Friday, August 31, 2012

साहित्य व वाचन संस्कृतीचे मारेकरी (१)


मराठी विश्व साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने दै. लोकसत्ताने "साहित्त्यिकानां न भयं न लज्जा" हा अग्रलेख नुकताच लिहुन वाचकांना सहसा माहित नसलेल्या साहित्यिकांच्या असाहित्त्यिक साहित्यप्रकाराला थेट भिडवले. अर्थातच यावर साहित्त्यिकांकडुन फारशा (किंबहुना नाहीतच...) प्रतिक्रिया आल्या नसल्या तरी इतरांच्या खांद्यावरुन बंदुकी झाडण्याचे काम केले आहे. टोरोंटो वारीचा आता मुद्दाच उरलेला नसला तरी हा विषय चर्चेत आहेच. आजही लोकसत्ताने टोरोंटो वारीत सहभागी झालेल्यांची यादीच प्रसिद्ध करुन त्यातील साहित्त्यिकांची यत्ता विचारली आहेच. त्याचवेळीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणा-या निवडणुकीच्या मतदारांचा मुळात साहित्याशी कितपत संबंध आहे याचीही चर्चा झालेली होतीच. यात वाचकांचे नेमके स्थान काय व एकुणातील आपली वाचनसंस्कृती याबद्दलही प्रश्न उपस्थित होतात.

मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा, ती वैश्विक व्हावी, इतकी कि एक दिवस मराठी साहित्त्यिकाला नोबेल मिळावे अशी आशा बाळगणारे मराठीत कमी नाहीत. पण मुळात मराठी साहित्याचीच यत्ता काय यावर आधी विचार केला पाहिजे.

पाश्चात्य भाषांत अत्यंत बाल, किशोर, कुमार साहित्याची अत्यंत सृजनशील अशी विपुल प्रमाणात निर्मिती होत असते. त्यामुळे मुलांना लहान वयातच वाचनाची गोडी लागते. यात रहस्य, थरार, गूढ, अद्भुतरम्य अशा विविधरंगी साहित्याचा समावेश असल्याने व सहित्त्यिक दर्जाही उत्तम असल्याने मुलांना आपापल्या आवडीनुरुप विपूल साहित्य उपलब्ध असते.

याउलट अत्यंत केविलवाणे असे मराठीचे चित्र आहे. मुळात मुलांसाठी लिहिण्याचीच आपल्या साहित्त्यिकांना लाज वाटते. भा. रा. भागवतांचा अपवाद वगळला तर आजीवन बाल-किशोरांसाठी लिहिणारा लेखक नाही. पण आता ते आउटडेटेड झाले आहे. जे सहित्य प्रसिद्ध होते त्याची लायकी जवळपास शुण्यवत अशीच आहे. अपवादाने अधुन-मधुन एखाददुसरे चांगले पुस्तक येते खरे, पण एखाद्या पुस्तकाने बाल-किशोर मराठी वाचनाकडे वळण्याची शक्यता नाही.

वाचनाची सवय लहानपणापासुन लागली तर मुलांच्या मनोविश्वावर सकारात्मक परिणाम होतो याचे भान आपल्याला कधीच नव्हते. आजही नाही. प्रकाशक जीही काही मुलांसाठीची म्हनवली जानारी पुस्तके काढतात ती अक्षरश: कोणत्यातरी शासकीय योजनेत त्यंची वर्णी लावण्यासाठी. त्यामुळे दर्जाचा विचार व अपेक्षा करता येत नाही. ही पुस्तके शेवटी शाळांच्या कपाटांत वा गोदामांत सडणार आहेत हे जसे प्रकाशकांना माहित असते तसेच खरेदी करणा-या शासकीय अधिका-यांनाही. त्यामुळे मुलांच्या आवडींचा, त्यांच्यातील वाचनसंस्कृतीचा विचार कोण आणि का करेल?

ज्याचा हिस्सा त्याला मिळ्ण्याशी मतलब!

वाचकांच्याही यत्ता असतात. बाल-किशोर साहित्याचा अभाव आहे, ठीक. पण मग पुढे तरी काय? ज्याला पहिलीतच यश नाही त्याने एकदम जी.ए. हातात धरावेत अशी अपेक्षा करता येत नाही. वाचनाची सवय लागायला वाचकाला आधी रंजक साहित्य हवे असते. तेही दर्जेदार असायला हवे. आपल्याकडे त्याचीही वानवा. रहस्यकथा, गुढकथा, भयकथा, थरारकथा, विनोदी साहित्य....

परकीय कथावस्तुंवर आधारीत का होइना मराठीत एके काळी रंजक सहित्याची मोठी लाट होती. गो. ना,. दातार ते शिरवळकर एवढा प्रवास मराठीने केला. लाखो लोकांना वाचक बनवले. वाचनालये गजबजु लागली ती याच लेखकांमुळे. हेच वाचक मग अधिक गंभीर साहित्याकडे वळाले.

पण मग ही परंपरा खंडितच झाली. मराठी समिक्षकांनी रंजक लेखकांना साफ नाकारले. रंजक लेखक हा साहित्यिकच नसतो हे म्हणतांना त्यांनी अगथा ख्रिस्ती, गार्डनर यांना मात्र जगाने नुसते डोक्यावर घेतले नाही तर राष्ट्रीय पुरस्कारही दिले. आपल्याकडे अशा रितीने हिणवुन घेत मग रंजक लेखन करायला कोण पुढे येणार? स्वतंत्र प्रतिभेने नव्या काळाशी सुसंगत, अधिक व्यापक परिमाणे घेवून येणारे नवे रंजक पण अनुभवविश्वात भर घालणारे साहित्यिक मराठीने निर्माण केले नाहीत. मारिओ प्युझो, जेफ्री आर्चर, फ़ोरसीथ...छे. आमची मजल तेथवर गेलीच नाही. आम्ही अवलंबुन राहिलो मग अनुवादांवर. मराठीतील जीही काही वाचन संस्कृती आहे ती थोडीफार या रंजक साहित्याच्या अनुवादांमुळे. मराठी साहित्त्यिकांचे योगदान अल्पांश आहे हे नाईलाजाने म्हणावे लागते.

मराठी साहित्यिकांची (किती जणांना साहित्त्यिक म्हणायचे हा प्रश्नच आहे.) सर्वात मोठी समस्या ही आहे कि एक पुस्तक प्रकाशित होते न होते, त्याला पारितोषिक कसे मिळेल, त्यावर परिचय कसे येतील...मग त्यावर आधारित पुढचे डाव काय..फायदे काय यातच लेखक गुंतुन पडत जातो. एकदा तर मी एका लेखकाची कादंबरीचे हस्तलिखित वाचलेलेही नसता मल सांगितले कि ही कादंबरी तुम्ही फक्त प्रकाशित करा, राज्य शासनाचा पुरस्क्कार मिळणारच आहे. तो एवढ्या ठामपणे बोलत होता कि त्याने काहीतरी फिल्डींग लावलेलीच आहे याची मला खात्रीच पटली. मी ती कादंबरी नाकारली. दुस-या वर्षी त्याच्या कादंबरीला खरोखरच पारितोषिक मिळालेले होते. आपल्या साहित्त्यिक पुरस्कारांच्या या यत्तेवर कोणाही सुजान वाचकाला शरम वाटायला हवी कारण बव्हंशी पुरस्कार हे अक्षरश: म्यनेज केलेलेच असतात याबाबत कोणीही शंका बाळगु नये. पुरस्कारप्राप्त पुस्तक वाचणे ही एक शिक्षाच बनुन जाते आणि वाचक गंडवला जातो. लेखक १०% कोट्यातील फ्ल्यट मिळवायला पात्र ठरतो...काय वाचन संस्कृती वाढवणार?

तो कशाला आपली साहित्त्यिक म्हणुनची यत्ता वाढवायचा प्रयत्न करेल?

लोकसत्ताचा आरोप...कि बहुतेक साहित्त्यिक हे राजकारण्यांच्या दावणीला बांधलेले असतात तो खराच आहे. त्यामुळे त्यांचे व्यक्तिगत काही लाभ होतही असतील...पण साहित्त्यिकांनी (अनेक विचारवंतांनीही) आपापल्या अस्मिता गहाण टाकण्यातुन निर्माण झालेला सर्वात मोठा सांस्कृतीक धोका हा आहे कि ही मंडळी कोणत्याही सामाजिक प्रश्नांवर तोंड उघडत नाहीत. मत काहीही असो, कोनाला पटो अथवा न पटो पण ते अभिव्यक्त करण्याचे स्वातंत्र्य ते गमावून बसले आहेत असे आपण सहज पाहु शकतो. पु. ल., दुर्गाबाइंची येथे आठवण येणे स्वाभाविक आहे...पण गेले ते दिन गेले. साहित्तिकांनी काही ते सर्वच अशी मजल मारली असल्याने समाजाशी काही घेणे-देणे नसणारे, "मी तुझी पाठ खाजवतो...तू माझी खाजव" वृत्तीचे माफियांना (राजकारण्यांनाही) लाजवतील असे पण अतिक्षुद्र मनोवृत्तीचे कंपु बनवलेले आहेत.

अशा कुपमंडुक साहित्त्यिकांकडुन नोबेल विनर साहित्त्यिक निर्माण होईल कसा? वैश्विकतेला कवेत घेत मानवी जीवनाचे असंख्य पदर उलगडुन दाखवत वाचकाला प्रगल्भ करणा-या कलाकृती निर्माण होतीलच कशा? तसे होणार नसेल तर वाचन संस्कृती बहरेलच कशी?
मराठीत गाजलेल्या (बव्हंशी गाजवल्या गेलेल्या) कृती या तुलनात्मक साहित्याच्या अंगाने पहायला गेले तर अजुनही प्राथमिक पातळीवर आहेत असे प्रसिद्ध तुलनाकार समीक्षक डा. आनंद पाटील म्हणतात हे खरेच आहे.

त्याहीपेक्षा अजुन भीषण बाब म्हणजे साहित्य क्षेत्रातील जातीयवाद. ब्राह्मण, मराठा, ओबीसी व दलित अशी जातीय विभागणी मराठी साहित्यात झालेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ब्राह्मणी आहे हा आरोप आजचा नाही. त्यातही देशस्थ-कोकणस्थ ही जातीय बाब डोकावतेच...यंदाही डोकावतेय! मराठा समाजही त्यांचे साहित्य संमेलन स्वतंत्र आयोजित करतो. ओबीसींचेही आता, दुबळे असले तरी, भरु लागले आहे. मुस्लिम, आदिवासी साहित्यसंमेलनेही होतात. विद्रोही साहित्य संमेलने नेहमीच प्रकाशात असतात ती त्यातील विद्रोही जाणीवांमुळे...पण विद्रोही नेमका कोण हे ठरवायचे तंत्र जातीयच असते! ब्राह्मणी संमेलने (आजवरच्या अध्यक्षांचा इतिहास पहा) केवळ सहानुभुती वा आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी अधुन मधुन दलित वा मुस्लिम लेखकाची अध्यक्षपदी निवड घडवून आणत असतात...पण ओबीसींना अत्यंत क्वचित असे स्थान मिळाले आहे.

आता या सर्व प्रकारात साहित्त्यिक योग्यता हा निकष नसतो. दोन-चार, कोणाहे वाचकाला न आठवणारी पुस्तके लिहिणारे अनेक महाभाग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेले आहेत.

या सर्व जातीय प्रकारांमुळे साहित्त्यिकांत जो विभेद, जो अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आणि कोणत्याही समाज संस्कृतीला अशोभनीय असल्याने, निर्माण झाला आहे त्याची परिणती मराठीचा एकूणातीलच साहित्त्यिक दर्जा ढासळवत नेत आहे. कारण लेखकाला अमुक जातीचे असणे पुरेसे असते. त्यासाठी सहित्त्यिक लायकी सिद्ध करत बसण्याची गरज नसते. मराठीत जर काही दखलपात्र साहित्य निर्माण झालेले असेल तर ते निव्वळ अपघाताने...आणि म्हणुणच असे साहित्य अत्यल्पही आहे.

वाचनसंस्कृती तेंव्हाच वाढु शकते जेंव्हा तेवढेच विविधांगी साहित्य विपुल प्रमाणात निर्माण होते. तुमच्या कादंब-या पाच-दहा पानांपार वाचवत नसतील तर वाचकाने आपले पैसे त्यावर का वाया घालवावेत? ही अपेक्षा चुकीची नाही काय? वाचक तेच पैसे मग सिनेमा, इंग्रजी (मूळ अथवा अनुवादित) साहित्यच वाचेल कि! केवळ मराठी साहित्यसंस्कृती वाचवायला त्याचे पैसे काही वर आलेले नाहीत.
आणि जेंव्हा वाचायलाच हवे असे त्याच्या आवडीचे साहित्य येते तेंव्हा वाचक बरोबर, प्रसंगी मेहनत घेवुन, ते पुस्तक मिळवतोच असा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. त्यामुळे वाचकांना वाचायचेच नाही असे नसुन त्याला वाचावे वाटलेच पाहिजे असे देण्यात साहित्त्यिक असमर्थ आहेत म्हणुनच वाचनसंस्कृतीही क्षीणावत चालली आहे.

अत्यंत अपवादात्मक लेखक जागतीकीकरण व त्यामुळे निर्माण होत असलेले बहुसांस्कृतीकीकरण स्पर्शु शकले आहेत. शेतकरी अजुन धड आवाक्यात आलेला नाही. आपण त्याला इतर म्हणतात म्हणुन कृषी/ग्रामीण जीवनाचे उत्कट चित्रीकरण करणारी कादंबरी वगैरे म्हणतात म्हणुन म्हणायचे...पण त्यात खोली किती, वास्तव किती...कि केवळ ज्यांना त्या जीवनाबद्दल काही माहितच नाही  त्यांना गंडवले जातेय हे कोण पाहणार? लोकांना ऐतिहासिक/पौराणिक कादंब-यांचे आपल्याकडे वेड आहे हे खरेच आहे. मृत्युंजयसारख्या कादंब-यांनी वाचकांना वेड लावले हेही खरे आहे. पण आजकाल केवळ अशी पुस्तके पटकन खपतील म्हणुन इतिहासातील व पुराणकथांतील हाती सापडेल ते पात्र घ्यायचे आणि कादंबरी ठोकायची असाही एक लेखकीय उद्योग बनला आहे. अर्थात प्रकाशकांचेही त्यांना प्रोत्साहन असतेच. मग दर्जा कोण पहातो...(आणि मग वाचतोही कोण म्हणा!)

थोडक्यात, मराठी साहित्य संस्कृती रसातळाकडे चालली आहे. लोक इतर प्रकारची, माहितीपर, अनुवादित वा वैचारिक पुस्तकांकडे झुकत आहेत. वाचकांची भुक शमलेली नाहीय. शमणारही नाही. उलट सर्व यत्तांना रुचेल असे उच्च (किमान ब-या) दर्जाचे साहित्य येत राहिले तर आहे ती वाचनसंस्कृती भरभराटेल यात मला शंका नाही.

येथवर मी साहित्त्यिक हा साहित्य संस्कृतीचा मुलाधार असल्याने त्यांचा आधी विचार केला आहे. पण प्रकाशक, विक्रेते आणि सरकारी ग्रंथालयांचे ग्रंथपाल आणि खुद्द शासन साहित्य व वाचनसंस्कृतीचे कसे मारेकरी आहेत हे पुढील लेखात!

Wednesday, August 29, 2012

संध्याप्रकाश गृह



संध्याप्रकाश गृह

मी आजवर दिडशेच्या वर चित्रे चितारली. त्यापैकी गाजलेले हे एक चित्र....Twilight House 
अर्थात संध्याप्रकाश गृह... 







शेवटी सावल्याच त्या!




मी फिरस्ता नाही. भटकंती मला मुळात आवडतच नाही. म्हणजे माझ्याकडे निवांत असे क्षणच नसतात असे कोणी म्हणू शकणार नाही. खूप असतात...अगदी अनेक दिवस गच्च भरुन जातील एवढे निवांत क्षण...पण बाहेर पडावे...कोठेतरी निर्जनवासात गवत-झुडुपे तुडवत, झरे-ओढे ओलांडत कड्याकपा-यांतुन वाट शोधत आभाळावर चढाई करावी असे मला कधी वाटलेच नाही हेही तेवढेच खरे.
मी आपला घरातच निवांतपणाचे ओझे पेलत इतिहासाची जीर्ण-शीर्ण गोधडी उसवत बसलेला असतो. कोणाचा इतिहास? खरे तर कोणाचा असा नाही. म्हटलं तर सर्वांचाच. पण जे उसवत असतो तो असतो इतिहासच. एक धागा उसवला कि आपला दुसरा उसवायला घ्यायचा. उसवल्या धाग्याचे करायचे काय? काही नाही! त्याच्या जीर्णतेचा गंध मनात साठवत, त्याला शब्दांच्या तेवढ्याच कोंदट कुपीत बंद करत दुस-या जीर्णतेकडॆ वळायचं! का...कशासाठी? नाही माहित मला...पण इतिहासालाही आठवणार नाही एवढी वर्ष मी हेच करतोय हेही तेवढच खरं!

* * *

पण आजचा दिवस थोडा वेगळा होता. माझ्याकडे कधीच कोणी येत नाही. खरं सांगायचं तर मला मित्रच नाही...एक सुद्धा! साध्या तोंडओळखीही मी ठेवत नाही. म्हणजे कधी काळी सहज बाहेर जरी पडलो आणि एखादा माणुस हजारदा दिसला असला तरी तो मला नवीनच वाटतो. त्यांनीही मला पाहिले असेल कदाचित पण त्यांनी आता ओळख दाखवायचा प्रयत्न करणेही सोडुन दिले असावे. नक्की का? आठवत नाही. माणसे म्हणजे माझ्या दृष्टीने केवळ सावल्या...अस्तित्वहीन हलणा-या-डुलणा-या, रस्ते अडवणा-या सावल्या. माझ्या घरात इतिहास सोडुन सावल्यांना प्रवेश नाही.
पण आजचा दिवस थोडा वेगळा होता. वेगळा अशासाठी कि माझ्या नकळत घरात एक सावली घुसली. आधी ती माझ्याही लक्षात आली नाही. मी तेंव्हा उसवत असलेल्या धाग्यात जरा जास्तच अडकलो होतो. होते असे कधी कधी. काही धागे मस्तक चक्रावून टाकतात. काही छातीत तीक्ष्ण आ-या खुपसतात. काही मोहवुन टाकतात. काही सरळ कडेलोटच करुन टाकतात. तसा मी काही भावनाशील जंतू नव्हे. असण्याचे काही कारणही नाही.  पण क्वचित कधी असे होते हे मात्र खरे. साला हा इतिहास मोठा अजब प्राणी आहे. डायनासोरसारखा. लोभस वाटला तरी कृर. कक्षेत जे येईल ते गिळंकृत करणारा. बरे झाले मी डायनासोरांचा इतिहास फार लवकर उसवून मोकळा झालो...नाहीतर माझाच डायनासोर झाला असता!

असो. घरात माझ्या नकळत एक सावली घुसली हे मात्र खरे. असे कधी झाले नव्हते. पहिलीच वेळ असं काही घडायची. मी जरा अस्वस्थ झालो. समोर मान उचलुन पाहतो तर एक तरुण सावली. पुरुषाची. अनोळखी. अर्थातच! मी चिडुन विचारलं, "कोण तू?"
"काय फरक पडतो?" तो काहीशा उर्मटपणे म्हणाला. दार उघडं दिसलं...आलो झालं आत."
"चालता हो प्रथम..." मी ओरडुन त्याला दाराकडे बोट दाखवलं. मला धक्का बसला...दार बंद होतं. आणि मला आठवलं मी दार नेहमीच बंद ठेवत असे. "आत कसा आलास तू?" मी अधिकच अस्वस्थ झाल्याने माझा संताप अजुनच वाढला होता.
"दार उघडंच होतं..." तो ठामपणे म्हणाला..."अगदी सहज आत येता येईल एवढं उघडं..."
माझा विश्वास बसत नव्हता. पण आली बला टाळायला तर हवीच होती. मी जरा सावरलो.
"काय काम होत?"
"काही नाही. नुकताच आलोय मी या वस्तीत रहायला. ओळख करुन घ्यावं असं कोणी भेटलं नाही. म्हटलं चला तुमच्याशी ओळख करुन घ्यावी. माझं नांव विकी...तुमचं?"
"मला नांव नाही. असलं कधी काळी तरी विसरलोय ते मी..." मी धुमसत म्हनालो. "आता झाली ओळख...या आपण आता. मी कामात आहे."
"काय करता आपण?"
"इतिहासाच्या गोधड्या उसवतो. आलं लक्षात? आता कृपा करुन..."
"इतिहास? अरे वा!...म्हणजे मला इतिहास आवडत नाही फारसा...त्याच त्या सनावळ्या आणि तेच ते ऐतिहासिक वाद...हा खरा कोण होता खरा कोण नव्हता...छी! किळस वाटते मला इतिहासाची. पण म्हणजे इतिहास हा विषय काही फारसा टाकावु आहे असे मला वाटतं असंही नाही. असतो आपला इतिहास...असा असो कि तसा...पण काहीतरी  घडलेलं असतं एवढं तर खरं..नाही का? तुम्हाला ब-याच गोष्टी कळत असतील...म्हणजे आम्हाला माहित नसलेल्या. कधीतरी वाटतं आपल्यालाही माहित असायला पाहिजे. पण मग शेवटी तेच ते...काय उपयोग माहित होवून? त्यापेक्षा आपलं मस्त भटकावं...मुक्त जगावं. कशाला पाहिजे कटकट? बरं...तुमची मग बरीच पुस्तकंही प्रकाशित झाली असतील...नाही?"
"मी इतिहासाच्या गोधड्या उसवतो आणि ट्रंकेत भरतो." मी म्हणालो.
"हे मात्र चांगलं. नाहीतरी काय उपयोग लिहुन? फुकटचा, म्हणजे लोकांना विकत घ्यायचा ताप! आपलं आपण शोधावं आणि आपल्याशीच ठेवुन द्यावं. हे खरं इतिहासकाराचं काम. पण आजकाल लोकांना प्रसिद्धीचा हव्यासच मोठा...असुद्यात. असतो काही लोकांना छंद. तुमचं मात्र आवडलं बुवा! हेच म्हणजे गोधड्या उसवनं आणि पेटा-यात पुन्हा बंद करुन टाकणं. कटकटच नाही कसली. ना स्वत:ला ना दुस-यांना. बरं...सध्या कसलं संशोधन सुरु आहे?"
"कसलंही नाही. मी कोणत्याही काळाचा धागा पकडतो नि बसतो उसवत. मजा येते उसवायला. सांगितलेल्या गोष्टी कशा धादांत खोट्या आहेत एवढं नक्कीच समजतं मला. मी जर खरा इतिहास सांगायला लागलो ना तर सावल्या हद्दपारच करतील मला या पृथ्वीवरुन. सध्या तरी मला पृथ्वीच बरी वाटतेय. पुढचं माहित नाही."
"मग तुम्ही गडकोट खुप हिंडले असाल...?"
"छे! काय गरज त्याची?"
"म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष ठिकाणांना भेट न देताच अभ्यास करता?"
"भेट देवुन मला जे समजेल ते या गोधड्यांमद्धेही आहेच कि! सर्व साफ आणि स्वच्छ दिसतं मला..."
"कमाल आहे!" तो म्हणाला. "ही गोधडी कोणत्या काळाची आहे...म्हणजे तुम्ही आता उसवत बसलाय ती?"
  "या गोधडीची जरा गुंतागुंत आहे. म्हणजे उसवला धागा कधी भुतकाळात जातो तर कधी पुढे...पार दुरच्या भविष्यकाळात. म्हणजे इतिहास भविष्यकाळातुन इकडे आल्यागत वाटतं. बरं. जा आता. मला सावल्यांशी बोलायला आवडत नाही..."
तो हसला. काही क्षण मौन राहिला. मग एकाएकी खर्जातल्या स्वरात म्हणाला...
"मी सावली नाही. तुम्ही अजुन माझ्याकडे नीट पाहिलेच नाही..."

मी चमकुन त्याच्याकडे पाहिले. न्याहाळले.
कसं शक्य होतं?
तो तरुण सावली नव्हता.
चक्क जीवंत माणुस होता.
आणि तो होता...
इतिहासातुन आलेला माझा मुलगा...
कि भविष्यकाळातुन आला होता तो?
छे!
मी माझ्या इतिहासाचा धागा कधीच उसवायला घेतला नव्हता. पुर्ण दुर्लक्षच ते. जणु काही तो कधी अस्तित्वातंच नव्हता.
मला धक्का वगैरे सहसा बसत नाही...
आज बसला एवढे मात्र खरे.

* * *

त्या रात्री मी स्वत:तच भरकटत राहिलो. घोंगावत राहिलो. आदळत-आपटत राहिलो.
मग कोठे स्थिर झालो.
सकाळी तो पुन्हा आला. तसाच मंद हसत.
"म्हणजे तुम्ही मला ओळखले तर!"
"तू येशील असे मला वाटलेच नव्हते. कसं शक्य होतं ते? तेही इतक्यात? सावल्यांच्या जगात मी एवढा हरवलो आहे कि जीवंत माणसांची आशाच संपल्यागत झालेलं. हे बघ इतिहासाच्या गोधड्या मला एकच गोष्ट शिकवतात. काहीच अनपेक्षीत नाही. त्यामुळे मला धक्का वगैरे काही बसलेला नाही हेही तेवढच खरं. भावनांना कधी मी तिलांजली दिली...कि द्यावी लागली बरं? ते जावु दे.  इतिहासात तुला कधीच रस नव्हता आणि ते चांगलंच होतं असं म्हणेन मी. इतिहास रमवतो..छळण्यासाठी. इतिहास आमंत्रण देतो आपल्या विकराल पाशात अडकवण्यासाठी. पण त्या पाशातही एक मौज असते. भवितव्याचेही तसेच. मी माझा धागा उसवायला घेतला असता तर कदाचित तु येणार हे समजलंही असतं मला! पण म्हटलं नकोच ते! कशाला उगाच? पण आता तू गेलास तरी चालेल. जीवंत माणसं हताश करतात मला. मला खुप काम आहे."
तो तसाच मंद हसत राहिला.
म्हणाला...
"कल्पना आहे मला. पण एवढं कशाला या कामात अडकावून घेताय? स्वत:चा इतिहास विसरुन या दुस-यांच्या गोधड्या कशाला उसवत बसताय? मी म्हणतो काय उपयोग होता आणि आहे त्याचा? तुम्ही पुर्वी असे नव्हता. इतिहास तुम्हालाही आवडत नसे...माहिताय मला. जाऊद्या ते उसवत बसनं आज. चला. आज कोठेतरी भटकायला जावू..."
"भटकायला? काय वेड लागलय कि काय??
"काय हरकत आहे?"
"नाही. मला अजुन शेकडो गोधड्या उसवायच्यात...कि लाखो? माहित नाही मला. जा तू. मी काही तुला बोलावले नव्हते."
"म्हणुन काय झालं? वडील आहात माझे. भेटावसं तर वाटणारच कि! शोधलं शेवटी तुम्हाला. तुम्ही इतिहास शोधता...मी तुमचा वर्तमान शोधला...अवघड होतं ते हे खरं...पण शोधलं हे महत्वाचं. चला...खरंच भटकुन येवूयात. तुम्हाला नसेल आठवत पण तुम्ही मला लहानपणी फिरायला घेवून जायचे. मम्मी आणि आपण केरळलाही गेलो होतो...आठवतंय?"
"नाही. मी माझ्या इतिहासाचा धागा उसवायचाच नाही असं एकदा ठरवलं नि मग विसरलो सगळं..."
"मग मला कसं ओळखलत?"
"माहित नाही." मी नि:ष्प्राण स्वरात म्हणालो. खरंच...कसं? वैतागच सारा. ही काय अवदसा आली होती? नको ते समोर येणे...तेही जीवंत...अनपेक्षीत...
खरे तर मला वेदना व्हायला हव्या होत्या...किंवा किमान आनंद तरी. पण मला चीड येत होती. इतिहासाचे न शोधलेले धागे मला बोलावत होते. घडलेल्या अगम्य-गहन गोष्टी मंत्रवत निमंत्रीत करत होत्या. माझ्या इतिहासाचा धागा कोठेतरी कुजत पडला होता. कोणी लावून दिलं हे काम माझ्यामागे? मीच कि! पण मग आठवत का नाही? अरे आठवायचेच नसले कि होते असे. सावल्यांच्या जगात स्मृतींना तसा अर्थ तरी काय असतो? आणि स्मृती तरी ख-या असतात हे कशावरुन? कोणीतरी लिहुन ठेवलं म्हणुन कोणीतरी एक होवुन गेला हे माहित पडतं...नाहीतर तो कधी झालाच नाही असंच नाही कि काय? आपलं बरं आहे. या गोधड्या नेतात तेथे, जेथे घटना होत्या...कोणाला ठावुक आहे जे मला ठावूक आहे? खरच सांगायला लागलो कि लागलीच जगाची नाहीतर माझी वाट.
आणि काय उपयोग आहे या सावल्यांना समजा खरं माहित झालं तरी?
मला खोटं ठरवायला मोकळेच कि!
बरंय मी ते जीर्ण-शीर्ण धागे उसवून पुन्हा कुपीत बंदिस्त करुन टाकतो...
    बसा लेको कुरवाळत तुम्हाला हवा वाटतो तो आणि तेवढाच इतिहास!

"चला...जावूयात आपण." तो म्हणाला.
"नको..."
"तुम्ही पार विसरलात आम्हाला. तुम्हाला किमान मम्मीची आठवण येत नाही? का अचानक घर सोडुन बेपत्ता झालात? मम्मी भांडायची तुमच्याशी खुप...पण ती प्रेमही करायची तुमच्यावर...रोज रडायची ती...अर्थात काही काळ. सापडला नाहीत तुम्ही...एवढा शोध घेवूनही. नंतर नाईलाजानं लग्न करावं लागलं तिला दुस-याशी. आठवण नाही येत तिची?"
"नाही. मी लग्न केलं होतं हेच विसरलोय मी."
"कमाल आहे...लग्नच केलं नसतं तर मी कोठुन आलो असतो?"
"मुलं व्हायला लग्नच करावी लागतात असं कोणी सांगितलं तुला?"
यावर तो दिलखुलास हसला.
"खरय..." त्यानं कबुली दिली. "आता सांगायला हरकत नाही...माझीही तीच गत आहे. म्हणजे प्रेयसी गरोदर आहे आणि ती मी लग्न केलं नाही तरी मूल वाढवणार आहे. गेली झकत! पण तुमचं तसं नाही. लग्न केलं तुम्ही मम्मीशी."
"हे बघ हे फालतु तुनतुनं वाजवू नकोस. आता तू गेलास तरी चालेल...मला काम आहे खुप. दिवसरात्र चालणारं काम.."
"पण आहे काय त्याचा उपयोग?"
"सारी कामं उपयोगासाठी असतात हे कोणी सांगितलं तुला? हे माझं नियत काम आहे असं समज."
"तुमचं अजबच असतं सगळं. काही बदल नाही. पण एवढा बदल कि तुम्ही माझे बाप आहात यावर विश्वास बसु नये."
"तू जा आता. तू गेलास कि मीही मला मुलगा होता यावर विश्वास ठेवणार नाही."
"ठीक आहे. पण माझी एक शेवटची विनंती...थोडं फिरुन येवुयात...मला काही अजब गोष्टी सांगायच्यात तुम्हाला...मला तुमची आठवण यायची पण नंतर धुसर होत गेली ती. पण अलीकडे का कोणासठावूक...एवढ्या तीव्रतेने आठवणी यायला लागल्या कि मी शेवटी शोधलंच तुम्हाला...नवल नाही वाटत?"
"मला कसलंच नवल वाटत नाही." मी कोरड्या स्वरात म्हणालो.
त्याने खांदे उडवले.
"बरं... येतो मग मी. पुन्हा येईल आलो तर..."
तो गेला.
मी सभोवताली अचानक पसरुन आलेल्या काळोखाच्या लाटांखाली पुरता चिरडला गेलो.
साला प्रकाश होताच कधी आणि कोठे?
* * *
तो आलाच. आज त्याच्या चेह-यावर हसू नव्हतं.
अत्यंत भयभीत वाटत होता तो.
"मला...मला..."
त्याला काय म्हणायचय हे मला माहितच होतं.
"सर्वत्र हिंडत्या फिरत्या सावल्या दिसायला लागल्यात ना?"
मी अत्यंत कोरड्या स्वरात विचारलं.
त्याने चमकुन माझ्याकडे पाहिलं.
"तुम्हाला कसं माहित?"
काय बोलावं? कसं सांगावं त्याला?
पण कसंही सांगितलं तरी आता काय फरक पडतोय?
हळु-हळु जीवंत माणसं सावल्यांत कशी बदलतात
आणि सावल्या जीवंत का वाटु लागतात..
हे त्याला इतक्या चटकन थोडंच कळणार?

शेवटी आपण मेलोय हे आधी समजावं तरी लागेल कि नाही?

* * * * * * *

संजय सोनवणी
९८६०९९१२०५

Tuesday, August 28, 2012

महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार: धनगर-गवळी (भाग १)


आपली पाळेमुळे जाणुन घेण्याची भावना प्रत्येकात असते. आपण मुळचे कोण, कोठुन आलोत आणि आपला आजचा वर्तमान हा असा का आहे हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात उठत असतात. परंपरागत समजुती व दंतकथांचा अशा प्रश्नावर तोडगा म्हणुन फारसा उपयोग होत नाही. समाजशास्त्रीय व पुरातत्वीय साधनांचा मात्र आपली पाळेमुळे शोधण्यासाठी अधिक उपयोग होत असतो.

महाराष्ट्राचा पुरातन इतिहास पाहिला तर मानवाचे आगमन या भुमीवर दोन-अडीच लाख वर्षांपुर्वीच झाले. तापी, गोदावरी, कृष्णा आदि नद्यांच्या काठांवर पुराष्म कालीन हत्यारांचे मोठे साठे मिळाले आहेत. अर्थातच हा शिकारी मानव होता व टोळ्या करुन शिकारीच्या शोधात फिरता होता. सर्वच टोळ्या महाराष्ट्रात स्थिर झाल्या नाहीत. परंतु मानव जसा पशुपालक मानवही बनला तसा मात्र त्याची भटकंती ब-यापैकी थांबली. सरासरी चाळीस हजार वर्षांपुर्वी महाराष्ट्रात पशुपालन युग सुरु झाले. मानसाळवता येवू शकतील असे खाद्य पशुंची निवड करत त्यांचा जीवनयापनासाठी उपयोग करणे ही मानवाची निकड होती. शेळ्या-मेंढ्या, गायी-म्हशी-डुकरे यासारखे प्राणी व कोंबड्या, शहामृगादि पक्षीही पाळण्यास सुरुवात झाली. यामुळे शिकारीसाठी अविरत भटकंती करण्याची गरज कमी झाली. हे पशुपालन करणारे लोक विविध मानवी समुदायांतुन आलेले होते. म्हणजे ते एकवंशीय नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग हा तसा पावसाच्या दृष्टीने शुष्क असल्याने काही सुपीक प्रदेश वगळता शेळ्या-मेंढ्यांचे पालन विपुल प्रमानात होवू लागले. दायमाबाद, इनामगांव, सावळदा, जोर्वे येथील व विदर्भातील महापाषाणकालीन अवशेषांत शेळ्या-मेंढ्याचे मोठ्या प्रमाणावर अस्तित्व मिळुन आले आहे. त्या काळात मनुष्य स्वत:साठी व पशुधनासाठीही कृत्रीम निवारे बनवत होता. आपले खिल्लार किंवा मेंढरांचे कळप घेवून चरवु कुरणांचा शोध घेत भटकणे सुरुच होते.

जवळपास वीस हजार वर्ष मनुष्य हा पशुपालक मानवच होता. जीवनोपयोगी अनेक शोध अद्याप लागायचेच होते. त्यामुळे एकच व्यवसाय असल्याने श्रमविभाजन असले तरी जाती बनण्याची सोय नव्हती. अद्यापही समाजव्यवस्था टोळी स्वरुपाचीच होती. ह सर्व समाज त्या काळात मातृसत्ताक पद्धती पाळत असे. उत्खननांत ज्याही प्रतिमा मिळाल्या आहेत त्या मातृदेवतांच्याच आहेत. एकार्थाने शक्ति पुजा ही सर्वात आधी सुरु झाली असे जे मानण्यात येते त्याला उत्खनित पुरावे दुजोराच देतात. महाराष्ट्रातील रेणुका, महालक्ष्मी, यल्लम्मा आदि देवतांची ठाणी याच पुरातन काळात कधीतरी निर्माण केली गेली.

पुढे शेतीचा शोध लागला. सरासरी बारा हजार वर्षांपुर्वी. ही शेती प्राथमिक स्वरुपाची होती. निम-भटक्या पशुपालकांना स्थिर होण्याची सोय या अत्यंत महत्वपुर्ण शोधाने केली. मनुष्य हा नद्या-ओढे, जलाशये यांचा जवळ वास्तव्यास येवू लागला. आपल्याला महाराष्ट्रात जेवढे पुरातत्वीय अवशेष मिळतात ते सर्व नद्यांच्याच खो-यांत आहेत. पशुपालक मानव हा तरीही काही हजार वर्ष निमभटका राहिला.  याचे कारण म्हणजे आपले पर्यावरण. पावसाळ्यात एकच पीक घेता येत असे. उर्वरीत काळ शेळ्या-मेंढ्यांना चरण्यासाठी घेवून जावे लागतच असे. पण नद्या-ओढ्यांना बांध घालुन अथवा विहिरे खोदुन शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यापरयंतची प्रगती जशी घदली तशी रब्बीची पीकेही तो घेवु लागला. येथे समाजाचे दोन भागांत विघटन झाले. एक वर्ग पुर्णतया शेतीकडे वळाला तर उर्वरेत आपल्या मुळ व्यवसायालाच चिकटुन राहिले. म्हणजे शेती तेही करत पण मुख्य साधन पशुपालन हेच राहिले.

थोडक्यात हे पशुपालक लोक आजच्या धनगर, गोपाळ व शेतकरी (कुणबी) व अन्य सर्वच जातींचे पुरातन पुर्वज होत असे म्हणायला प्रत्यवाय नाही. महाराष्ट्रात सनपुर्व दोन हजारापर्यंत महाराष्ट्र हा मुख्यत: धनगरांनीच व्यापला होता असे स्पष्ट दिसते. तोपर्यंत महाराष्ट्र अनेक जानपदांत विभागला गेला होता. गोपराष्ट्र, पांडुराष्ट्र, अश्मक, कुंतल आणि मल्लराष्ट्र असे महाराष्ट्रातील जानपदांचे उल्लेख महाभारतात येतात. महाराष्ट्र म्हणजे अनेक रट्ठांचा समुह. "राष्ट्र" हा शब्द मुळ प्राकृत "रट्ठ" या शब्दाचे संस्कृतीकरण आहे.  या जानपदांवरील सत्ता या प्राय: पशुपालकांच्याच होत्या. पशुपालकांची महत्ता शेतकरी समाजापेक्षा साहजिकच मोठी होती. महाराष्ट्रातील विराट राजा हा गोपालक होता. औंड्र सातवाहन हे धनगर होते. पुंड्रपुर उर्फ आजचे पंढरपुर हे धनगरांच्याच राज्याची राजधानी होते. मल्ल राष्ट्र हेही धनगरांचेच. खानदेश (कान्हदेश) येथे अहीर धनगर व गोपाळांच्याच सत्ता होत्या. उत्तरेत नंदराजा हाही गोपाळ. माहाभारात बव्हंशी युद्धे ही पशुधन प्राप्तीसाठीच झालेली दिसतात. याचे कारण म्हणजे पशुधन हेच श्रेष्ठ धन आहे असे मानण्याचा प्रघात होता. ज्याचे पशुधन अधिक तो राजा असे मानण्याचा प्रघात होता. शेती व्यवसायाला अद्याप प्रतिष्ठा यायची होती.

धनगर हा शब्दच मुळात "धनाचे आगर" या अर्थाने वापरला गेला आहे.  आणि ते संयुक्तिकही होते कारण अखिल समाज अद्यापही बव्हंशी मांसाहारीच होता आणि ती गरज हाच समाज पुरवू शकत होता. पुढे या समाजातुन लोकरीपासुन वस्त्रे व कांबळी विणन्याची कला प्रगत झाली. त्यांची आर्थिक भरभराट व्हायला या कलेनेही हातभार लावला. स्वाभाविकपणे जे या व्यवसायाला चिकटुन राहिले त्यांची स्वतंत्र पोटजातच पडली. अशा रितीने पोटविभाजन होत कालौघात आधी बारा तर आता जवळपास बावीस पोटजाती धनगर समाजात पडल्या आहेत. मुळचे आपण सारेच एक होतो हे भान हा समाज आता पुर्णपणे विसरला आहे.

जसजसे पुढे अनेक मानवोपयोगी शोध लागु लागले तसतसे याच समुदायातील लोक त्या त्या व्यवसायांत पडु लागले. मग ते सुतार असतील कि लोहार. सोनार असतील कि चर्मकार. गवंडी असतील कि वडारी, वाणी असतील कि वंजारी....हे व्यवसाय निष्ठ विभाजन होत गेले. आद्य पुरोहित वर्ग पंधरा-वीस हजार वर्षांपुर्वीच याच समुदायातुन निर्माण झाला हे समाजशास्त्रीय वास्तवही येथे विसरता येत नाही.

दैवते व धर्मश्रद्धा:

धनगर असोत कि गवळी, हे समुदाय शैव आहेत. ते नुसते शैवच आहेत असे नव्हे तर त्यांच्या काही महान पुर्वजांना त्यांनी दैवत प्रतिष्ठा दिल्याचेही आपल्याला इतिहासात डोकावून पाहिले तरी स्पष्ट दिसते. पौंड्र धनगरांनी दक्षीण महाराष्ट्र व्यापला. पुंड्रपुर (आजचे पंढरपुर) ही त्यांची राजधानी होती. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात पुजला जातो. (पहा-विट्ठलाचा नवा शोध -संजय सोनवणी.). अहिर धनगरांपैकी इश्वरसेन राजाने इसवी सनाच्या तिस-या शतकात आपली सत्ता निर्माण केली होती व ती दीद्शे वर्ष टिकली हेही लक्षात घ्यावे लागनार आहे.

खंडोबा हे लोकदैवत असुन नंतर त्याचे मार्तंड-भैरव वा शिवाशी नाते जुळवले गेले असे सोंथायमर ते डा. रा, चिं. ढेरे सांगतात. पण हे मुळचे वास्तव नाही. धनगर (औंड्र/पुंड्र/अहिर इ.) हे सारेच मुळचे शिवपुजक आहेत. सातवाहन घराण्यात स्कंद (हे संस्क्रुतीकरण आहे...मुळ नाव खंड...त्याच्या काही नाण्यांवर फक्त "खद" असेही लिहिलेले आहे...कदाचित अनुस्वार कालौघात अस्पष्ट झाला असेल.)धनगर राजे आपापसातही युद्धे करत असत, अन्यायी सत्ता उलथुन टकत असत. कालौघात याच महापुरुषांचे दैवतीकरण केले गेले एवढेच. खंडोबा ही एक ऐतिहासिक व्यक्ती होती असे डा. रा. चिं. ढेरे व सोंथायमर यांनीही नमुद करुन ठेवले आहे.

परंतु सर्वच महाराष्ट्र मुळात एकाच समुदायातुन विभक्त झाला असल्याचे वास्तव जनस्मृतींत कायम असल्याने खंडोबा आणि श्रीविट्ठल ही सर्वच जातीजमातींची कुलदैवते बनली हे वास्तव आपण विसरु शकत नाही. आजच्या सर्वच मानवी समाजांचे मुळ हे पशुपालक समुदायांत आहे हे या निमित्ताने लक्षात यावे. त्यामुळे जाती-जातींतील अकारणचे दुराग्रह अत्यंत अयोग्य आहेत हे आपल्याला समजावुन घ्यावे लागनार आहे.येथे एकच उदाहरण पुरेसे आहे. अहिर हे जसे धनगर समाजात आहेत तसेच ते सोनार, शिंपी, कोळी, सुतार, आगरी, मराठा अशा समाजांतही आहेत. गुजर पशुपालकांबाबतही आपण असेच पाहु शकतो. याचाच अर्थ असा कि एकच समुदाय व्यवसायनिष्ठतेने विभागला गेला पण मुळ हे एकच होते.

जवळपास तेराव्या शतकापर्यंत राष्ट्रकुट, भोज, कदंब, यादव अशा सत्तांच्या रुपाने पशुपालकांच्या सत्ता महाराष्ट्राच्या बव्हंशी भागात कायम राहिल्या. महाराष्ट्री संस्कृतीची त्यांनी अगत्याने जोपासना केली. महाराष्ट्री भाषेला भरभक्कम आधार दिला. गड-किल्ले यांच्या उभारण्या त्यांच्याच काळातल्या. बौद्ध व शैव लेण्यांची निर्मितीही त्यांच्याच काळातली. महाराष्ट्रातील आर्थिक भरभराट जी झाली तेही याच काळात.

पण याच काळात अनेक उद्योग व व्यवसाय निर्माण झाल्याने समाज जातीविखंडितही होवू लागला. आपले मुळ विसरत नवीन अभिमान  निर्माण होवू लागले. मुळ पशुपालन व्यवसायाला मुलभुत प्रेरणेने जे चिकटुन राहिले ते समाजिक परिप्रेक्ष्यात मागे पडु लागले. वर्णव्यवस्थेचा पगडा पडु लागला. हे सर्वांबाबतच होवू लागले. कोणीही असो, त्याचे पुरातन मुळ हे याच पशुपालक समाजात आहे हे भान हरपले. आणि तेथेच धनगर-गवळ्यांचीच काय सर्वच समाजांची अधोगती सुरु झाली. तेराव्या शतकानंतरचा धनगरांच्या इतिहासाचा नवाच अध्याय सुरु होतो. ते पुढील भागात!

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५


महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार: धनगर-गवळी (भाग १)

Sunday, August 26, 2012

तिरस्काराच्या पलीकडे..

वाचावे नेट-के : तिरस्काराच्या पलीकडे..Bookmark and SharePrintE-mail

सोमवार, १६ जुलै २०१२
आम्ही जे सांगतो आहोत ते सत्यच आहे, असा समज कुणाचाही असू शकतो आणि ब्लॉगजगतात या समजाचे विविध आविष्कार दिसतात. त्यापैकी जे आग्रही दावे केवळ स्वत:बद्दल किंवा आप्तस्वकीयांबद्दल असतात, ते निरुपद्रवी मानून वाचक पुढे जातो.
पण समाजाबद्दल किंवा भारतीय- महाराष्ट्रीय समाजरचनेत आजही ठसठसणाऱ्या ‘जाती’ या विषयाबद्दल असे ‘आपलंच खरं’ मानणारे आग्रही दावे कुणी ब्लॉगवर करत असेल, तर त्यामागचा हेतू केवळ सत्यकथनाचा आहे की उपद्रवी विधाने करण्याचा, असा प्रश्न वाचकाला पडतो. उदाहरणार्थ, एखाद्या वाचकाला, ‘अब्राह्मणी’ ही संकल्पना व्यापक अर्थाची आहे हे पटत असेल, तरीही त्याला अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर ‘अब्राह्मणी’ या संकल्पनेचं जे स्तोम माजलेलं दिसतं, ते पटणार नाही. ‘हा समाज विरुद्ध तो समाज’ हेच सत्य असल्याचा आग्रह अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरच्या अनेक (बहुतेक) नोंदींचा पाया आहे. ‘ब्राह्मण गोमांस खात होते’ हा ‘द होली काऊ’ यांसारख्या पुस्तकात आधीच अभ्यासूपणे ग्रथित झालेला दावा अनिता पाटील यांनी ब्लॉगलिखाणात अशा प्रकारे केला आहे की तिरस्कार ही भावनाच लिखाणात प्रबळ होते आहे, याची खात्री वाचकाला पटावी. ही खात्री पटलेल्या वाचकांचे मग दोन तट पडतात : पहिला, ‘होय- तिरस्कारणीयच’ असा पवित्रा घेतो. दुसरा- आपल्यावरच तिरस्काराचा हल्ला झाला आहे असं समजून प्रतिहल्ल्याची तयारी करू पाहतो. स्वत: ब्लॉगलेखक वा लेखिकेला हा तिरस्कार हवाच असतो का, पसरवायचाच असतो का, याबद्दल संबंधित लेखकांनी जरूर बोलावं, पण अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरल्या प्रतिक्रिया पाहिल्या असता- ‘तिरस्काराच्या भावनेची चाहूल ब्लॉगलिखाणातूनच लागल्यामुळे पडलेले दोन तट’ आणि त्यानुसार प्रतिक्रियांचेही दोन प्रकार- हे उघडपणे दिसेल.
तिरस्कारजनक किंवा तिरस्कारजन्य प्रतिक्रिया संजय सोनवणी यांच्या ब्लॉगवर कमी दिसतात, याचं कारण त्यांच्या ब्लॉगवरलं लिखाण. ते सहसा केवळ तिरस्कारवादी किंवा तुच्छतावादी नसतं. आपण सगळेचजण आपला इतिहास समजून घेऊ.. ‘हे म्हणजे इतिहास’ एवढंच जे तथाकथित मुख्य धारेतल्या शैक्षणिक संधींनी आपणा सर्वाच्या माथी मारलंय त्याच्या पलीकडे जाऊन आपण सगळेजण कसे होतो हे पाहू, असा त्यांच्या ब्लॉगचा हेतू असावा असं नोंदींमधल्या विविध संदर्भामुळे लक्षात येत राहतं. म्हणजे या ब्लॉगची बैठक ही अभ्यासकाची आहे. शोधकाची आहे. त्यांच्या ब्लॉगचा हेतू केवळ इतकाच नाही. सोनवणी हे प्रकाशन-क्षेत्रात आहेत आणि त्यांच्या स्वलिखित पुस्तकांची संख्याही भरपूर आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. छापील माध्यम हाती असताना ब्लॉगसारखं संवादमाध्यम वापरून, चर्चा घडवून आणण्याकडे या ब्लॉगचा कल दिसतो. सभासदसंख्या बऱ्यापैकी असल्यामुळे चर्चा होतेसुद्धा. अगदी ‘शेतमालाचे निर्जलीकरण’ या विषयावरसुद्धा दिल्लीच्या प्रताप नलावडे यांनी ‘तापमान १४० हे चूक- फारतर १२० तापमान हवे’ अशी- म्हणजे ‘दाद- वाहवा’च्या पलीकडची प्रतिक्रिया दिली होती.
या ब्लॉगला दाद मिळते, पण ती अभावितपणे. संजय सोनवणी हे मनस्वी लेखक आहेत आणि ते एकटे आहेत की एखादी टीम संजय सोनवणींचा ब्लॉग लिहिते असा प्रश्न पडतो, असा अभिप्राय संभाजी घोरपडे यांनी ११ जुलै रोजी दिला होता.  ‘मनस्वी’ हा शब्द फार गुळगुळीत झालेला वाटेल, पण सोनवणींच्या ब्लॉगवरले लिखाण कसं असतं आणि ते तसंच का असते, हे समजून घेण्यासाठी तो फार महत्त्वाचा आहे. सोनवणी यांच्या लिखाणात अभ्यास, संकल्पना आणि व्याख्या यांची समज, पुरोगामित्वाच्या मर्यादा ओलांडण्याचा आणि बुद्धिनिष्ठच राहण्याचा प्रयत्न हे सारे दिसत असले तरीही मध्येच साप, वांझ, षंढ.. असे हीनत्वदर्शक शब्द सोनवणी यांच्याही लिखाणात दिसतात. हे शब्द निव्वळ भावनिक प्रतिसाद म्हणून वापरलेले (किंवा असा भावनिक प्रतिसाद यावा म्हणून योजलेले) आहेत, यात शंका नाही. संजय सोनवणी यांच्या लिखाणामागचा हेतू भावना भडकावण्याचा नसतो आणि तरीही जोरकसपणासाठी असले शब्द ते वापरतात, याचा अर्थ लिखाणातला मनस्वीपणा, असा घेतला जाणार आहे.
लिखाणात एकतर मनस्वीपणा असू शकतो किंवा अभ्यासूपणा तरी. या दोन्ही तलवारी संजय सोनवणी यांच्या ब्लॉगमध्ये एकाच म्यानात दिसतात. बऱ्याचदा अभ्यासू लिखाण इतकं असतं की, या नोंदी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनं एखाद्या शिक्षकाकडून घेतलेल्या नोट्स- आहेत, असा भास व्हावा. पाणिनी आणि त्याचा काळ याबद्दलचं सोनवणी यांच्या ब्लॉगवरचं लिखाण हे असंच नोट्सवजा आहे. ब्लॉगनोंदीच्या साधारण कल्पनीय आकाराच्या मानानं ते बरंच लांबलचकही आहे. पण सोनवणी यांना अखेर एक निष्कर्ष मांडायचा आहे किंवा असलेल्या निष्कर्षांची बाजू घ्यायची आहे. ती बाजूच खरी, असा त्यांचा आग्रह नाही. उलट, ही माझी बाजू आहे आणि त्यावर तुम्ही चर्चा करू शकता, असं आवाहन त्यातून वाचकाला मिळू शकतं आणि अनेक वाचक ते घेतात, असं प्रतिक्रियांची संख्या आणि सूर यांवरून दिसून येतं.
संजय सोनवणी यांचा ब्लॉग हा ‘यशस्वी’ ब्लॉगपैकी एक आहे. सोनवणी यांचे लेख अन्यत्र (दैनिकं, दिवाळी अंक) छापून येत असले, तरी ते इथे तसेच्या तसे डकवण्याचा उद्योग कमी आहे. आठवडय़ातून जवळपास तीन नोंदी, एवढय़ा संख्येनं वाचनसंधी देणारा हा ब्लॉग आहे. इथे विषयांचं वैविध्य असलं तरी ‘खऱ्या’ पुरोगामित्वाच्या शोधात सोनवणी आहेत आणि त्यांचा ब्लॉगयज्ञही त्यासाठीच आहे, अशी वाचकाची धारणा झाल्यास हा ब्लॉग वाचनीय ठरू शकतो. आजच्या पुरोगाम्यांचा धिक्कार करण्याची जी कारणं सोनवणी यांच्याकडे आहेत, ती एरवी पुरोगाम्यांना हास्यास्पद अथवा दुष्ट ठरवणाऱ्यांपेक्षा नक्कीच वेगळी आहेत.
अगदी ताज्या, अलीकडच्या तीन नोंदींमध्ये परमेश्वर, धर्म आणि आनंद-दु:ख यांच्यावरचे विचार सोनवणी यांनी मांडले आहेत. हे विचार फक्त त्यांचे अर्थातच नाहीत. ते संस्कृतीचं आणि विचारधनाचं सार आहे.. त्यातून सोनवणी यांनी अमुकच का वेचलं, याचं स्पष्टीकरण त्यांच्या लिखाणातून मिळतं, हा त्या लिखाणाचा गुणच आहे. मात्र, शैलीदृष्टय़ा या तीन नोंदींकडे पुन्हा एकवार कुतूहलानंच पाहावंसं वाटेल. फेसबुकवरचा चटपटीतपणा, ट्विटरवरली शब्दमर्यादा या सर्वाची उगाच आठवण समजा या तीन नोंदी वाचताना झाली, तर याच नोंदींबद्दल अशी काळजीही वाटू लागेल की, ‘हे आता कुणीतरी मेलवर ‘फॉरवर्ड’ वगैरे करणार की काय?’  ‘कल्ट’ ठरण्याचा- पंथाभिमानाचा धोका संजय सोनवणी यांच्या ब्लॉगला आहे आणि तो लेखकामुळे नसून उत्साहीपणे किंवा आपले आग्रही दावे या ब्लॉगवर लादून इथल्या नोंदी वाचणाऱ्या वाचकांमुळे आहे.. हा धोका या नोंदीपासून सुरू झाला आहे, हे आत्ताच या ब्लॉगची दखल घेण्याचं एक निमित्त. स्वत: भरपूर ब्लॉगिंग करणाऱ्या सागर भंडारे यांनी या ब्लॉगची शिफारस केली होती.
अभिनवगुप्त

मनुष्य....त्याची भ्रामकता याबद्दल....


१. मानवी मन हे एक अथांग, अंधारी आणि तरीही अपार जिज्ञासेने भरलेले गुढतम कुहर आहे. मानवी मनाचा वर्तमानकालीन जागृत भाग हा अत्यंत अल्पांश असून भुतकालातील अर्धजागृत वा सुप्ततेत असणा-या, बव्हंशी असत्यच असणा-या मित्थकांत घोटाळत तर असतेच त्याच वेळीस अगदीच अज्ञात असलेल्या भवितव्यात ते वर्तमानापेक्षाही अधिक रममाण असते.

२. त्यामुळे मनुष्याचा वर्तमान हा वास्तव रहात नाही. भुतकाळाची मिथकरुपी गडद छाया आणि अज्ञात भविष्याची उत्कंठावर्धक आकांक्षा यात त्याचा वर्तमान हा नेहमीच झाकोळुन गेलेला असतो. त्यामुळे जो भुतकाळ बनतो, म्हणजे वर्तमान क्षणाक्षणाने भुतकाळ बनत असल्याने, तोही अवास्तव व रोगट असतो...तर त्याच वेळीस, मुळात भवितव्य हे घडीव, ठशीव, आणि ज्याबाबत पुर्वभाष्य करत येईल आणि जे होणर आहे ते तसेच्या तसे वर्तमानात बदलनारच आहे, असे काही मुळात नसल्याने भवितव्याला कसलाही ठाम मुलाधार नसतोच.

३. वर्तमान हा अत्यंत क्षणिक असतो. तो बरोबर भुतकाळाच्या पात्रात जावुन मिसळत असतो तर तेवढ्याच गतीने भवितव्यही वर्तमानात येत असते. पण भवितव्यातुन वर्तमानात येणारे आणि वर्तमानातुन भुतकाळात मिसळनारे क्षण नेमके कोणती मानवी मानसिक क्रिया-प्रतिक्रिया घडवत असतात?

४. माणुस वर्तमानकालीन जीही कृत्ये करतो त्यांवर भुतकालीन अनुभवांची छाप असते तसेच भवितव्यात इप्सित असे काही घडु शकेल या अंदाजापोटीचे काही आडाखेही असतात हे खरेच आहे. पण भुतकालीन अनुभव आणि त्यावरील आधारित भविष्याचा अंदाज व त्या आधारित वर्तमानात घेतले जाणारे निर्णय हवे तेच भवितव्य निर्माण करतातच असे नाही असेही आपण पाहु शकतो.

५.  तरीही मानवी वर्तमान हा मानवी परिप्रेक्षात भुतकाळ आणि भविष्यकाळाने ग्रसित झालेला असतो हे आपण सहज पाहु शकतो.

६. म्हणजेच माणसाच्या वर्तमानाला तसा काही अर्थ नसतो...जसा तो भुतकाळालाही नसतो आणि भविष्यकाळालाही नसतो.

७. म्हणजेच भुतकाळात कोणी काही अचाट कर्मे केली असे समजत आपला भुतकाळ अत्यंत वैभवशाली होता असे जे मानतात तेही चुक करत असतात. कारण भुतकाळातील व्यक्तींचा वर्तमान आपल्याला माहितच नसतो. (म्हणजे ते जेंव्हा जगत होते तेंव्हाचा त्यांचा सापेक्ष वर्तमान) भुतकाळ अथवा इतिहास हा बव्हंशी तथ्यात्मक नसुन आपल्याच आजच्या वर्तमानाचे गत्तैतिहासाचे एक प्रतिबिंब असते. इतिहास आपण तसाच पाहु इच्छितो जसा तो आपल्याला पहायला आवडते.

८. त्यामुळेच इतिहासाबद्दल विवाद होतात, कारण प्रत्येकाला जो इतिहास पहायचा आहे तो तसाच सर्वांनी पहावा असा आग्रह असतो. तीच साधने, तेच पुरावे आणि त्याच धारणा यांचाच आधार घेत जेंव्हा परस्परविरोधी मतांतरे येतात याचाच अर्थ असा असतो कि सर्वच इतिहास खोटा असून तो केवळ आपापल्या वर्तमानकालीन भविष्यकाळाच्या दडपनामुळे/अपेक्षांमुळे आक्रमकेतेने मांडावा लागतो...एवतेव तो इतिहास खोटाच असतो.

९. भुतकाळ हा कोणीही...भुतकालीन वर्तमानात असणारेही, कधीही निरपेक्षपणे नोंदवु शकत नाहीत. निर्णयप्रक्रियेत सामील होणा-या-कृत्यांत सामील होणा-या कोणचीही मानसिक प्रक्रिया कधीही नोंदवली जावू शकत नाही. म्हणुन इतिहास फक्त सनावळ्यांची नोंदपुस्तिका बनते ती यामुळेच. आजच्या...या क्षणातील वर्तमानाचा त्याकडे पहायचा दृष्टीकोन पुन्हा ज्याच्या-त्याच्या दुषित (भुत-भविष्यामुळे) वर्तमानावर अवलंबुन राहील. यामुळेच एखाद्याला महायोद्धा वा महापुरुष मानणा-यांना तोच योद्धा कसा कापुरुष आणि खलपुरुष होता हेही तेवढ्याच ताकदीने प्रतिवादार्थ सांगता येवू शकते. यच्चयावत विश्वात कोणी महापुरुष होत नसतो...होत नाही आणि होणारही नाही.

१०. महापुरुष हे समाजाचे त्यांच्या वर्तमानातील असह्य आक्रोशाचे रुप असतात. ते खरे महापुरुष नसतात. कोणात तरी मानवी समाज आपापल्या तत्कालीन व्यथा-वेदनांचे आरोपन करत असतो आणि मग कणाहीण माणसेही महापुरुष बनवले जात असतात, ते मुळात महापुरुष असतात म्हणुन नव्हे.

११. म्हणुनच प्रत्येक कथित महापुरुषाला त्याच्या काळचौकटीचे बंधन आहे. त्यांना वर्तमानात आणण्याचा प्रयत्न केला जातो...पण त्यामागे वर्तमानातल्यांना आपणही तसेच आहोत असे दाखवण्याचा अट्टाहास असतो...पण खुद्द मुळ महापुरुष आजच्या वर्तमानात उतरले तर तेही कदाचित क्षुद्र ठरतील...कारण कोणाचेही महानत्व मुळात वास्तव नसते.

१२. म्हणुन भुतकाळ हा जसा काळसापेक्ष चौकटीत निरर्थक असतो तसेच भवितव्यही, कारण भवितव्याला तर तसे काहीएक भौतिक अस्तित्व नसते. पण आपण वर्तमान मात्र भुतकाळाच्या अज्ञ चौकटीत कोंबत भवितव्याची कामना करत असतो. आणि म्हणुनच मानवी समाज आपले आदिम इप्सित साध्य करु शकलेला नाही.

१३. समाजाला जेंव्हा आराध्यांची गरज वाटते...गतकालीन महामानव यांचेच पाय धरावे व चिंतन मिळवावे असे जेंव्हाही वाटते तेंव्हा याचाच अर्थ असा असतो कि समाज अध:पतीत होण्याचेच हे लक्षण आहे.

१४. जोही समाज गतकालीन वा वर्तमानकालीन कोणालाही आराध्य मानतो व त्याची अंध पाठराखन करतो तेंव्हा त्याची फसवणुक अटळ असते...कारण "आराध्य" हे समाजाचीच उपज असते...कोणी निसर्गता: आराध्य असुच शकत नाही.

१५. आणि आराध्य हवे वाटते याचाच अर्थ व्यक्ती भुत-वर्तमान-भविष्य याचा तोल हरपुन बसलेली असते...नेमके कोणत्या काळात जगायचे याचे भानही नसते...या एकुणतील असमतोलातुन त्या त्या काळातील आराध्ये निर्माण होत असतात. अनेक आराध्ये जी गतकाळातील असतात...तेंव्हा ती आराध्येही नसतात...पण वर्तमान तोषवण्यासाठी तीही आराध्ये बनवली जातात...ही मानवी वंचना आहे.

१६. माणुस हा यच्चयावत विश्वातील अवैज्ञानिक आणि स्थल-कालसापेक्ष किमान ज्ञानापासुन दुरच होता आणि दुरच राहील. याला मुख्य कारण म्हणजे त्याची भावनिकता आणि त्याचे कालसंदर्भचौकटीत रहात असुनही होत असणारे कालसंदर्भातील भावनिक गोंधळ.


17. आणि म्हणुनच माणसाला भुतकाळाबद्दल अधिक बोलायला आवडते...भवितव्याची स्वप्ने पहायला आणि दाखवायला आवडते...मनुष्य कधीच वर्तमानात जगत नाही. आणि म्हणुणच तो दु:खी असतो. म्हणुणच तो कधीही त्याला जसेही हवे वाटते असे भवितव्य घडवु शकत नाही. म्हणुनच मनुष्य एक कणभरही पुढे सरकलेला नाही...भलेही भौतिक प्रगती कितीही साधली गेलेली असो.



Wednesday, August 22, 2012

महात्मा ते महात्मा


या देशात महात्मा पदवी मिळालेल्या दोनच महान व्यक्ती आहेत...पहिले म्हणजे महात्मा फुले आणि दुसरे म्हणजे महात्मा गांधी. पहिल्याने मानवी स्वातंत्र्याचा एल्गार केला तर दुस-याने मानवी स्वातंत्र्याला अस्तित्वात आणले...

महात्मा फुले शोषितांचे, वंचितांचे अस्पृष्यांचे, नाडल्या जाणा-यांचे पहिले कैवारी बनले. बहुजनीय सामाजिक चलवळीच्या पाया जातीभेदातीत होवून त्यांनी घातला. शेतक-यांचा आसुड लिहुन त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या शिका-यांना उजेदात आनले. गुलामगिरी लिहुन त्यांनी वैश्विक केवळ भारतीयच नव्हे तर वैश्विक गुलामगिरीकडे जगाचे लक्ष वेधले. त्यासाठी नवीन सर्वैक्याचे तत्वज्ञानही निर्माण केले.

महात्मा गांधींनी त्याच मुलभुत तत्वज्ञानाला अधिक व्यापकता देत सर्व राष्ट्राला राजकीय, मानसीक आणि वैचारिक गुलामीतुन बाहेर काढत एक नवीन राष्ट्रीय आत्मा सर्वांत भरला. अध्यात्माला नवा अर्थ दिला. मानवी जीवनाचा नवा संदर्भ शोधला. महावीर, बुद्ध आणि कृष्णाच्या तत्वज्ञानाला एक नवे रंगरुप देत एक नवा राष्ट्रधर्म घडवला. भारतीय घटनेने तो धर्मनिरपेक्ष आत्मा जपला.

सत्य, अहिंसा, अतुलनीय धैर्य, जीवनाकडे अतिव्यापक दृष्टीने पाहण्याची सर्वसमावेशक भुमिका...

म्हणुन देशवासियांनी केवळ या दोघांनाच महात्मा म्हणुन गौरवले आहे...

महात्मा ते महात्मा ही वाटचाल या देशाने केली म्हणुन आज जोही काही भारत आहे तो शिल्लक आहे...

Tuesday, August 21, 2012

ज्यांनी जगाला झिंगवले...



मनुष्याचा इतिहास हा मोठा अजब आहे. मानवाने प्रतिकुल निसर्गाशी झुंज घेण्यासाठी जसे जीवनोपयोगी शोध लावले तसेच विरंगुळ्यासाठी, बेधुंद होण्यासाठीही काही शोध लावले. मद्याचा शोध यापैकीच एक म्हणता येईल. पाश्चात्य जगात मद्यप्रतिष्ठा आहे असे मानण्याचा आपला कल आहे. पण ते खरे नाही. भारतात एके काळी मद्याला अत्यंत प्रतिष्ठा होती. पुरुषच काय पण स्त्रीयाही विपुल प्रमाणात मद्यपान करत असत. गांवोगांवी मद्यपानाच्या सार्वजनिक सोयीसाठी पानकुट्या असत. भारतात मद्य बनवण्याचा शोध अत्यंत प्राचीन काळी लागला असे मत सर जोन व्यट या इतिहाससंशोधकाने व्यक्त केले आहे. भारतात या संपुर्ण व्यवसायाचे श्रेय कलाल या जातीकडे जाते. ही जात देशभर आढलत असली तरी तिला स्थानपरत्वे वेगवेगळी नांवेही पडलेली दिसतात. उदा. कलाल, कलवार, कलार, कलान ही नांवे अधिक प्रचलित असली तरी सोंडी, शौडिक, सुंडि अशीही नांवे उत्तर व दक्षीण भारतात प्रचलित आहेत.

या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे मद्य निर्मितीतील त्यांची विशेष कुशलता. भारतात मद्यनिर्मितीचा शोध सिंधुकाळापासुनच लागला असावा. तत्पुर्वी नशेसाठी लोक इफेड्रा व भांगेचाचाच उपयोग करत असत. वेदांत वैदिकजन जे सोमपान करत तो सोम म्हणजे अन्य काही नसुन इफेड्रा या वनस्पतीचाच रस होय. सोमपानाला एवढे महत्व होते कि ऋग्वेदाचे पहिले कांड हे सोमसुक्त म्हणुनच ओळखले जाते. अर्थात सुरेचा शोधही तोवर लागलेला होताच. पहिले मद्य हे ताड, शिंदी, नारळ अशा वृक्षांच्या रसाला आंबवून केले गेले असे साधरणतया मानले जाते. परंतु उर्ध्वपातन करुन मद्य बनवायचे शास्त्र विकसीत व्हायला इसपु सुमारे एक हजार सालापर्यंतचा काळ लागला. उर्ध्वपातनाची कल्पना मानवाला सुचली ही एक विज्ञानातील मानवाचे पुढचे पाऊल आहे असे मानले जाते. अविरत निरिक्षण व सातत्याने केलेल्या प्रयोगांमुळे ही कला विकसीत झाली. "कलाल" हे सार्थ नांव या समाजाला पडले ते यामुळेच!

ग्रीक पुराणकथांत डायोनियसला मद्याची देवता मानले गेले आहे. भारतात मद्याची अशी देवता मात्र नाही...असे असले तरी आद्य मद्यनिर्माता हा विश्वकर्माच आहे असे मानण्याचा प्रघात आहे. उर्ध्वपातन करुन मद्य बनवण्याची कला भारतीय हैहय वंशातील सहस्त्रार्जुनाच्या काळात (इसपु १०००) भारतात विकसीत झाली असे मानले जाते. भट्टीवर भांड्यात उकळती, वेगवेगळ्या मिश्रणाची, आंबवणे ठेवून ती वाफ नलिकेतुन नेत ती वाफ थंड करत थेंबाथेंबाने मद्य दुस-या पात्रात जमा करणे अशी ही मुळ प्रक्रिया. प्राचीन नलिका या मातीच्या वा लोहाच्या असत. मुख्य म्हणजे मुळात ही प्रक्रिया शोधने हे मानवी कल्पकतेची (व अपरिहार्य गरजेचीही) एक झलक होय. पण ही प्रक्रियापद्धत कशी शोधली गेली याबाबत इतिहास मौन पाळतो. आपण फक्त तर्क करु शकतो!

शौंडिक (सुंडी, सोंडी ही अपभ्रंशित नांवे) हे नांवही या जातीला मिळण्याचे एक कारण आहे. प्राचीन काळी पानकुटीत (मद्यपानगृहांना पानकुटी असे म्हटले जात असे.) चषकांत मद्य जे वाढले जायचे ते पखालीतुन हत्तीच्या सोंडेच्या आकाराच्या चर्मनलिकेतुन. त्यामुळे अशा मद्यदात्यांना म्हटले जावु लागले शौंडिक. पुढे त्यातुनच अनेक पोटजाती पुढे आल्या. पुर्वी मद्य साठवण्यासाठी पखालींचाच उपयोग केला जात असे. भारतीय मद्य जसे निर्यात होई तसेच रोममधुनही मद्य आयात करण्यात येत असे. रोमन मद्य हे चार ते पाच फुट उंचीच्या, मोठ्या घेराच्या अंफोरा नामक कुंभांतुन आणले जात असे. महाराष्ट्रात उत्खननांत अशा कुंभांचे अनेक अवशेष मिळालेले आहेत.

वेदकालात मद्याला "सुरा" असे म्हनत. मद्य व सोमरस एकत्र मिसळुन विकायचीही पद्धत होती. त्या मिश्रणामुळे कडक नशा होते असा समज होता. कोकटेलची याला प्राचीन पद्धत म्हणता येईल. मद्याची व सोमरसाची दुकाने वेदकाळातच उघडायला सुरुवात झालेली होती असे याज्ञवक्ल्य स्मृतीनुसार दिसते. मद्य बनवनारे व ते विकणारे असे दोन वर्ग एकाच व्यवसायात निर्माण झालेलीही आपल्याला वेदकाळातच दिसते. सार्वजनिक मद्यपानगृहांत (पानकुटी) अनेक प्रकारची मद्ये सजवुन ठेवली जात असत व विविध प्रकारांच्या चषकांतुन ग्राहकांना दिली जात असत. काही चषक सोण्याचे व रत्नजडीत असत तर काही स्पटिकांचे...काही लाकडी तर काही मातीचे...ज्याची जशी आर्थिक ताकद तसा चषक व उंची मद्य...हे ओघाने आलेच! हळुहळु भारतात मद्यनिर्मितीचे स्वतंत्र शास्त्रच बनु लागले. उसाचा रस, द्राक्षरस, मोहाची फुले, यव व तांदुळ अशा अनेक पदार्थांपासुन मद्य निर्माण केले जात असे. अमरकोशात चोवीस प्रकारच्या मद्यांची नोंद मिळते...यावरुन मद्यशास्त्राच्या प्रगतीचा अंदाज येईल.

उच्चभ्रु लोक शक्यतो मसाल्यांनी सुगंधीत केलेले मद्य पीत असत. मदिरा जेवढी जुनी तेवढी तिची नशा औरच असेही त्यांना समजलेले होते. निघंटरत्नाकरात "जुने मद्य व तेहे सुगंधीत केले असेल तर ते नुसती नशाच देत नाही तर सर्व रोगांचा नाश करते" असे म्हणुन ठेवले आहे.

मद्यनिर्मितीचा उद्योग भारतात खेडोपाडी प्राचीन काळापासुन पसरलेला होता. खेड्यांतील पानकुट्या गांवाबाहेर असत. गाथा सप्तशतीत अशा पानकुट्या व मद्यपानाला समर्पित केलेल्या अनेक गाथा आहे. स्त्रीयाही मद्यपानात मागे नव्हत्या हे वर नमुद केलेलेच आहे. घरात साठवलेले मद्य त्या पीत असत. त्यांच्य मुखाला येणा-या मद्यसुगंधावरही अनेक अप्रतीम कविता गाथासप्तशतीत येतात.  पण त्याच्याही पुर्वी रामायण काळात सीता व तिच्या दास्याही मद्य घेत असत असा उल्लेख मिळतो. लंकेत तर मद्याची रेलचेल होती. मदिरापानाने धुंद झालेल्या स्त्रीयांची वर्णणे रामायणात अनेक वेळा येतात. एवढेच नव्हे अशोकवनात रामाची सीतेशी पहिली भेट झाली तेंव्हा रामाने सीतेला स्वहस्ते मद्य प्यायला दिले होते. महाभारताचे तर विचारायला नको. कौरव पांदव व त्यांच्या स्त्रीया तर मद्यपान करतच पण कृष्णही मद्यपान करत असे. द्रोपदी व सुभद्रा यांनी वनविहाराला गेल्या असता मद्यपान करुन आलेल्या खुशीत आपले दाग-दागिने इतर स्त्रीयांवर उधळुन टाकले असे आदिपर्वात म्हतले आहे. एवढेच नव्हे तर यादवांचा विनाश हाच मुळात अति-मद्यपानाच्या धुंदीत आपापसात झगडुन झाला हे आपल्याला माहित आहेच. कालिदासाच्या काळातही प्रियजनांच्या आग्रहाखातर स्त्रीया मद्य घेत. शिव स्वत: मद्य पितो व पार्वतीलाही पाजतो असे कुमारसंभवात कालिदास लिहितो. अज आपल्या लाडक्या इंदुमतीला स्वत:च्या मुखातील मद्य पाजतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या "सोंडिआपन" या तत्कालीन गुत्त्यांचाही उल्लेख कालिदास करतो. याचा अर्थ येवढाच कि तत्कालीन समाजात मद्यपान ही निषेधार्ह बाब होती असे दिसत नाही. इसवी सनाच्या दुस-या शतकातील एका कुशाण शैलीतील शिल्पात मद्यधुंद गणिकेला इतर कसे सावरत आहेत हे दृष्य कोरण्यात आलेले आहे. वारांगना आणि मद्य यावर कुट्टनीमत व कामशास्त्रात विस्ताराने लिहिले गेलेले आहे. किंबहुना त्याला एक सामाजिक प्रतिष्ठा होती. उच्चभ्रु काय आणि जनसामान्य काय, मेजवान्या,  रिकाम्या वेळी व उत्सवप्रसंगी मद्यात झिंगणे पसंत करत असत. आणि तत्कालीन सामाजिक स्थिती व लोकांची मुळात असलेली उत्सवप्रियता व जीवनाचा आनंद मनमुराद लुटण्याची मनोवृत्ती पाहता ते स्वाभाविकही होते. आजचे नैतीक निकष पुरातन कालाला लावणे याला आपण सांस्कृतीक अडाणीपणा म्हणतो.

यादवांचा विनाश अतीव मद्यपानामुळे झाला या जनस्मृतींमुळेच कि काय, तेंव्हापासुन मात्रसुरापान करुन होणारी भांडणे, कलह याबाबत वेदांतच नमुद केले गेलेले होतेच. सोमपान हे यज्ञप्रसंगापुरतेच मर्यादित होवू लागले. मद्यपानाबाबत सामाजिक निषेध व्यक्त होवू लागला असावा. विशेषत: ब्राह्मणांवर हे निषिद्ध सर्वात आधी आले व क्रमाक्रमाने पुढील शेकडो वर्षांत समाजात पसरत गेले. अर्थात निषिद्ध मानने व ते पाळणे यात मोठा फरक असतो आणि तो भारतात आजतागायत राहिलेला दिसतो. म्हणजे सामाजिक दृष्ट्या मद्यपान निषिद्ध...पण पिणारे काही केल्या कमी होत नाहीत.

परंतु या सामाजिक निषिद्धाचा फटका कलाल समाजाला बसणे स्वाभाविक होते. पानकुटीला "चंडालकुटी" असे संबोधले जावू लागले असे गाथा सप्तशतीवरुन लक्षात येते. याचा अर्थ मद्य जरी सर्वांना प्रिय असले तरी ते बनवणारे व विकणारे मात्र गांवाबाहेर बहिष्कृत असे सामाजिक चित्र निर्माण होऊ लागले. पण कलालांच्या (वा शौंडिकांच्या) आर्थिक परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. तो पडणे शक्यही नव्हते कारण उच्चभ्रु असोत कि जनसामान्य, मद्याच्या मागणीत फरक पडलेला दिसत नाही. बंगालमधील कलाल तर आताआतापर्यंत एवढे श्रीमंत होते कि ते शंभर टक्के वार्षिक अशा अवाढव्य व्याजाने कर्जे देत आणि वसुलही करण्याची शक्ती बाळगत!

युद्ध आणि मद्य

प्राचीन काळी भारतीय सैन्यात हत्तींचे प्रमाण मोठे असे. युद्धाच्या वेळी हत्तींना मद्य प्यायला लावले जायचे. यामुळे बेधुंद झालेले हत्ती उन्मत्तपणे शत्रु सैन्यात कसलीही पर्वा न करता घुसत शत्रुसैन्याची दानादान उडवुन देत असल्याचे उल्लेख परकीय प्रवाशांनीही केलेले आहेत. युआन श्वांग हा चीनी प्रवासी सातव्या शतकात महाराष्ट्रात आला होता. त्याने महाराष्ट्राच्या केलेल्या वर्णनात तर मराठी योद्धे युद्धाला तयार होण्यासाठी मद्यधुंद होतात आणि मग एक भालाईत शत्रुच्या हजार सैनिकांना भारी पदतो. सम्राट हर्षवर्धनही मराठी लोकांना जिंकु शकला नाही त्याचे कारण म्हणजे मराठे सैन्य मद्य पिवून लढतांना भारी पडतात असेही तो नमुद करतो. ही प्रथा पार पानिपत युद्धापर्यंत चालत आलेली दिसते. तत्कालीन बुणग्यांत कलालांचाही समावेश होता. वीरश्री संचारण्यासाठी मद्यपान समाजमान्य होते असेच दिसते. या पद्धतीत आजही फरक पडलाय असे दिसत नाही हे आधुनिक युद्धतंत्रातील, सहसा अप्रकाशित ठेवल्या जात असल्या तरी, प्रत्यक्ष उदाहरणांवरुन दिसते.

असे असले तरी आधीच म्हटल्याप्रमाणे कलालांचा आर्थिक नसला तरी सामाजिक दर्जा मात्र घसरतच गेला. अनेकांनी इस्लाम व शीख धर्मातही प्रवेश केला. तेथेही त्यांची सामाजिक श्रेणी वाढली नाही. हिंदु कलाल हे बव्हंशी शिवभक्त व देवीभक्तच आहेत. या जातीत विविध वंशीय, काही प्रमानात परकीयही, आहेत व ते स्वाभाविक आहे. या जातीत मुळचे ब्राह्मण व क्षत्रीय वर्णीयही उतरले व हा व्यवसाय जसा सामाजिक दृष्ट्या बदनाम होवू लागला तसे तेही आपला मुळ दर्जा हरपुन बसले असेही मत रिश्लेसारखे मानववंशशास्त्रज्ञ व्यक्त करतात.

हा अत्यंत कौशल्याचा व्यवसाय होता. खेडोपाडी त्याची व्याप्ती जवळपास आता-आतापर्यंत होती.  आधुनिकीकरनाने अवाढव्य कंपन्या, साखरकारखानेच मद्यनिर्मितीत उतरल्याने कलालांची कला निष्प्रभ ठरत गेली. उंची मद्ये बनवणे त्यांना व ग्राहकांनाही परवडणारे नव्हते. मग हातभट्टी ही अत्यंत निकृष्ठ दर्जाची दारु बनवण्यात वापरली जावु लागली. त्यात सरकारी निर्बंध एवढे वाढले कि कलाल म्हणजे गुन्हेगार असाही समज होवू लागला. कडक मद्याच्या नांवाखाली मद्यनिर्मितीत असे काही घाणेरडे पदार्थ वापरले जावू लागले कि पिणा-यांना मरणाशीच गळाभेट घ्यावी लागावी.

कलाल समाज आता मद्यनिर्मितीच्या व्यवसायातुन बाहेर पडला आहे. जगण्याच्या नव्या वाटा त्यांनी स्वत:च शोधल्या आहेत. कलाल असोत कि शौंडिक...पोटजातींचा प्रश्न एवढा आहे कि ते आपापसातही उच्च-नीच भेद पाळतात. परंपरागत व्यवसाय तर गेला पण जात मात्र चिकटुन आहे. ही जातीय धार्मिक मानसिकता कोणाची पाठ सोडत नाही...ती का याचे समाज-मानसशास्त्र आपल्याला समजावुन घ्यावे लागणार आहे. कलालांनी राजे-महाराजे असोत कि आपले अवतारी पुरुष...योद्धे असोत कि जनसामान्य...यांना हजारो वर्ष झिंगवत त्यांच्या जीवनाला आनंदाचा मादक आधार दिला हे मात्र खरे.

मद्यपान हे वाईटच आहे...पण ती एक मानवी संस्कृतीच्या इतिहासातील एक महत्वाची घटनाही आहे. ती दखल या लेखात घेतली आहे...मद्यपानाची स्तुती करण्यासाठी नाही...

-संजय सोनवनी
९८६०९९१२०५




Saturday, August 18, 2012

महारक्षक ते महार... एक प्रवास!


महारक्षक ते महार... एक प्रवास!




(आजच्या महाराष्ट्र टाईम्समद्धे शुद्धोदन आहेर यांनी लिहिलेले माझ्या "महार कोण होते?" या पुस्तकावरील परिक्षण).


19 Aug 2012, 0000 hrs IST

शुद्धोधन आहेर

मानवी समाजाच्या ऐतिहासिक विकासकामात भारतीय उपखंडात आलेला ' जातिसंस्था ' हा विषयसमाजशास्त्रज्ञांनाच नव्हे , तर अनेक चिंतनशील संवेदनाक्षम व्यक्तिमत्त्वांनादेखील आव्हानास्पद वाटतो आहे .भारताच्या इतिहासात व वर्तमानातही जातिसंस्थेने घातलेला हैदोस हा संतापजनक असाच आहे . हल्लीच्याकाळात अनेकविध कारणांमुळे जातिसंस्थेचे भौतिकशास्त्र बदलत असून तिच्या विखंडनाची प्रक्रियाही वेगवान होतचालली आहे . त्यामुळे तिच्या समाजघटकांचाही विविध प्रकारे अभ्यास होत आहे . ' महार कोण होते ? ' हे संजयसोनवणीलिखित पुस्तक यादृष्टीने दखलयोग्य आहे .

महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासात , पूर्वास्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या महार समाजाचे महत्त्व अनन्यसाधारणआहे . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातिसंस्था निर्मूलनवादी चळवळीचा एक प्रमुख घटक असणाऱ्या यासमाजाने अत्यंत विपरित परिस्थितीशी संघर्ष करून डोळ्यांत भरणारी शैक्षणिक व तदानुषंगिक प्रगती केली आहे .ही प्रगती काहींच्या असूयेचा तर काहींच्या कुतुहलाचा विषय झाला आहे . मंडलोत्तर काळात आत्मभान आलेल्याओबीसी बुद्धिमंतांच्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे संजय सोनवणी या सर्जनशील महारविषयक कुतूहलानेझपाटले आणि त्यातून प्रथम ' ... आणि पानिपत ' ही कादंबरी जन्माला आली . इसवी सन १६८० ते १७६१ याकालखंडातील राजकीय संज्ञासंघर्षाचा तत्कालीन महार समाजाच्या नजरेतून धांडोळा घेताना संजय सोनवणीयांना काही भौतिक साधनसंपत्ती प्राप्त झाली असावी . खरेतर ' पानिपत ' कार विश्वास पाटील यांच्यापेक्षा ' ...आणि पानिपत ' कार संजय सोनवणींसमोरील आव्हान हे कित्येक पटीने खडतर होते . त्यात त्यांनी ब्राह्मणसमाजातील पात्रांचे व्यक्तिचित्रण यथायोग्य अलिप्ततेने रेखाटले आहे . तथापि , ब्राह्मणी ' इगो ' न कुरवाळण्याचाअपराध (!) त्यांनी केल्यामुळे तिचा ' गाजावाजा ' करण्यात आला नाही , हा भाग अलाहिदा ! ' महार कोण होते ? 'या प्रस्तुत पुस्तकात , महार या शब्दाचा उदय शोधताना लेखकाने पाली साहित्याचा आधार घेतला आहे . पालीसाहित्य हे भारताच्या ऐतिहासिक संचितांचा अनमोल असा साठा आहे . या साहित्याचे निर्माते प्रामुख्याने बौद्धभिक्खू आहेत . त्यांनी राजापासून रंकापर्यंत सर्वांना दुःखमुक्त करण्याचा वसा घेतलेला असल्याने त्यांचे जीवनविश्वआशयसंपन्न होते . त्यामुळे तत्कालीन समाजजीवन पाली साहित्यात उत्कृष्टरित्या प्रतिबिंबित झाले आहे . अशापाली साहित्यात अनेकदा वापरल्या गेलेल्या ' महारक्षक ' या शब्दाचा संबंध महार या शब्दाशी जोडला जाऊशकतो , असे लेखकाचे प्रतिपादन आहे . हे महारक्षक संपूर्ण गावातील शूर , प्रसंगावधानी , धैर्यशाली व विशेषतःप्रामाणिक व्यक्त ‌ िंमधून निवडले जात आणि त्यांच्यावर संपूर्ण गावाच्या रक्षणाची जबाबदारी असे . हे कार्यदर्शविणारा महारक्षकी हा शब्द , महारकी या शब्दाचा पूर्वसूरी ठरतो . थोडक्यात , महारक्षक या सन्माननीयपदनामाचे परकीय मुस्लिमांच्या राजवटीत महार या जातनामात रूपांतर झाल्याचा निष्कर्ष लेखकाने काढला आहे.

लेखकाचा हा निष्कर्ष काही प्रमाणात कुतूहल शमविणारा आहे , हे खरे आहे . कोणे एके काळी एखादे कुलदैवतमानणारी टोळी एकच आडनाव घेऊन विविध जातींमध्ये विभागली गेली , असे प्रतिपादन दुसरे एक ओबीसीविचारवंत प्रा . श्रावण देवरे यांनीही केले आहे . मात्र सोनवणी यांच्या प्रतिपादनातून उद्भवणारा नवा प्रश्न म्हणजे ,महारक्षक हे पद देशातील ( देशाच्या काही भागांतील ) इतर प्रांतांत देखील असणार . मग महार केवळमहाराष्ट्रातच का आढळतात ? पंजाब , राजस्थान , गुजराथ या प ‌ श्चिमेकडील राज्यांत मिहिर , म्हार , मेहरा असेशब्द आढळतात . परंतु उत्तर प्रदेश , बिहार अशा प्रांतांतील ' महारक्षक ' कुठे गेले ? पाली भाषेचा प्रभावजवळपास सर्वच भारतीय भाषांवर पडला आहे . मग ' महारक्षक ' या पदाचे अवशेष हिंदी भाषिक वा दक्षिणेकडीलपट्ट्यात आढळतात का ? आढळत असतील तर कसे व नसतील तर का नाही ? लेखकाने अथवा या विषयातस्वारस्य असणाऱ्या इतर कोणीही या अशा प्रश्नांची संशोधनपर उत्तरे शोधण्यास या विषयावर अधिक प्रकाश पडूशकेल .

या पुस्तकात लेखकाने आजचे संक्रमण व उद्याची झेप याचेही विवेचन केले आहे . आजची संक्रमणावस्था ही सर्वचसमाजातील गोंधळाच्या रूपाने प्रतिबिंबित झाली आहे . परंतु जात आता तिच्या विरुद्ध गुणधर्मात रूपांतरित होऊलागली आहे . त्यामुळे अनेकदा ती उच्च जातीयांना बाधक तर कनिष्ठ जातीयांना तारक ठरू लागली आहे . जातीचेहे बदलते गतिशास्त्र जातिसंस्थासमर्थकांचा पराभव सूचित करणारे आहे . हे गतिशास्त्र बदलविण्यामागील एकमहत्त्वाचा घटक महार समाज आहे . उदाहरणार्थ , या वर्षीच्या डॉ . आंबेडकरजयंती कार्यक्रमात हाताळण्यातआलेले काही विषय बघा , डॉ . आंबेडकरप्रणीत जातिसंस्था निर्मूलनाची व्यूहरचना , ओबीसींचा मंडल अहवालआणि डॉ . आंबेडकर , आमचा आदर्श सम्राट अशोकाचा भारत , अर्थसंकल्प आणि मागासवर्गीय , ब्राह्मणवाद विरुद्धबहुजनवाद इ . या अशा कार्यक्रमांतून अभ्यासपूर्ण वक्तृत्व करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बोलाविलेजाते . गैरसोयींची कोणतीही पर्वा न करता हजारो सुशिक्षित , उच्चपदस्थ कार्यकर्ते या प्रक्रियेत आपले योगदान देतअसतात . प्रा . आ . ह . साळुंखे , प्रा . हरी नरके यांसारखे बिनीचे विचारवंत घडविण्यात या कार्यक्रमांचा फार मोठाहातभार लागला आहे .

या प्रक्रियेत इतर समाजाचा सहभाग वाढावा म्हणून कित्येक ठिकाणी डॉ . आंबेडकर जयंतीसह शिवजयंती वमहात्मा फुले जयंतीचेही आयोजन करण्यात येते . वीज , पाणी , भूमिसिंचन , संततीनियमन , हिंदू कोड बिल ,खेतीविरोधी चळवळ यांबाबत डॉ . आंबेडकरांनी सर्वसामान्य भारतीयांसाठी अमूल्य योगदान दिले आहे . स्टेट्सअँड मायनॉरिटीज व भारतीय संविधान यांबाबतही सर्वसामान्यांना हळूहळू का होईना पण कळू लागले आहे .परिणामी जातीय पूर्वग्रह बाळगणाऱ्यांचा अपवाद वगळता मोकळ्या मनाने विचार करणाऱ्या सर्वजातीयभारतीयांना डॉ . आंबेडकरांचे महत्त्व पटू लागले आहे . त्यामुळे डॉ . आंबेडकर जयंती कार्यक्रमाकडे पाहण्याचीत्यांची दृष्टीही नितळ होत चालली आहे . विशेषतः सर्व बहुजन समाजाने या प्रक्रियेतील सहभाग वाढविल्यासजयंती कार्यक्रमांतील त्रुटींचे निराकरण होत जाईलच शिवाय त्यातून आजच्या संक्रमणावस्थेतून बाहेर पडण्याचामार्गही मोकळा होईल .

कोणत्याही निर्मितीला स्थळकाळाच्या मर्यादा असणे अपरिहार्य असते . ' महार कोण होते ? ' हे पुस्तकही त्यालाअपवाद नाही . जातिसंस्थेतील स्थानबदल , शूद्र या संज्ञेविषयी काही आवश्यक विवेचन , महार समाजाबाबतकाही नामवंतांची निरीक्षणे या अशा गोष्टींनी पुस्तकांचे आशयमूल्य निश्चितच वाढले असते . शिवाय शाम्यांच्याविनाशाचा ऐतिहासिक प्रसंग परिशिष्ट स्वरूपात समाविष्ट करून जातीय अहंकाराचे दुष्परिणामही मांडता आलेअसते . असे जरी असले तरी महार या शब्दाची पाली भाषेच्या अंगाने उत्पत्ती शोधणारे हे पुस्तक जातिसंस्थेच्याअभ्यासकांना उपयुक्त ठरणारे आहे . त्यामुळे ' महार ' या शब्दाविषयी स्वारस्य असणाऱ्यांनीच नव्हे तर सर्वचवाचकांनी त्याचे वाचन , चिंतन , मनन करून प्रसंगी वादविवाद करून जातिसंस्था निर्मूलनाच्या प्रक्रियेला हातभारलावणे गरजेचे आहे .
...........................................................................
' महार कोण होते ? '
संजय सोनवणी
प्रकाशक - पुष्प प्रकाशन , पुणे
पृष्ठं - ११०
किंमत - १०० रु .

.....तुम्ही त्या दिशेला आम्हाला नेवू नका.


हिंसकता, असहिष्णुता आणि असामाजिकता हा प्रत्येक समाजाला लागलेला रोग आहे. एखादी घटना घडली कि त्या धर्म-जातीशी निगडीत सर्वच समाजाला धारेवर धरण्याची जागतिक परंपरा आहे. आपण तरी या परंपरेचा त्याग करायला हवा. भारतात भारतीयच असुरक्षीत असतील तर आपल्या स्वातंत्र्याला तिळमात्र अर्थ नाही. याला आपणही जबाबदार आहोत. पुर्वोत्तर भारतियांना चिंकी म्हणुन हीनवनारे कोण आहेत? त्यांना पोलीस रस्त्यांवर अडवत हरघडीला पासपोर्ट का मागतात? लदाखला जायला पासपोर्ट लागतो का असे मला १९९७ सालापर्यंत विचारले जायचे...म्हणजे लडाख हा भारताचाच भुप्रदेश आहे हे आपल्या बापड्यांना माहितच नव्हते...तरीही आम्ही अखंड भारताचा उद्घोष करतो...हा आमचा वेडेपणाच नाही काय?

बांगलादेशी घुसखोर असोत कि पाकिस्तानच आपली मायभुमी मानत येथीलच सोयी उपभोगणा-यांना घरचा रस्ता दाखवायची हिम्मत आपल्या कोणत्याही सरकारमद्धे नव्हती व नाही. ती कशी आणायची याचा विचार कोणताही सर्वच समाज टार्गेट न करता आपल्यालाच करावा लागनार आहे.


पुर्वोत्तर भारतातील बांगलादेशींना हाकललेच पाहिजे याबाबत शंका असण्याचे कारण नाही. जो देश आपल्याच प्रजेला पोसु शकत नसेल, प्रजेला शरणार्थी म्हणुन अन्य देशाचा आश्रय घ्यावा लागत असेल तर अशा देशाचे अस्तित्वच मुळात असण्याचे कारण नाही. भारतीय प्रजातंत्राचे गैरफायदे घेत पार येथील निवडनुका लढवत लोकनियुक्त प्रतिनिधी बनु शकण्याइतपत जर त्यांची मजल जावू शकत असेल तर भारतीय कायदा आणि एकुणातील व्यवस्था ढिसाळ झाली आहे हे मान्य करत त्यावर कठोर हल्ले व्हायलाच हवेत. घुसखोरांना परत हाकलणे हा एकमेव पर्याय आहे. आमच्या नागरिकांचे हक्क हिरावण्यात घुसखोर आघाडीवर येत येथील शांतता व सुव्यवस्थेवरच आक्रमण करत असतील तर त्यांचे निर्दालन करण्याचे कार्य आमच्या सरकारला करावेच लागेल.

येथील राष्ट्रप्रेमी मुस्लिमांची जबाबदारी अधिक आहे. ते जर इस्लामी मुलतत्ववादाला बळी पडत या घुसखोरांना केवळ धर्मबंधु म्हणुन आश्रय देत असतील, त्यांचे संरक्षण करत असतील वा त्यांना पाठिंबा देत असतील, तर मग त्यांची राष्ट्रप्रियता प्रश्नांकित होणारच. यातुन हिंदु दहशतवाद उफाळुन आला तर मग त्याची जबाबदारी कोणावर?

पुर्वोत्तर राज्यांत घुसखोरी करत, तेथे वा ब्रह्मदेशात मुस्लिमांवर हल्ले होताहेत असा कांगावा करत, खोटे फोटो प्रसृत करत सा-या देशात आग भडकावण्याचे काम जिहादी करत आहेत. आमचेच देशवासी या देशात भयभीत होत आपापल्या घराचा मार्ग पकडु लागले आहेत. पण जे घुसखोर आहेत त्यांनी मात्र आमच्याच देशबांधवांच्या मुलभुत हक्कांवर गदा आणली असुनही ते मात्र शिरजोर होत येथीलच कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहेत. अशा घुसखोरांना लषकराची मदत घेत प्रथम त्यांच्या भुमीत रेटुन हाकलले पाहिजे. अन्यथा हा प्रश्न एवढा उग्र होईल कि कदाचित एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बांगलादेशी घुसखोर असेल.

ज्या देशाला आपल्याच नागरिकांना सुरक्षीत वातावरण देता येत नाही त्याला देश म्हणता येत नाही. आपल्या, देशाचे असोत कि राज्यांचे, गृहमंत्री मुळात एवढे लुळे आहेत कि त्यांनी त्या महत्वाच्या पदावर का असावे हाच प्रश्न आहे. लोक घाबरुन जात आहेत तर त्यांना सुरक्षा देत, धीर देत, थांबवण्याऐवजी जादाच्या रेल्वे सोडणारे कोणती देशभक्ती दाखवत आहेत?

घुसखोर मुस्लिम हा या देशाला फार मोठा धोका आहे. इथल्या मुस्लिमांना जर हे समजत नसेल तर ते एक दिवस गुजरातेपेक्षा महाभयंकर घोटाळा स्वहस्ते निर्माण करतील आणि अकारण या देशात विध्वंसाचे वादळ निर्माण होईल. आम्हाला मोदी आजिबात नकोय. आम्हाला कोणताही कडवा आंधळा धर्मवादी नकोय. पण तुम्ही त्या दिशेला आम्हाला नेवू नका.

घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवा. आपल्याच देशबांधव नागरिकांना भयभित करत, त्यांना असुरक्षित वाटेल अशा कृत्यांपासुन दुर रहा...

मुस्लिम धर्म तसाही जगभर पराकोटीचा बदनाम करण्यात कडव्या इस्लामियांनी हातभार लावला आहे. आम्हे अजुनही इस्लामी बांधवांवर प्रेम करतो...

त्याला द्वेषात बदलवायला हातभार लावु नका हीच काय ती विनंती.

Thursday, August 16, 2012

लुटले गेलेले समाज ...


दबलेले...दाबुन टाकलेले, खोट्या भ्रमात ठेवले गेलेले, सर्वस्वी लुटले गेलेले समाज कधी न कधी जागे होत असतात. मग ते अन्यायकर्त्यांना जाब विचारु लागतात. आम्हाला धार्मिक असो कि आर्थिक कि राजकीय स्वार्थाच्या मागे लागणा-यांनी का नागवले हा प्रश्न विचारु लागतात. कुवतीपेक्षा कोणी पुढे जात नाही हे मान्य करुनही जेंव्हा कुवतीच छाटल्या जातात तेंव्हा जो मानसिक आकांत होतो त्याला अन्यायकारक व्यवस्था निर्माण करणारेच जबाबदार असतात. धर्मसत्तेकडे बोट दाखवत त्यांनाच स्वत:ही टार्गेट करणारे नेहमीच स्वत:ला सामाजिक टीकेपासुन स्वत:ला दुर ठेवायचा प्रयत्न करत पुन्हा सर्वसामान्यांना नागवण्याच्या उद्देशाला पुढे रेटत असतात. सत्ताधारी कोणत्याही जातीचा/धर्माचा असो, या नागवणुकीपासुन तेंव्हाच सर्वसामान्यांची सुटका होवू शकते जेंव्हा सत्तेचे वितरण न्याय्य पद्धतीने सर्वच समाजघटकांत होते...व ते कदापीही वंशपरंपरागत न बनता सर्वांत फिरते राहते. सरंजामशाहीला सलाम करणारी प्रजा कधीही खरी लोकशाही आणु शकत नाही. भारतातील लोकशाही हा एक भ्रम आहे. आता हे वास्तव सर्वसामान्यांना समजावून घ्यावे लागनार आहे. धर्मसत्तेने सत्ताधिशांकडे वा सत्ताधिशांनी धर्मसत्तेकडे बोट दाखवत आजवर जे शोषण केले ते त्यांनी थांबवायचे असेल तर सरंजामदारी मनोवृत्तीला छेद देण्याची गरज आहे.

जागा झालेला, मोहनिद्रेतुन बाहेर आलेला समाज अनेकदा हिंसक बनतो हे जागतीक इतिहासाने आजवर दाखवून दिलेले आहे. ज्याला मुळात गमावन्यासारखे काही उरलेलेच् नसते तो नकळत हिंसेचे वा जहरी द्वेषाचे हत्यार वापरु लागतो. आणि हे कोणत्याही सुसंस्कृत समाजाला परवडणारे नाही. आज धर्मसत्ता नष्टप्राय झाल्यासारखे वाटत असले तरी तीही चहुअंगांनी मानवी जीवन संकुचित करण्यासाठी प्रयत्न करत आहे...पण राजसत्ता मात्र सर्वोपरी होत मानवी जीवनाला किड्या-मकोड्याच्या मानसिक व वास्तव स्थितीला नेत जात मानवी जीवन अत्यंत असुरक्षित व भयावह स्थितीला नेण्यात अग्रेसर बनलेली असल्याचे दिसते.

राजसत्ता आणि लोकसत्ता यातील हा संघर्ष आहे. धर्मसत्तेला मानायचे कि नाही याचे स्वातंत्र्य आहे पण  राजसत्तेला मानणे वा न मानणे याचे स्वातंत्र्य आज आपण सारेच...अगदी धर्मसत्ताही गमावुन बसलेली आहे.

आपल्याला हवी आहे खरी निकोप लोकसत्ता. सरंजामशाही सर्वप्रथम लोकशाहीचा गळा घोटत लोकशाहीचेच सोंग आणत सर्व जीएवन व्यापत कशी जाते याची अगणित उदाहरणे याच देशाने दिली आहेत. या सरंजामशाहीच्या भ्रामक जालातुन बाहेर कसे यायचे हाच आता आपल्या लोकशाहीसमोरील खरा प्रश्न असला पाहिजे व त्यावरील उत्तरही आपल्यालाच शोधावे लागणार आहे.  

Wednesday, August 15, 2012

आता तरी बदलायचे कि नाही?


 ·  · 

Monday, August 13, 2012

जर्मनांनी जपलेला वाघ्याचा पुरावा....





Verhandlungen: Autoren- und Sachregister der Hefte I-X (1834-1852) der Verhandlungen der Naturforschenden Gesellschaft Basel

Naturforschende Gesellschaft in Basel
E. Birkhäuser & Cie, 1930 - 126 pages

मित्रहो, वाघ्याबाबत कोनत्याही समकालीन साधनांत माहिती मिळत नाही हा दावा धादांत असत्य कसा आहे हे आपण येथे पाहुयात. जर्मनांनी वर उल्लेखलेल्या १२६ पानी ग्रंथसुचीत खालीलप्रमाणे वाघ्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. यासंबंधीत मजकुराचे इंग्रजी भाषांतर खालीलप्रमाणे...

पुस्तकाचे नांव..."Negotiations: authors and subjects of books I-X (1834-1852) " प्रकाशित झल्याचे वर्ष...१९३०. 
या पुस्तकातील मुळ जर्मन भाषेतील मजकुर येणेप्रमाणे...

1680 starb Shivaji auf Raigad eines natürlichen Todes. Über der Kremationsstätte ist ein Schrein errichtet worden. Ein aus Stein gemeisselter Hund blickt von einem Podest aus zu diesem hin: es ist Vaghya, Shivajis Lieblingshund, der in den brennenden Scheiterhaufen gesprungen sein...(Page No. 76) 

या जर्मन मजकुराचा इंग्रजीतील अनुवाद खालीलप्रमाणे...

Shivaji died in 1680 at Raigad a natural death. About the cremation, a shrine has beenerected. A chiseled in stone on a pedestal made ​​of dog looks down to this: it is Vaghya,Shivaji's favorite dog, which have jumped into the burning pyre...(Page 76)

हे पुस्तक म्हणजे १८३४ ते १८५२ या काळात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची १२६ पानी सुची असुन त्यात लेखक व पुस्तकांच्या विषयांबाबत माहिती आहे. याच पुस्तकात जे लिहिले आहे त्याचा मराठी अनुवाद असा...

"शिवाजी नैसर्गिक मृत्युने रायगड येथे १६८० साली मरण पावला. त्याच्या दहनस्थळी स्मारक बांधण्यात आले. त्याबाजुलाच एका पाषाणस्तंभ असुन त्यावर दगडात ताशीवपणे बनवलेला कुत्रा (शिवस्मारकाकडे) पहात आहे. हाच वाघ्या...शिवाजीचा लाडका कुत्रा, ज्याने जळत्या चितेत उडी घेतली होती..."

या ग्रंथात फक्त १८३४ ते १८५२ या काळात प्रसिद्ध झालेल्या ऐतिहासिक पुस्तकांची नोंद आहे, म्हणजेच वाघ्याबाबतचा मजकुर याच काळात लिहिल्या गेलेल्या कोणत्यातरी पुस्तकातुन या सुचीत घेण्यात आला आहे हे उघड आहे. या पुस्तकाचे नांव जरी खुप प्रयत्न करुनही मला मिळालेले नसले तरी हा उल्लेख अत्यंत महत्वाचा व वाघ्याचे सत्य जाहीर करणारा आहे.

या सुचीचे पुनर्मुद्रण १९३० सालचे आहे. तेही जर्मनीत झालेले. वाघ्याचा नवा पुतळा पुन्हा बसवण्यात आला तो १९३६ साली. शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी हा पुतळा ब्राह्मणांनी १९३६ साली बसवला असा ब्रिगेडचा आरोप आहे. पण मग १८३४ ते १८५२ साली अधेमधे प्रसिद्ध झालेल्या, त्याही जर्मन ग्रंथात, वाघ्या कसा आला?

याचा अर्थ एवढाच आहे कि संभाजीराजांनी शिवस्मारक बांधल्यानंतर लगेच वाघ्याचेही स्मारक बनवले होते. येथे वाघ्याच्या दगडी ताशीव पुतळ्याचा उल्लेख आहे. याचाच अर्थ असा कि मुळ पुतळा दगडीच होता. कालौघात तो नष्ट झाला...वा केला गेला. आताचा पुतळा तर पंचधातुचा आहे. १९३० साली मुळात तो अस्तित्वातच नव्हता. म्हणजेच ज्याही लेखकाने वाघ्याच्या स्मारकाची माहिती दिली आहे ती मुळच्या पुतळ्याची व स्मारकाची आहे. म्हणजेच वाघ्याचे स्मारक शिवस्मारक जेंव्हा मुळात बनवले गेले तेंव्हापासुनचेच आहे. कोणा महाराणीच्या जागेवर आताचे स्मारक नाही.

न्यचरल सोसायटी ओफ बासेल या मिशनरी संस्थेने अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील शेकडो पुस्तकांचे पुनर्मुद्रण केले आहे. तेही आता दुर्मीळ असुन क्वचित एखाद्या विद्यापीठांत प्रती असल्याचे दिसते. शिवप्रेमींनी वरील मुळ ग्रंथ अवश्य मिळवावा. परंतु वर दिलेला मजकुर पुरेसा असुन त्यातुन वाघ्याचे सत्य लखलखितपणे समोर येते हे आता निर्विवाद आहे.

म्हणजे वाघ्या ही दंतकथा नाही. कुत्र्याचे नांव "वाघ्या" आहे असे जर्मनांनीही नोंदवलेले आहे. तसा भारताशी जर्मनांचा कसलाही राजनैतीक वा साम्स्कृतीक हितसंबंध नव्हता. याच ग्रंथात तमिळनाडुमधील राजकीय घटनांचीही वर्णने आहेत. १८१८ नंतर रायगडाची कशी दुर्दशा झाली हेही या पुस्तकात नमुद करण्यात आले आहे. पण इंग्रजी तोफांच्या भडिमारामुळे शिवस्मारक वा वाघ्याची समाधी उद्ध्वस्त झालेली नव्हती याचाच पुरावा जर्मन देतात. हा पुरावा जर्मन ख्रिस्ती मिशन-यांमुळे अथवा एखाद्या इंग्रजी लेखकाच्या पुस्तकातुन त्यांना मिळाला असावा.

मराठे साद्घनांत वाघ्याचा उल्लेख मिळत नाही म्हणुन वाघ्या अस्तित्वातच नव्हता असे म्हणणे अज्ञानमुलक कसे आहे हे आतातरी लक्षात आले असेल. शिवरायांच्या हयातीतील शिल्प आणि जर्मनांनी करुन ठेवलेली ही नोंद वाघ्याचे शिवचरित्रातील स्थान अधोरेखित करते. संभाजी महाराजांनी ती स्मृती जपली. पण आमचेच काही नतद्रष्ट मात्र आपलाच हेका चालवत शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचाही अवमान कसे करत आहेत हे पाहुन उद्वेग वाटतो.

Sunday, August 12, 2012

सुतारांचा इतिहास


मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे लाकडी युग इसवी सनपुर्व दहा हजार वर्षांच्या आसपास अवतरले असा संशोधकांचा कयास आहे. गुहेत राहणारा मानव जेंव्हा जलाशयांजवळ रहायला येवू लागला तेंव्हा त्याला कृत्रीम निवा-यांची गरज भासु लागली. याच कळात त्याला प्राथमिक शेतीचेही ज्ञान झाले होते. सुरुवातीला त्याने निवा-यासाठी चामड्याचा वापर केला खरा, पण त्यात कायमस्वरुपी टिकावूपणा नव्हता. याच काळात लाकडाचा उपयोग करता येवू शकतो हे त्याच्या लक्षात येवू लागले. हातकु-हाडीसाठी तासलेले लाकडी दांडे वापरायची सुरुवात म्हणजे काष्ठयुगाची सुरुवात मानली जाते. आता तेच लाकुड कृत्रीम निवा-यांसाठी तो वापरु लागला. नेवासे व बुर्झाहोम येथे असे प्राथमिक निवारे मिळाले आहेत.

यानंतर लागलेला क्रांतीकारी शोध म्हणजे चाकाचा. संपुर्ण मानवी जीवनात क्रांती घडवणारी ही घटना म्हणुन इतिहासाने या शोधाची नोंद केली आहे. पहिले चाक नेमके कोठे शोधले गेले हे सांगता येत नसले तरी जगभर समांतर काळी चाकाचा शोध लावला गेला असावा. भारतीय चाके मात्र जगाच्या पुढचे पाउल होते...ते म्हणजे आरी असलेली चाके. चाकांतुनच आद्य बैलगाड्यांचा जन्म झाला. यामुळे कुंभकारांना मातीपासुन सुबक घट व अन्य उपयोगी वस्तु बनवता येवू लागल्या. आज जगाचा पुरातन इतिहास समजतो त्यात याच पुरातन मृत्तिकाभांड्यांचा मोठा हात आहे. थोडक्यात आजच्या अनेक जातींचा इतिहास हा हातात हात घालुन चालत आलेला आपल्याला दिसतो तो या परस्पर साहचर्यामुळे व सतत नवीन शोध घेण्याची प्रेरणा असल्यामुळे.

सिंधु संस्कृतीत भारतातील सुतारकामाने कळस गाठला. घराचे व नगरद्वाराचे दरवाजे लाकडापासुन बनवले जावू लागले. बैलगाड्या बनु लागल्या. आजही भारतात सिंधु काळी बनत तशाच बैलगाड्या बनवल्या जातात. नांगरणीसाठी लाकडाचे नांगर बनु लागले. समुद्रप्रवासासाठी नौका बनु लागल्या. भारतीय व्यापार भरभराटीला येवू लागला. पुढे आला वैदिक काळ. या काळातील सुतारकामाची बरीच वर्णणे मिळतात. वैदिक लोक सुताराला त्वष्टा, ऋभु तर कधी विश्वकर्मा संबोधतांना दिसतात. ऋग्वेदकाळात सुताराचा व्यवसाय अत्यंत भरभराटीला आला असल्याचे दिसते. हे काम कष्टाचे व कुशल कारागिरीचे आहे असेही उल्लेख ऋग्वेदात आहेत. बैलगाडी ते रथ ही प्रगती याच काळात झाली. लाकडापासुन अनेक गृहोपयोगी पात्रे व पेलेही बनु लागले. ऋग्वेदात उल्लेखलेले पणी हे असुर सुतारकामात अत्यंत कुशल असुन त्यांना त्वष्ट्याची संतती म्हटले आहे. बुबु नांवाचा धनाढ्य पणी हा नौका बांधण्यचा उद्योग करत असे असेही ऋग्वेदावरुन दिसते. घरांसाठी दारे, खिडक्या, खांब कसे बनवावेत यांची शास्त्रीय माहिती अथर्ववेदातील शालासव सुक्तात मिळते. म्हणजे तोवर सुतारकामाला शास्त्रीय दर्जा मिळाला होता. पुढे भृगुसंहितेत व वराहमिहिराच्या बृहत्संहितेत कोणत्या वृक्षाची लाकडे कोणत्या काष्ठकामासाठी वापरावीत यावर विस्तृतपणे विवेचन केले गेले.

कोणत्या प्रकारच्या साधनासाठी नेमके कोणते व किती जुन लाकुड वापरावे हे मनुष्य निरंतर प्रयोगांतुन शिकत गेला. लाकडी वास्तु व तटबंद्या याची रेलचेल आपल्याला इसपु चवथ्या शतकापासुन दिसु लागते. चंद्रगुप्त मौर्याच्या पाटलीपुत्र या राजधानीच्या लाकडी प्रासादाचे व लाकडी तटबंदीचे अवशेष मिळाले आहेत. या तटबंदीला चौसष्ट दरवाजे आणि पाचशे सत्तर बुरुज होते असे मेगास्थानीस या ग्रीक वकीलाने लिहुन ठेवले आहे. अशा प्रकारचे असंख्य लाकडी वास्तुंचे उल्लेख आपल्याला तत्कालीन साहित्यात मिळतात. बौद्ध जातककथेनुसार खास सुतारांचीच वस्ती असलेल्या अनेक गांवांची उदाहरणे येतात. यावरुन हा व्यवसाय केवढा भरभराटीला आला असेल याची कल्पना येते.

प्राचीन काळी मंदिरे ही लाकडांपासुन बनवली जात असत. एवढेच नव्हे तर देवमुर्त्याही लाकडाच्याच असत. भारताचा मानबिंदु असलेले सोमनाथाचे मंदिर कुमारपालाने जीर्णोद्धार करण्यापुर्वी (इस. नववे शतक) चंदनी लाकडाचे होते हेही लक्षात ठेवायला हवे. मौर्यकालात बव्हंशी मंदिरे लाकडीच होती व अनेक मंदिरांचे अवशेषही सापडलेले आहेत. (बैराट या राजस्थानातील गांवात असे एक भव्य मंदिर सापडले आहे.) नंतर दीर्घकाळ टिकावीत म्हणुन दगडी मंदिरे व प्रासाद बांधायला सुरुवात झाल्याने लाकडी मंदिरे मागे पडली असली तरी सुतारकामाचे महत्व संपले नाही. लाकडाने शस्त्रास्त्रे ते दैनंदिन जीवन व्यापुन टाकले.

सुतार हा शब्द सुत्रधार या शब्दावरुन बनला अशी व्युत्पत्ती दिली जाते. ही व्युत्पत्ती ठीक वाटते. कारण लाकडावर काम करत असतांना सुत्राने (सुताने) मापे घेत खुणा कराव्या लागत असत. मग ओबडधोबड अशा लाकडापासुन कलाकृती जन्म घेत. भारतातील अनेक प्राचीन काष्टशिल्पे कलेचे अजोड नमुने मानले जातात.  

पण काष्ठपुराण येथेच संपत नाही. लाकडापासुनचे पहिले यंत्र, ते म्हणजे हातमाग व चरखे सुतारांनीच वीणकरांच्या सहाय्याने विकसीत केले. त्यामुळे वस्त्रोद्ध्योगात एक अभुतपुर्व क्रांती झाली. भारत हा जगाला वस्त्रे निर्यात करणारा श्रेष्ठ देश बनला. अत्यंत गुंतागुंतीची संरचना असनारे माग बनवणे ही एकार्थाने, प्राथमिक का असेना, भारतीय औद्योगिक क्रांतीच होती असे म्हटले तरी वावगे ठरु नये.

सुतारकामाच्या व्यवसायात प्राचीन काळी कोणीही कुशल कारागिर प्रवेशु शकत होता. किंबहुना त्यामुळेच सुतारकामाची विविधांगी प्रगतीही झाली. सुतारकामात विविध कलासंप्रदायही त्याचमुळे निर्माण झाले. यात काश्मिरी, बंगाली, उडिया, माहराष्ट्री, केरळी अशा विविध शैल्या बनत गेल्या. सुतारकामात अनेक वंशीय प्रवेशले व त्यांच्या पुढे पोटजाती बनत गेल्या. मुळात सुतार ही जात नव्हती. सुतारकाम हे अत्यंत कौशल्याचे काम होते. त्यात कष्टही होतेच. पण प्रचंड मागणीमुळे अनेक लोक त्या व्यवसायात पडत राहिले. भारताच्या विविध भागांत सुतारांना वेगवेगळी नांवे आहेत. सुत्रधार, सुत्तार, सोहळे, मिस्त्री, बाडिग, बढई, थवी ही काही नांवे होत. सुतारांत अहीर, गुजर, पांचाळ, मेवाड, पंचोली, कोकणी इ. पोटभेद आहेत ते स्थानांमुळे व वंशामुळेही पडलेले आहेत. पुरातन काळी रथकार अशी सुतारांची एक स्वतंत्र जात होती...पण पुढे रथ उपयोगातुन गेल्यामुळे ही पोटजात अन्य पोटजातींत मिसळुन गेल्याचेही दिसते.

एक जात म्हणुन सुतार ज्ञातीचा उगम दहाव्या शतकानंतर होवू लागला. कोणताही व्यवसाय वंशपरंपरागत बनु लागला कि असे होणे स्वाभाविक असते. सुतारांना जरी त्वष्टा वा विश्वकर्म्याचे वंशज मानले गेले असले तरी वैदिक व्यवस्थेने त्यांना शुद्र वर्णात ढकलले. हाही समाज बव्हंशी शैव असून चामुंडा, महामाया, वेराई इ. त्यांच्या कुलदेवता आहेत. काही सुतार स्वामीनारायण पंथातही गेले आहेत. गुजरात व कर्नाटकातील सुतार ब्राह्मणी पद्धतीने मुंजही करुन घेतात. अनेकदा स्वत:च पौरोहित्यही करतात. महाराष्ट्रातील देशी सुतारही अलीकडे ब्राह्मणांसारखी गोत्रे लावू लागले आहेत. लग्नापुर्वी ते मुलाची मुंजही करुन घेतात.

असे असले तरी महाराष्ट्रातील सुतारांचे अहीर व कुणबी यांच्याशी वांशिक साधर्म्य आहे. यावरुन एकाच मुळच्या समाजातुन व्यवसाय कौशल्यामुळे निर्माण झालेली ही एक जात आहे असे म्हणता येते.

अलीकडे हा व्यवसाय फर्निचर व लाकडी शिल्पे/मुर्ती यांपुरता मर्यादित झाला असुन महाराष्ट्रात राजस्थानी सुतारांचीच चलती आहे. रेडीमेड फर्निचरमुळे पारंपारिक उद्योगावर कुर्हाड कोसळलेली आहे. परंपरागत बैलगाड्या, नांगर, लाकडी चाके...पार अदृष्य होवू लागली आहेत. औद्योगिक क्रांतीचा हा एक अपरिहार्य परिणाम आहे. या समाजाने आता नव्या दिशा धुंडाळायला सुरुवात केली असुन परंपरेच्या जोखडातुन मुक्त होण्याचा ध्यास बाळगला आहे. अडचण आहे ती या समाजात ऐक्याचा अभाव आहे. त्यामुळेच कि काय राजकीय प्रतिनिधित्वापासुन हा समाज वंचित राहिलेला आहे. पोटजातींत वाटुन राहिल्यामुळे कसलाही समाजाला फायदा न होणारे पोटजातीय सवते सुभे निर्माण झालेले आहेत. एक दिवस त्यांचे ऐक्य घडुन येईल व त्यांचे पुरातन वैभव आधुनिक परिप्रेक्षात परत मिळेल अशी आशा आहे.

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...