Saturday, October 25, 2014

प्रिये...!

नेहमी विचारतेस
मी काय लपवून ठेवलंय
माझ्या हृदयाच्या
गच्च अंधारल्या
गुंफेत....

काय करायचंय तुला?

एवढा स्वच्छ प्रकाश
मी ओसंडलाय तुझ्याच साठी...
नाच त्यात...बागड...हस
खळाळत्या निर्झरांसारखी...
उगा व्यर्थ प्रश्न विचारु नकोस....
अनंत वेदनामय
आक्रोशांतून
उमदळेल्या
माझ्या हृदयगुंफेतील
साकळलेल्या
एकाकी
आसवाच्या थेंबाला
रडवू नकोस...

प्रिये...!

Friday, October 24, 2014

महात्मा बळीचा खून ?

ब्राह्मण वामनाने बळीराजाचा खून केला असा बहुजनांचा सर्वसाधारण समज आहे. पहिली बाब म्हणजे मुळात वामनावताराची पुराणकथाच बनावट आहे, असत्य आहे. ऋग्वेदात अवतार घेण्याचे कार्य प्रजापतीकडे आहे, विष्णुकडे नव्हे. मुळात कुर्मावतार व वराहावतार हे प्रजापतीचे अवतार आहेत. (तै. आरण्यक आणि तैत्तिरीय ब्राह्मण) अवतार घेण्याचे कार्य पुढे पुरांणांनी वैष्णव पंथ वर आला तेंव्हा विष्णुकडे सोपवले. ऋग्वेदात विष्णु तीन पावलांत त्रिभुवन व्यापतो (ऋ. १.२२.१७) असे म्हटले आहे. तेथे विष्णु हा सुर्याचे रुपक म्हणून येतो. सकाळ-दुपार-सायंकाळ ही त्याची रुपकात्मक तीन पावले. याच कथेचा आधार घेऊन वामन आणि त्याला बळीराजाचे तीन पाऊल दान ही पुरणांत आलेली कथा बनवली गेली आहे. ही कथा ओरिजिनल नाही हे उघड आहे. बळी असूर होता त्यामुळे तो यज्ञ करत होता हे अधिक मुर्खपणाचे विवेचन आहे. असूर हे यज्ञविध्वंसक/यज्ञ विरोधक होते, यज्ञकर्ते नव्हेत. शुक्राचार्य हे असुरांचे गुरु होते व ते यज्ञाचे पुरोहित नसत असेही पुराणकथा सांगतात. विष्णुला मोठे ठरवण्यासाठी बळीचे माहात्म्य कमी न होईल अशा बेताने वैदिक इंद्र महत्ता वाढवण्यासाठी ही कथा रचली गेली आहे. अनेक बहुजनीय विद्वान त्यातून ब्राह्मण वामनाने बळीचा खून केला असा अर्थ काढतात...त्यात तथ्य नाही.

गंमत म्हणजे ऋग्वेदानंतर ज्या साहित्याचा नंबर लागतो त्या शतपथ ब्राह्मणात वामनावताराची येणारी कथा तर वेगळीच आहे, तिचा बळीशी काडीइतकाही संबंध नाही. शतपथ ब्राह्मण सांगते कि देवासूर युद्धात देवांचा पराभव झाला. सारे देव पळून गेले. मग समस्त असूर पृथ्वीची वाटणी करायला बसले असता वामनाला पुढे घालून देव पुन्हा असुरांकडे गेले आणि पृथ्वीचा किमान छोटा तरी हिस्सा आम्हास मिळावा अशी विनवणी केली. तेंव्हा असुरांनी वामनाच्या तीन पावलांएवढी भुमी देवांना द्यायची तयारी दर्शवली. मग वामनरुपधारी विष्णुने तीन पावलात त्रिभुवन व्यापले व असुरांना भुमीपासून वंचित केले. (शतपथ ब्राह्मण १.२.२.१-५). आता ही कथा पुराणांपेक्षाही जुनी आहे. काय संबंध आहे बळीराजाशी या कथेचा? या कथा बनावट आहेत अथवा देवासूर युद्धांची ती काल्पनिक मित्थके आहेत एवढेच काय ते खरे आहे. एकाच अवताराच्या अन्वयार्थ एकच असलेल्या दोन कथा कशा बनतील याचा तरी विचार करावा कि नाही?

पण, खरे म्हणजे आमच्या बहुजनीय विद्वानांना बहुजन हे नेहमीच ब्राह्मणांचे वा आक्रमक आर्यांचे गुलाम होते, मुर्ख होते म्हणुन कपटी ब्राह्मण त्यांच्यावर मात करु शकले असे अन्वयार्थ काढत आपल्या सुमार बुद्धीचे डंके पिटवत आपली पराभुत मनोवृत्ती प्रकट करत असतात. वैदिक लोक कथा रचून रंगवुन सांगत बुद्धीभेद करण्यातही फार वस्तादही नव्हते हे सरळ या बळीकथेचे व देवासूर युद्धकथेचे अन्वेषन केले तरी लक्षात येईल. नाहीतर त्यांनी बेमालूम पचेल अशी तरी कथा रचली असती. उलट वैदिक हे सुमार बुद्धीचे होते हेच त्यांना आपल्या महत्तेसाठी अवैदिक दैवते ते महापुरुष यांचे अपहरण करावे लागले, खोट्या कथा रचाव्या लागल्या यावरुनच सिद्ध होते.

अवतारांचेच पहाल तर महाभारतातील नारायणीय उपाख्यानात फक्त सहा अवतारांचा निर्देश आहे. पुढे ती दहा, नंतर बुद्ध आणि हंस अवतार धरुन बारा तर भागवत पुराणात हीच संख्या २४ एवढी आहे. पुढच्या पुराणांत मात्र दहा ही संख्या नक्क्की केली गेली. का, याचे उत्तर नाही. बरेचसे अवतार काल्पनिकही आहेत. इसपुचा पहिल्या शतकापर्यंत कृष्ण हा पांचरात्र (नारायणीय)या अवैदिक संप्रदायातील एक मुख्य व्यूह (दैवत नव्हे) होता. त्याचे अपहरण तिस-या चवथ्या शतकाच्या आसपास झाले. वासूदेव आणि कृष्ण एक नव्हेत, देवकीपुत्र कृष्ण हा महाभारतपुर्ब साहित्यात ज्ञानी यती मानला गेला आहे व त्याच्या आईचे नांव (देवकी) असले तरी त्याच्या पित्याचे नांव उल्लेखलेले नाही. रामाचे म्हणाल तर अवतार या स्वरुपात रामोपासनेचा प्रचार बाराव्या शतकानंतर झालेला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नारायण व विष्णू या देवताही वेगळ्या आहेत, एक नव्हेत. (महाभारतातील नारायणीय उपाख्यान पहा).

वैदिक ब्राह्मणांनी शुद्रांना (असुरांना) गुलाम केले असे म्हणणा-यांनी शिशुनाग वंशापासून ज्ञात इतिहासातच शेकडो-हजारो अवैदिक शूद्र राजे/सम्राट झाले आहेत हे लक्षात घ्यायला हवे. त्यांना वैदिक लोक राजे होण्यापासून थांबवू शकलेले नाहीत, स्मृत्या असूनही. उलट वैदिक राजे किती याचा विचार केला तर हाताच्या बोटावर जेमतेम मोजता येतील.

असे असुनही आमचेच बहुजनीय विचारवंत गेल्या साताठशे वर्षांतील राजकीय गुलामगिरीने एवढे काजळी फासून बसलेत कि त्यांना प्रत्येक बाबतीत, अन्वेषण न करताच, वैदिकांचे वर्चस्व आणि कपट दिसते. आज त्यांचे वर्चस्व असेल तर त्याला कारण आपलीच पराभूत आणि रोगट मनोवृत्ती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आम्हाला तटस्थपणे अवलोकनाची सवयच नाही. हीपण वैदिकांनी सवय लावली का?

बळीचा खून झाला नाही...अथवा वामन अवतारच झालेला नसल्याने बळीराजाला पाताळात गाडल्याचीही कथा खरी नाही. वामन खरेच अवतार पद दिलेली (राम-कृष्णाप्रमाणे) व्यक्ती असती तर त्याची अनेक मंदिरे असती, एखादे पुराणही त्याच्यावर लिहिले गेले असते. तसे वास्तव नाही.

हे लक्षात घेत बहुजनांनी या जाणीवपुर्वक जोपासलेल्या पराभुत मनोवृत्तीतून बाहेर यायला हवे व प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीचे खापर वैदिकांवर फोडणे बंद केले पाहिजे, नाहीतर ही गुलामी कालत्रयी संपणार नाही. मानसिक न्यूनगंड स्वत:हुन जोपासायचा आणि आम्हाला ब्राह्मण मानसिक गुलाम करतात हे म्हणायचे हे मुर्खपणाचे लक्षण आहे.

 या भाकडकथांवर विश्वास ठेवणे म्हणजे महात्मा सम्राट बळीला भोळसट ठरवण्यासारखे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.


(Note-इतिहासात दोन इडा आहेत. ऋग्वेदातील इडा म्हणजे अन्यधान्याची देवता आहे. ऐल वंश जीपासून स्थापन झाला त्या इलेला इडाही असेही म्हटले जाते. ती द्वैलिंगी आहे असेही म्हटले जाते. ती बुधाची पत्नी आहे. महिला "इडा-पिडा टळो" म्हणतात ते -हिदममद्धे बसवण्यासाठी कि वैदिक लोकांसाठी हे सांगणे अवघड आहे. बळीराजा महान असणारच यात शंकाच नाही कारण हजारो वर्ष त्याचे एवढ्या प्रेमाने स्मरण कोणी ठेवले नसते. बळीची हत्या झाली असती तर त्याच्या नांवाने "बलीप्रतिपदा" हा वर्षारंभाचा आनंदाचा दिवसही जनतेने ठवला नसता. त्याचे स्वरुप वेगळे झाले असते हे लक्षात घ्यायला हवे.)

Tuesday, October 21, 2014

कोणाच्या धर्मांधतेचा धोका?


 महाराष्ट्रात नुकत्याच पार पाडलेल्या निवडणूकींच्या निकालानंतर सर्वाधिक चर्चा व चिंता लोक व्यक्त करत आहेत ती म्हणजे एम.आय.एम. च्या उदयाची. एम.आय.एम.च्या ओवेसीने जी धर्मांध भडकावू भाषणे केली ती लोक अजून विसरलेले नाहीत. धर्मांध ओवेसी हा लोकशाहीला धोका आहे असे मत बहुतेक व्यक्त करत आहेत.

देशाला कोणाच्या धर्मांधतेचा अधिक धोका आहे? संघाचा कि एमायएमचा? ८८ वर्ष शिस्तबद्ध रीतिने प्रचार करत, प्रसंगी धोरणे बदलत, गांधीवादी समाजवाद स्विकारत...फळत नाही म्हणून टाकत...पटेल ते गांधी जप करत चिकाटी म्हणजे नेमके काय असते याचे सार्थ दर्शन घडवत आता संपुर्ण सत्तेत आलेत. राज्येही व्यापली जातील ही चिन्हे आहेत. सध्यातरी ते रामजप करत नाहीत. कधी कोणता जप करावा...सोडून द्यावा याचे त्यांना चांगले भान आहे. एमायएमनेही (मुस्लिमांनी) आपली व्युहनीति बदलत संघाने हिंदुंचे केले त्याप्रमाणेच कोंग्रेसवर अवलंबून न राहता मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण सुरु केले असेल तर ते साहजिक आहे. मुस्लिमांचा भाजपवर कितपत विश्वास आहे हे यातूनच पुर्ण नसले तरी ब-यापैकी सिद्ध होते. कोंग्रेस नेहमीच संघाबाबत गाफील राहिली हेही वास्तव आहे. त्यांनी लोकांना ते धर्मांधतेविरुद्ध आहेत हे गृहितच धरले. पण ते वास्तव नाही हे आत सिद्ध झाले आहे. कोंग्रेसचे त्यामुळे पानिपत होणे स्वाभाविक होते....तसे झालेही आहे. भाजपचा सत्तेच्या पटावरील एकहाती उदय देश पुढे कोणत्या दिशेने जावू शकतो हे सांस्कृतिक व शैक्षणिक मंत्रालये ज्यापद्धतीने वैदिकवादाचा उद्घोष करत आहेत त्यावरून दिसते आहे. याची परिणती नव्या सांस्कृतीक वर्चस्ववादात होणार हे समजावून घ्यायला हवे. मुस्लिम समुदायही त्यांच्या सांस्कृतिक वर्चस्वतावादाला पुढे रेटणार नाहीत असे कशावरुन? आणि एक जर धादांत खोटे प्रयत्न करत असेल तर दुसरा का करणार नाही? ओवेसीच्या एमायएमचा उदय निवडणूका पंचरंगी झाल्या म्हणून वगैरे हे म्हणणे खोटे समाधान करुन घेतल्यासारखे आहे. देशभर हे लोन पसरले तर नवल नाही, किंबहुना ते अभिप्रेतच आहे. धोका संघाचा म्हणून भाजपचा अधिक आहे. कोंग्रेसला कोणताच धोका समजत नाही ही त्यांच्या मुजोरपणाची आणि जनतेत न मिसळण्याची अपरिहार्य परिणती आहे. त्यामुळे जे काही होते आहे त्या पापात त्यांचाही बरोबरीचाच सहभाग आहे.

म्हणजे सध्या देशाचे पारडे धर्मांधतेकडे झुकले आहे असे दिसेल. एमायएमचा निर्माण झालेला धोका हे त्याचेच उपफलित आहे. गुजराथ दंग्यांची त्याला पार्श्वभुमी नसेल असे मानणे कदाचित आपला भाबडेपणा असेल. नवमध्यमवर्गाला-तरुणांना आपण कोणत्या धोकेदायक पर्वात प्रवेश केला आहे हे आज समजणार नाही. समजेल तेंव्हा कदाचित उशीर झाला असेल.

ओवेसीने भडक भाषण केले, ठाकरेही करत, त्यांची भाषा उग्र होती म्हणून त्यांनी प्रत्यक्षात काही केले काय? हा प्रश्न अनुचित आहे. विचार कधीतरी कृतीत येत नाहीत असे नाही...किंबहुना ती सुरुवात असते. आधी हिंसा मानसिक पातळीवर अवतरते आणि ती संधी मिळाल्यावर कधी ना कधी प्रत्यक्ष कृतीत बदलते हे विसरता कामा नये.संघ स्थापनेपासून मुस्लिमद्वेष जोपासत आला. गांधीहत्येत त्यांचा प्रत्यक्ष हात असो अथवा नसो पण ती त्यांच्याच विचारधारेची परिणती होती हे नाकारता येणार नाही. सामाजिक असुरक्षितता निर्माण करत जाती-धर्माच्या टोळ्या बनवणे सोपे जाते हे संघाला समजते तसेच ते मुस्लिमांना समजत नाही काय? आपण सारे टोळीवादाच्या बाजुला आहोत कि विरोधात याचा निर्णय आपल्यालाच घ्यावा लागेल. दोषारोप करत बसण्यापेक्षा सर्वच (संघ आणि एमायएम) धोके आम्ही दूर कसे ठेवू शकतो हे पहायला हवे.

Friday, October 17, 2014

यक्षरात्रीच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा!

Image result for deepavali yaksha celebration

दीपावली हा सण मुळचा कृषिवल/पशुपालक संस्कृतीचा "यक्षरात्री" उत्सव आहे. कुबेर हा शिवाचा खजीनदार मानला जातो. बुद्धपुर्व काळापासून भारतात देशभर "यक्ष" संस्कृतीचा मोठा प्रभाव होता हे आपल्याला सर्व धर्मीय म्हणजे जैन, बौद्ध, हिंदू लेणी-मंदिरांतील यक्ष प्रतिमांवरुन व यक्षाच्या नांवाने असलेली गांवे/जमीनी/तलाव यावरून लक्षात येते. दीपावलीचे मुळचे नांवही यक्षरात्रीच होते हे हेमचंद्राने तर नोंदवलेच आहे, वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे.

यक्ष या शब्दाचा अर्थ प्रकाशमान असाही आहे. महाभारतात यक्ष हे ज्वाला अथवा सुर्यासारखे तेजस्वी असतात असे म्हटले आहे. या श्रद्धेतुनच दिपोत्सव यक्षांसाठी सुरु झाला व त्यांनाच यक्षरात्री असे म्हटले जावू लागले असे जी. बी कानुगा म्हणतात. (Immortal love of Rama, तळटीप. पृष्ठ-२७-२८) धनसंपत्ती देणारे, रक्षक असलेल्या यक्षांना दिपोत्सव करुन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा उत्सव. 

असूर संस्कृती भारतात मुख्य असली तरी प्रत्येक संस्कृतीच्या प्रभावक्षेत्रात उपसंस्कृत्याही सहास्तित्वात असतात. यक्ष संस्कृतीचा उदय हा गंगेच्या घन अरण्याच्या क्षेत्रात झाल्याचे मानले जाते. गुढत्व, भय, अद्भुतता या मिश्र भावनांतून यक्षकल्पना अरण्यमय प्रदेशांत जन्माला आली असावी. आज यक्ष हा जल, अन्न-धान्य-पशु व संपत्तीचा संरक्षक मानला गेला आहे. अगदी पुरातन काळी यक्ष हे वृक्ष व अरण्याचे रक्षक मानले जात. पुढे कृषी संस्कृतीच्या उदयानंतर ते ग्रामरक्षक या स्वरुपातही विराजमान झाले.  यक्ष पुजा ही इतकी पुरातन आहे कि यक्ष म्हणजेच पुजा असे दक्षीणेत आजही मानले जाते. यक्षपुजा ही आजही शैवजन करत असतात...पण सांस्कृतिक लाटांत विस्मरणामुळे ते यक्ष आहेत हेच माहीत नसते. उदाहरणार्थ वीर मारुती, वीरभद्र, खंडोबा, भैरवनाथ इ. दैवता या यक्षश्रेणीतीलच आहेत. ते संरक्षक आहेत ही जनमानसाची श्रद्धा आहे...आणि म्हणुनच त्यांचे स्थान हे शक्यतो शिवेबाहेर असते...कारण ते ग्रामरक्षक असतात ही श्रद्धा. त्यांना शिवाचेच अवतार अथवा अंश मानले जाते.

उपनिषदांची रचना करणारे हे यक्ष संस्कृतीचेच प्रतिनिधी होते असे ठामपणे म्हणायला पुष्कळ वाव आहे. यक्ष हा शब्द अद्भूत, विश्वनिर्मितीचे गुढ कारण या अर्थाने उपनिषदांत वापरला जात होता. ब्रम्ह हाही एक यक्षच. (ऋग्वेदात ब्रम्ह ही देवता नसून त्याती ब्रम्हचा अर्थ मंत्र असा आहे.) पण मुळची उपनिषदे ही वैदिक नसून आगमिक असूर/यक्ष संस्कृतीच्या लोकांनी परिणत तत्वज्ञानाच्या आधारे वैदिक संस्कृतीला केलेला प्रतिवाद आहे हे लक्षात घ्यायला हवे.

गौतम बुद्धाच्या शाक्यकुलाचा कुलदेव शाक्यवर्धन नांवाचा यक्षच होताच तर खुद्द बुद्धालाही यक्ष म्हटले गेलेले आहे. जैन धर्मातही यक्ष-यक्षिणी तीर्थकरांचे सेवक मानले गेले आहेत. मातृपुजा अथवा सुफलनविधी यक्षिणींनाही केंद्रस्थानी ठेवून होत असावेत कारण त्या शिल्पांत नेहमीच नग्न दाखवलेल्या असून त्यांचे नितंब व स्तन प्रमाणापेक्षा मोठे दाखवले जातात. सर्वात जुनी यक्षमुर्ती ही सनपूर्व चवथ्या शतकातील असून ती परखम येथे मिळाली. आता ती मथुरा संग्रहालयात ठेवलेली आहे. पुढे महायान संप्रदायातही यक्षपुजा सुरु राहिली. यक्ष मुर्ती देशात सर्वत्र आढळल्या असून यक्षगानाच्या स्वरुपात दक्षीणेत कलादृष्ट्याही यक्षमाहात्म्य जपले गेलेले आहे.

एवढी व्यापक देशव्यापी असलेली यक्षपुजा पुराणांनी केलेल्या वैदिक कलमांत हळू हळू विस्मरणात गेली. कुबेर व रावणाचे बाप बदलले गेले. पुराणांनी यक्षांना अतिमानवी, माणसांना मारून खाणारे, जलाशयांजवळ निवास करणारे कुरूप-भिषण, लोकांना झपाटणारे वगैरे असे चित्रित केले. तरीही यक्ष ही संरक्षक देवता आहे व तिचा निवास जल-वृक्ष यात असते ही लोकस्मृती लोप पावली नाही. महाकवी कालिदासाने मेघदुतात यक्षालाच आपले दूत बनवले. यक्षपुजा आजही आपण करीत असतो पण त्यातील अनेक देवता मुळस्वरुपातील यक्षच आहेत याचे भान मात्र हरपलेले आहे. दिपावलीही खरे तर यक्षरात्रीच असली तरी तेही आपले भान सुटले आहे.

कुबेर हा शिवाचाच प्रतिनीधी...यक्षांचा अधिपती...धनसंपत्तीचा रखवाला...खजीनदार. एक कृषि-हंगाम जावुन दुसरा येण्याच्या मद्धे जो अवकाश मिळतो...त्या काळात या कुबेराचे अभिवादन करत समस्त कृषिवल असूर संस्कृतीचा जो महानायक बळी त्याच्या स्मरणाने नवीन वर्ष सुरु करण्याची ही पद्धत. त्यालाच आपण बळी प्रतिपदा म्हणतो...नववर्षाची सुरुवातच सर्वश्रेष्ठ, शैव संस्कृतीचा आजही जनमानसावर राज्य करीत असलेल्या महात्मा बळीच्या नांवाने सुरु होणे स्वाभाविकच आहे.

या दिवशी विष्णुचा अवतार वामनाने बळीस पाताळात गाडले अशी एक भाकड पुराणकथा आपल्या मनावर आजकाल बिंबलेली आहे. खरे तर ही दंतकथा कशी जन्माला आली हे आपण पाहुयात. मुळात ही कथा ऋग्वेदात अत्यंत वेगळ्या प्रतीकरुपात येते. विष्णु तीन पावलात विश्व व्यापतो अशी ही मुळची कथा. तिचा बळीशी काही संबंध नाही. परंतू गुप्तकाळात दिपावलीचेही सांस्कृतीक अपहरण करण्याच्या प्रयत्नांत वामन अवतार घुसवत त्याने बळीला पाताळात गाडल्याची कथा बनवली गेली. मुळात ते सत्य नाही. बळी वेदपुर्व काळातला. अवतर संकल्पना आली तीच मुळात गुप्तकाळात. त्यामुळे ही एक "वैदिक" भाकडकथा आहे हे सहज लक्षात येईल असे तिचे एकुणातील स्वरुप आहे. अर्थात ही कथा निर्माण केली म्हणून बळीराजाचे महत्व कमी झालेले नाही. झाले असते तर ती "वामनप्रतिपदा" झाली असती...बळीप्रतिपदा नव्हे. पण तसे झाले नाही...थोडक्यात हिंदुंनी आपल्या सांस्कृतीक श्रद्धा जपल्या, पण वैदिक धर्मियांनी बनवलेल्या कथाही सातत्यपुर्ण प्रचारामुळे कालौघात डोक्यात घुसवुन घेतल्या. बळीला पाताळात गाडुन वैदिक टेंभा मिरवणा-या वामनसमर्थकांच्या हे लक्षात येत नाही कि नववर्षारंभ बळीच्या नावाने का? कारण ते बळीमाहात्म्य संपवुच शकत नव्हते...एवढेच...म्हणुन भारतात या वामन-अवताराची पुजा कोणी करत नाही...त्याचे भारतात बहुदा एकच मंदिर आहे. पण बळीचे तसे नाही...तो आजही कृषिवल संस्क्रुतीचा श्वास आणि ध्यास आहे. बळीप्रतिपदेला आपण बळीचीच पूजा करतो...वामनाची नाही.

अश्वीन अमावस्येला आपण आज जे लक्ष्मीपुजन करतो त्याचाही असाच सांस्कृतीक अनर्थ झालेला आहे. मुळात ही यक्षरात्री असल्याने या रात्री लक्ष्मीपुजन नव्हे तर कुबेरपूजन करण्याची पुरातन रीत. कुबेर हा शिवाचा खजीनदार. धनसंपत्तीचा स्वामी. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पुजणे हा मुळचा सांस्कृतीक कार्यक्रम. परंतू गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पुजा होऊ लागली. नंतर कालौघात मात्र कुबेराला गायबच करण्यात आले.

खरे तर विष्णू आणि लक्ष्मी हा संबंध जोडण्यात आला तोही उत्तरकाळात. गुप्तकाळात. ऋग्वेदात विष्णुला मुळात पत्नीच नाही. श्रीसूक्त हे प्रक्षिप्त असून ते उत्तरकाळात जोडले गेले आहे (गणपती अथर्वशिर्षाप्रमाणे) पण यातही विष्णु व लक्ष्मी यांचा पती-पत्नी संबंध, विष्णुचे शेषशायी समुद्रतळीचे ध्यान वगैरे वर्णित नाही. तो उपेंद्र आहे यापलीकडे त्याला महत्व नाही. त्याचे महत्व वाढवले गेले ते गुप्तकाळात. गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला त्यामुळे गुप्तकाळ सुवर्णकाळ मानायची प्रथा पडली. पण सांस्कृतिक गोंधळाचा काळ म्हणजे गुप्तकाळ हे लक्षात घ्यायला हवे.

हा उत्सव मुळचा अवैदिक (आगमिक व म्हणजेच हिंदुंचा, वैदिकांचा नव्हे) असल्याचे अनेक पुरावे जनस्मृतींनी आजही संस्कृतीत जपलेले आहे. मुळच्या यक्षरात्रीचे अनेक अवशेष आजही जनस्मृतीतून गेले नाहीत असे जी. एन. कानुगा (तत्रैव) म्हणतात. बंगालमद्ध्ये लक्ष्मीऐवजी कालीची पुजा करंण्यात येते. अनेक समाज यक्षरात्रीला गोवर्धन पर्वताची कृष्णासहित पूजा करतात. कृष्ण हा मुळचा इंद्रविरोधी (म्हणजेच वैदिक विरोधी) ही जनस्मृती आजही कायम आहे. काही लोक आजही लक्ष्मीबरोबरच कुबेराचीही पुजा करतात. म्हणजेच मुळचे अवशेष वैदिकांना समूळ पुसटता आलेले नाहीत.

वसुबारस, धनतेरस (धनतेरस हा शब्द "धान्यतेरस" असा वाचावा...कारण धन हा शब्द धान्य शब्दाचा पर्यायवाची आहे.) हे सण कृषिवल शैव संस्कृतीचीच निर्मिती आहे. कृषीसंस्कृतीत गाय-बैलाचे स्थान केंद्रवर्ती होते व आजही बव्हंशी आहे. वैदिकांनी त्यावर अतिक्रमण करुन त्यांना वैदिक रुप बहाल करण्याचा प्रयत्न केला आहे एवढेच. कारण या सणाचा राम वनवासातून परत आला या भाकडकथेशीही काहीएक संबंध नाही.

नरकासूराच्या दुष्टपणाच्या व सोळा हजार राजकन्यांना बंदिवासात ठेवण्याच्या कथेत तथ्यांश असता तर नरकासुराच्या नांवाने एक दिवस लोकांनी अर्पण केला नसता. मुळ रुपाला धक्का न लावता त्याचा बनावट कथा प्रसवत त्याचा अर्थच बदलून टाकायची वैदिकांची कला मात्र अचाट आहे. देव-असूर सांस्कृतीक (कथात्मक) संघर्षात असूर महामानवांना बदनाम करण्यासाठी अशा भाकडकथा रचण्यात आल्या हे उघड आहे. भारतात सोळा हजार राजकन्या कैदेत ठेवायच्या तर तेवढे उपवर मुली असणारे राजे तरी हवेत कि नकोत? या कथेने नरकासुराला तर बदनाम केलेच पण कृष्णालाही बदनाम केले गेले. कांचा इलय्या नामक बहुजन विचारवंत (?) कृष्णाला "रंडीबाज" म्हणतो ते या कथेच्या आधारावर. मुळात ही कथा का निर्माण झाली हे समजावून घ्यायला हवे. कृष्ण वैदिक नव्हता, असुही शकत नव्हता कारण त्याचा काळ वेदपुर्व असल्याचे संकेत खुद्द महाभारतात मिळतात. हे वास्तव समजावून घेतले कि अशा भाकडकथांचा उलगडा होतो. जनसामान्यांत नरकासूर अप्रिय नव्हता हे त्याच्या नांवाचाच सण आहे हे वास्तव लक्षात घेतले कि सांस्कृतीक पेच पडत नाहीत.

थोडक्यात मित्रांनो, हा यक्षरात्री उत्सव आहे...त्यांच्या स्वागतासाठीचा, वैभवप्राप्तीच्या प्रार्थनांचा दीपोत्सव आहे. मी तरी लक्ष्मीपूजन न करता कुबेरपुजनच करत असतो. कारण तोच खरा सांस्कृतीक मुलाधार आहे. असूर संस्कृती व त्याचीच उपसंस्कृती म्हणजे यक्ष संस्कृती हे लक्षात घेतले पाहिजे. वैदिक सांस्कृतीक आक्रमणाला थारा देण्यात अर्थ नाही. खरे तर बळीप्रतिपदेस महात्मा बळीची भव्य मिरवणुक काढावी... (आजकाल ती प्रथा अनेकांनी सुरू केली आहे, त्यांचे अभिनंदन!) तेच खरे आपल्या एका महान पुर्वजाला अभिवादन!

यक्षरात्रीच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा!

Sunday, October 12, 2014

मी कृतज्ञ आहे....

होय
मी कृतज्ञ आहे
पानाफुलांशी
ओहळ, निर्झर, महानद्या आणि दिगंतापर्यंत पसरलेल्या
तळ नसलेल्या सागरांशी
अगणित आकाशगंगा
आणि धरतीच्या कणाकणाशी
रोजच अंग निथळवणा-या सुर्यकिरणांशी
आत्मा चिंब भिजवत
आसमंत व्यापून राहणा-या
पावसाळ्याशी
कासाविस करणा-या वेदनांना
अंगाई बनणा-या शब्दांशी...

होय,
मी कृतज्ञ आहे
तुमच्या...माझ्या
सर्वांच्या हृदयांतून उसळत असलेल्या
मानवतेच्या
अखंड उद्गारांशी!

Friday, October 10, 2014

आपली पाळेमुळे...

सध्या वैदिकांच्या पावलावर पाऊल ठेवून आपापल्या जातींची मुळे युरेशियात, दुरच्या काळातील एखाद्या प्रख्यात राजवंशांत, लोप पावलेल्या (किंवा कधीही नसलेल्या) क्षत्रियत्वात शोधण्याची एक परंपरा निर्माण होते आहे. कोणी आपली जात नागवंशी असल्याचे सिद्द्ध करण्याचा अट्टाहास करतो तर कोणी आमच्याच पुर्वजांनी वेद लिहिले असेही दावे करतो. हे दावे करणारे वैदिक नसतात हे विशेष. सिंधू संस्कृतीचे निर्माते महाराष्ट्रातील मराठे आहेत असेही काही दावे आहेत. द्रविडही यात मागे नाहीत. सिंधू संस्कृतीचे निर्माते द्रविडच असल्याचे दावे आहेत. सिंधू लिपी वाचल्याचे दावे डा. मालती शेंडगे, सदार ते पारपोलापर्यंत सर्वांनीच केलेत...पण एकाच्याही लिपी वाचनात साधर्म्य नाही. राजपूत वंशाशी कसेही करून नाळ भिडवणे तर सर्वात सोपे.. एके काळी ज्यू लोक आपण हिंदुस्तानातून आलो असे सांगत असत. युरोपिय लोकही आम्ही त्या त्या युरोपिय देशातील मुळचे नसून इंडो-युरोपियन आर्य असल्याचे सांगत क्यस्पियन अथवा दक्षीण रशिया हे आपलेव मुलस्थान असल्याचे सांगत असतात. जर्मनांना हे मान्य नाही. ते चार पावले पुढे. ते म्हणतात आर्य मुळचे तिकडचेच आणि शुद्ध नोर्डिक वंश म्हणजेच आर्य वंश. कोणी म्हणतो आम्हीच मुलनिवासी. आर्यभट परकीय...त्यांना युरेशियात हाकला तर वैदिक लोक आम्ही येथलेच...येथुनच जगात आम्ही संस्कृती नेली असे सांगतात.

थोडक्यात प्रत्यकजण आपापल्या पाळामुळांबद्दल संभ्रमात नाही काय?

खरे तर पुराणांतील व महाभारतातील वंशावळ्या जुळत नाहीत. मुळात त्या अवास्तव आणि मिथकांनी भरलेल्या आहेत. उदा. ऋग्वेदातील ययाती, नहूष हे वैदिक ऋचा लिहिणारे ऋषी आहेत तर याच नांवाचे महाभारतात कुरु वंशाचे पुर्वज आहेत. यदु, द्रह्यु, अनु, पुरु व तुर्वश ही ऋग्वेदात टोळ्यांची नांवे आहेत तर महाभारतात ती चक्क ययातीच्या शर्मिष्ठा व देवयानीपासून झालेल्या मुलांची नांवे आहेत. ऋग्वेद ज्याच्या घराण्यात लिहिला गेला त्या मात्र सुदासाचे नांवही महाभारतात येत नाही. एवढेच काय सर्वात मोठे नोंदले गेलेले दाशराज्ञ युद्ध महाभारत अथवा पुराणांत उल्लेखलेले नाही...असो.

असे असुनही आजचे जातीसमाज मात्र आपल्या पाळामुळांच्या शोधात रममाण आहेत. आपली पाळेमुळे शोधावीत असे वाटणे स्वाभाविक आहे, परंतू त्यासाठी भोंगळ साधणे, पौराणिक कालगणना, त्यातील पिढ्यांच्या याद्या, युगसंकल्पनेतील अवास्तवता, त्यातील व्यक्तींची काही हजार वर्षांची आयुर्माने....इकडे सोयिस्कर अथवा अभिनिवेशापोटी दुर्लक्ष करत आपल्या इतिहासाची नाळ काहीही करुन नुसती पुरातन नव्हे तर तर प्रसिद्ध देशातील अथवा विदेशातील प्रसिद्ध टोळ्या/घराणी यांशी केवळ वरकरणी नामसाधर्म्यांनी जुळवायचे प्रयत्न होतात. ज्युडिया म्हणजे इकडील जाधव अशाही मजला गाठल्या जातात.  हिट्टाईट लोक म्हणजे हाटकर धनगर अशीही संशोधने होतात. वैदिक ज्याप्रमाणे आजकाल आर्य भारतीयच असून येथुन जगात पसरले असे सांगतात तसे हट्टी लोकही भारतातुन "तिकडे" गेले असे सांगितले जाते.

अशा संशोधनांतून (?) जाती/धर्म अहंकार वाढण्यापलीकडे काय साध्य होणार? खोट्या अहंकारांवर कोणत्या जाती/धर्माचे कल्याण होणार? आहे त्या ज्ञात इतिहासात आपापले योगदान काय याचे तटस्थ विवेचन पुरेसे नाही काय? जनुकीय विज्ञान अजुन बाल्यावस्थेत आहे व त्याचे निष्कर्ष हे परस्परविरोधी आहेत हे उघड असतांना सोयिस्कर निष्कर्ष का उचलले जातात? आउट ओफ़ आफ्रिका हा गेली काही दशके लोकप्रिय असलेल्या सिधांताला तडे जातील असे पुरावे आता आशिया, चीन, मलेशियात समोर येत असल्याने त्या सिद्द्धांताला जनुकीय आधारावरच मुठमाती देण्याच्या बेतात वैज्ञानिक जग आहे हे लक्षात कोण घेणार?

पण या कथित सिद्धांतांनी समाजाचे (युरोपियही) सामाजिक व सांस्कृतीक पराकोटीचे नुकसानच झाले आहे. भारतातील मुलनिवासी विरुद्ध वैदिक वाद, द्रविड विरुद्ध आर्यवादातून निर्माण झालेला व आजही जीवंत असलेला संघर्ष हा सरळ सरळ समाजाची उभी आडवी फाळणी करणारा आहे हे कधी समजणार?

आपापली पाळेमुळे शोधली पाहिजेत. ती माणसाची मानसिक गरज आहे. आत्माभिमान येत न्यूनगंडातून अथवा वर्चस्वतावाद गंडातून मुक्ती त्यामुळेच मिळू शकते. पण जाती/धर्म/वांशिक अहंकारातून संशोधने केली गेली तर मात्र स्वत:च्या हातीही ठोस काही पडणार तर नाहीच पण उलट सामाजिक नुकसानच होईल. युरोपचा इतिहास फार तरुण आहे तो वयोवृद्ध ठरवता यावा व काळ्यांपेक्षा गोरे श्रेष्ठ या अहंभावातून आर्य सिद्धांताचा जन्म झाला. पण काळ्यांचा इतिहास जुनाच आहे, युरोपियन वा भारतियांपेक्षाही हे मान्य करण्याची नैतिक हिंमत यांच्यात आहे काय? पण अस्तित्वात नसलेल्या "आर्य भाषा गटाच्या मुलस्थानावर" जेवढी चर्चा होते तशी सेमेटिक गटाची का होत नाही? त्यांचा इतिहास तर केवळ अवशेषांतून नव्हे तर लिखित स्वरुपात उपलब्ध आहे. गिल्गमेश सारखे जगातील आद्य महाकाव्य लिखित स्वरुपात जसेच्या तसे उपलब्ध आहे. तसे रामायण-महाभारताचे आहे काय? खुद्द ऋग्वेदाचे आहे काय? होमर वगैरे तर फार फार अलीकडचे.

हा सांस्कृतीक बाष्कळपणा करण्यात वैदिकांनी पिढ्या खपवल्या. आता त्यात अवैदिकांचीही (ते स्वत:लाच वैदिक समजतात हा भाग अलाहिदा.) भर पडावी हे भविष्यासाठी सांस्कृतीक दु:श्चिन्ह आहे.

बरे या समाजांचा मानसिक दुभंग पहा. आरक्षणासाठी हेच आम्ही सामाजिक मागास असल्याचे हिरीरीने दावे करतात...एकीकडे तुम्ही सुर्यवंशी/चंद्रवंशी क्षत्रीय म्हणवता, आपापली पाळेमुळे वैश्विक इतिहासातील पुढारलेल्या घटकांतच शोधतात आणि वर मागासही म्हणवून घेता...हे काय आहे? हा स्वत:च्याच अस्तित्वाबद्दलचा मानसिक दुभंग नव्हे तर अन्य काय आहे? स्वत:च्या हीणगंडातून येणारी ही वर्चस्वगंडाची प्रतिक्रिया तर नव्हे?

कोणताही गंड कामाचा नाही. श्रेष्ठता वंशात/प्रांतात/धर्मात/जातीत नसते...ती व्यक्तींच्या एकुणातील सांस्कृतीक/सामाजिक आणि अर्थव्यवस्थेतील योगदानात असते. ती योग्यता आधी वाढवा. पाळेमुळे अवश्य शोधा...पण ती कोणत्याही गंडाच्या किंवा अर्धवट शिजलेल्या विद्वानांच्या साहित्यालाच मुख्य संदर्भ ग्रंथ मानून आणि केवळ काही शब्द-साम्यांतून शोधू नका. नाहीतर "ज्याचा खोट्या इतिहासावर विश्वास असतो त्याचे भविष्यही खोटेच असणार!" याची नोंद ठेवा.

Tuesday, October 7, 2014

मी का लिहितो?

प्रत्येक व्यक्ती जन्मत:च आपले जग स्वत:बरोबर आणते असे म्हणतात ते खरेच आहे. ज्या आपल्या जगात तो वाढतो त्याचे जे काही भले-बुरे असते ते व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचे अपरिहार्य भाग बनणे स्वाभाविक अहे. लेखक आपल्या प्रतिभेच्या बळावर त्यातून आपली सृजनात्मक बीजे घेत आपल्या कृती रचत असतो. पण त्यातही त्याच्या स्वत:च्या जगाची मर्यादा सुटत नाही. मी त्याला अपवाद असणे शक्य नाही. त्यामुळे माझा लेखन प्रवास सांगत असतांना माझ्या जगाचे संदर्भ येणे अपरिहार्य आहे.

मी सातवीत असतांना पहिली एकांकिका लिहिली..."फितूरी". लेखकाचा प्रवास कवितेतुन सुरु होतो असे म्हणतात, तसे माझ्या बाबतीत झाले नाही. मी कविता लिहायला फार नंतर सुरुवात केली. एकांकिकेकडुन मी कथांकडे वळालो. मी अकरावीला जाईपर्यंत माझ्या अनेक कथा पुण्यातील मासिकांमद्धे प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर मी सरळ उडी घेतली ती कादंबरीवर. बारावीत असतांनाच "विकल्प" ही कादंबरी लिहून झाली. मग कविता...आजवर माझी ८०च्या वर मराठी-इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बहुतेक पुस्तकांच्या दोन ते सात-सात आवृत्त्या झाल्या आहेत. कादंब-उयांकडून मी इतिहास, अवकाशशास्त्र आणि समाजशास्त्रीय संशोधनांकडे वळालो त्यावरही अनेक पुस्तके झाली आहेत..अनेक प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. मी अमुकच गोष्टीकडे एका कसा वळालो हे मला नीटपणे सांगता येईल असे वाटत नाही. पुढे मी अजून कशाकडे वळेल हे मला सांगता येणार नाही. हे काहीच माहित नसणे, सारेच अनिश्चित आणि तरीही निश्चित असणे हे ज्या जगाला घेऊन मी सोबत आलो त्याचेच अपरिहार्य भाग आहेत.

मी मुळचा जळगांवचा. वडील प्राथमिक शिक्षक. चवथ्या वर्षापासुनचे बहुतेक मला सर्व आठवते. तेंव्हा मी पहिलीत होतो आणि दहिगांव (संत) या पाचोरा तालुक्यातील गिरणेकाठच्या गांवातल्या शाळेत, वडील तेथेच नियुक्तीला असल्याने, तेथेच शिकत होतो. आमची शाळा नदीकाठीच एका झाडाखाली भरे. पोहायला मी तेथेच शिकलो. कोळ्यांची वस्ती ब-यापैकी असल्याने मी खेकडे पकडण्यात लवकरच तरबेज झालो. आमच्यात पाचव्या वर्षी जावळ काढत. माझ्या केसांना वाढ फार...आई त्यामुळे वेण्या घालायची. तेंव्हा पाचवी-सहावीच्या मुली म्हणजे थोराड व काही चक्क विवाहित. मला त्यांनी अंगाखांद्यावर वाढवले म्हटले तरी हरकत नाही. दुसरीला मी आजीकडे जळगावात...म्युन्सिपालिटी शाळा क्र. २. आजी ५-६ घरी धुनीभांडी करायची. आजोबा कसे दिसायचे ते माहितच नाही. ते कधीच वारले होते. माझे काका अजून शिकतच होते. आजीबरोबर मीही घरकामांना जाई...आजीला मदत करे. नंतर आम्ही आलो ते सरळ पुणे जिल्ह्यातील वरुडे (ता. शिरुर) येथे. तो सर्व प्रवास रोमहर्षक आहे. वडिलांना वाचनाची प्रचंड आवड. मलाही ती लागली. सातवीपर्यंत पंचक्रोशीतील  सारी वाचनालये पालथी घालून झालेली.

वरुड्यात लाइट नव्हती, एस.टी. नव्हती आणि गिरणीही नव्हती. वडिल शिक्षक असले तरी अनेक कारणांनी दारिद्र्याचा कडेलोट होता. आई आणि मी सुताराच्या घरच्या जात्यावर लोकांची दळणे दळायचो. जास्त असेल तर चाराण्याला पायली या दराने दोनेक पायल्या डोक्यावर घेत जवळच्या गणेगांव किंवा वाघाळ्याच्या गिरणीतुन दळून आणुन द्यायचो. या प्रवासात माझ्या कल्पना भरा-या घेत असायच्या. त्यामुळे ओझ्याचे कधीच काही वाटले नाही. वाचायचो--तसे लिहावेही वाटायचे. सातवीत असता "फितुरी"ने मात्र एवढे झपाटले कि चक्क लिहुन पुर्णही केले. मानधन म्हणुन मास्तरांची कानफडीत पडली.


मी लेखक व्हायचे ठरवले होते का? तसे काही नाही. मला लिहायला आवडायचे एवढेच. तो एक विरंगुळा होता हलाखीच्या दिवसांतला. त्यामुळे कि काय माझे या काळातील, अगदी प्रसिद्ध झालेले लेखनही मी जपलेले नाही. माझी एक कवितांची वही रद्दीत गेली त्याचीही खंत नाही. आजही जवळपास तीस-पस्तीस कादंब-या अर्धवट लिहून केवळ मुड नाही म्हणून सोडून दिलेल्या. एका प्रकाशकाने "अगम्य" कादंबरीचे हस्तलिखित गहाळ केले, त्याचेही दु:ख नाही. माझे लेखन प्रसिद्ध व्हायचे म्हणून झाले तेवढेच...बाकी मी माझ्या लेखनात अडकुनही कधे पडलो नाही...एक झाले कि दुसरे सुरु हाच माझा खाक्या राहिला आहे.

असो. त्यावेळी मला परिस्थिती बदलायची होती...कथा-कादंब-यांतील नायकांप्रमाणे भव्य-दिव्य-वैभवशाली बनायचे होते. खरे म्हणजे स्वप्नरंजन हाच माझ्या जगण्याचा अपरिहार्य भाग बनला होता म्हणून मला परिस्थितीचे चटकेही तेवढे बसले नाहीत. बी. कोम होईपर्यंत माझ्या पायांना चप्पलही कधी मिळाली नाही. अकरावीनंतर ते पार थेट एम. कोम. होत शिक्षणाला पुर्णविराम देईपर्यंत मला परिक्षा आणि सेमिनार सोडता कधी कोलेजही अटेंड करता आले नाही. त्यामुळे कोलेज जीवन काय असते हे मला फार फार तर कादंब-या वाचुनच माहित आहे. माझ्या लेखनात ते जीवन कधीही आलेले नाही. फार काय कौटुंबिक कादंब-या जरी मी दोन-तीन लिहिल्या असल्या तरी त्यात पात्रे कमी आहेत...नात्यांचा मोठा गोतावळा नाही कि त्यातील जिव्हाळा नाही. मला त्याचा अनुभवच नाही तर काय करणार?

* * *

मी प्रचंड वाचायचो हे मी सांगितलेच आहे. पण माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पाडणारी पुस्तके कोणती हे सांगणे जरा कठीण आहे. मी गो. ना. दातार ते डी. के. बेडेकर...रहस्य रोमांच ते तत्वज्ञान यात वाचन-मुशाफिरी केली. अनेक कृत्यांनी खूप भारावुनही गेलो. पण तात्पुरते. कोणत्याही लेखकाला मी कधी पत्र लिहिले नाही...किंवा प्रत्यक्ष भेटावे असे वाटलेही नाही. माझे इंग्रजी बेतास बात असल्याने अनुवादित पुस्तकेही खूप वाचली गेली.   कामुच्या "आऊटसायडर"ने मी काही काळ प्रचंड अस्वस्थ होतो हेही खरे. बहुदा मी स्वत:लाच "आउटसायडर" समजत असल्याने तसे झाले असेल हेही खरे. पण अस्तित्ववादाची मोहिनी पडली नाही...किंबहुना कोनताही वाद माझ्या काळजाचा ठाव घेऊ शकला नाही. माझ्यावर जर प्रभाव असेल तर जे वाचले त्या सर्वांचा सामुहिक प्रभाव आहे असे म्हटले तरे चालेल.

लेखकांना कोणीतरी मार्गदर्शक असतो असे म्हनतात...सुदैवाने म्हणा कि दुर्दैवाने, असे मला कोणी मिळाले नाही. दीपक शिंदे या मित्राशी होत तेवढ्याच साहित्यिक चर्चा...त्यापलीकडे काही नाही. लेखक म्हणून माझी वाढही एकाकीच झाली आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. जी दिवास्वप्ने मी माझ्यासाठी पाहिली तीच माझ्या लेखनाची प्रेरणाच नव्हे तर एक भाग बनली.

* * *

माझा पहिला कवितासंग्रह "प्रवासी" ह महाराष्ट्र शासनाच्या अनुदानने प्रपंच प्रकाशनाने प्रसिद्ध केला तो १९८६ साली. मी २२ वर्षांचा होतो. त्याच वर्षी माझा "An Ancient Aryans Though on Religion" हा प्रबंध इंग्लंडमधील तत्कालीन स्टोनीब्रुक नामक एका सम्स्थेने स्विकारला...त्याचाच मराठी अनुवाद येथील गुढविद्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. खूप गाजला. कविता आणि पुरातन इतिहास यात तसे साम्य नाही. पण मीच प्रचंड विरोधाभासाने भरलेलो असल्याने असंख्य विरोधाभास माझ्या जीवनात हरघडीला दत्त म्हणून हजर राहिलेले आहेत. ते जाणीवपुर्वक नव्हे तर आपसुकच घडत गेले. कवितांतही सा-या कविता मानवी प्रवासाला केंद्रबिंदू मानत सहा-सहा ओळीच्या स्वतंत्र आशयाच्या तरी खंडकाव्यसदृष्य होत्या. त्यात तरुणाईत अभिप्रेत असलेल्या प्रेमभावना नव्हेत तर तत्वज्ञानाचाच भाग अधिक होता. आणि त्याच वेळीस मी अर्थतज्ञ बनायच्या प्रयत्नांत होतो आणि दै. आज का आनंद मद्धे वार्ताहराची नोकरी करत होतो.

* * *

पुढच्याच वर्षी मेहता पब्लिशिंग हाऊसने माझी "नरभक्षकांच्या बेटावर विजय" ही किशोर साहस कादंबरिका प्रकाशित केली. बारावीत लिहिलेली पहिली कादंबरी "विकल्प" मात्र त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी प्रकाशित झाली. मला साहस, रहस्य, थराराचे अननुभूत आकर्षण. नुसते आकर्षण नाही, मी स्वता: खाजगी गुप्तहेर संस्था काढून ती हौस प्रत्यक्षही भागवली...नुसते लिहिले नाही. सुरुवातीच्या माझ्या रहस्य-थरार कादंब-या दिलिपराज, अमोल, चंद्रमौळी प्रकाशनांनी प्रकाशित केल्या.

स्वतंत्र मराठी थरारकथा लिहिणारा मी मराठीतील पहिला लेखक. (रहस्य आणि थरार कादंब-या हा एकच प्रकार नव्हे) भारतात रहस्य थराराची बीजे पुरवणा-या घटनांची रेलचेल आहे. इंदिराजींच्या हत्येच्या घटनेचा वापर करत मी "डेथ ओफ द प्राईममिनिस्टर" ही थरार कादंबरी लिहिली. पुढे ती इंग्रजीत अनुवाद होऊन प्रकाशितही झाली. त्यावेळी इंडियन एक्स्प्रेसने मला "भारताचा फोरसीथ" अशी चक्क उपमाही दिली होती. मराठी लेखकाची थरारकादंबरी आणि तीही इंग्रजीत अनुवादित होते याचे अप्रुप मला नसले तरी अज्नेकांना होते...लोकप्रभात रवीप्रकाश कुलकर्णींनीही त्यावर लेख लिहिला होता.

नंतर राजीवजींच्या हत्यच्या पार्श्वभुमीवर मी "मृत्यूरेखा" ही कादंबरी लिहिली. मराठीत ते प्रचंड वाचली तर गेलीच तीही इंग्रजीत "On the Brink of Death"  या नांवाने प्रकाशित झाली...जगभर पसरली...अमेरिकेत रेडियोवर दोन मुलाखती झाल्या, दक्षीण आशियातील दहशतवादावर ती कादंबरी पाश्चात्य जगात चक्क संदर्भग्रंथ म्हणुनही वापरली गेली. समीर चक्रवर्ती हे पात्र निर्माण करत जवळपास आठ आंतरराष्ट्रीय थरारकथाही लिहिल्या. थोडक्यात सांगायचे तर थरार कादंबरी लेखनात मी बरीच भर घातली. अर्थात शंकर सारडा सोडले तर अन्य कोणी समिक्षक ते मान्य करणार नव्हता आणि केलेही नाही. आणि मीही प्रसिद्धीचा हव्यास नसल्याने त्या भानगडीत पडलो नाही. कारण थरार कादंब-या हेच माझे एकमेव लक्ष्य नव्हते.

मी नंतर आंतरराष्ट्रीय इतिहासाकडेही वळालो. १९९२ साली "क्लिओपात्रा" ही कादंबरी त्यातून साकार झाली. आश्चर्य वाटेल पण त्यावेळेस इंग्रजीतही क्लिओपात्रावर अनेक चित्रपट झाले असले, शेक्सपियरपासून अनेक नाटके लिहिली गेली असली तरी कादंबरी जवळपास १९९८ पर्यंत नव्हती. ही कादंबरी प्रचंड खपली. पेपरब्यक आवृत्त्यांमुळे जवलपास ५५००० प्रती विकल्या गेल्या. अनेक लोकांनी ही कादंबरी वाचून इजिप्तला भेटी दिल्या. इतिहास आणि तत्वज्ञान या जवळच्या बाबी आहेत. एकाकी राहण्याची सवय लहानपणापासुनच पडल्याने विचारांची जास्त सवय लागलेले होतीच. मानवी जीवनातील अनेक काल्पनिक संकल्पनात्मक समस्या घेत त्या सोडवत बसायचा माझा एक छंदच होता. क्लिओपात्राच्या विलक्षण व्यक्तीत्वाने मला झपाटले नसते तरच नवल.

त्यातून लिहिली गेली "यशोवर्मन". ही कादंबरी काल्पनिक इतिहासकाळात एका बेटावर घडते...मोजुन सहा पात्रे...आणि मध्यवर्ती एक गहन समस्या...आणि सहा दृष्टीकोन....ही कादंबरी प्रकाशित झाली. वाचकांनी चांगले स्वागत केले. प्रा. विजय काचरे सोडता यावर समिक्षात्मक लेखन मात्र झाले नाही. उलट "द जंगल" या नांवाने ही कादंबरी इंग्रजीत प्रकाशित झाली, अनेक अमेरिकन लेखकांनी आवर्जुन या कादंबरीवर लिहिले. तत्वचिंतनात्मक कादंबरी असुनही आणि माझ्यावर थरारकथालेखक असा शिक्का असुनही वाचकांनी ही कादंबरी स्वीकारली हे विशेष.

तसेच "कुशाण" या माझ्या तिस-या कादंबरीच्याही अनुवादाचे झाले. पुरातन काळातील भटक्या मानवी टोळ्या जेंव्हा नागर संस्कृतीच्या सन्निध्यात येतात...स्थिर होऊ लागतात तेंव्हा या संक्रमनातुन जी मानसिक उलघाल होते त्याचे चित्रण या कादंबरीत. नेहमीप्रमानेच ही कादंबरीही प्मराठीत उपेक्षीत राहिली पण तिचा इंग्रजी अनुवाद "Last of the Wanderers" प्रसिद्ध झाला आणि या कादंबरीला महाकाव्यसदृश कादंबरी असल्याची प्रतिक्रिया प्रख्यात अमेरिकन लेखिका सांड्रा स्यंचेझ यांनी दिली. अशा अनेक प्रतिक्रिया आल्या...लेख लिहिले गेले...चक्क दोन आवृत्त्या झाल्या.

असो. मराठीत मी अजून काही प्रयोग केले. राजकीय उपहास कादंब-या लिहिल्या. राजीव गांधींवर "गुडबाय प्राईममिनिस्टर" ही उपरोधकादंबरी लिहिली तर सद्दाम हुसेन-चंद्रशेखर-बुश-गोर्बाचेव या पात्रांना घेत आंतरराष्ट्रीय नव्हे तर आंतरविश्वीय उपरोध-कादंबरी लिहिली..."आभाळात गेलेली माणसं" या कादंबरीत मी सर्वप्रथम "एक जग: एक राष्ट्र" हे कल्पना मांडली. ही कादंबरीही कामिल पारखेंनी इंग्रजीत अनुवादित केली. "मातालियन्स" या शिर्षकाखाली प्रकाशितही झाली. "एक जग: एक राष्ट्र" ही संकल्पना केंद्रवर्ती मानत मी नंतर सैद्धांतिकही लेखन पुष्कळ केले. आज माझे या संकल्पनेसाठी ३-४ हजार अनुयायी आहेत आणि आम्ही ही संकल्पना रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

असो. ते मह्त्वाचे नाही. महत्वाचे हे आहे कि मी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इतिहास व वर्तमानातील पार्श्वभुम्या घेत मानवी जीवनाचे मलाच पडलेले कोडे उलगडत राहिलो. हिंदू असल्याने मला अपरिहार्यपणे जात असली तरी मी कसल्याही जातीय अथवा धार्मिक वातावरणात न वाढल्याने माझी पात्रेही सर्वच जाती-धर्मातील. माझी जातही फारशी कोणाला ठावी नाही. चौकस लोकांना तर त्याचा मीच थांग लागू देत नाही. असे असले तरी मला जातीयवादाचा फटका बसला का? तर त्याचे उत्तर "होय" असेच आहे याची मराठी सारस्वताने पुन्हा एकदा माझ्या निमित्ताने नोंद घेतली पाहिजे. (नाही घेतली तर गेले फाट्यावर!)

* * *

राजीव गांधींचा मृत्यू ते बाबरी मशीदीच्या पतनाचा काळ आणि जागतिकीकरण यात बदलणारे राष्ट्रीय विश्व हा माझ्या पुढील "सव्यसाची" या कादंबरीचा गाभा बनला. ही माझी आकाराने सर्वात मोठी कादंबरी. तब्बल साडेपाचशे पानांची. या कादंबरीनंतर मात्र मी काही काळ मराठी लेखन थांबवले. इंग्रजीतच मी लेखन सुरु केले. "द अवेकनिंग" ही मृत्युचे रहस्य उलगडु पाहणारी एका काल्पनिक मित्थकथा निर्माण करत लिहिलेली कादंबरी. कै. नरसिंहरावांनी तिचे प्रकाशन केले...मनसोक्त कौतूक केले. अमेरिकेत अनेक समिक्षकांनी त्यावर भरभरुन लिहिले. या कादंबरीचा नंतर विजय तरवडेंनी मराठी अनुवाद केला. मुळ मराठीतुन इंग्रजीत आणि इंग्रजीतुन मराठीत अनुवाद असा प्रवास या निमित्ताने पुर्ण झाला.

यानंतर मात्र मी स्वत:च संकटात सापडलो. जेलमद्धेही गेलो. माझे प्रचंड वाटोळे झाले. कर्जांच्या असह्य खाईत कोसळलो. पण मी जेलमद्ध्ये असतांना मागे पडलेले "नीतीशास्त्र" हे पुस्तक आधुनिक विज्ञानाला वेठीस धरत आधीच्या नीतिविदांच्या भुमिका नाकारत नव्या संकल्पना मांडत पुरे केले. बाहेर आल्यावर विश्वनिर्मितीचा नवा सिद्धांत :"अवकाश ताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती" या पुस्तकात सिद्ध केला. माझे नीति आणि विश्वनिर्मिती यातील सिद्धांत कोनाला मान्य नसले तरी मी एकमेव भारतीय आहे ज्याने प्रस्थापित आधुनिक विज्ञानांना आव्हान देत स्वतंत्र सिद्धांत मांडले व तेही मराठीत. नंतर अर्थात ते इंग्रजीतही अनुवादित झाले. डा. सम्नर डेव्हीस, र्यंडाल रोससारख्या संशोधकांनी दाद दिली... याचा मला व्यक्तीगत अभिमान आहे. 

यानंतर मी "शून्य महाभारत" ही वेगळी तत्वज्ञानात्मक कादंबरी लिहिली. कृष्ण भारतयुद्धासमयी जर दुर्योधनच्या बाजुला गेला असता तर द्रौपदी ते भिष्म यांच्या प्रतिक्रिया काय असत्या, युद्ध झाले असते का अणि बदललेल्या परिस्थितीत गीता कशी असती हा या कादंबरीचा गाभा. अवघी ९८ पानांची ही कादंबरी..खरे म्हणजे कादंबरिकाच...आता तिचा हिंदी अनुवादही झाला आहे.

मी लेखक म्हणून जाणीवपुर्वक असा कोणताही फोर्म वापरला नाही. माझ्या कथेच्या किंवा विषयाच्या अनुषंगाने जो फोर्म आपसुक योग्य वाटला तो मी मी वापरला. कल्की, शून्य महाभारत, क्लिओपात्रा, यशोवर्मन या कादंब-यात त्यामुळे आपसूक वेगळे प्रयोग झाले. खरे तर कादंब-या व नाटकांत यामुळे सर्वत्रच वेगवेगळे फोर्म वापरले गेले. ते जाणीवपुर्वक झाले नसल्याने त्याबद्दल मी अधिक लिहू शकत नाही. मी जवळपास अर्धे जग मनमुक्त फिरलो असल्याने माझ्या कादंब-यांतील लोकेशन्स कधी कृत्रीमही झाली नाहीत. इंटरनेट आले तेंव्हापासून त्याचा वापर केल्याने जगभर मित्र झाले, त्यामुळे कोनताही देश, तेथील मानसिकता, सांस्कृतिक आंतरबंध याचे मला फर्स्ट ह्यंड ज्ञान मिळत राहिले...त्यामुळे लेखनात जीवंतपणाही आला.

पण इंग्रजी अनुवादांना/लेखनाला जो प्रतिसाद बाहेरुन तर मिळालाच, पण हिंदू, इंडिया टुडे, टाइम्स सारख्या देशी इंग्रजी माध्यमांनीही जी स्वत:हुन दखल घेतली त्यामुळे खरे सांगायचे तर मराठी प्रतिक्रियांच्या अभावाचे मला कधी वाईटही वाटले नाही. अपेक्षाही केली नाही. हा लेखही मी सारडा सरांच्याच आग्रहाने लिहित आहे, एरवी मला माझ्याबद्दल काही बोलायला-लिहायलाही आवडत नाही. पण मराठी जग असे का आहे हे मला आजही समजत नाही. पण त्याचे कारण जातीयवादात असावे असे वाटण्याचा एक अनुभव...मी तीन-चार वर्षांपुर्वी "महार कोण होते?" हे संशोधनात्मक तर "असुरवेद" आणि "...आणि पानिपत" या कादंब-या लिहिल्या. या कादंब-यांचे नायक तत्कालीन महार असल्याने माझ्या साहित्यावर डाक्टरेट करतो असे म्हनणारे २-३ प्राध्यापक पुढे आले. नंतर मी महार नाही हे समजल्यावर त्यांचे प्रस्ताव बारगळले. म्हणजे आपल्याकडे साहित्यिकही अक्षरश: "जातीचा" लागतो असे नाही काय? मी महार आहे, धनगर आहे कि अजुन अन्य कोणी जातीचा आहे याचा आणि माझ्या लेखनाचा काय संबंध? असा दळभद्रीपणा करत आम्ही किती नवप्रतिभा वाया घालवणार आहोत याची खंत कोणाला आहे काय? मला काही फरक पडत नाही...मी लिहायला आवडते म्हणून लिहितो...हे खरे असले तरी इतर लेखकांवर अशा वातावरणांचा काय परिणाम होत असेल याचा गांभिर्याने विचार करायला हवा. असो. असे विचार करायची पद्धत मराठीत नाही याचे अनुभव मी सामाजिक चळवळींतही घेत असल्याने ही अपेक्षा फोलच ठरल्यास नवल नाही.

* * *
मला लहानपणापासून मित्रच कमी. कमी म्हणजे किती? फक्त दोन. त्यातील एक प्रशांत पोखरकर अपघाती मृत्युने माझ्या जीवनातून उणे झाला. दुसरा दीपक शिंदे पुढे माझा खिसा उणे करुन लंपास झाला. मला मित्र नाहीत. एकटेपणाने मला अधिक समृद्ध केले. मी समाजाचा झालो. सामाजिक प्रश्नांत हिरीरीने झोकुन दिले. असे असले तरी माझा एकांत मात्र कधी भंगला नाही...सर्वांत असुनही मी नसल्यासारखाच राहिलो. माझ्या कादंब-या-नाटके-कवितांत याचे प्रतिबिंब आहे. त्याच बरोबर साहस, नवोन्मेश आणि धडाडी हे माझे मुलभूत गुणही माझ्या पात्रांतुन व्यक्त होत असतात. मला भव्यतेचा- दिव्यतेचा प्रचंड सोस आहे. प्रत्येक माणसाच्या आत दडलेल्या माणुसपणाचे, त्याच्या प्रसंगोपात्त होणा-या पडझडींचे आणि त्यातुनही ताठ उभे राहण्याच्या उर्म्यांचे मला अनिवार आकर्षण आहे. "ओडिसी" कादंबरीत मी हेच व्यक्त केले आहे. खरे तर हे मी नुसते लिहिलेले नाही...जगलेलो आहे. माझ्या जगण्याची जेवढी योग्यता आहे तेवढीच माझ्या लेखनाची योग्यता आहे. त्यापलीकडे मी माझ्या लेखनाचे परिशिलन करण्यात अर्थ नाही कारण मग ते माझेच परिशीलन असेल!

* * *

मी थोडा नाटककारही आहे. "मीच मांडीन खेळ माझा" या नाटकाचे काही प्रयोगही झाले. मी एकुण नऊ नाटके लिहिली. "रात्र अशी अंधारी" या नाटकाचे इंग्रजीत "हार्ट ओफ द म्यटर" रुपांतर झाले, त्याचेही काही प्रयोग झाले. मी नाटकांच्या प्रयोगांत रमलो नाही कारण हा समुहाचा खेळ आणि मी मुळात समुहातील माणूस नाही. त्यामुळे केवळ लिहिने पसंत केले. मुलांसाठी तर मी भरपूर लेखन केले. एक तर कल्पनाविश्वात आजही माझा रमण्याचा शोध. अद्भुत-साहसाची आवड...मग काय? ब-याच किशोर कादंब-या लिहिल्या...प्रसिद्ध झाल्या.

२००७ नंतर मी अपघातानेच सामाजिक जीवनात आलो. माझ्या "हिंदू धर्माचे शैव रहस्य" या पुस्तकाने भारतीय धर्मेतिहासावर नवा प्रकाश टाकला. लोकांनाही त्याचे आकर्षण वाटले. त्या निमित्ताने व्याख्याने सुरु झाली. समाजाच्या अधिक जवळ जाऊ लागलो. समाज वस्तव पाहून हादरलो. समाजातील अज्ञान एवढे असेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. या अज्ञानापोटी शासनही त्यांची कशी लुबाडणुक करत आहे ते लक्षात आले. सांस्कृतिक वर्चस्वतावादासाठी वैदिक धर्मीय समाजाची कशी मानसिक खच्चीकरणे करण्यासाठी सज्ज आहेत हे अनुभवले. त्यात संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या ब्राह्मणविरोधी आतताई भुमिकेतुन सामान्यांचाही इतिहास पुसण्याचे प्रयत्न होताहेत हे लक्षात आले. माझ्या लेखनाचे संदर्भ बदलले. थोरामोठ्यांच्या इतिहासाकडून मी जनसामान्यांच्या इतिहासाकडे वळालो. "...आणि पानिपत" "असूरवेद" हे त्याचे कादंबरीमय उद्गार तर "जातिसंस्थेचा इतिहास", "महार कोण होते?"  ही संशोधनात्मक पुस्तके तर शेकडो लेख विविध वृत्तपत्रे, मासिके (आणि ब्लोगही) यावर प्रसिद्ध...धमासान चर्चा हे त्यातून उद्भवलेले फलित. गेल्या तीन दिवाळ्या माझ्या तर शिव्यांच्याच फराळात गेलेल्या./..किस्त्रीममधील लेखांमुळे. असो.  

येथेच मी थांबलो नाही. मी आंदोलने केली, भाग घेतला, उपोषणे केली...सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट भुमिका घेत अनेक प्रस्थापित माझे कायमचे शत्रु बनवले...साहित्य लिहिता लिहिता मी पुन्हा वेगळ्या भुमिकेतुन साहित्य जगु लागलो.

प्रकाशक म्हनूनही बरेच प्रयोग केले. टीव्हीवर आणि होर्डिंग्जवर पुस्तकांच्या जाहिराती करणारा मी पहिला आणि बहुदा अखेरचा प्रकाशक. मी चित्रपटही निर्माण केले, भुमिका केल्या, संगीत दिले...उषा मंगेशकर, नितिन मुकेश वगरे माझ्या संगीतावर गायले. मीही गायलो.

उद्योजक म्हणून मी काय साध्य केले आणि काय गमावले ते येथे सांगायची जागा नाही. मी लेखक म्हणून काय केले आणि तो प्रवास कसा झाला एवढेच या लेखाचे प्रयोजन. मी जीवनाला मुक्तपणे सामोरा गेलो. मी आयुष्य मनसोक्त जगत राहिलो. मनापासून लिहित राहिलो. अनंत अनुभव या छोट्या आयुष्यात घेतले. मग माझे लेखन कोणत्या प्रकारात मोडते, त्यावर समिक्षा व्हावी काय, समिक्षकांच्या कच्छपी लागावे काय हे प्रश्न मला कधी पडले नाहीत. पुरस्कारांना तर पुस्तके न पाठवण्याचा माझा निर्णय १९९१ सालचा. त्यात बदल व्हावा असे साहित्य क्षेत्राचे वातावरण मला कधी दिसले नाही. गेल्या वर्षी तर पडणार हे माहित असुनही चक्क
साहित्य संमेलनाध्यक्षांची निवडणुकही लढवली. फ्यंटास्टिक अनुभव आले. माझी भुमिका लोकांपर्यंत पोहोचवता आली...जे एरवी शक्य झाले नसते हे त्याचे मोलाचे फलित.

मी कोणत्याही साहित्य प्रवाहाशी संबंधीत नाही...त्यामुळे कंपुंचा प्रश्नच येत नाही. माझ्या साहित्याची यत्ता काय, मराठीत त्यांचे स्थान काय? असले प्रश्न मला पडत नाहीत आणि त्यासाठी माझ्याकडे वेळही नाही. स्वत:हुन ओळख-पाळखही नसता माझी दखल घेणारे राजा दिक्षीत, विजय काचरे, शंकर सारडा हे संचित आहेच. त्यांनी दखल घेतली म्हणून त्यांनी अजून आपल्यावर लिहावे अशी मी अपेक्षाही केली नाही.

मी का लिहितो मग?

उत्तर खूप साधे आहे...

मला लिहायला आवडते आणि लिहिण्यासारखे खूप काही मला सतत सुचत असते म्हणून!

-संजय सोनवणी

("मेहता ग्रंथ जगत" च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख.)

Monday, October 6, 2014

मराठा सेवा संघ...आणि मी!

मराठा सेवा संघ. मला ही संघटना अस्तित्वात आहे हे भांडारकर प्रकरणामुळे समजले. खरे तर माझा चळवळीतील कोणत्याही संघटनेशी कधी संबंध आला नसल्याने त्यात विशेष नवलही वाटण्याचे कारण नाही. मी तसा उद्योग-व्यवसाय जगतातील माणूस. मी कादंब-या भरपूर लिहिल्या असल्या तरी त्यांचे विषय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय. त्यातील तिढे आणि त्यातून माणसाचा शोध. जाती-पाती, त्यावरील सामाजिक कलह याशी माझा संबंध न आल्याने किंवा त्यामुळेच त्यांचा विशेष अनुभव नसल्याने  माझ्या लेखनात त्याचे प्रतिबिंब न पडणेही स्वाभाविक होते. माझे नायक-नायिका (नंतर विचार केल्यावर लक्षात आले) समाजातील जवळपास बहुतेक जातींतील आहेत. ते मी जाणुन बुजून केले असे मुळीच नाही. असे असले तरी मी रा. स्व. संघाचा मात्र पुर्वीपासून विरोधक राहिलो आहे हेही खरे. त्याची सुरुवात १९८५ सालीच झाली होती. मी तेंव्हा एकविस वर्षांचा होतो आणि नुकताच पुण्यात रहायला आलेलो होतो. स्टोनीब्रुक विद्यापीठासाठी मी "An Ancient Aryans Thought on Religion" हा प्रबंध लिहिला होता. त्याच वर्षी तो एका दिवाळी अंकात मराठीतही प्रसिद्ध झाला. मला सर्वप्रथम, जवळपास पाठलाग कर भेटायला आले ते संघाचे दोन वयस्क गृहस्थ. माझे लेखन आवडून इतक्या चकरा मारत शेवटी भेटलेले ते गृहस्थ पाहून मला आनंद होणे स्वाभाविक होते. संघाची मला विशेष माहिती नसली तरी ती एक कडवी हिंदुत्ववादी विचारधारा आहे हे नक्कीच माहित होते. त्यांनी मला सर्वप्रथम जे पुस्तक भेट दिले ते गोळवलकर गुरुजींचे "विचारधन".

विचारधनाने मी अर्थातच अस्वस्थ झालो. संतापही आला. त्याचे पडसाद माझ्या अनेक कादंब-यांतही पडले. कल्की, सव्यसाचीवर हिंदुत्ववाद्यांनी हल्लेही चढवले. पण ठीक आहे. मला त्याची फारशी पर्वा करण्याचे कारण नव्हते. केलीही नाही. तरीही माझे अन्य सामाजिक चळवळींशी कधी संबंध आले नाही किंवा चळवळीतील कोणी मला भेटलेही नाही. २००१ साली मी भारतीय संस्कृती कोशाचे सर्व खंड घेतले. सारे वाचून काढले. आणि सांस्कृतिक खोटेपणाबद्दल एक चीड निर्माण झाली. मग मी पुरातन संस्कृतीशी संबंधीत इतरही मराठी-इंग्रजी पुस्तके जमतील तशी वाचून काढली. खोटेपणाचा, वैदिक आणि आर्य महत्तेचा एवढा मोठा पर्वत खोट्याच्या आधारावर रचला गेलेला पाहून मी अस्वस्थ नव्हे तर संतप्त झालो.

मी मुळचा कादंबरीकार. त्या पहिल्या प्रबंधानंतर मी कधीही वैचारिक लेखनाला हात घातलेला नव्हता. पण या प्रकाराने उद्वेगून मी "हिंदू धर्माचे शैव रहस्य!" हे पुस्तक लिहिले. सिंधू काळापासून भारतात अव्याहत वाहत राहिलेली धर्म धारा म्हनजे शैव प्रधान आहे याचे विपूल पुरावे उपलब्ध असतांनाही त्यावर वैदिक कलमे चढवत वैदिक माहात्म्याची कशी सोय लावली गेली आहे याबाबत मी या विचारकांचे त्यात वाभाडे काढले. हे सारे सांगायचे कारण म्हणजे चळवळीशी आणि विशेषत: मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संस्था यांच्याशी माझा कसा संबंध आला हे आहे.

"हिंदू धर्माचे शैव रहस्य!" जसे वैदिकवाद्यांना आवडले नाही तसेच ते चळवळीतल्या लोकांच्याही पसंतीस आले नाही. त्याची कारणे चर्चायचे येथे प्रयोजनही नाही. पण हे पुस्तक येवून गेल्यावर काही काळाने माझ्या वाचनात ह. मो. मराठे यांचे "ब्राह्मणांना अजून किती झोडपणार?" हे पुस्तकही वाचण्यात आले. ज्या पद्धतीने ह.मों.नी हे पुस्तक लिहिले होते ती पद्धत कांगावेखोराची अधिक होती,. या पुस्तकाला प्रत्युत्तर म्हणून "ब्राह्मण का झोडपले जातात?" ही पुस्तिका लिहिली. या पुस्तिकेमुळे मला माझी प्रकाशन संस्था बंद करावी लागली. (बहुतेक विक्रेते ब्राह्मण असल्याने.) आर्थिक नुकसानही सोसावे लागले. पण याच पुस्तिकेमुळे व विशेषत: गणेश हलकारे यांच्यामुळे सर्वप्रथम माझी भेट पुरुषोत्तम खेडेकर आणि प्रवीण गायकवाड यांच्याशी झाली. या भेटीत मला खेडेकरांनी त्यांच्या तसेच इतरांच्याही पुस्तिका वाचायला दिल्या. ही झाली माझी एखाद्या चळवळीतील संघटनेशी ओळख कशी झाली याची कथा.

पुस्तिका वाचून माझे मत जसे संघाबद्दल बनले होते तसेच मराठा सेवा संघाबद्दल बनले. पुराव्यांची मोडतोड आणि प्रत्येक अवनतीला ब्राह्मणांना दोषी ठरवत जाणे हेही मला पटण्यासारखे नव्हते. विशेषत: त्यांतील भाषा ही शिवराळ होती. तरीही या पुस्तिका मी ज्येष्ठ समिक्षक शंकर सारडा यांनाही दिल्या आणि समाजात असेही प्रवाह आहेत त्याची नोंद समिक्षकांनी घ्यायला पाहिजे असे सुचवले. अर्थात सारडांनी त्यावर एक ओळही लिहिली नाही हे वेगळे.

दरम्यान दादोजी कोंडदेव पुतळ्याचा वाद चालू झाला. फेसबुकवर तर हंगामा सुरू होता. एकीकडे दादोजी हे महाराजांचे कसे गुरू होते यावर हिरीरीने लिहिणारा एक वर्ग तर दादोजींचा उद्धार करत ब्राह्मणांना लाखोल्या वाहणारा ब्रिगेडी व बामसेफी वर्ग एकीकडे. मी या वादात आपसूक ओढला गेलो. दादोजी शिवरायांचे गुरू किंवा शहाजी महाराजांचे नोकरही असू शकत नाहीत कारण ते आदिलशहाचे कोंडाणा किल्ल्याचे सुभेदार होते, त्यामुळे ते एखाद्या जहागिरदाराचे चाकर असू शकत नाहीत हे मी पुराव्यानिशी सिद्ध केले, त्यावर ब्लोग लिहिला. तोवर हा वाद विकोपाला गेला होता आणि ब्रिगेडची बाजू तात्विकदृष्ट्या बरोबर असली तरी त्यांचे पुरावे लंगडे पडत होते. पण पुण्यनगरी दैनिकाने अचानक मला फोन करून विचारले कि दादोजींवरचा तुमचा ब्लोगवरील लेख प्रसिद्ध केला तर चालेल काय? मी नाही म्हनण्याचा प्रश्नच नव्हता. लेख प्रसिद्ध झाला. आणि त्यानंतर काही दिवसांतच दादोजींचा पुतळा हटवलाही गेला. यावर प्रतिक्रिया देतांना मीम्हणालो होतो, "सत्याचा विजय झाला पण यामुळे उन्माद केला जावू नये." ही प्रतिक्रिया पुण्यनगरी व दै. प्रभातमद्ध्ये प्रसिद्ध झाली होती.

पण तसे व्हायचे नव्हते. उत्साहाच्या भरात ब्रिगेडने लगेच दोन उपक्रम हाती घेतले व ते म्हणजे नाटककार गडकरींचा संभाजी उद्यानातील पुतळा व रायगडावरील वाघ्याचा पुतळा छ. शिवाजी महाराजांची बदनामी केली व होतेय यामुळे काढून टाकायची घोषणा. यात मी विरोधी बाजुला आपसूक गेलो. वाघ्याचा पुतळा हा पुर्वापार होता, जर्मन प्रवाशांनीही त्याची नोंद घेतली आहे, आधी तो दगडी होता...नंतरचा मात्र पंचधातुचा आहे आणि शिवाजी महाराजांचे स्मारक करनारे त्यांचाच अवमान करण्यासाठी वाघ्याचा पुतळा बसवणार नाहीत असा माझा युक्तिवाद होता. याच दरम्यान प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरी नरके आणि मराठा सेवा संघ व बामसेफमद्ध्ये वैचारिक मतभेद झाले. त्याचे परिणती प्रा. नरकेंवर अत्यंत अश्लाघ्य भाषेत हल्ले सुरु करण्यात झाली. मीही अर्थातच वाचलो नाही. अशा वेळीस चळवळीतील कोणीही माझ्या अथवा नरकेंच्या मागे उभे राहिले नाही. मी बामसेफवर व ब्रिगेडवर त्याबाबत जाहीर टीका सुरु केली. वाघ्याचे प्रकरण पेटत होतेच. यातून एक झाले व ते म्हणजे गडकरींच्या पुतळ्याला हात लावायचा विचार मात्र त्यांनी सोडून दिला. याला माझे फेसबुकवरील व ब्लोगवरील सातत्याने होत असलेले लेखन होते असे ब्रिगेडचेच लोक म्हणतात. असो.

वाघ्याचा वाद मात्र थांबायला तयार नव्हता. कितीही पुरावे दिले तरी ते मान्य करण्याच्या स्थितीत ते नव्हते. शिवराज्याभिषेक सोहोळा जवळ आला कि पुतळा हटाव मोहिमेला जोर यायचा. बहुदा जुलै १२ मद्ध्ये तो काढला गेला. मला वाहिन्यांचे-वृत्तपत्रांचे फोन आले. आता काय करणार? मी म्हणालो, मी एकटा आहे, माझ्या पाठी ना संघटना ना कोणी...मी सपत्नीक उपोषणाला बसणार. दुस-या दिवशी माझे सकाळी उपोषण सुरू झाले, दुपारपर्यंत बातमी आली, वाघ्या पुन्हा स्थापित झाला होता. मी उपोषण सोडले. (वाघ्याची पुनर्स्थापना माझ्या उपोषणाने झाली असा माझा भ्रम नाही.)

यानंतर "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" हे पुरुषोत्तम खेडेकर यांचे पुस्तक वाचन्यात आले. त्यातील ब्राह्मणांबद्दलचे किती जहर त्यांच्या मनात बसले आहे याची प्रचिती आली. त्यात ब्राह्मण स्त्रीयांबद्दल जे लिहिले आहे ते कोणीही सुसंस्कृत माणूस वाचुही शकणार नाही. त्यातच ब्राह्मण पुरुषांच्या कत्तलींचे जाहीर आवाहन केले होते. तत्पुर्वी मी अशी विघातक आवाहने (भाषा किंचित सभ्य असली तरी) सावरकरांच्या पुस्तकांत मुस्लिम स्त्रीयांबद्दल वाचले होते. असो. आम्ही पाच मित्रांनी ही बाब पुणे पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी ते वाचून तडकाफडकी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. आम्ही गुन्हा दाखल केला. आता तो न्यायालयात प्रलंबित आहे.

* * *

असा माझा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि बामसेफशी आला. यातून त्यांची विचारधारा लक्षात यायला मदत होईल. वाघ्या प्रकरणानंतर म. से. संघ आणि ब्रिगेडचे आक्रमक धोरण कमी होऊन ते मराठा आरक्षनाच्या आंदोलनांकडे वळाले. औरंगाबादच्या एका कार्यक्रमात "बहुजनांनी ब्रह्मणांना शिव्या देत बसण्यापेक्षा स्वत:ची प्रगती साधावी" अशा अर्थाचे उद्गार काढले, ते मी वृत्तपत्रात वाचले. स्त्रीयांबद्दलची त्यांची मते बदलली असावीत अशा अर्थाचीही काही विधाने प्रसिद्ध झाली आहेत. विशेष म्हनजे ७-८ महिन्यांपुर्वी डेक्कन कोलेजच्या एका विदुषीने पेशव्यांवर एक पुस्तक प्रकाशित केले त्याच्या दुस-याच दिवशी खेडेकरांचा मला फोन आला होता व पेशव्यांवर तुम्ही लिहा अशी सुचनाही केली होती. तेंव्हा मी ब्रिगेडकडे एवढे इतिहासकार असतांना मला का विचारले, असा प्रश्न केला असता, "आमच्या इतिहासकारांची विश्वासार्हता राहिलेली नाही." असेही प्रांजळ विधान केले होते. मी तर लिहिण्याची शक्यता नव्हती. पण तटस्थपणे ज्याचे माप त्याच्या पदरी घालू शकतो असा "पानिपत असे घडले" चा लेखक संजय क्षिरसागर याला ते काम सांगितले. हे झाले उत्तरायण. एवढेच.

* * *

यातून माझ्या लक्षात आलेल्या बाबी अशा आहेत कि रा. स्व. संघ आणि म. से. संघ यांच्या मुलभूत तत्वज्ञानात काही फरक नव्हता. (नव्हता हा शब्द अशासाठी वापरतो आहे कि जर समजा म. से. संघ आपल्या तत्वज्ञानाची पुनर्रचना करत असेल तर ते स्वागतार्ह आहे.) रा. स्व. संघाने नेहमीच मुस्लिम द्वेषाचा हौवा उभा करत, खोटीनाटी इतिहासाची प्रकरणे उकरत त्या भितीने तरी हिंदू संघटित होतील असा वारंवार स्थापनेपासून प्रयत्न केला. त्यांचे आदर्श हिटलर आणि खेडेकरांच्या पुस्तकातील हिटलरचे उल्लेख काही वेगळे दर्शवत नाहीत. म्हणजे आयडोलोजी एकच. द्वेष आणि त्यातून स्वसंघटन.

या संघटनेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मुळात संघटना उभी करणे आणि इतकी वर्ष ती चालवणे हे सोपे काम नाही. या संघटनेने आधी ही संघटना ब्राह्मणेतर सर्व बहुजनांची आहे असा देखावा निर्माण करण्यात यश मिळवल्याने अनेक मराठेतर तरुणही हिरीरीने या संघटनेत सामील होत क्यडर क्यंपही अटॆंड करत होते. प्रत्यक्षात ही मराठाकेंद्रीत संघटना आहे व होती. रा. स्व. संघात जरी बहुजन असले तरी खरे वर्चस्व वैदिकांचेच असते तशातलाच हा प्रकार. बरे त्यात काही वावगे नाही. पण असा बुरखा पांघरण्याची गरज नव्हती. मराठा समाजालाही प्रबोधनाची आत्यंतिक आवश्यकता आहे हे कोणी नाकारणार नाही. जेवढा वर्चस्वतावादाचा भाव वैदिकांत असतो तेवढाच, कधी जास्तच मराठा समाजात आढळतो हे वास्तव आहे. विवाहांतील वारेमाप खर्च एकीकडे तर शेतीच्या तुकडीकरणामुळे व राजकारणाच्या कच्छपी लागल्याने मराठा तरुणांची होत चाललेली आर्थिक अवनती दुसरीकडे. इतिहासाचे व त्यातील ख-या-खोट्या गौरवगाथांची मस्ती एकीकडे तर कमी शिक्षण आणि म्हणुनच नोक-यांचा अभाव एकीकडे. या स्थितीत सापडलेल्या, विशेषत: मराठवाड्यातील मराठा तरुणांना, योग्य दिशादिग्दर्शनाची गरज होती व आहे. प्रागतिक शेती, स्वयंरोजगार, इतिहास व वर्तमानाचे सम्यक भान व भविष्याच्या प्रगतीशील दिशा याबाबत जागरणाची गरज होती व आहे. त्याऐवजी अत्यंत सोपा मार्ग शोधला गेला तो म्हणजे आरक्षणाचा. ते कोर्टात टिकेल कि नाही हे त्यांनाही सांगता येनार नाही. शेवटी मराठा तरुणांना सांस्कृतिक जरी नाही तरी ऐहिक आधार कसा दिला जाईल हा एक प्रश्नच आहे.

* * *

मराठा सेवा संघाने मराठा तरुणांना अंधश्रद्धांपासून दूर केले काय या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे. म. से. संघाच्याच एका लाडक्या लेखकाने आपल्या मुलाच्या लग्नात लग्न लावायला ब्राह्मणाला बोलावले होते. या लग्नाचे निमंत्रण त्याने म. से. संघ/ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला लाजेपोटी दिले नाही. एका दृष्टीने गुपचूप विवाह उरकला हे मी स्वत: पाहिले आहे. रा. स्व. संघाला मराठा सेवा संघाचे आव्हान आहे कि पाठबळ आहे हे शोधण्यासाठी माझाच एक अनुभव येथे देतो.

पुण्यात लोहगांवजवळ शिवाजी महाराजांचे मंदिर करण्याची घोषणा रा. स्व. संघाशी निगडित असलेल्या फ्रंकोइस गोतिये नामक फ्रेंच (आता भारतीय व कडवा हिंदूत्ववादी) गृहस्थाने केली. मी याबाबत प्रथम लोकमतमद्ध्ये विरोध करणारा लेख लिहिला. मला चक्क ब्रिगेडच्याच असंख्य कार्यकर्त्यांचे अभिनंदनाचे फोन आले. काही काळाने गोतिये यांनी डी. एन. ऎ. या वृत्तपत्रात माझ्यावर झोड उठवणारा लेख लिहिला. मी त्यालाही सविस्तर उत्तर दिले व महाराजांचे दैवतीकरण करणे, त्यांचे मंदिर करणे अयोग्य असल्याचे प्रतिपादन केले. गोतिये व माझे लेख पुन्हा लोकमतमद्धेही प्रसिद्ध झाले. या वेळीस मात्र मला एकही फोन आला नाही. यथावकाश मंदिराचे व वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन पं. रविशंकर यांच्या हस्ते यज्ञ करुन झाले.

या कार्यक्रमाच्या प्रमूख पाव्हण्या होत्या सौ. सुनेत्रा पवार. अजितदादा काही कारणांमुळे येवू शकले नाहीत. अर्थातच म.से.संघ अथवा ब्रिगेडने या प्रकाराचा साधा निषेधही केला नाही. पुरुषोत्तम खेडेकरांचे काही नातेवाईक रा. स्व. संघाशी निकटचे संबंधी असल्याचे दावे केले गेले आहेत. ते खरे नसतीलच असे म्हनण्याची सोय नाही. (नगर जिल्ह्यात महाराजांचे मंदिर करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तो ब्रिगेडने मात्र उग्रपणे हानून पाडला होता असे वाचल्याचे मला स्मरते.)

त्यामुळे रा. स्व. संघ आणि मराठा सेवा संघ हे विरोधी आहेत कि विरोध दाखवत आतून हातमिळवणी करत आहेत हे सांगता येणे अशक्य आहे. इतिहासाच्या शुद्धीकरनासाठी रा. स्व. संघाची "इतिहास संकलन समिती" ज्याप्रमाने सांस्कृतिक आचरट पुस्तके प्रसिद्ध करत असते जवळपास तशीच् पुस्तके म. से. संघाच्या जिजाई प्रकाशनामार्फत प्रसिद्ध होत असतात. पण यांना वरकरणी साधर्म्ये म्हनता येतील. महत्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो कि म. से. संघाचे महाराष्ट्राला सांस्कृतिक योगदान काय?

* * *

म. से. संघाने ब्राह्मण द्वेषाची लाट आणली हे तर वास्तव आहे. प्रत्येक बाबीचे खापर ब्राह्मणांवर फोडणे, दुरवस्थांना जबाबदार धरणे हा प्रकार अतिरेक म्हणता येईल या पातळीवर गेल्याने सांस्कृतिक म्हणता येईल अशी चळवळ उभी राहिली नाही. द्वेषातून जनजागरण घडत नसते याचे भान त्यांना आले नाही. जरी फुले-शाहू-आंबेडकर अशे बहुजनांना प्रिय वाटतील अशा नांवांभोवती म. से. संघाची इमारत उभी करण्याचा प्रयत्न झाला असला तरी तो पुरता यशस्वी झाला नाही तो यामुळेच. एक मात्र खरे कि कट्टर मराठ्यांना म. से. संघाने बाबासाहेब वाचायला लावले. बामसेफशी (राजकीय हितसंबंधांसाठी का होईना) जी मोट बांधली त्यामुळे दलित-मराठ्यांतील दरी काही प्रमानात का होईना कमी झाली. तीच बाब मुस्लिमांची. म. से. संघ / ब्रिगेडने हिंदु-मुस्लिम तेढ कमी करण्याचा जाणीवपुर्वक प्रत्यत्न केला हे नाकारण्यात अर्थ नाही. पण यासाठी इतिहासाचे आधार वाकवले गेले, जिजाऊ महार होत्या असे शोधही लावले गेले. महार नागवंशी तसेच मराठेही नागवंशी म्हणून दोहोंचे मूळ एकच असेही सिद्धांत मांडले गेले. मुस्लिम-शिवाजी महाराज यांचे संबंध वास्तवदर्शी न राहता अतिरंजित बनवले गेले.

हिंदू धर्माचा आणि त्याच्या देवदेवतांचा द्वेष करणे हा बहुदा पुरोगामी म्हनवणा-या सामाजिक चळवळींचा प्राणच बनून गेला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. ब्रिगेड त्यात कधीही मागे राहिली नाही. ज्या देवतांना आपण शिव्या देत आहोत त्या वैदिक नव्हेत तर शुद्ध अवैदिक असून त्यावर वैदिकांनी केलेले अतिक्रमण हटवण्यापेक्षा ब्राह्मणांना नाकारायचे तर हिंदू देवतांनाही नाकारा असा अतिरेकीपणा घुसला. ब्राह्मणांना जेवढी शिवीगाळ तेवढीच देवतांनाही होणे मग स्वाभाविक होते. यातून भडक माथ्याचे तरुण अजून अतिरेकी जरी बनत गेले तरी सर्वसामान्य , अगदी मराठा वर्गही, हिंदू धर्मावरील एवढे हल्ले पचवू शकत नव्हता. त्यामुळे ही चळवळ मर्यादित होत गेली असल्यास नवल नाही. पण म. से. संघाला हिंदू धर्म नाकारायचा होता हेही खरे.

यातून मग एक पर्याय काढला गेला व तो म्हणजे नव्या धर्माची स्थापना. नवीन धर्माची स्थापना हे म. से. संघाचे फार मोठे धाडस आहे हे मान्य केलेच पाहिजे.  हिंदू धर्म नाकारण्यासाठी या धर्माची स्थापना झाली. या धर्माचे संहिता लिहिण्याचे कार्य डा. आ. ह. साळूंखे व अन्य विद्वानांवर सोपवले गेले. ती संहिता पुर्ण झाले कि नाही हे मला माहित नाही. पण शिवधर्म पद्धतीचे विवाह किमान फेसबुकवरुन अधे-मधे गाजत असल्याने या धर्माची कर्मकांडेही तयार झाली आहेत असे दिसते. हा शिवधर्म म्हणजे पुरातन शैव धर्म कि छ. शिवाजी महाराजांना केंद्रीभूत मानून स्थापन झालेला शिवधर्म हा मात्र गोंधळ इतरांच्या (माझ्याही) मनात आहे खरा!

काहीही असले तरी चळवळीने चक्क स्वतंत्र धर्म स्थापन करण्याची घटना भारतात कधी घडली नाही हे खरे. म. फुलेंनीही "सत्यशोधक" समाजाची स्थापना केली होती, धर्माची नव्हे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

पण यातील गंमतीचा भाग म्हणजे, आम्ही बौद्ध धर्माच्याच वाटेवर आहोत...शिवधर्म एक थांबा आहे असे सांगायला हे लोक कचरत नाहीत हे एक विशेष!
* * *

मग नेमकी म. से. संघाची भूमिका काय आहे? ती बहुजनवादी आहे कि मराठावादी आहे? ती मराठावादी आहे हे अनेक घटनांवरुन स्पष्टच दिसते. जिजाऊंना केवळ सावित्रीबाई फुलेंना मागे सारायचे म्हणून प्रमोट केले जात आहे असे आरोप चळवळीतून अधून-मधून होत असतात. शहाजी महाराज, छ. शिवाजी महाराजांच्या पुर्वी आणि संभाजी महाराजांनंतर जणू मराठ्यांना इतिहासच नव्हता कि काय असे वाटावे या पद्धतीने इतिहास-लेखन (?) कार्य चाललेले असते.

वामन मेश्रामांच्या बामसेफशी म. सेवा. संघाची युती तर कोड्यात टाकणारी आहे. ही संघटना म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे उत्तम उदाहरण आहे. खुद्द बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाची-विचारांची जेवढी पायमल्ली या संघटनेने केली आहे तेवढी बाबासाहेबांच्या कट्टर विरोधकांनीही केली नसेल. म. से. संघ आणि बामसेफमधील एक समान दुवा म्हणजे पराकोटीचा ब्राह्मण द्वेष. पण त्यात छुपी राजकीय गणितेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अगदी ताजे उदाहरण म्हणजे सोशल मिडियावरून ब्राह्मण विरुद्ध मराठा वाद निवडणुका समोर ठेवून एका प्रादेशिक पक्षातर्फे पेटवला जात असल्याचा आरोप एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने केल्याच्या बातम्या आल्या आहेत. आता मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजपा असला तर प्रादेशिक पक्ष राष्ट्रवादी कोंग्रेस असावा. राष्ट्रवादीची म. से. संघावर मेहरनजर आहे असे मानले जाते.

वरील बाबी पाहिल्या तर म. से. संघाची गोंधळयुक्त स्थिती लक्षात येईल. रा. स्व. संघाला तोंड देण्यासाठी खरे अवैदिक बहुजनवादी संघटना हवी काय तर त्याचे उत्तर निखालसपणे "होय" असेच आहे. रा. स्व. संघाने आक्टोपसप्रमाणे एवढा फास आवळत आनला आहे कि ते म्हणतील ती संस्कृती, ते म्हणतील ते धर्मकर्तव्य आणि ते सांगतील तसाच राष्ट्रवाद अशी परिस्थिती आलेली आहे. सिंधू संस्कृतीपासून अव्याहतपणे वाहत आलेली बहुजनीय अवैदिक विचारधारा आपलीच तत्वज्ञाने व धर्मचिन्हे अपहृत होऊ दिल्याने सांस्कृतिक अवनती आली. ती वैदिक पुटे कढत, अनिष्ट ते सोडत परत मिळवण्याऐवजी केवळ द्वेषाचा आधार घेत कर्तव्यशून्य शिवीबाज बनायच्या भानगडीत कोणतीही बहुजनीय संघटना रा. स्व. संघाला तोंड देवू शकण्याची शक्यता दिसत नाही. म. से. संघाला ही पोकळी भरून काढण्याचे चांगली संधी होती, पण तिने ती मुळातच चळवळीचे तत्वज्ञान राजकीय, सामाजिक कि स्वजातीय असावे यातच मुलभूत गोंधळ केल्याने गमावली आहे असेच म्हणावे लागेल.

रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश करतांना पुरुषोत्तम खेडेकरांचा होऊ शकणारा पुणे मनपाचा सर्वोच्च नागरी सन्मान लोकांच्या विरोधामुळे गमवावा लागावा यातच म. से. संघाच्या कार्याची सुफळ कहानी संपन्न होते. 

आपण परिवर्तनवादी आहोत. माणसे बदलतात. संघटनाही बदलू शकतात यावर विश्वास ठेवतो. वैचारिक गोंधळातून म. से. संघही वाट काढेल, निखळ द्वेषाचे धोरण न ठेवता अभ्यासपुर्वक वैदिकांचे सारे दावे खोडून काढत त्यांचा तथाकथित वर्चस्वतावाद हटवायला चांगला हातभार लावेल आणि समाजाला, अगदी मराठ्यांनाही, समतेच्या पातळीवर आणायचा भविष्यात अविरत प्रयत्न करेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

(My article in Media Watch Diwali issue)

Saturday, October 4, 2014

आर्यवंशाची मोहिनी


आर्यवंशाची मोहिनी

Oct 5, 2014, 12.43AM IST(MAHARASHTRA TIMES)

aarya
संजय सोनवणी

आर्य नेमके कोण? हा प्रश्न अजून चर्चेचा विषय आहे. मात्र आर्यांना भारतीय ठरवत, दिल्ली युनिव्हर्सिटीच्या संस्कृत विभागाने आता हा प्रश्न निकालात काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या निमित्ताने आर्यसिद्धांताचा घेतलेला मागोवा.

एकोणिसाव्या शतकात जर्मन पंडीत म्यॅक्समुल्लर याने संस्कृत व युरोपिय भाषेतील काही साम्ये पाहून आर्यभाषा बोलणारा आर्यवंश हा सिद्धांत मांडला. भारतातील दरिद्री आणि अज्ञानी लोक एवढ्या सुंदर भाषेचे निर्माते असूच शकत नाहीत, या वांशिक अहंकारातून त्याने या भाषेची निर्मिती मूळ युरेशियात झाली असून तेथून या भाषा बोलणारे लोक गटागटाने जगभर (भारतातही) विखुरले असावेत असे प्रतिपादन केले. यात जर्मन वंशश्रेष्ठत्वाचा अर्थातच मोठा भाग होता. या सिद्धांतातील वांशिक भाग म्यॅक्समुल्लरने नंतर क्षमा मागत मागे घेतला असला, तरी आर्य वंशवादाच्या विस्फोटाची परिणती जर्मनीत काय झाली, हे सर्वांना माहीत आहे. भारतातील वैदिकही पूर्वी या सिद्धांताने शेफारुन जात, आपली मुळं पार आर्क्टिक प्रदेशातही हिरिरीने शोधू लागले होते. तेंव्हा सिंधुसंस्कृती सापडलेली नव्हती. ती सापडल्यानंतर वैदिक विद्वानांचं अस्वस्थ होणं स्वाभाविक होतं. सिंधुसंस्कृती उध्वस्त करणारे आक्रमक वैदिक आर्य ते सिंधुसंस्कृतीचे निर्माते वैदिक आर्य अशा कोलांटउड्या कोणत्याही पुराव्याच्या अभावात ते हिरिरीने सांगू लागले. अलीकडे आर्य हे भारतातीलच व ते येथून संस्कृतीप्रसारासाठी जगभर गेले, असं सांगायची फॅशन आलेली आहे. श्रीकांत तलागेरी हे या गटाचे अध्वर्यू आहेत.

युरोपियन विद्वानांनी अलीकडे जरी वांशिक अर्थाने नाही, तरी युरो-भारतीय भाषागटाच्या नावाखाली या सिद्धांताची पाठराखण केलेली दिसते. या सिद्धांतानुसार युरो-भारतीय भाषा बोलणारे लोक पुरातन काळी दक्ष‌णि रशिया, मध्य आशिया किंवा काळ्या समुद्राच्या परिसरात राहत होते व तेथून ते इसपू २००० पासून स्थलांतर करत युरोप व दक्ष‌णि आशियात प्रवेशले. या सर्व युरो-भारतीय भाषांतील काही वरकरणी समान शब्द व व्याकरणाचे काही नियम हा मुख्यत: या सिद्धांताचा आधार. तर ऋग्वेदाचाच आधार घेत तलागेरी हे वैदिक आर्य हरियाणातून पश्चिमेकडे सरकत आधी इराण आणि पुढे युरोपात गेले, असं प्रत‌पिादन करत असतात. या दोन्ही सिद्धांतामागील राजकीय व सांस्कृत‌कि वर्चस्वतावादाच्या कारणांकडे वळण्याआधी मुळात या सिद्धांतात किती तथ्य आहे हे पाहिलं पाहिजे.

युरोपियन विद्वानांचा मुख्य भर आर्य हे दक्ष‌णि रशियातील असून अंड्रोनोवो संस्कृतीचे संस्थापक होते, असं मानण्यावर आहे. याची कारणं म्हणजे तेथे सापडलेली रथ व अश्वांची इसपू २००० मधील दफनं. ऋग्वेद, अवेस्ता व मितान्नी लोकांच्या पुरातन (इसपू १४००) लेखनात अश्व आणि आ-यांच्या रथांचे उल्लेख असल्याने अंड्रोनोवो संस्कृतीचे निर्माते आर्यच असले पाहिजेत, एवढाच या निष्कर्षामागील आधार. दुसरा कोणताही लिखित पुरावा नाही. मितान्नी व हट्टी लोकांमधील इसपू १४५० मद्ध्ये झालेल्या एका तहनाम्यात इंद्र, वरुण, मित्र, नासत्य या देवतांची नांवे 'इंदारा, उरुवनास्सिल, मिथरास्सिल आणि नाशतानिया' या रुपात अवतरतात, म्हणजे आर्य हे मेसोपोटेमियापर्यंत तोवर पसरुन तत्कालीन हुर्रीयन संस्कृतीत मिसळून गेले होते असाही दावा केला जातो. प्रत्यक्षात हुर्रीयन भाषा ही सेमेटिकही नाही की युरोभारतीय गटातीलही नाही. ती उर्गातिक भाषा आहे, असे भाषाविदच म्हणत असतात. ही नावं खरं पाहिलं तर प्राकृत भाषारुपांशी जुळतात, संस्कृत नव्हे, हे सहज लक्षात येईल. येथे हे लक्षात घेतलं पाहिजे की इंद्र-वरुण-मित्र ही दैवतं वैदिक अथवा झत्रुष्ट्रीय धर्म निर्माण होण्यापुर्वीपासून आशियायी प्रदेशात अस्तित्वात होती व तीही असूर म्हणून! शिव हा अस्सीरियन साम्राज्यात सिब म्हणून ओळखला जात होता. या भागातील विविध मानवी समूहांनी या देवतांची नावं कायम ठेवत त्यांना वेगवेगळी चरित्रं दिली. उदा. पर्शियनांनी वरुणाला देव मानलं, तर इंद्राला असूर. वैदिकांनी आधी दोघांना असूर मानलं, तर नंतर देव. नंतर कालौघात शिव वगळता त्या देवतांचं अस्तित्वही लोप पावलं. तत्कालीन जगात असूर संस्कृती प्रबळ होती, हे डॉ. मालती शेंडगे यांनी सप्रमाण दाखवून दिलं आहे.

अस्सीरियन भाषा ही सेमेटिक गटातील असून तिचा वैदिक-अवेस्तन भाषेशी संबंध नसतानाही केवळ भौगोलिक निकटतेमुळे या देवतांचा प्रसार झाला. त्यासाठी आर्य भाषागटांच्या विखुरण्याची गरज नाही. महत्वाचं असं की अंड्रोनोवो संस्कृतीतील ज्या चाकांच्या आ-यांच्या रथांचा व अश्वांच्या दफनाचा पुरावा दिला जातो आणि त्यांच्यामुळेच युद्धरथ व घोडे आशिया व युरोपात पसरले असं सांगितलं जातं, त्यांच्या मुळावरच घाव घालणारा पुरावा २००९ मद्धे चीनमधेच सामोरा आला आहे. तेथे लुयोंग प्रांतात आ-यांच्याच रथांची व अश्वांची तब्बल २० दफनं मिळाली असून तेथीत रथही आ-यांच्या चाकांचेच आहेत. च‌निी भाषा अथवा लोक कोणत्याही अंगाने युरो-भारतीय नाहीत वा तिकडे अंड्रोनोवो संस्कृतीचे लोक गेलेले नाहीत, हे येथे लक्षात घेतलं पाहिजे. 


म्हणजे अत्यंत दुर्बल भाषिक सिद्धांतावर संपूर्ण 'आर्य' अथवा 'आर्यभाषा' सिद्धांताची मांडणी करणं किती चुकीचं होतं, हे लक्षात येईल. खरंतर ऋग्वेद अथवा अवेस्त्यात आर्य हा शब्द वंशवाचकही येत नाही किंवा ते मूळचे अन्य ठिकाणचे लोक होते, असे पुसटसेही उल्लेख नाहीत. जे भाषिक साम्य आहे, ते फक्त अवेस्ता आणि ऋग्वेदिक भाषेत आहे व तेही सर्वस्वी नाही. दोन्ही धर्मातील देवता व कर्मकांडंही वरकरणी समान आहेत. अवेस्त्यात असूर (अहूर) हा आदरार्थी आहे, तर ऋग्वेदात त्याचा प्रवास आदरार्थाकडून अवमानार्थाकडे झाला आहे. अवेस्त्यात इंद्र हा दुय्यम देव (अवेस्तन भाषेत देव म्हणजे दुष्ट) आहे, तर वरुण हा पूजनीय १०१ असुरांपैकी (असूर म्हणजे श्रेष्ठ) एक आहे. वैदिकांनी मात्र या दुय्यम देवता-असुरांना आपल्या साहित्यात श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे.

पण ही साम्य आहेत ती आर्यांच्या स्थलांतरामुळे नाहीत, हे भारतीय वैदिक विद्वान मान्य करायला कचरतात. ऋग्वेदाचा बव्हंशी भाग हा अफगाणिस्तानातील हेल्मंड (मूळ नांव अवेस्तन हरहवती...संस्कृत सरस्वती) नदीच्या काठावर लिहिला गेला. अवेस्त्याचा भूगोलही दक्ष‌णि अफगाणिस्तान हाच आहे. अनेक अवेस्तन राजे, खुद्द झरत्रुष्ट्राचेही उल्लेख ऋग्वेदात आहेत. याचं कारण म्हणजे दोघांतील भौगोलिक निकटता.

पण राजस्थानातील घग्गर नदी म्हणजेच ऋग्वेदातील सरस्वती असा दावा करत भारतीय वैदिक विद्वान घग्गर नदीच्या काठावरील हजारावर सापडलेली सिंधू संस्कृतीची स्थानं म्हणजे वैदिक आर्यांचीच निर्मिती, असे दावे करत असतात. मायकेल ड्यनिनोसारखे हिंदुत्ववादी विद्वान या सिद्धांताला समर्थन देतात. परंतु घग्गर नदीच्या खो-यात जपानी व ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या भूशास्त्रीय संशोधनात घग्गर ही वैदिक सरस्वती असूच शकत नसल्याचे विपुल पुरावे समोर आलेले आहेत. घग्गर नदी ही गेल्या दहा हजार वर्षांपासून मान्सुनवर अवलंबून असलेली सामान्य नदी होती, हिमालयातून तिला कधीही जलपुरवठा होत नव्हता, हे आता सिद्ध झालेलं आहे. इतकंच नव्हे तर घग्गरला यमुना व सतलज नद्या मिळायच्या, पण त्या पन्नास हजार वर्षांपूर्वी...तदनंतर नव्हेत. त्यामुळे ऋग्वेदातील सामर्थ्यसंपन्न देवतेसारखी 'अंबितमे' मानली गेलेली, हिमालयापासून उगम पावलेली सरस्वती घग्गर नव्हे. शिवाय वैदिक विद्वान 'उपग्रहीय चित्रांमुळे हरवलेली सरस्वती सापडली...' असा दावा करत असतात. प्रत्यक्षात घग्गर कधीही हरवलेली नव्हती. ती आजही मान्सुनमध्ये वाहती नदी आहे...तिला १९८८ ते २०१३ पर्यंत आठ मोठे पूरही आल्याची नोंद आहे. मग जे हरवलंच नव्हतं ते कसं सापडेल? उलट अवेस्त्यातील हरहवतीची वर्णनं आणि ऋग्वेदातील सरस्वतीची वर्णनं एकसारखी आहेत, हा योगायोग नाही. वैदिक विद्वानांनी हिडेकू मेमेकू, गिसन, तोशिकी ओसाडा, पिटर क्लिफ्ट, संजीव गुप्ता यांसारख्या भूशास्त्रसंशोधकांनी केलेली घग्गरच्या पात्रावरील संशोधनं वाचायचे कष्ट घेतले पाहिजेत.

आर्यसिद्धांत मुळात जर्मन वंशश्रेष्ठत्वतावादातून निर्माण झाला. वैदिक विद्वानांनी आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी तो उचलला. अवेस्ता व वेदांचे निर्मातेही आर्य नव्हते. ऋग्वेद व वैदिक धर्म दक्ष‌णि अफगाणिस्तानातून उत्तर भारतात धर्मांतरांच्या प्रक्रियेतून पसरला याचे अगणित पुरावे उपलब्ध आहेत. त्यासाठी कोणताही आर्यभाषिक अथवा वांशिक गट समूहाने भारतात आला किंवा भारतातून बाहेर गेला असं मानणं, म्हणजे जागतिक सांस्कृतिक इतिहासाची हत्या आहे. उलट सेमेटिक संस्कृती पुरातन असल्याचे इसपू २६०० पासूनचे लिखित पुरावे आहेत. तसे आर्यसिद्धांताला बळ देऊ शकतील असे तुटपुंजेही पुरावे नाहीत. आहेत ते अंदाज आणि अंदाजांवर सांस्कृत‌कि इतिहास रचणे आणि इसपू ७००० (मेहेरगढ) पासून सुरू झालेल्या सिंधुसंस्कृतीवर निर्माते म्हणून दावा करणे, हा निखळ वेडेपणा आहे. भारतीय समाजाची फसवणूक आहे.

Thursday, October 2, 2014

सृष्टीजन्माचा महन्मंगल उत्सव

दसरा हा सृष्टीजन्माचा महन्मंगल उत्सव आहे.

आदिमाया नऊ दिवस (नऊ महिन्यांचे प्रतीक) सृष्टीचा गर्भ धारण करते आणि दहाव्या दिवशी सृष्टीला जन्म देते अशी ही वरकरणी साधी पण पुरातन मानवाच्या कल्पनेची मोहक झेप.

या सणाचा रावणवधाशी काहीही संबंध नाही. उलट हे मित्थक जोडुन सणाचा पवित्र-मंगल मुलार्थ मात्र घालवुन टाकला गेला आहे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. दस-याला रावणवध झाला असता आणि तोच या उत्सवाचा हेतू असता तर आधीच्या नवरात्रींचे प्रयोजनच रहात नाही हे सांस्कृतीक भेसळ करणा-यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. त्यामुळे रावण-दहन वगैरे अपप्रकार करणे सांस्कृतीक मुढतेचे लक्षण आहे.

सर्व जगात विश्वाचा जन्मोत्सव असलेला हा एकमात्र सण...सृजनाचे माहात्म्य ठसवण्याऐवजी त्या महन्मंगलतेला हिंसक घटनेची पाचर ठोकणारे सांस्कृतीक विकृत नक्कीच निषेधाला पात्र आहेत.

पुर्वी पावसाळा संपला कि लष्करी मोहिमा सुरु होत. पावसाळ्यात सहसा युद्धे केली नसत. शेतकरी हेच बव्हंशी सैनिकही असल्याने पानकळ्यात त्यांना शेतीकडे लक्ष देणे भाग होते. हंगाम संपला कि मोहिमांत सामील होण्याचे आदेश येत. सीमोल्लंघन हा त्याचाच एक प्रतिकात्मक भाग या सृष्टीजन्माच्या सोहोळ्याशीही नंतर जोडला गेला आहे.

माझ्या सर्व मित्रांना सृष्टीजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! आंणि खरे तर हा दिवस मातृदिनच आहे. स्त्री सामर्थ्याचे प्रतीक आहे. यच्चयावत विश्वातील सर्व मातांना विनम्र अभिवादन!

युरोपियनांचा वर्चस्ववाद, वैदिक धर्म आणि येथील वास्तव!

  प्राचीन  इराणमध्ये पारशी धर्माचे प्राबल्य वाढले. त्या धर्माने वैदिक धर्माचे आश्रयस्थान असलेल्या सरस्वती (हरह्वैती) नदीचे खोरेही व्यापल्य...