Saturday, August 30, 2014

इतिहास-मागास

इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबुन असते. असे असले तरी सामान्य माणसांवर वदंतांचा प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा अधिक प्रभाव असतो असे आपल्याला सामान्यतया दिसून येईल.

इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणा-यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे कि इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पुर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो.

अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषन इतिहासकारपरत्वे बदलते असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्य संशोधनामुळे सामाजिक पुर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातुन जी वादळे निर्माण होतात तशी पुर्वग्रहविरहित, संपुर्ण द्न्यान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खिळ बसते.

अलीकडेच दिल्ली विद्यापीठातुन अभ्यासक्रमात असलेल्या "थ्री हंड्रेड रामायनाज" या रामकथा ही विविध ३०० वेगवेगळ्या प्रादेशिक संस्करणात कशी बदलली आहे याचा शोध घेणा-या ए. के. रामानुजन यांच्या प्रबंधाला काही परंपरावादी, पुर्वग्रहांनी मंडित विद्यार्थी संघटनांनी तोडफोड आंदोलने करुन अभ्यासक्रमातुन मागे घ्यायला भाग पडले. खरे तर इतिहास संशोधनकार्यात कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती वा तीसंबंधाचे लेखन चिकित्सेला मुक्त वाव देणारे असले पाहिजे, तरच इतिहासाचे आकलन सम्म्रुद्ध होण्यास मदत होवू शकते. परंतु भारतीय जनमानसाला अशी चिकित्सा सहसा मान्य नसते.

खरे तर इतिहासाच्या गाभा-यात श्रद्धेला वा पुर्वग्रहांना मुळी प्रवेशच नसतो. निखळ सत्त्याचा शोध हेच इतिहासकाराचे कार्य असते, मग जे सामोरे येईल ते किती का कटु असेना, त्याची निर्भीड मांडनी केलीच पाहिजे. परंतु जातीय झुंडशाह्या मुलतत्ववादी बनत अशा मांडण्यांना अनेकदा सुरुंग लावतात. परंतु हाच छुपा का होईना, मुलतत्ववादी दुर्गुण बव्हंशी इतिहासकारांत घुसला असल्याने त्यांच्या संशोधनाला व त्याहीपेक्षा त्यांच्या मांडनीला जातीय पुर्वग्रहांची पुटे चढलेली आपल्याला दिसतात, मग ते कोणत्याही जाती/धर्माचे का असेनात.

वाचकांचाही द्रुष्टीकोन सहसा असाच जातीय परिप्रेक्षातीलच असल्याने व श्रद्धा वा समजुतींना नवीन पुराव्यांच्या परिप्रेक्षात चिकित्सकपणे व उदारपणे पाहण्याची मनोव्रुत्तीच नसल्याने इतिहासावरुन आपल्याकडे वारंवार वादंगे होत असतात.

डा. बाबासाहेबांच्या रिडल्समुळे असेच झंझावात महाराष्ट्रात उठले होते. राम आणि क्रुष्ण हे साक्षात इश्वरी अवतार असल्याने त्यांची चिकित्साच केली जावु शकत नाही असा पवित्रा सनातन्यांनी जसा घेतला तसाच श्रद्धाळु समाजानेही घेतला हे वाचकांच्या स्मरणात असेलच. खरे तर विद्वेषरहित चिकित्सेमुळे मानवी द्रुष्टीकोनाला नवीन आयाम मिळतात व आपलीच प्रगल्भता वाढत असते हे आपला समाज लक्षातच घेत नाही हे एक दुर्दैवच आहे.

आपला देश मागास आहे कारण आम्ही अजुनही इतिहास-मागास आहोत. आम्ही स्वजातींच्या-स्वप्रांताच्या पलिकडे जाऊन इतिहासाचा विचार करु शकत नाही. त्यामुळे खरे तर आम्हाला इतिहासच नाही. जी आहेत ती नुसती स्वभ्रम जोपासणारी मिथ्थके आहेत. त्यामुळे आम्ही आमच्याच इतिहासाबाबत नेहमीच संभ्रमात असतो.

आणि तरीही विगत गौरवाने आम्ही केवढे भारावलेले असतो...

मग तो कितीही खोटा आणि पोकळ का असेना!

Tuesday, August 26, 2014

खरे मराठी साहित्य...




"खरे मराठी साहित्य अजून यायचेच असून आजवरचे मराठी साहित्य म्हणजे "जेमतेम साहित्य" आहे. साहित्य म्हणजे समाजमनाचा, त्याच्या वर्तमानाचा, भुतकालीन सावटाचा आणि त्यातून निर्माण होणा-या आशा-आकांक्षांचा आरसा असेल तर अपवादात्मग भाग सोडला तर मराठीत सार्वकालिक म्हणता येईल असे साहित्य नाही.

"मराठी साहित्यिक हा अनुभवांच्या स्वनिर्मित मर्यादांच्या चौकटीत अडकवून घेत, ना स्वत:साठी ना वाचकांसाठी लिहित जात प्रसिद्धी आणि पारितोषिके याच त्याच्या जर साहित्यप्रेरणा असतील तर मराठीचे साहित्य हे खपत नाही, वाचले जात नाही या तक्रारी निरर्थक होऊन जातात.

"महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून ते आजतागायत धार्मिक, वैचारिक, सामाजीक चळवळींनी गजबजलेला आहे. त्याचे प्रतिबिंब/विश्लेषन अथवा त्या त्या चळवळी व त्या त्या काळचे सामाजिक मानसशास्त्र कोणत्याही कादंबरीत येत नाही. जे चित्रण आहे ते वरकरणी व वाचकशरण असेच आहे. परंपरावाद्यांनी पुराणकथांतील व इतिहासातील पात्रांचे पुनरुज्जीवनवादी भांडवल केले तर विद्रोहवाद्यांनी त्या पात्रांचे निखळ द्वेषपूर्ण चित्रण केले. यात पात्रे व समाज कोठे होता? अशाने ज्याला आपण "निखळ साहित्य" म्हणू ते कोठे राहते?

"आणि यातून समाजजीवनाला सुदृढ विचारी बनवायची परंपरा निर्माण होते काय? याचे उत्तर आहे आम्ही साहित्यातून भरीव असे काहीही देवू शकलो नाही. त्यामुळे अलीकडच्या सर्वच सामाजिक चळवळीही साहित्यबंधापासून पुरत्या अलिप्त आहेत. त्यांना तत्वज्ञान देतील असे बळ साहित्यिकांत नाही. ते नाही तर नाही, त्यांचे यथास्थित चित्रणही साहित्यात होत नाही.

"जातीअंत हे आदर्श मानले तर चळवळीच जातींत विखुरल्या आहेत. छोटे-मोठे नेते जातींतच आपले अस्तित्व शोधत आहेत. साहित्यिकही त्याला अपवाद नाहीत. आपल्याच जातीच्या चौकडीत साहित्यिक म्हनून मिरवण्यात जर साहित्यिक धन्यता मानत असतील व इतरांकडे उपहासाने पाहत असतील तर साहित्य आणि साहित्यिकाला अर्थ काय राहिला? "दलित" हा शब्द बाबासाहेबांच्या "Broken Man" सिद्धांताशी जवळ जात दलित या संज्ञेत सर्व पुर्वास्पृष्य, आदिवासी, भटके-विमूक्त व श्रमिक-मजूरही आहेत अशी ती व्यापक संज्ञा होती. परंतू ती बरोबर एकाच जातीच्या मर्यादेत साहित्य व तत्वज्ञान म्हणूनही विसावली आहे. त्यामुळे दलित चळवळही भरकटली आहे. नव्या काळाला सुसंगत असे तत्वज्ञान व तसे साहित्य निर्माण करण्यात घोर अपयश आले आहे.



"सध्या दिखावू चळवळ्यांपेक्षा समाजाच्या मनातच जी सूप्त चळवळ सतत चालू असते ती लिहिली जात नाही, रस्त्यावर सहसा येत नाही, पण तीच खरे बदल घडवते. त्या चळवळीला अजून वैचारिक अधिष्ठाण साहित्यिकांना देता येत नाही हे त्यांचे दुर्दैव!"

"जागतिकीकरणामुळे नातेसंबंधांची फेरआखणी होत आहे. नवे तानतणाव निर्माण होत आहेत. निराधार व वृद्धांसाठी आश्रम वाढत आहेत. पती-पत्नी, भाऊ-बहीण, पिता-माता-पूत्र या नात्यांचे संदर्भ बदलत चालले आहेत. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संदर्भही झपाट्याने बदलत आहेत. पण आमचा लेखक कोठेतरी हरवला आहे. आम्हाला लेखकाचाच शोध आहे."


( भांडुप (पूर्व) येथे (24/8/14) झालेल्या साहित्य संगीतीतील "आजचे समाज वास्तव-साहित्य आणि चळवळ" या परिसंवादात बोलतांना मी. सोबत माझे मित्र, सा. विवेकचे संपादक रवींद्र गोळे..या संगीतीचे आयोजक. नेटके आयोजन, प्रगल्भ श्रोते यामुळे सहभाग घेतल्याचे खरेच समाधान मिळाले.)

Sunday, August 17, 2014

डॉ. भटकरांचं परम प्लँचेट



feature size
डॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्यांना बहाल केलं गेलं आहे. देशी-विदेशी विद्यापीठांत त्यांनी अनेक प्रबंधांचं वाचन केलं असल्याने त्यांना ‘विश्वप्रसिद्ध’ असं लेबल चिकटवता येणंही सहज शक्य आहे. त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ने सन्मानित केलं असून त्यांना इतरही अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. असे विजय भटकर वैज्ञानिक असल्याने त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून वैश्विक घडामोडींकडे पहावं आणि आपल्या अंधविश्वासू भारतीय समाजाचं डॉ. जयंत नारळीकरांप्रमाणे प्रबोधन करावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवली तर त्यात काहीही अस्वाभाविक नाही. मात्र आपण धर्म आणि विज्ञान याची सांगड घालण्याचा विवेकानंदांचा संदेश अंमलात आणत आहोत असं सांगत ते धर्माकडेच अधिक झुकलेले दिसतात. बरं तेही समजा ठीक आहे, पण त्यांनीच अंधश्रद्धेकडे झुकावं आणि तिचं जाहीर समर्थन करावं ही बाब मात्र स्तिमित करणारी आहे. भारताला लज्जास्पद आहे.

भारतातील तीर्थस्थानं ही भावी पिढ्यांसाठी दैवी ज्ञानाची केंद्रं बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असं ते एका लेखात लिहितात. ‘दैवी ज्ञान’ हे कोणत्या विज्ञानाच्या नियमात बसतं हे या नवीन हभपंना कोणी विचारलं नसावं. याहीपेक्षा ते पुढे जातात आणि प्लँचेट या अवैज्ञानिक, अंधश्रद्धाळू लोकांनी, विशेषतः युरोपात, जोपासलेल्या गेलेल्या खुळचट खेळाचं समर्थन करतात. तेही डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारख्या अंधश्रद्धांचं निर्मुलन करण्यासाठी आयुष्य घालवत प्राणार्पणही करणार्या माणसाच्या खुनाच्या तपासाच्या संदर्भात… हे मात्र नुसतं धक्कादायक नाही, तर निंदनीयदेखील आहे.

येत्या २० ऑगस्ट रोजी दाभोलकरांची हत्या होऊन एक वर्ष पूर्ण होईल. या प्रदीर्घ काळात खुनी तर सोडाच, पण खुन्यांचे साधे धागेदोरेही पुणे पोलिसांना मिळालेले नाहीत. यामुळे पुणे पोलिसांवर सातत्याने टीका होत आहे. या नैराश्यातून पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना काय मार्ग दिसावा तर प्लँचेटचा? एका पत्रकाराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि सर्वत्र खळबळ माजली. गुलाबराव पोळ यांनी आधी हा प्रकार केला असल्याचं फेटाळून लावलं असलं तरी त्यांनीच या स्टिंगध्ये या प्रकाराची कबुली दिली असल्याने ते अजूनच टीकेचे धनी झाले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने पोळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यात दस्तुरखुद्द नामवंत शास्त्रज्ञ म्हणवणार्या भटकरांनी प्लँचेटच्या वापरात काहीही गैर नसून विदेशांतही पोलीस प्लँचेटचा वापर गुन्हेगार शोधण्यासाठी करतात असं सांगून विवेकवादाची पुरती हेटाळणी केली. यामुळे मराठी माणसाच्या विस्मृतीत जाऊ पाहत असलेला प्लँचेट हा प्रकारही चर्चेत आला.

काय आहे प्लँचेट?

प्लँचेट, बोलके बोर्ड, औजा आणि डायल प्लेटस हा भुताळ प्रकार सरासरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर पुढे आणण्यात आला. यामागे खुद्द चर्चचा हात असावा असं अनेक विद्वानांचं मत आहे. विविध शास्त्रीय शोधांनी परंपरागत धर्मश्रद्धा कमी होत आहेत, यामुळे लोकांना पुन्हा गुढवादी विचारांकडे खेचणं चर्चला भाग पडलं असणं स्वाभाविक आहे. धर्म आणि विज्ञान या संघर्षात धर्मसत्ता कायम रहावी यासाठी लोकांना मृत्योत्तर जीवनावर श्रद्धा स्थापित करायला लावणं हाही हेतू यामागे होता. म्यगी आणि केट फोक्स या भगिनींनी १८४८ मध्ये आपण मृतात्म्यांशी संवाद साधू शकतो असा दावा केला. तत्कालीन माध्यमांनी या प्रकाराला प्रचंड प्रसिद्धी दिली आणि काही वर्षांत अमेरिकेत लोकांचा प्लँचेट करणं हा फावल्या वेळाचा छंद बनला. मृतात्म्यांशी खरोखर संवाद साधला असे दावेही हिरिरीने होऊ लागले. शेकडो लोक आपण मृतात्म्यांचं माध्यम असण्याचेही दावे करू लागले. एकट्या फिलाडेल्फियामध्ये ४०-५० प्लँचेट मंडळं निघाली. तबकडीसारख्या आकाराच्या वस्तुचा उपयोग यात केला जात असल्याने या प्रकाराला प्लँचेट असं नाव पडलं.

प्रेतात्मे विशिष्ट माध्यमांमार्फत आपल्याशी संवाद साधतात, आपल्या प्रश्नांना उत्तरं देतात हे पाहून प्लँचेटमध्येही अनेक सुधारणा (?) होत राहिल्या. प्रथम टिचक्या वाजवून हो किंवा नाही अशी उत्तरं देणारे साधे प्लँचेट अक्षरमालेवरून हलक्या वस्तू-नाणी-वाट्या इ. फिरवून उत्तरं देऊ लागली. आपोआप उत्तरं लिहून देणारे प्लँचेट मात्र अलन कार्डेक या फ्रेंच माणसाने १८५३ मध्ये शोधलं. अशा रितीने पुढेही प्लँचेटचे अनेक प्रकार शोधले गेले. युरोप-अमेरिकेत या प्रकाराने अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली. या विषयावर शेकडो पुस्तकंही लिहिली गेली. प्लँचेटची साधनं विकणारे गब्बर होऊ लागले एवढा हा ‘प्लँचेट रोग’ साथीसारखा पसरला होता. ‘औजा बोर्ड’चं (हो किंवा नाही असं सांगणारा) १८९१ मध्ये अमेरिकेत चक्क पेटंट घेतलं गेलं होतं.
या प्रकाराकडून अमेरिकन लोकांचं लक्ष वळालं आणि ते जीवनाबाबत अधिक गंभीर झाले ते अमेरिकन यादवी युद्धाच्या घटनेमुळे… अमेरिकन समाजशास्त्रज्ञ म्हणतात, ‘‘यादवीमुळे अमेरिकन लोक आत्मिक थोतांडाकडून दूर होत वास्तव जगाबाबत अधिक डोळस झाले…’’

थोडक्यात अमेरिकेतून प्लँचेट हा प्रकार जेवढ्या झपाट्याने पसरला तेवढ्याच झपाट्याने दूरही झाला. हा प्रकार संपला असं मात्र म्हणता येणार नाही. कारण युरो-अमेरिकन जगातही अंधश्रद्धा आहेतच. आजही प्लँचेटची उपकरणं बनवणारे आणि त्यांचा वापर करणारे समूह आहेतच. ही उपकरणं शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवली असल्याने ती वापरणार्यांना खरंच मृतात्म्यांशी संवाद साधल्याचा आनंद होतो.
म्हणजेच मृतात्म्यांशी संवाद साधण्याचं लोकांच्या मानगुटीला बसलेलं भूत अजून पुरतं उतरलेलं नाही!

पण पोलीस अंध नव्हते!

या पार्श्वभूमीवर पाश्चात्य पोलिसही गुन्हेगार शोधण्यासाठी प्लँचेटचा वापर करतात, असं डॉ. भटकर कोणत्या आधारावर म्हणाले हे समजत नाही. याचं कारण असं की, पोलिसांनी कुठेही प्लँचेटची मदत घेतल्याचं एकही उदाहरण मिळत नाही. पाश्चात्य जगात प्लँचेटकडे आधिभौतिकवादी सोडलं तर कोणीही गांभीर्याने पाहत नाही. प्लँचेटच्या वस्तू उत्पादकांच्या दृष्टीने ही एक बाजारपेठ आहे. चित्रपट, गूढ कादंबर्या यात मात्र प्लँचेटला स्थान मिळतं ते त्यातील गूढ वाढवण्यासाठी. पाश्चात्य पोलीस गुन्हेगार पकडण्यासाठी अक्कलेचा उपयोग करतात, गुलाबराव पोळ यांच्याप्रमाणे ते अक्कलशून्यतेचा प्रयोग करत नाहीत!

आणि त्याचं समर्थन करू धजावणारे स्वतःला वैज्ञानिक समजणारे मूर्ख तर तिकडे मुळातच नाहीत…
एक बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे ती ही की, प्लँचेटचा जन्मच मुळात लोकांना धार्मिक श्रद्धांकडे खेचण्याचा होता. मृतात्मे असतात आणि ते माणसांशी संवाद साधतात हे दाखवलं की लोक धर्मग्रंथात बाकी जे काही सांगितलंय त्यावरही विश्वास ठेवणार हे ओघाने आलंच. त्यात विज्ञानाचा बळी देणं त्यांना भागच होतं आणि त्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले हेही खरं आहे.

भटकरांनी किमान हा इतिहास पहायला हवा होता. पण ते स्वतः वैदिक तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणारे असल्याने त्यांनाही विज्ञानापेक्षा धर्मच महत्त्वाचा वाटत असला तर त्यात काहीच नवल नाही. तथाकथित शास्त्रज्ञ, विचारवंतांना आपल्या गोटात खेचत त्यांच्याच तोंडून असल्या बाबींचा गवगवा करून घेतला तर धर्मवाद्यांचं फावतं. तिथे मग प्लँचेट ही ख्रिस्ती धर्मियांची आयडिया आहे याच्याशीही त्यांना देणंघेणं नसतं.
पण यामुळे सामान्य लोक गोंधळतात याचं काय करायचं? त्यांनाही हे प्रकार खरे वाटू लागले आणि महाराष्ट्रातही पुन्हा प्लँचेटचे ‘खेळ’ रंगू लागले तर काय करायचं? विवेकवादाची हत्या होत असेल तर काय करायचं?

डॉ. दाभोलकर आजन्म अंधश्रद्धांविरुद्ध लढत होते. आत्मा, मोक्ष, कयामत का दिन, प्रेतात्मे या सर्व खुळचट अंधश्रद्धा आहेत हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ उच्चरवाने सांगत असताना एक भारतीय महासंगणकतज्ज्ञ मात्र अशा प्रकारांचं समर्थन करतो हे निंदनीय आणि अत्यंत आक्षेपार्ह आहे.

- संजय सोनवणी

(Saptahik Kalamnama)

सुखद स्वप्नांच्या ...

सुखद स्वप्नांच्या
दुलईला पांघरून
वर्तमानाचे चांदणे टिपत
माझ्यात तुझी क्षितीजे पाहत
वेडावणा-या प्रिये...
ऐकू येतात का तुला
तुझ्या क्षितीजापारचे
विव्हळ...वेदनांनी ओथंबलेले
आक्रोश?

तू तुझ्या विभ्रमांत निमग्न रहा
पण मला गेलेच पाहिजे
त्या आक्रोशांना
शब्द देण्यासाठी
शब्दांचा ज्वालामुखी होण्यासाठी
त्या आक्रंदनांना
एक स्मित अर्पण करण्यासाठी...

पण मला गेलेच पाहिजे!

Tuesday, August 12, 2014

आम्ही माणूस आहोत...

आभाळ तुटून कोसळतय म्हणताय?
हरकत नाही
तुटू देत
आम्ही आमच्या अंगणात, शेतांत,
माळरानांत
त्या कोसळत्या
आभाळाचे कोसळलेले तुकडे वेचू
तेच आम्ही आमच्या अंगणांत
शेतांत
माळरानांत
पेरू...

त्यातून अनंत आभाळे
पुन्हा उगवू...
आमची कोसळलेली घरे
पुन्हा उभारू...

आम्ही माणूस आहोत...
विनाशातुनही सृजन करणारे!

Saturday, August 2, 2014

माणसाचा अहंकार.....

माणसाचा अहंकार एवढा तीव्र आहे की जणू हे सारे विश्व आपल्यासाठीच बनले आहे असा त्याचा दृढ समज आहे. त्याच्या अहंकाराची झेप एवढी मोठी कि त्याच्या देवदेवताही मानवासारख्याच तो चितारतो, त्याच्यासारख्याच भावभावना देवतांत आहे असे तो मानतो. पुरातन मिथके पाहिली तर त्यात माणसाचे हे अहंकार प्रदर्शन अधिकच तीव्र असलेले दिसेल.

माणूस आजही बदललेला नाही. ज्या वेगाने त्याने निसर्गाचा "उद्धार" सुरू केला आहे त्या वेगाने कही दशकांतच तो नैसर्गिक, जैविक संपदा संपुर्ण संपवुनच टाकेल. असंख्य जीव त्याने भुतलावरून नाहीसे केले आहेत तर अगणित नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाशी जुळवून नव्हे तर त्याच्याशी अजरामर स्वार्थापोटी वैर घेऊनच तो वागतो आहे.

हेच वैर मग जेंव्हा निसर्ग प्रकोपातून व्यक्त करतो तेंव्हाची माणसाची उथळ हवालदिलता शरम आणते. निसर्गाशी संघर्ष एक दिवस माणसालाच या भुतलावरून नष्ट करेल याचे भान स्वत:ला बुद्धीमान व परमेश्वराचे लाडके अपत्य समजणा-या माणसाने कधीच बाळगलेले नाही.

आणि मनुष्य येथील निसर्गाचा भाग आहे ही कल्पनाच चुकीची असावी...खरेच तो डोनिकेन म्हणतो त्याप्रमाणे परग्रहावरून येथे आला असावा म्हणूनच त्याला स्वार्थापलीकडे येथील निसर्ग-जीवसृष्टीबाबत आत्मीयता वाटत नसावी हेच कधीकधी खरे वाटू लागते!

माणसाने अन्य सृष्टीला नष्ट करण्याचा नादात स्वत:लाही नष्ट करण्याचा चंग बांधला आहे हे मात्र निश्चित!

Friday, August 1, 2014

जग बदल ....

 
 
"जग बदल घालूनी घाव" अण्णा भाऊ म्हणाले होते. जगात कोणी शोषित, वंचीत आणि पिडीत राहणार नाही यासाठी त्यांचे तगमग होती. आम्ही उलटी सुरुवात केली. आम्ही घाव घातले पण याच शोषित-वंचितांच्या स्वप्नांवर. आशा आकांक्षांवर. आम्ही जग बदलले...पण कसे? जगाला निर्दय, सवेंदनहीण आणि उथळ बनवले. दीड दिवसांची शाळा न शिकता जीवनाच्या शाळेत अण्णा भाउंनी ज्ञानार्थीच रहात साहित्यात उंच झेपा घेतल्या. जगभरच्या २७ भाषांत त्यांच्या साहित्याचे अनुवाद झाले. त्यांनी भारतीयच नव्हे तर जगभरच्या वंचित-शोषितांच्या स्वातंत्र्याची कामना केली.

टिळकही खरे हाडाचे ज्ञानार्थी. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी संग्राम केला, पण त्यांची ज्ञानतृष्णा त्याहीपेक्षा मोठी होती. त्या काळी संदर्भग्रंथ मिळवणे हे अत्यंत वेळखाऊ व किचकट काम असतांनाही "गीतारहस्य" सारख्या नीतिशास्त्रातील एक जागतिक दर्जाचा ग्रंथ लिहिला. ते गणिताचे व संस्कृतचे पंडितही होते. अण्णा भाऊ आणि टिळक हे समाजाच्या दोन टोकातून आलेले, वेगळ्या संस्कारांत वाढलेले...दृष्टीकोणही त्यामुळे वेगळे. पण म्हणून टिळकांबाबतचा आदर व्यक्त करतांना अण्णा भाऊ कोठे संकोच करत नाहीत. याला मानवतेची विश्वव्यापकता म्हणतात.

आज आमच्या पिढ्या संगणकयुगात आल्यात. इंटरनेट हातातल्या मोबाईलवर आलेय. म्हणजे जागतीक ज्ञान हातात आलेय. पण ते तेथेच आहे. त्या आधुनिक साधनांचा वापर आमच्या पिढ्या ज्ञानासाठी करत नाहीत तर उथळ सवंगपणासाठी करतात. जशी संगत तसा माणूस बनतो हे सत्य लक्षात घेतले तर या सवंगपणात वाहून जाणारी पिढी भावी ज्ञानात काय भर घालणार? चकचकीत प्रतिष्ठांच्या मागे लागलेले, जीवन हरपून बसलेले कोणत्या प्रकारची जीवनशैली घडवणार?

थोडक्यात आम्ही उथळ आणि म्हणुणच नालायक पिढ्या घडवायचा चंग बांधला आहे. जग आम्ही बदललेय पण ते सवंगपणात बदलवले आहे. त्याला ठोस आधार नाही. मग हा देश कसा महासत्ता होणार?

असेच जर असेल तर मग विगतातील महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साज-या करण्याचा आम्हाला कोणी अधिकार दिला, जर आम्हाला त्यांच्यापासून काही चांगले घ्यायचेच नसेल तर?"

(काल ५१२ खडकी येथे लो. टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या संयुक्त कार्यक्रमात बोलतांना मी. )

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि व्यापारी मार्ग!

  संत तुकाराम सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले अशी मान्यता आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात जी व्यापक जीवनदृष्टी दिसते तिचे नेमके मर्...