Pike Virchand Gandhi of Jain philosophy | जैन तत्त्वज्ञानाचे पाईक वीरचंद गांधी
जैन तत्त्वज्ञानाचे पाईक वीरचंद गांधी
- संजय नहार
(सरहद संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष)

शिकागो येथील विश्व धर्म परिषदेतील भाषणामुळे स्वामी विवेकानंद यांची जगभर चर्चा झाली. त्यात या देशाच्या सहिष्णू परंपरेबद्दल बोलताना स्वामी विवेकानंद म्हणाले, पृथ्वीला कट्टरता, धर्मांधता आणि हिंसाचाराने भरून टाकलं आहे. कितीतरी संस्कृतींचा नाश केला आहे. हे राक्षस नसते, तर मानवसमाज आज कितीतरी विकसित झाला असता. याच भाषणात त्यांनी जगाला सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धर्माचा एक भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला. याच परिषदेत वीरचंद गांधी यांनी जैन धर्माबद्दल भाषण केले. त्यात जैन तत्त्वज्ञान, जैन सिद्धांत यावर ओघवत्या भाषेत विवेचन केले. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे २९ वर्षे. उद्या, रविवारी त्यांची १५५ जयंती.
विश्वबंधुत्वाची प्रतिष्ठा आणि प्रचार या उद्देशाने अमेरिकेतील शिकागो येथे ११ मे ते २७ सप्टेंबर, १८९३ मध्ये विश्व धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य विजयानन्दसूरिजी (आत्माराम महाराज) यांनी वीरचंद यांना या धर्मसंसदेत जैन धर्माचे प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. वीरचंद गांधी यांचा जन्म २५ आॅगस्ट, १८६४ रोजी गुजरातच्या भावनगरजवळील महुवा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण महुवा तर माध्यमिक शिक्षण भावनगर येथे झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी ते मॅट्रिक पास झाले. त्यावेळेच्या भावनगर राज्यातील प्रसिद्ध एल्फिन्स्टन कॉलेजातून ते १८८४ साली पदवीधर झाले. १८८५-८६ साली ते सॉलिसीटर झाले. पुढे ते ब्रिटनमध्ये बॅरिस्टर पदवीधारक झाले. बॅरिस्टर झालेले ते पहिले जैन होते. ते चौदा भाषा शिकले. त्या सगळ्या भाषा ते अस्खलित बोलत असत.
विश्व धर्म परिषदेत वीरचंद गांधी यांनी जैन धर्माची मूलतत्त्वे यावर अत्यंत प्रभावीपणे मते मांडली. स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणेच उदार दृष्टिकोन ठेवून त्यांनी जगाच्या इतर कोणत्याही धर्मावर अथवा विचारांवर टीका केली नाही. उलटपक्षी अहिंसा धर्माचे पालन करणारी आणि विचारात अनेकांतवाद पाळणारी, कोणत्याही धर्माची व्यक्ती जैनच आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करून अननोन लाइफ आॅफ जिझम ख्राइस्टफ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात येशू ख्रिस्त यांनी काश्मीरला दिलेल्या भेटीचा आणि त्यांच्यावर जैन धर्माच्या, तसेच भारतीय संस्कृतीच्या पडलेल्या प्रभावावर साधार भाष्य केले आहे.
जैन धर्म आणि संस्कृती यांची माहिती जगाला व्हावी, म्हणून वीरचंद गांधी यांनी अमेरिकेत स्कूल आॅफ ओरिएंटल फिलॉसॉफी आणि इस्टोरिक स्टडीज या संस्था स्थापन केल्या. या संस्थांमार्फत जैन तत्त्वज्ञानाची माहिती धर्म अभ्यासकांना मिळू शकेल, अशी व्यवस्था त्यांनी केली. त्याचा लाभ जगभरातील अभ्यासक आणि जिज्ञासू घेत आहेत. त्यांनी इंग्रजीमध्ये द जैन फिलॉसॉफी, द योग फिलॉसॉफी, द कर्म फिलॉसाफी आणि इतर पुस्तके लिहिली. वीरचंद गांधी यांची भाषणे ऐकून हर्बर्ट वॉरन्ट यांनी जैन धर्मावर प्रकाशित केलेले पुस्तक लोकप्रिय झाले. यावरून त्यांची भाषणे कशी अभ्यासपूर्ण आणि ओघवती होती, हे प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या या भाषणाचा प्रभाव उपस्थित श्रोत्यांवर होत असे.
शिकागो येथे वीरचंद गांधी यांनी सोसायटी फॉर द एज्युकेशन आॅफ वुमन आॅफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने भगिनी निवेदिता प्रभावित झाल्या. त्याचप्रमाणे, श्रीमती हॉवर्ड याही वीरचंद गांधी यांच्या विचारांमुळे प्रभावित झाल्या आणि त्यांच्या शिष्या बनल्या. पूर्ण शाकाहारी बनून त्यांनी जैन धर्माप्रमाणे आचरण केले. मात्र, वीरचंद गांधी यांचा पिंड फक्त धार्मिक नव्हता. १८९0मध्ये जेव्हा त्यांचे वडील राघवजी यांचे निधन झाले, त्यावेळी छातीवर हात मारून रडण्याच्या प्रथेला त्यांनी विरोध केला. वीरचंद गांधी दुसºया वेळेस अमेरिकेत गेले (१८९६-९७), तेव्हा भारतात भयंकर दुष्काळ पडला होता. त्यांना या दुष्काळाविषयी समजले, तेव्हा ते व्यथित झाले. भारतातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी अमेरिकेत दुष्काळ निवारण समिती (फेमिन रिलिफ कमिटी) स्थापन केली होती. गांधी यांनी या समितीमार्फत चाळीस हजार रुपये, तसेच एक जहाज भरून धान्य भारतातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविले. त्यांच्या अशा सामाजिक उपक्र मांची यादी खूप मोठी आहे.
आज अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांतील अनेक विद्यापीठांमधून जैन धर्माची तत्त्वे, जैन वाङ्मय, इतिहास यावर सविस्तर अभ्यास होत आहे, याचे श्रेय निर्विवादपणे वीरचंद गांधी यांना जाते. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथून भारतातील जुनागडचे दिवाण हरिदास देसाई यांना लिहिलेल्या पत्रात वीरंचद गांधींचा विशेष उल्लेख करून म्हटले की, येथील भयंकर थंडीतही वीरचंद गांधी पूर्णपणे शाकाहार घेत आहेत. यांची नखं आणि दात नेहमी देश आणि धर्माच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करत असतात व अमेरिकेतील लोकांमध्येही ते खूप लोकप्रिय झाले आहेत.
वीरचंद जसे स्वामी विवेकानंदचे मित्र होते, तसेच महात्मा गांधी यांनीही वीरचंद गांधींना ‘भावासारखे मित्र’ अशी उपमा दिली होती. अशा या भारतपुत्राचे ७ आॅगस्ट, १९0१ रोजी वयाच्या अवघ्या ३७व्या वर्षी निधन झाले. १५५व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.