Saturday, May 31, 2014

माणसाचे माणुसपण...



"माझे साहित्य म्हणजे माणुस आणि मानवी संस्कृत्यांच्या तळाचा शोध आहे. जगाच्या ज्ञात इतिहासात हजारो संस्कृत्यांचा उदय झाला आणि त्या नष्टही झाल्या. त्या त्या संस्कृत्यांचे श्रेष्ठ देवही कालौघात नष्ट झाले. मार्डुक उरला नाही कि ओसायरिस, इंद्र-वरुण उरले नाहीत कि एल-बेल. देवच नष्ट होतात तर त्यांच्या देवत्वाची महती ती काय? संस्कृत्या नष्ट होतात त्या आपल्याच वजनाखाली चिरडत जातात म्हणून. तरीही माणसाचा संस्कृतीचा हव्यास सुटत नाही. अमूक काळातील, अमुकची संस्कृती श्रेष्ठ कि कनिष्ठ असे ठरवायचे मापदंड नसतांना आम्ही आमच्याच संस्कृती श्रेष्ठत्वाबद्दल आग्रहाने बोलायला फार आतूर असतो. संस्कृती म्हणजे मालकी हक्कांचा आमचा अथक झगडा, मग तो नैतीक असो, भावनिक असो, कायदेशीर असो कि अनैतिक असो.

इतिहासात महासत्ता, राजकीय असोत कि सांस्कृतिक...त्याही नष्ट झाल्या आहेत. ग्रीक गेले, नंतर रोमन गेले, बायझंटाईन कोसळले. अलीकडे इंग्रजांचे अर्ध्या जगावरील राज्य संपले. आज अमेरिकेची जागा घ्यायला कोण पुढे येतेय यात स्पर्धा आहे. आमच्या आजच्या संस्कृतीचा इतिहास दोनशे वर्षांपलीकडे जात नाही...पण आम्ही आमची नाळ संस्कृतीच्याच नांवाखाली हजारो वर्षांपर्यंत भिडवायचा प्रयत्न करतो.

प्रत्येक काळात आहे त्या संस्कृतीचे विरोधक असतात. म्हणजे ती संस्कृती परिपुर्ण नसते. असंतुष्टांचे असणे हेच मुळात संस्कृतीश्रेष्ठत्वाच्या तत्वाच्या विरोधात जाते. मनुष्यच सम्स्कृतीचा विनाश करतो आणि तरीही त्याला सम्स्कृतीच्या बेड्या तोदता येत नाहीत. संस्कृती म्हणजे मानवी स्वातंत्र्याला अधिकाधिक बेड्या घालणारी यंत्रणा आहे. जेवढी बंधने अधिक, मग ती नैतिक असोत, धार्मिक असोत, सामाजिक असोत कि कायद्याची, तेवढे आम्ही सुसंस्कृत असे म्हनण्याचा, मानण्याचा प्रघात आहे. आमची सम्स्कृती ही मुलात काय करु नये अशा नकारात्मक बंधनांवर उभी आहे. अशी संस्कृती मुळात का हवी आहे? कृत्रीम पायावर उभा असलेला, चिरस्थायी नसलेला राष्ट्रवाद का हवा आहे? धर्मवाद का हवा आहे?

धर्माशिवाय माणूस जगु शकत नाही हे मानसाचे कृर वास्तव आहे. विज्ञानाचाही तो धर्म बनवतो. नास्तिकही नास्तिकतेवर श्रद्धा ठेवतो तेथेच तो आस्तिक बनतो. विज्ञानही धर्माप्रमाणेच चिकित्सा नाकारू लागते. तेथेही विज्ञाननिष्ठ पुरोहितांचे स्तोम माजते. विरोधी आवाज सहजी ऐकून घेतला जात नाही, ही मानसाची शोकांतिका आहे.

आणि

(आज कल्की, कुशाण, व ओडिसी या माझ्या कादंब-यांच्या प्रकाशन समारंभातील माझे मनोगत. भाषण उत्स्फुर्त होते. त्यामुळे वरील जसेच्या तसे नाही, पण जवळपास हेच!)

माणसाचे माणुसपण शोधणे हे माझे कर्तव्य मी समजतो. माणुस हा असा आहे. तो वैश्विक व्हावा असे तर किमान स्वप्न आहे. आज तरी संपुर्ण ज्ञात विश्वात मनुष्य एकाकी आहे. पण असे असुनही संस्कृती, राष्ट्र, धर्म, जाती, वर्ग वगैरेंनी तो एवढा विखम्डित झाल आहे कि या पृथ्वीवरही तो सर्वात असुनही एकाकी आहे. या सा-या मानसिक प्रवासांचा केंद्रबिंदू म्हणजे आज प्रकाशित होणा-या कादंबरीत आहेत."

Tuesday, May 27, 2014

जीवनाशी सांधा कसा जुळवता येईल?

विकासाच्या संकल्पना अनेक आहेत. अत्याधुकिकरणाने प्रश्न वाढतात, कमी होत नाहीत असाही मतप्रवाह आहे. गांधीजींचे "खेड्याकडे चला" याचा शब्दश: अर्थ न घेता कृत्रिम गरजा कमी करा आणि संतुलित जीवनाचा आनंद घ्या असा आता घ्यायला हवा. विकास म्हणजे हाव नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीला ओरबादत राहणे तर नक्कीच नाही. उदा. सर्व खनीजे, कृड सुद्धा ज्या गतेने आम्ही उपसा करत चाललो आहोत त्या गतीने किती वर्ष टिकतील? आमच्या आजपासून चवथ्या वा पाचव्या पिढीला आम्ही काय शिल्लक ठेवणार आहोत?

शेती अतिउत्पादनासाठी रासायनिक बनत चालली आहे. शेत जमीनींचे खारवत नापीक होण्याचे प्रमाण वाढत आहे. मंगळ-चंद्रावरून आम्ही खनिजे आणु हा कल्पनाविलास ठीक आहे पण वास्तवात ते कितपत व्यवहार्य असेल याचाही विचार करायला हवा. मनुष्य जीवन आनंदासाठी जगतो. आनंदाची-सुखाची आमची नेमकी कोणती व्याख्या आहे? आनंद-सूख या सापेक्ष बाबी असल्याने व्यक्तीपरत्वे त्या बदलतात अथवा बदलवता येतात हे आपण वर्तमान जगातही पाहू शकतो. आनंदाची पुर्ती भौतिक सम्साधनांनी होऊ शकते तशीच साधेपणानेही होऊ शकते. आज भौतिक संसाधनांचा पक्ष प्रबळ आहे हेही वास्तवच आहे.

पण तरीही सूख का नाही? असंतोषच अधिक का आहे? निवदणुकातील निकाल नेमके कोणत्या असम्तोषामुळे लागले? विकासाचा हव्यास हे त्याचे कारण आहे. पण विकास म्हणजे नेमके काय याची व्याख्याही आपल्याला करावी लागेल याचे भान आपल्याला आहे काय? प्रश्न अनेक आहेत. भौतिक प्रगतीने सुखच साधते असे नाही...उलट असंतोष, स्पर्धा आणि मानसिक तणावांचे वर्धनच होते हे थोडा विचार केला तरी लक्षात येईल.

याचा अर्थ भौतिक प्रगती नको असा मुळीच नाही. सर्वांना किमान जगण्याचे साधन मिळालेच पाहिजे याबाबतही दुमत नाही. पण आर्थिक प्रगतीही सापेक्ष असल्याने गरीब वर्ग सापेक्षतया मोठाच राहणार कारण उत्पन्नातील असमानता ही कोणत्याही प्रगतीच्या बिंदुवर असनारच. म्हणजे "गरीबी हटाव" या घोषणा राहणारच. अमेरिकेतही कथित गरीब आहेतच कि! एकीकडे आम्हाला वस्तू स्वस्त हव्यात आणि पगार मात्र वाढते पाहिजेत...कोणत्या अर्थशास्त्रीय नियमांनी असे होऊ शकेल, हे एक कोडेच आहे.

आपल्याला दोहोंत संतुलन कसे साधता येईल, अनावश्यक गरजांच्या मोहापासून दूर राहत जीवनाशी सांधा कसा जुळवता येईल हा खरा प्रश्न आहे.

Monday, May 26, 2014

त्यांचे विचार धर्म बनत नाहीत.....

प्रत्येक विचारव्युहासाठी एक दुसरा विरोधी विचारव्यूह असतोच. कोणताही विचारव्यूह हा अंतिम नसतो हे जरी खरे मानले तरी विविध विचारव्युहांचे अस्तित्व असणे हेच मानवाला पुढे नेत आले आहे. भावनिक लाटांवर जे वाहवत जातात त्यांचे नाते कोणत्याही विचाराशी नसते हेही एक वास्तव आहे. काल ज्यांचे जयजयकार केले त्यांना पायतळी तुडवनारे उद्या आज ज्यांचा जयजयकार करते त्यांनाही पायतळी तुडवणार नाही असे नाही. जयजयकार करनारे कालही मुर्ख असतात...

आजही आणि उद्याही.

जगाचे अधिकाधिक नुकसान या भावनांच्या लाटांवर हिंदोळणा-या लोकांनी केले आहे. चोराला सोदा पण येशुला सुळावर चढवा असे म्हणनारे असेच भावनिक मुर्ख होते. गांधींना ठार मारा...देश वाचवा असे म्हणनारेही हेच मुर्खांचे नंदनवन होते. त्यांनी येशुला मारले, त्यांनी गांधीजींना मारले.

हरकत नाही. नवीन विचारव्यूह समजावून घेण्यातील सामान्य माणसांची ती मुलभूत अडचण असते. ते मेले, काही फरक पडत नाही. ज्यांना विरोधी विचारव्युहांचे अस्तित्वच मान्य करायचे नसते, विरोधी विचारांना ज्यांना हिंसेनेच संपवायचेच असते ते घडीभर जिंकतात....

पण त्यांचे विचार धर्म बनत नाहीत हाही एक इतिहास आहे.

एका कट्टर संघ कार्यकर्त्याला देशाच्या नेतृत्वाची धुरा डोक्यावर घ्यायची असतांना राजघाटावर जावेच लागते हा विजय गांधीजींचा आहे...रा. स्व. संघाचा अथवा सावरकरवाद्यांचा नाही. कट्टर हिंदुत्ववाद्यांना फाट्यावर मारत शरीफला बोलवावे लागते आणि त्याचे केविलवाने समर्थन संघवाद्यांनाही करावे लागते यात पराजित विचारव्युहाची दिशा दिसते.

प्रेयसीच्या आंधळ्या का होईना प्रेमात पडणे हे माणसासाठी नैसर्गिक आहे. नेत्यांच्या प्रेमात अंधपणे पडणे याला मात्र मुर्खपणा म्हनतात. विचारांच्या प्रेमात पडणे अथवा विचारविरोधक असणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. पण विचारांचाच थांगपत्ता नसतांना व्यक्तीच्या प्रेमात पडने यात प्रेमभंगाचीच अधिक शक्यता असते हे आम्ही लक्षात घेणार नाही हेही मला माहित आहे.

काही महिन्यांपुर्वी केजरीवालांच्या प्रेमात पडनारे अगणित मी पाहिले होते...ते आज कोठे आहेत हे शोधावे लागते, हे केजरीवालांचे नव्हे आमचे दुर्दैव आहे. आमच्याच कर्तुत्वहीण भावनांतून निर्माण झालेल्या, अस्तित्वात नसलेल्या कर्तुत्ववान नेत्यांच्या शोधातील आमच्याच हाती आलेले हे एक शून्य आहे. हे आम्हाला कधी कळेल?

हा देश घटनेमुळे एक नसून आमच्या राष्ट्रहीन भावनेने आम्ही विखुरलेले असल्याने एक आहे....हा विरोधाभास आहे खरा. पण विचार करा....आम्ही बळे हरवलेले वांझ लोक आहोत. आम्हाला लोकशाही पाहिजे पण लोकशाहीची मुलतत्वे आम्हाला पाळायची नाहीत. आम्हाला हुकुमशहाही हवा आहे पण मग हुकुमशाहीची नैसर्गिक अव्यवस्था झेलायचीही आमची तयारी नाही.

आम्ही वास्तवात नव्हे तर स्वप्नील जगात जगणे निवडतो. आम्हाला वास्तव हवेच कोठे आहे?

असो. माझे असंख्य वाचक मला शिव्या देतात, टीका करतात...ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. मी मोदींवर टीका करतो हे माझ्या निकटतम प्रत्यक्ष ओळखीतील मित्रांनाही आवडत नाही...मी रा. स्व. संघावर तुटुन पडतो तेही खुपजणांना आवडत नाही. कोणालाही आपल्यावर टीका करुन घ्यायची हौस नसते.

प्रश्न विचारव्युहांचा असतो. आणि मला समजा एक विचारव्यूह कोणत्याही आधारावर पसंत नाही तो मला पसंत पडावाच हा अट्ट्टाग्रह कशासाठी?

मला माझा विचार आहे आणि त्याशी मी प्रामाणिक आहे. तुमच्या विचारांशी तुमच्या प्रामाणिकतेवर जर मी संशय घेत नाही, तर माझ्या अथवा माझ्या समविचारींच्या विचारांशी फालतू शंका का घेता?

एकच लक्षात घ्या...

राजकीय लोकशाहीत संख्येचे फार महत्व असते....

वैचारिक लोकशाहीत संख्याबलाने कसलेही विजय प्राप्त होत नसतात!

Saturday, May 24, 2014

विजयांमुळे काही......

विजयांमुळे काही गोष्टी आपोआप सोप्या होऊन जातात.

उदा. अर्जुनाने पणात जिंकलेल्या द्रौपदीवर पाचही भाऊ कामांध होत अधिकार सांगतात आणि गैरसंबंधातून विवाहाआधी आणि विवाहानंतर नियोगातुन पुत्र प्रसवणारी कुंती त्याला अनुमोदन देते. द्रौपदीचा समावेश आम्ही नित्यस्मरणीय पंचकन्यांत करतो...

उदा. धर्मराज जुगारी असतो, तो कोणाचीही परवानगी न घेता भावांना, नंतर भावांच्या सामुहिक बायकोला पणावर लावतो...तरीही तो धर्मराजच असतो.

उदा. पांडव वनवासात जातात. तेथेही लबाड्या करतात. वात्सल्य भावनेने अमांत कि पौर्णिमांत असा वाद काढत अज्ञातवासाच्या काळाबद्दल भिष्म महाराज पांडवांचीच बाजु घेतात. तेच पांडव युद्धात भिष्माला शिखंडीच्या आडुन ठार मारतात.

उदा. द्रोणाचार्य आपल्या अर्जुनापेक्षा कोणी मोठा धनुर्धर होणार नाही या प्रतिज्ञेला जागत एकलव्याचा अंगठा कापून घेतात. त्याच द्रोणाचार्यांना धर्मराजाच्या असत्त्यामुळे अर्जुनाला ठार मारता येते.

उदा. कृष्ण स्वत:ला धर्माचा उद्गाता समजतो. तोच कर्णाला अधर्माने मारायला सांगतो. धर्म आणि अधर्म सोयीने ठरवायचे असतात हे चिरंतन सत्य नव्हे काय?

उदा. खूप आहेत.

आता दुर्योधन पाहुयात. तो हरलेला आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल फार सहानुभूती बाळगायची गरज नाही. पण...

उदा. तो कधीच राजा नव्हता. अंध बापाला ठार मारुन राजा व्हावे अशी स्वाभाविक इच्छा त्याची कधीही नव्हती.

उदा. तो वाईट प्रशासक होता अथवा प्रजेवर अन्याय करत होता असे महाभारतही जितांचे असुनही कोठेही म्हणत नाही.

उदा. त्याला जुगाराचा नाद नव्हता. युधिष्ठिराल होता म्हणून जुगारात त्याने आपल्या मामाला बसवले. द्रौपदीच्या प्रत्येक आक्षेपाला त्याने आधी पांडवांचे त्यावर काय म्हणणे अहे हे विचारले. आणि त्याला कोणाचाही, धर्मराजाचाही आक्षेप नव्हता.

उदा. राज्यावर उत्तराधिकारी म्हणून  अभिषिक्त राजाचा मुलगा म्हणून त्याचा आणि त्याचाच अधिकार होता. राज्याचे विभाजनी नको म्हनून अविवाहित व ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा करनारे भिष्म स्वत:च राज्याची कौरव-पांडवांत विभागणी करा हे कोणत्या तत्वाने म्हणाले?

उदा. अर्थस्य पुरुषो दास: हे भिष्मवचन कोणत्या वैफल्यातुन आले? राज्य जर पांडवांचेच आहे असा त्यांचा सिद्धांत होता तर अर्थ ते पांडवांचाच अप्रत्यक्षपणे खात नव्हते काय? जर पंडवांची बाजू न्याय्य होती असे त्यांना वाटले तर ते त्या बाजुला न जाता दहा हजार सैन्याला रोज ठार मारील पण पांडवांना नाही असे का म्हणाले? म्हणजे या न्याय्य महापुरुषाला दहा हजार सैनिकांचे प्राण तुच्छ वातले तर तो नेमका कोणता धर्म होता? आणि असे माहित असुनही केवळ आदरभावनेने ते पडेपर्यंत त्यांना सेनापतीपदावर ठेवणारा दुर्योधन अन्यायी कसा?

उदा. कौरवांपैकी एकही वीर पांडव समोरासमोरच्या पराक्रमात मारू शकले नाहीत. प्रत्येकाला कपटानेच मारावे लागले. अगदी दुर्योधनाला सुद्धा. दुर्योधनाने अखेर आली हे कळूनही धर्मयुद्धाचे नियम तोडले नाहीत. तरीही पांडव न्यायी/धर्मनिष्ठ कसे?

उदा. महाभारतही कौरव अन्यायी होते हे एखाददुसरे उदाहरण सोडले (तेही बालपणीचे) तर उदाहरणांनी सिद्ध करत नाही. केवळ दुष्ट - अन्यायी असे सतत म्हणत राहिल्याने कोणी कसा दुष्ट होतो?

उदा. पांडवांनी अनधिकाराने जेवढे कौरवांवर अन्याय केले तेवढे काही केल्या कौरवांनी पांडवांवर अन्याय  केल्याचे दिसत नाही. वनवास युधिष्ठिराच्या जुगारी प्रवृत्तींनी ओढवून घेतला होता. त्यासाठी दुर्योधनाला दोषी धरायचे काय कारण?

उदा. जो जिता वोही सिकंदर...

तात्पर्य: जिंकत जा...न्याय अन्यायाची पर्वा करू नका!

(यात कोठे "यदाकदाचित"ही वर्तमान आढळला तर व्यासांच्या प्रतिभेला अभिवादन करा आणि एकसुरात म्हणा.....अबकी बार....)

श्रेष्ठ प्रशासिका अहिल्याबाई होळकर!

धर्मराज युधिष्ठिरानंतर फक्त अहिल्याबाई होळकरांना जनतेने पुण्यश्लोक असा किताब बहाल केला. त्या थोर शिवभक्त होत्या. ज्या काळात राजे-रजवाडे आपल्या क्षेत्राच्या बाहेरील प्रजेचा साधा विचारही करत नसत त्या काळात अहिल्याबाईंनी देशभरात हजारो लोकोपयोगी  कामे केली. त्या कामांनी त्यांची ख्याती देशभरात चिरंतन राहिली आहे. पण अहिल्याबाईंची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचे प्रशासन! अठराव्या शतकातील भारतातील सर्वश्रेष्ठ प्रशासिका असा त्यांचा गौरव ब्रिटिश पार्लमेंटने केला आहे. देशातील हिंदू-मुस्लिम सर्वच रजवाडेही त्यांचा गौरव करत असत. त्यामुळे त्यांच्या इंदोर संस्थानाबाहेरच्या कोणत्याही समाजकार्याला कोणीही आडकाठी केली नाही. टिपू सुलतान तर अहिल्यादेवींना तत्वज्ञ प्रशासिका म्हणे.

अहिल्यादेवींचे प्रशासन हे राजकेंद्री नसून समाजकेंद्री होते. समाजातील सर्व घटकांना समान न्याय हे त्यांचे वैशिष्ट्य होते. निपुत्रीक विधवांची संपत्ती जप्त करण्याचा परंपरागत कायदा त्यांनी रद्द तर केलाच पण विधवांना दत्तक पुत्र घेता येईल असे कायदे बनवले. ही एक सामाजिक क्रांती होती.
अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात कररचना सौम्य व समानतेच्या तत्वावर ठेवली होती. इंग्रजांनी त्यांचे शासन देशात सुस्थापित झाल्यानंतर अहिल्यादेवींच्या कररचनेचा आधार घेतच आपली कररचना केली. तत्पुर्वी कररचना ही रजवाड्यांच्या मर्जीप्रमाणे असे. त्यामुळे श्रीमंत लोकही आपल्या वैभवाचे प्रदर्शन टाळत असत. अहिल्यादेवींच्या राज्यात मात्र तशी परिस्थिती नव्हती. प्रत्येकाच्या जिवित-वित्ताची हमी घेतलेले असे अहिल्यादेवींचे कल्याणकारी राज्य होते. त्या रोज दरबारात उपस्थित असत व प्रत्येक प्रजाननाची तक्रार ऐकून लगेच निर्णय देत किंवा गुंतागुंतीचे विषय न्यायखात्याकडे स्वत: पाठवत.
अहिल्यादेवींनी आपल्या व्यवस्थापनाचे सैनिकी प्रशासन व मुलकी प्रशासन असे दोन विभाग केले होते. सैनिकी व्यवस्थापन तुकोजीराजे होळकरांकडे सोपवले तर मुलकी प्रशासन आपल्या हातात ठेवले.
अहिल्यादेवींचे महत्वाचे क्रांतीकारी कार्य म्हणजे त्यांनी स्थापन केलेली महिलांना लष्करी प्रशिक्षण देणा-या संस्थेची स्थापना. या संस्थेतून अक्षरश: हजारो स्त्रीया प्रशिक्षीत झाल्या. खुद्द अहिल्यादेवींनी आपले स्वत:चे असे ५०० महिलांचे लढवैय्या पथक स्थापन केले होते. भारताच्या इतिहासातील प्रशिक्षित महिलांचे हे पहिलेच पथक!
राज्यातील व्यापार उदीम बाढावा यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. महेश्वरला वीणकरांना स्थायिक करून त्यांनी वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन दिले. ते इतके यशस्वी ठरले की माहेश्वरी साड्या व अन्य वस्त्रे भारतीय बाजारपेठ व्यापून उरले. आजही ती ख्याती पुसलेली नाही.

इंदोर हे त्या काळी एक छोटे खेडे होते. अहिल्यादेवींनी इंदोर हे एका नगरामद्धे परिवर्तीत करण्याचा चंग बांधला. फलश्रुती अशी कि इंदोर एका भव्य शहरात बदलले. आज ती मध्य प्रदेशाची आर्थिक राजधानी आहे.
अहिल्यादेवींचा समकालीन इतिहासकार स्टुअर्ड गोर्डन म्हणतो, त्या काळात देशभरात अंदाधुंदी चालू असतांना अहिल्यादेवींचा प्रदेश मात्र अठराव्या शतकातील सर्वात शांततेचा आणि भरभराटीचा होता. अहिल्यादेवींचे सामाजिक व आर्थिक भान कसे होते हे पाहिले तर आजही थक्क व्हायला होते. रानावनांतून जाणा-या यात्रेकरुंना भिल्ल लुटत असत. अहिल्यादेवींनी सैन्य पाठवून त्यंचा बंदोबस्त करण्यापेक्षा भिल्ल असे का करतात याचा शोध घेतला. उत्पन्नाची कसलीही साधने नसल्याने भिल्ल लुटारु बनले आहेत हे लक्षात येताच त्यांनी भिल्लांना कसण्यासाठी शेतजमीनी दिल्या. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर भिल्लांवरच यात्रेकरुंना सुखरुप इप्सित ठिकाणी अल्प मोबदल्यात पोहोचवण्याची जबाबदारी दिली. भिल्ल यात्रेकरुंकडुन या कामासाठी जो मोबदला घेत त्याला "भिलवाडी" म्हणत. यामुळे भिल्लांच्या उदरनिर्वाहाचीही सोय झाली आणि यात्रेकरुंना होणारा उपद्रव संपला.

इंग्रजांबद्दल अहिल्यादेवींचे मत आणि धोरण दूरदृष्टीचे होते. १७७७ साली पेशव्याला लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, इंगरज गोडबोल्या आणि अस्वलासारखा धूर्त आहे. त्याच्याशी संग करू नका. तो गुदगुल्या करुन मारेल. अस्वलाला ठार मारायचे तर त्याचा तोंडावरच आघात करावा लागतो." हे कार्य पेशव्यांना जमले नसले तरी पुढे महाराजा यशवंतराव होळकरांनी इंग्रजांचा धोका लक्षात घेऊन त्यांना अनेक युद्धांत धूळ चारली.
अहिल्यादेवींची किर्ती त्या काळात जगभर पोहोचली होती. जोआना बेली या ब्रिटिश कवयित्रीने तर अहिल्यादेवींवर इंग्रजीत खंडकाव्य लिहिले. या खंडकाव्यात जोआना बेली म्हणतात, "तीस वर्षांचा तिचा शांततामय राज्यकारभार, प्रजेच्या आशिर्वचनांनी ओथंबलेली तिची भूमी, आया त्यांच्या लहानग्यांना म्हणतात...खुद्द ब्रह्मदेवाने आपल्या भूमीवर राज्य करण्यासाठी तिला पाठवले...एक राजस हृदयी, कोमल अंत:करणाची आणि बुलंद व्यक्तिमत्वाची ती अहिल्या!"

ही कोमल अंत:करणाची स्त्री तेवढीच कठोर होती. तिचे संस्थान जप्त करून घशात घालण्यासाठी राघोबादादा सैन्य घेऊन महेश्वरवर चालून आला होता, तेंव्हा अहिल्यादेवींनी त्याला निरोप पाठवला..."मी एक अबला आहे, असहाय स्त्री आहे, या भ्रमात कोणी राहू नये. मी भाला घेऊन उभी ठाकले, तर तुमचे मनसुबे जागीच जिरतील. मी कोणत्या प्रकारची अबला आहे, हे रणांगनावरच कळेल!"

जोआना बेली म्हणतात ते खरेच आहे. कोमल अंत:करणाची, प्रजाहितदक्ष, उत्कृष्ठ प्रशासक महान धैर्यवतीही होती. नगर जिल्ह्यातील चोंडी हे एक छोटे गांव त्यांचे जन्मस्थान. ३१ मे १७२५ हा त्यांचा जन्मदिन. दरवर्षी लाखो लोक या महान पुण्यश्लोक महिलेला मानवंदना देण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी चोंडीला जमतात. आपणही जायलाच हवे!

Friday, May 23, 2014

घग्गर-हक्रा म्हणजे सरस्वती नव्हे!


सध्या घग्गर-हक्रा नदी म्हणजेच वैदिक सरस्वती नदी असे सिद्ध करण्याचा हिरीरीने प्रयत्न सुरू आहेत. घग्गर-हक्राच्या काठी सर्वाधिक, म्हनजे हजारापेक्षा अधिक पुरातन नगरांचे अवशेष मिळालेले असल्याने या संस्कृतीचे नांव सिंधू संस्कृतीऐवजी "सरस्वती संस्कृती" असे नामकरण करावे अशीही मागणी केली जात आहे. इतकेच नव्हे तर सरस्वती नदीकाठची संस्कृती आणि वेदांतील सरस्वतीचे माहात्म्य पाहता या संस्कृतीचे निर्माते हे वैदिकच होते असेही घाईचे निष्कर्ष काढले जात आहे. वैदिकवाद्यांचे त्यात जे स्वार्थ असतील ते असोत, पण वास्तव काय आहे हे आधी आपण समजावून घ्यायला पाहिजे.

घग्गर म्हणजेच सरस्वती?


घग्गर म्हणजे सरस्वती आहे काय हे आधी आपण ऋग्वेदाच्याच आधारे पाहुयात. ६.६१, ७.९५ व ७९६ ही तीन सरस्वतीसुक्ते असून अन्य काही सूक्तांतही सरस्वती नदीचे उल्लेख आहेत. दुस-या मंडलातील एका सूक्तात (२.४१.१६-१७) वैदिक ऋषींनी सरस्वतीला देवी व माता मानून तिची प्रार्थना केली आहे. या सूक्तात या नदीला "नदीतमे, अम्बितमे, देवीतमे" असे संबोधले आहे. वेदांत सिंधू, सरस्वती व सरयू यांची गणना महानद्यांत केली असून सरस्वती ही सर्वश्रेष्ठ नदी आहे. सिंधूसूक्तात (ऋग्वेद-१०.७५.५) यमुना, शुतुद्री (शतद्रू नव्हे), परुष्णी, असिक्नी, वितस्ता ई. नद्यांच्या बरोबरच सरस्वतीचा उल्लेख आला आहे. सरस्वान नामक समुद्राचा उल्लेखही ऋग्वेदात (७.९५.३, ७.९६.४-६, १०.६६.५) आढळतो. सरस्वती नदी या समुद्राला मिळत असल्याने त्याला सरस्वान असे नांव दिले गेलेले दिसते.

ऋग्वेदातील सरस्वतीच्या पुर्वेला यमुना नदी असून पश्चिमेला शतुद्री नदी आहे. म्हणजे दोन नद्यांच्या मधोमध सरस्वती नदी वाहते आहे.

ज्या पुरातत्त्वीय आणि भुगोलशास्त्रावरून घग्गर हीच सरस्वती ठरवण्याचा प्रयत्न होतो, तो त्याच पुराव्यांवर पाहता घग्गर ही सरस्वती असल्याचे सिद्ध होत नाही. कारण आज यमुना घग्गरच्या पुर्वेस वाहत असली तरी दहा हजार वर्षांपुर्वी यमुना ही घग्गरची उपनदी होती. तीच बाब सतलजचीही. म्हणजे या दोन्ही नद्या घग्गरला तिच्या उगमापासून काही अंतरावरच येवून मिळत होत्या. हे संगम घग्गरच्या वरच्या टोकाला असल्याने व या नद्या घग्गरला मिळत असल्याने घग्गरमद्धे मोठ्या प्रमाणात पाणी येत होते हे वास्तव असल्याने ऋग्वेदातील शतुद्री-यमुनेचा भुगोल जुळत नाही. बरे त्या ऋग्वेदातील स्वतंत्र व मोठ्या नद्या आहेत. त्या घग्गरला येवून मिळतात असे वर्णन आपल्याला ऋग्वेदात कोठेही सापडत नाही.

दुसरी महत्वाची बाब अशी कि पुरातत्वीय संशोधनांनुसार घग्गर ही एक मोठी नदी असली तरी ती नेहमीच मान्सूनवर अवलंबून होती. हिमालयातुन तिचा उगम होत नाही. घग्गरच्या पात्रातील गाळ व रेतीवर केलेल्या अनेक परिक्षणांतून हे सिद्ध झाले आहे कि इसपू दहा हजार वर्षांपासून त्यात हिमालयीन गाळाचे अवशेष मिळत नाहीत. ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाने पहाडांतून झेपा घेत खाली उतरणारी, रथसदृष वेगवान अशी घग्गर पुरातन काळातही नव्हती. यमुना आणि शतुद्री (तिचेच नवे नांव सतलज मानायची प्रथा आहे, पण तेही खरे नाही कारण ऋग्वेदातच शुतुद्री आणि शतदृ अशी दोन वेगवेगळी नांवे आलेली आहेत व त्यांचे अर्थही वेगवेगळे आहेत.)

तीव्र क्षमतेच्या भुकंपामुळे (भुगर्भातील हालचालींमुळे) सतलज व यमुनेने आपले प्रवाहमार्ग बदलले. सतलज पश्चिमवाहिनी होत सिंधुला जावून मिळाली तर यमुना पुर्ववाहिनी होत गंगेला जावून मिळाली. या दोन मुख्य उपनद्यांनीच मार्ग बदलल्याने घग्गर नदी आटली हे पुरातत्वीय पुरावे व उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे यातून स्पष्ट होते. घग्गर नदी आटल्याने तिच्या काठावरील वसाहती पुर्वेला व उतरेकडे सरकल्या असे दिसते. सरस्वती हीच घग्गर नदी मानले आणि तिच्याच काठावर वेदरचना झाली असे मानले तर या प्राकृतीक उत्पाताचा कसलाही संदर्भ ऋग्वेद अथवा उत्तर-वैदिक साहित्यात का मिळत नाही हा प्रश्न उपस्थित होतो.
महाभारतात (वनपर्व १३०.४-५) म्हटले आहे कि विनशन या ठिकाणी सरस्वती भूगर्भात लुप्त झाली आणि चमसोद्भेद या ठिकाणी ती पुन्हा प्रकट झाली आणि तिला अनेक नद्या मिळाल्या असे म्हटले आहे. पण या मताला कसलेही पुरातत्वीय  समर्थन मिळत नाही. हक्रा नदीला (पाकिस्तानात जेथे घग्गर प्रकट होते तेथून या नदीला हक्रा असे म्हणतात.) कोणतीही उपनदी पुरातन कालातही मिळत होती असा पुरावा उपलब्ध नाही.


पुराणांत सरस्वती नदीचे तीन भिन्न उल्लेख आहेत. पहिली म्हनजे कुरुक्षेत्रातील नदी, दुसरी म्हनजे पुष्कर-सरस्वती नदी आणि तिसरी म्हणजे प्रभास येथे समुद्राला मिळनारी नदी. या तीनही सरस्वती सर्वस्वी वेगवेगळ्या आहेत. महाभारतात बलरामाने प्रभास तीर्थापासून ज्या सरस्वतीच्या काठाने प्लक्षप्रस्त्रवन या तिच्या उगमाच्या ठिकानापर्यंत प्रवास केल्याचे वर्णण येते तेही घग्गर नदीला लागू पडत नाही. म्हणजे ऋग्वेदात नदीतमा असलेल्या महनीय नदीबाबत वैदिक साहित्यातच प्रचंड गोंधळ दिसतो हे उघड आहे.
हक्रा (घग्गर नव्हे) हीच ऋग्वेदातील गुप्त झालेली सरस्वती नदी होय हे मत सर्वप्रथम के. एन. दिक्षित यांनी व्यक्त केले होते. याला कारण घडले सर ओरेल स्टीन यांना हक्राच्या काठी अनेक पुरातत्वीय स्थाने दिसली म्हणून. सरस्वती गुप्त झाली व ती अदृष्य रुपाने गंगा-यमुना संगमात सामील होते अशी हिंदू मान्यता आहे, तेही वास्तव नाही. घग्गर नदी ही सुकलेली नाही. आजही ती पावसाळ्यात वाहती असते. थरच्या वाळवंटात मात्र पुरेशा प्रवाहाअभावी तिचे पात्र सुकलेले असते. वाळवंट ओलांडल्यानंतर ती पुन्हा कच्छच्या रणापर्यंत वाहती होते. त्यामुळे सरस्वती अदृष्य झाली तशी घग्गर मात्र आजही अदृष्य झालेली नाही, हे एक वास्तव आहे.

घग्गर हीच समजा सरस्वती नदी होती आणि ती एवढी पुज्य-पवित्र होती कि पुराणांतरीही तिचे उल्लेख श्रद्धेनेच केले जातात तर मग सरस्वती नदीचे नांव घग्गर कसे बनले याचे उत्तर वैदिक व पौराणिक साहित्यातही मिळत नाही. पवित्र पूज्य नद्यांचे नांव बदलले जाण्याचा इतिहास नाही. सरसुती नामक एक अत्यंत लहाण, नालासदृश्य एक नदी घग्गरला येवून मिळते. तीच वैदिक सरस्वती असे म्हनण्याची कसलीही सोय नाही कारण मग भुगोल अत्यंत वेगळा बनतो.

खुद्द ऋग्वैदिक भुगोल कसा घग्गर हीच सरस्वती या समीकरणाच्या विरोधात जाते हे आपण आधीच थोडक्यात पाहिले आहे.

सांस्कृतिक अवशेष व ऋग्वैदिक संस्कृती

घग्गर-हक्रा म्हनजेच वैदिक सरस्वती हे ठरवण्याचा घाट का घातला जात आहे यामागील खरे कारण म्हणजे घग्गर-हक्राच्या काठी सापडलेली हजारो सिंधु संस्कृतीची स्थाने. या हजारापेक्षा जास्त असलेल्या स्थानांपैकी कालिबंगन व लोथल या दोनच स्थानांत काही कुंडे सापडली. ही कुंडे म्हणजे वैदिक यज्ञकुंडेच असा दावा सर्वप्रथम एस. आर. राव यांनी केला व सपुर्ण संस्कृतीचे निर्माते म्हणजे वैदिक धर्मीय होते असा अजब निष्कर्ष त्यांनी काढला. त्यांच्या सिद्धांताच्या विरोधात जाणारे अन्य हजारो पुरावे सर्वच्या सर्व म्हणजे हजाराहुनही अधिक अवशेषांत मिळुनही सुतावरून स्वर्ग गाठणे म्हनजे काय याची प्रचिती या निमित्ताने आली. अर्थात सर्व वैदिक संशोधक या गृहितकावर अंध उडी घेते झाले हे ओघाने आलेच!



मी सोबत त्या कुंडांचा फोटो दिला आहे. वैदिकांचे अनेक प्रकारचे यज्ञ होते. यज्ञवेदीच्या रचनेला आणि आकारांना त्यात महत्वाचे स्थान असून चारही दिशांनी कोणी बसायचे याचे नियम ठरलेले आहेत. यज्ञ हे मंडपात होत. गृहयज्ञही आहेत. पण छायाचित्रात दिसते तशी खेटून नालाच्या आकारांच्या अनेक वेदी रचना असलेल्या यज्ञाचे वर्णन कोठेही आढळून येत नाही. आणि समजा ओढून ताणुन त्या यज्ञवेद्याच आहेत असा अट्टाहास क्षणभर खरा मानला तरी दोनच ठिकाणी मिळणा-या कथित वेद्यांवरून हजारो ठिकानची संस्कृती वैदिकच असे म्हणण्याचे धाडस हे अविचारीच म्हणायला हवे!

आधी आपण ऋग्वैदिक संस्कृती आणि सिंधू संस्कृतीत नेमका काय ढोबळ फरक आहे हे पाहुयात.

१. वैदिक लोकांना लोह माहित होते. सिंधू संस्कृती अद्यापही ताम्रयुगातच होती. लोहवस्तुंचे कसलेही अवशेष सिंधू संस्कृतीत मिळुन आलेले नाहीत.

२. वैदिक लोक लोकरीची वस्त्रे वापरत. त्यांच्या स्त्रीयांना लोकरीचे सुंदर वीणकाम येई. (ऋ. ५.२९, १.३४.४, १०.१०६.१)  त्यांना सूती वस्त्रे माहित नव्हती तर सिंधू संस्कृतीचे लोक सुती वस्त्रे वापरत, मोठ्या प्रमाणात निर्यातही करत.

३. वैदिक लोक निसर्गाचीच अमूर्त व्यक्तीरुपे पावलेली दैवते आहेत. या दैवतांना यज्ञातून हवन देत संतुष्ट करणे हा ऋग्वैदिक धर्म आहे. सिंधू संस्कृतीचे लोक मात्र मातृपूजा आणि लिंगपूजा करत. त्याचे आज पुजले जातात तशाच्या तशा शिवलिंगांसकट अगणित अवशेष सर्वच पुरातत्वीय अवशेषांतून मिळालेले आहेत. उलट या पुजांचे (किंबहुना मुर्ती/प्रतीक पुजेचे) कसलेही उल्लेख वेदांत मिळत नाहीत.


४. सिंधू (घग्गर) संस्कृतीचे लोक नियोजनबद्ध नगरांत रहात होते. शेती व उद्योग-व्यापारप्रधान ही संस्कृती होती. परदेशांशीही त्यांचा व्यापार चालत होते हे खाल्दियन संस्कृतीत मिळालेल्या पुराव्यांवरुनही सिद्ध होते. ऋग्वेदात अशा व्यापारांचा, विदेशी संस्कॄत्यांचा कसलाही उल्लेख नाही. वैदिक लोक हे प्राय: पशुपालक असून थोडीशी भटक्या स्वरुपाची शेती ते करत असत. किंबहुना नगरांत राहना-या "शिस्नदेव" पुजना-या संस्कृतीविषयक द्वेष-शत्रुभावना वेदात वारंवार आढळते.

५. सिंधु जनांना लिपी माहित होती हे तर सिद्धच आहे. वेदांत लिपी अथवा लेखनासाठी कसलाही प्रतिशब्द मिळत नाही.

६.  सिंधू संस्कृतीची स्थाने १२ लाख चौरस कि.मी.त मिळाली आहेत. सर्वत्र एकाकार संस्कृतीचे पुरावे उपलब्ध आहेत. ही संस्कृती युद्धायमान नव्हती तर व्यापार-कृषीप्रधान शांततामय जीवन जगनारी संस्कृती होती याबाबत सर्व विद्वानांत एकमत आहे. वैदिक जन मात्र ऋग्वेदावरुनच सतत युद्धायमान असल्याचे दिसते. ऋग्वैदिक शस्त्रे व शिरस्त्रान-कवच इत्यादींचा सिंधू संस्कृतीतील अभावही उत्खननांतुनच स्पष्ट होतो.

७. सिंधू संस्कृतीत वृषभाचे अनन्यसाधारण महत्व होते कारण ही संस्कृती कृषीप्रधान होती. अगणित वृषभमुद्रा त्याचे प्रतीक आहे. शिवासमोर आजही नंदीला मानाचे स्थान असते. ऋग्वेदात मात्र वृषभ हा एक खाद्य व हवनीय प्राणी आहे. पशू हे त्यांच्या दृष्टीने भुमीपेक्षाही महत्वाची संपत्ती असून ते त्यांच्या पशुपालक रुपाला साजेशे आहे. ऋग्वेदातील बव्हंशी सूक्ते ही पशुधन वाढावे यासाठी आहेत, शेतीतील यशासाठी नाहीत.

८. ऋग्वेदात नौकांचे (शंभर वल्ही असलेल्याही) उल्लेख आहेत पण या नौकांची वर्णने पणी नामक व्यापारी अवैदिक लोकांशी संबंधीत आहेत. सुरुवातीच्या काळात पणींचा द्वेष करणारे वैदिकजन बुबू नामक पणीकडून दान स्वीकारत त्याचे गौरवही करतांना दिसतात. ऋग्वेदातील बुबू हा गंगातीरावरील पणी असून नौका बांधनारी धनाढ्य दानशूर व्यक्ती होय. पणींबाबत ऋग्वेदात द्वेषपुर्ण अशा अनेक ऋचा आहेत व त्यांच्या समूळ नाशाच्या प्रार्थना आहेत.

९. ऋग्वेदात रथ व अश्वांचे विपूल उल्लेख आहेत. सिंधू संस्कृतीत भरीव चाकांच्या बैलगाड्यांचे पुरावे मिळतात. पण आ-यांचे रथ अथवा अश्वाचे पुरावे मात्र मिळत नाहीत. सिंधू संस्कृतीचे लोक कृषी संस्कृतीचे असल्याने त्यांना अश्वांऐवजी वृषभाचे महत्व अधिक असणे तर वैदिक लोक हे मुख्यत: पशुपालक असल्याने त्यांना अश्वाचे महत्व अधिक असणे स्वाभाविक आहे. घग्गर संस्कृतीचे निर्माते वैदिक असते तर अश्वाचे व रथाचे काहीतरी पुरावे मिळाले असते, पण तसे वास्तव नाही.

१०. सिंधू (घग्गर) संस्कृतीत असंख्य मुद्रा मिळालेल्या आहेत. कोणत्याही वेदात अथवा उत्तरकालीन वैदिक वाड:मयात मुद्रांचा कसलाही उल्लेख मिळून येत नाही.

हा असा सांस्कृतिक विभेदच एवढा मोठा आहे कि वैदिक हे सिंधू (घग्गर) संस्कृतीचे निर्माते होत हा दावाच हास्यास्पद आणि एनकेनप्रकारेन वैदिक सांस्कृतीक वर्चस्वतावाद निर्माण करण्याचा प्रयत्न ठरतो.

थोडक्यात घग्गर म्हणजे सरस्वती नव्हे, मुळची सरस्वती कोणती याचेही व्यापक पुरावे उपलब्ध आहेत. त्यावर खालील दुव्यांना भेट दिली तर अजून काही बाबी स्पष्ट होतील.

http://sanjay-sonawani.hubpages.com/hub/induscivilizationblunders

http://sanjay-sonawani.hubpages.com/hub/Myth-of-the-lost-river-Saraswati

http://sanjay-sonawani.hubpages.com/hub/helmand-saraswati 

Monday, May 19, 2014

मानवी स्वातंत्र्याच्या प्रेरणा....

मी जेंव्हा "राष्ट्रवादी" हा शब्द वापरतो तेंव्हा मला अन्य राष्ट्रांशी शत्रुभाव जपत, त्याच प्रेरणांना जपत द्वेषभाव वाढवणारे आणि त्या राष्ट्रांतील धर्मियांचा ही द्वेष करत आपल्या राष्ट्रातील पण त्याच धर्माच्या लोकांशीही आकस व शत्रूभाव ठेवणारा राष्ट्रवाद मुळीच अभिप्रेत नसतो. राष्ट्रवाद ही व्यापक संज्ञा असून ती जगभरच्या मानवी समुदायांबद्दल तेवढीच आत्मीयता ठेवत आपल्या देशातील सर्वांचेच समतेच्या पातळीवर कसे उत्थान होईल ते पाहणारा राष्ट्रवाद अभिप्रेत असतो. मला वाटले मलालाला खुप कोवळ्या वयात हा राष्ट्रवाद समजला आहे. महात्मा गांधींचा राष्ट्रवाद आपल्याला कधीच समजला नाही तो दूर देशीच्या एका मुलीला समजला. मार्टिन ल्युथर किंग, आइंस्टाईन, मंडेला, ते आजही जगभर अन्यायाच्या विरोधात समतेसाठी लढतात त्यांना समजलेला आहे. भविष्यातही म. गांधी हेच शोषनाविरुद्ध व शोषकांविरुद्ध उभे ठाकणा-यांचे एकमेव प्रेरणास्थान असतील. ज्याही कोणाला वास्तुंची अथवा इतिहासाची पाडापाड, खुनाखुनी (सरकारी असो कि व्यक्तिगत) यातच रममाण व्हायचे आहे त्यांची नोंद इतिहासात खलनायक म्हणुणच होईल. त्यांना कितीही बेगडी राष्ट्रप्रेमाचा मुलामा दिला तरी कोणीही स्वातंत्र्यवीर होऊ शकत नाही.

ज्यांना स्वातंत्र्याचा अर्थच समजला नाही, मानवी स्वातंत्र्याच्या प्रेरणा या दुस-यांचे स्वातंत्र्य हिरावून भागत नाही हे समजत नाही त्यांना कोणतेही जग कधीही डोक्यावर घेत नाही...घेणार नाही. क्षमा हा सर्वात मोठा गूण आहे...तो पाळायला अवघड जातो हे खरे आहे...पण तो प्राप्त करण्याची प्रेरणाही आम्हाला गांधीजीच देतात...सुडबुद्धीने जातीय हिंसाचारांचे समर्थन करनारे नव्हेत!

मनोविकृत हिंसाचा-यांची संख्या जगात नेहमीच अधिक राहिली होती...केवळ आणि केवळ हिंसा हा फक्त भेकडांचा मार्ग असतो...सबलांची अहिंसाच तेवढी वंदनीय असते हे आम्हाला गांधीजींनी शिकवले आणि ते सत्यात येतांनाही पाहिले. आम्हाला वीरांचा देश हवा आहे...भेकड हिंसकांचा नव्हे.

होय...आम्ही वैश्विक राष्ट्रवादाचे समर्थक आहोत. आम्ही समतेचे समर्थक आहोत. शाश्वत अर्थव्यवस्थेतुनच मानवतेचे चिरंतन कल्याण होनार आहे...बुभुक्षितपणे धरतीतील साधनस्त्रोतांना अविरत लुटना-या अशाश्वत अर्थव्यवस्थेचे नव्हे...आम्ही कोणी केवळ एका जातीचा अथवा धर्माचा आहे म्हणुन द्वेष करनारे नव्हेत...ज्याचा इतिहासच नाही, एक मित्थक असलेल्या रामाचे आम्हीही भक्त आहोत पण त्याचा कोठे खरेच जन्म झाला होता व तो ऐतिहासिक व्यक्ती होता असे मानणा-या बेवकुफांच्या रांगेत आम्ही नक्कीच नव्हेत! मित्थके आणि इतिहास यातील फरक आम्हाला समजतो! हिंसेचा आगडोंब उसळवणा-यांच्या आम्ही नेहमीच विरोधात राहू...आणि त्यातच आमचा राष्ट्रवाद प्रकट होत राहील!

Saturday, May 17, 2014

निवडणूक आणि मी ...आपण!

अर्थशास्त्रातील एक मुलभूत सिद्धांत असा आहे कि आपल्या गरजा नेमक्या काय आहेत हे कधीच ठरवता येत नाही, त्यामुळे गरजा निर्माण करुन त्यांची आवश्यकता पटवून द्यावी लागते.

मतदारही असाच एक ग्राहक असतो. खरे तर संकल्पनात्मक दृष्ट्या तो जरी मतदाता असला तरी संभाव्य अपेक्षेतील शासकीय संकल्पनांचा नकलत ग्राहक बनत असतो. त्याला नेमके काय हवे आहे हे त्यालाच माहित नसते. त्यासाठी गरज निर्माण करून ती आपणच पुर्ण करू शकतो याचा विश्वास दिला कि मतदार बरोबर त्याच गरजेला शरण जातो.

हे एक मानसशास्त्रीय युद्ध असते. ते मानसशास्त्रीय संकल्पनांवरच खेळले जाते...कधी जाणतेपणे तर कधी अजाणतेपणे. हे युद्ध कधी मोठे असते तर कधी छोटे...पण ते युद्धच असते हे खरे. आणि युद्धात असतात तसे येथेही मतदारांचे आणि मते घेऊ इच्छिना-यांचे अनेक भावनिक पक्ष असतात. हे पक्ष खरे तर या युद्धात ग्राहकच असतात, तरीही यातला सर्वात दुर्बल घटक म्हणजे भावनिक होणारा मतदार हाच मतांच्या बाजारपेठेत हरवून गेलेला ग्राहक असतो. तो कोणाची तरी हिरीरीने तळी उचलत राहतो. तेथे विचार, भवितव्यातील परिणाम याबाबत तात्विक विचार असतोच असे नाही. लाटेवर स्वार होणे किंवा लाटेला विरोध करणे एवढेच काय तो आपल्या दुबळेपणात करू शकतो.

पण हा बाजार आहे याचे भान मात्र सुटलेले असते. मते घेणा-यांना त्याची ब-यापैकी जाणीव असते, पण मतदात्यांना त्याची जाणीव असतेच असे नाही.

आतापर्यंत भारतातील अनेक निवडनूका कधी कृत्रीम तर कधी अनपेक्षित घडलेल्या घटनांमुळे निर्माण झालेल्या लाटांवरच झालेल्या आहेत. कधी लाटांना विरोध करणारे प्रबळ ठरल्याने लाटा अयशस्वीही ठरलेल्या आहेत तर कधी त्या अत्युच्च यशाचे शिखर गाठणा-याही ठरलेल्या आहेत.

आताची लाट ही विशेष आहे. या लाटेला जागतिकीकरणाने निर्माण केलेल्या आशा-आकांक्षांचे जेवढे संदर्भ आहेत तेवढेच धार्मिक संदर्भही आहेत. भौतिक विकासाच्या अपेक्षांच्या ओझ्याबरोबरच जातीय/धर्मीय आकांक्षांचे प्रतिबिंब या निवडणूकीत पडल्याचे दिसते. ते आधी नसे असे नाही, पण यावेळेस दोहोंचेही अगदी आकर्षक प्यकेज बनले आणि ते मतदात्यांना एक भावनिक लाट क्रमश: उत्पन्न करत विकलेही गेले. विक्रयकलेचा, सामाजिक मानसशास्त्राला कालसुसंगत ओळखत त्याचा अत्यंत शिस्तबद्ध वापर केला जाण्याचा हा अभूतपुर्व नमुना आहे याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही.

यातून खरेच काय घडेल हे आज तरी सांगता येणार नाही. पण धर्मप्रधानता येणार याबाबत शंका राहू नये अशी कृती आजच घडलेली आहे. मी हिंदू आहे त्यामुळे मला त्याचे दु:ख असायचे कारण नाही, पण देशाचा कारभार हिंदू पद्धतीत छुप्या अजेंड्यावर चालणार याची खंत नक्कीच आहे.

खरे तर हे लिहिण्याचे कारण नव्हते. पण आज अनेक मित्रांनी फोन करुन, पोक करुन, अथवा मला उद्देशून पोस्टस व प्रतिक्रियाही लिहिल्यामुळे माझी मते मांडणे भाग पडले. मी रा. स्व. संघाच्या विचारधारेचा विरोधक असल्यामुळे त्या विचारधारेचा मी नेहमीच विरोध केलाय आणि करत राहील. रा. स्व. संघाची वैदिक विचारधारा मला कधीही मान्य होणे शक्य नाही.

येथे माझ्या कोणाही मित्रांनी वाचलेय कि नाही माहित नाही, पण माझी "गुडबाय प्राईममिनिस्टर" नांवाची एक कादंबरी होती. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कालाच्या सरत्या वर्षात ती
सटायर मी लिहिली होती. त्यात मी गांधी यांची प्रचंड खिल्ली उडवली होती. कादंबरी प्रसिद्ध झाली, कोंग्रेसवाल्यांनी माझ्यावर प्रचंड टीका केली...मी टीकेची पर्वा करण्याचे कारण नव्हते. पण दुर्दैवाने त्यांची श्री पेरंबुदूर येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिषण हत्या झाली. कोणी मेल्यानंतर त्यावर टीका करू नये. तोवर कादंबरीच्या तीन-साडेतिनशे प्रती बाजारात संपलेल्या होत्या. मी उर्वरित सर्व प्रती मागवून घेतल्या....त्या पुन्हा कधीच बाजारात गेल्या नाहीत.

त्यानंतर अटलबिहारी वाजपेयींबद्दलही अशीच सटायर लिहायचे मनात आले होते. पण "गुडबाय..." बाजारात आल्यानंतर राजीवजींची हत्या झाली...पुन्हा असला प्रयोग नको म्हणून मी हस्तलिखित अर्धवट सोडून दिले. ही माझी अंधश्रद्धा असेल...पण मी तसा वागलो हे मात्र खरे.

साहित्यकाराची भुमिका वेगळी असते. चिंतकाची भुमिका वेगळी असते. जोवर आपण मतदार असतो तेंव्हा आपली भुमिका वेगळी असते. मतदान ज्या क्षणी संपते त्याक्षणी आपण बाजारु युद्धातून बाहेर पडलेलो असतो आणि सर्वांचे कल्याण व्हावे असे सरकार यावे एवढीच भावना मनात असते. पण आम्ही मतदाराच्या भुमिकेतून बाहेर पडतच नाही. त्याच उन्मादाला कवटाळून बसतो. खरे तर प्रत्येक निवडणूक ही मतदाराची परिक्षा असते आणि त्यालाही आपापल्या पातळीवर विकासाचेच कार्य करत रहावे लागते हे विसरत असतो. शासनच कल्याण करू शकते, आमची काहीच जबाबदारी नाही, या दुर्बळ भावनेतून भारतीय बाहेर कधी पडतील ते पडोत.

असो. ज्या सर्वांनी माझ्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा केली होती त्यांना हे उत्तर आहे.

Friday, May 16, 2014

हे पण... ते पण....

हे पण ते पण
माझे मी पण
तुझे तु पण
नकोच असले
वेडे पागलपण
तुझ्यात मीही
माझ्यात तुही
कसली दुही?

हे विश्वची सारे
विराट असले
तरीही असते
बनुनी कण कण
नि जगते स्वपण
मग कोठून येते
हे दुजेपण?

Wednesday, May 14, 2014

हेही!

वेदनांच्या चक्रीवादळांत
कोणतीही गोष्ट स्थिर
सापडणे कठीण
अगदी वेदनाही...!

मनाच्या मनाला वाटलेल्या
सुखद संवेदना शोधत जावे
पण मनच दगाबाज....
हेही....!

शेवटी कोठुनही निघालो
आणि कोठेही पोहोचलो
पण पोहोचलोच नाही कोठेही
हेही!

Monday, May 12, 2014

विद्रोहाची संकल्पना का फसली?

विद्रोहाची संकल्पना फसली कारण विद्रोह नेमका कोणाविरुद्ध, एखाद्या जातीविरुद्ध कि व्यवस्थेतील अन्याय्य विषमतामुलक तत्वज्ञानाविरुद्ध याचे भानच उरले नाही. जातींविरुद्धचा संघर्ष एका जातीविरुद्ध एकवटण्याचा द्वेषमुलक प्रयत्न सुरु झाला येथेच विद्रोहाच्या नाशाची बीजे होती. ब्राह्मण आणि हिंदू देवतांना शिव्या देणे म्हणजे पुरोगामीपणा अशी काहीतरी विचित्र पुरोगामीपणाची संकल्पना हिरीरीने स्वीकारली गेली. असे करत असतांना आपण आपल्याही जातीच्या बेड्या घट्ट करत चाललो आहोत याचेही भान राहिले नाही.

विद्रोह हा आवश्यकच असतो...पण तो विषमतामुलक तत्वज्ञानांना तिलांजली देण्यासाठी...मग ही विषमता जातीय असो कि आर्थिक-सांस्कृतिक!

आमचे विद्वान समतेबद्दल नेहमीच हिरिरीने बोलत असतात. पण त्यांना नेमकी कोणती समता अपेक्षित असते? उच्च वर्णीय, निम्न वर्णीय हे शब्द सातत्याने वापरत असतांना समतेचे अधिष्ठाण कसे येईल याचा कसा विसर पडला? वर्ण शब्द वापरतांना आपण वैदिक विषमतेची वर्णव्यवस्था स्विकारतो आहोत, म्हणजे समतेच्या मुलतत्वालाच सुरूग लावतो आहोत याचे भान कसे सुटले?

मी अंबेजोगाई येथे एका भाषणात म्हणालो होतो, बहुजनांना ज्ञानात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक उत्थान करून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम ब्राह्मणातील "ब्र" काढणेही बंद करावे. त्यांना शिव्या देवून तुमची पोटे भरणार नाहीत. ते जातीसंस्थेचे निर्माते नाहीत. पुरोहित या नात्याने त्यांनी शोषण केले असेल तर त्यांना पुरोहित म्हणून बोलवणे थांबवा...स्वत:च सारी कर्मकांडे करा...शिव्या देत बसून काय साधणार आहे? त्यापेक्षा आपले ज्ञान, अर्थ आणि आजच्या जगाशी सुसंगत अशी सुसंवादी संस्कृतीचे नवनिर्माण कसे करता येईल यासाठी उभे ठाका!

अर्थात विद्रोही म्हणवणा-या चळवळीने झटपट प्रसिद्धी मिळते, टाळ्यांचे गजर होतात म्हणून शिवीसत्राला बांध घालणे सोडले नाही. जातींत स्वत:च कोंबून टाकलेले महापुरुष आपल्या चळवळीचे प्रतीक निवडले, पण जातीपार असलेले महात्मा गांधी यांना स्विकारणे तर दुरच, पण त्यांनाही शिव्या घालत बसण्याचा मार्ग निवडला.

विद्रोही चळवळीने नवे सामाजिक ज्ञान व भान निर्माण केले नाही. सामाजिक ऐक्याची संकल्पना पुढे रेटण्याऐवजी विभक्तीकरणालाच ते कारणीभूत झाले. पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्र कधी प्रतिगामी झाला हे समजलेच नाही. जातीय विद्वेषाचे विष उतरलेच नाही...उलट वाढत गेले.

आज समाजव्यवस्था मोठ्या संक्रमणातून जात आहे. जागतिकीकरण आणि त्यामुळे निर्माण होत असलेली नवी मुल्ये, वाढत्या आशा-आकांक्षा, नव्य जीवनशैलीचे अनिवार आकर्षण आणि त्याच वेळीस उपलब्ध अत्यल्प साधनस्त्रोत या कचाट्यात सर्वच सापडले आहेत. व्यवस्थेचा फायदा अत्यल्प लोकांना होत आहे तर बहुसंख्य लोक वंचित होत चालले आहेत. आरक्षण हवेच यासाठी जसे नवनवे समाजघटक आक्रमकपणे पुढे येत आहेत तसेच यांना आरक्षण का असे जोमाने विचारणारेही पुढे येत आहेत. आरक्षणाची आवश्यकता भासणे म्हणजे अजुनही आम्ही आर्थिक दृष्ट्या मुर्दाड आहोत, आमची मानसिकता ज्ञानात्मक होत प्रगती साधण्याकडे नाही हेच सिद्ध करते. आणि जातीय संघर्षाला आरक्षण हेही एक महत्वाचे कारण आहे याचे भान पुरोगाम्यांना आले नाही. सर्वांत गोड रहायचे, सर्वप्रिय (किमान आपल्या जातगटात तरी) व्हायचे अशी खाज लागलेल्यांकडून परखड बोलीची अपेक्षा तरी कशी करायची?

साधनसंपत्तीचे नुसते फेरवाटप करून काही होत नसते. मुळात उपलब्ध साधनसंपत्तीचा विनियोग कसा करायचा याचीच अक्कल नसेल तर आहे तीही साधनसामग्री वाया जानार. उदा. भारतात आजही ३०% शेतमाल वाया जातो. शेतमालावर प्रक्रिया होण्याचे प्रमाण २%‍ पेक्षाही कमी आहे. म्हणजे आपण त्यावर प्रक्रिया करणारे लघुउद्योग सर्वत्र सुरु करत शकलो नसू, वाया जाना-या साधनसंपत्तीचा विनियोग करु शकलो नसू तर आपण मागास म्हनवण्याच्याच योग्यतेचे नव्हेत काय?

आहे त्या आर्थिक, ज्ञानात्मक व सांस्कृतिकतेकडून जो पुढे जात राहतो, गुणात्मक प्रगती साधत असतो, त्याला पुरोगामी म्हणतात. प्रस्थापितांना शिवीगाळ करत बसलेल्यांना नाही याची नोंद घ्यायला हवी.

Saturday, May 10, 2014

असाही विचार करून पाहुयात...!


सोनईतील हत्याकांड ते नितीन आगे, उमेश आगळे यांची निघृण हत्या. सत्र वाढत आहे. याबद्दल निषेध, कडकडीत बंद, जलदगती न्यायालयांच्या घोषणांचा आवाज एवढा दुमदुमत आहे कि जणू या पुरोगामी महाराष्ट्रात जातीव्यवस्थेमुळे होणा-या अन्याय-अत्याचाराविरोधात खरेच चीड उसळली आहे. एकीकडे शोषित-वंचितांनी स्वतंत्र वसाहती कराव्यात यापासून ते भीमा कोरेगांवचा पराक्रम आठवत शस्त्रे परजा अशी आवाहने सोशल मिडियातून होतांना दिसताहेत तर दुसरीकडे या घटनांतील अपराध्यांची जात पाहून त्या जातीच्या सर्व समाजाला दोषी ठरवू नये अशी आवाहने दुसरीकडून होत आहेत.

एकुणातच तात्पुरते का होईना सारे समाजघटक जागे होतांना दिसत आहेत. या अशा घटनांचा निषेध करत असतांना असे पुन्हा घडूच नये यासाठी आम्ही सर्वांनीच नेमके काय करायला हवे, असे का घडते आहे याबद्दल विश्लेशन करायला आमचे बोटचेपे पुरोगामी विचारवंत मात्र कमी पडत आहेत. शोषक विरुद्ध शोषित हा संघर्ष पुरातन आहे हे खरे आहे. बळी जाणारा हा बव्हंशी शोषित-वंचित समाजघटकांतीलच असतो हेही वास्तव आहे. परंतू शोषणाचे मार्ग बदललेले आहेत आणि जुन्या भुमिकांतून शोषक-शोषित संघर्षाकडे पाहून चालणार नाही याचे आमचे भान हरपलेले आहे. शोषितांचा शोषितांविरुद्ध वर्गीय/जातीय लढा असे वेगळेच स्वरूप आपल्या समाजव्यवस्थेत आकारू लागले आहे, आणि म्हणून त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करावा लागेल.

गेल्या काही महिन्यांतील घटना पाहिल्या तर काही प्रेमप्रकरणांतून तर काही राजकीय कारणांतून घडल्या आहेत असे वरकरणी म्हणता येईल. प्रेमप्रकरणातून निर्माण होणारे संघर्ष आणि त्यातून उद्भवनारी हत्याकांडेही भारताला नवीन नाहीत. सर्वत्रच त्यांना जातीय परिमाने असतातच असेही नाही. पण बव्हंशी घटनांत "जात" हा घटक महत्वाचा ठरला आहे हेही वास्तव आहे. जे जातीविरहित धर्मात प्रवेशते झाले आहेत त्यांच्याबाबतही जातीचा अभिशाप सुटला आहे असे नाही. इतरांच्या दृष्टीने "ते" अजुनही विशिष्ट जातीचेच आहेत. जातीनिहाय उच्च-नीचतेची उतरंड वैदिक धर्मातून झिरपली आणि ती वैदिकांपेक्षा कठोरपणे अवैदिकच जास्त पाळत आहेत असे भिषण चित्र सध्या तरी दिसते आहे.

शिक्षण आणि आधुनिकीकरण यातून जातीनिहाय उच्च-नीचतेच्या भावनांना तिलांजली मिळेल हे जात्युच्छेदनाचे स्वप्न पाहणा-या महनियांना आम्हीच रसातळाला पोहोचवले आहे. जातींचे भान मुलांना विद्यार्थीदशेपासुनच कसे असते हे समीर मोहिते या तरुणाने केलेल्या सर्वेक्षणात सामोरे आलेले आहे. जातीव्यवस्थेला कठोर करत नेणारी आज जी नवीन आर्थिक आणि राजकीय परिमाने लाभलेली आहेत त्यावर मात्र व्हावे तसे संशोधन होत नाही हेही एक वास्तव आहे.

भारताचा पंतप्रधानपदाचा उमेदवारच जेंव्हा स्वत:ला "निचली जाती का" असे म्हणतो तेंव्हा त्यालाही कोणत्यातरी उच्च जाती अभिप्रेत आहेत, म्हणजेच जातीव्यवस्थेची उतरंड मान्य आहे असा अर्थ होतो. जर समाजाला ही उतरंडच मनोमन का होईना मान्य असेल तर समतेचा प्रश्न येतोच कोठे?  महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. ब्राह्मण, मराठे, ओबीसी हे घटक कथित "उच्च जातीय" अथवा "सवर्ण" आहेत हे गृहित धरुनच जेंव्हा कोणत्याही घटनेची चिकित्सा केली जाते तेंव्हा ती कितपत तथ्यापर्यंत पोहोचू शकेल याबाबत मला शंका आहे. आणि समजा, कथित मराठे अथवा ओबीसी स्वत:ला ते जे मुळात नाहीत ते मानत असतील तर त्यांचा दृष्टीकोन हा इतिहासातील पिचलेल्या समाजघटकांबद्दल आकसाचा, घृणेचा असनार हेही उघड आहे. येथेही आपण समतेबद्दल बोलायचा अधिकार गमावून बसलेलो असतो याचे भान दोन्ही समाजांना असणे आवश्यक आहे.

मुळात एखाद्याला हाल हाल करून मारुन टाकावे अशी मानसिकता येते तरी कोठून? ही विकृती आहे हे तर उघड आहे. नितीन आगे या कोवळ्या मुलाला निर्दयपणे मारले जात असतांना मारणारे सोडा, हजारो बघ्यांचे अंत:करण थोडेही का द्रवले नाही? कोणीही हस्तक्षेपही का केला नाही? कि पोलिस म्हणतात त्याप्रमाणे हत्या सोडता असे काही घडलेच नाही? पुन्हा या प्रकरणाला दोन पक्ष आहेत आणि नेमका खरा पक्ष कोणाचा हे कसे ठरवायचे? डा. प्रकाश आंबेडकर एका वाहिनीवर मुलाखत देतांना म्हणाले, आगे प्रकरण हे जातीय नसून प्रेमप्रकरणातून घडले आहे. पण येथे हा प्रश्न निर्माण होतो, प्रेमप्रकरणात हत्या कोणत्या तत्वात बसते? आमचे काही आजचे विचारवंत उठाठेव करत म्हणतात, हे काय प्रेम करायचे वय असते काय? आता प्रेम करायचे वय नेमके कोणते याचा कसलाही शास्त्रीय डाटा उपलब्ध नाही. ते कधीही, कोणत्याही वयात होऊ शकते. प्रेमात लैंगिक भावना अनुस्युतच असतात. केवळ गप्पा मारण्यासाठी कोणी विभिन्नलिंगीच्या प्रेमात पडत नाही. दुसरे असे कि आगे प्रकरणात सांगितले जाते कि मुलगीच त्याच्या मागे लागली होती. पण याने फरक काय पडतो? हत्या झाली आहे हे अत्यंत निघृण असे वास्तव आहे, त्याच्याकडे डोळेझाक करत सारवासारवीचे उद्योग का केले जातात?

वास्तव हे आहे कि उभय घटकांत द्वेषाचे मळे फुलत आहेत. कथित विचारवंत आणि पुरोगामी म्हणवणा-या संघटना या द्वेषाला खतपाणी घालत आहेत. एकीकडे स्पृष्य म्हणून गणला गेलेला समाज पुर्वास्पृष्यांचा द्वेष करत आहे, आणि दोन्ही गटांना मैत्रीचे हात पुढे करायला त्यांचे नवे अहंकार आड येत आहेत. ब्राह्मण-मराठे जेवढा खोटा इतिहास उभारत आपल्या कथित अस्मिता चेतवताहेत तेवढेच पुर्वास्पृश्य समाजघटकही नव्या आत्मशोधात का होईना त्याची री ओढत आहेत. खरा इतिहास आणि खरे आत्मभान कोणालाच नको आहे असे वाटावे अशी भिषण समाजस्थिती आपणच निर्माण केली आहे.

बदलत्या अर्थव्यवस्थेने त्यात अजून तेल ओतले आहे. एकीकडे तळागाळातील, गांव-पाटलासमोर, धनदांडग्यांसमोर नित्य झुकलेला असलेला एके काळचा समाज झपाट्याने शिकून प्रगती साधत आहे. जुनी गुलामी नाकारत आहे. दुसरीकडे शेतीच्या तुकडीकरणाने, नवे शेती-तंत्रज्ञान अथवा आधुनिक शिक्षनाकडे पाठ वळवलेला पुर्व-सरंजामी समाज मात्र रसातळाला जात आहे. कथित खानदानी अहंकार तर जात नाही, पण आर्थिक बोजे असह्य झालेले, अशा परिस्थितीत आत्महत्या करण्यात हाच समाज अग्रेसर आहे हेही एक वास्तव आहे. नैराश्याने  या बव्हंशी समाजाला ग्रासलेले आहे आणि त्यांच्या सामाजिक संघटना या नैराश्यात भर घालत आहेत. मराठा आरक्षण ही त्याच नैराश्यावर मात करण्यासाठी व राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी केली गेलेली एक चाल आहे. त्यामुळे जातीय संघर्षाला आर्थिक व म्हणूनच एक नवे राजकीय परिमाण लाभलेले आहे. एके काळचा व्यवस्थेचा शोषकच शोषितांच्या हक्कांवर घात घालतो आहे हा उद्वेग एकीकडे तर नव्या अर्थव्यवस्थेत हतबल ठरत असनारे कालचे सरंजामदार एकीकडे असा हा समाज-मानसशास्त्रीय तिढा आहे. मनोविकृत्या हिंसकतेकडे झुकतात हा जागतिक इतिहास आहे. आणि गुलामगिरी नाकारतांना जुन्या व्यवस्थेचा निरंतर द्वेष करत राहण्यात कोणते शहानपण आहे?

आर्थिक हतबल नातेवाईक व आपापला समाज स्वार्थासाठी धरून रहायचा प्रयत्न करतो. धर्मवेड, जातवेड हे आर्थिक दुर्बलांना विकृत करत नेते हा समाजशास्त्रीय इतिहास आहे. राजकीय स्वार्थसाधकांना जात हेच भांडवल वाटते त्यामुळे ते जात-सापेक्ष तत्वज्ञानाचेच समर्थक असतात. अशा परिस्थितीत परस्परांकडे पाहण्याचा दृष्टीकोण हा अत्यंत टोकाच्या द्वेषाचा असणार हे उघड आहे आणि ते तसे आहेही. सोशल मिडिया हे सध्याचे एक दिग्दर्शक माध्यम मानले तर त्यावरून आपली समाज-मानसिकता केवढी विकृत व द्वेषांधळी झाली आहे याचे दर्शन होते. प्रश्न एवढाच उरतो कि कोण कोणावर कुरघोडी करतो. आजवरच्या जातीय हत्याकांडांनी त्याचे उत्तर दिले आहे.

तथागत बुद्ध म्हणाले होते कि द्वेष हे तीन विषांपैकी एक विष आहे. सोनईचे प्रकरण असो कि नितीन आगेचे, ही आत्यंतिक द्वेषाची परिणती आहे. त्याला जेवढीही परिमाने आहेत त्यावर जोवर आम्ही सर्वच प्रामाणिकपणे विचार करत सामाजिक मानसिकतेत बदल घडवून आणु शकत नाही तोवर आम्हाला वीट येईपर्यंत फक्त निषेध मोर्चे वा बंदच पाळावे लागतील.

सामाजिक द्वेषापार जाण्यासाठी आमच्याकडे नेमकी काय व्युहरचना आहे हा खरा प्रश्न आहे. सामाजिक आत्र-हितसंबंध सामंजस्याचे होतील यासाठी कोणती रचना अभिप्रेत आहे हाही प्रश्न आहे. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे सामाजिक द्वेष उठवत, नामानिराळे राहणा-या समाजकंटकांबद्दल आमची भुमिका काय आहे हे आम्हालाच ठरवावे लागेल.

अन्यथा आज नितीन आगेबद्दल शोक करत असतांना आम्हाला उद्याच्या अन्य कोणाच्या हत्येचा/अन्यायाचा/अत्याचाराचा निषेध वारंवार करत बसण्याची वेळ येईल. उत्तर मात्र सापडनार नाही ते नाहीच!

Tuesday, May 6, 2014

थोडा हाही विचार व्हावा...

दलितांवर गतकाळात पराकोटीचा अमानवी अन्याय झाला आहे याबाबत कोणाचेही दुमत असू शकत नाही. वर्तमानकाळातही ते पुर्ण संपले आहेत असे नाही. आगे प्रकरणातील वास्तव एवढे दाहक आहे कि शरमही शरमली असेल. अमानवीपणाचे हे तांडव कोठे चालले आहे हे पाहून व्यथित व हताश व्हायला होते. हिंदू म्हणून आजही राहिलेल्या अनेक जाती-जमातींना आजही अनेक मंदिरांत प्रवेश नाही. अनेक सार्वजनिक पानवठे वापरायचीही दलितांवर बंदी आहे. वैदिक तत्वे जपणारे कथित हिंदू स्वत:ला कसलेही कारण नसतांना, त्यांना वैदिक धर्माने कसलीही "उच्चता" बहाल केली नसतांना उगाचच स्वत:ला उच्च समजत आले त्याची ही शोकांतिका आहे. बाबासाहेबांनी या अशा असंवेदनशील, मानवताविहिन धर्माला लाथ मारून आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्विकारला. तरीही अजुनही सर्व हिंदूंना अक्कल आलेली आहे अशातला भाग नाही.

पण ही झाली एक बाजू. ज्यांनीही बौद्ध धर्म स्विकारला त्यांनी बौद्ध धर्माचे प्रामाणिक आचरण करीत, घटनेने आणि बौद्ध धर्माने दिलेल्या समतेचे, बंधुतेचे आणि स्वातंत्र्याचे तत्व आचरणात आणण्याचा कितपत प्रामाणिक प्रयत्न केला आहे हाही एक प्रश्न आहे. गतकाळातील अन्यायाचा सल नवी क्षितिजे गाठण्यासाठी झेप घ्यायला वापरायचा कि ज्या धर्माला त्यागले आहे त्याला व त्यातील देव-देवतांना  शिव्या घालण्यासाठी नकारात्मक अर्थाने वापरायचा यावर मुलगामी चिंतन शिक्षितांनी तरी करायला हवे होते. नकारात्मकतेतून कोणती मानसिक व बौद्धिक प्रगती होते? प्रश्नच आहे.

सोशल मिडियातून अनेक बौद्धांकडून अथवा बामसेफी विचारांनी ग्रस्त शोषित (बौद्ध नसलेल्या) तरुणांकडूनही हिंदू देव-देवतांची, ब्राह्मण समाजाची यथेच्छ टवाळी करण्याचे सत्र सुरु असते. विशेषकरून हिंदु सणांचा मुहुर्त साधला जातो. बीफचे रसभरित फोटो साइटसवरून फिरू लागतात. हिंदू धर्म वाईट असेल, त्यांच्या देवदेवता अतार्किक असतील, पण हे विसरले जाते कि ८५% अवैदिक बहुजन हिंदुच आहे आणि तो ब-यापैकी धार्मिक असून तो या देवतांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानतो.  त्यांना शिवीगाळ केल्यावर प्रतिवाद करायला फारसे लोक पुढे येत नाहीत कारण त्यातून त्यांनाच शिव्यांचे धनी बनावे लागते. पण त्यांची मानसिकता काय बनत असेल? त्यांच्या मनात एखाद्या समाजाबद्दल प्रेम वढेल कि तिरस्कार? सर्वच बौद्धांना हे पसंत असेल असे मुळीच नाही, पण ते मूक राहिल्याने विचारी बौद्धही त्यांचे समर्थकच आहेत अशी भावना निर्माण झाली तर दोष कोणाचा?

बाबासाहेबांनी हिंदू धर्मावर परखड टीका केली आहे. राम-कृष्णाचीही यथेच्छ चिकित्सा केली आहे. पण त्यात विद्वेषाची भावना कोठेही झळकत नाही. आपल्या प्रकांड विद्वत्तेने त्यांनी या धर्माची व अनेक देवतांची "चिकित्सा" केली आहे. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवणा-यांनी बाबासाहेबांकडून काय घेतले हा एक प्रश्नच आहे. द्वेषरहित चिकित्सेला कोणी आक्षेप घेत नाही. मीही माझ्या परीने राम-कृष्ण-शिव यांची चिकित्सा केली आहे. काही सनातनी सोडले तर कोणाचा आक्षेप नाही. परंतू शिवीगाळ करून, अश्लाघ्य भाषा वापरून आपण एक मोठा गट दुखावतो आहोत, त्यांना आपल्या निकट आनण्याऐवजी दूर ढकलत आहोत याचे भान किती जणांना आहे?

महात्मा गांधींना पुणे कराराबाबत दोषी मानत त्यांनाही शिवीगाळ ही नवी बाब नाही. बामसेफने गेल्या अनेक दशकांत पेरलेले हे विष आहे. भगव्यांना गांधींचे जेवढे वावडे आहे तेवढेच बौद्धांना आहे. पण या दोन गटांच्याही पार असलेला गांधीजींना माननारा अत्यंत मोठा जनसमूह आहे आणि आपण त्यांना नकळत दुखावत जातो याचे भान उरले आहे काय? तोंडदेखले का होईना गांधीजींना आणि बाबासाहेबांना रा.स्व. संघाने प्रात:स्मरणियांच्या यादीत टाकले. आपण लोकभावना दुखावत आपली संघटना वाढवू शकत नाही एवढे कागदोपत्री का होईना भान त्यांना आले. मोदींना महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात वर्ध्यापासुनच करावी लागली. हे भान बौद्ध आणि बामसेफी समुदायाला कधी येणार आहे?

प्रिव्हेन्शन ओफ़ अट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग ही ग्रामीण/शहरी भागातले एक दुखणे बनले आहे हेही एक वास्तव आहे. या दुखण्यातून मानवतावादी माणसेही सुटलेली नाहीत हे डा. लहाणेंच्या प्रकरणातून दिसून येते. ग्रामीण भागात या कायद्याचा उपयोग शस्त्राप्रमाणे केला जातो. जातीसंबंध नसलेल्या किरकोळ भांडणांतही अथवा सूडापोटी या कायद्याचा वापर केला जातो. ब्यकमेलिंग हाही या कायद्याचा दुरुपयोग करण्यामागील  अनेकदा उद्देश्य असतो. अट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग वाढत असल्याबद्दल बहुतेक उच्च न्यायालयांनीही चिंता व्यक्त केली आहे. या कायद्याअंतर्गत अटक झाल्यावर जामीनही मिळत नसल्याने जीही काही अवहेलना व धुळधान वाट्याला येते त्यांच्या मनात काय भावना राहत असतील? आज ग्रामीण भागात जेंव्हाही मी फिरतो, असंख्यांचा या बाबतीतील रोष मी पाहिला आहे, ऐकला आहे. पण याबाबत जाहीरपणे बोलण्याची हिंमत कोणात उरलेली नाही हेही एक वास्तव आहे. हा कायदाच रद्द करावा अशा मागण्या कधी जाहीर तर कधी खाजगीत केल्या जातात."विशिष्ट समुदायांना जातीवादच हवा आहे...म्हणून अशा मागण्या होतात..." असे म्हणून या समस्येतून सुटका कशी होईल?

बरे सर्व प्रश्न मुळातुन जातीयच असतात हे कशावरून ठरवायचे? त्यांना अनेकदा स्थानिक राजकीय अथवा आर्थिक संदर्भ असले तरी त्यांकडे मुळात न पाहता टीआरपी बेस्ड जातीय रूप दिले जाणे अनेकदा घातक ठरते हे विचारी लोकांच्या लक्षात येवू नये काय?

समतेच्या पायावर समाज जवळ यावेत, परस्परांबद्दल आस्था आणि सहकार्यभाव वाढावा हे खरे तर आजच्या समाजव्यवस्थेला ठिकाणावर आनण्यासाठी गरजेचे आहे. द्वेषातून द्वेषच निर्माण होतो. भगवान बुद्धाने अज्ञान, वासना आणि द्वेषाला तीन विषे म्हटलेले आहे. हिंदू धर्मियांनी वंचितांचा द्वेष केला हे एक वास्तवच आहे. पण आपल्या पापाची बोच म्हणून का होईना ते बदलत असतांना त्यांचा द्वेष करून त्यातून पुन्हा नवीन द्वेष जर निर्माण होणार असेल तर ते धोकेदायक नाही काय?

भगवान बुद्धाची, बाबासाहेबांची विचारसरणी आचरत अन्य सर्वच समाजांसमोर आदर्श ठेवणे अधिक श्रेय:स्कर नाही काय?

कोणीही कोणावर अन्याय करणे, अत्याचार करणे हे वाईटच आहे. त्याचा निषेध सर्वच करताहेत. पण घटनेमागील वास्तव त्या घटनेपुरते, त्या घटनेत सामील असलेल्यांच्या जातीपुरते मर्यादित असते काय? एखाद्या विशिष्ट समुहाच्या व्यक्तीची हत्या अथवा अत्याचार हे एकुणातीलच द्वेषप्रक्रियेचे रुपांतर असू शकते. संपुर्ण समाजात सूप्त पातळीवर जे मतप्रवाह असतात, खतपाणी घालून वाढवले जातात त्या प्रवाहांची दखलही घ्यावी लागते. घटनेला वेगळे काढून तिचे विश्लेशन होऊ शकत नाही. हा आपला सामाजिक प्रश्न बनला आहे. तो सोडवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. आत्मपरिक्षण न करता शस्त्रे परजून कोणी त्यावर उत्तर शोधू पाहिल तर त्यात सर्वांचाच विनाश आहे!

Sunday, May 4, 2014

शोध बुद्धअस्थी-धातुंचा…

By on May 4, 2014
feature size
भगवान बुद्धांच्या महानिर्वाणानंतर ते आजतागायतपर्यंत त्यांच्या रक्षा-अस्थी पूजनीय राहिल्या असल्या तरी जवळपास २६०० वर्षं या रक्षा-अस्थींचा प्रवास अत्यंत रोचक आणि अनेकदा गहन असा राहिलेला आहे. तथागतांच्या रक्षा, अस्थी ते त्यांच्या नित्य वापरातील वस्तुंनी जवळपास अर्ध जग पादाक्रांत केलेलं आहे. तथागतांच्या रक्षा-अस्थींचं चौर्य ते त्यातील काही अवशेषांचा विनाश करण्याचे प्रयत्नही अनेकदा झालेले आहेत. कंबोडियातही अलीकडेच बुद्ध अस्थींची चोरी झाली होती. अर्थात चोरांना शिताफीने पकडण्यात आलं. बुद्धाच्या म्हणून बनावट अस्थी-रक्षाही पुरातत्व वस्तुसंग्राहकांत सतत चर्चेत राहिल्या आहेत. सुरक्षित असं भव्य स्तूप बांधण्याची सुरुवात सम्राट अशोकाने सुरू केली असली आणि नंतर ती पद्धत श्रीलंका, ब्रह्मदेश, तिबेट, चीन ते पार कंबोडियापर्यंत पसरली असली तरी अशोकपूर्व काळातील स्तूप नेमके कोठे आणि कसे होते याबाबत विद्वानांत चर्चा आणि वाद आहेत.

भारतातील पुरातन श्रमण परंपरेत श्रमणाच्या मृत्युनंतर श्रमणाला बठ्या ध्यानस्थ अवस्थेत पुरण्याची आणि त्यावर मातीचा गोलाकार ढिग उभारण्याची प्रथा बुद्धपूर्व काळातही होती. या उंच ढिगाला प्राकृत भाषेत ‘थूप’ असं म्हटलं जाई. याचंच नंतरचं संस्कृतीकरण म्हणजे ‘स्तूप’. या स्तुपांत कलात्मकता नसे. बौद्ध वाङमयावरून पूर्वबुद्धांचेही स्तूप होते असे उल्लेख मिळतात. या काळातील स्तुपांचे स्वतंत्र अवशेष सापडले नसले तरी पिपरावा (जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) इथे १८९८ मध्ये सापडलेल्या स्तुपाखाली अजून एक स्तुपाचे जे अवशेष मिळाले आहेत त्यावरून किमान बुद्धकाळातील स्तुपांची कल्पना येते.

आज स्तूप या शब्दाचा एकमेव अर्थ आहे तो म्हणजे भगवान बुद्धाची रक्षा आणि अस्थी यांचं जतन करण्यासाठी, त्यामार्फत बुद्धाचं अस्तित्व वर्तमानातही जाणवण्यासाठी बांधलेली गोलाकार घुमटाकार वास्तू. पहिला स्तूप भगवान बुद्धाच्या जीवितकाळातच झाल्याचे संकेत मिळतात. मगधाचा राजा बिंबीसार हा भगवान बुद्धाचा शिष्य होता हे सर्वांना माहीतच आहे. त्याची राजधानी राजगृह इथे तथागत आले असता बिंबीसाराच्या पत्न्या कोसलादेवी, क्षेमा आणि छेल्लना त्यांचं दर्शन घ्यायला गेल्या होत्या. त्यावेळीस भगवान इथे नसले तरी त्यांचं दर्शन सतत मिळावं म्हणून तिघींनीही तथागतांचे केस आणि नखं मागितली आणि त्यावर आपण स्तूप उभारू असं सांगितलं. तथागतांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. हा स्तूप राजगृहात बांधला गेला असावा.

भगवान बुद्धांचं परिनिर्वाण कुशीनारा इथे वैशाखी पौर्णिमेला इसवी सनपूर्व ४८३ मध्ये झालं. परिनिर्वाणानंतर तथागतांचा देह सुशोभित करून सातव्या दिवशी कुशीनाराच्या पूर्वेला असलेल्या मुकूटबंधन या ठिकाणी तथागतांचे अग्नीसंस्कार केले गेले. त्यांची रक्षा आणि अस्थी गोळा करण्यात आल्या आणि त्या एका सभागारात ठेवून त्यांच्या रक्षनासाठी कुशीनाराचे स्वतः सशस्त्र मल्ल कोट करून राहिले. बुद्धाच्या परिनिर्वाणाची वार्ता तोवर सर्वत्र पसरली होती. स्तुपांसाठी त्यांच्या अस्थी आणि रक्षेसाठी सर्वप्रथम अजातशत्रूने मागणी केली. तोवर शाक्य, लिच्छवी, कोलीय, पावा इत्यादी गणराज्यांतूनही मागण्या यायला लागल्या. यावर संघर्ष नको म्हणून द्रोण नावाच्या एका ब्राह्मणाने रक्षा आणि अस्थींचे आठ भाग करून सर्वांना द्यावे असा सल्ला दिला. त्याप्रमाणे रक्षा-अस्थींचं वाटप झालं. कलह टळला. वेगवेगळ्या नगरांत आठ ठिकाणी स्तूप बनवले गेले.

पण महास्तूपवंशानुसार पुढे ‘महाकश्यपाने अजातशत्रूला सांगितलं की या सर्व अस्थी परत आण आणि त्या एका ठिकाणी गुप्तपणे ठेवून दे. अजातशत्रूने सर्वांकडून रक्षा-अस्थी पुन्हा एकत्रित करून एकात दुसरी बसतील अशा आठ चंदनाच्या पेट्यातील सर्वात आतल्या पेटीत अस्थी ठेवल्या आणि त्याने त्या राजगिरच्या बाहेर एका स्तुपात ठेवल्या. चंदनी पेटीवर त्याने सुवर्णाचं पान बसवलं आणि त्यात भविष्य लिहिलं की पुढे राजपुत्र प्रियदर्शी अशोक म्हणून हे उघडेल आणि सर्वांमध्ये वाटेल.’ या कथेतील ऐतिहासिकता किती (विशेषतः भविष्यवाणीमुळे) हा जरी विवादास्पद मुद्दा असला तरी मुळचे स्तूप कोणते हे आज आपल्याला माहीत नाही हे वास्तव आहे. पिपरावा येथील स्तूप मात्र मुळच्याच एका स्तुपावर उभारला गेलेला नवीन स्तूप असावा असं अनुमान करता येईल एवढे पुरावे सुदैवाने मिळाले आहेत.

बुद्धाचं महापरिनिर्वाण ते सम्राट अशोकाचा बौद्ध धर्माचा अनुयायी म्हणून उदय यात किमान अडिचशे ते पावणेतीनशे वर्षांचं अंतर आहे. या प्रदीर्घ काळात सुरुवातीला बुद्ध अस्थी-रक्षेचं आणि त्यावरील स्तुपांचं संरक्षण बौद्ध भिक्खुंनी केलं असलं तरी पुढे त्यावर अवकळा आली असावी आणि ते स्तूप विस्मृतीत गेले असावेत असं महास्तूपवंशातील वृत्तांतातील अतिशयोक्ती बाजूला काढली तर स्पष्ट होतं. त्यानुसार सम्राट अशोक हा बुद्धानुयायी झाल्यानंतर त्याने ८४००० स्तूप उभारायचं ठरवलं. पण त्यासाठी बुद्ध अस्थी-रक्षा मिळवण्यासाठी त्याला बरेच प्रयत्न करावे लागले, स्तुपांच्या मुळच्या जागा शोधण्यासाठी जुन्या-जाणत्यांची मदत घ्यावी लागली. सम्राट अशोकाने सांची, सारनाथसारखे असंख्य स्तूप त्याच्या साम्राज्यात, सुदूर अफगाणिस्तानपर्यंत उभारले. धम्मप्रचारकांमार्फत काही अस्थी-धातू श्रीलंका, ब्रह्मदेश ते चीनपर्यंत पाठवण्यात आले. बृहद्भारतातील स्तूप (आणि अस्थी-धातू) जोवर बौद्ध धर्म जोमात होता तोवर सुरक्षित राहिले. अनेक चीनी प्रवाशांनी आपल्या प्रवासवर्णनांत भारतात हजारो स्तूप असल्याचं नोंदवून ठेवलं आहे. परंतु नंतर मात्र अवकळा आली. स्तुप, विहार, लेणी जवळपास हजार वर्षं पार विस्मरणात गेले. इतकंच काय अनेक मूळ गांवं-नगरंही नष्ट झाली अथवा त्यांची कालौघात नांवंही बदलली गेली. १८१८ नंतर मात्र ब्रिटिश, जर्मन पुरातत्वविदांनी एकामागून एक उत्खननं करत अनेक स्तूप प्रकाशात आणले. अवशेषग्रस्त स्तुपांत ठेवण्यात आलेले अस्थीधातू दिल्ली, कोलकता आणि पटनासारख्या शहरांतील पुरातत्व संग्रहालयांत हलवण्यात आलं. या प्रकारात अनेक गफलतीही झाल्या. सारनाथ येथील उत्खनन तेथील राजा चैतसिंग बेनारस यांचे दिवान जगत सिंग यांनी केलं होतं. त्यांना हिरव्या रंगाच्या संगमरवराच्या पेटीत अस्थी-धातू आढळून आले. पण इतिहासाचं ज्ञान नसलेल्या जगत सिंगाने ते अस्थीधातू गंगेत विसर्जित केले. ती संगमरवरी पेटी मात्र कोलकात्याच्या संग्रहालयात पोहोचली.

श्रीलंकेत भगवान बुद्धाचा दात कसा पोहोचला याच्या अनेक थरारक दंतकथा असल्या तरी तो बहुदा अशोकाने पाठवलेल्या धम्मप्रचारकांनी तिथे नेला असावा. पोर्तुगिजांनी (१५६१) आधी अनुराधपूर येथील स्तुपात ठेवलेला दात पन्नास हजार पौंडांच्या बदल्यात मागितला. तो न मिळाल्याने बराच संघर्ष झाला. हा दात आता क्यंडी येथील स्तुपात संरक्षित ठेवला असला तरी ‘रेलिक्स ऑफ बुद्धा’ या ग्रंथात सुरुवातीलाच पुस्तकाचे लेखक जॉन एस. स्ट्राँग  पुराव्यानिशी सांगतात की पोर्तुगिजांनी हा दात श्रीलंकेवरील चढाईत ताब्यात घेतला आणि गोवा इथे तेथील आर्च बिशप डॉन ग्यास्पर  याच्या हट्टामुळे नष्ट करण्यात आला. यामागे अर्थात परधर्म विद्वेशाची भावना होती.

बुद्धांच्या अस्थीधातुच्या इतिहासात एक रोमांचक रहस्यमय प्रकरणही घडलं आहे. पिपरावा (जि. सिद्धार्थपूर, उ.प्र.) इथे १८९८ साली खोदकाम करताना तेथील इस्टेट मॅनेजर विल्यम पेपे याला भूमिगत एक दगडी पेटी सापडली. त्यात त्याला कुंभांत ठेवलेले अस्थी अवशेष आणि १६०० रत्नं आणि चांदी-सोन्याची फुलं सापडली. एका भांड्यावर अज्ञात लिपीत लिहिलेला मजकूरही त्याला दिसला. त्याने तो डॉ. अँटोन फ्युहर या जर्मन पुरातत्वविदाकडून वाचून घेतला… त्यावर ब्राह्मी लिपीत ‘या शाक्यमुनी बुद्धाच्या अस्थी आहेत…’ असा मजकूर लिहिल्याचं आढळलं. इतिहासातील ही एक रोमांचक घटना… पण अन्य पुरातत्वविदांनी या अवशेषांवर आणि मजकूरावरही ते संशयास्पद आणि बनावट असल्याचे आक्षेप घेतले. वादात न पडण्यासाठी इंग्रज सरकारने सापडलेले अस्थी-धातू सयामचा राजा राम (पाचवा) यास एक राजनैतिक चाल म्हणून बहाल करून टाकले आणि रत्नं आणि भांडी कोलकता संग्रहालयात पाठवून दिली. पुढे जवळपास शंभर वर्षांनी यावर पुन्हा संशोधन झालं आणि ते अवशेष आणि लेखन बनावट नसून अस्सलच असल्याचं सिद्ध करण्यात आलं. तिथे उत्खननात स्तुपच सापडला आणि त्याखालीही जुना स्तूप असल्याचंही उघडकीला आलं.

या शतकात पाटण्यातील के. पी. जयस्वाल इन्स्टिट्यूटकडून १९५८ आणि १९८१ मध्ये वैशाली येथील स्तूप भागात उत्खनन करण्यात आलं होतं. त्यावेळी आणखी एक मंजुषा (हिरव्या रंगाची संगमरवरी पेटी) सापडली. त्यातदेखील भगवान बुद्ध यांच्या अस्थी आढळून आल्या. त्या सध्या पाटणा येथील संग्रहालयात आहेत. हे उत्खनन ए. एस. अल्तेकर यांच्या देखरेखीखाली झालं होतं. ब्रिटिश कालखंडात नागार्जुनकोंडा येथील कुली काम करणार्या एका व्यक्तिला भांडं सापडलं होतं. त्यामध्येही अस्थींचा काही भाग होता. त्याचं परीक्षण करण्यात आल्यानंतर त्या भगवान बुद्ध यांच्या अस्थी असल्याचं स्पष्ट झालं होतं.

बुद्धाच्या अस्थीधातूचा इतिहास पाहता बव्हंशी अस्थीधातू भारतातीलच ज्ञात-अज्ञात विहारांत असल्याचं दिसतं. पुरातत्वीयदृष्ट्या हा मोलाचा ठेवा असल्याने त्याचं जतन करण्याची जबाबदारी सर्वस्वी पुरातत्व विभागाची आहे. भारतात सापडलेल्या अस्थीधातू सध्या दिल्ली येथील पुरातत्वखात्याच्या ताब्यात आहेत. त्या बुद्ध स्तुपांमध्ये ठेवल्या जाव्यात यासाठी ३०-३५ वर्षं बौद्ध धर्मनेत्यांचे प्रयत्न असले तरी त्यात अजून यश मिळालं नाही. पण आपल्या अस्थी स्तुपामध्ये ठेवाव्यात, अशी खुद्द भगवान बुद्धांचीच इच्छा होती आणि सुखी आयुष्याचा मंत्र देणार्या बुद्धांच्या अस्थी प्रदर्शनासाठी नसून त्या पूजनासाठी आहेत, असं विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका यांचं म्हणणं होतं.

अशा परिस्थितीत कोणीही व्यक्ती त्या अस्थी आपल्या ताब्यात असून प्रदर्शन भरवत असेल तर तो भावना दुखावण्याचा आणि फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे.
- संजय सोनवणी

Friday, May 2, 2014

महाराजा यशवंतराव : एक मुल्यमापन


    आपण यशवंतराव होळकरांचा एकुण जीवनप्रवास पाहिला आहे. असा थरारक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्द्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेत्रुत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रुशी दुर्दांत क्रुरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.

     यशवंतरावांना राज्य सोडा साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिलालेली नाही. ते त्यांना भिल्ल-पेंढारी व पठानांच्या स्वत: उभारलेल्या अल्प सैन्याच्या जीवावर प्रशिक्षीत पलटनींशी लढुन मिळवावी लागली. त्यांनी शिंदे-पेशव्याच्या घशातुन जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केलेत. एवढेच काय पण शिंद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढुनच मुक्त केले. गादीचा खरा वारसदार खंडेरावाला मुक्त करण्यासाठी आयुष्य पणाला लावले. त्यांना स्वत:ला ईंदोरी गादीची हाव कधीच नव्हती हे त्यांच्या सर्व कृत्यांवरुन सिद्ध होते. आणि हे सर्व प्रांत त्यांनी जिंकलेले होते. एका अर्थाने त्यांनी संपुर्णपणे नव्याने राज्याची पायाभरणी केली होती. शिवरायांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहनारा, स्वत:हुन एकही तह कोनाशीही न करनारा हा एकमेव महायोद्धा होता.

    दौलतराव शिंद्यांनी व पेशव्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर आपत्तीमागुन आपत्ती कोसळवल्या. दुसर्या मल्हाररावांचा खुन केला. यशवंतराव व विठोजीरावांना कोवळ्या वयात आश्रयासाठी वनवण भटकावे लागले. रघोजी भोसलेनेही विश्वासघात केला. त्या क्षणापासुन यशवंतरावांचे जीवन पुर्ण पालटलेले दिसते. त्यांनी स्वत: आपला मार्ग निर्माण केला, स्वत:च स्वत:चे नियम बनवले आणि आपली अविरत वाटचाल सुरु ठेवली.  

    पेशव्याकडे व दौलतरावाकडे त्यांच्या सतत त्याच मागण्या होत्या...खंडेरावाला व होळकरी परिवाराला मुक्त करा, होळकरी प्रांतांवरेल जप्तीचे हुकुम मागे घ्या, दौलतरावांशी समेट करुन द्या. खरे तर तोवर त्यांची स्वत:चीच शक्ती एवढी वाढली होती कि पेशव्यांवर आक्रमण करुन पेशवाई बुडवुन ते आपल्याला हवे ते साध्य करु शकत होते. पण त्यांनी पेशव्यांच्या मसनदीचा, त्यांच्या सर्वोच्च अधिकारांचा नेहमीच आदर ठेवला. पेशव्याने त्यांचा थोरला भाउ विठोजीरावाला अत्यंत क्रुरतेने ठार मारले. कट्तर शत्रुलाही कोणत्याही राजसत्तेने अशी शिक्षा दिलेली नाही, तरीही संतापच्या भरात आततायी क्रुत्य करने त्यांनी टाळले. तत्पुर्वी शिंद्यांनी मल्हारराव (दुसरा) या सावत्रभावाचीही हत्या केली होती. पेशवे नव्हेत तर शिंदे हेच आपले शत्रु आहेत एवढीच खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली. हडपसरच्या युद्धात त्यांनी स्वत: ऐन जंगेत उतरुन जो पराक्रम गाजवला त्याचे त्यांचा कट्टर शत्रु मेजर माल्कमही करतो. खरे तर पेशव्याने यशवंतरावांच्या पराक्रमाचा दौलतीसाठी उपयोग करण्याची थोडीतरी दुरद्रुष्टी दाखवली असती तर इंग्रजांचे राज्य या देशात कदापि आले नसते हे आपण यशवंतरावांनी एकट्याच्या जीवावर इंग्रजांशी जी युद्धे केली-जिंकली त्यावरुन सहज स्पष्ट होते.

    त्यांनी पुणे जाळले-लुटले हा धादांत खोटा आरोप करुन पुणेकर सनातन्यांनी त्यांना महाराष्ट्रात पुरते बदनाम करुन टाकले. अगा जे घडलेच नाही त्याच्या खोट्या रसभरीत कहान्या बनवल्या गेल्या. पेशवा पळुन गेला. त्याला परत आणायचा यशवंतरावांनी पराकोटीचा आटापिटा केला....पण पेशवा पेशवाई इंग्रजांना विकुन बसला. एवढे होवुनही यशवंतरावांनी कोठेही पेशव्यांबद्दल कटु उद्गार काढलेले नाहीत ही बाब यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वावर वेगळाच प्रकाश टाकते. पण पुणेकरांनी त्यांची गणना "प्रात:काळी ज्यांची नावे घेवू नयेत" अशा त्रयीत करुन टाकली. बंडवाला होळकर...होळकरी दंगा असे शब्दप्रयोग वापरले. लाखावरच्या सैन्याचा अधिपती, स्वतंत्र सार्वभौम राजाला त्यांनी बंडखोर-दंगेखोर ठरवले. मराठीत यशवंतरावांवर फारसे का लिहिले गेले नाही, जेही लिहिले गेले ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्यांची बदनामी करणारेच का होते या प्रश्नांची उत्तरे आपल्याच आजही भिषण असलेल्या व्यवस्थेत आहेत यात शंका बाळगायचे कारण नाही.

    वसईचा तह झाल्यानंतर इंग्रजांच्या आसुरी आकांक्षांचा अंदाज आलेला हा पहिला भारतीय शासक. शिंदेंशी परंपरागत हाडवैर असुनही, त्यांनी होळकरांचे एवढे अपराध केले असुनही त्यांनी शिंदेंना व भोसलेंना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्याचे पराकोटीचे प्रयत्न केले.  शिंदेंनी काय केले तर होळकरांच्याच नाशाच्या योजना आखल्या. जर नर्मदेच्या तीरी हे शिंदे व भोसले मनात कपट न ठेवता होळकरांची साथ देत तिघे इंग्रजांविरुद्ध सर्वकश लढा देते तर? यशवंतराव दिल्लीवर चालुन गेले तेंव्हाच भोसले यशवंतरावांच्या सुचनेनुसार खरेच कलकत्त्यावर चालुन जाते तर? किंवा आपापल्या बळावर इंग्रजांशी सुनियोजित लढा देते तर? पण तसे झाले नाही. यशवंतरावांतील धगधगते राष्ट्रप्रेम आणि इंग्रजांचा खरा धोका त्यांना समजलाच नाही. त्याची परिणती त्यांच्याच अवमानास्पद पराभव व मांडलिकत्वाच्या तहांत झाली.

    यशवंतरावांच्या दुरद्रुष्टीला दाद देत असता या करंट्या सरदारांच्या आत्मघातकी क्रुत्यांबाबत कोणालाही रोष वाटने स्वाभाविक आहे.
   
    यशवंतरावांची युद्धनीति इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहीली. गनीमी कावा हा फक्त पहाडी प्रदेशांत उपयुक्त असतो हे खोटे आहे हे त्यांनी मल्हाररावांपाठोपाठ सिद्ध करुन दाखवले. मोन्सनचा भिषण पराभव हा गनीमी काव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युद्धशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषन व्हायला हवे. आधी शत्रुला आपल्या मागे आणुन, मग त्याला उलटे पळायला लावुन, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवुन भर पावसाळ्यात गाळाच्या जमीनीत त्याची फजीती करत, तब्बल २५० मैल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत नेत कसे संपवावे याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारापेक्षा अधिक सैन्य ठार झाले...

    यामुळेच अनेकदा अनेक इंग्रज इतिहासकार यशवंतरावांवर क्रौर्याचा आरोप करतात. हे खरे आहे कि यशवंतरावांनी युद्धात शत्रुच्या भिषण कत्तली केल्या. मग युद्धे असतात कशासाठी? लुटुपुटीची युद्धे करुन शत्रुला सन्मानपुर्वक जीवंत घरी धाडण्यासाठी? यशवंतरावांचे युद्ध धोरण शक्यतो आक्रमकच असे. ते तसेच असते तरच विजय मिळतात. कर्नल फोसेटवर त्यांनी इशा-याची लढाई केली त्यातही त्यांनी त्याच्या दोन पलटनी कापुन काढल्या. त्यामुळे इंग्रज वचकला. कधी आक्रमक व्हायचे, कधी शत्रुला सावकाश जेरीस आणत मग संपवायचे, कोठे युद्ध टाळायचे याचे त्यांचे स्वत:चे आडाखे होते आणि ते बव्हंशी यशस्वी झालेले आहेत. यशवंतरावांच्या या आक्रमकतेचा व कथित क्रौर्याचा फटका सामान्य मानसाला बसल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळेच आजही उत्तर भारतात यशवंतरावांचे पवाडे गायले जातात.

    "हिंदवाणा हलको हुवा
    तुरका रहयो न तत
    अग्र अंगरेजा उछल कियौ
    जोखाकियौ जसवंत..."
    (हिंदुस्तानचा एकमेव रक्षक आता राहिला नाही. हिंदु समाजाचे बळ तुटले आहे. मुस्लिम बादशहाचे बळ तर पुर्वीच तुटले होते. यशवंतरावांच्या देहांतामुळे इंग्रज बेहद्द खुष झाले आहेत.) असे कवि चैन सांदुने यशवंतरावांच्या म्रुत्युनंतर लिहिले, यावरुन उत्तर भारतात या पहिल्या स्वातंत्रयोद्ध्याचा केवढा सन्मान आहे याची मराठी वाचकांना कल्पना यावी.

    खरे तर इंग्रजी सैन्य हे त्यांच्या सैन्यापेक्षा खुप प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. भारतातच काय फ्रांसमद्धे नेपोलियनलाही धुळ चारणारे हे ईंग्रजी सैन्य. त्यात इंग्रजांनी यशवंतरावांवर कोण सोडला तर जनरल जेरार्ड लेक...अत्यंत अनुभवी आणि कडवा सेनानी. त्याला यशवंतरावांनी भरतपुरच्या युद्धात धुळ चारली. त्याचा पराभव हा इंग्रजांच्या जिव्हारी लागणारा होता. जनरल स्मिथ, कर्नल मोन्सन, मरे, फोसेटसारख्या दिग्गजांचा पराभवही यशवंतरावांनी लीलया केला. याचे कारण म्हनजे यशवंतरावही आधुनिकतेचे भोक्ते होते. इंग्रजांएवढी नसली तरी त्यांच्या सैन्याला त्यांनी पाश्चात्य शिस्त लावली होती. पेंढा-यांसारख्या तशा बेशिस्त आणि बेबंद सैन्यालाही त्यांनी आपल्या कडव्या शिस्तीच्या जोरावर कह्यात ठेवले होते. उज्जैन व पुण्यावरील मोठ्या विजयानंतरही त्यांनी पेंढा-यांना शहरे लुटु दिली नाहीत. ज्यांनी प्रयत्न केले त्यांना हातपाय तोडायच्या शिक्षा दिल्या. इंग्रजांनीही त्यांच्या या कठोर शिस्तप्रियतेचे कौतुक केले आहे. या उलट अन्य सरदारांच्या सैन्यातील पेंढा-यांचे वर्तन होते. खुद्द दौलतरावांच्या सैन्यातील पेंढा-यांनी पुणे, पुण्याचा परिसर ते पेशव्यांच्या अखत्यारीतील महाराष्ट्र किती निर्दयतेने लुटला याची अंगावर शहारा आनणारी वर्णणे माल्कमनेच केलेली आहेत. पेंढारी त्यासाठीच कुप्रसिद्ध होते. पण यशवंतरावांनी त्यांच्या या वृत्तीवर कठोरपणे लगाम घालत त्यांच्या पराक्रमी प्रव्रुत्तींचा पुरेपुर उपयोग करुन घेतला यातच त्यांच्या सैन्यव्यवस्थापन क्षमतेची चुणुक दिसते.

    इंग्रजांनी यशवंतरावांना सतत लुटारु व दरवडेखोर-बंडखोर असे उल्लेखुन बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ती इंग्रजांची जुनीच रीत आहे. शिवरायांनाही ते लुटारुच म्हणत असत. स्वाभाविक आहे. शत्रुची बदनामी करण्याची संधी कोणी सोडत नाही. पण वास्तव हे आहे कि यशवंतरावांनी शत्रुंकडुन रीतसर खंडण्या वसुल केल्या. ज्यांनी नकार दिला त्यांच्याच विभाग-महालांची लुट केली. पण असे करत असतांना त्यांनी हात लावला तो फक्त श्रीमंतांना. सामान्यांना नाही अन्यथा उत्तर भारतात त्यांचा जनमानसात सन्मान राहिला नसता. भवानी शंकर खत्रीने त्यांच्याशी गद्दारी केली तर त्यच्या हवेलीला आजही "निमकहरामकी हवेली" असे म्हटले नसते.  सैन्य पोटावर चालते आणि त्याचा खर्च हरलेल्यांकडुन वसुल करण्याची जुनी रीत आहे. अगदी आजही ती चालु आहे. दुस-या महायुद्धानंतर अमेरिकेने जपान ते जर्मनीवर ज्या जबरी खंडण्या लादल्या तो इतिहास तर अगदी अलीकडचाच आहे.

    शत्रुला बदनामच करायचे झाले कि कोणतेही कारण पुरते याचे हा आरोप म्हनजे एक नमुना आहे यापलीकडे त्याला महत्व देण्याची आवश्यकता नाही.

    तत्कालीन हिंदवी राज्यकर्त्यांमद्धे आस्तित्वातच नसलेले यशवंतरावांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना उमगलेली राष्ट्रभावना. १८५७चे बंडही जे झाले ते स्वत:ची संस्थाने सुरक्षीत ठेवण्याकरता. राष्ट्रासाठी नाही. दुस-या बाजीरावाला फक्त आपल्या गादीची पडली होती. निजाम, टिपु, बडोद्याचे गायकवाड, उत्तरेतील शिख महाराजे, नबाब, रजपुत राजे हे सर्वच आपापल्या संस्थानांपुरते पहात होते आणि त्यामुळेच ते इंग्रजांचे मांडलिक/अंकितही बनत गेले. पण यशवंतरावांसमोर फक्त स्वत:चे राज्य कधीच नव्हते...तर संपुर्ण देश होता. त्यासाठी ते सर्व राजेरजवाड्यांना, शिंदे-भोसलेंना जी पत्रे धाडत होते त्यातील राष्ट्रीयता दाहक आहे. ते पत्रांत म्हणतात..."पहिले माझे राष्ट्र, माझा देश. आज धर्म, जात, प्रदेश याच्यापलीकडे जावून देश-राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे. माझ्यासारखेच तुम्हा सर्वांना इंग्रजांविरुद्ध संघर्षाने युद्धास उभे राहीले पाहिजे. " पुढे यशवंतराव भोसलेंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "पुर्वी स्वराज्यात ऐक्यता बहुत. येणे करोन आजपावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता...." स्वराज्याची आठवण करुन देत यशवंतराव पुढे तेच स्वराज्य घरापुरते करण्यात जमीनदार ते सरदार कसे गर्क झाले आहेत ही कटु वस्तुस्थिती विषद करत खंत व्यक्त करतात.

    एक राष्ट्र, परकियांची हकालपट्टी व एतेद्देशियांचा अम्मल हेच त्यांच्या संघर्षामागील खरे आणि एकमेव कारण आहे. आणि १८०३ ला त्यांनी सुरु केलेला हा संघर्ष मुळात स्वत:साठी नव्हताच कारण त्यांचे स्वत:चे राज्य सुरक्षीत होतेच. त्यांनी उत्तरेत १८०३ पासुन ज्या मोहिमा केल्या त्या सर्वस्वी अन्य राजसत्तांना जागे करत इंग्रजांविरुद्ध बळ एकवटवण्यासाठी. त्यांनी ज्याही १८०३ नंतर लढाया केल्या त्या सर्वच्या सर्व इंग्रजांविरुद्धच्या आहेत, एतद्देशियाविरुद्ध एकही नाही हेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. या सर्व लढायांत-युद्धांत ते अजिंक्य राहिले आहेत हेही उल्लेखनीय आहे.

    माल्कम म्हणतो ते खरेच आहे. यशवंतरावांत एक अद्भुत चैतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहित नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळुनही त्यांनी मनाचे संतुलन ढळु दिले नाही. त्यांच्या स्वता: मैदानात सैनिकांच्या खांद्याला खांदा लावुन लढण्याच्या व्रुत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरुन लक्षात यावे. खरे तर नेपोलियनच यशवंतरावांपासुन तर शिकला नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो...कारण यशवंतराव आधी झाले...नेपोलियन पाठोपाठ. वाटर्लूचे युद्ध १८१५ मद्धे झाले. आणि भारतात अनेक फ्रेंच तेंव्हा तत्कालीन राजकीय व सामरीक घटनांची नोंद घेत होते व त्या आपल्या मायदेशी कळवत होते. त्यातून नेपोलियन काही शिकलाच नसेल असे म्हणता येत नाही. या युद्धात भरतपुरच्या युद्धातील काही सेनानी नंतर सामील झाले होते. तेही म्हणतात भरतपुर वाटर्लूपेक्षा अवघड होते. हीच यशवंतरावांना जागतीक योद्ध्यांनी दिलेली सलामी आहे.

    यशवंतराव हिंदु धर्माचे अभिमानी जरी  असले तरी त्यांनी अन्यधर्मियांचा दुस्वास केल्याचे एकही उदाहरण नाही. अमिरखानाला तर ते सगा भाई मानत असत. अक्षरश: हजारोंचे मुस्लिम सैन्य त्यांच्या पदरी होते. फ्रेंच-इंग्रज असे ख्रिस्ती सेनानी व सैनिकही त्यांच्या पदरी होते. त्यांच्या सैन्यात भिल्लांसह सर्व जातींचे लोक होते. दरबारात ब्राह्मण कारभारी होते. स्त्रीयांबाबत त्यांची भुमिका उदार होती. आपली कन्या भिमाबाई हीस त्यांनी घोडेस्वारी ते सर्व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले तसेच लिहायला-वाचायलाही शिकवले. तत्कालीन सामाजिक स्थितीत राजे-रजवाड्यांच्या स्त्रीया या जनानायात पर्दानशीन वा घुंघटात असायच्या. महाराणी तुळसाबाईंनाही त्यांनी आवश्यक ते शिक्षण दिले होते त्यामुळेच यशवंतरावांनंतर त्या राज्यकारभार पाहु शकल्या. इंग्रजांना अखेर त्यांचा खुनही गफुरखानाला विकत घेवुनच करावा लागला. त्यांचा खुन करण्याचे एकमेव खरे कारण म्हनजे त्या जीवंत असता आपल्याला होळकरी राज्य गिळता येणार नाही याची त्यांना पटलेली खात्री.

    यशवंतरावांची शिस्त कठोर होती. आपले इंग्रज अधिकारी फितुर झाले आहेत हे कळताच त्यांनी त्यांना देहांत शासन दिले.

    यशवंतरावांचे सर्वात मोठे आणि शिवरायांनंतरचे अद्वितीय कार्य म्हणजे त्यांनी ६ जानेवारी १७९९ रोजी करुन घेतलेला राज्याभिषेक. या राज्याभिषेकाची कधीच चर्चा होत नाही. यशवंतरावांना पेशव्याने अधिक्रुत कधीच राजवस्त्रे दिली नाहीत. तरी लोकमान्यतेसाठी व अन्य सरदारांनी आपले महत्व जाणावे व आपल्या कार्यात साथ द्यावी म्हणुन त्यांनी राज्याभिषेक करुन घेतला. एका धनगराचा आधुनिक काळातील हा एकमेव राज्याभिषेक. त्याचे ऐतिहासिक व समाजशास्त्रीय मोल अद्याप आपल्याला समजावयाचे आहे.

    यशवंतरावांना हिंदी, पर्शियन, उर्दु, मराठी व संस्क्रुत भाषा येत असत हे वेगवेगळ्या ठिकाणी माल्कमनेच नोंदवुन ठेवले आहे. ते स्वत: सर्वच शस्त्रास्त्रे उत्तम रित्या चालवत असत. बंदुकीवर त्यांचे विशेष प्रेम होते. एकदा नेमबाजीचा सराव करत असता तोडा फुटुन झालेल्या स्फोटात त्यांचा उजवा डोळा जायबंदी झाला होता. नंतरही त्यांचे बंदुकप्रेम कधी कमी झाले नाही. भालाफेकीत तर त्या काळात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता असे माल्कमने गौरवाने नोंदवले आहेच. ते स्वत: उत्तम हिशेबतपासनीस होते त्यामुळे महसुल-खंडणी वसुल्यांत कारकुन त्यांची फसवणुक करण्याची शक्यता नसे. तोफांच्या कारखान्यात स्वत: तोफा ओतण्याचे कामही त्यांनी केले यावरुन त्यांची द्धेयावरची अथांग श्रद्धा सिद्ध होते.

    आता प्रश्न असा उपस्थित राहतो कि बाजीराव पेशव्यांनी दौलतराव शिंदेंच्या एवढे कह्यात जावुन यशवंतरावांचा एवढा दुस्वास का करावा? यशवंतरावांच्या उत्तरेतील पराक्रमाच्या वार्ता कानावर येत असता त्यांचा उपयोग दौलतीसाठी का केला नाही? हे महत्वाचे प्रश्न आहेत व या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. कारण पेशवाईच्या अस्तामागे पेशव्यांचे यशवंतरावांबाबतचे चुकलेले धोरण आहे हे तर उघड आहे.

    इतिहासावरुन तीन गोष्टी ठळक होतात त्या अशा:

    १. मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर महादजी शिंदेंचे प्रस्थ पुणे दरबारात वाढले. त्यांच्यानंतर आलेल्या दौलतरावाने तेच स्थान कायम ठेवण्याचा सर्वस्वी प्रयत्न केला. पेशव्याला आपल्या अंकित ठेवण्याचा सतत प्रयत्न केला, इतका कि त्यामुळे वैतागलेले  पेशवे स्वत: शिंदेंचे वर्चस्व झुगारण्यासाठी इंग्रजांच्या मदतीसाठी सन १८०० पासुनच प्रयत्न करत होते, पण तेंव्हा ते ब्रिटिशांच्या अटी मानण्याच्या परिस्थितीत नव्हते. अहिल्याबाईंनी तुकोजीरावांना होळकरी राज्याचा सेनापती नेमले असले व विविध युद्धांत सेना घेवुन ते सामील होत असले तरी ते अहिल्याबाई असेपर्यंत अधिक्रुत शासक नसल्याने राजकारणात पेशव्यांनी त्यांना सामील करुन घेतले नाही. अहिल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असुन ते गिळता येईल असाच दौलतराव व बाजीराव पेशव्याचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकुन घेतील याचा त्यांना अदमास आला नाही. तेथुन त्यांचे सारेच आडाखे फसत गेले. दौलतरावाच्या सैनिकी शक्तीवर बाजीरावाचा फाजील विश्वास होताच. पुढे यशवंतरावांनी तो आत्मविश्वास धूळीला मिळवला.

    २. दुसरे असे कि यशवंतरावांना पेशव्याने वा दौलतरावाने "औरस" कधीच मानले नाही. अनौरसाकडे पाहण्याचा खास तत्कालीन हीनत्वाचा द्रुष्टीकोन येथे आडवा आला व कसलीही माहिती नसतांना त्यांनी यशवंतरावांना एक "बंडखोर" अशीच उपाधी देवुन पेशवाईचा शेवटपर्यंत शत्रुच मानले. त्यामुळे बाजीरावाने यशवंतराव व शिंद्यांत सलोखा घडवुन आनण्याचा प्रयत्न केला नाही. शिंद्यांनी तसा प्रयत्न फेटाळुनच लावला असता कारण "अनौरसाशी काय समझोता करायचा?" या उद्दाम भावनेतच तो राहिला. पुढेही त्याने यशवंतरावांच्या ऐक्याच्या व इंग्रजांविरुद्धच्या लढ्याच्या ज्या हाका दिल्या त्याला नीट प्रतिसाद का दिला नाही, याचे उत्तर याच खास तत्कालीन मराठी सनातनी व्रुत्तीत आहे.. भोसलेंबाबतही हेच म्हनता येईल. प्रत्यक्षात यशवंतरावांनी कोणाहीबाबत कटुता ठेवली नव्हती हे आपण पाहिलेच आहे.

    ३. पहिले बाजीराव हे जातीभेदातीत बुलंद व्यक्तिमत्व होते. त्यामुळे अनेक नवी लढवैय्यी घराणी पुढे आली हे वास्तव आहे. पण पुढील पेशवाई, माधवरावांचा अपवाद वगळला तर, फाजील चित्पावनी वर्णाहंकाराची होती. पानिपतच्या युद्धकाळातील घडामोडींतच जातीयवादाच्या पावुलखुणा उमटतांना आपल्याला दिसतात. पानिपतच्या पराजयामागे हा छुपा जातीयवाद होता हे मी अन्यत्र लेख/पुस्तकांत सिद्ध केलेले आहेच. पानिपतच्या युद्धात मसलतींत मल्हाररावांना डावलले जात होते. ब्राह्मण (त्यातही चित्पावन)-मराठा-अन्यजातीय अशी त्रिभागणी उत्तर-पेशवाईच्या काळात झालेली दिसते. एका धनगराला मराठा राजमंडलात बरोबरीचे स्थान द्यावे काय अशा सुप्त प्रवाहांच्या नोंदी आपल्याला इतिहासात सापडतात. त्यामुळे यशवंतरावांना न मोजण्याचे धोरण दुस-या बाजीरावाने कायम ठेवले असे दिसते. "इंग्रजांच्या वर्चस्वाखाली जाणे श्रेय:स्कर पण यशवंतराव होळकरांच्या नको..." असा निर्णय दुस-या बाजीरावाने घेतला असेल तर त्याची जातीय मनोभुमिका आपण समजावुन घेवू शकतो. पण त्याचे दुरगामी परिणाम काय होतील याचा कसलाही विचार पेशव्याने केला नाही हे दुर्दैवी आहे. त्याने यशवंतरावांच्या आवाहनांना प्रतिसाद देवुन परत पुण्याला यायला हवे होते...पण तसे झालेले नाही.
   
    १७९७ ते १८११ असा फक्त चवदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तुत्वासाठी मिळाला. १७९७ ते १८०३ हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वता:ची पत्नी व कन्येस कैदेतुन मुक्त करण्यासाठी वेचावी लागली. १८०३ पासुन त्यांनी इंग्रजांविरुद्ध सर्वकश अथक लढा उभारला आणि बलाढ्य इंग्रज सेनांना एकामागुन एक वेळा पराजित केले. यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणुन वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणा-या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन. पण त्यांचा अजरामर आशावाद कधीच निस्तेज झाला नाही. कलकत्त्यावर आक्रमण करुन एकट्याच्या जीवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते कोणत्याही महाकवीला स्फुर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. असा महामानव आपल्या धरतीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. आपण त्यांना समजवुन घेतले नाही हे आपले दुर्भाग्य आहे.

      जेम्स व्हीलर नावाचा पाश्चात्य इतिहासकार यशवंतरावांबद्दल लिहितो-

    " The life of Yashwant Rao Holkar was one of unceasing struggle and peril, endured with the abounding high spirits for which he was renowned. He experienced the murder of one brother by Sindhia and the public execution of another by the Peshwa. He took lightly even the loss of an eye by the bursting of a matchlock; jesting at the belief that a one-eyed man is wicked, he exclaimed that he had been bad enough before but would now surely be the guru or high priest of roguery. He was generous as well as witty, and his wildness was pardoned as part of the eccentricity of genius. He was of superior education as well as superior mental abilities, a skilled accountant and literate in Persian as well as Marathi.
    " No member of his race ever possessed the gift of guerilla warfare in such higher measures as did Yashwant Rao Holkar. His resources were always slight, but his energy and hopefulness boundless. When for the war that now followed he announced to his troopers that they must gather their own rewards and these conditions were accepted with enthusiasm. His reputation was such that, even when himself a fugitive from Scindia`s army, he had been continually strengthened by desertions from his pursuer. His personal courage was of the kind which soldiers most esteem, that of such leaders as Ney and Lannes, and he never lost his personal ascendancy until he lost his reason. "

        मला वाटते खरे यशवंतराव या लेखमालिकेमुळे कळायला मदत झाली असेल....आता तरी त्यांच्या वीरश्रीचे, स्वातंत्र्यप्रेमाचे पवाडे मुक्तकंठाने गाल आणि भारतभुमीच्या या सुपुत्राची नित्य आठवण ठेवाल अशी आशा आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ सुची
मराठी:
१. मराठे आणि महाराष्ट्र- अ. रा. कुलकर्णी
२. मराठ्यांचा इतिहास, खंड - ३ ( संपादक :- अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खरे )
३. मराठी रियासत, खंड ८: गो.स. सरदेसाई
४. झुंज- ना. सं. इनामदार
५. ऐतिहासिक बखरी, खंड दुसरा- संपादक अविनाश सोवनी
६. पानिपत:१७६१ : त्र्यं. शं शेजवलकर
७. पुणे शहराचे वर्णन: ना. वि. जोशी
८. ऐतिहासिक गोष्टी: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख.
इंग्रजी:
१. Battles of the honourable East India Company: making of the Raj:  By M. S. Naravane
२. Advanced study in the history of modern India 1707-1813: By Jaswant Lal Mehta
३. Fall Of The Mughal Empire Vol.5 (1789-1803):  By Jadunath Sarkar
४. Memoir of Central India by Sir John Malcolm
५. Memoir of the services of the Bengal artillery ... edited. by J.W. Kaye( By E. Buckle, Sir John William Kaye)
६. Strangers within the gates:  By Gabrielle Festing
७. Women in the medieval Islamic world: power, patronage, and piety : By Gavin Hambly
८. Blackwood's Edinburgh magazine, Volume 4: Despatches of the Duke of  Wellington
९०. The History of India from the Earliest Period to the Close of Lord Dalhousie’s Administration. – 1867. John Clark Marshman
१०. Indian women freedom fighters: By Ushā Bālā, Anshu Sharma
११. Journal of the Society for Army Historical Research:  Vol. 63 & 64
12. The political history of India, 1784 to 1823: By Sir John Malcolm

...बात त्याची कशाला?

श्वासांत जागते भाग्य, भाग्य जळे सरणात
जो सरण घेई उशाला...बात त्याची कशाला?

आकाश चोळते अंगा, उटणे कधी प्रकाशाचे 
तो प्रकाश थैमानी ऐसा...बात त्याची कशाला?

उरगांनी गिळली धरती, धरतीने गिळले आभाळ
आभाळ खाते माती...बात त्याची कशाला?

तो सूर्य उगे हृदयात, हृदयाला आली भरती
जो अथांग प्रेमे व्याला....बात त्याची कशाला?

मी म्हणतो "मी" पण नाही...तू म्हणतो "तू" पण नाही
मग जो नाहीच अस्तित्वाला...बात त्याची कशाला?

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...