Saturday, October 31, 2020

हिंदू राष्ट्र की वैदिक राष्ट्र?

 

 हिंदू राष्ट्र हा स्थापनेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रमुख उद्देश्य व कळीचा मुद्दा राहिलेला आहे. हिंदुत्व, हिंदुत्ववाद, हिंदू राष्ट्रवाद, हिंदुंच्या तथाकथित गौरवशाली इतिहासाबद्दल वारंवार बोलणे, लिहिणे हा संघी विद्वानांचा आजतागायत नित्यक्रम राहिलेला आहे. पुर्वी जनसंघ व आता भारतीय जनता पक्ष आपले अंतिम उद्दिष्ट साकार करण्यासाठी स्थापन केलेले राजकीय हत्यार आहे. आज प्रचंड बहुमताने याच पक्षाचे सरकार आहे. राज्यसभेत अद्यापी पुरेसे बहुमत नसल्याने त्यांना आपला अजेंडा सर्वस्वी राबवता येत नसला तरी त्या अजेंड्याचे सुतोवाच सत्तेत आल्याआल्या स्मृती इराणी, सुषमा स्वराज इत्यादिंनी केलेच होते. हे सुतोवाच होते वैदिक विज्ञान, गणित, संस्कृत भाषा इत्यादिंचा अभ्यासक्रमात समावेश करणे. ही पहिली पायरी होती. त्याला विरोध झाल्याने हा अजेंडा पिछाडीवर गेला. गेल्याच महिन्यात भारताचा बारा हजार वर्षांच्या इतिहास लेखनासाठी जी समिती नेमली गेली आहे तीही वेद, रामायण, महाभारत काल, आरांचे मुल स्थान आणि सिंधू संस्कृतीचे जनक याचाच इतिहास बव्हंशी लिहिणार असल्याचेही सुतोवाच झाले आहे. शिवाय हा “अभिनव” इतिहास अभ्यासक्रमातही आणला जाणार आहे. या समितीत एकही हिंदू (अवैदिक) नाही. जैन नाही बौद्ध नाही की दाक्षिणात्यही नाही. म्हणजे याचा अर्थ काय हे समजाऊन घेण्याची बुदधी हिंदू गमावून बसलेत असा नाही काय?

 पंतप्रधान मोदींनी प्राचीन काळी भारतात प्लास्टिक सर्जरी कशी प्रगत अवस्थेत होती याचे गौरवगान करून आपण संघाच्या पठडीतून पंतप्रधान होऊनही कसे सुटलेलो नाहीत हे सिद्ध करत जगात हसू करून घेतले. त्याहीपेक्षा मोठे हसू झाले ते वैदिक विमान प्रकरणात. गोहत्याबंदीही आली. अखलाख व नंतर काही मुस्लिमांना गोमांस खाल्ल्याच्या नुसत्या संशयाने ठार मारले गेले तर गुजरात व आंध्रमद्धे गोहत्या केल्याच्या संशयाने दलितांना अमानुष मारहाण केली गेली. शंकराचार्य ते साधू-साध्व्या, महंत इत्यादि अधूनमधून हिंदुंना चिथावणीखोर भाषणे देत हिंडतात.

संघाचे स्वप्न साकार होईल कि नाही यावर चर्चा करण्यापुर्वी संघाचे हिंदुत्व म्हणजे काय हे खोलात जाऊन पहायला हवे. सर्वसामान्य हिंदू "हिंदू" या शब्दाने हुरळून अनेकदा धर्मरक्षणाच्या नांवाखाली संघाच्या छावणीखाली नकळत जातात. त्यांना वाटते संघाचे पवित्र कार्य हे हिंदुंच्या भल्यासाठी व मुस्लिमांच्या व अन्य धर्मियांच्या विरोधात आहे. मुस्लिमांपासून आपण आपला धर्म वाचवायला हवा या काल्पनिक भयगंडाने ते झपाटलेले असतात. साथीला संघीय कपोलकल्पित इतिहासही असतोच. एकंदरीत ते ब्रेनवाश्ड होऊन जातात आणि स्वतंत्र विचार करायची बुद्धी जागेवर रहात नाही. त्यासाठी प्रथम संघाचा आणि हिंदू धर्माचा काय संबंध याच प्रश्नाचा निकाल लावला पाहिजे. संघ आणि हिंदू यांचा मुळात संबंधच काय हा प्रश्न विचारला तर अनेकांच्या भिवया विस्फारू शकतात.

संघाने आजवर हिंदू धर्माची मुळातच व्याख्या केलेली नाही. का असे कोणी विचारलेलेही नाही. हिंदुस्तानात जन्माला आलेले जेही धर्म आहेत त्याचे अनुयायी म्हणजे हिंदू असा एक भ्रम ते तयार करतात. त्यासाठी घटनाही वेठीला धरतात. "हिंदू ही एक जीवनपद्धत आहे" अशी सर्वोच्च न्यायालयाने केलेली तशी अत्यंत भोंगळ असलेली व्याख्याही कधी कधी सोयीसाठी ते मान्य करतात. कारण जीवनपद्धत म्हटले कि त्याचा धर्माशी काहीएक संबंध रहात नाही. पण सोयीच्या वेळीस हिंदू हा त्यांच्या दृष्टीने धर्मच असतो. स्वत: आचरतात ते मात्र वैदिक तत्वज्ञान असते.

·         खरे म्हणजे हिंदू धर्माची व्याख्या होत नाही असे नसून ती जर करायचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न अंगलट येऊन आपले पितळ उघडे पडेल अशी भिती त्यांना वाटते व या त्यांच्या भितीचा अनुभव मी गेला अनेक काळ घेत आहे. पण हिंदू धर्माची व्याख्या का होत नाही? प्रत्येक धर्माची स्वत:ची अशी परंपरा असते, मान्य कर्मकांडे असतात व त्यावरून त्याची व्याख्या व्हायला हरकत नाही. तरीही काही व्याख्या करायचे प्रयत्नच केले गेले नाहीत असेही नाही. त्या व्याख्या आपण जरा नजरेखालून घालुयात व त्यातीलही भोंगळपणाही समजावून घेऊयात. वैदिक धर्म आणि हिंदू धर्म हे अत्यान स्वतंत्र वेगळे धर्म असताना हिंदूंमध्ये वैदिक धर्मियाही गृहीत धरले तर मग कशी व्याख्या होणार याचा विचार हिंदूच करत नाहीत आणि वैदिकांना तर ते अडचणीची असल्याने तेथे सोयीस्कर मौन बाळगून बसतात.

काही विद्वानांनी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे त्याही आपण पाहून घेऊयात. खालील व्याख्या मी श्री. ज.स.करंदीकर, श्री. दा.न. शिखरे, पं. महादेवशास्त्री दिवेकर व डा. रा. ना. दांडेकर यांच्या विवेचनातुन घेतल्या आहेत.

१. "ज्याचे आईबाप हिंदू असतील तो हिंदु."
या व्याख्येतील त्रुटी अशी कि अहिंदू माता-पित्यांच्या संततीला हिंदु करुन घेतले तर ती त्याला लागु होत नाही.

२. हिंदुस्तानात जन्म झाला तो हिंदू.
या व्याख्येत परदेशात जन्म झालेल्या हिंदुंना बाहेर टाकले जाते तर ज्या मुस्लिम अथव अन्य धर्मियाचा जन्म हिन्दुस्थानात झाला आहे त्यांनाही हिंदू मानावे लागते.

३. जातीभेद मानतो तो हिंदू.
असे मानल्यास लिंगायतादी जातीभेद न मानणारे संप्रदाय (व व्यक्तीही) अहिंदु ठरतात. एवढेच नव्हे तर ही व्याख्या जातीभेदाला गंभीर रुप देते.

४. जो हिंदु कायदा मानतो तो हिंदु.
काही विद्वान ही व्याख्या मानतात. पण हा कायदा केवळ दत्तक, वारसा, विवाह, घटस्फोट आदि बाबतींपुरता मर्यादित आहे. शिवाय या कायद्यात बौद्ध, जैन, शीख आणि वैदिकही एकत्र धरले गेलेले आहेत त्यामुळे हा कायदा धर्माची व्याख्या होऊ शकत नाही.

५. सावरकरांची व्याख्या:
"आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका

पितृभू: पुण्यभुश्चैव स वै हिंदुरिती स्मृत:
अर्थात सिंधु नदीपासुन समुद्रापर्यंत पसरलेली ही भारत्भूमी ज्याला वाडवडीलांची भूमी आणि पुण्यभुमी वाटते तो हिंदू होय.
ही व्याख्या प्रादेशिक आहे आणि भावनिक आहे. ही व्याख्या राष्ट्रवादाला डोळ्यासमोर ठेवत बनवलेली आहे. ती धर्माचे दिग्दर्शन करत नाही.

६. लो. टिळक यांची व्याख्या अशी आहे:
प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानाननेकता
उपास्यानामनियमं एतद्धर्मस्य लक्षणम
अर्थात: वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य नेमके कोण असावे याविषयी निश्चित नियम नसणे, हे हिंदु धर्माचे लक्षण होय.

श्री. दा. न. शिखरे टिळकांच्या व्याख्येवर आक्षेप घेतात तो असा: "वेदप्रामाण्य मान्य नसलेल्या चार्वाकापासून ते संतांपर्यंत एक अवाढव्य प्रवाह आहे तो या व्याख्येप्रमाणे हिंदू ठरत नाही. एवढेच नव्हे तर स्त्रीया आणि शुद्रांना मुळात वेदांचा अधिकारच नाहे. याखेरीज महत्वाचा प्रश्न असा कि वेदांच्या पुर्वीही हिंदु धर्म आस्तित्वात होताच कि! शिवाय "श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त अशीही व्याख्या करता येत नाही कारण श्रुती अनेक असून त्यात खुपच मतभिन्नता आहे. पुराणांतील मतभेदांबाबत तर बोलायलाच नको. तसेच कोणते आचार आवश्यक आहेत हेही लोकमान्यांनी स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे अव्याख्येयता हीच हिंदु धर्माची व्याख्या आहे असे म्हटले तर त्याचा व्यवहारात काही उपयोग होत नाही." ("सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म": श्री. दा.न.शिखरे)

गोळवलकर गुरुजींचे "विचारधन" ते पं. दिनदयाळ उपाध्यायांचे "एकात्म मानव दर्शन" यातील लेख हे संघाचे मुख्य तत्वज्ञान आहे. हे समग्र वाचले असता, जरी त्यात हिंदू धर्माची व्याख्या केली नसली तरी हिंदू धर्म म्हणजे त्यांना काय म्हणायचे आहे हे स्पष्ट होते. वेद हे त्यांच्या दृष्टीने हिंदू धर्म/संस्कृतीचे मुलस्त्रोत आहेत. त्यांच्या मते चातुर्वर्ण्य व जातिव्यवस्था या शास्त्रशुद्ध असून प्रत्येक वर्णाने व जातीने आपापले काम चोख केले तरच समाजाचा गाडा सुरळीत चालू राहील. आधुनिक कालातील व्यवसायाधिष्ठित समाजविभागणीपेक्षा जातीव्यवस्था जास्त शास्त्रीय आहे. वैदिक संस्कृती ही जगातील श्रेष्ठ संस्कृती आहे. वेदांमद्ध्ये सर्व ज्ञान आहे. वेदाधार हाच हिंदूंचा मुलाधार आहे. ऋग्वेदातील वचनांप्रमाणे सारे एकजीव, एक विचाराचे होऊन गौरवशाली जीवन जगायला हवे. संघाची "समरसता" किंबहुना याच वचनावर आधारित आहे.

संघवादी विद्वान, कथित संशोधक आर्य हे भारतातीलच असून येथुन ते जगभर पसरले अशी मांडणी करण्यात व्यस्त असतात. श्रीकांत तलागेरी व कल्याणरमण यात आघाडीवर आहेत. यांची मांडणी अशी कि वैदिक आर्य हे भारतातीलच. त्यांनी सिंधू संस्कृतीची स्थापना केली. वेदकाळ हा सिंधुपुर्व असून वैदिक आर्य भारतातून युरोपपर्यंत पसरले व आर्यभाषांचा प्रसार केला. घग्गर नदी म्हणजेच ऋग्वैदिक सरस्वती असून तिच्याच काठावर वेद रचले गेले म्हणून सिंधू संस्कृतीला सिंधू-सरस्वती संस्कृती म्हणायला हवे. यासाठी त्यांनी अनेक कोलांटउड्या घेतल्या आहेत. थोडक्यात भारतात भाषेसहित जेही काही पुरातन आहे, समृद्ध वारशाचे अंग आहे, ते वैदिकांनी निर्माण केले आहे. सबब भारतीय संस्कृती ही वैदिकांची देणगी आहे. पण या मतांचा सविस्तर उहापोह येथे घेत न बसता वरील बाबींवरून काय लक्षात येते, ते पाहुयात.

टिळकांनी त्यांच्या व्याख्येत वेद व वेदमान्यता घेतल्याने काय समस्या निर्माण होतात हे दा. न. शिखरेंनी दाखवून दिलेलेच आहे. इतरांच्या बव्हंशी व्याख्यांत व संघीय समजुतींत वेदांतील चातुर्वर्ण्य त्यांना मान्य आहे. वेदांत सर्व ज्ञान-विज्ञान असून वेद हेच हिंदू धर्माचा मुलाधार आहेत असेही त्यांचेच मत आहे. हे जर खरे मानले तर ८०% हिंदू हिंदुच ठरत नाहीत याचे कारण म्हणजे त्यांचा मुळात वेदांशी धार्मिक, संस्कारात्मक वा पठनात्मकही कधी संबंधच आलेला नाही. एवढेच काय वेदोक्त संस्कारही वैदिक तत्वज्ञान नाकारते. अवैदिकांसाठी (हिंदूंसाठी) तंत्रोक्त म्हणजेच पुराणोक्त संस्कार असतात. त्यावरच त्यांची समग्र जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती उभी आहे. जर सारे एकाच धर्माचे असते तर धर्मग्रंथांचे व धार्मिक संस्कारांचे अधिकार सर्वांना सारखे समान असले पाहिजेत व सर्व वैदिक देवता सर्वांना प्रिय राहून अन्य शिवादि वेदपुर्व देवता विसर्जित व्हायला हव्या होत्या असे कोणीही म्हणेल. पण तशी स्थिती नाही. हिंदू आजही आपल्या वेदपूर्व देवताच पुजत असतात, एकाही वैदिक देवता ते पुजत नाहेत. यावरून वैदिक आणि हिंदू हे दोन वेगळे धर्म आहेत हे समजून येईल.

बरे, चर्चा अंगलट आली की मग  हिंदू नांव विदेशी आक्रमकांनी दिले असे तेच म्हणत असतात. संघाला तर विदेशी आक्रमकांचा (म्हणजे मुस्लिमांचा) प्रचंड तिटकारा असुनही मग ते हिंदू हे नाव ते "अभिमानाने" कसे घेतात? ते कसे चालते? त्याला नेमके काय कारण आहे?

येथे जरा सावरकरांची जरा मदत घेऊ. ते म्हणतात "बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. तर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील. -  (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६९)

या विधानात सावरकर शब्दच्छल करीत जैन, बौद्ध, शीख या धर्मांनाही हिंदुच संबोधत आहेत ही बाब गैर व अनैतिहासिक असली तरी ती येथेच सोडून देवू. या विधानातील सनातन किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म ही धर्मनांवे विचारात घेऊ. सनातन धर्म हा वेदाधारितच असतो हे आपल्याला माहितच आहे. श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म असे म्हटले तर प्रचंड विरोधाभास निर्माण होतो.

श्रुति-स्मृति म्हणजे वेद व मनुस्मृती ते अनेक स्मृत्या. यातील धर्म काय आहे? यातील धर्म हा यज्ञांचा धर्म आहे. सर्व कर्मकांडे यज्ञाभोवती फिरतात. यात वर्णधर्म आहे. यातील एकाही धार्मिक कर्मकांडे हिंदू करत नाहीत. त्यांना तसा अधिकारही नाही. हिंदूंची कर्मकांडे त्यापेक्षा टोकाची वेगळी आहेत. हिंदू ज्या देवी-देवता पुजतात त्यातील एकाही दैवताचे नांव ऋग्वेदात मिळत नाही. पुराणोक्त धर्म म्हणजे पुराणांतील कथा / गाथा नव्हेत. तंत्रोक्त आगमिक धर्म म्हणजे पौराणिक धर्म. पुराणांत पुजादि धार्मिक कार्यांसाठीचे मंत्र अथवा विधी नाहीत. जे आहेत ते तंत्र परंपरेतून आलेले आहेत. वैदिक त्रैवर्णिकांसाठी मात्र  वेदोक्त मंत्र व विधी असतात.  म्हणजेच श्रुति-स्मृतिचा धर्म वेगळा आहे तर पुराणोक्त धर्म वेगळा आहे. विधीही सर्वस्वी वेगळे आहेत. आणि या श्रुती-स्मृत्योक्त धर्माचे नांव काय? तर सावरकरच सांगतात कि त्याचे नांव सनातन अथवा वैदिक धर्म. थोडक्यात वैदिक आणि हिंदू (अथवा आगमिक/तंत्रोक्त/पुराणोक्त) हे धर्म  वेगळे आहेत, ही बाब धार्मिक परंपरांनीच स्पष्ट केली आहे.

थोडक्यात सावरकर वैदिक धर्म, हिंदू धर्म, बौद्ध व जैनादि धर्म या सर्वच धर्मांना एकत्रीत रित्या हिंदू हे नांव देतात. पण हे धर्म वेगळे आहेत याची त्यांना चांगली जाण आहे. संघालाही ती जाण आहे. हिंदू हे नांव वापरून वैदिक धर्माचे अतोनात स्तोम माजवत हिंदुंची दिशाभूल करायचा हा प्रकार आहे.  वेद हे ज्यांचे धार्मिक वाड्मय नाही, ज्यांच्या धर्माशी वैदिक वाड्मयाचा दुरान्वयानेही संबंध नाही ते वैदिक धर्माला आपला धर्म कोणत्या आधारावर मानणार होते? हा धोका त्यांनाही माहित असावा म्हणून ते हिंदुत्वाबाबत बोलत असले तरी गाभा हा वैदिकच असतो. त्यामुळेच ते सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती न म्हणता "वैदिक आर्यांनी निर्माण केलेली" व म्हणजेच वैदिक संस्कृती म्हणतात. वैदिक चातुर्वर्ण्याचे शास्त्रशुद्ध गुणगाण गातात. आणि नेमके हेच हिंदुंच्या लक्षात न आल्याने त्यांची प्रचंड गफलत झाली आहे. संघाच्या छुप्या डावाला ते बळी पडलेले आहेत. हिंदुत्वाच्या नांवाखाली आपण वैदिक अजेंडा राबवत आहोत हे त्यांना न समजल्याने ते स्वत:ची ओळख विसरत स्वत:ची फरफट करून घेत आहेत. अकराव्या शतकानंतर ही स्वतंत्र ओळख विसरण्य़ाची प्रक्रिया कशी व कोणत्या स्थितीत झाली याची मिमांसा मी "जातीसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात केली आहेच!

पण वर्तमानकालीन ज्ञानयुगातही सांस्कृतिक इतिहासाच्या विश्लेशनात कमी पडल्याने असे करत असतांना आपण आपल्याच वेदपुर्व काळापासून चालत आलेल्या वैदिकेतर "सिंधू" (हिंदू/आगमिक)) धर्माचे, आपल्या देवी-देवतांचे राजरोस अपहरण होऊ देत आहोत याचे हिंदूंना भान नाही. हे नवे धार्मिक दास्य आहे हेच मुळात त्यांना समजत नाही.

वैदिकांना हिंदू हवेत ते त्यांच्या वर्चस्वासाठी व स्वत:चे अजेंडे राबवण्यासाठी हे हिंदुंना अद्याप समजलेलेच नाही. आणि याचमुळे संघाने कधीही हिंदू धर्माची व्याख्या केली नाही. तशी ती व्याख्या होते, पण केली तर आपणच वेगळ्या धर्माचे ठरतो याची त्यांना आंतरिक जाण आहे. जाण नाही ती हिंदुंना अशी ही शोचणीय परिस्थिती आहे.

म्हणजेच संघाला जे हिंदू राष्ट्र हवे आहे ते खरे तर वैदिक राष्ट्र आहे, वेद आणि स्मृत्यांचे तत्वज्ञान लादता येईल असे राष्ट्र हवे आहे. यात स्वातंत्र्य नाही. शूद्र वर्नव्यवस्थेचा भाग आहेत हे सांगणे ही लबाडी आहे. शुद्र म्हणजे जे वैदिक धर्म पाळत नाहीत किंवा वैदिक धर्मकक्षेबाहेरचे, म्हणजेच अवैदिक लोक अशी व्याख्या विद्वानांनी केलेली आहे. त्याही थोडक्यात पाहुयात.

१) "शूद्र हे मुळात एखाद्या अवैदिक (अनार्य) टोळीचे नांव असावे." -राज पृथी,  Indian Caste System, edited by R.K. Pruthi, Discovery Publishing House, 2004, page 72.
२) "तीन वर्णांच्या बाहेर जो समाज होता त्याला शूद्र हे नांव वापरले गेले." - वि. का. राजवाडॆ, (राधामाधवविलासचंपू, प्रस्तावना.)
३) "शूद्र हे आधी एखाद्या टोळीचे नांव असावे. नंतर हे नांव जोही कोणी अनार्य आहे, अवैदिक आहे व तीन वर्णांच्या बाहेर आहे अशा सर्वांनाच, परकीयांनाही उद्देशून वापरले गेले. सुत्रांच्या दृष्टीने जेही कोणी तीन वर्णांचे नाहीत ते शूद्र."- देवदत्त भांडारकर, (Some Aspects of Ancient Indian Culture, By D. R. Bhandarkar, 1989, page 12.)

वरील विद्वत्मते पाहिल्यावर लक्षात येईल कि जे वैदिक नव्हते ते वैदिकेतर लोकांना (व जे आपल्या सेवेत घेतलेले पण अन्यधर्मीय) ते सरसकट शूद्र म्हणत होते. अंगविज्जा या दुस-या शतकातील महाराष्ट्री प्राकृत ग्रंथातही त्रैवर्णीक नसलेले भारतातील इतर सर्व, त्यात शक, हुण कुशाण हे पराकीयाही ही आले, शूद्र आहेत असे नोंदवलेले आहे. वरील व्याख्यांवरुनही दोन धर्म स्वतंत्र असल्याचे स्पष्ट दिसत असतांना संघ हिंदू नांव वापरत वैदिक अजेंडा कसा राबवत आहे हे लक्षात यावे. शूद्र हा एकंदरीत ज्ञात समाजाचा हिस्सा असला तरी तो वैदिक धर्मीय नाही याची जाण पुरुषसुक्ताला जशी आहे तशीच मनुस्मॄतीलाही. जी बंधने शुद्रांवर आहेत ती वैदिकांच्या सेवेत गेलेल्या तत्कालीन सेवक वर्गावर. अन्यांवर नाहीत अन्यथा मनुस्मृतीत शुद्र राजे व त्यांची राज्ये नोंदली गेली नसते किंवा मंदिरांची व पूजा-यांचीही निंदा केली गेली नसती.

·        
विषमता व स्त्री-स्वातंत्र्य नाकारणे हा वैदिक धर्माचा मुख्य गाभा आहे. हिंदुन्हे त्याउलट आहे. पाट लावून विधवा वा विधुरांचे पुनर्विवाह होत असतात ते हिंदूंत. केशवपनाची चालही होती ती वैदिक धर्मात. या प्रथा परंपरा धर्मतत्वांतून आलेल्या आहेत. आणि ती सर्वस्वी वेगळी आहेत. हिंदू स्त्री-समानता मान्य करतात, वैदिक नाहीत.

·        
संघाला भारतीय राज्य घटना मान्य नाही हे जगजाहीर आहे. याचे कारण लोकशाहीचे मुल्यच त्यांना मान्य नाही. घटनेने स्वातंत्र्य-समता-बंधुता या महनीय मुल्यांचा स्विकार जो केला आहे तोही त्यांना मान्य नाही. समतेऐवजी ज्यात व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तित्वच उरत नाही अशी समरसता त्यांना हवी आहे. "आपल्याकडेही जाती बनल्या पण एक जातीने दुस-या जातीशी संघर्ष करण्याचा विचार केला नाही. वर्णांची संकल्पना ही विराट पुरुषाच्या चारी अंगांशी केली गेली. या चार अंगांत, म्हणजे डोके, हात, मांड्या व पाय, यात संघर्ष नसून एकात्मता आहे. परस्परपुरक असणे व एकात्म असणे हेच जीवन व्यवहाराचे मानदंड असून ते साधणे व परस्पर संघर्ष टाळण्याची वृत्ती जोपासणे महत्वाचे आहे" असे दीनदयाळ उपाध्याय (एकात्म मानव दर्शन) म्हणतात. त्यांना वर्णीय उतरंडीच्या विषमत: व जातनिहाय उच्चनीचता मान्य आहे. गोळवलकर गुरुजीही वर्णव्यवस्था आणि जन्माधारित जातिव्यवस्थेचे खंदे समर्थक होते. थोडक्यात घटनेची मुलतत्वेच मान्य नाहीत. याबद्दल आजकाल प्रकट बोलणे टाळले जात असले तरी हे तत्वज्ञान वरीष्ठ संघ सेवकांना चांगलेच पाठ असते व मान्यही असते. हे तत्वज्ञान आम्हाला आज मान्य नाही असे संघाने कधी घोषितही केलेले नाही.

संघाला हिंदू राष्ट्र आणायची किती इच्छा आहे हे आपण, मागचे संदर्भ वजा केले तरी, आजही प्रबळ इच्छा आहे व ती रेटण्यासाठी सुरुवातीचे काही मार्ग वापरले जात आहेत हे आपण हिंदुत्ववाद्यांच्या (पक्षी वैदिकवाद्यांच्या) उन्मादावरून पाहू शकतो. गोहत्या व गोमांसबंदीबाबतच्या उन्मादात लोक ठार मारले गेले किंवा जीवघेण्या मारहाणीचा, विशेषत: दलितांना, सामना करावा लागला. गोमुत्र व गोमयाची तरफदारी केंद्रीय मंत्रीही करू लागले. वायफळ दाव्यांचा वर्षाव झाला. खरे तर वैदिक एके काळी गोमांसभक्षक होते हे गवालंभ ते गोमेध यज्ञाच्या वर्णनावरुनच सिद्ध होते. शुलगवात बैलाचा बळी निहित आहे. मधुपर्कादि असंख्य संदर्भ वैदिकांच्या गोमंसभक्षणाकडे निर्देश करत असतांनाही ते नुसते नाकारायचीच सध्या प्रथा पडली आहे. एवढेच नव्हे तर गोहत्या करणा-यास वेदांत देहदंडाची शिक्षा सांगितले आहे हे तर दडपुन सांगितले जाऊ लागले. रा. स्व. संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यमद्ध्ये अशी माहिती प्रसिद्ध झाली होती. खरे तर वेदात असली कसलीही आज्ञा नाही अथवा विधानही नाही. वैदिक गोमांस खात होते तर खात होते. ते कबूल करायला लाजायचे काय कारण? कोणी काय खावे वा काय खाउ नये याचे बंधन असू शकत नाही. वैदिकांनी नंतर कृषीवलसंस्कृतीशी संपर्क आल्यानंतर नाईलाजाने गोमांसभक्षण सोडून दिले. पण आता त्याचे स्तोम का माजवले जावू लागले याची कारणे वैदिक सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

आता आपण मुख्य प्रतिपाद्य विषयाकडे वळू. तो म्हणजे संघाचा हिंदू राष्ट्राचे (पक्षी वैदिक राष्ट्राचे) स्वप्न साकार होईल काय? खरे तर संघाला नुसते हिंदू राष्ट्र नको आहे तर अखंड हिंदुस्तान हवा आहे. म्हणजेच पाक/बांगला/ब्रह्मदेश/अफगाणिस्तानसहितचा हिंदुस्तान. हे तर दिवास्वप्न आहे हे उघड आहे. बरे हे अखंड अथवा सध्याचे हिंदुराष्ट्र त्यांना शक्यतो मुस्लिमविरहित अथवा मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व देवून हवे आहे. गोळवलकर गुरुजी म्हणाले होते, "The non-Hindu people of Hindustan must either adopt Hindu culture and language, must learn and respect and hold in reverence the Hindu religion, must entertain no idea but of those of glorification of the Hindu race and culture ... In a word they must cease to be foreigners, or may stay in the country, wholly subordinated to the Hindu nation, claiming nothing, deserving no privileges, far less any preferential treatment—not even citizens' rights." (We, or Our Nation defined (1938)) विधान स्वयंस्पष्ट आहे. या मताशी असहमती अद्याप संघाने दाखवलेली नाही हेही येथे उल्लेखनीय आहे. हीच गत ख्रिस्त्यांसाठी आहे हेही उघड आहे. दलितांबाबत संघाचे विचार वरकरणी सौम्य भासत असले तरी मनुस्मृतीचा गवगवा करत, तीच प्राचीन कालची आदर्श समाजपद्धती आहे असे विधान करत घटनेला विरोध दाखवला आहे. (६ फ़ेब्रुवारी १९५०, Organiser) म्हणजेच दलितांचे स्थान त्यांच्या दुष्टीने काय हे लक्षात घ्यायला हरकत नाही. खरे तर मनुस्मॄती  जशीच्या तशी वैदिक धर्मियांसाठी राबवावी. त्यांच्या सेवेत जाणा-या शुद्रांवर त्यांनी स्मृतींची बंधने टाकावीत. शूद्रांच्या राज्यांत निवास करू नये. शुद्र राजांना (सत्ताधीशांना) आपल्या, यज्ञ सोडा, श्राद्ध कार्यक्रमांतही बोलावू नये. ब्राह्मणाने ब्राह्मणांना घालून दिलेले नियम पाळावेत. त्यांना सेवा त्याज्ज्य असल्याने सर्व नोकरी-धंदे सोडुन द्यावेत. वेदाध्ययन व त्याचे वैदिकांना शिक्षण देत बसणे एवढाच उद्योग करावा. हे यांना चालणार आहे काय? सरसकट शुद्रांसाठी (म्हणजे हिंदूंसाठी) स्मृत्यांतील नियम लिहिले गेले आहेत या भ्रमातून वैदिकांनी व संघानेही बाहेर यावे.

संघ "वैदिक" शब्द न वापरता हिंदू शब्द का वापरतो हे देवभोळ्या व सांस्कृतिक इतिहासाचे कसलेही भान न ठेवलेल्या हिंदूंना (ज्यांना आपण आज बहुजन म्हणतो) समजलेले नाही. उलट हेच वैदिक धर्माचे, ते वैदिक धर्माचे नसल्याने कसलेही वैदिक धर्माधिकार प्राप्त नसतांना अथवा त्या धर्माचे कसलेही ज्ञानही नसतांना त्यांचे संरक्षक व त्यांच्या हितासाठीचे योद्ध्ये बनलेले आहेत. त्यामुळे समस्या अधिक गहन झाली आहे. संघ म्हणतो तसे "हिंदू राष्ट्र" होण्यात आपलीच गुलामगिरी त्यांना आवश्यक आहे याचे त्यांना भान नाही ही अशी शोचणीय अवस्था आहे. रा. स्व. संघ जेही राष्ट्र बनवू पाहतोय ते हिंदू राष्ट्र नसून वैदिक राष्ट्र असणार आहे हे त्यांना समजावून सांगायची नितांत गरज आहे. पण तसा वैचारिक फोर्स आज तरी नाही हे वास्तव मान्य करायला हवे.

आपला अजेंडा राबवत नेण्याचे, कसोशीने सातत्यपुर्वक रेटत राहण्याचे कसब संघात आहे हे सर्वांना माहितच आहे. अभ्यासक्रमात ते, पुर्ण बहुमत असले तर, वैदिक ज्ञानाचा व संस्कृतचा समावेश करतील ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. आता जो नवा इतिहास लिहिला जाणार आहे त्यो अभ्यासक्रमात आणला जाणार हेही मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यातुनच पुढची पिढी वैदिकाश्रयी व म्हणूनच विषमतावादी, अन्य-धर्म द्वेष्टी घडवण्याचा जो प्रयत्न आजवर वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत ते करीतच आले आहेत तो सर्वाव्यापी होईल. पण त्याची परिणती अराजक, सर्वव्यापी हिंसाचार व शेवटी राष्ट्राचे तुकडे पडण्यात होईल याचे भान या वैदिकावाद्यांना नाही.. संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न, जर त्यांचा प्रतिरोध आजच पुरेशा पद्धतीने होत राहिला नाही तर ते शांतपणे त्यांच्या ध्येयाच्या दिशेने एकेक पाऊल पुढे टाकतच जातील व ते स्वप्न साकार करायचा प्रयत्न करतील. त्यासाठी देश विखंडित झाला तरी त्यांची हरकत असेल असे मला वाटत नाही हे सावरकरांच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेकडे पाहता दिसते.  सावरकरांनी केवळ हरिसिंग हिंदू आहे म्हणून त्याला काश्मिर भारतात विलीन न करता स्वतंत्र राष्ट्र ठेवत नेपाळच्या राजाची मदत घेत भारतीय संघराज्यावर स्वारी करत जिंकून घ्यायचा सल्ला दिला होता. हाच सल्ला त्यांनी त्रावणकोरच्या महाराजांना व अन्य हिंदू संस्थानिकांना दिला होता. म्हणजे हिंदू बहूल भांगांचे एकेक स्वतंत्र हिंदू राष्ट्र व मुस्लिम बहुलांची नवी पाकिस्ताने (शत्रू राष्ट्रे) अशी स्थिती संघाला जर प्रेय वाटली तर काय बिकट स्थिती होईल याची आपण कल्पना करू शकतो.

धर्माधारित राष्ट्र हा मानवतेला शाप आहे. कोणता धर्म चांगला कोणता वाइट हा विषयच नसून मुळात धर्म हा राज्यसंस्थेच्या नियमनाचा विषयच नाही व नसावा. घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेचे स्वरूप अत्यंत विचारपुर्वक इहवादी (सेक्युलर) ठेवले आहे. गांधी-नेहरूंचा द्वेष करण्यात ज्यांची हयात गेली त्यांना ही इहवादी संकल्पना मान्य असण्याची शक्यता नाही. मुळात संघ धर्मवादी आहे व ते त्याने कधी लपवलेलेही नाही. खरे तर संघर्ष धर्मवाद कि इहवाद असा आहे. थोडक्यात आपल्याला घटनात्मक कायद्याचे राज्य हवे कि धर्माचे राज्य हवे यातील आपली निवड आहे. आपण ती केलेली आहे. चिरंतन घटनात्मक कायद्याच्या राज्याची आपली निकड आहे. आज अनेक संघी मित्र व्यक्तिगत स्तरावर व्यापक भुमिका घेतात, पण ती संघाची भुमिका नाही. व्यक्तीगत स्तरावर प्रत्येक जण मानवी भाव-भावनांनी गजबजलेला असतो व मानवी मुल्ये कोठेतरी समजत असतात. समजत नाही ते उन्माद्यांना, ब्रेनवाशिंगला बळी पडलेल्यांना.

हिंदू राष्ट्र ही इसिसी महत्वाकांक्षा आहे. मुस्लिम तर सोडाच पण तमाम हिंदुंना वैदिकांचे गुलाम करण्याची ही महत्वाकांक्षा आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना अनेक भोळसट हिंदुंना आकर्षक वाटते हे खरे असले तरी त्यांना त्यामागील वैदिक अजेंडा अजून नीट समजायचा आहे. भारताचे ज्यामुळे तुकडेच पडणार आहेत असा हा अजेंडा आहे. तो पुरेपुर राबवणे नजिकच्या भविष्यात सहजशक्य नसले तरी आताचे उन्माद, वल्गना अशाच सुरु राहिल्या तर एका पिढीनंतर याचा भयावह उद्रेक दिसू लागेल. याचा आपण वेळीच विचार करायला हवा.

Friday, October 30, 2020

भारतीय मुस्लिमांचा हा मूर्खपणा कशासाठी?


नृशंस घटनांवर काही गोष्टी अनेकदा लिहून झालेल्या असतात. घटनांची पुनरावृत्ती होतच राहते. अमानुष हिंस्त्रपणा माणसाची पाठ सोडत नाही. त्या अमानुष घटनांवर लिहायचाही कंटाळा येत जातो. हिंस्त्रपणा ही कोणा एका धर्म/पंथाची मक्तेदारी राहिलेली नसली तरी जेंव्हा त्या हिंस्त्रपणाचे मोर्चे काढून समर्थन धर्म/पंथीयांकडून होते तेंव्हा तो धर्म/पंथ एक दिवस संपुष्टात येणार यात शंका नाही.
पैगंबरांचे चित्र किंवा व्यंगचित्र काढण्यात गैर का असावे? कोणी गैरही मानले तर त्याचा विरोध करण्याचा मार्ग हिंसा हाच आहे काय? येशुपासून कृष्ण-गणपतीची असंख्य व्यंगचित्रे काढली गेलेली आहेत. त्यामुळे येशू ते कृष्ण/गणपती छोटे झाले काय? होत असतील तर ते मग तेवढे महान नव्हतेच. पैगंबरही मग सांगितले जातात तेवढे मुस्लिमांच्या दृष्टीने महान वगैरे नसले पाहिजेत, एका भ्रमाच्या भोपळ्याला गुलदस्तात ठेवण्यासाठी केलेली ही नृशंस योजना आहे असे म्हटले तर ते मग कसे अयोग्य ठरेल?
धर्मावर, प्रेषितावर प्रेम वगैरे ठीक आहे. पण त्या प्रेमाचा वेडपटपणा करत जीव घेणे, जीव देणे यात कोणता धर्म आणि प्रेषिताची महत्ता आहे? धर्मातले आदेश हे अपरिवर्तनीय ईश्वरी संदेश असतील तर मग त्या ईश्वरावरच प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. परीवर्तनशिलता हाच (मानत असाल तर) ईश्वरी सृष्टीचा नियम आहे असे म्हणतात. सृष्टीच काय मनुष्यही बदलत असतो. अपरिवर्तनशील असे काहीही, अगदी असला तर ईश्वरही नाही. मग त्याचे त्या काळात दिलेले संदेश अपरिवर्तनीय कसे? उंटावर बसून समशेरी फिरवत इतरांना मारण्याचा आणि स्त्रिया पळवायचा काळ कधीच मागे पडला. ते जग राहिले नाही की ती संस्कृती राहिली नाही. आता तसे वागताही येत नाही. चरितार्थाची साधनेही बदललेली आहेत. हे सारे होत असतांना धर्मादेशांच्या हास्यास्पद अपरीवर्तनीयतेची मातब्बरी कोणी सांगत असेल तर तो मूर्ख विकृतीचा कळस आहे. इस्लाम खरे तर त्या काळाच्या गरजेचे अपत्य होते. आता त्यातील कालसुसंगत आहे ते घेत बाकी अरबी समुद्रात बुडवता येण्याचे साहस करायला हवे. आणि तेहे जमणार नसेल तर जागतिक संस्कृती आपला द्वेष का करते हा प्रश्न उपस्थित करता कामा नये.
चार्ली हेब्दो मासिकाच्या कार्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दहा पत्रकारांसहित १२ ठार तर २० जखमी झाले होते. अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा होता. नववर्षाची सुरुवात अमानवी रक्तपाताने झाली होती. पण ती साखळी अजून संपली नाही हे ताज्या हल्ल्याने दाखवून दिले.
मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र काढले म्हणून मुस्लिम दहशतवाद्यांनी हे अमानवी कृत्य केले असे मानले जाते. हा विकृत मुर्खपणा आहे. पैगंबरांची चित्रे काढली गेली नाहीत असे एकही शतक नाही. मोझेस, येशूची व्यंगचित्रेही असंख्य वेळा काढली गेली आहेत. पैगंबरांची काढली तर एवढा गजहब का? हा तद्दन मुर्खपणा...विकृती आणि मेंदुच नसल्याचे लक्षण आहे.
तेच आयसीसचे. या क्रूरकर्मा संघटनेने २०११ पासून निर्माण केलेल्या हिंसक संघर्षात दोन लाखाहुन अधिक ठार झालेले आहेत.आयसिसच्या दहशतवाद्यांनी हाती पडलेल्या सिरियन/इराकी नागरिकांसह परकीय नागरिक व पत्रकारांची ज्या नृशंस पद्धतीने हत्या केली आहे ती "सैतानी" या शब्दातच वर्णन करता येईल. परंतू हा मध्यपुर्वेतील राष्ट्रांपर्यंत मर्यादित असलेला मामला युरोपच्याच भुमीवर जावून पोहोचेन याची कोणी कल्पनाही केली नव्हती. चार्ली हेब्दो मासिकातील व्यंगचित्रांच्या बदल्यासाठी हा आतंकवाद फ्रांसमद्ध्ये घुसला. त्यानंतर लगेच ब्रुसेल्स या बेल्जियमच्या राजधानीत विमानतळ आणि मेट्रो स्टेशनवर झालेल्या दहशतवादी स्फोटांत तीसहून अधिक ठार झाले. युरोपमध्ये आयसिसचे नेटवर्क किती पसरले आहे याचा अंदाज या अनपेक्षित हल्ल्यामुळे येतो.
आणि त्याहून घृणास्पद बाब आहे ती या दहशतवाद्यांना समर्थन देऊ पाहणारे मोर्चे आणि तेही भारतात निघावेत ही. भारतीय मुस्लिमांचा दहशतवादाला पाठींबा असल्याचा संदेश यातून जातो आहे हे समजायची बुद्धीही येथील मुस्लीम नेते गमावून बसलेले आहेत. नेते गमावून बसलेत कारण स्थिर बुद्धीने चिकित्सा करणारे मुस्लीम अभावानेच आहेत हे खरे कारण आहे. पुराणपंथी समाज कधीही वैश्विक मानवतावादी विचारांचा होऊ शकत नाही.
पण ज्याला स्वत:चा कडेलोटच करून घ्यायचा आहे त्याला काय सांगणार?
भारतीय मुस्लिमांनी या मूर्खपणापासून दूर रहायला हवे होते. पण तेही चुकत आहेत हे लक्षात कोण घेणार?

Monday, October 26, 2020

संघाचे वैदिकत्व की शिवसेनेचे हिंदुपण?

 

रा.स्व. संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत आणि एकेकाळी त्यांची मित्र असेलेल्या शिवसेनेचे प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या दोघांची दस-यानिमित्त होणारी भाषणे ऐकली. आता हे दोन घटक मित्र राहिलेले नाहीत म्हणून त्यांच्या विचारांत बदल झालाय की संघाचे हिंदुत्व हे हिंदूंशी निगडीत नसून वैदिकवादाशी निगडीत आहे या प्रखर सत्याकडे सेनेचीही वाटचाल सुरु झालेली आहे याची निदर्शक आहे याचा या निमित्ताने विचार केला जायला हवा. त्यासाठी त्यांच्या भाषणांतले काही मुद्दे आपण विचारात घेऊ शकतो.
श्री. भागवत म्हणाले, आम्ही देशाला “हिंदू” मानतो. हिंदुत्व ही या देशाच्या व्यक्तीमत्वाची खरी ओळख आहे. स्वदेशीमधील “स्व” हाही हिंदुत्वाशी निगडीत आहे त्यामुळे आम्ही स्वदेशीचा अंगीकार हिंदुत्वाचे मुख्य तत्व म्हणून करतो. हिंदुत्व या शब्दाने आम्ही आमच्या आध्यात्मिक परंपरा आणि त्यावर आधारित नितीमुल्य हीच आमची ओळख आहे असे सांगत असतो. रा.स्व. संघाची हिंदू राष्ट्र ही संकल्पना सत्ताकेंद्रित अथवा राजकीय नाही. आमच्या मूल्यरचनेला न मानणारे आणि लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचे संरक्षक आहोत असे मानणारे लोकांना मूर्ख बनवत आहेत. ”
श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, “माय मरो आणि गाय जगो, हे आमचं हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा केलात मग तो गोव्यात का नाही? शिवसेनाप्रमुखांचं आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे आम्हाला देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व नको. हे हिंदुत्व आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. तुम्हीच बडवा ती घंटा. तुम्हाला दुसरं येतंय काय? नाहीतर करोना आला थाळ्या बडवा, घंटा बडवा हेच तुमचं हिंदुत्व. बेडूक उड्या, कोलांटी उड्या, दोरीच्या उड्या मारणारं हे कसलं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असं नाही. बाबरी पाडली गेली तेंव्हा बिळात लपून बसलेले आता आम्हाला आमचे हिंदुत्व विचारत आहेत आणि कदाचित त्या वेळेला ज्यांचं नाव त्यांच्या कुटुंबाशिवाय कुणालाही माहिती नव्हतं ते आम्हाला विचारताहेत तुमचं हिंदुत्व कुठं गेलं? तुम्ही अचानक सेक्युलर झालात?"
श्री. भागवत असे काहीही नवीन सांगत नाहीत जे त्यांच्या पूर्वसुरी आणि संघाचे तत्वद्न्य दीनदयाळ उपाध्याय सांगत आलेले नाहीत. पण यातील मेख अशी की हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र ही संकल्पना मांडत असतांना प्रत्यक्षात लोकांवर वैदिक धर्ममाहात्म्य लादण्याचे कार्य संघ का करत असतो? फार मागे जायला नको. सिंधू-घग्गर संस्कृतीला “सरस्वती” संस्कृती का म्हणत असतो?
आताच केंद्र सरकारने जो गेल्या बारा हजार वर्षांचा इतिहास लिहायला घेतलाय त्या समितीची प्रमुख उद्दिष्टे काय आहेत? वेद आणि संस्कृतची प्राचीनता शोधत (?) सिंधू संस्कृतीचे निर्माते “एतद्देशीय” वैदिक आर्य होते हे त्यांना अस्तित्वात नसलेली गोष्ट शोधायची आहे. हे कार्य भाजप सरकारने केले आणि आमचा राजकारण-सत्तेशी संबंध नाही म्हणून त्याला आम्ही जबाबदार नाही असे भागवतांचे सत्य नसलेले अप्रत्यक्ष दावे जरी मान्य केले तरी मग त्यांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला काय? या समितीत एकजात सारे उत्तरभारतीय आणि वैदिक ब्राह्मणच का असावेत? म्हणजे त्यांना नेमका कोणाचा इतिहास शोधायचा आहे? जैन, बौद्ध, हिंदू हे धर्म आणि प्राकृत आणि द्रविड भाषांना यात प्रतिनिधित्व का नाही? याचाच अर्थ “हिंदुत्व या शब्दाने आम्ही आमच्या आध्यात्मिक परंपरांचे आणि त्यावर आधारित नितीमुल्य हीच आमची ओळख आहे असे सांगत असतो.” हे श्री. भागवतांचे विधान कोणाच्या परंपरांबद्दल जास्त सजगता दाखवते आहे हे लक्षात यावे. या वैदिकत्वात (हिंदुत्व म्हणणे हा हिंदुचा अपमान आहे.) सर्वसमावेशकता नाही हे उघड आहे. हिंदू शब्दाचा वापर केवळ जनसामान्य हिंदूंना दिग्भ्रमित करत वापरून घेणे हा नाही तर अन्य काय आहे? लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता याबद्दल तुच्छता कोठून येते?
गोहत्याबंदी आणि तीही राजकीय सोयीनुसार काही राज्यात आहे तर काही नाही अशी ठेवत राजकारण तर करायचे पण आपले “गोप्रेमी” वैदिकत्व मात्र सोडायचे नाही असे भाजपा किंवा संघाचे धोरण असेल तर श्री. उद्धव ठाकरे काय चुकीचे बोलले? आता हेच वैदिक गोमेध ते गवालंभ यज्ञ करत गोमांस भक्षण करत होते हे कोणी सांगितले तर का राग येतो? बरे कालौघात त्यांनी खाणे सोडून दिले असेल, अनेक लोकांनी तसे केले म्हणून सरसकट सर्वांनीच तसेच करावे हा हट्ट कोणत्या लोकशाहीत बसतो? म्हणजेच मुळात लोकशाहीची मुल्ये अमान्य असल्याचे हे लक्षण आहे असे नव्हे काय?
श्री. ठाकरे यांनी सरळपणे “वैदिक” हा शब्द वापरला नसला तरी भाजप/संघाचे हिंदुत्व वेगळे आहे हे स्पष्ट केले आहे. प्रबोधनकारांचे आणि बाळासाहेबांचे “हिंदुपण” हे शिवसेनेचे नवे तत्व आहे, गोळवलकरांचे हिंदुत्वाच्या नावाखालील “वैदिकत्व” नव्हे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. आणि दोन समान वाटणा-या “हिंदुत्व” या संकल्पनेत फरक आता हिंदुपणाचा वेध घेणा-यांना प्रकर्षाने जाणवू लागला आहे आणि त्याचे राजकीय अभिव्यक्तीही होते आहे ही एक महत्वाची समाज-सांस्कृतिक घटना आहे जिचे दूरगामी पडसाद उमटणार आहेत. हिंदुपणात मुळात सेक्युलरीझम आहे. त्यात कडवेपणाला स्थान नाही. मंदिरांबद्दल जे ओरडा करताहेत ते वैदिकवादीच का आहेत? हिंदूंना त्याने फरक पडत नाही कारण प्रत्येकाच्या घरात देव्हारा आहे. तेच त्याचे मंदीर आहे. हिंदूंची पूजा वैदिकांच्या यद्न्यांप्रमाने कधीही सामुहिक नव्हती. आजही नाही.
राजसत्तेपेक्षा आध्यात्मिक मुल्यांवर उभी असलेली धर्मसत्ता मोठी असते आणि असावी असे म्हणणारे उपाध्याय. भागवत काही वेगळे सांगत नाहीत. कारण आध्यात्मिक नितीमुल्ये कोणती आणि कोणाची याबाबत ते स्पष्ट आहेत. त्यात अवैदिकांना स्थान असण्याचे काहीएक कारण नाही. आणि अशाच आशयाचे विधान महाराष्ट्रात भाजपची सत्ता असतांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केले होतेच.
म्हणजे भाजप आणि संघाचे “हिंदू राष्ट्र” आणि “हिंदुत्व” या संकल्पनाच मुळात फसव्या आणि दिशाभूल करणा-या आहेत अन्यथा पार्श्वभूमीला त्यांनी “वैदिक” राग आळवणे कधीच बंद केले असते.

श्री. ठाकरे धार्मिक भूमिकेबद्दल स्पष्ट होत आहेत ही चांगली बाब आहे. याची या देशात गरज आहे. सेनेने “हिंदुत्व” या शब्दाला सोडचिठ्ठी देत “हिंदुपण” खुलेपणाने स्वीकारावे.
हिंदुंचा ठेका घेतल्याचा आव आणणा-यांना त्यामुळेच रोखता येईल, वैदिक वर्चस्वतावादातून हिंदूंची सुटका होण्याची गती वाढेल आणि ते खरे राष्ट्रहितासाठी आणि सर्वांच्याच शांततामय सहजीवनासाठी उपकारक ठरेल.
-संजय सोनवणी

Wednesday, October 21, 2020

स्टोरीटेलऑडीओ बुक्स

 श्राव्य आणि छापील माध्यमे एकमेकांची स्पर्धक आहेत की काय अशी चर्चा स्टोरीटेलने ऑडीओ बुक्स प्रकाशनांचा धडाका लावल्यानंतर सुरु झाली. गेल्याच आठवड्यात आघाडीची प्रकाशन संस्था प्राजक्त प्रकाशनाचे जालिंदर चांदगुडे आणि माझी भेट झालीत्यावेळीस याच विषयावर झालेल्या चर्चेत ते म्हणालेस्टोरीटेल हे छापील माध्यमातील प्रकाशकांना स्पर्धक नाही तर कोम्प्लीमेंटरी आहेवाचक आवडलेली छापील पुस्तके जशी अभिवाचकाच्या लेखकाच्या शब्दांना शब्द-अभिनयात उतरवलेल्या आवाजात पुन्हा ऐकणे पसंत करतातआणि जे आधी ऐकतातजे पुस्तक आवडते ते श्रोते त्या पुस्तकाची छापील प्रत आपल्या संग्रही असावी म्हणून विकतही घेतात. त्यामुळे ऑडीओ माध्यमामुळे छापील माध्यमातील पुस्तकांचा खप कमी झाला हे म्हणणे खरे नाही. शिवाय विदेशातील मराठी माणसांची साहित्याशी नाळ कायमची जुळून राहते ते वेगळेच. ” 

आणि हे खरेच आहेजेंव्हा टीव्ही वाहिन्यांचा स्फोट झाला तेंव्हाही भारतात आता काही पुस्तकांचे खरे नाही. अशाही चर्चेचा विस्फोट झाला होताप्रत्यक्षात ज्या पुस्तकांवर मालिका निघाल्या त्या पुस्तकांच्या विक्रीने विक्रम केले हा फारसा जुना इतिहास नाही.

माझा व्यक्तिगत अनुभवही वेगळा नाही. माझ्या नव्या कादंब-यांसोबतच स्टोरीटेलने माझी पुर्वप्रसिद्ध किमान २० पुस्तके श्राव्य माध्यमात आणलीविशेष म्हणजे त्यातील उपलब्ध पुस्तकांच्या छापील प्रतीही अधिक संख्येने विकल्या जाऊ लागल्याजी उपलब्ध नाहीत त्यांच्या आवृत्यांची मागणी होऊ लागली.

टिकणार आहे ते मानवी संवेदनांना मोहवणारे साहित्यते कोणत्याही माध्यमातून येवोएका माध्यमातून दुस-या माध्यमात साहित्याचे माध्यमांतर होतच राहणारआणि ते परस्परपुरकच असणार हे यातून सिद्ध होते.

ऑडीओ (श्राव्यपुस्तके ही संकल्पना महाराष्ट्राला नवीन नाहीपूर्वी कॅसेट-सी.डीस्वरुपात प्रख्यात लेखकांची आधीच प्रसिद्ध झालेली पुस्तके या रूपातही सादर केली जातपण अवाढव्य किंमती आणि सर्वत्र सहजपणे ऐकता येऊ शकण्यातील तांत्रिक अडचणी यामुळे त्यांच्या प्रसाराला खूपच मर्यादा राहिलीइतकी की श्राव्य पुस्तके मराठीत ऐकली जाणे आणि त्यापासून प्रकाशकाला फायदा होणे अशक्यप्राय बाब आहे असे प्रकाशक स्वत:च म्हणू लागलेलेखकांनीही कधी या माध्यमात फारसा रस घेतला नाही.

पण तंत्रज्ञान झपाट्याने बदलत गेलेआधी फक्त दूरध्वनीला पर्याय म्हणून आलेले मोबाईल फोनचे तंत्रज्ञान प्रचंड झपाट्याने पसरलेया तंत्रज्ञानाचा उपयोग अनेक तर्हेने करता येऊ शकतो हे कल्पक नव-उद्योजकांच्या आणि तंत्रज्ञांच्या लक्षात आलेआणि मोबाईल सेट हळूहळू तळहातावरील इंटरनेट सुविधांनी युक्त संगणक बनलाफोन करणेसंदेश देणे-घेणे यापार जात तो व्यवसायाचे आणि मनोरंजनाचेही साधन बनलाविविध सुविधा देणारी हजारो एप्लीकेशंस रोज दाखल होऊ लागलीखरे तर याला आपण मोबाईल क्रांती म्हणू शकतोया क्रांतिने मानवी जीवन अजूनच सोपे बनवण्यात हातभार लावला.

मग या क्रांतीपासून साहित्यही दूर राहू शकत नव्हतेचित्रपटमालिका किंवा ओटीटीसाठीच बनवल्या गेलेल्या बहुभाषिक मालिका यापेक्षा मोबाईल हा साहित्याचा प्रमुख आधार बनू शकतो हे लक्षात घेऊन ऑडीओ बुक्स हे संकल्पना अत्यंत नव्या स्वरूपात मांडली गेलीस्वीडनमधील स्टोरीटेल या स्टार्टअपने ते साहस अत्यंत कल्पकपणे केले आणि ऑडीओ बुक्स ही संकल्पना नव्या स्वरूपात झपाट्याने किमान अर्धे जग पादाक्रांत करून बसलीभारतात ही संकल्पना घेऊन स्टोरीटेल तर्फे आले ते साहसीमराठी साहित्यप्रेमी योगेश दशरथभारतातील स्टोरीटेलची सुरुवातच झाली ती मुळात मराठी साहित्यातूनमग हिंदीबंगाली आणि दाक्षिणात्य भागांतही चांगलाच जम बसवला.

यामागे स्टोरीटेलची संकल्पना ज्या व्यापक व्यावसायिक पायावर उभी आहे तिचा विचार करायला हवास्टोरीटेल ऑडीओबुक्स स्वतंत्रपणे एकेकटे विकत नाहीती सर्वस्वी सबस्क्रिप्शन (वर्गणीआधारित संरचना आहेम्हणजे मासिक विशिष्ट वर्गणी भरून तुम्ही स्टोरीटेल एप्लिकेशनवरून लाखांपेक्षा अधिक पुस्तकांतून हवे ते हवी तेवढी पुस्तके ऐकत राहू शकताभाषानिहायही स्वतंत्र सबस्क्रिप्शन उपलब्ध असल्याने ती तर अत्यंत स्वस्तात वाचक आपल्या भाषेतील साहित्याचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतोउदाहणार्थ ज्यांना फक्त मराठी ऐकायचे आहे ते महिन्याला फक्त ९९ रुपये वर्गणीत शिवाजी सावंतांपासून भालचंद्र नेमाडेंपर्यंत अभिजात तर सुहास शिरवळकरांपासून ते हृषीकेश गुप्तेन्पर्यंत लेखकांचे लोकप्रिय साहित्य ऐकू शकतात.

बरेपुर्वप्रसिद्ध पुस्तकांच्या खजिन्याबरोबरच स्वतस्टोरीटेलने खास ऑडीओ माध्यमासाठी लिहून घेतलेल्या ओरिजिनल कथाकादंब-या या एप्लीकेशनवर एका पाठोपाठ एक प्रसिद्ध होताच राहतातहे स्टोरीटेलच्या स्वतंत्र निर्मिती असल्याने श्रोत्यांचे एक आकर्षण असते. आणि हीच गाजलेली ऑडीओ पुस्तके स्टोरीटेल छापील माध्यमातुनही प्रसिद्ध करते. उदा. स्टोरीटेलने माझीच “धोका” ही समीर चक्रवर्ती नायक असलेली थरार कादंबरी आणि “फराओचा संदेश” ही सिंधू संस्कृती काळातील एक आगळीवेगळी साहसकथा ऑडीओ माध्यमात गाजल्यानंतर पुस्तकरूपातही प्रसिद्ध करण्यात आली. आणि ही छापील पुस्तकेही तेवढ्याच उत्साहाने विकली जात आहेत. म्हणजेच ऑडीओ आणि मुद्रण माध्यमे किती परस्परपूरक आहेत हे लक्षात यावे. आणि साहित्यासाठी ही अत्यंत महत्वाची घटना आहे.

पूवी ऑडीओ पुस्तकांना यश न मिळण्याची अनेक कारणे होती. एकतर ना प्रोफेशनल पद्धतीने रेकॉर्डींग केले जात असे ना व्यावसायिक अथवा प्रसिद्ध आवाज अभिवाचनासाठी वापरले जात असततांत्रिक कमजोरी हा त्यात मोठा दोष असेसहज वापरता एल असे मोबाईल तंत्रज्ञानही तेंव्हा विकसित नव्हते. नव्या तंत्रज्ञानाने पूर्वीचे सारे अडसर दूर केले.

स्टोरीटेलचे अभिवाचक पाहिले तर थक्क व्हायला होतेबराक ओबामाटॉम हँक्स यासारख्या विश्वविख्यात व्यक्तींपासून ते जगभरचे उत्कृष्ठ व्यावसायिक अभिवाचक यात सहभागी आहेतमराठीचे म्हणाल तर सुधीर गाडगीळउदय सबनीस ते उर्मिला निंबाळकर असे दिग्गज अभिवाचक आहेतयाशिवाय वेगवेगळे अभिनव आणि रंजक ऑडीओ प्रयोग मराठीतही स्टोरीटेल करत असतेअगदी पावनखिंड ३०३ हे ध्वनीनाट्यही निर्माण केलेमी या भारतातील पहिल्या वहिल्या अभिनव प्रयोगाचा लेखक दिग्दर्शक आहे याचा मला अभिमान आहेश्रोत्यांनीही त्याला उदंड प्रतिसाद दिला आहेत्यात नाट्य-सिनेमा क्षेत्रातील दिग्गजही आहेत हे विशेष.

हे यश कायाचे मुख्य कारण भारतियच नव्हे तर जागतिक रसिकांच्या  श्रवणभक्तीत आहेगतिमान आधुनिक युगात अनेकांची साहित्याशी नाळ तुटली होतीपण आपल्या मोबाईलवरच सुलभतेने हवे तेंव्हा ते दिग्गजांच्या भावरम्य आवाजात ते ऐकता येते हे समजल्यावर त्याकडे साहित्यप्रेमींनी वळणे स्वाभाविक होतेआणि तसे झालेही आणि ही नवी साहित्य श्राव्य लाट घरोघरी पोहोचेल असा अंदाज आहे.

स्टोरीटेलने एका अर्थाने भारतात ही माध्यमक्रांती घडवली आहेसाहित्य पार कानाशी आणून भिडवले आहेही साहित्याशीची अनोखी जवळीक आहेयेथे अभिजातता आहेवैचारीकता आहे आणि रहस्य-थरार आणि विनोदात्मक मनोरंजनही आहेही कोणाशी स्पर्धा नाही तर परस्पर साहचर्याची रुजुवात आहे.

-संजय सोनवणी

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...