच सारे श्रेष्ठ होते हा अहंकार
सुखावणारा असला तरी तो बौद्धिक उन्नतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतो याचे
भान नको?
अशा स्थितीत लेखक, इतिहासकार आणि विचारवन्तांची
जबाबदारी मोठी असते. ती पेलण्यासाठी धाडस
तर लागतेच पण तेवढाच सखोल अभ्यास लागतो. मांडणी लागते. भयभीत किंवा सरकारी
विचारधारेचे लांगुलचालन करणारे लोक असे धाडस करू शकत नाही हे आपण देशातील सर्वच
सांस्कृतिक घटनांवरून पाहू शकतो. राम मंदिर हवे म्हणून बाबरी पाडली. बाबरीची जागा
हिंदूंना मिळाली ती वहिवाटीच्या तत्वावर, हिंदूंची खरेच मालकी होती आणि तेथे
राममंदिर खरेच पूर्वापार होते याचे पुरातत्वीय पुरावे मिळाले म्हणून नाही. पण ठीक
आहे. राम मंदिर झोकात उभे राहिले. पण आता राममंदिराला मिळालेले दानच चोरी
झाल्याच्या बातम्या गाजत आहेत. तेथे तर घोरी किंवा बाबर आला नव्हता ना? पण
त्याबाबत सर्व स्तरातून शांतता आहे. ही आमची खरी संस्कृती आहे? संस्कृती रक्षक
म्हणवणार्यानी यावर विचार करायला नको? लेखक-विचारव्न्तांनी याचे समाज-मानसिक
विश्लेषण करायला नको? ज्या समाजातील नवविचार-प्रेरणा मरते तो समाजच मेल्यासारखा
असतो हे आम्हाला कोणीतरी सांगायची गरज आहे.
सास्न्कृतीक मते राजकीय मतांना सोडून असू शकत नाहीत
याचीही नोंद घेतली पाहिजे. सांस्कृतिक मत हेही राजकारणाचा अपरिहार्य भाग असते.
म्हणूनच हे वैदिकवादी सरकार अस्तित्वात आल्यापासून वैदिकीकरणाचा चंग बांधलेला आहे.
सत्तेवर येताच स्मृती इराणी यांनी शपथविधी होऊन काही दिवस उलटतात न उलटतात
तोवर त्यांनी अभ्यासक्रमात वैदिक विज्ञान-गणित वगैरे सामील करणार असे घोषित करुन
धुरळा उडवून दिला होता आणि या सरकारचे प्राधान्यक्रम काय असतेल याचेच जणू सुतोवाच
केले होते. त्यानंतर लगेचच स्मृती इराणींनी अभ्यासक्रमात जर्मनीऐवजी संस्कृतचे
पिल्लू सोडले. लागोपाठ सुषमा स्वराज यांनी "भग्वद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ
घोषित करावे!" अशी मागणी केली होती. जागतिक सायंस परिषदेत वैदिक विमानांवर
प्रबंध आला आणि अवघ्या जगात भारताचे हसे झाले. त्यात खुद्द पंतप्रधान मोदींनी
भारतात वैदिक काळात प्लास्टिक सर्जरीचा शोध लागला होता हे विधान चक्क वैद्यकीय
तज्ञांसमोर केले. अशा प्रकारांना पुनरुज्जीवनवादी
म्हटले जात नाही तर आपल्या सामान्य बुद्धीचाही किती विचका उडालेला आहे एवढेच
त्यातून सिद्ध होते. याला इतिहासलेखनही म्हणत नाहीत तर विकृतीकरण म्हणतात. खरा
पुनरुज्जीवनवाद इतिहासातील विसंगात्या शोधून, त्यातील तृटी शोधून पुराव्यानिशी आणि
सप्रयोग सादर करणाऱ्या संशोधनास म्हणतात हे आमच्या गावीही नसावे?
बरे, हे फक्त इतिहासाबाबत घडते असे नाही. आमचे जागतिक स्थान,
एकूण अर्थस्थिती याबाबतही असेच खोटेपण मिरवले जाते आहे. साधी जीडीपी घ्या. ही मंडळी फेक आकडेवाऱ्या फेकण्यात जेवढी
वस्ताद आहे तसेच त्यांनी साधे जीडीपी मोजण्याचे जुने मापदंड बदलून खोटी टक्केवारी
जाहीर करण्यात आणि भारत आता महासत्ता होणारच किंवा झालीच आहे हे टिर्या बडवत घोषित
करण्यात हे लोक वस्ताद झालेले आहेत. मुळात जीडीपी वाढला असला समजा, तरी तो
सर्व लोकांची क्रयशक्ती संतुलित प्रमाणात
वाढली म्हणून नव्हे तर मोह्जाक्या उद्योजकांच्याच उत्पन्नात अनैसर्गिक अवाढव्य वाढ
झाली आहे म्हणून हे अर्थशास्त्रीय सत्य कोण उलगडून दाखवतो? म्हणजे समजा एका घरात
पाच माणसे आहेत. त्यातील चार बेरोजगार आहेत. एके वर्षी एकाला लाख रुपयाची नोकरी
लागली आणि ती घरातील पाचही लोकांत वाटली तर घरातील प्रतिमाणसी उत्पन्न वीस हजार
दिसेल...पण त्याला वीस हजार मात्र प्रत्यक्षात मिळत नाहीत. म्हणजे घराचे म्हणून
उत्पन्न वाढले असे दिसले तरी ते सर्वांचेच वाढलेले नसते. सध्याच्या अमेरिका-इराण
युद्धात भारताचा शत्रू पाकिस्तानने बाजी मारून मध्यस्थी केली. इराण भारताचा
प्राचीन मित्र पण आम्हाला इज्राएलशी सलगी करण्याची अवदसा आठवली. परिणामी तेलही
गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले. समजा आले नसेल तर आम्ही काय मिळवले याचे
तरी सविस्तर विश्लेषण होतेय का? तर नाही.
आम्ही सरकारचीच री ओढतो आहोत आणि बेइज्जतीला सन्मान समजतो आहोत.
लेखक-विचारव्न्तान्ना राजकीय किंवा सांस्कृतिक मते नसावीत, आणि
असली तरी ती आमच्या मतासारखीच असली पाहिजेत अशा दबाव आणणार्या प्रवृत्ती खूप
बोकाळल्या आहेत हे खरे आहे. पण या सर्वांना तोंड देत समर्थपणे आपले मत, संशोधन
मांडणे यालाच तर “अभिव्यक्ती” म्हणतात. विचारधारा-शरण लेखन म्हणजे अभिव्यक्ती
नव्हे तर ती शरणागती असते.
लेखकांना सांस्कृतिक आणि राजकीय मते असतातच. ती साध्या
भिकार्यालाही असतात. पण ती मते व्यक्त करण्याचे, प्रामाणिकपणे प्रत्येक घटनेचे
विश्लेषण करण्याचे स्वातंत्र्य लेखकांना, विचारवन्तान्ना आणि इतिहासकारांना असले
पाहिजे आणि ते झाकोळले जाते आहे असे वातालेक तरी ते जगासमोर मांडण्याचे धैर्य असले
पाहिजे. मग विचारधारा कोणतीही असो. कोणतीही विचारधारा परिपूर्ण नाही हा जगाचाच
इतिहास आहे पण तिला काटेकोर बनवत नेण्याचे काम विचारव्न्तांचे असते आणि त्यांनी ते
स्वातंत्र्य कोणत्याही बाह्य शक्तीला न भिता वापरलेच पाहिजे तरच तो जिवंत समाज
निर्माण करू शकतो. सध्याचा समाज जवळपास मेल्यासारखाच झाला आहे. पण त्यात सारेच
मिळून प्राण फुंकू शकतात. पण त्यासाठी अतुलनीय धैर्य हवे. शेवटी भेकडांच्या हातून
विजयाची कामना करणे व्यर्थच असते.
हे सारे मी केवळ टीका करण्यासाठी लिहित नाही तर आम्ही अंधाराची
दिशा पकडली आहे की प्रकाशाची हे दाखवण्यासाठी. मी केवळ मोदी सरकारवर टीका करतो असा
समाजमाध्यम जगातील बहुतेकांचा समज आहे. पण त्यांना हे माहित नाही की राजीव गांधी
लोकप्रियतेच्या शिकाहावर असताना मी “गुडबाय प्राईम मिनिस्टर” ही त्यांचे अक्षरशा:
खिल्ली उडवणारी कादंबरीच लिहिली होती. सोनिया गांधींनी आणलेल्या अन्नसुरक्षा
विधेयकावर मी “हा लोकांना दुबळे करणारा प्रकार आहे...” अशी कठोर टीका केले होती. माझ्या
बहुतेक राजकीय थरार कादंबर्या भारताचे आंतरराष्ट्रीय धोरणाच्या चिकित्सा करतात. मग
रशियाचा भारतावरील प्रभाव असो की अगदी अलीकडचे पुलवामा प्रकरण असो कि ऑपरेशन
सिंदूर. साम्यवाद्यांनी लिहिलेल्या
इतिहासाची आणि तशीच संघवादी इतिहासकारांचीही मी चिरफाड करत राहिलो आहे, माझे
संशोधन, आकलन मांडत राहिलेलो आहे. तेही गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून. तेव्हा केवळ
हे सरकार आहे म्हणून मी त्याचा विरोधक आहे असे समजण्याचे काहीएक कारण नाही.
आम्हाला इतिहासाच्या मिथकांत जगात अंधाराकडे जायचे आहे की मिथकांचे जाळे तोडत नवा
सूर्य उराशी कवटाळायचा आहे एवढाच काय तो माझ्यासमोरचा प्रश्न आहे.
-संजय सोनवणी
(साहित्य चपराकच्या जुलै २०२६ अंकात प्रसिद्ध झालेला लेख.)
Friday, July 3, 2026
महाराष्ट्र पुरोगामी होता कि प्रतिगामी?
प्रत्येक प्रदेशाची स्वता:ची अशी स्वता:ची संस्क्रुती असते. संस्क्रुतीत भाषा, साहित्य, कला, धर्मशास्त्र, युद्धशास्त्र, राजशास्त्र, अर्थशास्त्रादि घटकांचा आणि त्यामागील एकुणातील समाजमानसशास्त्राचा समावेश होतो. मराठी संस्क्रुतीला किमान २५०० वर्षांचा द्न्यात इतिहास आहे. सहाव्या शत्कात एका चीनी प्रवाशाने (ह्यु-एन-त्संग) महाराष्ट्राला भेट दिली होती तेंव्हा त्याने नोंदवून ठेवले आहे कि "येथील भुमी सुपीक आहे आणि लोक अत्यंत कष्टाळु आहेत. येथील लोक जिद्न्यासु असून नव्या गोष्टी शिकण्यास तत्पर असतात. येथील लोक प्रामाणिक आणि कष्टाळु असून ते सावळे पण काटक असतात. ते मुलता: दयाळु व्रुत्तीचे व स्वभावाने साधे असले तरी शत्रुच्या बाबतीत अत्यंत कठोर असतात. त्यांना अपमान सहन होत नसून जर तसे काही झाले तर सुड उगवल्याखेरीज रहात नाहीत. संकटप्रसंगी ते एकमेकांना मदत करण्यात तत्पर असतात." हे एका परकीयाचे निरिक्षण आहे आणि ते अनेक बाबतीत खरेही आहे. आजही आपण अल्पांशाने का होईना याचा, विशेश्त: ग्रामीण महाराष्ट्रात, अनुभव घेवू शकतो.
महाराष्ट्र पुरोगामी होता कि
प्रतिगामी याचा ऐतिहासिक आढावा घेणे येथे रोचक ठरेल. त्यासाठी आपल्याला आधी
पुरोगामी म्हणजे नेमके काय हे समजावून घेण्याची गरज आहे.
"पुरोगामी म्हणजे प्रस्थापित
अन्याय्य समाजनियम/धर्मनियम/अर्थव्यवस्था/राजकीय धारणा/नीतिशास्त्र याविरुद्ध जात
नवसमाजाला अनुकुल असे समतामय नियम अस्तित्वात यावेत यासाठी संघर्ष करनारा वर्ग
म्हणजे पुरोगामी होय तर जे जुने आहे तेच तसेच्या तसे अपरिवर्तनीय आहे असे मानत
समाजाला पुरातनत्वाच्या पाशात ओढत राहतात ते प्रतिगामी होत."
या वरील व्याख्येनुसार आपण पुरोगामी
महाराष्ट्र आणि प्रतिगामी महाराष्ट्र याची गतेतिहासातील चर्चा आधी करुयात म्हणजे
आपल्याला वर्तमान अजुन घासुन-पुसुन लक्खपणे पाहता येईल आणि निर्नय घेता येईल कि
खरेच आज आम्ही पुरोगामी आहोत कि प्रतिगामी. दुर्दैवाने त्याचे उत्तर प्रतिगामी
असेच येते आणि त्यावरील विवेचन मी येथे करत आहे.
प्रतिगात्मतेचा इतिहास:
ह्यु-एन-त्संग हा चीनी प्रवासी ईस
६२० च्या आसपास महाराष्ट्रात येवून गेला. त्याच्या वर्नणावरुन मराठी मानसिकतेचा
एकंदरीत प्रत्यय येत असला तरी तेंव्हाची धार्मिक/सामाजिक स्थीती नेमकी काय होती
याचा त्यावरुन आपल्याला अंदाज येत नाही. देवल स्म्रुतीची रचना मात्र महाराष्ट्रात
झाली आणि तिचा काळ हा इस्लामी आक्रमणे आणि धर्मांतरांनंतरचा आहे हे स्पष्ट आहे. हा
काळ इस. १२ वे ते १३ वे शतक असु शकतो. याच काळात रामदेवरायाचा मंत्री हेमाडपंत
याने "चतुर्वर्ग चिंतामणी" या ग्रंथाची रचना केलेली दिसते. म्हणजे या
काळात जातीव्यवस्था नुसती बळकटच नव्हे तर अन्याय्य होण्यास सुरुवात झाली होती असे
दिसते. एवढेच नव्हे तर काशी खालोखाल पैठण हे एक धार्मिक बाबतींत (ते ठरवतील तसे)
निर्णय घेण्याची अधिकारक्षमता मिळवुन बसले होते हेही दिसते. द्न्यानेश्वरांचे
उपनयन याच पीठाने नाकारले. खरे तर आळंदीकर ब्राह्मण या तिन्ही भावंडांचे उपनयन
व्हावे या पक्षात होते. म्हणजे धर्मनियमही सुस्पष्ट नव्हते. पण एक धर्मपीठ म्हणुन
धर्म-अधर्म बाबत निर्नय घेण्याचा अधिकार या पीठाला मिळाला होता. पहिल्या
सहस्त्रकातील राजवटी पाहिल्या तर असे कसले धर्मपीठ आस्थित्वात असल्याचे दिसत नाही.
उलट राजसत्ता या खुपच सहिष्णु असल्याचे दिसते. म्हणजे बौद्ध विहारांना ते आर्थिक
मदत करत तशीच जैन धर्मियांना व वैदिक कर्मकांडांनाही उदारपणे मदत करत असल्याचे
चित्र आपल्याला तत्कालीन शिलालेख/ताम्रपटांवरुन दिसते. सातवाहन कुळातील राजे समुद्रसंचारी
बनले होते...तीन्ही समुद्रांवर अधिकार गाजवला होता व त्यांचे नौकादल बलाढ्य होते
याची नोंद अगदी ग्रीक प्रवाशांनीही घेवून ठेवलेली आहे.
पण दुस-या सहस्त्रकाच्या
आरंभकाळापासुनच कालात आपण एक उलटा प्रवास झालेला दिसतो. याच काळात वेदबंदी, शिक्षण बंदी (ब्राह्मणेतरांना) समुद्रबंदी (सर्वांना), वर्णबंदी...(म्हनजे कलियुगात फक्त दोनच वर्ण...ब्राह्मण आणि
शूद्र..बाकी वर्ण आस्तित्वातच नाहीत...) परशुरामामुळे क्षत्रिय हटवले हे ठीक
समजा....पण वैश्य कोणत्या धर्मनियमाने हटवले? त्याबाबत पुराणे मौन पाळुन आहेत. शेतकरी हा खरे तर वर्णव्यवस्थेत
वैश्य...पण त्याचे तेही स्थान हिरावुन घेतले गेले आणि त्याचा व्यवसाय कायम ठेवून
त्याला सामाजिक/धार्मिक पातळीवर एक पायरी अजुनच अध:पतीत केले. अन्य जातीयांनाही
त्याच पातळेवर आणुन शुद्रातीशुद्र, अस्प्रुष्य अशा
समाजाचीही निर्मिती केली आणि अति-प्रतिगामी विचारांचा उदय केला. हे फक्त
महाराष्ट्रात झाले असे नाही तर उर्वरीत देशातही पद्धतशीरपणे केले गेले.
का? अशी काय निकड भासली होती धर्मनियंत्यांना कि ज्या बाबी फार नसल्या
तरी काही समता/सामाजिक अधिकार या बाबत काही प्रमाणात उदारत्व बाळगत असलेल्या
समाज/धर्म स्थीतीला एकाच वळचणीला आणले?
हे माझे विधान धाडसी वाटले तरी मी
स्पष्ट करु इच्छितो कि इस्लामी सत्ता आणि काशी/कांचीची धर्मपीठे यांनी इस्लामी
सत्ता सुखनैव येथे नांदावी यासाठी सत्ताधा-यांशी काहीतरी संगनमत केले असावे, अन्यथा एकाएकी स्म्रुतीसत्ता (धर्मसत्ता हा शब्द मी मुद्दाम वापरत
नाही.) एवढी बलाढ्य व सर्वोपरी होवुच शकली नसती. सर्वच ब्राह्मण यात सहभागी
असण्याची शक्यताच नव्हती. किंबहुना या कथित वेदद्न्यानी आणि इस्लामीय साठगाठीमुळे
सामान्य ब्राह्मण समाजाचेही पराकोटीचे नुकसान झाले. गतसहस्त्रकात
द्न्यान-विद्न्यानाची प्रगती खुंटली. अभिजात साहित्याची निर्मिती थांबली.
संस्क्रुत भाषा म्रुत्युपंथाकडे गेली व जनभाषा हळुहळु जनजीवन व्याप्त करु लागली.
या संक्रमणाचा इतिहास आपल्याला तपासायलाच हवा. याच काळात जातीव्यवस्था कठोर झाली.
खुद्द ब्राह्मण समाज ५५० जातीत वाटला गेला.
प्रश्न अर्थव्यवस्थेचा
असतो...धर्मापेक्षाही आर्थिक आकांक्षा आणि जगण्याचे राजकारण नेहमीच सर्वोपरी ठरत
असते. धर्म हवा तसा वाकवता येतो. अर्थव्यवस्था ही मात्र अत्यंत वास्तव असल्याने ती
म्हनाल तशी कधीच वाकवता येत नाही. या विशिश्ट काळात परकीय सत्त्तांमुळे
अर्थव्यवस्था कोणच्याही हातात उरलेली दिसत नाही. येत्द्देशियांच्या तर नाहीच नाही.
व्यापार थांबल्यांमुळे निर्मानकर्ते...मग ते लोहार असोत कि सुतार, माळी असो कि धनगर...तेली असो कि तांबोळी...यांचे व्यवसाय मर्यादित
होत होत शेवटी गावगाड्याच्या चौकटीत अडकुन बसले. आपापल्या व्यवसायात स्पर्धा नको
म्हणुन ब्राह्मनच काय अन्य जातीयही जातीची चौकट अन्न्याय्य पद्धतीने विकसीत करत
गेले. "माझ्या व्यवसायात अन्य कोणी पडु नये...अन्यथा आह्र त्या एकुणातील
मागणीच्या स्थितीत माझे उत्पन्न थांबेल..." ही असुरक्षिततेची भावना विकसीत
होत गेली. यातुन जातमाहात्म्य वाढत खरे तर प्रत्येक जात हा एक स्वतंत्र धर्म बनत
गेला आणि एकुणातील धर्म हा असंख्य जातीयांचा संघ बनत गेला. जात पंचायतींची सुरुवात
जर अभ्यसली तर लक्षात येते कि याच काळात त्यांचा उदय झाला आणि त्याही अन्याय्य व
कठोर बनत गेल्या. या जातीय संस्था स्वता:चे कायदे पाळत होते व त्यानुसार शिक्षा
देण्याचा अधिकार बळकावून बसले होते, एवढे, की राजसत्ताही तंटे निर्माण झाले तर
जात-धर्मानुसार निर्णय घेत असत, स्वीकारत असत. या
प्रक्रियेतुन कोणतीही जात सुटलेली दिसत नाही. आजही अनेक जातींत आपण जातपंचायतींची
सार्वभौमता अनुभवत आहोत.
ब्राह्मणही आपापले विशिष्ट देवांचे
पुजाहक्क, धर्महक्क सांगते झाले, एवढेच नव्हे तर ते हक्क अबाधित रहावेत म्हणुन प्रसंगी मुस्लिम
सत्तांच्या दरबारांतही गा-हाणे गुदरते झाले. (शंकराचार्य पदाचा वाद तर ब्रिटिश
न्यायालयातही लढला गेलेला आहे...) हा सर्व लढा आपापल्या जातीय हक्कांना अबाधित
राखण्यासाठी होता....आणि त्यामागे सर्वस्वी बदललेले अर्थकारण आणि राजकारणही होते
हे लक्षात घेतले पाहिजे.
सांगायचा मुद्दा हा आहे कि
प्रतिगामिता कशी असते याचे दर्शन महाराष्ट्राने गतकाळात घडवले आहे. चक्रधरांची
हत्त्या हेमाडपंताच्या निर्देशाने केली गेली. द्न्यानेश्वर व त्यांच्या बांधवांना
सामाजिक समतेचा, भले तो जात-निष्ठ असो नाकारला गेला.
धर्मांतरीतांना पुन्हा धर्मात घेण्याचा जोही काही धर्मनिष्ठ/जातनिष्ठ मार्ग होता
(अगदी देवल स्म्रुतीनेही सांगितलेला) तोही नाकारला गेला. थोडक्यात समान न्यायाचे
मुलतत्वच सर्वांना, मग तो कोणत्याही जातीचा असो, नाकारले गेले. आणि अपरिहार्यपणे सर्वच समाजाने ते स्वीकारले.
आणि याच वेळीस राजसत्तात्मक
प्रतिगामीपणा क्रमश: स्वीकारला गेला. आत्माभिमान, स्वाभिमान, शत्रुंबाबत कडवा असे म्हणवला जाणारा
मराठी समाज आक्रमकांचा एकनिष्ठ चाकर बनला. दैवतवादाच्या (ही आपली गतजन्मातील
पापांमुळे निर्माण झालेली अपरिहार्य स्थीति आहे असे मानत) आहारी जात याच नव्य
समाजाने आपल्याच समाजाशी वैर मांडले.
मी याबाबत तत्कालीन समाजाला दोष देत
नाही. चुकत होते ते धर्माचे आणि समाजव्यवस्थेचे नियंते. आणि या धर्मसत्ता
सर्वसामान्य ब्राह्मनांच्या हातुनही निसटल्या होत्या. त्या केंद्रीभुत झाल्या
होत्या त्या काशी, पैठण आणि कांचीच्या
विद्वत्सभांहाती. शंकराचार्य पीठांचा अधिकार कधीच संपला होता. आणि पुर्वापारच्या
राजसत्ताच या नव्य परकीय सत्तांचे एकनिष्ठ चाकर बनल्याने स्वकीयांच्या हिताची
त्यांना काळजी वाटणे असंभाव्यच होते. यादवोत्तर आणि शिवपुर्व काळात तशी या
चाकरांची समाजाशी काही बांधिलकी होती याचे निर्देश मिळत नाहीत. या चाकरांनी
पराक्रम गाजवले, आपल्याच स्वबांधवांची आणि
आक्रमणांच्या निमित्ताने अन्य राजकीय क्षेत्रात असणा-या प्रदेशांची (व पर्यायाने
सामान्य जनतेची) धुळधान उडवण्यात कसलीही कसर सोडलेली दिसत नाही.
हे विवेचन अशासाठी कि प्रतिगामत्व
कसे मुळात उद्भवले. ते कसे क्रमश: द्रुढमुल होत गेले. त्यामागील सामाजिक राजकीय
स्थित्या नेमक्या काय होत्या हे आपणास पाहिले पाहिजे. पहिल्या सहस्त्रकात स्थिर
सुर्य सिद्धांत (प्रुथ्वी केंद्रित) मांडण्यापासुन ते सुर्यकेंद्रित सिद्धांत
(आर्यभट्टीय) मांडण्याची बौद्धिक क्षमता असणारा समाज, अद्वैततात्मक तत्वधारा मांडणारा समाज, बौद्ध असोत की जैन, यांच्याशी
सहिष्णु वागणारा समाज आपापसातच एवढा वैरभावाने वागु लागला याचे समाजशास्त्रीय
विवेचन अभिप्रेत आहेच. विद्न्यानाभिमुख समाज परत का अजनाभ वर्ष ते मेरु पर्वताच्या
बाता करायला लागला? द्न्यानेश्वरांना "न चालता
सुर्याचे चालणे" हे वैद्न्यानिक विधान करण्यासाठी मुळातील आर्यभट्टीय परंपरा
उपलब्ध कोठुन झाली आणि ती लुप्त होत हाच समाज ऐहिकतेच्या बाबत उदासीन होत पारलौकिक
आणि तेही जातीनिष्ठ होत कसा अध:पतीत झाला? तो एवढा कसा प्रतिगामी झाला?
इस्लामी आक्रमणे आणि त्यांची सत्ता
स्थिरस्थावर झाल्यावर येथील धर्मनियंते/समाजनियंते पराकोटीचे बदललले दिसतात याला
मी योगायोग मानत नाही. समाजनियंते सत्ताधारी जसे या नव्य सत्तांचे एकनिष्ठ चाकर
बनले तसेच धर्मसत्तेनेही केले असे मी वर म्हणालो आहे ते यापोटीच.
हा प्रतिगात्म्तेचा इतिहास आपल्याला
ब्रिटिश काळात वेगळ्या पद्धतीने विकसीत झाला आहे असेही दिसते. माक्स्मुल्लर या
जर्मन विद्वानाने आर्य सिद्धांत भाषिक परिप्रेक्षात मांडला. त्याचे विघातक परिणाम
लक्षात घेवून त्याने तो मागेही घेतला...पण येथील विद्वान अधिक अक्कलवान होते.
त्यांनी आर्य सिधांतामुळे ब्रिटिश आणि ब्राह्मण हे एकाच मुळाचे ठरतात अशी समजुत
करुन घेतली. विष्णुशास्त्री चिपळुनकर हे तर ब्रिटिशांना "आमच्या आर्य रक्ताचे
पुरातन बांधव..." असे उद्देशुन म्हणु लागले. टिळकांनी यावर तर कळस चढवला.
ओरायन असो कि आर्क्टिक होम इन वेदाज...ते ब्राह्मण (आर्य) हे उत्तर खंडातुन भारतात
आले असे हिरिरेने सिद्ध करु लागले. बरे हे सांगणारे टिळक हे त्याच वेळी राष्ट्रीय
पातळीवरील नेते होते...त्यामुळे त्यांच्या विवेचनाचा समाजमनावर प्रभाव पडणे
स्वाभाविक होते. ब्राह्मण या संशोधनामुळे शेफारले तर बहुजनीय वर्ग ब्राह्मण हे
पर्कीय असुन आपल्यावर आपली धर्मसत्ता लादणारे आहेत अशी प्रतिक्रिया उमटणे
स्वाभाविक होते. राजकीय चळवळीवरही या नव्य-संशोधनाचा परिणाम झाला. ब्रिटिशांच्या
चाक-या करण्यात कमीपणा वाटणे आता शक्य नव्हते कारण ब्रिटिशही आर्य
वंशाचेच...पुढेही या मित्थकावर समाज विश्वास ठेवत गेला. त्यावर कसलाही अंकुश
राहीला नाही. बाबासाहेबांनी "आर्य हा वंश नसुन जोही काही पुरातन काळात संघर्ष
झाला तो धर्मश्रद्धांबाबत होता...वांशिक नव्हे..." हे स्पष्ट करुनही आजही
त्यांचे अनुयायी म्हणवणारे काही लोक त्यांचेच विधान ऐकत न्नाहीत. मान्य करत नाहीत.
"आर्य वंश हा एक तिढा आहे." असे वरकरणी मान्य करत डा. मधुकर
ढवळीकरांसारखे संशोधक आर्य हेच सिंधु संस्क्रुतीचे निर्माणकर्ते होत असे मत
मांडतात. (पहा...आर्यांच्या शोधात...ले. मधुकर केशव ढवळीकर). अगदी तर्कतीर्थ
लक्षमण्शास्त्री जोशीसुद्धा आर्यवादाचे (म्हनजे आर्य नामक लढावु वंश भारतात
प्रवेशला व त्यांनी येथील अडाणी-रानटी संस्क्रुतीला जिंकुन त्यांना मानसाळवले व
आपल्या व्यापक सांस्क्रुतिक परिप्रेक्षात सामावून घेतले, त्यांच्या रानटी देवतांना (शिव/शक्ती आदि) वैदिक अलंकार चढवून
आपलेसे करुन घेतले....) खंदे समर्थक होतेच. पण आर्यवादाने समाजाला प्रतिगामी
बनवण्यात १९ व्या शतकात फार मोठा हातभार लावला. वेदांची निर्मिती येथील सरस्वती
नदीच्या खो-यात नव्हे तर हेल्मंड नामक अफगानिस्तानातील सरस्वतीचेच मुळ नाव असणा-या
नदीच्या काठी झाला असे उच्च रवाने सांगितले जावू लागले. आर्य हा एक प्रबळ, शक्तीशाली, विजिगिषु लोकांचा समुदाय होता व
त्यांनीच जगभर विखरुन नवी सम्स्क्रुती घडवली असे हिरिरीने प्रतिपादन केले जावू
लागले. यात कसलीही तार्किकता नव्हती, ऐतिहासिक पुरावेही नव्हते...पण तरीही ही प्रतिगात्म भावना अंतत:
विघातक ठरली हे मात्र खरे.
या आर्यवादापुर्वी भारतात वा कथित
हिंदु धर्मात ब्राह्मण ष्रेष्ठत्वतावाद होताच. पण तो जातीय परिप्रेक्षात. त्याला
या माक्समुल्लरपर्यंत आणि टिळकांनी सैधांतिक रुप देईपर्यंत तो एकाच समाजसमुहातील
अंतर्गत वाद होता...पण आर्यवादाने त्याची व्यापकता वंशश्रेष्ठत्वता वादापर्यंत
वाढवली. हा प्रतिगामीपणा भारताला केवढा महागात पडला आहे याचे विवेचन मी पुढे करतच
आहे. पण आपल्या धर्माचे नियंते हे आपल्या वंशाचे नाहीत, या भुमीचे नाहीत, स्वकीय नाहीत ही
जाण याच मुढांनी वंशष्रेष्ठत्वाच्या वल्गना हाकण्याच्या नादात स्वता:च्याच पायावर
कुर्हाड मारुन घेतली. महात्मा फुलेंनी ब्राह्मण वर्गावर जे आघात केले त्यात
"आर्यभट" हा शब्द संतापाने का येतो याचे कारण फुलेंना शिव्या
घालना-यांना आजही माहित नाही. (क्रमश:)
पोरस म्हणजे पुरू?
मायकेल वित्झेल (Michael Witzel) आणि हेमचंद्र रायचौधुरी (Hemchandra Raychaudhuri) यांसारख्या विद्वानांनी 'पोरस'ची ओळख ऋग्वेदात उल्ल...
-
१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...