Monday, July 27, 2020

दुतोंडी मनोवृत्तीला चपराक


सध्याचा काळ हा वैचारिक दुष्काळाचा काळ मानला जातो. जे विचारवंत सध्या अस्तित्वात आहेत ते जुन्याच विचारांच्या व्युहात गोल गोल फिरताना दिसतात आणि त्यांनाही पुढे न नेता उलट गढूळ करण्याच्या प्रयत्नात लागलेले दिसतात. त्यामुळे की काय किंवा वैचारिक अनारोग्याची कोरोनासारखी साथ आलीय म्हणून की काय आजचे समाजजीवनही उथळ विचारांवर आरुढ झालेले आहे. त्यात समाजमाध्यमांमुळे सहज अभिव्यक्तीची संधी मिळत असल्यामुळे झटपट विचारवंत होणेही सोपे झाले आहे आणि यातुनच अविचार्‍यांची झुंडशाही फोफावत असल्याचे चित्र आपल्याला दिसते; पण त्यावरही विचार करत मार्ग काढण्याची प्रवृती कोणात राहिली नसल्याने वैचारिकतेचाच समूळ र्‍हास होतो आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. समाजात जर काही न्यून असेल तर त्याचे मुख्य कारण प्रगल्भ, अग्रगामी आणि बहुआयामी परिवर्तनवादी विचारांचे सहअस्तित्व यांचा अभाव असणे हे असते.
परंतु आपल्याकडे मुळातच वैचारिक दुष्काळ असलेल्या काळात घनश्याम पाटील या तरुण संपादकाचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘दरवळ’ हे पुस्तक एखादी का होईना वैचारिक सर आल्याचा दिलासा देते. विविध लेखांतून विचारांना प्रवृत्त करते. अविचारावर कोरडे ओढते. गतकाळातील स्वामी विवेकानंदांसारख्या महनीय व्यक्तींबाबत आदर दाखवताना त्यांच्यापासून नेमके काय विचारमूल्य घ्यायचे हे सांगत ते पुढे काय या प्रश्नाला भिडतात आणि नवी विचारवाट निर्माण करण्यासाठी सज्ज होतात. ‘दरवळ’ पुस्तकातील पंचवीस लेखांपैकी बव्हंशी लेख हे सामजिक तळमळीतुन अगदी आतून आलेले आणि नवविचारांच्या पालवीने फुलारले गेलेत.
समाजमाध्यमांच्या विस्फोटामुळे प्रतिक्रियावादाला उधाण आलेले आहे हे आपण पाहतो. ट्रोल केले जाणे हे आता सामान्य लेखकांबाबतही होऊ लागलेले आहे. प्रत्येक दुर्दैवी घटनेत आधी पिडिताची जात पाहणे ही विकृती सार्वत्रिक झाली आहे. त्यावरही पाटील विवेचन करतात. ते तरुण आहेत. शैली अनेकदा आक्रमक होते पण त्यामागील कळकळही सहज लक्षात येत असल्याने कोणालाही राग येणार नाही. स्वत: प्रकाशक असूनही ते ‘साहित्यिक दहशतवाद’ या मराठीत गेल्या दोनेक दशकांत उद्भवलेल्या अपप्रकारावरही तुटुन पडतात आणि ‘साहित्यिक जीवनव्रती निर्माण व्हावेत’ या लेखातुन ते साहित्यिकांसाठीच काही मार्गदर्शक तत्त्वे सांगतात.
पुण्यात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडून विटंबित करण्यात आला. मी तेव्हा या प्रकाराला माध्यमांतून-भाषणांतून ‘तालीबानी’च म्हटले होते. मागे एकदा वारकर्‍यांनी ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीवरुन ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादवांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होऊनही त्यांना संमेलनालाच उपस्थित राहू दिले नव्हते. ती कादंबरीही मागे घ्यायला लावली होती. साहित्यिक कलाकृतींची चिकित्सा, समीक्षा करण्याचे वा ते वाचण्या-न वाचण्याचे स्वातंत्र्य लोकाना उपलब्ध असताना जेव्हा असे प्रकार घडतात ते आमचा वैचारिक इंडेक्स किती ढासळलेला आहे याची चुणूक दर्शवतात. यादव प्रकरणात भलेभले मराठी सारस्वत मूग गिळुन बसले होते. तेव्हा फक्त मी आणि पाटील यांच्यासारखे मोजके अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या महत्तेबद्दल बोलत वारकर्‍यांच्या तालीबानी वर्तनाचा निषेध केला होता. राम गणेश गडकरींनाही जातीय कोंदणात अडकावण्याचा प्रयत्न झाला.
औंरंगजेबाचा भाऊ दारा शुकोहलाही केवळ धर्माच्या चौकटीत ढकलत त्याला शक्यतो अज्ञातातच ठेवण्याची प्रवृत्ती नवी नाही. शेख महंमदासारखे संतकवी दुर्लक्षित तर राहतातच पण समर्थ रामदासांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची महती सांगणारी मुसलमानी अष्टकेही विस्मृतीत ढकलली जातात कारण रामदासांना बहाल केलेल्या हिंदुत्त्ववादी प्रतिमेशी ते विसंगत आहेत. ही साहित्यिक, कवी, संतांशी प्रतारणा आहे याचे भान मात्र कोणाला नसते. ‘दरवळ’मधील ‘ही तर मेकॉलेचीच अवलाद!’ या लेखात गडकरी पुतळा विटंबनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात काही जातीय कट्टरतावादी संघटनांच्या असल्या समाजविघातक कृत्यांवर कोरडे ओढलेले आहेत.
‘राहिले’लं राहूच द्या!’ या लेखातुन घनश्याम पाटील यांच्या मराठवाड्यातील किल्लारी या भूकंपग्रस्त भागातून येऊनही कमी वयात केलेल्या संघर्षाची हृद्य कथा येते पण त्यात जी उमेद, आकांक्षा आणि साहित्यात काहीतरी नवे करेल ही जी उमेद दिसते तिला तोड नाही. किंबहुना पाटील असे कसे घडले याचे मानसशास्त्रीय विवेचन त्यातून सहज करता येते. पुस्तकातील काही लेख हे खरे तर लेखाचे विषय नसून त्यावर हीच भूमिका कायम ठेवत सैद्धांतिक मांडणी करणारी स्वतंत्र पुस्तके होऊ शकतील असे आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि प्रतिक्रियावाद्यांचा दहशतवाद हा एक असा विषय होऊ शकतो. ही प्रवृत्ती आता धोक्याची पातळी ओलांडून चुकली आहे. त्याचे सखोल विवेचन होणे आवश्यक आहे.
घनश्याम पाटील यांचा एक दृष्टीकोन आहे. प्रत्येक लेखकाचा दृष्टीकोन त्याचे समाज-सांस्कृतिक पर्यावरण आणि स्वत:चे आकलन यातून विकसित होत असतो. साहजिकच त्यात त्याचे स्वपण डोकावतेच. अनेक लेखक या स्वचा हात सोडून कोणा तथाकथित महान विचारवंत-लेखक-कवींच्या प्रभावाखाली येतात आणि स्व-विचारांची हत्या करतात हे अलाहिदा पण हे लेखन घनश्याम पाटील यांच्या स्व वर कोणाचाही प्रभाव नाही ही बाब ठळक करते. राहिला प्रश्न त्यांनी घेतलेल्या दृष्टीकोनाचा. तो वेगळा असला तरी समाजाप्रती असलेल्या आस्थेतुन, कळवळ्यातुन आला आहे आणि मुळात त्यांची शैलीच संवादात्मक असल्याने ती थेट भिडते. यातील विचारांना विरोध करायचा असेल तर तो तेवढ्याच वैचारिकतेतुन करावा लागेल. सर्व वाचकांनी आपापल्या परीने या पुस्तकातील वैचारिक दिशादिग्दर्शनाची आपापल्या मगदुराप्रमाणे मीमांसा करत पुढील वाटचाल ठरवावी अशी अपेक्षा आहे.
आम्हाला सर्वच वाईटाचा विरोध करावा लागेल. सर्वच गोष्टींचे विश्‍लेषण तटस्थपणे करावे लागेल. नाहीतर ब्रिगेडने हल्ले केले, तोडफोड केली तर ते तालीबानी आणि एम. एफ. हुसेनच्या चित्रांची नासधुस करणारे बजरंगदलीय संस्कृती रक्षक असले सरधोपट सापेक्ष आकलन करुन आम्हाला चालणार नाही आणि नेमका हाच आशय ‘दरवळ’मधून आला आहे. खरे तर ही आमच्याच दुतोंडी प्रवृत्तीला एक चपराक आहे. त्याच वेळेस तरुण आपल्या समाजाच्या इतिहास, वर्तमान आणि भविष्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत आहेत याचाही हा एक आरसा आहे जो तथाकथित ज्येष्ठांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे.
दरवळ
लेखक - घनश्याम पाटील
प्रकाशन - चपराक, पुणे (7057292092)
पाने - 128, मूल्य - 200
मुखपृष्ठ - संतोष घोंगडे
-संजय सोनवणी

Thursday, July 2, 2020

हरी नरकेंना नृशंस पद्धतीने ट्रोल!

चुका होऊ शकतात. अनेकदा व्यक्तीला तत्कालीन भावनात्मक प्रभावात जे कृत्य योग्य वाटते ते कृत्य अन्य दृष्टीकोणानुसार अयोग्यही असु शकते. नैतिक समस्या त्यातुनच निर्माण होतात आणि त्याचा निर्वाह कसा लावायचा याबद्दल अगदी नीतीविदही गहन चर्चा करत आले आहेत. अगदी राम-कृष्ण, पांडवांची अनेक कृत्येही नैतीक चर्चेच्या परिप्रेक्षात आलेली आहेत तशीच चार्वाक-बुद्धाचीही. कारण पुन्हा नैतीकता आणि सत्य म्हणजे नेमके काय याची व्याख्या जशी नाही तशीच "योग्य-अयोग्य" म्हणजे काय आणि योग्यायोग्यतेचा परिप्रेक्ष म्हणजे काय याचीही व्याख्या नाही.
उदा. मी आज प्रा. हरी नरके यांच्यावर लिहिलेल्या लेखातील अंशावर माझे मित्र घनश्याम पाटील यांची प्रतिक्रिया मला त्याक्षणीच्या आणि लेख उद्घृत करण्याच्या परिप्रेक्षात अयोग्य वाटल्याने मी सहसा न करणारे कृत्य केले व ती प्रतिक्रिया डिलिट केली. मी एका अर्थाने श्री. पाटील यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे अयोग्य कृत्य केले. म्हणजे मर्यादित परिप्रेक्षात मला योग्य वाटलेले कृत्य मी केले पण त्या योग्यतेतच अयोग्यताही होती. त्या अर्थाने मी अनैतीक कृत्य केले असे सहज म्हणता येईल.
तसेच प्रा. नरकेंनी शाहु महाराजांवरेल लेखात दारुबाबत विधाने केली. त्यांचा बौद्धांनी (आणि जमले तर सर्वांनीच. पण दारुबाबतचे आंबेडकरंनी दिलेली विशेष शप्पथ त्यांनी घेतलेली असल्याने) दारुपासून दूर रहावे हा शुद्ध हेतु होता हे उघड आहे. आक्षेप कशाला तर "घरकाम करुन घर चालवणा-याया बौद्ध महिलांचे पती दारु पितात व महिलांना मारहाण करतात. हे थांबले पाहिजे." अशा आशयाच्या विधानाला. ९९% बौद्ध दारु पितात असे त्यांनी म्हटलेले नाही. देशात किती बौद्ध स्त्रीया इतरांचे घरकाम करुन चरितार्थ चालवतात याची आकडेवारी कोणकडेही असेल असे मला वाटत नाही. पण समजा १% (आता या १%वरही वाद घालायचा असेल तर सहज घालता येईल) जरी बौद्ध झोपडपट्टीत राहत असतील आणि बहुतेकांच्या स्त्रीयांना घरकाम करुन चरितार्थ चालवावा लागत असेल आणि बव्हंशी महिलांचे पतीराज त्यांच्या जीवावर दारुमग्न असतील तर मुळात कोणत्याही बौद्धावर झोपडपट्टीत राहण्याचे गरज पडणार नाही व महिलांना दुस-यांची धुनी-भांडी करावी लागणार नाहीत अशी स्थिती आणता येत नसेल तर या सामाजिक अपयशाला जबाबदार कोण? सुस्थितीतील बौद्धांची काही जबाबदारी आहे की नाही? नसेल तर ठीक आहे.
पण केवळ टक्क्यांचा घोळ घालून हरी नरकेंना नृशंस पद्धतीने ट्रोल करायचा अधिकार या महानुभावांना कोणी दिला? ९९% नसतील तर ९०, ८०, ७५, किंवा अगदी फक्त १ टक्काच दारुबाज संसाराची धुळधान करत असतील तरी हरी नरकेंचे म्हणणे विचार करण्याच्या लायकीचे नाही की काय? त्यावर विचार करण्याऐवजी नरकेंवरच हल्ला चढवला की अपली बाजु सुरक्श्ढित होते असे यांना वाटतेच कसे?
अलीकडेच एका विचारवंताने (मी त्याला बौद्ध हा शब्द अशासाठी वापरत नाही कारण खरा बौद्ध असा असुच शकत नाही.) आंबेडकर सांगायला आम्हाला इतर कोणाची गरजच काय? अशा स्वरुपाची पोस्ट लिहिली. गंमत म्हणजे हेच विचारवंत माझ्यासोबर बियर पिऊन नाचलेले आहेत. असे अनेक आहेत. दारु पिणे आणि दारुडा असणे या फरक असतोच. मी पितो. पितो म्हणून मलाही दारुडा ठरवता येईल. पण दारुच्या आहारी जाऊन संसाराची धुळधान करणा-यांबाबत (बौद्धांबाबत बौद्धांना) काही वाटत नसून फ्क्त हरी नरके बौद्ध नाहीत, मग त्यांना बौद्धांबाबत सांगायचा अधिकार काय या गुर्मीतून ही सारी ट्रोलबाजी झालेली आहे. या चुका नैतीक अध:पतनातून झाल्या आहेत आणि त्यांचा निर्वाह लावला गेला पाहिजे. बाबासाहेब सांगायला केवळ आंबेडकरी समाजच समर्थ असेल आणि इतर स्वार्थप्रेरीत आहेत, आम्हीच कोणाला मोठे केले वगैरे कोणाचा समज असेल तर हे असले समज समाजविघातक तर आहेतच पण बुद्ध आणि बाबासाहेब विघातकही आहेत.
प्रा. नरकेंनी दिलगिरी व्यक्त करायला नको पहिजे होती या माझ्या काही विचारी मित्रांच्या मताशी मी सहमत आहे. पण त्याच वेळीस क्रुर लांडग्यांप्रमाणे ट्रोल तुमच्व्ही मानसिकता उध्वस्त करण्याचा चंग बांधत असतील तर भविष्यात हरी नरकेच काय पण कोणीही अन्य विचारवंत गौतम बुद्ध, बाबासाहेब किंवा बुद्धिस्ट समाजावर काहीही लिहायला धजावनार नाहीत. आणि असे वैचारिज्क मंथन थांबवण्याचा मार्ग बुद्धाचाच नसल्याने या ट्रोलबाज काही बुद्धीस्टांना बौद्ध कसे म्हणायचे हाही प्रश्न निर्माण होईल. प्रा. नरकेंची हतबलतेतून आलेली दिलगिरी हा महाराष्ट्रातील जाणतेपणाचा पराभव आहे. बुद्धाचाही पराभव आहे.

आता शेवटचे. प्रा, हरी नरकेंचे विरोधक आता म्हणत आहेत की खरा मुद्दा हा डा. आंबेडकर साम्यवादाचे, विरोधक होते आणि त्यांनी चीनचा धोका सांगीतला होता हा होता. डा. आंबेडकर साम्यवादाचे विरोधक होते हे नरकेंचे म्हणणे खोटे आहे.
बाबासाहेबांना साम्यवादी त्यांच्या काही निवडक विधानांच्या आधारे साम्यवादी गोटात ओढायचा प्रयत्न करतात तसेच जागतीक पातळीवर मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक गट बाबासाहेबांच्याच "The Problem of Rupee" या ग्रंथाचाच आधार घेत आजही चर्चा घडवत असतात. अलीकडेच लुदविग वोन मायसिस संस्थेत "Ambedkar- The Forgotten Free Market Economist” हा प्रबंध एका चर्चासत्रात सादर केला गेला होता. म्हणजे बाबासाहेब मुक्त बाजारपेठेचे म्हणजेच भांडवलशहीचे समर्थक होते असाही अर्थ काढायचाच असेल तर काढता येतो.
साम्यवादाला धर्म मान्य नाही. पण त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्विकारला. त्या अर्थाने बाबासाहेब धर्मवादी होते असेही म्हणता येऊ शकते. धर्मवादी मनुष्य साम्यवादी कसा असू शकेल?
कोणाचीही निवडक विधाने काढून कोणालाही कोणाचे विरोधक अथवा समर्थक ठरवता येईल. समजा मी स्वतंत्रतावादी असलो तरीही मलाही साम्यवादातील शेतकरी-कामगार कल्याण, उत्थान (त्यांची किंवा कोणाचीही हुकुमशाही नव्हे) ही तत्वे मान्य आहेत म्हणून मी साम्यवादी होत नाही. वंचितांचे कल्याण हा सरकारचा प्रधान हेतू असला पाहिजे असे मला वाटते म्हणून मी समाजवादीही होत नाही.
तेंव्हा नरकेंचे विधान सरसकट खोटे आहे असे म्हणतांनाही तारतम्याची गरज आहे. सर्वच वाद (साम्यवाद, समाजवाद, स्वतंत्रतावाद इं०) सर्वस्वी त्याज्ज्य नाहीत तसेच सर्वस्वी स्विकारणीयही नाहीत.
पण हे वेगळे झाले. बुद्ध आणि मार्क्स यात शेवटी बाबासाहेबांनी बुद्धच स्विकारला हे वास्तव एवढेच सांगते की त्यांनी मार्क्स नाकारला.

काय वैज्ञानिक बरे?


"३. एखादा मार्ग आपल्याला सापडेल अशी आशा त्याला नेहमीच वाटे. त्याला एवढी आशा वाटे की, सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली; आणि तो जेंव्हा जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नाचा अर्थ काढला.
४. त्याने भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून तो म्हणाला, "जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे! नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे!" आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले.
५. आशा आणि निश्चय यामुळे धीर येऊन त्याने उरुवेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमाराला तो गयेच्या मार्गाला लागला. तेथे त्याने एक पिंपळवृक्ष पाहिला......."
हे आहे गौतम बुद्धांना बोधी प्राप्त व्हायच्या दिशेने झालेल्या अंतिम वाटचालीचे डा, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" य ग्रंथातील विवेचन. याच पुढे असलले काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी गजेंद्रप्रभा यांना पडणरे स्वप्न आणि गौतमाला आता पुर्ण ज्ञानप्राप्ती होणार याची झालेली खात्री आणि केलेली स्तुती जिज्ञासुंनी मुळातुनच वाचावी.
आणि कोणीही जगातील कोणताही धर्म (पायथागोरसचा गणिताचा धर्म सोडून) वैज्ञानिक आहे असा आव आणु नये व नव्या अंधश्रद्धा पसरवू नये.
(संदर्भ- भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक- डा. भीमराव रामजी आंबेडकर, अनुवादक- घन:श्याम तळवटकर इ. प्रकाशक- धम्म सासन विश्व विद्यापीठ, १९९७, पृ. ६२)

युरोपियनांचा वर्चस्ववाद, वैदिक धर्म आणि येथील वास्तव!

  प्राचीन  इराणमध्ये पारशी धर्माचे प्राबल्य वाढले. त्या धर्माने वैदिक धर्माचे आश्रयस्थान असलेल्या सरस्वती (हरह्वैती) नदीचे खोरेही व्यापल्य...