Wednesday, February 26, 2020

सावरकरांना "भारतरत्न" हा पुरस्कार खरेच मिळावा काय?




वीर सावरकरांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी गेला काही काळ वारंवार होत असते. आताच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुक जाहीरनाम्यात भाजपने तशी घोषणाही केली होती. सावरकरांना भारतरत्न दिले जावे असे वाटणारा वैदिकवादी गट जसा प्रबळ आहे तसेच त्यांना हा पुरस्कार मिळू नये असे वाटणारा गटही मोठा आहे. त्यामुळेच की काय गेली सहा वर्ष केंद्रात भाजपचे सरकार असुनही आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सावरकरांना गुरुस्थानी मानत असुनही अद्यापपावेतो सावरकरांना हा सन्मान जाहीर होऊ शकलेला नाही.

सावरकरांना हा पुरस्कार खरेच मिळावा काय असा प्रश्न जेंव्हा पडतो तेंव्हा अनेक विचार मनात येतात. एकीकडे पाहता सशस्त्र क्रांतीकारकांचा प्रेरणस्त्रोत असलेल्या आणि अंदमानात सेल्युलर जेलमध्ये तब्बल दहा वर्ष यमयातना सहन करणा-या या प्रखर देशभक्ताला सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करणे हीच त्यांच्याप्रती देशाने दाखवलेली कृतज्ञता असेल असेही म्हणता येईल. अंदमानपुर्व सावरकर हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे समर्थक होते हे त्यांच्याच "१८५७ चे स्वातंत्र्य समर" या त्या काळात क्रांतीकारकांचे प्रेरणास्थान असलेल्या ग्रंथावरुन लक्षात येते. अंदमानोत्तर काळातील सावरकरांनी केलेली समाजसेवा, जातीभेद निर्मुलनाचे प्रयत्न, "गाय हा उपयुक्त पशू आहे" यासारखे धाडसी विधान हे त्यांच्यातील सामाजिक क्रांतीकारकाचे दर्शन जसे घडवते तसेच त्यांचा त्या काळातील त्यांहा मर्यादित परिप्रेक्षातील का होईना, पण विज्ञानवाद सनातनी वैदिकांना हादरवत एका धर्मसुधारकाचे रुपही दर्शवतो. शिवाय कवी म्हणून ते महान होते यात कोणीही शंका घेऊ शकत नाही. "ने मजशी ने परत मातृभुमीला" जसे आजही देशप्रेमाने व्याकुळ करते तसेच "जयोस्तुते श्रीमहन्मंगले" हे चिरतरुण ओजस्वी गीत राष्ट्रमातेसमोर आपल्याला लीन करते. त्यांनी अंदमानात असतांना भिंतीवर लिहिलेले "कमला" महाकाव्य त्यांच्या असामान्य प्रतिभेचे दर्शन घडवते. या व्यतिरिक्तही त्यांचा अचाट पत्रव्यवहार आणि लेखनातून एक समग्रतेला हात घालू पाहणारे साहित्यिक-विचारवंतही आपल्या समोर उभे राहतात.

या अशा जमेच्या बाजू असुनही त्यांना भारतरत्न देऊ नये असे वाटते त्यालाही तेवढीच कारणे आहेत. सर्वत्र चर्चेत असलेले त्यांनी ब्रिटिशांना पाठवलेले माफीनामे आणि पेंशनवर करुन घेतलेली सुटका हे मला फारसे महत्वाचे वाटत नाही हे आवर्जुन नमूद करु इच्छितो. अनेकांत कारावास सहन करण्याचे धैर्य नसते किंवा बाहेर असलो तर अधिक कार्य करता येईल अशी आशा असते. त्यांनी आपली सुटका करुन घेतली याबद्दल त्यांना फार दोष देता येत नाही. पण अंदमानात त्याच वेळीस दोनेकशे स्वातंत्र्य सैनिक बंदी होते, तेही तेवढ्याच हाल अपेष्टा सोसत होते पण त्यांनी ब्रिटिशांची माफी मागण्याचा विचारही केला नाही हे कसे विसरता येईल? सावरकरांचे महत्व येथे कमी होते हेही लक्षात घ्यावे लागेल. अखंड हिंदू राष्ट्र हे त्यांचे स्वप्न होते हे खरे मानले तरी ते अस्तित्वात येण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते भारतीय स्वातंत्र्याच्याच विरोधात जाणारे होते हे येथे लक्षात घ्यावे लागेल.

उदाहणार्थ हिंदू संस्थानिकांचे स्वतंत्र अस्तित्व टिकून राहण्यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिले. सर्व हिंदू रजवाड्यांना भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय संघराज्यात सामील न होता आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवावे यासाठी पत्रे पाठवत राहिले. काश्मिर जरी मुस्लिम बहूल राज्य असले तरी तेथील महाराजा हिंदू असल्याने सावरकरांना त्यांच्याबद्दल ममत्व होते. काश्मिरने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे हे समजताच सावरकरांना अत्यंत आनंद झाला. १० जुलै १९४७ रोजी सावरकरांनी हरीसिंगांना लिहिले कि "नेपाळप्रमाणेच काश्मीरचे महत्व आहे म्हणुंन काश्मीरमद्धे केवळ हिंदुंचे सैन्य उभारून त्यांनी नेपाळची मदत घेत आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करावे. त्याने आपले स्वातंत्र्य नामधारी हिंदी संघराज्याच्या अंकित ठेवणे धोक्याचे ठरेल." हे वाचून बडोद्याचे महाराज व अन्य संस्थानांचे प्रतिनिधीही त्यांना भेटले. सर्वांना सावरकर आपले सैन्यबळ वाढवायला सुचवित होते, स्वतंत्र अस्तित्व टिकवायला सांगत होते. त्रावणकोर संस्थानाबाबतही सावरकरांची भुमिका काश्मीरप्रमाणेच होती. त्रावणकोरचे दिवान सी. पी. रामस्वामी अय्यर यांनीही त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात सामील करण्यास विरोध केला होता. ११ जुन १९४७ रोजी त्यांनी त्रावणकोरचे स्वातंत्र्यही घोषित केले. हे वृत्त समजताच सावरकरांनी त्यांना लिहिले, "अखंड हिंदुस्तानच्याच हिताच्या दृष्टीने त्रावणकोर हे स्वतंत्र हिंदू संस्थान ठेवण्याच्या तुमच्या नि महाराजांच्या दूरदृष्टीच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. निज़ामाने त्याच्या स्वातंत्र्याची घोषणा पुर्वीच केली असून इतर मुसलमान संस्थानिकही तसेच करण्याची शक्यता आहे. हिंदू संस्थानिकांनी तात्काळ एकत्र येवून आपले सैनिकी सामर्थ्य बळकट करून बाहेरुन येणा-या हिंदूविरोधी आक्रमकांचा प्रतिकार करण्यास आणि आतून होणारा विश्वासघात नष्ट करण्यास सिद्ध व्हावे. हिंदुविरोधी नेत्यांच्या हाताखाली काम करनारी सध्याची घटना समिती हिंदू जगताचा विश्वासघात करून मुस्लिमांचा आणखी मागण्या मान्य करण्याची शक्यता आहे." (जुलै ४७). ही आणि इतर अशी अनेक उदाहरणे पाहता सावरकर अखंड नव्हे तर केवळ हिंदू संस्थानिकांचा विखंडित स्वतंत्र भारत अपेक्षित होते असे म्हणता येणार नाही काय?

शिवाय त्यांच्या हिंदू महासभेने मुस्लिम लीगशी युती करुन सिंध, नोर्थ-वेस्ट फ्रंटियर व बंगाल प्रांतात सरकारे स्थापन केली. (१९३७). मार्च १९४३ मध्ये सिंध प्रांत सरकारने पाकिस्तान स्थापनेचा ठराव केला. या ठरावाला वरकरंणी विरोध केला तरी हिंदू महासभेच्या एकाही मंत्र्याने राजीनामा दिला नाही हे काय दर्शवते? दुर्दैवाने नेमके हे तिनही भाग आजच्या पाकिस्तान व बांगला देशात आहेत.

बरे, त्यांच्या विज्ञानवादाबद्दल व जातीभेद निर्मुलनाबद्दल बोलावे तर सावरकर म्हणतात "आपले सामाजिक बीज, रक्त, जातिजीवन नि परंपरा शुद्ध रहावी, संकराने विकृत होऊ नये यासाठी त्या त्या काळच्या हिंदुधर्मियांनी हिंदुराष्ट्राच्या हिताच्याच बुद्धीने ही जन्मजात जातिभेदाची प्रथा निर्मिली किंवा स्वयंप्रेरनेने निर्मु दिली..." (सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, शेषराव मोरे, पृष्ठ ९५) हे वंशवादी भेदात्मक विधान करणारे सावरकर विज्ञाननिष्ठ होते असे कसे म्हणता येईल? खरे तर त्यांच्या विज्ञानवादी म्हणवल्या जाणा-या विधानांत मिथ्या-विज्ञानवादच अधिक झळकतो हे कोणत्याही सुजाण वाचकाच्या सहज लक्षात येईल.

महात्मा गांधींच्या हत्येच्या कटातील सहभागाच्या आरोपातुन पुरेशा पुराव्यांच्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली असल्याने त्याबाबत त्यांना अजुनही दोषी मानने चूक असले तरी जनमानसात अजुनही शंकेचे सावट आहे हेही नाकारता येणार नाही.

भारतरत्न हा पुरस्कार एखाद्या क्षेत्रात अलौकीक कामगिरी करत देशाच्या लौकिकात भर घालणा-या व्यक्तीस देण्यात यावा असा संकेत आहे. वरील सर्व बाजुंचा विचार केला तर सावरकर हे त्यात कोठे बसतात याचे परिक्षण करवे लागेल.

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...